थक्क करणारी एक घोडदौड

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
15 Jun 2016 - 1:01 pm

पेला अर्धा भरला आहे.. पेला अर्धा सरला आहे... पाडगावकरांच्या या कवितेतले भाव इतके कालातीत आहेत की बास! आणि क्षणोक्षण त्याचा प्रत्यय येत राहतो. शंभर व्यक्ती भेटतात, शंभर गोष्टी कानावर पडतात. नाव, गाव, चेहरा, व्यवसाय या पलिकडची माणसाची एक ओळख असते ती म्हणजे त्याचा विचार. त्याला दृष्टिकोन म्हणा, स्वभाव म्हणा, किंवा अ‍ॅटिट्यूड म्हणा इंग्लिशमधे. हा अ‍ॅटिट्यूड माणसाची खरी ओळख करून देतो, तोच माणसाला घडवतो किंवा बिघडवतो. बाकी सगळं दुय्यम असतं.

संकटं, अडचणी सगळ्यांनाच येतात. काही त्यात खचतात, काही त्यातही रचतात, काही विरतात, काही उरतात, काही पडतात, काही घडतात. अ‍ॅटिट्यूड. परवा याच अ‍ॅटिट्यूडचं एक लाजवाब उदाहरण बघायला मिळालं. बघायलाच नव्हे, त्याच्याशी बोलायला मिळालं. मुलाला टांग्यात बसवायला घेऊन गेलो असता, सवयीनुसार टांगेवाल्याची विचारपूस केली आणि मातीत सहज हात घातल्यावर एखादं रत्न हाती लागावं तसं झालं.

नंदकुमार असं त्या घोडेवाल्यांचं नाव. माणूस तसा वयस्कर आहे. दिवसाला पाच ते सहा फेर्‍या मिळतात, आणि सहाशे सातशे रुपये घरी नेता येतात. 'इतक्यात भागतो घोड्याचा खर्च बिर्च?' असं विचारल्यावर ते म्हणाले, 'इच्छा असेल ना, तर सगळं शक्य होतं.'

नंदकुमारांकडे एक नाही, दोन घोडे आहेत. एक हा चॉकलेटी आणि एक पांढरा आहे. तो लग्नामुंजीला जातो. ते गेली पस्तीस वर्षं टांगा चालवत आहेत. 'पूर्वी चार आण्यात स्टेशन ते टेंभी नाका आणायचो, आता तुम्हाला चार आणे माहितही नसतील.', असं म्हणत ते आठवणीत रमले. 'मी रेल्वेत कामाला होतो. परिस्थिती अतिशय बेताची. पण रेल्वेची डुटी संपली की उरल्या वेळात टांगा चालवायला लागलो. आता रिटायर्ड आहे. पेन्शन येतंय. पण टांगा चालवतो अजूनही. सवय झालीय, सुटत नाही आणि त्रासही होत नाही. मुलं म्हणतात, कशाला आता हे करताय? आराम करा... पण तरीही करतो. मन रमत नाही याशिवाय.'

मी यातच प्रेरित झालो होतो पण पुढे अजून भारी माहिती कळायची होती. 'मुलं काय करतात?' मी विचारलं. 'एक लंडन ला असतो; आणि दुसरा दुबईला.' हे उत्तर ऐकलं आणि मला पुढे काय विचारावं हेच कळेना. फक्त हँडशेक केला त्यांना. त्यांची ही थक्क करणारी घोडदौड ऐकून मी अवाक झालेलो होतो. त्यांचंच वाक्य घोकत होतो, 'इच्छा असेल ना, तर सगळं शक्य होतं.'

हेच सिद्ध करणारा एक रिक्षावाला मागे भेटला होता. ठाण्याहून अंधेरीला कुठल्याशा मिलमधे कामाला जाणार्‍या त्याने कर्ज काढून रिक्षा घेतली. दूरदृष्टी वाखाणण्याजोगी होती त्याची. रिक्षामुळे त्याची जायची यायची सोय झाली. ठाण्यावरून सकाळी भाडं घेऊन तो जातो, दिवसभर दुसर्‍या एकाला रिक्षा भाड्याने चालवायला देतो, आणि येताना पुन्हा भाडं घेऊन ठाण्याला येतो. आहे त्या परिस्थितीत त्याने दुसरा भक्कम उत्पन्नस्त्रोत तयार केला; हो तयार केला, याला शोधणं म्हणता येत नाही. टांगेवाल्यासारखंच हे उदाहरण. आमच्या कंपनीतला कँटीनबॉय संध्याकाळी कपड्यांचा स्टॉल लावतो. त्याचाही तोच फंडा. हातपाय हलवत रहायचे. क्रिएटिंग ऑपॉर्च्युनिटीज. अनेक उदाहरणं ठाऊक आहेत आणि या मंडळींशी बोलून फार उत्साह येतो, उमेद येते.

