क्रिकेट - २

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in क्रिडा जगत
5 Jan 2017 - 2:11 pm

मिपाच्या नवीन आरेखनात क्रिकेटचा पहिला धागा अदृश्य झाला आहे. तो धागा शोधून त्यात प्रतिसाद लिहिला तरी मुख्य पानावर किंवा नंतरच्या पानांवर तो धागा दिसतच नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरू करीत आहे.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

5 Jan 2017 - 2:48 pm | श्रीगुरुजी

नवीन धाग्याची सुरूवात खालील बातम्यांनी करीत आहे.

(१) महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्यांचे व ट-२० सामन्यांचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. २००७ मध्ये द्रविडने भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्यावर एकदिवसीय व ट-२० सामन्यांसाठी धोनीला कर्णधार करण्यात आले होते. कसोटी संघाचे कर्णधारपद अनिल कुंबळेकडे सोपविण्यात आले होते. कुंबळेने २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या मालिकेतील तिसर्‍या सामन्यात अचानक निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यावर कसोटी संघाचेही कर्णधारपद धोनीकडे आले. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने खालीलप्रमाणे महत्त्वाची कामगिरी केली.

- २००७ मध्ये द. आफ्रिकेतील पहिल्या ट-२० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद
- ऑस्ट्रेलियात २००८ मध्ये झालेल्या तिरंगी व्हीबी मालिकेत (श्रीलंका, ऑस्ट्रेलिया व भारत) अंतिम फेरीतील ३ सामन्यांपैकी प्रथम २ सामन्यात विजय मिळवून या स्पर्धेचे प्रथमच विजेतेपद मिळविले.
- २०११ मध्ये भारतात झालेल्या १० व्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद
- भारतात झालेल्या कसोटी मालिकांमध्ये २०१२ मधील इंग्लंडविरूद्धची मालिका वगळता इतर सर्व पाहुण्या संघांविरूद्ध मालिका जिंकल्या. मात्र भारतात पाहुण्या संघांविरूद्ध झालेल्या सर्व एकदिवसीय मालिका जिंकण्यात भारताला अपयश आले. मागील वर्षी आफ्रिकेविरूद्ध २-३, त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरूद्ध २-४, २०१३ मध्ये पाकिस्तानविरूद्ध १-२ अशा काही मालिका भारताने गमावलेल्या आहेत. नुकत्याच संपलेल्या न्यूझीलंडविरूद्धची ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुद्धा भारताने ३-२ अशी काठावर जिंकली. २०१२ मध्ये पुन्हा एकदा व्हीबी मालिकेत श्रीलंका व ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यात अपयश आले होते. २०११ मधील इंग्लंडमध्ये झालेल्या ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुद्धा भारत १-३ असा हरला. मात्र २०१४ मध्ये कसोटी मालिका गमावल्यानंतर सुद्धा भारताने एकदिवसीय मालिका ३-१ अशी जिंकली.
- २०१४ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चँपियन्स ट्रॉफीचे विजेतेपद
- २०११ मध्ये भारत प्रथमच कसोटी वर्गवारीत प्रथम क्रमांकावर पोहोचला
- २०१५ मधील ११ व्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश

भारतातील जवळपास सर्व कसोटी मालिलेत भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली विजय मिळविला. परंतु परदेशात याच भारतीय संघाचा अत्यंत दारूण पराभव झाला. २०११ मध्ये विश्वचषक संपल्यानंतर झालेल्या इंग्लंडमधील ४ कसोटींच्या मालिकेत भारताचा ०-४ असा पराभव झाला. त्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेत भारताचा पुन्हा एकदा ०-४ असा पराभव झाला. भारताने परदेशात २००९ मध्ये फक्त न्यूझीलंडविरूद्धची मालिका जिंकली. बाकी जवळपास सर्व संघाविरूद्ध परदेशात भारताला मालिका जिंकण्यात अपयश झाले. २०१४ मध्ये पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये ५ कसोटींच्या मालिकेत भारताची १-३ अशी हार झाली. विशेषतः त्या मालिकेत भारताचा ४ थ्या कसोटीतील दुसरा डाव व ५ व्या कसोटीतील दोन्ही डाव जेमतेम ३ तासात ४५ षटकांच्या आतच संपले होते. २०१४-१५ मध्ये भारत ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर असताना पहिल्या कसोटीत जायबंदी असल्याने धोनी संघात नव्हता. त्यामुळे कोहलीने नेतृत्व केले. कोहलीने दोन्ही डावात शतक करूनसुद्धा भारत सामना हरला. नंतर दुसर्‍या कसोटीत धोनीच्या नेतृत्वाखाली भारताची हार झाली. तिसरी कसोटी सुरू असताना धोनीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून धक्का दिला. ती मालिका भारत ०-२ असा हरला. नंतर लगेचच ११ व्या विश्वचषक स्पर्धेत भारताने अनपेक्षितरित्या चांगली कामगिरी करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला होता. परंतु उपांत्य फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.

धोनी एकदिवसीय सामन्यात व ट-२० सामन्यात आक्रमक कर्णधार म्हणून ओळखला जातो. परंतु कसोटी सामन्यात मात्र तो खूपच बचावात्मक डावपेच वापरायचा. कसोटी सामन्याचे नेतृत्व करताना त्याची आक्रमकता कोठेतरी हरविल्यासारखे वाटायचे. सामना जिंकायची संधी असताना बचावात्मक खेळ करायला सांगून सामना अनिर्णित ठेवण्याकडे त्याचा कल दिसायचा.

