खालील लेख वाचताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी
"त्या काळात एखाद्या कारकुनाचा पगार महिना ८ रुपये असायचा तर चांगल्या मास्तरांचा ३०-३५.''
बालगंधर्व.... भाग - १ पहिला...
बालगंधर्व.... भाग - २ शेवटचा.
प्रेक्षकांना बालगंधर्वांचे इतके वेड लागले होते की त्यांना त्यांचा आज आवाज लागला नाही किंवा इतर नट कोण होते याच्याशी काही घेणेदेणेच उरले नाही. नाटकाला जायचे बालगंधर्वांचा अभिनय पहायचा आणि त्यांनी म्हटलेली पदे गुणगुणत घरी जायचे हा त्यांच्या आनंदाचा परमोच्च बिंदू होता. याच काळात बोडसांनीही कंपनी चांगली सावरली पण परत खर्चाचा प्रश्न आला की मतभेद विकोपाला जात. कटकटी एवढ्या वाढल्या की शेवटी बोडसांनी कंपनी सोडण्याचे ठरविले. त्यांनी २७००० रुपये घेऊन २४ नोव्हेंबर १९१९ रोजी कंपनी सोडली आणि बालगंधर्व गंधर्व नाटक मंडळीचे सर्वेसर्वा झाले, खर्या अर्थाने मालक झाले.
एकंदरीत किर्लोस्कर मंडळी फ़ुटल्यापासून ते आत्तापर्यंत मराठी नाट्यक्षेत्रासाठी हा काळ मोठ्या धामधुमीचा, विश्र्वास आणि विश्र्वासघात, भरभराटीचा आणि दारिद्र्याचा, प्रेमाचा आणि द्वेषाने भरलेला ठरला. त्यावर एक दृष्टी टाकली तर वावगे होणार नाही. किर्लोस्कर मंडळी फ़ुटली १९१३ साली. दुसर्यांदा फ़ुटली १९१८ मधे जेव्हा चिंतामणराव कोल्हटकर व दिनानाथ मंगेशकर बाहेर पडले व त्यांनी बळवंत संगीत मंडळी नावाची कंपनी काढली. गोविंदराव टेंब्यांनी याच सुमारास त्यांची शिवराज संगीत मंडळी काढली. त्यांच्याच कंपनीमधील सरनाईक यांनी नंतर यशवंत संगीत मंडळी काढली ज्याला आश्रय होता, इंदोरच्या सवाई यशवंतराव होळकर यांचा. खुद्द भास्करबुवा बखले यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर कृष्णराव यांनी एक कंपनी काढली जिचे नाव होते नाट्य कला प्रसारक मंडळी जिचा उल्लेख वर आलेलाच आहे. सगळ्यात महत्वाची अजून एक कंपनी होती ती म्हणजे केशवराव भोसले यांची स्वदेश हितचिंतक नाटक कंपनी. त्यांनी किर्लोस्कर कंपनीतून बाहेर पडून ललित कलादर्श नाटक मंडळी नावाने एक कंपनी चालू केली होती त्याचेच रुपांतर पुढे स्वदेशमधे झाले. या कंपनीची लोकप्रियता गंधर्वांच्या कंपनी इतकीच होती. किंबहुना खूपच जुनी असल्यामुळे थोडीशी जास्तच असावी. गंधर्वांनी या कंपनीशी स्पर्धा करण्यापेक्षा त्यांच्याशी सहयोग करुन संयुक्त मानापमान सादर केले जे भलतेच लोकप्रिय झाले. पहिल्याच प्रयोगाला १६००० रुपयाची तिकिटविक्री झाली. खेळ अर्थातच हाऊसफ़ुल झाला. दुर्दैवाने या प्रयोगानंतर एकाच आठवड्याने अत्यंत तरुण वयात श्री. भोसले यांचा मृत्यु झाला. भोसले यांचे वय त्यावेळेस फक्त ३१ वर्षाचे होते. ते जर हयात असते तर मराठी रंगभूमीला निश्चितच जास्त वैभवाचे दिवस दिसले असते.
श्री केशवराव भोसले यांच्या मृत्युनंतर एक गोष्ट मात्र झाली आणि ती वाईट झाली ती म्हणजे गंधर्व नाटक मंडळींना तुल्यबळ प्रतिस्पर्धी उरला नाही. उधळपट्टीमुळे कंपनी कर्जात बुडाली. त्याच वेळी बालगंधर्वांनी त्यांचा वाद्याचा संच बदलला. वादकांना न झेपणारा मोबदला देऊन त्यांनी तिरखवाँसारखे तबलावादक साथीला आणले पण हा सर्व आतबट्ट्याचा व्यवहार होता. तिरखवाँसाहेब येऊन कंपनीच्या उत्पन्नात काय भर पडली असेल ते बालगंधर्वच जाणोत. पण माझ्या साथीला तिरखवाँसाहेब आहेत ही हौस मात्र भागली. सारंगीवार कादरबक्ष व नुकत्याच आयात केलेल्या ऑर्गनवर श्री. विष्णूपंत कांबळे असा मोठा नामी संच जमला खरा पण त्याचे पैसेही तसेच होते. लोकप्रियतेबरोबर कर्जही वाढत होते. वाढता वाढता हे कर्ज एक लाख पासष्ट हजारवर जाऊन पोहोचले. असे म्हणतात यातील एक लाखाच्या वरचे श्री. पंडित यांनीच त्यांच्या खाजगी कामासाठी काढले होते. म्हणजे थोडक्यात पैशाचा गैरव्यवहार झाला असेच म्हणावे लागेल. बोडस गेल्यावर तालमींमधेही बरीच घसरण झाली. पंडितांनी मोठ्या अक्कलहुशारीने त्यांना परत कंपनीत आणले पण या वेळेस भागीदारी दिली नाही. बोडसांनाही कंपनीची आर्थिक परिस्थिती माहीत असल्यामुळे त्यांनीही पगारावर रहायचे मान्य केले असावे. तालमी परत सुरु झाल्या पण एक मोठे संकट उद्भवले. कंपनीच्या ऋणकोंनी त्याची थकलेले हप्ते दिले नाहीत तर कंपनीच्या मालमत्तेवर टाच आणण्याची धमकी दिली. पंडित महाशय नेमके त्यावेळेस तिर्थयात्रेला गेले होते. अर्थात ते असते तरीही काही उपयोग झाला असता असे वाटत नाही. जप्तीची बातमी वार्याच्या वेगाने पसरली आणि नाट्यक्षेत्रात एकच खळबळ उडाली.
बालगंधर्वांचे इतके चाहते होते की हे कर्ज मिनिटात फ़िटले असते. काही मान्यवरांनी तशी तयारीही दाखविली. त्यातील नावे वाचली तर कळते, बालगंधर्वांचा स्वभाव कसाही असो पण त्यांच्या चाहत्यांची काही कमी नव्हती. सुप्रसिद्ध वकील जमनादास मेहता, उद्योगपती वालचंद हिराचंद व विठ्ठल सायन्ना, प्रसिद्ध शल्यविशारद भडकमकर मदतीची तयारी दाखविली. काहींनी तर गंधर्व मंडळींसाठी खास गंगाजळी स्थापन करण्याचीही तयारी दाखविली पण बालगंधर्वांनी ती मदत नम्रपणे नाकारली. ते म्हणाले, “यात माझी चूक आहे. माझ्यामुळे कंपनी कर्जबाजारी झाली आहे. माझे कर्ज मलाच कष्ट करुन फ़ेडू देत. मला तुमच्याकडून हव्यात फ़क्त शुभेच्छा व त्याच्याकडून (देवाकडून) कृपा.” पण नुसते असे म्हणून चालणार नव्हते. पैशाचे सोंग आणता येत नाही. शेवटी हितचिंतकांनी व मित्रांनी मिळून एक योजना आखली. त्यात मुंबईचे सॉलिसिटर लाड यांचा मुख्य सहभाग होता. त्यांनी त्या कर्जाची जबाबदारी उचलली. त्यांनी गंधर्व कंपनीचा पूर्ण ताबा बालगंधर्वांकडून घेतला व प्रथम काय केले असेल तर पंडितांची हकालपट्टी. त्यांनी एक विश्र्वासू माणूस मॅनेजर म्हणून कंपनीत आणून बसविला. त्यांचे नाव होते दादा काटदरे.