या उलट अशी अनेक जणं माहितीत आहेत, ज्यांनी गरिबी, कंपनी बंद पडणं, जवळची व्यक्ती जाणं, योग्य संधी न मिळणं, लग्न न होणं, इत्यादी अनेक कारणांमुळे आपल्या आकांक्षा, इच्छांचा कप्पाच बंद करून टाकला. जिद्द बिद्द फंडेच झुगारून दिले आणि उरलेलं आयुष्य निव्वळ वैफल्यग्रस्त राहण्यात आणि इतरांना करण्यात घालवलं; घालवतायत. त्यांचं वाईटही वाटतं, पण चूकही वाटतं. They seal their own fate.

असो. पहिल्या कॅटेगरीतली माणसं नियमित भेटत राहूदेत अशीच मी नेहमी इच्छा करतो. It keeps you pushing towards your goals.

ता.क. ठाण्याला तलावपाळीला मागे 'नंदकुमार' लिहिलेला टांगा दिसल्यास एक फेरी जरूर मारा असं सुचवेन.

समाजजीवनमानलेखअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

15 Jun 2016 - 1:40 pm | मुक्त विहारि

"'इच्छा असेल ना, तर सगळं शक्य होतं.'"

ह्याला प्रचंड अनुमोदन.

स्पा's picture

15 Jun 2016 - 1:47 pm | स्पा

ओहके

अभ्या..'s picture

15 Jun 2016 - 2:10 pm | अभ्या..

मस्त, मला असे व्यवसाय करणाऱ्या पेक्षा काहीतरी स्पेशालाईज्ड व्यवसाय करणारं पब्लिक लै इंस्पायर करतं.
दोन मस्त उदाहरणे आहेत.
आमच्या प्रिंटिंग क्षेत्रात ज्यांच्याकडे मशीन्स असतात त्या सगळ्याकडे पेपर कटर मशीन नसते. त्यासाठी चांगलं सुस्थितीतले वापरातल मशीन आणि स्किल्ड कटर लागतो. सगळ्या प्रेसवाल्याना ते ठेवणे परवडत नाही. एक फॅमिली आहे सोलापुरात.ते फक्त हेच काम करतात तीन पिढ्यापासून. फक्त कागद कापून देणे. मस्त कमावतात.
तसाच एक जण फक्त ह्या मशीनच्या ब्लेडना धार लावून देण्याचे काम करतो. त्यासाठी अगदी इंपोर्टेड मशिनरी आणलीय.
दुसरे उदाहरण एका वृद्ध माणसाचे आहे. तो एका ज्ञातीच्या संस्थेत कामाला होता. ज्ञाती व्यापारी आहे. त्या ज्ञातीत कुणाचेही मंगल कार्य असले की त्या माणसाला बोलावतात. त्याच्याकडे सगळ्या समाजाचा लेटेस्ट डेटाबेस आहे. तो प्रॉपरली फिल्टर लावून पत्रिकांचा आणि जेवायला येणाऱयांचा सुद्धा काऊंट सांगतो, तेवढ्या पत्रिका दोन दिवसात सायकलवरून नावे वगैरे टाकून पोहोच करतो, पोच म्हणून सह्यांचा कागद पण आणून देतो. पर पत्रिका ऑर सारक्युलेहशन तो 3 रु घेतो. सीझन मध्ये इतका काम करतो कि दोघे जण कामाला ठेवतो. लग्नहंगाम सोडून इतर काळात वास्तुशांत्या उद्घाटने वगैरे असतातच.

वेल्लाभट's picture

15 Jun 2016 - 2:24 pm | वेल्लाभट

क्लास!

रियली.

लेखाइतकाच सुंदर प्रतिसाद.

जगप्रवासी's picture

15 Jun 2016 - 2:26 pm | जगप्रवासी

मस्त

उल्का's picture

15 Jun 2016 - 2:33 pm | उल्का

या मंडळींशी बोलून फार उत्साह येतो, उमेद येते.