आपण २०१९ ची विश्वचषक स्पर्धा खेळणार असे त्याने पूर्वीच सांगितले होते. परंतु कर्णधारपद सोडण्याच्या त्याच्या निर्णयामुळे तो बहुतेक निवृत्तीचा विचार करीत असावा असं दिसतंय. तो बहुतेक याच वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेईल असा माझा अंदाज आहे. मॅचफिनिशर हा त्याचा लौकिक अनेक वर्षे होता. परंतु गेल्या १-२ वर्षांपासून त्याने बर्‍याच वेळा निराशा केली आहे. त्याची फलंदाजीतील आक्रमकताही कमी झाली आहे. आयपीएल स्पर्धेत तब्बल ८ वर्षे तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार होता. ८ वर्षात त्याच्या संघाने तब्बल ५ वेळा अंतिम फेरीत प्रवेश करून २ वेळा विजेतेपद मिळविले होते. परंतु या संघावर मॅचफिक्सिंगचे मोठ्या प्रमाणावर आरोप होऊन त्यात तथ्य असल्याचे सिद्ध झाल्यावर त्या संघावर २ वर्षे बंदी घालण्यात आल्यामुळे तो आता पुणे संघात आला. परंतु त्याच्या नेतृत्वाखालील पुणे संघाची कामगिरी अत्यंत वाईट झाली. एकंदरीत ८ वर्षे ज्या संघाबरोबर होतो त्या संघाशी नाते तुटल्याचे त्याला फारसे भावले नसावे. मॅचफिक्सिंगची व बेकायदेशीर बेटिंगची माहिती असूनही तो गप्प राहिले असेही आरोप त्याच्यावर झाले. एकंदरीत त्याचा क्रिकेटमधील रस कमी झाल्याचे दिसत होतेच. आयपीएलमधूनही तो एखादे वर्ष खेळून बाहेर पडेल असं वाटतंय.

भारताला लाभलेल्या काही महान कर्णधारांमध्ये त्याचा समावेश आहे. त्याचे यष्टीरक्षणही अत्यंत उत्कृष्ट आहे. त्याच्याइतका चपळ यष्टीचित करणारा दुसरा यष्टीरक्षक कोणत्याही संघाकडे नाही. तसा अजून तो ३-४ वर्षे सहज खेळू शकेल. परंतु आता त्याने ग्लोव्हज, पॅड्स व बॅट कायमस्वरूपी बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतोय असं वाटतंय.

श्रीगुरुजी's picture

5 Jan 2017 - 3:30 pm | श्रीगुरुजी

(२) ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी डेव्हिड वॉर्नरने फक्त ७८ चेंडूत पहिल्याच सत्रात उपाहारापूर्वी शतक ठोकण्याचा पराक्रम केला. सामन्यात उपाहारापूर्वी (किंवा २ तासांच्या एका सत्रात) शतक करणारा तो जगातील ५ वा फलंदाज. यापूर्वीची कामगिरी खालीलप्रमाणे -

- ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टर ट्रंपरने १९०२ मध्ये इंग्लंडमधील मँचेस्टर येथील कसोटीत उपाहारापूर्वी १०३ धावा केल्या होत्या.
- ऑस्ट्रेलियाच्या चार्ली मॅकार्टने १९२६ मध्ये इंग्लंडमध्ये लीड्स येथे उपाहारापूर्वी ११२ धावा केल्या होत्या.
- डॉन ब्रॅडमनमे १९३० इंग्लंडमधील हेडिंग्लेमध्ये मध्ये तर एका दिवसात त्रिशतक केले होते. त्यात त्याने दिवसाच्या तीनही सत्रात एकेक शतक केले होते. पहिल्या सत्रात त्याने १०५ धावा केल्या होत्या.
- पाकिस्तानच्या मजीदखानने १९७६ मध्ये कराची येथे न्यूझीलंडविरूद्ध उपाहारापर्यंत नाबाद १०८ धावा केल्या होत्या.

भारताच्या फारूख इंजिनिअरने १३ जानेवारी १९६७ या दिवशी विंडीजविरूद्ध मद्रास येथील कसोटी सामन्यात इंजिनिअर सलामीला आला. विंडीजकडे वेस्ली हॉल व चार्ल्स ग्रिफिथ असे तुफानी गोलंदाज होते. भारताची फलंदाजी सुरू झाल्यावर इंजिनिअरने विंडीजच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढविला. खेळाचा पहिला तास संपला तेव्हा भारताची धावसंख्या १२ षटकात नाबाद ७२ अशी होती. त्यात फारूखचा वाटा नाबाद ५७ धावांचा होता. हॉल ६ षट्कात ३५ व ग्रिफिथ ६ षटकात ४६ अशी धुलाई झाली होती. उपाहारापूर्वी दोन षटकांचा खेळ शिल्लक असताना इंजिनिअर ९२ वर नाबाद होता. शेवटून दुसर्‍या षटकाचा पहिला चेंडू इंजिनिअरने एक उसळता चेंडू फारूखने हूक केला. परंतु तो चेंडू डीप स्क्वेअर लेगवर रोहन कन्हाईने अतिशय चपळाईने अडविल्यामुळे त्याला एकच धाव मिळाली. दुर्दैवाने त्या षटकाचे पुढील ५ चेंडू दिलीप सरदेसाईने निर्धाव खेळून काढले. शेवटचे षटक सुरू होताना पुन्हा एकदा इंजिनिअर स्ट्राईकवर होता. त्याने पुन्हा एकदा पहिला चेंडू जोरदार ड्राईव्ह केला. परंतु तो सुद्धा अडविला गेल्याने इंजिनिअरला फक्त १ धाव मिळून तो ९४ वर पोहोचला. पुन्हा एकदा दुर्दैवाने त्या षटकाचे पुढील ५ चेंडू दिलीप सरदेसाईने निर्धाव खेळून काढले व उपाहार होताना इंजिनिअर ९४ वर नाबाद राहिला व एका विक्रमापासून दूर राहिला. त्यावेळी भारताची धावसंख्या नाबाद १२५ होती. उपाहारानंतर काही वेळाने तो १०९ वर बाद झाला. त्यात त्याने १८ चौकार मारले होते.

