ठेवणीतले आवाज ..

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
12 Feb 2009 - 7:10 am

नमस्कार मंडळी,
आवाज हा शद्ब इतक्या अर्थी आपण वापरतो की आपल्यालाच त्याची कल्पना येत नाही. साधारणपणे "त्याचा आवाज चांगला आहे" असं कोणी म्हंटलं तर नक्कि तो चांगला गात असावा असंच वाटतं. आवाजात चढउतार सुरेख आहेत असं कोणी म्हंटलं तर नक्की समजतं की, निवेदकाचा / नाटककाराचा/ नटाचा आवाज आहे . चिरका आहे आवाज असं म्हंटलं तर समजतं की, कानाला त्रास होणारा किंवा पिचत जाणारा आवाज आहे. खणखणीत आहे आवाज .. असं म्हंटलं की समजतं की नक्की एखाद्या वक्त्याचा, पुढार्‍याचा आवाज आहे. जर म्हंटलं की, मंजुळ आहे आवाज तर फक्त आणि फक्त समोर एखादी नाजूकशी मुलगी येते. कोणा मुलाचा आवाज मंजुळ असल्याचा ऐकिवात नाही. भसाडा आहे आवाज असं म्हंटलं तर एखादा बोजड मनुष्य डोळ्यासमोर येतो. आवाजाला विशेषणं तरी किती लावावीत! कित्येक प्रकारचे आवाज आपण ऐकत असतो.. जेव्हा कोणताही आवाज नसतो तेव्हा पोकळीचा आवाज आपल्याला ऐकू येतो.. म्हणजे आपल्याला जाणवतो.
रोजच्या जीवनात, घरातले आवाज, धुण्याचे, भांड्याचे, फ्रिजचे, वॉशिंग मशिनचे, गॅस पेटवल्याचे, चहा , दूध उतू गेल्याचे, रेडीओचे, बिल्डिंगच्या लिफ्टचे, जीन्यावरून जाणार्‍या पावलांचे... अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरात, बाहेर, सगळीकडे आपण वेगवेगळ्या आवाजांनी वेढलेलो असतो. आवाजाशिवाय दुनिया असूच शकत नाही.
सकाळी दूध वाला घंटी वाजवतो तिथेपासून सुरू झालेले आवाज, ते आपल्या नवरा/बायकोचे घोरणे ऐकून संपातात. वाहनांचे आवाज, हॉर्न, ब्रेक खडखड.... इ. विषयी न बोलणंच बरं. कारण इथे मग साऊंड पोल्युशन वाले जोरदार वाद घालतात. तेव्हा तेरीभी चूप मेरी भी चूप.. हेच बरं.
हृदयाची धडधड.. अतिशय महत्वाची. हा आवाज जर थांबला तर जीवन थांबलं. श्वासांचे आवाज.. तितकेच महत्वाचे. नाही का?
जे काही नैसर्गिक आवाज आहेत.... म्हणजे झर्‍याचं खळाळणं, वार्‍याचं घोंघावणं, झाडांची सळसळ, पक्ष्यांचा किलबिलाट, प्राण्यांचं ओरडणं, कोकीळेचं कूजन, विजेचं कडाडणं, ढगांचा गडगडाट्,पावसाची रिपरिप, नागाचा फुत्कार.... यांचा एकप्रकारे मानवी मनावर इतका जबरदस्त प्रभाव आहे की, त्या त्या आवाजांना आपण ती ती विशेषणंच लावतो. कधी ऐकलं आहे कोणी म्हंटलेलं, " व्वा! काय पावसाचा किलबिलाट चालू आहे!" किंवा " तुमचा कुत्रा किती फुत्कारतो आहे?" .... नाही ना! म्हणजेच आवाज या एकाच शब्दामध्ये इतके प्रचंड अर्थ दडलेले आहेत.
आता ठेवणीतले आवाज.. असं म्हंटलं की काय येईल डोळ्यासमोर?? एकदा कॉलेजमध्ये माझी एका मुलीशी ओळख झाली. तिच्या आवाज इतका विचित्र होता.. पण नंतर थोडे दिवसांनी कॉलेजच्या कोणत्याशा कार्यक्रमात तिला गाताना पाहिलं आणि ऐकलंही. तेव्हा माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तिला सांगितलं मी, "बाई गं, तुझा ठेवणीतला आवाज इतका सुंदर असेल असं वाटलं नव्हतं". तर असा हा ठेवणीतला आवाज. माझा धाकटा भाऊ,"तायडे, मायडे"... असं सोडून.. "ए ताई गं...." अशी हाक मारून ठेवणीतला आवाज काढून बोलू लागला की, समजायचं साहेबांना नक्की स्कूटी हवी आहे, किंवा कॉलेजची वर्कशीट पूर्ण करायला मदत हवी आहे. "बॉबॉ... " अशी माझ्याकडून हाक गेली की, बाबा समजायचे नक्की काहीतरी हवं आहे. घरातल्या घरातच आपण कितीतरी ठेवणीतले आवाज ऐकतो.
"अहोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!" किंवा "अरे ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ए!' अशा ऐवजी ठेवणीतला आवाज काढून बायको हाक मारते म्हंटलं की, नवरा लगेच आपलं पैशाचं पाकिट चपापतो.. आणि त्यात किती पैसे आहेत त्यावर तिला नक्की कोणत्या आवाजात "ओ" द्यायची हे ठरवतो. किंवा आता माझ्या नवर्‍यासारखा माणूस नक्कीच विचार करत असेल की, आता नक्की कोणता पदार्थ (होनोलूलूयन, तिबेटियन... मेक्सिकन्...वगैरे) टेस्ट करायला ही सांगणार आहे??...हे झालं नवरा बायको बद्दल. सासू-सून.. यांच्या ठेवणीत बर्‍याच प्रकारचे आवाज असतात. भांडताना काढायचा वेगळा आवाज, मिळून काम करताना वापरायचा वेगळा आवाज, इतर लोकांसमोर प्रेमाने वापरायचा वेगळा आवाज, टोमणे मारताना वेगळा आवाज. सासू असेल तर मुलासमोर सूनेशी बोलतानाच वेगळा (थोडा गरीब) आवाज, सूनेचेही तसेच नवर्‍यासमोर सासूशी बोलताना (अगदी आज्ञाधारक) आवाज.. .. हे झाले घरातले ठेवणीतले आवाज.
पण खरे ठेवणीतले आवाज ऐकायचे तर घराबाहेर. म्हणजे फेरीवाले, भाजी वाले.. यांचे. पुण्यात आमच्या सोसायटीत रोज दुपारी साधारण १ ते दीड वाजता "............अंडीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ य" असा आवाज यायचा. मला वाटायचे हा माणूस रोज रोज अंडी विकायला येतो की काय! आणि अशी काय लोकं त्याच्याकडून अंडी घेतात म्हणून हा इतक्या जोरात ओरडतो? एकेदिवशी संध्याकाळी ब्रेड ऑम्लेट करावे असे ठरले. म्हंटलं दुपारी अंडीवाला आला की त्याच्याकडूनच अंडी घ्यावी. बरोबर १.३० वाजता नेहमीची हाक आली, ".........अंडीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ य." जीना उतरून खाली गेले.. आणि त्याला पाहून हसावे का रडावे हेच कळेना. कारण तो अंडीवाला नसून बोहारी होता आणि "भांडीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ य' असे तो ओरडत होता. त्याचं नावही भारी होतं..'गुलाबभाई कपबशीवाला.."!
एक आणखी एक मटकी मावशी यायची सोसायटीत. ती मोडाची कडधान्ये, सोबत टॉमेटो, कोथिंबीर, मिरच्या अशा बेसिक भाज्या विकायची. ती आजूबाजूच्या सोसायटीत आली की,.."....ट्की ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" अशी हाक ऐकायला यायची. आणि मग जसजसे "...टकी"... मग "... मटकी ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" असे पूर्ण ऐकायला यायचे तेव्हा समजायचे की बाई आता आपल्या बिल्डींग मध्ये आली आहे. एकदा कोल्हापूरात कपिलतिर्थ मंडई मध्ये गेले होते. तेव्हा.. एका माणसाची गंमत वाटली. " आल्ले आल्ले आल्ले.... टॉमॅट्टो(ट्टो वर जोर देऊन) आले, फिलावर(वर वर जोर देऊन) आले, काक्कड्डी आले (त्याच टोन मध्ये), ताजी भेंडी आले... आल्ले आल्ले आल्ले..." असा ओरडत होता. आधी नुसतंच आल्ले आल्ले आल्ले हे ऐकून वाटलं हा माणूस आलं विकतो आहे.. मग पुढचे ऐकल्यावर समजलं की तो आलं सोडून बाकिच्या भाज्या विकतो आहे.