लाड व बालगंधर्वांचा खूपच घरोबा होता. गंधर्व कंपनीचा एकही प्रयोग लाडांच्या कुटुंबियांशिवाय होत नसे. त्यांचीच एक मुलगी पुढे सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली – दुर्गा खोटे. हिला या क्षेत्रात जाण्याची स्फुर्ती बालगंधर्वांपासूनच मिळाली असे म्हणतात. हे दिवस बालगंधर्वांना फारच वाईट गेले. एक तर त्यांचे वडील गेले व वर उल्लेख केलेल्या अपत्यांपैकी दोन याच काळात वारली. शिवाय गडकर्यांचा तरुण वयातील मृत्युही त्यांना चटका लाऊन गेला.
बोडस ज्यांना पंडितांनी तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी कंपनीत परत आणले होते त्यांनी प्रकृतीस्वास्थ्यामुळे नाटक सोडले. बालगंधर्वांना अजून एक धक्का बसला तो म्हणजे भास्करबुवा बखले यांचा अचानक मृत्यु झाला. ते तर त्यांचे संगीताचे गुरुच होते व हिंदुस्थानी संगीताचा पुरेपूर वापर त्यांच्यामुळेच नाटकात सुरु झाला होता. या सगळ्या कारणांमुळे बालगंधर्वांची प्रकृती ढासळू लागलेली पाहताच लाडांनी कंपनीला काही महिने सुट्टी जाहीर केली व सगळ्यांना नाशिकला विश्रांतीसाठी पाठवले. त्याचा चांगला फायदा होऊन सगळे ताजेतवाने होऊन परत कामाला लागले. कर्जबाजारी झाल्यानंतर गडकर्यांच्या एकच प्यालाने सतत साडेसहा वर्षं सगळे उच्चांक मोडले. याचे श्रेय मात्र बालगंधर्वांनाच द्यावे लागेल. त्यांनी जीव ओतून काम केले. त्यांना कर्ज फेडायचे होते. बोडसांनंतर बालगंधर्वांनी विनायकराव पटवर्धनांना नायकांची कामे करण्यासाठी कंपनीत आणले व त्याचाही चांगलाच फायदा कंपनीला झाला. विनायकराव विष्णू दिगंबर पळुसकरांचे शिष्य होते हे म्हटले म्हणजे त्यांच्या गाण्याबद्दल कोणाला काही बोलायचे काही कारण नव्हते.
श्री. टिपणीस यांची दोन नाटके बालगंधर्वांनी यानंतर रंगमंचावर आणली. एक आशा-निराशा व दुसरे नंदकुमार. या दोन नाटकांनीही चांगले यश मिळविले पण ते मुख्यत: मास्टर कृष्णरावांच्या संगीतामुळे. त्यानंतर आले एक पौराणिक नाटक – मेनका. नाटककार होते खाडिलकर. खाडिलकरांनी हे नाटक अशाप्रकारे लिहिले होते की बालगंधर्वांना खर्चाला विशेष वाव राहू नये. पण वय वाढायचे थांबत नाही. बालगंधर्व आता ३८ वर्षांचे झाले होते. त्यांना टक्कलही पडायला लागले होते. वयानुसार अंगकाठीही सुटू लागली होती. टक्कलासाठी त्यांनी फ्रान्समधून खास विग करुन आणले. अर्थात त्यांच्यावर प्रेम करणार्या पेक्षकांना त्याने काहीच फरक पडत नव्हता. ते त्याच निष्ठेने त्यांच्या नाट्यप्रयोगांना हजेरी लावत होते.
मुंबईच्या ग्रांटरोडच्या नाट्यगृहात श्रीमंत मंडळी त्यांच्या नाटकांची तिकिटे पंधरा पंधरा दिवस आधी आरक्षित करु लागले. पुण्या-मुंबईच्या स्त्रिया त्यांच्या वेशभूशेचे अनुकरण करण्यात स्वत:ला धन्य मानू लागल्या. अमुकामुक नाटकात बालगंधर्वांनी नेसलेला शालू सारखा शालू हवा अशी मागणी होऊ लागली. असे म्हणतात या प्रकारच्या शालू/साड्यांची मागणी कुठून येते हे पाहण्यास वाराणशीचे व्यापारी पुण्या-मुंबईला येऊन गेले.
आठवड्यात तीन दिवस खेळ होत. खास खेळही आधेमधे होत असत. पण बुधवार, शनिवार व रविवार निश्चित. श्री घोटणकर त्यांच्या आठवणीत सांगतात, “तीनच्या खेळासाठी नारायणराव दुपारी बारा पासूनच थिएटरवर हजर होत. मग सुरु होई दाढी व हजामत. नुसती दाढी नाही तर सर्वांगावरचे केस उतरविण्यात येत. मग थंडगार पाण्याने आंघोळ. घंघाळे बर्फासारख्या गार पाण्याने भरलेले असे व घागरीवर घाघरी डोक्यावर ओतून घेत. त्यांचा चौरंग डुगडुगत असे व प्रत्येक हालचालीवेळी टक टक असा आवाज करे. तो आवाज थांबला की समजावे आंघोळ आटोपली आहे. नाटकापूर्वी एकदा आणि नाटकानंतर मेकअप उतरविल्यावर एकदा अशी दोनदा आंघोळ होत असे. पहिली आंघोळ झाली की रंगपटात जात. त्या रंगपटात एका बाजूला काकासाहेब खाडिलकर, अण्णासाहेब किर्लोस्कर तर दुसर्या बाजूला अल्लादियाखाँ साहेब, बखलेबुवा यांच्या तसबिरी असत. त्यांना नमस्कार करुन मग रंगायला बसत. तेथे कोणीही आलेले चालत नसे. फक्त एका मदतनिसाला परवानगी होती (नथ्थू नावाच्या) रंग खास जर्मनीवरुन आयात केलेले. लुगडं-बिगडं नेसण्यात फार वेळ जाई. जराही चुणी चालत नसे....एकदा लुगडे नेसले की चुणी पडेल म्हणून खाली बसत नसत.....”
पुढे म्हणतात, “नाटकापूर्वी जेवण नसे. नाटक संपल्यावर पहाटे पिठल भात किंवा खिचडी. सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे पावटे व शेवग्याच्या शेंगा घालून केलेली वांग्याची भाजी...” (एकदा करुन पहायला हवी)
विषय निघालाच आहे तर त्यांच्या स्वभावाबद्दलही दोन शब्द लिहिले पाहिजेत. अत्यंत श्रद्धाळू. नाटक संपल्यावर पडदा पडल्यावर सांष्टांग नमस्काराच्या स्थितीत अगदी चार पाच मिनिटे प्रार्थना चाले. त्यावेळी कोणी त्यांना त्रास दिलेले चालत नसे. कोणाविषयी कधीही वाईट बोलत नसत. त्यांचा हा गुण मला वाटते सर्वात महत्वाचा होता. कोणीही त्यांच्या स्वभावाबद्दल कसलिही तक्रार केलीली ऐकिवात नाही. अर्थात नवरा बायकोचे चार भिंतीआड जे झाले असेल ते झाले असेल. पैशासाठी कधीही गात नसत. एकदा अहमदनगरला गल्ला फक्त ३५ रुपये जमलेला असताना सर्वोत्कृष्ट अभिनय केला असे घोटणकरांनी आठवणीत लिहिले आहे. प्रेक्षकांना तर आपल्याला माहितच आहे मायबाप म्हणून साष्टांग नमस्कार घालत. गल्ल्याची कधीही चौकशी करीत नसत. त्याचेच दुष्परिणाम त्यांना भोगावे लागले. हा पूर्वीच्या मराठी माणसाचा दुर्गुण म्हणावा पण त्याकाळी त्यातच मस्ती होती, हिंमत होती हेही खरे. स्वप्ने मात्र मोठमोठी पहात. त्यांना एक राष्ट्रीय स्तरावरचे नाटक थिएटर काढायचे होते. अर्थातच ते स्वप्नच राहिले म्हणा.... त्याबद्दल मात्र मला अत्यंत वाईट वाटते. बालगंधर्वांचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे त्यांचा मृदू स्वभाव. त्यामुळे त्यांनी अनेक मित्र व सर्वस्व वाहणारे चाहते जोडले होते. त्याचीच एक आठवण सांगितली जाते –
कराचीमधे एक प्रतिष्ठीत व्यापारी होते, लाला लक्ष्मीचंद ईश्र्वरदास. यांनी बालगंधर्वांना मदत करताना काधीही हात आखडता घेतलेला नव्हता. हे बालगंधर्व व त्यांच्या संगीताचे निस्सीम चाहते होते. ते कराचीला आजारी पडले. आता थोडे दिवस राहिले या कल्पनेने त्यांनी शेवटची इच्छा म्हणून बालगंधर्वांकडे त्यांचे गाणे ऐकण्याची इच्छा प्रदर्शित केली. अर्थातच नाही म्हणण्याचा प्रश्र्नच नव्हता. बालगंधर्वांनीही लगेचच कराचीसाठी प्रस्थान ठेवले. दुर्दैवाने पोहोचण्याच्या एकच दिवस आधी लालाजींचे निधन झाले. उशाशी एक ग्रामोफोन होता त्यावर बालगंधर्वांची “दया छाया घे” ही ध्वनिमुद्रीका ऐकतच त्यांनी प्राण सोडला.