१० जून २००६ या दिवशी भारत वि. वेस्ट इंडीज यांच्यातील सेंट ल्युसिया येथील कसोटी सामन्यात वीरेंद्र सेहवागने जोरदार फटकेबाजी करताना उपाहारापूर्वीच नाबाद ९९ धावा केल्या होत्या. शतक पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ १ धाव कमी पडली होती.

तुषार काळभोर's picture

5 Jan 2017 - 4:55 pm | तुषार काळभोर

आज मुंबईने तमिळनाडूला रणजीच्या उपांत्य सामन्यात हरवलं>
हायलाईट ठरला तो किशोरवयीन पॄथ्वी शॉ. रणजी पदार्पणात शतक ठोकलं!

चावटमेला's picture

5 Jan 2017 - 11:22 pm | चावटमेला

कप्तान धोनी पेक्षा बॅट्समन धोनी जास्त आवडायचा. त्याचा नैसर्गिक आक्रमकपणा आताशा कुठेतरी हरवल्यासारखा वाटत होता. विंडिज विरुद्ध्च्या फ्लोरिडातील टी-२० सामन्यात तर हद्द झाली, शेवटच्या षटकात फक्त सात धावा हव्या होत्या आणि दस्तुरखुद्द धोनी क्रीझ वर असून सुद्धा आपण सामना हरलो. असो, अजूनही कप्तान म्हणून दादा लाच आमच्या मनात वरचे स्थान आहे

श्रीगुरुजी's picture

14 Jan 2017 - 3:46 pm | श्रीगुरुजी

गुजरातने मुंबईला रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत नमवून प्रथमच रणजी करंडक जिंकला. ३१२ धावांचा पाठलाग करताना पार्थिव पटेलने १४३ धावा करून मोलाची कामगिरी बजाविली. पहिल्या डावातही त्याने ९० धावा केल्या होत्या. ही स्पर्धा यावर्षी प्रथमच त्रयस्थ मैदानांवर खेळली गेली.

श्रीगुरुजी,

तुम्हाला खुशखबर. पाचव्या दिवशी पाकला जिंकायला १८८ हव्या असतांना ३ बाद ३५ वर एकदम त्यांचे दोघे बाद झाले. लवकरच उपाहार संपून दुसरं सत्र सुरू होईल. जरूर बघा : http://www.espncricinfo.com/west-indies-v-pakistan-2017/engine/match/107...

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

4 May 2017 - 10:22 pm | गामा पैलवान

उपाहारपश्चात दुसऱ्याच चेंडूवर आजूनेक गचकला. ३५/६.
-गा.पै.

गामा पैलवान's picture

4 May 2017 - 11:26 pm | गामा पैलवान

अभिदेश's picture

4 May 2017 - 11:37 pm | अभिदेश

८१ /१० ..पाकडे पराभूत..

गामा पैलवान's picture

4 May 2017 - 11:39 pm | गामा पैलवान

१०६ धावांच्या विजयाबद्दल वेस्टिंडिजचं अभिनंदन.
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

1 Jun 2017 - 2:22 pm | श्रीगुरुजी

आजपासून चॅम्पियन्स ट्रॉफी ही एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा इंग्लंडमध्ये सुरू होत आहे. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीनुसार असलेल्या पहिल्या ८ संघांचा समावेश आहे. दुर्दैवाने वेस्ट इंडिज ९ व्या क्रमांकावर असल्याने त्यांचा या स्पर्धेत समावेश नाही. त्यांच्याऐवजी बांगलादेश स्पर्धेत आहे. किंबहुना बांगला जागतिक क्रमवारीत पाकडे व श्रीलंकेच्या पुढे ६ व्या क्रमांकावर आहेत.

प्रत्येकी ४ देशांचे दोन गट केलेले असून दोन्ही गटातील सर्व देश आपापल्या गटातील उर्वरीत देशांशी सामने खेळतील. दोन्ही गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीत असतील. स्पर्धेत एकूण १५ सामने खेळले जातील.

स्पर्धेतील फक्त २ सामने भा. प्र. वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता सुरू होतील. उर्वरीत १३ सामने दुपारी ३ वाजता सुरू होतील. आज इंग्लंड वि. बांगलादेश हा पहिला सामना दुपारी ३ वाजता सुरू होईल. इंग्लंड अत्यंत उत्सुकतेने या सामन्याची वाट पहात असेल कारण २००७ व २०११ या दोन्ही विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला बांगलाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाचे उट्टे काढण्याची आज संधी आहे.

भारताचे सामने - रविवार ४ जून दुपारी ३ वाजता पाकड्यांविरूद्ध, गुरूवार ८ जून दुपारी ३ वाजता श्रीलंकेविरूद्ध व रविवार ११ जून दुपारी ३ वाजता द. आफ्रिकेविरूद्ध - असतील.

या स्पर्धेत इंग्लंड, आस्ट्रेलिया, भारत व द. आफ्रिका हे संघ उपांत्य फेरीत असतील व इंग्लंड किंवा द. आफ्रिका विजेते होतील असा माझा अंदाज आहे.

पाऊस येणार हे नक्की असलेल्या काळात स्पर्धा कशाला ठेवतात, त्यामुळे विरस होतो. बघुया किती सामने खरेच होतात... डलू पद्धतीने निकाल लागणे पटत नाही.

श्रीगुरुजी's picture

1 Jun 2017 - 6:44 pm | श्रीगुरुजी

बांगलाने तब्बल ३०५ धावा केल्यात. आता इंग्लिश फलंदाजांची कसोटी आहे.

श्रीगुरुजी's picture

1 Jun 2017 - 10:50 pm | श्रीगुरुजी

इंग्लंडने १६ चेंडू व ८ गडी राखून अगदी सहज सामना जिंकून मागील दोन विश्वचषक स्पर्धेतीत पराभवाचा बदला घेतला.

आता उद्या ३ वाजता किवीज वि. कांगारू.

श्रीगुरुजी's picture

2 Jun 2017 - 4:37 pm | श्रीगुरुजी

किवींनी वेगवान सुरुवात करून ९.३ षटकांत १ बाद ६७ धावा केल्यानंतर दुर्दैवाने पावसाने खेळ थांबला आहे.