आमच्या कडे रोज सकाळी सकाळी खर्जातला आवाज काढून (आल्ला के नाम पे दे दे बाबा प्रकारचा आवाज) "केदाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ र्र" ... असं कोणीतरी ओरडत यायचं. खूप दिवस ऐकल्यावर एकदा कुतुहल म्हणून पाहिलं तर तो रद्दिवाला होता आणि तो ठेवणीतल्या आवाजात "पेप्पॉर" असा ओरडत होता. एकदा मुंबईतल्या डोंबिवली या उपनगरात मामाकडे रहायला गेले होते. तेव्हा तिथे रोज दुपारी ४ च्या दरम्यान .."नीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ट चाला" असं कोणीतरी ओरडताना ऐकू यायचं. २-३ वेळा ऐकल्यावर हा नक्की काय विकत असेल याचा अंदाज बांधायला सुरूवात केली. पण काही कळेना. शेवटी ४ च्या दरम्यान बाल्कनीत उभी राहीले.. तो आलाच... लांबून आवाज आला "नी ऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ट चाला". पण तो अजून नजरेच्या टप्प्यात नव्हता. शेवटी तो दिसला आणि त्याच्याकडे असलेले खडे मीठ दिसले. तो ओरडत होता..."मीऽऽऽऽऽठ वालाऽऽऽऽ"
तासगांवला आजी-आजोबांकडे गेले की, तिथेही दुपारी एकजण यायचा. त्याचं ओरडणं सजमायचं. तो काय विकतो आहे ते ही समजत होतं. कारण ठेवणीतला असला तरी त्याचा आवाज, शब्द नीट समजण्या इतका स्पष्ट होता. त्याची ओरडण्याची पण एक स्टाईल होती.. "उंदीर मारतंय, घुश्शी मारतंय ऽऽऽऽऽ डोसकीतल्या व्वा मारतंय" असं तो ओरडायचा. कोणतंतरी उंदीर मारायचं देशी औषध तो विकायचा. तासगावला आणखी एकजण यायचा.."घेट्ला घेट्ला.. घेटला.. लाल घेतला, पिव्ळा घेतला, पांढरा घेतला.... गोड घेतला" असं तो ओरडायचा. तो आईस्क्रिमचे गोळे विकायचा ...ते काठीला लावलेले असतात तसले.
सगळ्यांत गमतीदार आवाज असतात ते भंगार वाल्यांचे. आजपर्यंत एकही भंगारवाला असा नाही पाहिला किंवा ऐकला की ज्याचं ओरडणं निट समजलं आहे. "पत्रा, बाटली, लोखंड.. किंवा डब्ब्बा .. बाटली, लोखंड, प्लाश्टीकऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" ओरडताना शब्द हेच पण प्रत्येकाचे ठेवणीतले आवाज वेगळे. बरं.. या लोकांशी तुम्ही त्याच्यापाशी जाऊन बोलू लागलात तर वेगळेच आवाज असतात. ते तुमच्याशी बोलताना साध्या आवाजात बोलतात. पण ओरडताना मात्र खास कमावलेले, कल्चर केलेले आवाज वापरतात.
सांगलीत आमच्या बिल्डींग मध्ये शनिवार रविवार सकाळच्या वेळेत एक माणूस यायचा.. इडली चटणी, सँडवीच, समोसे, बटाटेवडे असले प्रकार विकायचा. तो जो आवाज काढायचा त्यातलं फक्त शेवटचं ....'स्सम्मोस्से ऽऽऽऽऽ य" इतकंच कळायचं.
एकदा एक फेरिवाला अगदी मनापासून ठ्वेणीतल्या आवाजात ओरडत होता.."स्वच्छ करून देनार्ऽऽऽऽऽऽऽऽऽऽ पाव किलो घ्या, १ किलो घ्या.. २ किलो घ्या.." हे ऐकून काही समजलं नाही. कारण तिथे काही जणांकडे त्यांचे बाथरूम संडास धुण्यासाठी माणूस येत असे. आधी वाटले असाच कोणी फिरतो आहे वाटतं. स्वच्छ करून देनार.... पण मग १ किलो.. २ किलो.. हा काय प्रकार आहे म्हणून बाहेर जाऊन पाहिले, तर तो एक शेतकरी होता आणि शेतातला फक्त फ्लॉवर विकत होता. आणि तो फ्लॉवर , पाठिमागचा देठ आणि पानाचा भाग काढून टाकून १-२ किलो असे विकत होता. अच्छा!! म्हणून स्वच्छ करून होय!
असे कितीतरी ठेवणीतल्या आवाजांशी मी संबंधीत होते. खास करून मटकि मावशी, तो पेप्पॉर वाला... नाही म्हंटलं तरी या आवाजांची एकप्रकारची सवय झाली आहे. कितीही कर्कश्श किंवा ठेवणीतले असले तरी त्या आवाजात एक प्रकारचं चैतन्य आहे. इथे अमेरिकेत ना कोणी पेप्पॉरवाला.. ना..... अंडि ऽऽऽऽऽ असं ओरडणारा बोहारी. दुपारी सुनसान होतं जग सगळं.
हे ठेवणीतले आवाज मात्र मनाच्या कुपित कुठेतरी दडलेले असतात आणि कधीतरी असे लेखांतून बाहेर येतात.