या काळात कंपनीची आर्थिक घडी श्री. लाडांनी व्यवस्थित बसविली. १९२७ अखेर कंपनीने व्याजासहीत जवळजवळ चार लाख रुपयांचे कर्ज फेडले यावरुन कंपनीच्या उत्पन्नाची कल्पना यावी. १९२१ ते १९२७ या काळात कंपनीने वर्षाला दीडलाख रुपये नफा कमवला. हा काळ कंपनीच्या दृष्टीने सर्वोत्तम होता आणि अनेकांनी बालगंधर्वांना आता नाटक पुरे असा सल्ला दिला. खरे तर तो योग्यच होता. आता उरलेले आयुष्य आरामात जगता येईल एवढा पैसा त्यांच्या गाठीशी होता पण तसे व्हायचे नव्हते.
त्याच वेळी मृच्छकटीक नाटकाच्या पहिल्या प्रयोगालाच त्यांच्या चौथ्या मुलीचा मृत्यू झाला. याचा त्यांना फार मोठा धक्का बसला कारण त्यांना या मुलीचा फारच लळा लागला होता व ती लग्नाला आली होती. ते तिला मायेने ताई अशी हाक मारीत. त्यांनी याही वेळी प्रयोग चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. मला वाटते या आघाताने त्यांच्यातील मृदूभाव बराच कमी झाला असावा. व्यवहारी तर ते नव्हतेच पण या मृत्युमुळे ते बहुधा निरिच्छ झाले असावेत व पुढील आयुष्य त्यांनी जे कृष्णमूर्ती यांनी एका कवितेत लिहिल्या प्रमाणे पाण्यात वाहणार्या वाळलेल्या पानाप्रमाणे काढले असावे.
१९३० सालीगंधर्व मंडळी पुण्यात असताना बालगंधर्वांच्या थोरल्या मुलीचे म्हणजे कु. सरोजिनीचे लग्न गोविंदराव वाबळे यांच्याशी ठरला. पुण्यात सात दिवस हे लग्न थाटामाटात गाजत होते. त्या काळात घरातील पहिल्यावहिल्या शुभकार्यात बालगंधर्वांनी ३०,००० खर्च केला. त्या काळात १० ग्रॅम सोन्याचा भाव फक्त १८ रुपये आणि पाच पैसे होता हे लक्षात घेतल्यावर या विवाह सोहळ्याची भव्यता लक्षात येईल. या लग्नाचा भव्य सोहळा झाला पण बालगंधर्वांचे एक पाऊल कर्जाच्या फासात पडले. त्यांना वाटत होते की मागील वेळी केली तशी ही कर्जफेडही ते सहज करतील. पण त्यांचा अंदाज चुकला. म्हणजे भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे कोणाला सांगता येते ? पण स्वत:च्या वाढत्या वयाचा अंदाज येऊन सुद्धा त्यांना बहुधा त्यांचा फाजील आत्मविश्र्वास नडला असवा..पुढे काय झाले ते आपण पाहणारच आहोत. त्याच काळात त्यांनी मुलगा व्हावा म्हणून पुष्कळ उपासतापास, यज्ञ इत्यादी आरंभले होते. मुलगा झाला पण फक्त चोवीस तास जगला. या सगळ्या प्रकाराने त्यांना खूपच मनस्ताप झाला. त्या परिस्थितीतही त्यांनी जावयाला इंग्लंडला पुढील शिक्षणासाठी पाठवले व आपले कर्तव्य पूर्ण केले.
१९२१ साली ज्याप्रकारे एका धडाक्यात त्यांनी कर्ज फेडले होते तसे आत्ताचेही कर्ज आपण फेडू अशा भ्रमात ते होते पण वाढत्या वयाबरोबर अजून एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही ती म्हणजे कंपनीतील लोकांचे आतोनात वाढलेले पगार. जवळजवळ १०० बुजुर्ग मंडळींचे पगार कमी करण्याचा प्रश्र्नच उद्भवत नव्हता आणि ते शक्यही नव्हते. हे सगळे कमी होते म्हणून त्यांनी श्री. कुलकर्णी यांचे कान्होपात्रा हे नाटक रंगमंचावर आणले. त्यासाठी वजन व सडपातळ होण्यासाठी खास शिक्षकांची नेमणूक केली. रंगमंचासाठी नेहमीप्रमाणे आतोनाच खर्च केला पण हे नाटक साफ पडले. संत कान्होपात्रा या नाटकात बालगंधर्व कान्होपात्राची भूमिका करायचे. भूमिका करता करता ते भक्तीसंगीतात रमू लागले. त्यांना रंगभूमी व वास्तव यातील रेषा फिकट झालेली कळेना. रंगभूमीच्या बाहेर ते भजनांचे जाहीर कार्यक्रम करु लागले. त्या काळी माईक नव्हते मोठ्या समुहासमोर भजने गाताना त्यांना मोठ्या आवाजात गावे लागे. त्याने त्यांच्या आवाजावर परिणाम झाला. ( नंतरच्या काळात त्यांच्या पत्नीने या प्रकाराला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला पण बालगंधर्वांनी त्यावेळेस चक्क उपोषण केले. शेवटी तिला त्यांना ते कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी लागलीच.) उत्पन्न कमी होऊ लागल्यावर बोडसांनी कंपनी सोडली. नंतर विनायकराव पटवर्धनांनी सोडली. ज्यांनी गेली दहा वर्षे कंपनीत प्रामाणिकपणे काम करुन कंपनी अडचणीतून बाहेर काढली त्या व्यवस्थापकांना, श्री काटदर्यांनीही प्रकृतीस्वास्थाच्या कारणाखाली कंपनी सोडली पण खरे कारण होते कंपनीची खालावलेली आर्थिक स्थिती.