या मंडळींविषयी वाचून सुद्धा येतो. :)

प्रमोद देर्देकर's picture

15 Jun 2016 - 3:12 pm | प्रमोद देर्देकर

अपुर्वा ती माणसे वगैरे भेटणे नंतर, मला मिपावरील अनेक लोकांपैकी भेटलेला एक भयानक सकारात्मक विचारसरणीचा तु मिपाकर आहेस असे वाटते. तुझे लेख वाचुन मनाला खुप उभारी येते, काम करायचा उत्साह वाढतो. रोजच्या आयुष्यातल्या प्रसांगातुन तु कुठुन कुठुन काय काय शोधुन काढतोस. असेच लेख लिहित रहा ही विनंती.
बाकी ठाण्याला मी ही लहान मुलाला घेवुन दर रविवारी जातोच जातो. फक्त मुलगा मोठा झाल्याने टांग्यात बसणं कमी झालंय आणि आता तर सगळे टांगावाले एल.सी. डी. लाईट , डी.जे. वगैरे लावुन सज्ज झालेत.
एवढेच काय एक वातानुकूलीत (A/c) टांगाही आलाय तलावपाळीला फेरी मारायला.

वेल्लाभट's picture

15 Jun 2016 - 3:25 pm | वेल्लाभट

धन्यवाद प्रमोद देर्देकर

हो तलावपाळी बदललीय प्रचंड. एलईडी, डेक, एसी... सगळे टांगे आहेत. मजा आहे. मला अजूनही मजा येते त्यात बसायला. मोठे झालो म्हणून काय झालं.

ठाण्यात बग्गिला टांगा म्हणतेत व्हय? टांगा येगळा. एक घोडा, दोन चाकवाला. चल मेरी धन्नो वाला.
तसले टांगे सोलापूर मध्येच 1 2 असतील. ठाण्यात नसावेत.

सौंदाळा's picture

16 Jun 2016 - 2:54 pm | सौंदाळा

+१
सोलापुर एस.टी स्टँड्वरुन टांग्यातुन मामाकडे जायचो.
एकदा रेवणसिद्धेश्वरच्या प्राणिसंग्रहालयात पण टांग्याने गेलो होतो. मधेच रेल्वे क्रॉसिंग लागले फाटक बंद होते. थोड्या वेळाने ट्रेनचा भोंगा ऐकल्यावर घोड्याने पुढचे दोन पाय वर केल्यावर आमची अशी काही तंतरली होती की बास..

नाखु's picture

16 Jun 2016 - 3:44 pm | नाखु

पुणे स्टेशनला आणि काही वेळा स्वारगेटला टांग्यात बसलो आहे (शालेय वयात).
नंतर टांगेवाले गायब झाले तर घोडे वरातीत दिसू लागले (आधी गणपतीच्या) नंतर लग्नाच्या..

यादगार नाखु

खटपट्या's picture

16 Jun 2016 - 10:22 pm | खटपट्या

ठाण्यात बग्गी आणि टांगे दोन्ही आहेत अजून. टांगे आता मच्छीच्या टोपल्या वाहून नेण्यासाठी वापरतात. मच्छीवाल्यांना रीक्शावाले घेत नाहीत.

रुस्तम's picture

15 Jun 2016 - 3:49 pm | रुस्तम

सहमत

लेखन आवडले. खरच जिद्दीची माणसे आहेत ही!

टवाळ कार्टा's picture

15 Jun 2016 - 3:38 pm | टवाळ कार्टा

:)

नाखु's picture

15 Jun 2016 - 3:47 pm | नाखु

जगण्याची फक्त उमेद असण्यापेक्षा मार्ग शोधणारी ही रत्ने खरेच प्रेरणास्थान (उर्जास्थान हा शव्द जास्त योग्य होईल, कारण प्रेरणाला फलकांनी लाज आणली आहेच)

अशीच अनवट आणि "अपुर्व" माहीती येऊदेत.

या जन्मावर शतदा प्रेम करावे वाला नाखु

सुबक ठेंगणी's picture

15 Jun 2016 - 4:51 pm | सुबक ठेंगणी

लेख आवडला.
गोट्या पुस्तकातल्या "बघलं केलं आलं" ची आठवण झाली.

चतुरंग's picture

15 Jun 2016 - 8:57 pm | चतुरंग

चार्ज्ड माणसं असतात ही, आपल्यालाही फुल्ल चार्ज करुन जातात!
अतिशय छान अनुभव.