- प्राजु

साहित्यिकप्रकटनलेखप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

सहज's picture

12 Feb 2009 - 7:48 am | सहज

अतिशय आवडला. लेखीका कवयित्रीला भारी पडते आहे असे माझे मत.

विचार - जर इतक्या भावना, अर्थ आवाजातुन येतात, तर कर्णबधीर लोकांचे ........

प्राजु's picture

12 Feb 2009 - 7:14 pm | प्राजु

विचार - जर इतक्या भावना, अर्थ आवाजातुन येतात, तर कर्णबधीर लोकांचे ........

नाही विचार करू शकत मी.. .. फक्त जखम होते मनाला.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दशानन's picture

13 Feb 2009 - 7:00 am | दशानन

>>>अतिशय आवडला. लेखीका कवयित्रीला भारी पडते आहे असे माझे मत.

१००% सहमत. सुम्दर आठवणी प्राजु.
आवडल्या...

>>>विचार - जर इतक्या भावना, अर्थ आवाजातुन येतात, तर कर्णबधीर लोकांचे ........

निशब्द.

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

शंकरराव's picture

14 Feb 2009 - 2:38 am | शंकरराव

अतिशय आवडला. लेखीका कवयित्रीला भारी पडते आहे असे माझे मत.
हेच म्हणतो

शंकरराव

केशवराव's picture

14 Feb 2009 - 2:10 pm | केशवराव

सहजराव,
मनाला स्पर्ष करून गेली आपली प्रतिक्रिया! याला म्हणतात संवेदनशीलता!!

अनामिक's picture

12 Feb 2009 - 7:51 am | अनामिक

आमच्या शेजारच्या छोटीचा सायकल रिक्षावाला तिला शाळेत पोचवण्यासाठी आला की दुरुनच तिला हाक मारायचा... "वालीsss....ऐ वालीsss"... सुरवातीला कळायचंच नाही की तो 'वाली' का म्हणतोय..... पण मग लक्षात आलं तो 'बाली' म्हणून हाक मारायचा! त्याची हाक ऐकू आली की आई म्हणायची "तो बघ.. आला सुग्रीव!"

लेख अगदी खुसखुशीत झालाय!

अनामिक.

भडकमकर मास्तर's picture

12 Feb 2009 - 7:56 am | भडकमकर मास्तर

मस्त लेख...
रेल्वेतल्या भिकार्‍यांचेसुद्धा ठेवणीतले खास आवाज असतात...
आणि ती गाणी म्हणायचे आवाज...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Feb 2009 - 3:04 pm | बिपिन कार्यकर्ते

हेच बोल्तो... असं आवाजांबद्दल ऐकलं की मला भिकार्‍यांच्या गाण्याचीच आठवण येते.

'एऽ सिरडीवाले साईबाबा.......'

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

12 Feb 2009 - 7:19 pm | प्राजु

येऽऽऽऽऽऽऽ.....बॉळ्या संकर्‍याऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ..
आव्ड तुला बेल्याची... बेल्याच्या पाण्याची.. ;)
काय शब्द.. काय स्वर!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Feb 2009 - 9:07 pm | बिपिन कार्यकर्ते

मेलो!!!!

=)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

मदनबाण's picture

12 Feb 2009 - 8:12 am | मदनबाण

मस्त लेख... :)
दादर स्टेशनच्या बाहेर बर्‍याच वस्तु विकणारे बसलेले असतात ते असचं अगदी वेगळ्या टोन मधे ओरडत असतात..लॉट ऐ स्सेल्ल है,,ज्युस वाले:-- आ लेलो ज्युस्स्स मॅन्गो का..मॅन्गो का लेलो ज्युस्स्स..
हल्ली आमच्या इथं बुधवारी बाजार बसतो...भय्या लोकांची प्रचंड वस्ती झालेली आहे त्यामुळे माल विकणारे पण बरेचसे भय्येच असतात...ते असे ओरडतात..आवा आवा लहसुन लेवा !!! (हे लेवा आहे का लेबा ते अजुन मला कळलेल नाही !!!)