याच सुमारास मराठी नाट्यक्षेत्रात एक क्रांती झाली. आजवरच्या बुरसटलेल्या वातावरणात ती क्रांतीच म्हणावी लागेल. काही धाडसी स्त्रियांनी रंगमंचावर अभिनयाची चुणूक दाखविण्यास सुरुवात केली. त्या काळी स्त्रिया रंगभूमीवर येत नसत म्हणून स्त्रीपार्ट करणार्या नटांची चलती होती पण आता हिराबाई बडोदेकर, जोत्स्ना भोळे यांच्यासारख्या स्त्रियांनी रंगमंचावर पदार्पण केल्यावर नाटकांचा बाजच बदलला. प्रथमच असे झाले की गंधर्व नाटक मंडळींच्या नाटकाची तिकिटे शिल्लक राहू लागली. यानंतर आलेली विधीलिखित व अमृतसिद्धी ही दोन नाटके तर साफ पडली. कंपनी पूर्णपणे कर्जात बुडाली. शेवटी जड मनाने त्यांना गंधर्व नाटक मंडळी बंद करावी लागली. यावेळीही त्यांच्या चाहत्यांनी मदतीचा हात पुढे केला होता पण त्यांनी ती मदत नम्रपणे नाकारली. पण खर्च भागविण्यासाठी बालगंधर्वांनी मिळेल तेथून उसनवार करण्यास सुरुवात केली. याच काळात त्यांनी त्यांच्या जावयाला एका पत्रात लिहिले होते, ‘‘कंपनीला हल्ली दर मिहिन्याला ५-१० हजाराचा तोटा होत असतो’’ यावेळी त्यांना दोन लक्ष रुपयांचे कर्ज झाले होते. पन्नास एक सावकार एकाच वेळी पैशासाठी तगादा लावायचे. एकदा बडोद्याच्या सरदार माधवदास मुनशी नावाच्या कारभार्याने १२००० रुपयांसाठी फौजदारी दाखल करण्याचे ठरविल्यावर मात्र सगळ्यांचे धाबे दणाणले. त्याच सुमारास मराठी रंगभूमीचा शतसांवत्सरिक महोत्सव साजरा करण्यात येणार होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद बालगंधर्वांकडे देण्यात आले. मोठा बाका प्रसंग उभा ठाकला. अध्यक्षाच्याच हातात बेड्या पडण्याची वेळ आली. आयोजक डॉ. भालेराव, श्री. आमोणकरांनी लागलीच मदतीसाठी एकच प्यालाचा प्रयोग जाहीर केला. सावकारांनीही रु ८००० वर हे प्रकरण बंद करण्यास मान्यता दिली. प्रयोगाला तुडुंब गर्दी जमली. १२००० चा गल्ला जमला. डॉक्टरांनी ते पैसे ताबडतोब परस्पर सावकाराकडे भरले. याच प्रयोगावेळी बालगंधर्वांना भावना न आवरता आल्यामुळे विस्मरण झाले...लोकांच्या मनात पाल चुकचुकली. या १२ हजारातील ४००० रुपये उरले. त्याचे काय करायचे याच्यावर विचारविनिमय चाललेला असताना बालगंधर्व म्हणाले, ‘‘ ते पैसे मुंबई स्फोटातील मृत्यु पावलेल्या लोकांसाठी निधी जमावला जातोय ना त्यात जमा करा.’’ दिलदार माणूस होता हे खरे.
या कर्जाच्या विळख्यातून सुटण्यासाठी त्यांना शेवटी गंधर्व नाटक मंडळी बंद करावी लागली व ते सिनेसृष्टीकडे वळले. तसे त्या काळात इतरजणही चित्रपटसृष्टीकडे वळतच होते उदा. पेंढारकर व मा. दिनानाथ पण बालगंधर्व हे आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी हे करीत होते. त्यांना शक्य असते तर ते चित्रपटसृष्टीत गेले नसते हेही खरे आहे. असो.
पूर्वी गंधर्व नाटक कंपनीत काम केलेले श्री व्ही. शांताराम यांना एक संत तुकारामावर चित्रपट काढायचा होता. त्यांनी कंपनीत असतानाच बालगंधर्वांना जवळून पाहिलेच होते. त्यांनी या चित्रपटासाठी बालगंधर्वांना भागीदार म्हणून त्यांच्या प्रभात फिल्म कंपनीमधे घेतले. कराराच्या अटी कुणालाही भुरळ पाडणार्या होत्या. बालगंधर्वांसाठी तर निश्चितच होत्या. तीन वर्षात सहा लाख रुपये मिळायचे होते, एकही पैसा गुंतवायचा नव्हता. गुंतवायचा होता फक्त अभिनय आणि गळा. पण पुढे संत तुकाराम मागे पडून संत एकनाथांवर चित्रपट काढण्याचे ठरले. प्रमुख भूमिका अर्थातच बालगंधर्वांची होती. चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले ‘‘महात्मा‘‘ आणि कटकटींना सुरुवात झाली. महात्मा गांधींच्या नावाशी साधर्म्य असल्यामुळे या चित्रपटाला सेन्सॉरने परवानगी नाकारली. मग चित्रपटाचे नाव बदलण्यात आले ‘‘धर्मात्मा’’. चित्रपटाने बर्यापैकी धंदा केला. पण एकंदरीत तो चित्रपट कोसळलाच. खरे सांगायचे तर बालगंधर्वांकडून संत एकनाथांच्या भूमिकेला बिलकूल न्याय मिळाला नाही. आता करारानुसार पुढच्या चित्रपटाची सुरुवात करायची होती. चित्रपट ठरला श्री. व्ही. शांताराम यांनी प्रथम ठरवलेला ‘‘संत तुकाराम’’ संत तुकारामाची भूमिका अर्थातच बालगंधर्व करणार होते....
नवीन चित्रपटाच्या मुहुर्ताला पंधरवडा राहिलेला असताना एकदा सकाळी बालगंधर्व श्री. फत्तेलाल यांच्या बंगल्यावर पोहोचले. श्री. रविन्द्र पिंगे यांनी एका लेखात ही कथा सांगितली आहे. फत्तेलाल यांनी बालगंधर्वांचे स्वागत केले,
‘‘ या ! या ! संत तुकारामाचे सेट तयार होत आले आहेत, पुढच्या आठवड्यात चित्रीकरणास सुरुवात करु !’’
’‘ नको देवा शुटींग नको आता. आम्हाला या करारातून मोकळे करा.’’ बालगंधर्व.
फत्तेलाल यांना ते ऐकून धक्काच बसला. बालगंधर्वांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार धर्मात्मा चित्रपटात त्यांना जवळ जवळ अडीच लाख रुपये मिळाले होते पण बालगंधर्व सांगत की फत्तेलाल यांनी अडीच लाख दिले पण तेवढाच खर्चही माझ्या नावे दाखविल्यामुळे मला प्रभात मधून हात हलवत बाहेर पडायला लागले. खरे खोटे देव जाणे. पण मला वाटते त्यांचे व चित्रपटसृष्टीचे जमत नव्हते. कर्ज फेडण्याइतके पैसे मिळाल्यावर त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असावा. हे त्यांच्या नंतरच्या काही उद्गारांवरुन सिद्ध होते. ते त्यांच्या काही साथीदारांना म्हणाले,
‘‘ चित्रपटातील अभिनय मला मृतवत वाटतो. तो करताना रंगभूमीवर चढतो तसा कैफ चढत नाही. मी फक्त देवल मास्तरांचे व काकासहेबांचा हुकूम जाणतो. हे सिनेमेवाले पुढे जा, मागे बघा, मान अशी करा तशी करा सांगतात ते मला पटत नाही....’’
थोडक्यात त्यांना या नवीन तंत्रज्ञानाची माहिती नव्हती. क्लोजअप ही भानगड रंगमंचावर नसते हे त्यांच्या बहुधा लक्षात आले नसावे. अर्थात त्यांना दोष देता येत नाही कारण काळच तसा होता. उदा. सिंगिंग इन द रेन मधे त्या नटीच्या ह्रदयाचे ठोके कसे द्वनिमुद्रीत होतात ते आठवा.. बालगंधर्वांच्या जावयाने प्रभात फिल्म कंपनीशी काडीमोड घेतल्याचे वेगळेच कारण सांगितले. एकदा म्हणे कराचीहून त्यांचे एक चाहते लक्ष्मीचंद त्यांना प्रभात कंपनीमधे भेटण्यास आले होते त्यांना आत प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे चिडून जाऊन त्यांनी म्हणे प्रभातला धडा शिकविण्यासाठी हे पाऊल उचलले. हे जर खरे असेल तर धडा कोणाला मिळाला हे स्पष्टच आहे. हे प्रकरण झाल्यावर त्यांचा चित्रपटसृष्टीशी संबंध तुटला असेल असे तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे पण काहीच काळानंतर ते परत चित्रपटसृष्टीकडे परतले आणि परत एकदा पराभूत झाले. ती हकिकत पुढे येईलच. तूर्तास तरी ते परत कोल्हापूरला गेले.
