मराठी-इंग्रजी शब्दकोष असं सांगतो की ‘व्यायामशाळा’ याचा समानार्थी इंग्रजी शब्द आहे ‘जिम्नॅशियम’. मात्र बोली भाषेत ह्या दोन्हीमध्ये फारच तफावत आहे.
पूर्वी व्यायामशाळा असायच्या. व्यायामशाळा म्हणजे जिथे दंड, जोर, बैठका, मुद्गल, डंब-बेल्स आणि तत्सम उचलण्याची वजने हे मुख्य व्यायामप्रकार. थोडक्यात म्हणजे गुरुत्वाकर्षणाविरुद्ध सगळे व्यायाम. सिंगल बार, डबल बार, शिवाय जागा असली तर आखाडा आणि मलखांब. चपला बूट बाहेर काढायचे. व्यायाम अनवाणी करायचा.
लॉकर्स वगैरे नाहीत. काढलेले कपडे अडकवायला भिंतींवर खिळे. बहुतेक जण बनियनवर व्यायाम करायचे. काही उघडबंबही असायचे आणि त्यात कोणालाही काही गैर वाटत नसे. सगळा माहोल पुरुषी. मध्यवर्ती ठिकाणी मारुतीरायाची फोटोफ्रेम. त्याला नित्यनेमानी फुलं वाहिली जात आणि उदबत्ती लावली जाई. बहुतेक व्यायामपटु आल्याआल्या मारुतीरायांना नमस्कार करून व्यायाम सुरू करायचे.
मासिक फी अतिशय माफक असायची. “अमक्या अमक्या रुपयांत इतके इंच/किलो कमी करून देऊ” (मागोमाग *Conditions Apply) अशा वल्गना अजून आस्तित्वात आलेल्या नव्हत्या.
तेव्हां जिम्नॅशियम्स फक्त पंचतारांकित हॉटेलांमध्ये दिसायच्या. आम जनतेचा त्यांच्याशी संबंधच नव्हता. यात विविध प्रकारची यंत्रं असायची. जागच्या जागीच चालणं, धावणं, सायकल चालवणं, वेगवेगळ्या अंशात हॅन्डल्स ओढून वा ढकलून शरीरातल्या वेगवेगळ्या स्नायुगटांना नेमका व्यायाम देणारी यंत्र, भिंतींवर छोटस्सं डोकं, अगदी खपाटीला गेलेलं पोट, पण बाकी शरीरभर पीळदार स्नायूंचा अतिरेक असलेल्या नीग्रो नाहीतर गोर्या महाकाय व्यायामपटूंचे फोटो लावलेले, दिवे म्हणजे पिवळा उजेड देणारे बल्ब नसून ट्यूबलाइट्स, पावलांना मसाज देणारी यंत्रं, स्टीम बाथ! सगळंच स्वप्नवत्! सामान्य मनुष्य इकडे वळण्याचा प्रश्नच नव्हता.
अशा वातावरणात तळवलकर बंधूंनी मुंबईच्या सिटीलाईट थियेटरजवळ पहिली जिम्नॅशियम उघडली! आमच्या घरून शिवाजी पार्ककडे जाण्याच्या अगदी रस्त्यावर. मला आणि मित्रमंडळींना खेळाची आणि व्यायामाची आवड होतीच. त्यामुळे शरीरयष्टीही बरी होती. आम्ही सगळे जण आशाळभूतपणे त्या नवनवीन मशीन्सकडे काचेतून पहायचो. व्यायामशाळेच्या तुलनेत सभासद वर्गणी कैच्या कै महाग! परवडण्याचा प्रश्नच नव्हता.
अविनाश तळवलकर तिथे असायचा. भक्कम शरीरयष्टी आणि छाप पडेल असं व्यक्तिमत्व. खूप लोक चौकशीला यायचे. तो आलेल्या प्रत्येकाला माहिती द्यायचा, या मशीन्समुळे व्यायामाच्या गुणवत्तेत कसा आणि का फरक पडतो तो समजवायचा. लोक त्याने भारावून जायचे खरे, पण प्रत्यक्षात सभासदत्व घ्यायचे नाहीत. किमतीच्या बाबतीत व्यायामशाळांशी स्पर्धा करणं अवघडंच होतं. असे कित्येक महिने गेले.