श्रीगुरुजी's picture

3 Jun 2017 - 3:05 pm | श्रीगुरुजी

काल दुर्दैवाने ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड यांच्यातील सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघांना १ गुण मिळाला. त्यामुळे आता इंग्लंडची अडचण झाली आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड व इंग्लंड हे तीनही संघ बांगलाविरूद्ध जिंकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत जाण्यासाठी इंग्लंडला ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड या दोन संघातील किमान एका संघाला हरवावेच लागेल. इंग्लंडमधील पावसाचे वातावरण बघता न्यूझीलँड किंवा ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडविरूद्धचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला तर त्याचा इंग्लंडला फटका बसेल व त्यांना उर्वरीत सामना जिंकावाच लागेल.

काल न्यूझीलँडने जोरदार फलंदाजी करूनही त्यांना शेवटी माती खावी लागली. ३ बाद २५४ अशा जोरदार परिस्थितीतून सर्वबाद २९१ अशी वाईट अवस्था त्यांच्या पदरी आली. अर्थात नंतर ऑस्ट्रेलियाचीही ९ षटकात ३ बाद ५३ अशी वाईट अवस्था होती. त्यामुळे दोन्ही संघांना समान संधी होती.

आज ३ वाजता द. आफ्रिका वि. श्रीलंका हा सामना आहे. श्रीलंकेचा सध्याचा संघ अत्यंत दुर्बल आहे. मागील २ वर्षात दिलशान, जयवर्धने, संगक्कारा असे श्रीलंकेचे ३ प्रमुख फलंदाज निवृत्त झाले. अँजेलो मॅथ्यूज अत्यंत नाईलाजाने नेतृत्व करीत आहे. मलिंगा कधी असतो तर कधी नसतो. मुथय्य मुरलीधरननंतर रंगना हेराथने फिरकी गोलंदाजीची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. परंतु तो आता जवळपास निवृत्त झाल्यासारखाच आहे. त्यांचे नवीन खेळाडू फारसे चांगले नाहीत.

श्रीगुरुजी's picture

4 Jun 2017 - 2:50 pm | श्रीगुरुजी

३ वाजता भारत वि. पाकडे हा सामना सुरू होत आहे. पाकड्यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. सामना व्यवस्थित पूर्ण झाला तर भारत जिंकणार हे नक्की आहे.

काल अपेक्षेप्रमाणे श्रीलंका हरले. खरं तर श्रीलंकेने बर्‍यापैकी गोलंदाजी करून आफ्रिकेला २९९ वर म्हणजे ३०० च्या आतच रोखले होते. फलंदाजी सुरू केल्यानंतर डिकवेला व थरंगा या श्रीलंकेच्या सलामीच्या जोडीने आफ्रिकेच्या पोटात गोळा आणला होता. १० षटकानंतर श्रीलंका १ बाद ८७ अशा भक्कम स्थितीत होते. सलामीच्या दोन्ही फलंदाजांनी, विषेषतः डिकवेलाने, चौफेर टोलेबाजी करून वेगवान धावा केल्या होत्या. परंतु नंतर आफ्रिकेच्या गोलंदाजांन हळूहळू स्थिती नियंत्रणात आणली. ताहिरने टिच्चून गोलंदाजी करून ४ बळी घेतले. एबीडी फलंदाजीत अपयशी ठरला. परंतु त्याने एक एक उत्कृष्ट झेल व एक अशक्यप्राय धावबाद करून विजयात मोलाचा हातभार लावला. शेवटी श्रीलंकेला जेमतेम १९२ पर्यंत मजल मारता आली.

श्रीगुरुजी's picture

4 Jun 2017 - 11:34 pm | श्रीगुरुजी

मस्त जिंकलो. मजा आली.

काय मजा आली? एकदम सपक झाला सामना. पाकिस्तानशी भारताने क्रिकेट खेळू नये या मागणीला माझा एका वेगळ्या कारणाने पाठिंबा आहे. कारण हल्ली पाकिस्तानशी खेळताना भारत लैच आरामात जिंकतो. गेले ते दिवस, गेली ती चुरस! त्या सर्फराजला सामना हरल्यापेक्षा इंग्रजीत बोलायचे जास्त टेन्शन आल्याचे दिसत होते. मला लय वाईट वाटलं. कुठे तो मुशर्रफ जो भारतीयांपेक्षा पाकिस्तान्यांचे इंग्रजी जास्त फ्लूएंट आहे असा बाता मारायचा आणि कुठे ही आजची पाकिस्तान्यांची टीम! आपले क्षेत्ररक्षण अतिशय सुमार झाले आज. अपवाद जडेजाने केलेली अफलातून फेकी. आणि युवराजला दणादण फटके हाणताना बघून व्हिन्टेज युवराज आठवला.

आता दक्षिण आफ्रिकेशी जरा जास्त रंगतदार सामना व्हावा ही इच्छा.

श्रीगुरुजी's picture

5 Jun 2017 - 2:19 pm | श्रीगुरुजी

खरं आहे. अगदीच एकतर्फी सामना झाला. गेल्या काही वर्षांपासून भारताचे श्रीलंका, विंडीज व पाकड्यांविरूद्धचे सामने अगदीच एकतर्फी होत आहेत. श्रीलंका व विंडीजचे संघ दुर्बल होण्यामागची परिस्थिती समजण्यासारखी आहे. परंतु पाकड्यांची परिस्थिती वेगळी आहे. दहशतवाद्यांना अधिकृत पाठिंबा देऊन त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. जानेवारी २००९ पासून फक्त एकदा झिंबाब्वेचा अपवाद वगळता इतर सर्व देशांच्या संघाने पाकिस्तानमध्ये पाऊल ठेवलेले नाही. भारताबरोबरील द्विपक्षीय मालिका केव्हाच बंद झाल्या आहेत. भारत पाकिस्तानबरोबर फक्त मोजक्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळतो. आता तर अफगाणिस्ताननेसुद्धा पाकिस्तानबरोबर सामना खेळायला नकार दिला आहे. एकंदरीत पाकिस्तानी संघाला फारसे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला मिळत नसल्याने संघाची दुरावस्था झाली आही.