-रंगा

चांगलं जीवन जगताहेत.स्वत:साठी,इतरांसाठी.
दखलपात्र धागा.

खटपट्या's picture

15 Jun 2016 - 10:15 pm | खटपट्या

जबरदस्त माणसे. अशी माणसे पाहीली की खूप हुरुप येतो जगण्यासाठी.
माझे एक उदाहरण - आमच्या ओळखीच्या एक आजी आहेत. वय ६५. रोज सकाळी उठून ठरलेला भाजीचा ट्रक पकडून नाशिकला जातात. त्या ट्रकमधे परप्रांतीय भाजीवालेही असतात. ट्रकमधे मागे बसून जातात हे विशेष. नाशिकच्या शेतकर्‍यांच्या मळ्यामधून भाजी विकत घेतात. ११ ते १२ ला परत ठाण्यात येतात. जेउन थोडावेळ आराम करतात. संध्याकाळच्या बाजारात नाशिकहून आणलेली भाजी विकतात. १००० रु ची भाजी १७०० ते १८०० ला विकतात. कधी कधी दीवसाला रू. १००० ही कमावतात. आणि हे त्या रोज करतात. एकही दीवस सुटी घेत नाहीत. त्यांचे दोन मुलगे हमालीचे काम करतात. या आजी जेव्हा गरज लागेल तेव्हा दोघांच्या संसाराला मदत करतात.

वेल्लाभट's picture

15 Jun 2016 - 10:30 pm | वेल्लाभट

काहीच्या काही!!!!!!!!!

खतरनाक यार

हॅट्स ओफ

चाणक्य's picture

15 Jun 2016 - 10:28 pm | चाणक्य

सहीच.

बोका-ए-आझम's picture

15 Jun 2016 - 11:00 pm | बोका-ए-आझम

हा अनुभव share केल्याबद्दल धन्यवाद वेल्लाभट!असे सकारात्मक लोक आपल्याला नेहमीच प्रेरित करतात.

अतिशय उत्साही, तत्पर आणि नेमके काम करणारी. तिच्या क्यूबमध्ये एक प्रिंटाऊट लावलाय "I am fighting cancer, what is your super power?"
पहिल्यांदा जेव्हा हे वाचलं तेव्हा बराचवेळ काहीच सुधरत नव्हतं. अर्थात हे उदाहरण या ठिकाणी कितपत लागू आहे मला माहीत नाही परंतु जीवनाला (की मरणाला?) आमनेसामने भिडणारी आणि सकारात्मक व्यक्ती म्हणून मला हे मोलाचं वाटलं!

यशोधरा's picture

15 Jun 2016 - 11:51 pm | यशोधरा

अतिशय सकारात्मक धागा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jun 2016 - 12:12 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर धागा ! अशी केवळ सकारात्मक विचार नव्हे तर प्रत्यक्ष कृती करणारी माणसे नेहमीच एक उत्साह देऊन जातात !!

खटपट्या's picture

16 Jun 2016 - 12:25 am | खटपट्या

+१००

पिशी अबोली's picture

16 Jun 2016 - 9:04 am | पिशी अबोली

आवडली त्या माणसाची जिद्द!
धाग्यावरील इतर प्रतिसादांमधील माणसेही आवडली..

वेल्लाभट's picture

16 Jun 2016 - 10:06 am | वेल्लाभट

या निमित्ताने इतर अनेक अशी माणसं कळतायत... छान वाटतंय.

लेख आवडला आणि प्रतिसादही. अशी सकारात्मकता कृतीत आणणारी माणसे खरंच इतरांनाही उर्जा देण्याचे काम करतात. आपण क्धी निराशेच्या भावनेने त्रस्त झालो आणि त्यावेळेस असे काही वाचनात आले की खरंच उत्साह
देऊन जातात आणि आपलाच द्रूष्टीकोन तपासता येतो.
हा अनुभव इथे मांडल्याबद्दल खुप धन्यवाद !

प्रिया

समीरसूर's picture

16 Jun 2016 - 11:38 am | समीरसूर

सकाळी सकाळी प्रसन्न वाटलं हा लेख वाचून. सुरेख लेख.