आम्ही मात्र जातायेता कित्येक वेळा तिथे डोकावून आमचे डोळे शेकून घ्यायचो.
एक दिवस अविनाशनी आम्हाला आत बोलावलं अन् विचारलं. “काय, इथे व्यायाम करायला आवडेल का?” आमच्या उत्तराची वाट न बघता आम्हाला वेगवेगळ्या मशीन्सची माहिती द्यायला लागला.
काही माकडं जशी खायला वेळ नसला की हाती लागलेले खाद्यपदार्थ भसाभसा गालात कोंबून ठेवतात नंतर खाण्यासाठी, तसं मी “इथे कोणाच्या बापाला परवडणार आहे?” हा जिभेवर असलेला प्रतिप्रश्न बाजूला सरकवून गालात ठेवून दिला आणि तो देत असलेली माहिती ऐकायला लागलो.
सगळ्या जिमची माहिती मिळाल्यानंतरच आमच्या सांपत्तिक दुर्बलतेची बातमी त्याला द्यावी असं मी ठरवलं. मात्र अविनाशनी ती संधीच दिली नाही. त्यानी आम्हाला एक ऑफर दिली.
“तुम्ही इथे रोज संध्याकाळी फुकट व्यायाम करू शकता. कसा करायचा ते मी शिकवीन. मात्र किमान एक तास तरी व्यायाम करायचाच. वर प्रत्येकाला रोज एक मिल्क शेक मिळेल!”
च्यायला, आंधळ्यानी मागितला एकही नाही, तरी मिळाले डायरेक्ट दोन डोळे!
मृग सोन्याचा जगी असंभव । तरिहि तयाला भुलले राघव ।।
पण आम्ही नाही.
मध्यमवर्गीय विचारांमध्ये आश्वासक असं एक स्थैर्य असतं. ‘कोणतीही गोष्ट फुकट मिळंत नाही आणि जर का मिळालीच तर भविष्यात त्याची अवाच्या सवा किंमत मोजावी लागते.’ हा तो विचार.
त्यामुळे लगेच आमचा पुढचा प्रश्न. “आम्हालाच का बरं देणार?” माझी कल्पना अशी की आधीच चमकंत असलेल्या या यंत्रांना रोज आणखी चमकवून ठेवायचं असेल, किंवा कॉलेजांमध्ये जाऊन जाहिरातीची पत्रकं वाटायची वगैरे अशी कामं असतील. पण अविनाशनी एक अनपेक्षित प्रस्ताव ठेवला.
आम्ही व्यायाम करंत असताना जे कोणी जिम बघायला येतील त्यांना आम्ही आमचे अनुभव सांगायचे! आम्ही ‘व्यायामशाळां’मध्ये व्यायाम करतंच होतो. त्यात आणि यात काय फरक वाटतो ते सांगायचं. काहीही खोटेपणा नसल्यामुळे आम्ही लगेचंच राजी झालो.
आम्हाला ते व्यायामप्रकार मनापासून आवडायचे. जिम पाहायला येणार्या प्रत्येकाला ठरल्याप्रमाणे आम्ही त्याबद्दल सांगायचो. त्यातून मी गप्पिष्ट असल्यामुळे वाहावत जाऊन जरा अतीच वर्णन करायचो. लगेचंच अविनाशनी मला झापलं!
तेव्हां त्यानी मला एक interesting वाक्य ऐकवलं. “सत्य ही अशी एकमेव वस्तू आहे की ज्यात तुम्ही भर घालू शकत नाही. कारण मग ते सत्यच राहात नाही.”
त्यानी मला सगळ्यांसमोर झापल्यामुळे मी खट्टू झालो खरा, पण बिझनेसची जरूर असूनदेखील अविनाशनी खरं बोलण्यावर इतका आग्रह धरला याचं मला अतिशय कौतुक वाटलं.
आम्ही पाच सात महिने व्यायाम केला, माहिती दिली अन् रोज मिल्क शेक प्यायलो. हळुहळु लोकांचा राबता वाढला. गर्दी वाढल्यावर आमचं तिथे जाणं बंद झालं. त्यानंतर आयुष्यात माझा तळवलकर जिमशी संबंध आला नाही. पुढे ‘तळवलकर जिम’ हा ब्रॅण्ड सशक्तपणे वाढला हे सगळ्यांना माहीतच आहे.