आज संध्याकाळी ६ पासून ऑस्ट्रेलिया वि. बांगला हा सामना आहे. अर्थातच ऑस्ट्रेलिया अगदी सहज सामना जिंकेल. यदाकदाचित बांगलाने ऑस्ट्रेलियाला हरविले तर मात्र ऑस्ट्रेलिया प्रचंड अडचणीत येईल.

गामा पैलवान's picture

6 Jun 2017 - 11:22 am | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

पाक क्रिकेटची पार वाट लागल्याने तिथल्या खेळाडूंनी वेस्टिंडीज, हॉलंड, क्यानडा, इत्यादी देशाकडून खेळावे.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

6 Jun 2017 - 2:45 pm | श्रीगुरुजी

कालचा ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश हा सामना पावसामुळे अनिर्णित अवस्थेत संपल्याने दोन्ही संघांना १-१ गुण मिळाला. ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलँड विरूद्धचा पहिला सामनाही पावसाने अनिर्णित राहिला होता. अर्थात पहिला सामना पावसाने धुवुन नेल्यामुळे ऑस्ट्रेलियाला हायसे वाटले असणार कारण न्यूझीलँडच्या ४६ षटकातील २९२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया ९ षटकांत ३ बाद ५३ अशा अडचणीत सापडले होते. परंतु कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय नक्की असताना जेमतेम ४ षटकांचा खेळ कमी पडला व ऑस्ट्रेलियापासून विजय दूर राहिला.

आता त्या गटात ऑस्ट्रेलियाचे २ सामन्यात २ गुण असून फक्त इंग्लंडविरूद्धचा सामना शिल्लक आहे. ऑस्ट्रेलियाला कोणत्याही परिस्थितीत उर्वरीत सामना जिंकावाच लागेल.

न्यूझीलँडने १ सामन्यात एकच गुण मिळविला असून त्यांचे बांगला व इंग्लंडविरूद्धचे सामने शिल्लक आहेत. त्यातील इंग्लंडविरूद्धचा सामना आज ३ वाजता खेळला जाईल. न्यूझीलँडला देखील हे दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्यांना दोन्ही सामन्यातून किमान ३ गुण मिळवावे लागतील.

बांगलाचे दोन सामन्यातून १ गुण असून त्यांचा अजून न्यूझीलँडविरूद्धचा सामना शिल्लक आहे. न्यूझीलँडला हरविले तर बांगलाला अजूनही अंधुकशी संधी आहे.

इंग्लंडला देखील न्यूझीलँड व ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यातील किमान एक सामना जिंकावाच लागेल.

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2017 - 6:08 pm | श्रीगुरुजी

काल इंग्लंडने मोठ्या फरकाने सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

आता त्या गटात प्रचंड चुरस आहे. ऑस्ट्रेलियाचे २ गुण असून निव्वळ धावगती ०.० आहे (दोन्ही सामने पावसामुळे अनिर्णित राहिल्यामुळे). त्या खालोखाल बांगला व न्यूझीलँड या दोन्ही संघांचा प्रत्येकी १ गुण असून बांगलाची निव्वळ धावगती न्यूझीलँडपेक्षा चांगली आहे.

सर्व चार संघांचा प्रत्येकी एक सामना शिल्लक आहे. इंग्लंड विरूद्धचा सामना ऑस्ट्रेलियाला जिंकावाच लागेल. तो सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर ऑस्ट्रेलियाचे सुद्धा ४ गुण होऊन त्यांचा अंतिम फेरीत प्रवेश नक्की होईल.

जर ऑस्ट्रेलिया तो सामना हरले तर न्यूझीलँड वि. बांगला या सामन्यातील विजेता उपांत्य फेरीत जाईल. जर न्यूझीलँड वि. बांगला हा सामना अनिर्णित राहिला तर निव्वळ धावगतीच्या जोरावर बांगला किंवा ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत जाईल. त्यासाठी ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरूद्ध खूप कमी फरकाने हरावे लागेल.

जर इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया आणि बांगला वि. न्यूझीलँड हे दोन्ही सामने अनिर्णित राहिले तर निव्वळ धावगतीच्या जोरावर बांगला उपांत्य फेरीत जाईल.

म्हणजेच अजूनही उर्वरीत ३ संघांना समान संधी आहे.

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2017 - 7:38 pm | श्रीगुरुजी

Africa is in deep trouble against pakistan (90/4 in 22.2 overs).

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2017 - 2:59 pm | श्रीगुरुजी

आफ्रिकन्स काल मूर्खासारखे पाकड्यांविरूद्ध हरले. पावसाचा अंदाज असूनसुद्धा आणि नाणेफेक जिंकूनसुद्धा प्रथम फलंदाजी करण्याचा चुकीचा निर्णय आफ्रिकेने घेतला. नंतर पाकड्यांनी चांगली गोलंदाजी करून आफ्रिकेला २१९ धावांवर रोखले होते. अशा वेळी गोलंदाजीसाठी रबाडाच्या बरोबरीने आपला सर्वोत्कृष्ट गोलंदाज मॉर्नी मॉर्केलला गोलंदाजीसाठी आणण्याऐवजी त्यांनी स्वैर मारा करणार्‍या पार्नेलला आणले. पार्नेलने आपल्या पहिल्या २ षटकात अत्यंत स्वैर गोलंदाजी करून भरपूर धावा दिल्या. नंतर मॉर्केलला आणल्यावर त्याने लगेचच एका षटकात दोन बळी घेतले. परंतु तेव्हा थोडासा उशीर झाला होता. नंतर ताहिर चांगली गोलंदाजी करीत असताना त्याच्या बरोबरीने दुसरा फिरकी गोलंदाज ड्युमिनीला आणण्याऐवजी गोलंदाजी सातत्याने रबाडा, मॉर्केल व मॉरिसला दिली गेली. काही वेळाने पुन्हा एकदा पार्नेलला आणले. शेवटी पावसाने पुढे खेळ न झाल्याने डकवर्थ-लुईस च्या टेबलनुसार पाकड्यांनी विजयी घोषित केले गेले.