तेथे त्यांची गंधर्व नाटक मंडळी गंगाधरपंत लोंढे यांनी बालगंधर्वांना बाजूला ठेऊन कंपनी कशीबशी चालू ठेवली होती. स्वत: बालगंधर्व, त्यांचे बंधू बापूराव, लोंढे व मास्तर दुर्गाराम असे चारजण ही कंपनी चालवू लागले. लोंढे यांचे गाणे उत्कृष्ट होते पण त्यांच्या पुरुषी रुबाबापुढे स्त्री भूमिका करणारे बालगंधर्व आता वाढत्या वयामुळे बेढब दिसू लागले. हे सगळे प्रेक्षकांना विचित्र वाटू लागल्यावर, आता स्त्री भूमिकेसाठी कोणी स्त्री नटीच घ्यावी असा विचार सुरु झाला. आता हा विचार बालगंधर्वांना आवडला का नाही ते काही कळत नाही कारण त्याच वेळी बालगंधर्व परत एकदा चित्रपटसृष्टीत परतले. दादासाहेब तोरण्यांनी एकदा सहज म्हणून स्वयंवर नाटकाच्या एका प्रवेशाचे चित्रिकरण केले होते. त्यातील बालगंधर्वांचे रुक्मिणीचे रुप पाहून कोल्हापूरच्या बाबूराव रुईकरांना बालगंधर्वांना परत एकदा रुपेरी पडद्यावर स्थान द्यावे असे वाटू लागले पण त्यांनी या वेळी जरा सावध पवित्रा घेतला त्यांनी अमृतसिद्धी नावाच्या नाटकाचे चित्रिकरण केले. खर्चही कमी झाला व वेळही वाचला. बालगंधर्वांनी प्रथम याला स्पष्ट नकार दिला होता पण बाबूराव पेंटर मधे पडल्यावर त्यांना नाही म्हणता येईना. दुर्दैवाने हाही चित्रपट साफ पडला. याला मुख्य कारण होते की कॅमेरा बालगंधर्वांचे वय लपवू शकला नाही उलट ते त्यात जास्त प्रकर्षाने जाणवत होते. रंगमंच पडद्यावर मोठा भव्य दिसत होता खरा पण त्याचबरोबर बालगंधर्वांचे वयही. त्यानंतर त्यांनी मीराबाई हा चित्रपट काढला पण त्याचीही अशीच वाट लागली. यानंतर मात्र बालगंधर्वांनी चित्रपट सृष्टीला रामराम ठोकला तो मात्र कायमचा.
मला वाटते त्या वेळी बालगंधर्वांनी स्वत:वर चित्रपट काढला असता तर त्यांनी त्या काळातही खोर्याने पैसे ओढले असते.
यावेळी त्यांनी वयाची पन्नाशी गाठली होती.
त्यांच्या ५१व्या वर्षी त्यांच्या आयुष्यात एका स्त्रीने प्रवेश केला. गंधर्व नाटक मंडळी स्त्री भूमिका करण्यासाठी एखाद्या नटीच्या शोधात होती आणि त्याच वेळी त्यांच्या प्रेमात पडलेली एक स्त्री अशाच संधीच्या शोधात होती. तिचे नाव होते गोहरजान कर्नाटकी. हिचे त्यावेळी वय होते अवघे सत्तावीस किंवा अठ्ठावीस. कोण होती गोहरजान कर्नाटकी ? तुम्ही अमीरबाई कर्नाटकी हे नाव ऐकले असेल. तिचे ‘‘चंदा देस पिया के जाऽऽऽ’’ हे गाणे तर तुम्ही निश्चितच ऐकले असेल.
चंदा देस पिया के जा....
हा खालचा फोटो मुद्दाम टाकला आहे कारण गोहरजानचा चांगला फोटो उपलब्ध नाही. आमीरबाईंच्या या फोटोवरुन त्यांच्याही सौंदर्याची कल्पना यावी.
हिची धाकटी बहीण होती गोहरजान कर्नाटकी. विजापूरपासून चाळीस एक मैलांवर बिळगी नावाचे एक खेडेगाव होते तेथे हुसेनखाँ नावाचे एक कानडी मुसलमान तबलजी होते. त्यांना सहा मुली एक मुलगा एवढी अपत्ये होती. अर्थात त्या काळात ही काही विशेष बाब मानली जात नसे. यांच्या घराण्यात हिंदू नावे कशी आली किंवा कशी ठेवण्यात आली ही एक संशोधनाची बाब आहे. पण सर्वात मोठी होती तिचे नाव होते अल्लम्मा उर्फ अहिल्या. ही मुंबईत जलसे करीत असे. त्या काळात मोठमोठे गवैय्ये अशा स्त्रियांना गाणे शिकवत असत हे लक्षात घेतले पाहिजे. उदा. अब्दुल करीमखाआँही अशा स्त्रियांना गाणे शिकवत असत. तिच्या पाठीवरची होता अमीरबाई कर्नाटकी. हिने चित्रपट सृष्टीत आपले चांगलेच बस्तान बसविले होते.
हिच्या नंतर होती आपली नायिका गोहरजान.
गोहरबाई रुपाने काळीसावळी पण अत्यंत देखणी होती. हिचा आवाज फार गोड होता. तिचे एक गाणे आपण ऐकणार आहोत, त्यावरुन आपल्याला त्याची कल्पना येईल.
गोहरबाईंच्या आवाजातील जोगिया...
(उत्तरेत अजून एक गोहरजान होती तिच्याशी हिची गफलत नको). या मुलीत काय विशेष होते हे त्या काळातील पुरुषच सांगू शकतील किंवा बालगंधर्वच सांगू शकतील. ही रुपाने सामान्य, इतर भावंडांप्रमाणे काळी सावळी पण हिचा आवाज स्वर्गिय होता असे म्हणतात. ही महत्वाकांक्षी असून काळी दोनच्या पट्टीत गात असे. ही रुपाने कशीही असली तरीही ही मादक व पुरुषांना हिची सहज भुरळ पडत असे. हिलाही गौराम्मा असे हिंदू नाव होते. हिच्या नंतर जन्माला आली ती बडी मन्नी. तिच्या नंतर होती नन्ही मन्नी व सगळ्यात शेवटी एक मुलगा होता ज्याचे नाव होते दस्तगीर. हा शिकलेला असून आकाशवाणीत नोकरीला होता. अमीरबाई आणि गोहरबाई यांचे आपापसात बिलकूल पटत नसे. पण त्या दोघीही एके काळी वाणीविलास नाटक कंपनीत काम करीत असत. या गोहरबाईंचे गुरु कोण होते याबाबतीत बरेच मतभेद आहेत. काही जण म्हणतात त्यांचे गुरु एक अंध गायक पंचाक्षरीबुवा होते तर काहींच्या मते तिचे गुरु एक निळकंठशास्त्री नावाचे पंडीत होते. मल्लिकार्जून मन्सूरांचे बंधू बसवराज हे तिला नाटकातील पदांच्या चाली बांधून देत.
गोल निशानमधील एक गाणे...असे म्हणतात जेथे गवय्यांचा आवाज संपतो तेथे म्हणजे काळी दोनवर तिचा आवाज सुरु व्हायचा.