‘इन्स्टंटका जमाना है भाई’ असं जरी म्हटलं जात असलं तरी उपयुक्त सर्विस जर आपण लोकांना दिली आणि तातडीच्या नफ्याकडे आकर्षित न होता सचोटीनी धंदा केला तर कालांतराने तो देखील खूप यशस्वी होऊ शकतो हा तळवलकर जिम, चितळे बंधू वगैरेंचा अनुभव आपल्यासारख्यांसाठी आश्वासकच आहे हे नक्की.
प्रतिक्रिया
18 Aug 2016 - 3:02 pm | तर्राट जोकर
नेहमीप्रमाणे हटके लिखाण. आवडले. विचारप्रवर्तक व मनोरंजक, दोन्ही एकाच टिकटात.
18 Aug 2016 - 3:25 pm | नाखु
अगदी शर्करागुंठीत औषध.
आवडीचं आणि परिणामकारकही.
पुभाप्र (बोटीचे बोट अजून सोडले नाही आम्ही वाचकांनी)
18 Aug 2016 - 3:52 pm | शलभ
+१
मस्त ले़ख. आवडला.
तजो, खूप दिवसांनी..तुमच्या गोष्टीची वाट बघतोय..
18 Aug 2016 - 3:15 pm | पद्मावति
+१
18 Aug 2016 - 3:18 pm | महासंग्राम
सहीच.... तळवलकर्स हिस्ट्री वाचुन वाटलं
18 Aug 2016 - 3:18 pm | कपिलमुनी
लेख आवडला !
चहा , कोलगेट फुकट द्यायचे किस्से ऐकीवात आहेत . त
18 Aug 2016 - 3:24 pm | एस
नेहमीप्रमाणेच जबरदस्त.
18 Aug 2016 - 3:29 pm | पगला गजोधर
तळवलकर जिम, चितळे बंधू आणि हल्दीराम....
चांगली क्वालिटी हमखास ...
(व्यैयक्तिक अनुभव)
18 Aug 2016 - 3:36 pm | वटवट
व्वा....
18 Aug 2016 - 3:53 pm | अमितदादा
मस्त लेख..आवडेश..
18 Aug 2016 - 4:12 pm | रघुनाथ.केरकर
"सत्य ही अशी एकमेव वस्तू आहे की ज्यात तुम्ही भर घालू शकत नाही. कारण मग ते सत्यच राहात नाही.”
18 Aug 2016 - 4:21 pm | सूड
ह्म्म !!
18 Aug 2016 - 6:49 pm | यशोधरा
खुसखुशीत लेख, आवडला!
18 Aug 2016 - 8:00 pm | मयुरा गुप्ते
आज तर त्यांची जागोजागी जिम्स थाटली आहेत.
मस्त लेख. व्यावहारीक चतुर तळवलकरांनी अतिशय गोड बोलुन, तरुणाईची नस पकडत, सगळ्यात महत्वाचे 'सत्यवचनाने' हळुहळु जि़कत आज बराच मोठा डोलारा उभा केलाय तर. कौतुक आहे.
--मयुरा
18 Aug 2016 - 8:19 pm | सुबोध खरे
तळवलकरांनी उच्चभ्रू वर्गात व्यायामाला प्रतिष्ठा दिली हि वस्तुस्थिती आहे. उत्तम आणि अत्याधुनिक यंत्रे आणून त्यांनी आपल्या व्यायामशाळांना जागतिक दर्जा दिला.
"सत्य ही अशी एकमेव वस्तू आहे की ज्यात तुम्ही भर घालू शकत नाही. कारण मग ते सत्यच राहात नाही.”
कुणीतरी "यंग अँड ओल्ड" सारख्या अमेरिकन कंपनीने करण्यापेक्षा तळवलकर सारख्या अस्सल मराठी माणसाने ७५० कोटी रुपयाच्या उभ्या केलेल्या उद्योगाचे कौतुक आहे. यात त्यांचे स्वतःचे भागभांडवल ६० % आहे.