आता आफ्रिकेची पंचाईत झाली आहे. त्यांचा शेवटचा सामना बलाढ्य भारताबरोबर आहे. तो सामना त्यांना जिंकलाच पाहिजे. अन्यथा श्रीलंकेने पाकड्यांना हरवावे अशी प्रार्थना करत त्यांना बसावे लागेल.

आज ३ वाजता भारत वि. श्रीलंका हा सामना आहे. आजही पावसाचा अंदाज आहे. बलाढ्य भारतासमोर श्रीलंकेचे काहीही चालणार नाही. सामना पूर्ण झाला तर भारत अगदी सहज हा सामना जिंकेल. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे.

Ujjwal's picture

8 Jun 2017 - 10:59 pm | Ujjwal

भारत ७ विकेट्सनी हारला

दशानन's picture

8 Jun 2017 - 4:44 pm | दशानन

भारताची चांगली पकड
127/0 24 ओव्हर!
325+ अपेक्षा आहे आज.

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2017 - 11:00 pm | श्रीगुरुजी

लंकेकडून लाजिरवाणा पराभव ¿

अभिजीत अवलिया's picture

9 Jun 2017 - 8:59 am | अभिजीत अवलिया

ब गटात फार चुरस वाढलेली आहे आता. पाकिस्तान श्रीलंकेला हरवून उपांत्य फेरीत जाईल असे वाटतेय. तुलनेत आपली परिस्थिती कठीण आहे. दक्षिण आफ्रिका आपल्यापेक्षा बलाढ्य आहे.

अद्द्या's picture

9 Jun 2017 - 10:48 am | अद्द्या

घा ण
होती कालची मॅच .. आता आफ्रिकेला हरवलं तरच काही तरी होईल

उपेक्षित's picture

9 Jun 2017 - 11:30 am | उपेक्षित

अतिशय सुंदर मॅच झाली कालची श्रीलंका deserve the win अतिशय योजनाबध्ह खेळ केला श्रीलंकन batsman ने,
अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे मला वयक्तिक कालची मॅच हरली बरे झाले असे वाटत आहे कारण मध्ये गेले काही दिवस कुल वाटत असलेला विराट परत आता थोडा मग्रूर वाटत आहे खास करून पाक विरुध्द च्या सामन्यात युवराज कडून एक मिस्फिल्ड झाली तर या बहाद्दराने त्याला बहुतेक शिवी वगेरे दिली निदान त्याचा वयाचा अनुभवाचा मान ठेवणे गरजेचे होते,
त्याच प्रमाणे बरेच भारतीय खेळाडू विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना थोडे दबलेले, झाकोळलेले वाटत आहे, इथे धोनीसारख्या संयमाची अपेक्षा आहे कोह्लीकडून कारण अति आक्रमकतेच्या नादापायी बर्याचदा सामन्यावरील पकड निसटून जाते.

जाता जाता - अजूनही संघ अडचणीत आला कि कोहली सारखा धोनीचा सल्ला मागताना दिसतो असे का बरे असावे ?

विशुमित's picture

9 Jun 2017 - 12:10 pm | विशुमित

विराट काल धीरज जाधव वर पण खेकसला. जाधव ची उलट प्रतिक्रिया बोलकी होती. नंतर बुम्बाराच्या गोलंदाजीवर जाधव कडून मिसफिल्ड होऊन चौकार गेला. त्यावेळेस पण विराट चे हावभाव नाही पटले.

त्याची आक्रमकता प्रतिस्पर्धी संघावर ठीक आहे पण स्व खेळाडूं बद्दल त्यांना संयम ठेवावा.

श्रीलंका खूपच नियोजन बद्ध खेळली. त्यांचे अभिनंदन. भारतीय संघाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा..!!

अद्द्या's picture

9 Jun 2017 - 12:13 pm | अद्द्या

कोहली सारखा धोनीचा सल्ला मागताना दिसतो असे का बरे असावे ?

किती म्हणलं तरी अनुभव कमी येतोच ना ? धोनीही सुरुवातीच्या दिवसात गांगुली सचिन द्रविड चे सल्ले घेताच होता .

विशुमित's picture

9 Jun 2017 - 12:41 pm | विशुमित

सांघिक प्रयत्न आणि विजय महत्वाचा. विनाकारण तुलना करण्याची खोड भारतीय लोक कधी सोडणार काय माहित.

अद्द्या's picture

9 Jun 2017 - 1:14 pm | अद्द्या

डब्यातले खेकडे आहोत आपण.. जात नाही ती सवय =]]

सल्ल्यासाठी आक्षेप नाहीये आणि तुलना तर नाहीच नाही तितकी maturity आता आली आहे (माझ्यात :) ) फ़क़्त जिंकताना स्वतः ला क्रेडीट घ्यायचे आणि हरताना मग पार शेवटच्या क्षणी अनुभवी लोकांकडे जायचे हे नाही पटत (या हिशेबाने खरे तर काल युवराज चे मत पण घ्यायला पाहिजे होते रादर त्याला बोलिंग पण द्यायला पाहिजे होती. )
असो जर तर ला खेळात अर्थ नसतो हेच खरे. बाकी विराट च्या ब्याटीन्ग चा मी चाहता आहे पण एक व्यक्ती म्हणून तो डोक्यात जातो इतकेच.