मदनबाण.....

देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.

प्रभाकर पेठकर's picture

12 Feb 2009 - 12:12 pm | प्रभाकर पेठकर

पुलंच्या लेखाची आठवण झाली.
त्यांनी वर्णीलेले आवाज, त्यातील 'क्लस का?' (ऐकलस का?), वगैरे अगदी खासच.
चर्चगेट स्थानका बाहेर एक आवाज हमखास ऐकू यायचा, 'लँ ऽऽऽ ज्यूस' तो विकायचा 'लेमन ज्यूस'. आमच्या इथे रात्री ९-१० वाजता एका विक्रेत्याचा आवाज यायचा, 'फ्फेऽऽऽऽ' तो विकायचा 'कुल्फी", रेल्वे स्टेशनवर हमखास एक आवाज ऐकू यायचा 'स्स्सऽऽऽ!' तो असायचा 'बुट पॉलीशवाल्या पोर्‍याचा'.
पर दु:ख शितलम्. आपण चाळीच्या संडासात बसलो असताना बाहेरून कोणीतरी सतत टक् टक् टक् करणं.... एक अस्वस्थ आवाज. (बाहेर कोणी तरी आहे हे माहित असूनही आवरता न येणारे 'आतले' काही आवाज).
वेळ काळा नुसार काही आवाज वेगळीच वातावरण निर्मीति करतात. रात्री दोन वाजताच्या मिट्ट्ट्ट काळोखात एकदा ऐकलेला पैंजणांचा आवाज. छुम् .. छुम्.. छुम् छुम् छुम्.. पाचावर धारण बसविणारा होता. स्मशानात कवटी फुटल्यावर येणारा आवाज.. मनात ध्धस्स.. करणारा.
एका आवाजाचा अनुभव सहसा कोणी घेऊ नये तो म्हणजे 'कानाखाली काढल्याचा'.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

नाटक्या's picture

12 Feb 2009 - 9:44 pm | नाटक्या

मनातलं बोललात काका.

स्मशानात कवटी फुटल्यावर येणारा आवाज.. मनात ध्धस्स.. करणारा
हा मात्र अगदी नकोसा वाटणारा, सगळं संपलं याची जाणीव करून देणारा.

एका आवाजाचा अनुभव सहसा कोणी घेऊ नये तो म्हणजे 'कानाखाली काढल्याचा'.
दुर्दैवाने हा बर्‍याच वेळा ऐकला शाळेत असताना.. >:)

आणखी एक आवाज मुंबईच्या उपनगरात रहात असताना ऐकू यायचा, पुईईईईईई पुईईईईईई असा. सकाळी सकाळी (साधारणता ८-८:३० च्या दरम्यान, हो माझी सकाळ याच वेळेस व्हायची. शाळेत 'कानाखाली' आवाज उगाच नाही ऐकलेत) सायकल वरून ईडली/चटणी विकणारा एक माणूस यायचा त्याचा. आमच्या शेजारचे एक मद्रासी कुटुंब बर्‍याचदा त्याच्या कडून ईडल्या विकत घ्यायचे.

तसाच आणखी एक आवाज यायचा 'पऽऽऽ ऽऽऽ ऽऽऽ ड' तो एका 'पापड' विकणार्‍याचा होता. 'मेऽऽऽ ऽऽलीऽऽऽ य' म्हणजे चमेली/मोगरा यांचे गजरे/वेण्या विकणारा.

असेच आणखी बरेच आवाज लहान पणाची आठवण करून देतात.

महेंद्र's picture

12 Feb 2009 - 12:14 pm | महेंद्र

मस्त जमलाय..

स्मिता श्रीपाद's picture

12 Feb 2009 - 1:55 pm | स्मिता श्रीपाद

.."नीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ट चाला" हे तर भरीच...