हिच्या आवाजाची प्रत आपल्याला त्या गाण्यावरुन सहज कळते. नाट्य क्षेत्रातील अजून एक नट श्री. नानासाहेब चाफेकर यांनी या दोन बहिणींना घेऊन मुंबई गाठली. त्यांच्यासाठी त्यांनी सगळ्या स्टुडिओत खेपा घातल्या, अनेक लोकांच्या गाठी भेटी घेतल्या. त्यांची तपश्चर्या फळाला आली. अमीरबाई कर्नाटकीचे काय झाले ते आपल्याला माहितच आहे. पण गोहरजानलाही सिनेमात कामे मिळू लागली. हे दोघे ग्रांटरोड समोर बावला इमारतीत एकत्र रहात असत. मुंबईत आल्यावर गोहरजानला बालगंधर्वांच्या गाण्याची ओळख झाली. चाफेकरांना ती होतीच. गोहरजान बालगंधर्वांच्या नाट्यगीतांची हुबेहूब नक्कल करायची. खरे म्हणजे शास्त्रीय संगीताचा पाया पक्का असल्यामुळे तिची गाणी खूपच चांगली उतरत असत. आवाजाचा तर प्रश्नच नव्हता. चाफेकरांनीच कोलंबिया रेकॉर्ड कंपनीत खेटे घालून त्यांना गोहरजानची बालगंधर्वांच्या कान्होपात्रा नाटकातील काही पदे रेकॉर्ड करावयास सांगितली.
गोहरजान बालगंधर्वांच्या प्रेमात वेडी झाली होती असे म्हणायला हरकत नाही. ती त्यांच्या अनेक प्रयोगात वारंवार पहिल्या रांगेत तिकीट काढून हजेरी लावत असे. असे म्हणतात जेथे गवय्यांचा आवाज संपतो तेथे म्हणजे काळी दोनवर तिचा आवाज सुरु व्हायचा. थोडक्यात तिने बालगंधर्वांना कुठल्याही परिस्थितीत गटवायची प्रतिज्ञाच केली होती. त्यासाठी तिने बालगंधर्वांच्या पत्नीचा व आईचा विश्र्वास संपादन केला. इतका की जेव्हा कंपनीत नटी घेण्याचा विचार चालू झाला तेव्हा त्या दोघींनीही गोहरजानचे नाव सुचवले. खरे तर गोहरजान त्यावेळी चित्रपटसृष्टीत बर्यापैकी स्थिरावलेली होती. तिचे शककर्ता शिवाजी, रासविलास असे दोन चित्रपट येऊन गेले होते. तरी सुद्धा बालगंधर्वांच्या वेडामुळे किंवा गंधर्वगायकीच्या वेडामुळे ती सगळे सोडून कंपनीत रुजू झाली. कुठलाही करार नाही, पैसे ठरलेले नाहीत तशीच रुजू झाली. मला वाटते प्रेमात वेडी झालेली स्त्रीच असा निर्णय घेऊ शकते. गंधर्वांचा प्रथम विरोध होता पण नंतर सर्वानीच भरीस घातल्यामुळे बालगंधर्वांनी तिचे गाणे एकदाचे ऐकले व होकार भरला. तिचे गाणे होतेच तसे शिवाय तिला गंधर्व गायकी पाठ होती. नवीन काही शिकवायची आवश्यकता नव्हती. याच काळात ते दोघे बरेच जवळ आले आणि बालगंधर्वांच्या कुटुंबियांच्या मनात पाल चुकचुकली. बालगंधर्व व गोहरजान लक्ष्मीबाईंना नोकरासारखे वागवू लागल्यावर मात्र पत्नीने कंपनीतील बिर्हाड मोडले व त्या कंपनीतून निघून गेल्या. त्यावेळी बालगंधर्वांनी आपल्या पत्नीवर फार अन्याय केला. असे म्हणतात बालगंधर्व व गोहरजान खोलीत असताना त्यांची पत्नी त्या खोलीचे दार उघडण्याची वाट पहात बाहेर बसत असे. हे खरे असेल तर कोणी काहीही म्हणोत, बालगंधर्वांना त्या बाईचे शाप भोवले असेच म्हणावे लागेल.
कंपनी दौरे करीत वर येण्याचा प्रयत्न करीत होती पण प्रत्येक गावात कंपनीने सावकाराकडे काहीतरी गहाण टाकल्याची बातमी येत असे. गंधर्व कंपनीचे एक हितचिंतक व सावकार शेठ लक्ष्मीचंद यांना हे गोहर प्रकरण अजिबात आवडलेले नव्हते. लक्ष्मीबाईंची हकिकत कानावर गेल्यावर त्यांनी ही कंपनी आता गोहरजानच्या ताब्यात जाणार हे ओळखले व कर्जवसुलीची कायदेशीर प्रक्रिया चालू केली. कानुगो सॉलिसिटर्सना हे काम देण्यात आले. वाटाघाटी सुरु असतानाव शेठजीचे कराचीत निधन झाले. त्याच काळात सॉलिसिटर लाडही वारले व गोहरजानबाईंची घट्ट पकड कंपनीवर व बालगंधर्वांवर बसली. चाळीस साली बालगंधर्वांच्या पत्नी मधूमेहाचे कारण होऊन मिरजेला वारल्या. हे काहीही असले, जरी गोहरजानमुळे लक्ष्मीबाई हाय खाऊन मेल्या तरी गंधर्व गायकी मात्र गोहरजानच्या गळ्यातच जिवंत होती. नुसतीच जिवंत नाही तर थोडीफार फुलतही होती. त्याचे एक सूप्त आकर्षण बालगंधर्वांनाही असावे.
बालगंधर्वांच्या निकटच्या परिचयांच्यामते गोहरजानकडे मुसलमान मांत्रिकांचे बरेच येणे जाणे असे. त्यांनीच त्या मांत्रिकांना हाताशी धरुन बालगंधर्वांवर चेटूक केले व त्यांच्या मनाचा ताबा घेतला होता. ते गोहरसमोर अगदी गलितगात्र होऊन जात. ती सांगेल ते ऐकत. याबद्दलही काय खरे काय खोटे हे तेच लोक जाणोत. शेठजी वारल्यावर त्यांच्या मुलाकडे त्या पेढीची गादी आली. त्याला या नाटकबिटक प्रकारात काडीचाही रस नव्हता. त्यांनी पुण्यातील गंधर्व कंपनीची पेरुची बाग ताब्यात घेतली व त्या बदल्यात कंपनी गोहरजानच्या ताब्यात दिली. बालगंधर्वांनी नेहमीप्रमाणे हो ला हो केले आणि व्यवहार पूर्ण झाला. (आत्ताचे आकाशवाणी केंद्र जेथे आहे त्या जागेत ही बाग होती).
आता नाटकांना एक मातब्बर प्रतिस्पर्धी आला होता आणि तो म्हणजे कमी पैशात भरपूर करमणूक करणारे चित्रपट व चित्रपटगृहे. कंपनीची परिस्थिती मोठी हलाकीची झाली. बालगंधर्वांची तर त्याहूनही. ती अवस्था बघून डॉ. भडकमकरांनी बालगंधर्वांवरच्या प्रेमापोटी कंपनी परत आपल्या ताब्यात घेतली. (सावकाराकडून) व कंपनीतील नेवरेकर व भांडारकर या दोघांनाच कंपनी चालविण्यास दिली. हे अर्थातच गोहरबाईंना व बालगंधर्वांना पटणे शक्यच नव्हते. शेवटी बालगंधर्वांनी व गोहरजानने कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
२७ एप्रिल १९५१ या दिवशी बालगंधर्व व गोहरबाईंनी औरंगाबादला गुपचुपपणे नोंदणीपद्धतीने विवाह केला. हा विवाह गुपचुप का केला याचे कारण बहुधा आंतरधर्मीय विवाह होता हे असावे. नंतर त्यांनी मिरजेला खाजगीरित्या सुंताही करुन घेतली. नंतर ते भजने करु लागले. ज्यासाठी बालगंधर्वांनी कधीही पैसा घेतला नसता त्या गायनासाठी आता गोहरबाई पैसे मागू लागल्या. नुसत्या भजनात बालगंधर्वाचे मन रमेना तेव्हा परत एकदा नवीन नाटक कंपनी त्या दोघांनी मिळून चालू केली पण ती काही फार काळ चालली नाही. यावेळेस बाई मात्र त्यांच्या माहीमच्या घरात असत. बालगंधर्वांचे ऑर्गनवादक श्री. अनंतराव लिमयांनी पेणला बालगंधर्वांचा सत्कार आयोजित केला व त्यांना मानधनाची थैली दिली. यानंतर गोहरबाईंनी उत्पन्नाचे हे चांगले साधन समजून सत्कारांची अनेक आमंत्रणे लावून घेतली व बरेच पैसे जमविले.