"चितळे बंधू" ना आपण नावे ठेवतो कि "बाकरवडी संपली" परंतु यंत्रावर बनवण्यात आलेल्या बाकरवाडीचा दर्जा हाताने बनविण्यात आलेल्या बाकरवडी इतका येईपर्यंत त्यांनी आपला दर्जा राखून ठेवला होता. उगाच पातळ पाणी घालून दह्याचे ताक केले नाही. त्यांचेही कौतुक करावे तितके थोडे.
18 Aug 2016 - 8:21 pm | सुबोध खरे
आपण अशा उद्योजकांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून मराठी माणसाच्या पुढच्या पिढीतील "उद्योगांना आणि उद्योजकांना" प्रोत्साहन दिले पाहिजे हा यातून संदेश मिळावा. नाही तर आपली खर्डे( कीबोर्ड)घाशी आहेच दुसऱ्यासाठी श्रम करण्यासाठी.
18 Aug 2016 - 8:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर अनुभव ! मोजक्या मराठी उद्योजकांमधे असलेल्या नावाची स्वानुभवावर आधारलेली ओळख भावली.
"सत्य ही अशी एकमेव वस्तू आहे की ज्यात तुम्ही भर घालू शकत नाही. कारण मग ते सत्यच राहात नाही.”
१००% सत्य :)
कारण, सत्यात थोडीशी भर घातली की त्याचे अर्धसत्य बनते आणि भरीचा अतिरेक केला की त्याचे असत्य बनायला वेळ लागत नाही.
19 Aug 2016 - 12:11 am | अजया
लेख नेहमीप्रमाणेच आवडला हे वे सां न!
18 Aug 2016 - 10:25 pm | खटपट्या
तळवळकर जीम मधे प्रवेश घ्यावा हे एक स्वप्न होते पण तेव्हा पैशांअभावी पुर्ण झाले नाही. आता पैसे आहेत पण तळवळ्कर नसली तरी दुसरी जीम लावली आहे.
थोडे अवांतर - मधे मीलींद सोमण दील्लीहून मुंबैला धावत आला. तेव्हा त्याने सांगीतले की आपल्याकडे व्यायामाबद्द्ल खूपच उदासीनता आहे. भारतीय स्वतःला फीट ठेवण्यासाठीसुद्धा व्यायाम करत नाहीत. यात बदल होण्याची गरज आहे. क्रीडा क्षेत्रातील पीछेहाटीला सुध्दा व्यायाम संस्क्रुती नसणे हेच कारण आहे. परदेशात १० पैकी ५ लोक्स तरी व्यायाम शाळेत जातातच.(विदा नाही. निरीक्षणावरुन सांगतोय) त्यामुळे जागोजागी सुसज्ज व्यायामशाळा आहेत. रोज नियमीत व्यायाम केल्यामुळे काय बदल होतात हे सांगण्याची गरज नाही पण मागील सहा महीने जो अनुभव घेतोय तो स्वप्नवत आहे. मिलींदच्या सांगण्याप्रमाणे मुळ समस्या मानसिक आहे. एकदा व्यायामशाळेत गेलो की सर्व काही व्यवस्थीत होते, गरज आहे ती फक्त उठून व्यायामशाळेच्या रस्त्याला लागण्याची. तीथेच खरी मनाची मारामारी सुरु होते, एकदा ती जींकली की बास. रोज २० मिनिटे जोरात चालण्यानेही खूप फरक पडतो. विश्वास नसेल तर करुन पहा. मिपाकरांनी निरोगी रहावे म्हणून माझे दोन शब्द...
19 Aug 2016 - 1:04 am | अंतु बर्वा
१००% सहमत. मागच्या २ महिन्यांपासुन सकाळी ६ ला उठुन धावायला जातोय. आधी एक दिड आठवडा वाटायचं की कशाला इतका जीव काढायचाय? ते सुद्धा सकाळची एक तासाची झोप घालवुन. पण निर्धार करुन जात राहीलो आणि आता एखादा दिवस नाही गेलो तरी दिवसभर चल्बिचल होत राहते.आणि पुर्ण दिवस फ्रेश वाटतं, भुक चांगली लागते वर फ्रीचं वायटॅमिन डी :-)
20 Aug 2016 - 12:59 am | सूड
खरंय!!
20 Aug 2016 - 1:02 am | खटपट्या
:)
18 Aug 2016 - 10:52 pm | स्वीट टॉकर
सर्वजण,
धन्यवाद!