,"तायडे, मायडे"... असं सोडून.. "ए ताई गं...." हा माझा पण अनुभव आहे :-)

मज्जा आली वाचताना... :-)

माझ्या कराडच्या घरी एक म्हातारा माणुस एक दिवसाआड यायचा....आणि ओरडायचा.....
ताजाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽळू ....ताजाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽळू ....बर त्याच्या डोक्यावरची पाटी झाकलेली असायची त्यामुळे काय आहे हे ताजाळू कळायचंच नाही....लाजाळू च्या झाडासारखं असतं का काही असं वाटायचं मला.... :-)
नंतर मला कळलं की तो ताजा अळू आहे :-)

तसच आलेपाकाच्या वड्या विकणारे पण मजेशीर ओरडायचे....आल्लेऽऽऽऽऽऽऽऽपाक ..आल्लेऽऽऽऽऽऽऽऽपाक :-)

तुझा लेख वाचुन ही आठवण आली :-)
मस्त लेख

-स्मिता

जयवी's picture

12 Feb 2009 - 1:55 pm | जयवी

प्राजु...... मस्त झालाय लेख :) असेच निरनिराळे आवाज ऐकायला आवडतील अजून :)

मनीषा's picture

12 Feb 2009 - 1:58 pm | मनीषा

(पु. ल. च्या लेखाची आठवण झाली ..)
खूप छान लेख ..

मी कर्वेनगरला असताना पहाटे नाथपंथी "पिंगळाजोगी " गुरुवाणी म्हणत यायचे. त्यांचा टिपेतला आणि खणखणीत आवाज पहाटेच्या शांततेला चिरत जात असे. तो अजूनही आठवतॉ.

शाल्मली's picture

12 Feb 2009 - 3:51 pm | शाल्मली

मस्त झाला आहे लेख. एकदम ठेवणीतला :)
अंडीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ य तर एकदम मस्तच.

एकदा मी मुंबईला गेले असतां त्या बसस्थानकाबाहेर खासगी वाहतूक वाले असेच ठेवणीतले आवाज काढत होते. पुणेऔरंगाबादकोल्हापूरनास्स्स्सिक.. असं सगळं एका दमात ओरडत होते. ते ऐकायला फार मजेदार वाटत होते. त्याची आठवण झाली.

तसंच घरी पूजा सांगायला किंवा मंत्रपठणासाठी येणार्‍या गुरूजींचा बोलतानाचा आवाज वेगळा आणि मंत्र म्हणतानाचा आवाज एकदमच ठेवणीतला येतो. (बरेचदा एखाद्या ओळीचा पहिला आणि शेवटचा शब्दच फक्त ऐकू येतो ;))
--शाल्मली.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Feb 2009 - 4:02 pm | प्रकाश घाटपांडे

सर्व लोकाऽऽस कळविण्यात येते की बेऽ
ल्हे गावात आज दिनांका .... रोजी ..
मग पुढील वार्ता.
अशा आवजात दवंडी देणारा ग्रामपंचायतीतला हिरा महार डोळ्यासमोर येतो. ते बेल्हे शब्दातील बे व ल्हे तोडणे हातात पितळी थाळी व लाकडी हातोडा डोक्यावर काळी टोपी व पान तमाखु खाउन समेवर पचकन थुंकणारा हिरा कोणती बातमी सांगतो याची उत्सुकता असायची.
प्राऽऽजु च्या लेखाने त्याची आठवण आली.
सुंदर लेख प्राऽऽजू
प्रकाश घाटपांडे

रेवती's picture

12 Feb 2009 - 7:37 pm | रेवती

मस्त लेख!
खूप आठवणी जाग्या झाल्या.
माझ्या सासूबाईंच्या शाळेत आरोही नावाची गोड मुलगी होती.
तीची आई शाळा सुटल्यावर तीला न्यायला यायची तर शाळेत शिपाईगिरी (हो, भलत्याच कडक बाई आहेत त्या..) करणार्‍या बाई असाच ठेवणीतला आवाज काढून,
"ए आरोळी आयी आली बग" असं ओरडायच्या ते आठवलं.
पुण्यातल्या आमच्या बिल्डींगपाशी रोज सकाळी एक मुलगा त्याची मोटरसायकल घेऊन यायचा व "ए औल" अशी हाक मारून निघून जायचा.
मला बर्‍याच दिवसांनी समजलं की आपल्या राहूल नावाच्या मित्राला तो सकाळी झोपेतून उठवायला यायचा.

रेवती

लिखाळ's picture

12 Feb 2009 - 8:58 pm | लिखाळ

मस्त लेख :) मजा आली.
त्यावरुन मला सुद्धा आमच्या घराच्या आसपास येणार्‍या बोहारी आणि भंगारवाल्याची विशिष्ट आणि विशेष अशी हाळी आठवली :)
-- लिखाळ.