नुकतेच (एप्रिलमध्ये) आमच्या घरी (म्हणजे माझ्या मोठ्या भावाच्या घरी) दोन मोठे सोहळे पार पडले. दोन दिवस कार्यालयात दोन समारंभ होते. आलेले पाहुणे खूप होते. बरेच पाहुणे कार्यक्रमाच्या दिवसाच्या दोन दिवस आधी आलेले होते. आम्ही घरातले ९-१० आणि घरी आलेले २०-२५ पाहुणे असा ४-५ दिवस रोज ३५-४० माणसांचा स्वयंपाक घरी करायचा होता. माझ्या वहिनींच्या परिचयातले भोसरीमध्ये राहणारे एक जोशी काका आहेत. घरी स्वयंपाकासाठी या काकांना बोलावले होते. पन्नास माणसांचा साग्रसंगीत स्वयंपाक हे काका एकटे सहज करतात. त्यापेक्षा जास्त माणसे असतील तर त्यांच्या पत्नीदेखील येतात. पहाटे ४:३० ला उठून या काकांनी पूजेचा जवळपास पन्नास लोकांचा स्वयंपाक दुपारी १ वाजेपर्यंत तयार ठेवला. या दिवशी जरा जास्त माणसे जेवायला होती.

पुरणपोळी, दोन भाज्या, दोन चटण्या, कोशिंबीर, भात, वरण, मूगवडे, पंचामृत, शिरा असा ५० लोकांचा स्वयंपाक जोशी काकांनी करून ठेवला होता. जेवण सुरेख होते. चव अप्रतिम! सगळे खुश झाले. हे काका साधारण ६०-६५ च्या दरम्यान. गोरे आणि चेहरा अत्यंत सात्विक. बोलणेदेखील एकदम मिठास. पुढील ३-४ दिवसांचा सगळा (दोन्ही वेळचा) स्वयंपाक यांनी उत्तम पद्धतीने केला. त्याशिवाय जेव्हा हवा तेव्हा आणि तितका चहा, सकाळी नाश्ता, संध्याकाळचे खाणे, आणि समारंभासाठी लागणारे अनारसे, चिवडा, करंज्या वगैरे या काकांनी अतिशय सुरेख केले. अनारसे तर मी जन्मात कधी असे खाल्ले नव्हते. ते गरमागरम तळत होते आणि पाहुणे अनारशांचा आस्वाद घेत होते. मी १-२ दिवस तिथून कार्यालयात जात असे. दोन्ही दिवस सकाळी ६:४५ वाजता त्यांनी मला दुपारच्या जेवणाचा डबा हातात दिला.

आम्ही सगळे त्यांच्या हाताच्या चवीने, वक्तशीरपणामुळे, मधुर बोलण्यामुळे, त्यांच्या एक-एक अफलातून अनुभवांमुळे अगदी भारावून गेलो. मी त्यांच्याशी असाच बोलत बसलो होतो. मला प्रश्न होता की या वयात यांना ही धडपड का करायला लागत असेल. हे काका अशा ४-५ दिवसांच्या कामासाठी यजमानांकडे मुक्कामी असतात. जिथे व्यवस्थित जागा मिळेल तिथे झोपतात. कुठल्याच गोष्टीचा आग्रह अजिबात नाही. अगदी कमी आहार आणि तोदेखील सगळ्यांचे पोट भरल्यानंतर घेतात.

त्यांच्याशी बोलल्यानंतर मला कळले. त्यांचे भोसरीमध्ये एक मोठे स्वतंत्र घर आहे. त्यांचा एक मुलगा अमेरिकेत एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर आहे. धाकटा मुलगा हैदराबादला एका नामांकित आयटी कंपनीमध्ये काम करतो. धाकटी सून पुण्यात पीडब्लूडी मध्ये नोकरीला आहे आणि गरज पडल्यास सासऱ्यांना जशी जमेल तशी मदत करते. धाकटा मुलगा पुण्यात असला की जमेल तशी आई-वडिलांना मदत करतो. मी हे ऐकून अवाक झालो.

माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह बघून ते काकाच म्हणाले "मला स्वयंपाकाची आवड आहे. देवाच्या कृपेने मला आरोग्याच्या तक्रारी फार अशा कधीच नव्हत्या. माझ्या पत्नीलादेखील देवदयेने चांगले आरोग्य लाभले आहे. आमचा आधी केटरिंगचा मोठा व्यवसाय होता. सचोटीने काम करायचे आणि जास्तीत जास्त लोकांना चांगले खाऊ घालायचे याचा मला सदोदित ध्यास होता आणि आहे. बऱ्याच परिस्थिती फारशी चांगली नसलेल्या घरांमध्ये मी स्वत:हून मोफत काम करतो. अजून मला हे सगळं व्यवस्थित जमतंय आणि आवडतंय तर का नाही करायचं? मुलं, सुना म्हणतात की आता आराम करा पण घरी नुसतं बसून रहायचं मला पटत नाही आणि आवडतही नाही. शिवाय खूप वेगवेगळी माणसे भेटतात. नवनवीन अनुभव येतात. लोकांचे स्वभाव जवळून बघायला, अनुभवायला मिळतात. त्यातून मी अधिकाधिक समृद्ध होत जातो. मला माझं काम खूप आवडतं आणि जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत ते मी करत राहणारच आहे." चहाचा कप माझ्या हातात देत ते म्हणाले.