५२ साली बडोद्याला प्रयोगानंतर त्यांच्या पायाला मुंग्या आल्या व पाय जड झाले. या आजाराचे निदान होईना. प्रयोग व दौरे तसेच सुरु ठेवण्यात आले कारण गोहरबाईंना पैसे जमवायचे होते. काही लोकांचे म्हणणे होते की गोहरजानबाईंचे बालगंधर्वांवर निस्सीम प्रेम होते पण त्याला सुसंगत त्यांचे हे वागणे नव्हते हेही खरे. दोन वर्षे हे असेच चालले होते. बालगंधर्व कोणाचा तरी आधार घेत रंगमंचावर उभे राहून अभिनय करीत तेव्हा ते दृष्य फारच केविलवाणे दिसे पण त्यांच्यावरील प्रेमापोटी प्रेक्षक तेही चालवून घेत. पण पायांचा आजार फारच बळावल्यावर त्यांनी १५ ऑगस्टला रंगभूमीवरची शेवटची भूमिका केली. ती होती वसन्तसेनेची. अखेरीस या सगळ्याचा अतिरेक होत होत १५ सप्टेंबर १९५५ साली कंपनीला कायमचे टाळे लागले.
त्यानंतर पैशाचे सर्व स्त्रोत बंद झाल्यावर रंगभूमिच्या या सम्राटाला सरकारी मदतीवर जगण्याची वेळ आली. आत्तापर्यंत गोहरजान बाईंनी बालगंधर्वांना सांभाळले होते पण आता एखाद्या आश्रिताला सांभाळावे तसे ते वाटत होते. बाईंनी बालगंधर्वांचे सगळे हिंदू नातेवाईक तोडले व मुसलमान नातेवाईक जवळ केले. त्या त्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटू देत नसत अशीही एक कहाणी आहे. १९६४ साली नोव्हेंबरात मुंबईत जवळ कोणी नसताना गोहरबाईंचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या दफनप्रसंगी बालगंधर्वांनी बराच आक्रोश केला. बालगंधर्व त्यांना लाडाने ‘‘बाबा’’ म्हणत तर त्या त्यांना ‘‘ परवरदिगार’’ म्हणत.
गोहरजानच्या मृत्युनंतर मात्र बालगंधर्व खर्या अर्थाने खचले. त्यांचे दोन्ही पाय कमरेखाली लुळे पडले होते, डोळ्यात मोतीबिंदू झाला होता तर स्मृतीभ्रंशाचे झटके त्यांना वारंवार येत. त्यांची व गोहरजानची एक मानलेली मुलगी होती आशम्मा नावाची. ती व रमेश इथनकर हे दोघे त्यांच्या पलंगावरच त्यांचे सगळे करीत. त्यांची प्रकृती नंतर अगदीच ढासळत गेली. दृष्टी गेली, पाय गेले, वाणी गेली व अखेरीस ते कोमात गेले. नंतर त्यांच्या जवळजवळ मृतदेहाला पुण्यात जहांगीर रुग्णालयात आणले गेले तेथेच १५ जुलै १९६७ रोजी त्यांनी प्राण सोडला......
त्यांच्या मृत्युनंतर काय झाले याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही....पण दिव्याची ज्योत विझताना फडफडते तशी जर त्यांच्या जिवात काही क्षण धुगधुगी आली असेल तर त्यांच्या डोळ्यासमोरुन काय काय गेले असेल याचा विचारच करवत नाही.... पण त्यांनी केलेल्या भूमिका मात्र त्यांच्या डोळ्यासमोरुन झरकन एकामागून एक अंतर्धान पावल्या असतील हे निश्चित.........त्यातील कारुण्यसिंधूने मात्र क्षणभर मागे वळून पाहिले असणार.
मला वाटते तिच्या डोळ्यातून दोन अश्रू या नटसम्राटासाठी मराठी रंगभूमीवर ओघळले असतील.....
समाप्त...
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
13 May 2016 - 11:08 am | स्पा
__/\__
मिपावरील एक सर्वोत्तम लेख
वाचनखूण साठवलेली आहे
जेवढे चित्रपट पाहून समजले नव्हते तेवढे या दोन भागातून कळले
13 May 2016 - 9:46 pm | शलभ
+११११
13 May 2016 - 11:37 am | तिरकीट
शेवटच्या काळामधे बालगंधर्वांनी नादारी पत्करल्याचा पण उल्लेख कुठेतरी वाचला होता, ते खरे आहे का?
13 May 2016 - 11:40 am | चाणक्य
फारच सुंदर उतरलेत दोन्ही लेख. धन्यवाद काका.
13 May 2016 - 12:05 pm | पैसा
_/\_
वाचताना अक्षरे धूसर झाली...
13 May 2016 - 12:21 pm | यशोधरा
बालगंधर्वांचे शेवटचे दिवस अत्यंत वेदनादायी गेले असणार - शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही. नको वाटते ते वाचताना. एका मनस्वी कलाकाराची अशी अवस्था झालेली वाचवत नाही...
तुम्ही प्रत्ययकारी लिहिले आहे.
13 May 2016 - 12:27 pm | गौतमी
अ प्र ति म !
13 May 2016 - 12:28 pm | लॉरी टांगटूंगकर
_/\_ धन्यवाद.
13 May 2016 - 12:29 pm | बबन ताम्बे
उत्कृष्ट लेख.
फक्त एक विरोधाभास आढळला.
एका ठीकाणी तुम्ही लिहीलेय की "गोहरबाई रुपाने काळीसावळी पण अत्यंत देखणी होती."
पण पुढे लिहीलेय की "ही रुपाने सामान्य, इतर भावंडांप्रमाणे काळी सावळी पण हिचा आवाज स्वर्गिय होता असे म्हणतात..."
13 May 2016 - 12:38 pm | बेकार तरुण
अप्रतिम !!
13 May 2016 - 12:38 pm | नाखु
अनोख्या कारकिर्दीला न्याय देऊ शकत नाही आणि मी सिनेमा पाहिलेला अस्ल्याने जास्त खोलातील आणि नेमकी माहीती जयंत्काकांच्या ह्या भागातून समजली.पुन्हा धन्यवाद.
आतबट्ट्याचे व्यवहार आणि उधळपट्टीने मराठी अभिजात संगीत नाटकांचे नुकसान झाले आहेच पण सद्यस्थीतीतही साधी नाटकेही रास्त तिकिटदरात खेळ करीत नाहीत हे वास्तव आहे.
अगदी पुण्यातही फक्त जिथे ४००-५००-७०० दर परवडतील अश्याच पब्लीकसाठी यशवंतराव चव्हाण आणि बालगंधर्वला प्रयोग असातात. पिंपरी चिंचवडला आणि भोसरीत्,तुकाराम नगर मधील नाट्यग्रुहात किमान एखादा प्रयोग वरील पेक्षा ४०% कमी दरात लावावे वाटत नाहीत.
आणि त्याचमुळे ही नाट्यग्रुहे फक्त एमेलेम कंपन्याचे सेमिनार्,राजकीय आरासी आरती कारेक्रम्,आणि अधून्मधून लावणी पुरती उरली आहेत.
खंतावलेला नाखु
व्यक्ती आणि वल्लीला मागील रांग ५०० ची असे मला फोनवर कळाले (गेल्या रवीवारी प्रयोग होता)
15 May 2016 - 2:31 pm | सुकामेवा
नाखू,
पिंची प्रेक्षागृहा मध्ये नाटकाची एक योजना आहे १००० रुपये भरा आणि ६ नाटके बघा, तुम्हाला हवी असेल सांगा मी त्यांचा दूरध्वनी क्रमांक तुम्हाला देतो.
23 May 2016 - 6:34 pm | मी-सौरभ
मला पण चालेल ही योजना.