श्रीगुरुजी's picture

9 Jun 2017 - 2:55 pm | श्रीगुरुजी

दोन्ही गटात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. 'ब' गटात सर्व ४ संघांनी प्रत्येकी १ सामना जिंकला व १ सामना हरला आहे. पाकिस्तानने अनपेक्षितपणे आफ्रिकेला हरविले तर श्रीलंकेने जबरदस्त फलंदाजी करून भारताने रचलेला धावांचा डोंगर अगदी सहज पार केला. सर्व संघांचे प्रत्येकी २ सामने झाले असून प्रत्येकाचे २ गुण आहेत व प्रत्येक संघाचा एक सामना शिल्लक आहे.

'ब' गटातील उर्वरीत २ सामने - ११ जूनला भारत वि. आफ्रिका आणि १२ जूनला श्रीलंका वि. पाकडे - असे आहेत. प्रत्येक सामन्याचे ३ वेगवेगळे निकाल लागू शकतात. कोणताही १ संघ जिंकतो किंवा हरतो किंवा सामना अनिर्णित राहतो (सामना बरोबरीतही सुटु शकतो, पण तशी शक्यता अत्यल्प असते.). भारत वि. आफ्रिका या सामन्यात जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीत जाईल व हरलेला संघ स्पर्धेतून बाद होईल. जर हा सामना बरोबरीत सुटला किंवा अनिर्णित राहिला तर मात्र दोन्ही संघांचे ३ गुण होतील व त्यावेळी निव्वळ धावगती महत्त्वाची ठरेल. सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही संघांनी केलेल्या धावा निव्वळ धावगती मोजताना विचारात घेतल्या जातात. पण पाऊस किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सामना पूर्ण न होता अनिर्णित राहिला तर मात्र त्या सामन्यातल्या धावा निव्वळ धावगती मोजण्यासाठी धरल्या जात नाहीत. त्यामुळे भारत वि. आफ्रिका हा सामना अनिर्णित राहिला तर आधीच्या दोन सामन्यातील सरस धावगतीच्या जोरावर भारत आफ्रिकेच्या पुढे असेल.

श्रीलंका वि. बांगला या सामन्यातील विजेता उपांत्य फेरीत जाईल. जर तो सामना अनिर्णित राहिला किंवा बरोबरीत सुटला तर दोन्ही संघांचे ३ गुण होतील व श्रीलंकेची धावगती सरस असल्याने श्रीलंका पाकड्यांच्या पुढे असेल.

म्हणजे भारत व आफ्रिका या दोन्ही संघांना उपांत्य फेरीत यायचे असेल तर हे दोन्ही सामने अनिर्णित अवस्थेत सुटले पाहिजेत. अन्यथा भारत व आफ्रिका यापैकी १ संघ आणि श्रीलंका व पाकिस्तान यापैकी १ संघ उपांत्य फेरीत जाईल. एकंदरीत भारताला सुद्धा उपांत्य फेरीतील प्रवेश खूप अवघड आहे.

दुसरीकडे 'अ' गटात इंग्लंडने आपले पहिले दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सामने अनिर्णित राहिल्याने त्यांच्याकडे २ गुण आहेत व निव्वळ धावगती ०.०० आहे. न्यूझीलँड व बांगलाचे प्रत्येकी दोन सामन्यात १ गुण असून निव्वळ धावगती सर्वात कमी असल्याने न्यूझीलँड या गटात तळाला आहे. आता न्यूझीलँड वि. बांगला आणि इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया हे दोन सामने शिल्लक आहेत. न्यूझीलँड वि. बांगला या सामन्यातील विजेत्याचे ३ गुण होतील. सामना बरोबरीत सुटला किंवा अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांचे प्रत्येकी २ गुण होतील. त्यामुळे उपांत्य फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ कोणता हे ठरण्यासाठी इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया हा सामना पूर्ण होण्याची वाट पहावी लागेल. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला हरविले तर तेच उपांत्य फेरीत जातील. जर ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला तर न्यूझीलँड वि. बांगला या सामन्यातील विजेता उपांत्य फेरीत जाईल किंवा जर तो सामना अनिर्णित राहिला/बरोबरीत सुटला तर या तिन्ही संघातील सरस धावगती असलेला संघ उपांत्य फेरीत जाईल. एकंदरीत परिस्थिती बघता त्यातल्या त्यात ऑस्ट्रेलियालाच जास्त आशा आहेत.

आज ३ वाजता न्यूझीलँड वि. बांगला हा सामना आहे. न्यूझीलँडसाठी वाईट बातमी आहे. पावसामुळे आजचा सामना वेळेवर सुरू होणार नाही. पंच ३:१५ वाजता खेळपट्टीची पाहणी करून पुढील निर्णय घेणार आहेत.

श्रीगुरुजी's picture

9 Jun 2017 - 3:24 pm | श्रीगुरुजी

आनंदाची बातमी. आजचा सामना उशीरा ४ वाजता सुरू होणार असून पूर्ण ५० षटकांचा होणार आहे.

अभिजीत अवलिया's picture

10 Jun 2017 - 9:07 am | अभिजीत अवलिया

धक्कादायक निकाल लावण्याची परंपरा बांग्लादेशने कायम ठेवली.

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2017 - 2:22 pm | श्रीगुरुजी

मागील ३ सामने फारच वाईट गेले. तीनही सामन्यात नको असलेलाच संघ जिंकला व त्यामुळे मुख्य संघांची खूप अडचण झाली आहे.

या तीनही सामन्यात काही समान गोष्टी आहेत. तीनही सामने तुलनेने दुर्बल संघांनी धावांचा पाठलाग करून जिंकले. तीनपैकी दोन सामन्यात नाणेफेक जिंकूनसुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा चुकीचा निर्णय प्रबळ संघाने घेतला. विशेषतः पावसाची शक्यता असूनसुद्धा नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करणे हा चुकीचा निर्णय होता. तीनही सामन्यात सुरवातीचे बळी झटपट मिळूनसुद्धा प्रतिस्पर्धी संघाच्या मधल्या फळीने टीच्चून फलंदाजी करून सामना जिंकून दिला.