कार्यालयातले दोन्ही कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही तिसऱ्या दिवशी घरी आलो. त्याच्या दुसऱ्या दिवशी घरी घरी पुन्हा पूजा होती. काकांनी झकास स्वयंपाक केला होता. सगळ्यांनी जेवणावर ताव मारला. स्वयंपाकाचा सगळा भार हलका झाल्याने घरातल्या महिलावर्गाला प्रत्येक कार्यक्रमात, गप्पांमध्ये, गाण्यांच्या कार्यक्रमात, मेंदीमध्ये, बांगड्यांमध्ये वगैरे मनसोक्त भाग घेता आला. कार्यक्रमाच्या सगळ्या दिवसांचा संपूर्ण आनंद त्यांना घेता आला. ही खूप जमेची बाजू होती. नाहीतर समस्त महिलावर्गाचा सगळा वेळ स्वयंपाकातच जातो. ही कल्पना सगळ्यांना खूपच आवडली.

पूजेच्या दिवशी मी संध्याकाळी कार्यालयातून घरी पोहोचलो. काका आपले सामान (म्हणजे फक्त एक छोटी पिशवी) घेऊन निघून गेले होते. अशाच कुठल्यातरी कार्यक्रमासाठी कुणाच्या तरी घरी चविष्ट स्वयंपाक करण्यासाठी. मला उगीच चुटपूट लागून राहिली. पुढचे १-२ दिवस आम्ही त्यांना खरोखर मिस केले. नुसत्या त्यांच्या चवदार जेवणासाठी नाही; तर त्यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्वासाठी, मोकळ्या स्वभावासाठी, कामसू वृत्तीसाठी, आणि विचारांतल्या खुलेपणासाठी! प्रेरणेसाठी नेहमी आभाळाएवढ्या माणसांकडेच पाहण्याची गरज नसते. आपल्या आस-पासच जगण्याची अशी स्वच्छ आणि सकारात्मक नजर देणारे बरेच असतात!

आदिजोशी's picture

16 Jun 2016 - 12:13 pm | आदिजोशी

१ नंबर रे. मस्त अनुभव आणि काकाही.

सुबक ठेंगणी's picture

16 Jun 2016 - 1:27 pm | सुबक ठेंगणी

जियो जोशीकाका :)

वेल्लाभट's picture

16 Jun 2016 - 12:17 pm | वेल्लाभट

_/\_
समीर काय भारी वर्णन केलंयस हे!
शब्दच नाहीत. ते काकाही अफलातून आणि तुझं वर्णनही.
क्लास.

जिन्गल बेल's picture

16 Jun 2016 - 5:39 pm | जिन्गल बेल

जोशी काकांना _/\_

अजया's picture

16 Jun 2016 - 6:30 pm | अजया

या काकांना, लेखातल्या व्यक्तीला, सर्वच प्रतिसादांमधील सकारात्मक काम करणार्या व्यक्तींना साष्टांग _/\_
वेल्ला, असा धागा काढल्याबद्दल धन्यवाद!

चतुरंग's picture

16 Jun 2016 - 6:49 pm | चतुरंग

अतिशय सुंदर अनुभव समीरसूर. जोशीकाकांना आमच्या शुभेच्छा जरुर सांगा. आपल्याला जे आवडतंय ते मनापासून करीत राहणे आणि दुसर्‍यासाठी करत राहणे अशी माणसं कमी होत चालली आहेत हे नक्की. पण तरीही जोशीकाकांसारखी माणसं वाचली की सगळं बाजूला सारून आपण आयुष्य किती सुंदर आहे याचा विचार करु लागतो हीच जमेची बाजू!
चांगलं पेरत रहा, चांगलं उगवत राहील! :)

समीरसूर's picture

17 Jun 2016 - 9:24 am | समीरसूर

अगदी मनातलं बोललात.