शितल's picture

12 Feb 2009 - 9:01 pm | शितल

प्राजु,
मस्त लेख. :)

चकली's picture

12 Feb 2009 - 9:34 pm | चकली

सहज सोप्या ओघवत्या शैलीतला लेख!
चकली
http://chakali.blogspot.com

मीनल's picture

12 Feb 2009 - 9:39 pm | मीनल

बाळ जेव्हा पोटात असत तेव्हा त्याला त्याच्या आईच्या हृदयाचे ठोके ऐकू येत असतात.
म्हणूनच जन्मा नंतर ते बाळ आईला लागेच ओळखत.ते ठोके त्याच्या परिचयाचे असतात.
आईने जवळ घेतल की ते शांत होत.

मीनल.

चतुरंग's picture

12 Feb 2009 - 10:03 pm | चतुरंग

आवाजाची दुनिया ही अगदी आपल्या लहानपणापासुन सोबत करत असते. कितीतरी आवाज असे मनात घुसून बसलेले असतात. आणि अशा काही निमित्ताने वर येतात हे खरे.
मला आठवतंय लहानपणी मी आजोळी मिरजेला जायचो त्यावेळी अगदी सकाळी सकाळी मिरज स्टेशनला गाडी यायची. फलाटावरच गरमागरम इडली चटणी द्रोणात घेऊन गाडीवाले फिरत असायचे "ईऽऽऽट्ली चेऽऽणी" आणि वाफाळत्या कॉफीसाठी "काऽऽऽप्पी" ही हाळी अजूनही मला एका क्षणात तिथे घेऊन जाते!
नगरला थंडीच्या दिवसात संध्याकाळी एकजण सायकलवरुन निघे "एऽऽर्दिला, खोकल्याला, पडशाला, पित्ताला ऽऽए ल्याचीव्डि आलेपाक!"
म्हणजे "आल्याची वडी आलेपाक" विकायला यायचा.
तसाच सायकलला पुढे बांबूची बास्केट आणि घासलेटाचा धूर ओकणारा दिवा लावून एकजण "एंऽऽ चना जोऽऽर गरम, बाबू!" असं म्हणत एक फिरस्ता येत असे. त्याच्याकडच्या कागदी कोनात भरपूर लिंबू पिळून आणि कांदा भुरभुरवून त्याने दिलेल्या चना जोरची चव अजूनही जिभेवर आहे आणि ती त्या विशिष्ठ आवाजाशी निगडित आहे.
सायकलला भलीमोठी पिशवी लावून येणारा "एऽऽक्लेऽऽऽऽऽई" म्हणजे कल्हईवाला! त्याच्या जवळ बसून तो कल्हई कशी करतो आणि नंतर थंड पाण्यात ते भांडे बुडवताच "चर्रर्रर्रर्राऽऽऽ" आवाज कसा येतो हे बघण्यात आमचे तासनतास जात.
आणखीन एक आठवण आहे. धारवाला घिसाडी येत असे. त्याच्या सायकलला त्याने एक धारेच्या दगडाचे चाक बसवून घेतलेले होते. काळाकभिन्न असा तो माणूस माझ्या अजूनही पक्का लक्षात आहे. "धाऽऽऽऽऽऽर्वाला!" अशी घोगर्‍या आवाजातली हाक टळटळीत दुपारच्या शांततेचा भंग करीत येई आणि मी रस्त्यावर धाव घेत असे. त्याच्या सायकल शेजारी उभे राहून तो सुर्‍या, कातर्‍यांना धार कशी लावतो आणि त्या "सुंऽऽऽऽईंऽऽऽसुर्र" आवाज करत ठिणग्या उडवत ते धारेच्या दगडाचे चाक कसे फिरते हे अजूनही डोळ्यांसमोर आहे!

इतक्या आठवणी जागवल्याबद्दल तुझे विशेष अभिनंदन प्राजू! :)

चतुरंग

भाग्यश्री's picture

12 Feb 2009 - 11:23 pm | भाग्यश्री

प्राजु लेख आवडला!

हे असे ठेवणीतले आवाज म्हटले की मला, एक आजोबा आठवतात!
मळकट धोतर, तसाच सदरा, वरती गुलाबी पागोटं, आणि काळा अगदी जीर्ण कोट.. त्या कोटावर इतके बिल्ले !!
खूप थकलेले, दृष्टी जवळजवळ अधू असलेली.. आणि ते आजोबा हळू आवाजात ओरडत शांत पणे निघून जायचे कॉलनी मधून.. "शर्टाल्ला.. साड्डील्ला.. सगळ्याल्ला.. रफ्फुवाल्ला.. !"