कालच्या पराभवाने न्यूझीलँड स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. नाणेफेक जिंकूनसुद्धा प्रथम फलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय चुकला. आता बांगलाचे ३ गुण व ऑसीजचे २ गुण आहेत. आज ३ वाजता इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया हा सामना आहे. उपांत्य फेरीत जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकावाच लागेल. या सामन्यातील इतर कोणताही निकाल (पराभव, बरोबरी, अनिर्णित) बांगलाला उपांत्य फेरीत नेईल.

आज ऑस्ट्रेलिया जिंकून उपांत्य फेरीत यावेत अशी इच्छा आहे.

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2017 - 4:38 pm | श्रीगुरुजी

वेस्ट इंडिजची अधोगती सुरूच आहे.

http://www.thehindu.com/sport/cricket/afghanistan-tour-of-west-indies-we...

Rashid Khan spins Afghanistan to victory over West Indies in ODI series opener.

Rashid Khan (7 for 18) tore through West Indies batting line-up to claim the fourth-best bowling figures ever in an ODI.

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2017 - 7:54 pm | श्रीगुरुजी

ऑस्ट्रेलिया ५० षटकात २७७/९. इंग्लंड ६ षटकात ३५/३.

दुर्दैव ऑस्ट्रेलियाची पाठ सोडायला तयार नाही. पावसाने खेळ थांबलाय. निकालासाठी डाव किमान २० षटके खेळला गेला पाहिजे. अन्यथा ऑस्ट्रेलियाचा लागोपाठ तिसरा सामना पावसाने वाया जाऊन बांगला उपांत्य फेरीत जाईल.

मुक्त विहारि's picture

10 Jun 2017 - 11:06 pm | मुक्त विहारि

पावसाळ्यात क्रिकेटच्या आणि लॉन टेनिसच्या मॅचेस ह्या ईम्ग्लंडमध्ये ठेवणारी व्यक्ती भलतीच हुषार.

जॉन मॅकेन्रो आबि बोर्गची मॅच पण अशीच रंगात असायची आणि हा पाइइस व्यत्यय आणायचा.

सध्या तरी इंग्लंड २४०/४ षटके ४०.२

मुक्त विहारि's picture

10 Jun 2017 - 11:24 pm | मुक्त विहारि

पावसामुळे ऑस्ट्रेलिया बाहेर...

घ्या अजून घ्या ह्या पावसाळ्यात मॅचेस....

आणि तसेही वेस्ट इंडीज नसल्याने मला तरी ह्या मॅचेस बघण्यात जास्त रस न्हवताच......

वेस्ट ईम्डीज शिवाय ह्या उच्च दर्जाच्या मॅचेस बघणे आणि अप्सरां शिवाय स्वर्गात जाणे एकच.

अभिजीत अवलिया's picture

11 Jun 2017 - 11:24 am | अभिजीत अवलिया

तसे पण ऑस्ट्रेलिया बाहेर होण्याचीच शक्यता जास्त होती. कालची मॅच पावसाने थांबली तेव्हा इंग्लंड जवळपास जिंकले होते. न्यूझीलंड विरुद्ध देखील जेव्हा मॅच थांबली तेव्हा ऑस्ट्रेलिया हरण्याचीच शक्यता जास्त होती. त्यामुळे पावसामुळे ऑस्ट्रेलिया बाहेर झाली असे वाटत नाही.

ती मॅच नक्कीच ऑस्ट्रेलियाने जिंकली असती.

जावू दे....

गतं न सोच्यं.....

आजची भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच बघायला नक्कीच मजा येईल.

हाशीम आमला , ए.बी.डी. आणि जेपीडी खेळले तर, आपले जरा कठीणच आहे.

शिवाय साऊथ आफ्रिकेच्या क्षेत्ररक्षणामुळे आपल्याला २५० धावा पण ३०० एव्हढ्या मोठ्या वाटतात.

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2017 - 8:34 pm | श्रीगुरुजी

पाऊस नसता तर आफ्रिका सुद्धा पाकड्यांविरूद्ध नक्की जिंकले असते व आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश उपांत्य फेरीत आले असते.

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2017 - 8:32 pm | श्रीगुरुजी

विंडीजचा संघ अत्यंत वाईट अवस्थेत आहे व दिवसेंदिवस त्यात घसरण होत आहे. चॅम्पियन्स करंडक या स्पर्धेत फक्त टॉप ८ संघांना प्रवेश दिला जातो. विंडीजचा क्रम ९ आहे. त्यांची क्रमवारी बांगलापेक्षाही खाली घसरली आहे. कालच त्यांना त्यांच्याच देशात अफगाणिस्तानने सुद्धा पराभूत केले. काही काळाने ते अफगाणच्याही खाली जातील.

विंडीजच्या खेळाडूंचा खेळ मला आवडतो. त्यांच्याकडे अजूनही खूप प्रतिभावान खेळाडू आहेत. परंतु संघ म्हणून एकत्रित कामगिरी करण्यात ते अपयशी ठरतात. विंडीज नियामक मंडळाकडून खूपच कमी मानधन मिळत असल्याने अनेक चांगले खेळाडू विंडीज संघाकडून खेळण्याऐवजी आयपीएल, केएफसी बिग बॅश, पाकिस्तानमधील लीग इ. स्पर्धांना प्राधान्य देतात. तशीही कॅरबिअन देशात क्रिकेटची लोकप्रियता खूप कमी झाली आहे. सध्याची पिढी क्रिकेटऐवजी इतर खेळांकडे वळ्त आहे.

विंडीज, भारत, द. आफ्रिका व न्यूझीलँड हे चार देश कोणत्याही स्पर्धेच्या उपांत्य फेरीत असावेत असे मला कायम वाटत राहते. परंतु अजूपपर्यंत तरी ते शक्य झालेले नाही.

मुक्त विहारि's picture

10 Jun 2017 - 11:26 pm | मुक्त विहारि

भारत जिंकणार की साऊथ आफ्रिका