यशोधरा's picture

17 Jun 2016 - 2:27 am | यशोधरा

सह्हीच! ह्या काकांचा नंबर मिळेल का?

समीरसूर's picture

17 Jun 2016 - 9:23 am | समीरसूर

व्यनि केला आहे आपल्याला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jun 2016 - 4:09 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर प्रतिसाद ! स्पृहणिय उदाहरण !!

प्रेरणेसाठी नेहमी आभाळाएवढ्या माणसांकडेच पाहण्याची गरज नसते. आपल्या आस-पासच जगण्याची अशी स्वच्छ आणि सकारात्मक नजर देणारे बरेच असतात!

+१०००

चौकटराजा's picture

16 Jun 2016 - 12:26 pm | चौकटराजा

आपण ज्या मुक्त मनाने अशा विविध माणसांचा चौकशा करीत असता हेच खरे एक मस्त अ‍ॅटीट्यूड आहे. अशी माणसे आता जगात कमी होत चालली आहेत तुमच्यासारखी. " हौ आर यु ?" असा प्रश्न समोरच्यास न विचारणे हाच एक स्वभाव समाजाचा होत चालला आहे. सध्या तरी " तो" आपल्या बायकोला , मुलाला , मुलीला " हौ आर यू ?" असा प्रश्न विचारतो तरी. आणखी पन्नास वर्षानी " तो व ती " कदाचित फक्त " हौ अ‍ॅम आय?" एवढाच प्रश्न विचारतील. बाकी माणूस हा जगातील अत्यंत हिडीस तरीही वन्डरफुल स्पेशी आहे असे माझे मत॑ झाले आहे.

वेल्लाभट's picture

16 Jun 2016 - 12:47 pm | वेल्लाभट

धन्यवाद चौराकाका. आवडतं मला. आणि ज्या माणसांच्या चेहर्‍यांवर 'ग' किंवा 'मा' दिसत नाही त्यांच्याशीच गप्पा मारायला आवडतं.

बाकी माणूस हा जगातील अत्यंत हिडीस तरीही वन्डरफुल स्पेशी आहे असे माझे मत॑ झाले आहे.
याच्याशी प्रचंड सहमत.

चतुरंग's picture

16 Jun 2016 - 6:51 pm | चतुरंग

वेल्लाभटांच्या या 'कस्तुरीशोधक' अ‍ॅटीट्यूडचा हेवा वाटतो! :)

असंका's picture

17 Jun 2016 - 4:22 pm | असंका

प्रतिसाद पटला...आवडला!

रातराणी's picture

16 Jun 2016 - 1:33 pm | रातराणी

लेख आणि प्रतिसाद दोन्ही _/\_

स्वीट टॉकरीणबाई's picture

16 Jun 2016 - 2:44 pm | स्वीट टॉकरीणबाई

लेख तर मस्त आहेच, प्रतिसादही साजेसेच. त्यामुळे दुधात साखर.

जगप्रवासी's picture

16 Jun 2016 - 2:51 pm | जगप्रवासी

जितका लेख उत्साह वाढवणारा आहे तितकेच प्रतिसाद पण उत्साह वाढवतात.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

16 Jun 2016 - 5:50 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

जबरदस्त असतात अशी माणसे ,एक म्हणजे भविष्याचा विचार करने यांच्या गावी नसते ,दुसरं म्हणजे निराशावाद कशाशी खातात हेच माहीत नसते,प्रचंड कष्ट करायची नैसर्गिक इच्छा असते.
( माझ्यावर अशी वेळ आली तर मी आत्महत्याच करेण ,पांढरपेश्या लोकांना निराशावादाचा रोग असतो.)

दीपा माने's picture

16 Jun 2016 - 5:55 pm | दीपा माने

इच्छा तिथे मार्ग आणि पेला अर्धा भरलेला पाहण्यातच यशसिध्दी होत असते हाच जीवनमंत्र मी मानते.

नमकिन's picture

16 Jun 2016 - 6:15 pm | नमकिन

गेटवेला बंदीचे निर्देश घातलेले आहेत मुक्या प्राण्यांच्या हक्कासाठी कोर्टाने.

मस्त धागा. एकसे एक लोकं आहेत ही सगळी.
खटपट्या यांनी सांगितलेल्या आजी आणि समिरसूर यांनी वर्णन केलेले जोशी आजोबा यांच्याकडुन शिकण्यासारखं आहे.