आम्हाला खूप कुतुहल होते त्यांचे.. विशेषतः त्यांच्या कोटावरच्या बिल्ल्यांचे.. शेवटी आई काहीतरी रफु करायला घेऊन गेली त्यांच्याकडे आणि गप्पा मारल्या त्यांच्याशी.. ते स्वातंत्र्यसैनिक होते..! आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात ते सहभागी होते. आणि आता अशी वेळ.. ते बिल्ले त्याबद्दलचेच होते.. आई मग नेहेमी त्यांना काहीतरी मदत करायची...

पण काही वर्षांपासून ते येत नाहीत.. :(
http://bhagyashreee.blogspot.com/

फक्त_ मोक्श's picture

13 Feb 2009 - 12:11 am | फक्त_ मोक्श

मनाचा आवाज पन असतो. जो आपल्या स्व:ताशिवाय कोणी ऐकू शकत नाही. जो आपले जी वन बनवतो आणि .........व मनाने घेतले तर च तो आवाज समोरचा ऐकू शकतो. मनाचा आवाज खूप मह्त्वाचा आहे आपल्या जिवनात. हो ना!

प्राजु लेख आवडला! :)

चित्रादेव's picture

13 Feb 2009 - 1:47 am | चित्रादेव

मुंबईत पण काही विषेश आवाज एकू येतात दुपारी.. भांडीयो.. भांडीयो.... हे म्हणजे जुने कपडे देवून भांडी विकणर्‍यांचे आवज. हमखास दुपारी येत.
मग टाकीया वाली... टाकीया.. वाली..... ते जुन्या पाट्या वरवंट्याला धार आणणारे...
तसे बर्‍याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

लवंगी's picture

13 Feb 2009 - 6:54 am | लवंगी

आमच्या गल्लीत एक नेहेमी आवाज यायचा.. 'जुनांबुऽऽऽऽऽऽ...' काही कळायच नाहि .. नंतर कळल की जूने बूट विकत घेणारा कोणी होता.
घरी दूध घेऊन एक लहान मुलगा यायचा . तो 'टूऽऽऽऽऽऽध' म्हणत ओरडायचा.
हे सगळे आवाज इथे खूप मीस करतेय..

मी असाकसा वेगळा वेगळा's picture

13 Feb 2009 - 12:54 pm | मी असाकसा वेगळा...

प्राजु,अगदी जुन्या आठवणी जागवल्यास :)

आमच्या संत तुकारामनगरमधे एक आवाज यायचा येंद्रुले....
आणि तो असायचा भंगारवाला...
अजुन एक आवाज "गावात तात्या आला तात्या"....
आणि तो असायचा भांडी घासण्यासाठई लागनारा काथ्या विकणारा......................................

प्राजु's picture

13 Feb 2009 - 7:13 pm | प्राजु

ठेवणीतले आवाज आवडलेल्या सर्वांचे मनापासून आभार. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पद्मश्री चित्रे's picture

14 Feb 2009 - 4:04 pm | पद्मश्री चित्रे

आवडला ग लेख खुप..

नीधप's picture

14 Feb 2009 - 4:29 pm | नीधप

सहीच....
आमच्याकडे दुपारी तीन-चार च्या वेळेला एक जण
हेऽऽऽऽऽऽऽप्पा
असं ओरडत येतो. तो पाव, खारी, अंडी विकतो असं संशोधना अंती कळलंय.
पण तो काय ओरडतो ते शब्द कळलेले नाहीत.
:)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

घाटावरचे भट's picture

14 Feb 2009 - 4:37 pm | घाटावरचे भट

आज पूर्ण वाचायला वेळ झाला. आमच्या घरापाशी मी लहान असताना एक माणूस डोक्यावर एक ट्रंक घेऊन 'आऽऽरी....राऽऽस्कीट' असं ओरडत यायचा. तो खरंतर 'खारी, खारा बिस्कीट' असं ओरडतो असं मला नंतर कळलं.... :) तेही त्याला विचारल्यानंतर.

हरकाम्या's picture

15 Feb 2009 - 12:06 am | हरकाम्या

निरनिराळे आवाज हवे असतील तर प्रा.दीपक देशपांडे यांचा " हास्यकल्लोळ " पहा . अतिशय उत्तम कार्यक्रम आहे .