24 May 2016 - 9:16 am | नाखु
तरी चालेल (चार संभाव्य प्रेक्षक तरी मिळतील)
13 May 2016 - 1:23 pm | मुक्त विहारि
नटरंग सिनेमा बघीतला नाही, ह्या वैषम्य अजिबात वाटले नाही.
24 May 2016 - 4:32 pm | मृत्युन्जय
नटरंग सिनेमा बालगंधर्वांवर नव्हता. तुम्हाला बालगंधर्व हा सिनेमा म्हणायचा आहे का? तो नाही बघितलात हे बरेच केले. सुंदर आहे पण अर्ध्यातच संपवल्यास्सारखा वाट्तो.
13 May 2016 - 1:36 pm | अत्रन्गि पाउस
गंधर्वांच्या आयुष्यातील व्यावहारिक बाजू
असे शीर्षक असते तरीही अपुरे ...
कालच्या भाग १ नंन्तर मला बहुतेक हि ६-७ महिने चालणारी लेख मालिका होईल असे वाटले ...
रा च्या कने
कराचीची रेकोर्दीन्ग्स माझ्याकडे आहेत ...
गंधर्वांच्या गायकीबद्दल खूप ऐकले, वाचले आहे परंतु ते ह्या निमित्ताने संकलित होईल असे वाटले....जमल्यास पुढील भाग लिहायचा विचार करावा हि प्रेमाची विनंती
13 May 2016 - 4:41 pm | प्रफ
पण बालगंधर्वांबद्दल अजुन वाचायला आवडेल..
13 May 2016 - 4:47 pm | धनंजय माने
कलंदर आणि मनस्वी कलाकार. लेख छान पण फार ओझरता आणि निव्वळ आढावा घेणारा वाटला.
आमचे स्फूर्तिस्थान असं विनोदाने म्हणावे लागेल पण तेवढ्यापुरतेच.
13 May 2016 - 5:03 pm | बोका-ए-आझम
बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्यावर महाराष्ट्र टाईम्सने त्यांच्या दोघांच्याही जन्मशताब्दी वर्षात विशेषांक काढले होते. त्यामुळे या लेखातली माहिती माहित होती पण ती इतक्या सुंदर रीतीने मांडणं हे जयंतकाकाच करु जाणे!_/\_
13 May 2016 - 5:39 pm | विटेकर
अप्रतिम!
13 May 2016 - 6:04 pm | अत्रन्गि पाउस
बसवराज राजगुरू ??
13 May 2016 - 6:15 pm | सुबोध खरे
अतिशय सुंदर रितीने मांडलेलं लिखाण.
छान
13 May 2016 - 8:01 pm | सिरुसेरि
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरच्या भुमी पुजन / उद्घाटन समारंभाला बालगंधर्व उपस्थित होते असे वाचल्यासारखे वाटते .
14 May 2016 - 1:27 am | रातराणी
_/\_ अप्रतिम!! शेवटी तर काटा आला अंगावर :(
14 May 2016 - 9:05 am | नंदन
लेख. कहाणी थोडी परिचित असूनही चटका लावून गेली पुन्हा!
15 May 2016 - 11:18 am | मारवा
सुंदर लेख प्रचंड आवडला.
अजुन विस्तार केला असता तरी आवडल असत.
15 May 2016 - 12:37 pm | मनीषा
प्रथम भाग वाचायचा आहे..
परंतु बालगंधर्व म्हणल्यावर एक वाचलेले पुस्तक आठवले.. "शापीत राजहंस " (बहुदा) असे नाव होते.
गंधर्वांचे चरित्र आहे. एका असामान्य कलाकाराचा जीवन प्रवास, त्यांची कलेप्रति असलेली निष्ठा .. पण त्यामुळे त्यांच्या कुटुबियांची झालेली परवड .. आणि त्यांच्या अयुष्याच्या शेवटी ते ज्या अवस्थेत होते .. हे सर्व अतिशय दु:खदायक आहे.
15 May 2016 - 2:56 pm | हकु
खूप सुंदर लेख. इतक्या मोठ्या कलाकाराचा शेवट असा झालेला वाचवत नाही.
18 May 2016 - 8:31 pm | पर्ण
खूपच सुंदर लेख लिहले आहेत... डोळ्यांसमोर अगदी बालगंधर्वांचा जीवनपट उभा राहिला!!
18 May 2016 - 9:08 pm | आदूबाळ
हे नक्की काय गौडबंगाल आहे? कोणीच याबद्दल का बोलत/लिहीत नाही?
थोडी पार्श्वभूमी अशी: माझ्या एका मित्राचे वडील बालगंधर्वांच्या मृत्यूनंतर जे काही घडलं त्यात काही ऑफिशियल कपॅसिटीमध्ये संबंधित होते**. हे त्यांनीच सांगितलं, आणि व्यावसायिक गोपनीयतेच्या कारणास्तव बाकी काहीही सांगायला नकार दिला. नक्की काय घडलं होतं?
**ते प्रॉपर्टी व्हॅल्युअर आहेत, आता अर्थातच निवृत्त.
18 May 2016 - 10:31 pm | अत्रन्गि पाउस
अंत्यसंस्कार केले गेले ...रातोरात ...कुणालाही फारसे कळवले गेले नव्हते ...
19 May 2016 - 2:18 pm | पद्मावति
अप्रतिम लेख.
22 May 2016 - 12:39 am | जुइ
एका मनस्वी कलाकाराचा जीवनपट डोळ्यांसमोर उभा राहिला. मात्र त्यांच्या आयुष्याचा करूण अंत वाचवत नाही. आपल्या पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.
22 May 2016 - 1:49 am | चतुरंग
बालगंधर्व गायकनट म्हणून असामान्य होते यात शंकाच नाही.
कलाकार माणूस म्हणून वैयक्तिक आयुष्यात कसा आहे हे बघू नका असे म्हणतात. परंतु कला एकीकडे आणि वैयक्तिक आयुष्य दुसरीकडे असे १००% करता येत नाही. मुळात माणूस कसा आहे हे देखील महत्त्वाचे ठरतेच..
एकीकडे या मनस्वी कलाकाराला सगळे जग डोक्यावर घेऊन नाचते आहे आणि दुसरीकडे त्यांच्या पत्नीला कणभरही सुख मिळू नये या विरोधाभासाने जीव जळतो, कळवळतो. गंधर्वांच्या पत्नीने जे काही सोसले ते केवळ भयंकर होते...सर्व अपत्यांचा मृत्यू? काय हे जीवन :(
आणि याच कारणामुळे गंधर्वांना आयुष्याच्या शेवटी जे काही भोगायला लागलं त्याचं फार वाईट वाटत नाही. कुठेतरी त्या माउलीचे शाप यांना भोवलेच...असो.
(गोहरजान कर्नाटकीचा आवाज अतिशय सुरेल आणि गोड होता असे वरती दिलेल्या तूनळी दुव्यावरुन ऐकले. हा जोगिया राग म्हणजे "वद जाऊ कुणाला शरण" या नाट्यपदाचा राग आहे ना?)
-रंगा
23 May 2016 - 12:52 pm | अत्रन्गि पाउस
होय ..
भीमसेननि गायलेला पिया मिलन कि आस सुद्धा जोगीयाच ...
24 May 2016 - 3:39 pm | मंदार दिलीप जोशी
सहमत.
23 May 2016 - 7:37 pm | स्वीट टॉकर
अतिशय सुरेख, वाचनीय आणि माहितीपूर्ण!
"त्यातील कारुण्यसिंधूने मात्र क्षणभर मागे वळून पाहिले असणार.
मला वाटते तिच्या डोळ्यातून दोन अश्रू या नटसम्राटासाठी मराठी रंगभूमीवर ओघळले असतील.....
शेवटच्या दोन ओळींनी अगदी परफेक्ट शेवट केलात!
27 May 2016 - 7:17 pm | रघुपती.राज
कारुण्यसिंधू
27 May 2016 - 8:05 pm | चित्रगुप्त
अत्यंत वाचनीय लेख. धन्यवाद.