चांगले अनुभव कथन!

"क्रिएटिंग ऑपॉर्च्युनिटीज" वरून आठवले.. इंजिनिअरींगच्या पहील्या वर्षात असताना एक कार्यक्रम केला होता त्यात सिनिअर्सपैकी एकेका विद्यार्थ्याने त्याने निवडलेली अभियांत्रिकी शाखा का निवडली ते सांगायचे होते. आमच्याकडे (सरदार पटेल) त्यावेळेस फक्त सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रीकल इतक्याच शाखा होत्या. इलेक्ट्रीकल वाल्याने ती शाखा कशी जोरात आहे हे वर्णन करून सांगत आधीपासून ठरवून त्यात अ‍ॅडमिशन मिळवली वगैरे सांगितले. मेकॅनिकलवाला म्हणाला की त्याला सिव्हीलला मिळाली होती. मग एक वर्ष भरपूर अभ्यास केला आणि ट्रान्सफर मिळवली कारण मेकॅनिकल कशी चांगली असते. सिव्हील वाला बिचारा ओशाळलेला होता. गिल्ट काँप्लेक्स दाखवत त्याने सिव्हील इंजिनिअरींग पण कसे चांगले असते वगैरे वगैरे लेक्चर दिले.

मग या सगळ्यांचे (म्हणजे अनुभवी विद्यार्थ्यांचे) आवडते "मित्रासारखे" असलेले पांचोली सर उभे राहीले. "उपदेशोही मुर्खाणां.." असे सुभाषित ते म्हणाले (मुर्ख वगैरे म्हणले तरी विद्यार्थ्यांना त्यात प्रेमाचे शब्दच दिसत होते. कुणालाही राग / व्यक्तीगत वाटले नव्हते). मग इंग्रजीत म्हणाले की "You are all fools! Engineers are supposed to create jobs and not supposed to demand! ते जेंव्हा तुम्हाला कळेल तेंव्हा समजेल की नक्की कुठे जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत ते!"

भाग्यश्री कुलकर्णी's picture

17 Jun 2016 - 11:05 am | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त धागा अन् प्रतिसाद पण एकसे एक. जगायला बळ देतात अशी माणसं

फार सुंदर लेख आणि प्रतिसाद.

नीलमोहर's picture

17 Jun 2016 - 11:25 am | नीलमोहर

प्रेरणादायी लेख आणि प्रतिसादही.

वेल्लाभट's picture

17 Jun 2016 - 12:50 pm | वेल्लाभट

सर्वांना अनेक धन्यवाद :) इथे अशीच अजून अजून व्यक्तींची माहिती येत राहिली तर फारच उतम होईल.

सिरुसेरि's picture

17 Jun 2016 - 1:36 pm | सिरुसेरि

छान लेख . या लेखामुळे नया दौर मधला दिलिपकुमारचा टांगेवाला आणी त्याने जोशात म्हणलेला "थुंक देना उसके मुंहपर जो अपनी बातसे पलट जाय ." हा डायलॉग सहजच आठवला .

हल्ली सगळीकडे शहरीकरणामुळे टांग्यांचे प्रमाण कमी झाले आहे . "टांगा पलटी घोडा फरार" अशीच स्थिती आहे .

अभ्या..'s picture

17 Jun 2016 - 1:41 pm | अभ्या..

"थुंक देना उसके मुंहपर जो अपनी बातसे पलट जाय ."

भारीच डॉयलॉग कि, आवडला.

स्नेहल महेश's picture

17 Jun 2016 - 1:58 pm | स्नेहल महेश

अतिशय सकारात्मक धागा.

धनंजय माने's picture

17 Jun 2016 - 4:27 pm | धनंजय माने

सुन्दर लेख आणि प्रतिसाद.

पैसा's picture

17 Jun 2016 - 6:47 pm | पैसा

लेख आणि प्रतिसाद आवडले.

राघवेंद्र's picture

17 Jun 2016 - 9:08 pm | राघवेंद्र

+१

फारएन्ड's picture

17 Jun 2016 - 9:33 pm | फारएन्ड

एकदम छान वाटले वाचून. समीरसूर व इतर अनेकांच्या प्रतिक्रियाही मस्त.

हा एक एकदम सकारात्मक उद्योग केलाय, वेल्लाभट! धन्यवाद :)

वेल्लाभट's picture

20 Jun 2016 - 2:21 pm | वेल्लाभट

सगळ्यांचेच आभार ! :)