बोटीचा जोर ओसरला आहे कबूल. येईल परत महिन्याभरात.
18 Aug 2016 - 10:54 pm | इना
:) नेहमीप्रमाणे छान लेख!
18 Aug 2016 - 10:59 pm | रातराणी
लेख आवडला!
18 Aug 2016 - 11:06 pm | माम्लेदारचा पन्खा
काळजाला भिडले !
19 Aug 2016 - 12:01 am | ज्योति अळवणी
लेख खूप आवडला
"सत्य ही अशी एकमेव वस्तू आहे की ज्यात तुम्ही भर घालू शकत नाही. कारण मग ते सत्यच राहात नाही.” अगदी पटलं
19 Aug 2016 - 12:22 am | बहुगुणी
दुसर्या एका धाग्यात हायब्रिड बायसिकल पासून वीजनिर्मिती या प्रकल्पाविषयी वाचल्यावर दुर्गम भागांत तसंच शहरांतही जिम्स मध्ये अशा हायब्रिड सायकल्स बसवून त्यांपासून वीज निर्माण करता आली तर व्यायामापरी व्यायाम आणि सामाजिक उत्थानासाठीही मदत, अशा दोन्ही गोष्टी साध्य होतील असं वाटलं.
19 Aug 2016 - 12:56 am | अर्धवटराव
१ कोटी लोकांना २४/७ साकयल + इतर मॅकेनिकल यंत्रणा चालवायला देऊन संपूर्ण देशाची वीजेची गरज भागवण्याचा उद्योग सध्या आमच्या डोक्यात चालु आहे. बघु कसं जमतं ते.
20 Aug 2016 - 4:31 am | अस्वस्थामा
आमच्या आवडत्या मालिकेतला हा "फिफ्टीन मिलियन मेरिट" हा भाग याच, अगदी याच कन्सेप्टवर आहे बघा (गोष्ट वेगळीय आणि जबरा आहे खरं तर).
19 Aug 2016 - 7:45 am | कैलासवासी सोन्याबापु
लेख खूप आवडला सर, प्रचंड जास्त कनेक्ट झाला.
19 Aug 2016 - 12:14 pm | निर्धार
"सत्य ही अशी एकमेव वस्तू आहे की ज्यात तुम्ही भर घालू शकत नाही. कारण मग ते सत्यच राहात नाही.”
फार आवडल आणि 100% पटल
19 Aug 2016 - 12:15 pm | संत घोडेकर
लेख आवडला.
19 Aug 2016 - 12:30 pm | शान्तिप्रिय
मस्त लेख!
19 Aug 2016 - 12:38 pm | मृत्युन्जय
तळवळकरांची तळमळ भावली आणी प्रामाणिकपणा प्रामाणिकपणे आवडला
19 Aug 2016 - 12:52 pm | जगप्रवासी
हेच म्हणतो आणि नेहमीप्रमाणेच छान लेख
19 Aug 2016 - 1:20 pm | मोदक
+ १११११
19 Aug 2016 - 1:53 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला,
स्वाती
19 Aug 2016 - 3:50 pm | संजय पाटिल
लेख आवडला..
19 Aug 2016 - 4:00 pm | मंदार कात्रे
लेख आवडला..
19 Aug 2016 - 4:18 pm | सस्नेह
लेख आवडला.
20 Aug 2016 - 10:42 am | मुक्त विहारि
आमच्या (अद्याप तरी डोंबोली आमचीच आहे.) डोंबोलीत पण "तळवलकर" यांची जिम आहे.
त्यांना तुमचा लेख वाचायला दिला तर चालेल का?
20 Aug 2016 - 1:13 pm | स्वीट टॉकर
आपलं लेखन जास्तीत जास्त लोकांनी वाचावं ह्यातच मजा आहे.
तिथे जर तळवलकर कुटुंबातला कोणी असेल तर त्याला जास्तच मजा येईल.
20 Aug 2016 - 11:00 pm | विवेकपटाईत
लेख आवडला. मला नेहमीच धंद्यात उतरलेल्या आणि यशस्वी झालेल्या मराठी माणसाचे कौतुक वाटते. बाकी विज्ञापन साठी पारिश्रमिक म्हणून केवळ मिल्कशेक मिळाला, चालेल.