मराठी चित्रपटांच्या वाटेला मी मुळीच जात नाही याची एक नाही अनेक कारणं.
वास्तवाशी फारकत घेतलेलं टेलरमेड कथानक. स्टुडीओतलेच नव्हे तर कित्येकदा चक्क स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन. आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य. कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद आणि अतिशय बोल्ड, नको इतका ठसठशीत अभिनय, ओव्हरअॅक्टिंग. प्रेक्षक हा जणू एक मठ्ठ धोंडा आहे अशा थाटात सर्व पात्रे आपले अभिनय-पियुष त्याच्यावर संततधारेने ओतत असतात.
यामुळे मराठी चित्रपट बघण्यापेक्षा एखादा अॅनिमेशन चित्रपट बघितलेला बरा.
पण इथे ‘सैराट’ ची लैच चर्चा चालली तसं कुतूहल उड्या मारू लागलं. मराठी चित्रपटांचे वर दिलेले सगळे पैलू सहन करून हा चित्रपट बघणेबल असेल का याचा साधक बाधक विचार करून अखेर ठरवले, चित्रपट बघायचा.
पण चित्रपट बघितला आणि अहो आश्चर्यम ! यापैकी एकही पैलू टोचला नाही. ना नाटकी कथानक, ना रंगवलेले पडदे, ना पुस्तकी थाटाचे संवाद. आणि अभिनयाबद्दल काय बोलावं ? पडद्यावरची ष्टोरी आपण बघत नसून तुमच्या आमच्या आजूबाजूला घडणारा रोजच्या बघण्यातलाच किस्सा वाटून गेला राव.
तर, ‘सैराट’ भन्नाट आवडला. आता का आणि कसा याचा पंचनामा करायचा म्हणजे त्यातली मज्जा घालवण्यासारखंच. पण तरीसुद्धा काही प्लस मायनस इथे मांडल्याशिवाय राहवत नाही. विशेषत: ‘सैराट’ फ्यान क्लबसाठी
पाटलाची लाडकी लेक अर्ची आणि कोळ्याचा झिंगाट पोर परशा यांची ही जमिनीवरचीच प्रेमकथा. पाटलाची दहशत अतिशय सूचकपणे दाखवली आहे. त्या दहशतीची जाणीव नायक आणि नायिका दोघेही बाळगून आहेत. कोवळ्या वयात फुलणारे प्रेम त्या दहशतीने कोमेजून न जाता त्यातूनच वाट शोधत जाते. दोघांमधली सामाजिक आणि आर्थिक विषमता पावलोपावली प्रेक्षकांच्या समोर येत राहते आणि तरीही प्रसंगांचे वळण कुठे खटकत नाही. अखेरीस अर्ची आणि परशा ठेचा खात खात पळून जाण्यात यशस्वी होतात. हा पूर्वार्ध अतिशय रोचक झाला आहे.
उत्तरार्ध बऱ्याच जणांना भावला नाही. पण तोसुद्धा पूर्वार्धाप्रमाणेच वास्तवाशी इमान राखून आहे. एकीकडे कुटुंबाबद्दलची घराबद्दलची ओढ आणि परशाबद्दलचे नैसर्गिक आकर्षण यात होणारी रस्सीखेच रिंकू राजगुरू या नवोदित मुलीने अतिशय प्रगल्भपणे दाखवली आहे. संपन्न घरात वाढलेली असल्याने विपन्न्तेचा, बकालतेचा सामना करताना हरणारी हिम्मत शर्थीने सावरून धरणारी अर्ची रिंकूने अगदी समर्थपणे उभी केली आहे. त्यामानाने उत्तरार्धात आकाशचा अभिनय तिच्यापुढे काहीसा फिका पडलासा वाटते. पडत झाडत, ठेचा ठोकरा खात अखेर त्या दोघांचे प्रेम सगळ्या कसोट्यांना पुरून उरते हा भाग खरोखर बघण्यालायक झाला आहे.
आणि शेवट मात्र पूर्ण कलाटणी देणारा. केवळ सुन्न !
हा शेवट म्हणजे रुढीप्रियतेच्या मानसिकतेवर आणि ती सहन करणाऱ्या समाजमनावर सन्नकन मारलेली चपराक आहे ! ! !
ग्रामीण ष्टुरी असूनसुद्धा सैराट मध्ये ‘ग्राम्य’पणा अधोरेखित केलेला नाही. शहरी लोकांच्या कल्पनेतले ‘ग्राम्य’ वातावरण मुद्दाम निर्माण केलेले नसून खरोखरच्या ग्रामजीवनातले सरळ चित्रण आहे. कथानक सहज पुढे जात राहते. कुठेही कृत्रिम चढ-उतार, नाट्यमय झटके दिलेले नाहीत. पात्रे कृत्रिम वाटत नाहीत. तरीही प्रेक्षकांच्या मनातली उत्कंठा सातत्याने राखून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. नायिका अर्चना उर्फ अर्ची ही सरासरी मराठी चित्रपट नायिकेच्या परंपरेला धक्के देणारी आहे. तरीही बोल्ड वाटत नाही. ओढूनताणून आणलेला शहरी सुधारकपणा तिच्यात नाही. पण तरीही कुठल्याही हिंदी चित्रपटाच्या नायिकेपेक्षासुद्धा ती मॉड आहे. तिचा बिनधास्तपणा कसल्याही सो कॉल्ड मॉडर्नपणा पेक्षा आकर्षक आहे. सौंदर्याचे कुठलेही पारंपारिक निकष तिला लागू होत नसूनही ती सुंदर वाटते यात निवळ कॅमेर्याचे यश नसून तिची अदा, अंदाज आणि दिग्दर्शकाचे कौशल्य यांचाही मोठा वाटा आहे.
नायक परशा हासुद्धा पारंपारिक नायकाच्या चौकटीत बसत नाही. धाडसी असूनही काहीसा बुजरा. त्याच्या वावरण्यात ष्टाईल आहे पण ‘अॅक्शन’ नाही. धीटपणा आहे पण कसलेही ग्लॅमर नाही. आणि तरीसुद्धा अर्चीचे त्याच्याकडे आकर्षित होणे अगदी नैसर्गिक वाटते. आकाश ठोसरने परशा अगदी यथार्थ उतरवला आहे.
एकूणच मांडणीमध्ये कुठेही भडकपणा नाही इतकेच नाही तर साधेपणासुद्धा कुठेच ‘अधोरेखित’ केलेला नाही. चित्रपट मांडण्याचा हा सहजपणाच मला भावून गेला.
आणखी एक अतिशय उल्लेखनीय विशेष म्हणजे व्हायोलन्सच्या सर्व प्रसंगात पार्श्वसंगीत शून्य आहे ! ना कर्णकर्कश्श वाद्यमेळ ना तारस्वरातील किंचाळ्या ना ड्रम्सचा टिपेचा धडधडाट. पण कोणताही बटबटीत म्युझिक इफेक्ट न देताही त्यातली हिंसा जाणिवांना हादरवून जाते.
अजय अतुल यांचे सुश्राव्य आणि मधुर संगीत ‘याड’ लावून जातं. सर्वच गीते अतिशय मेलोडियस आणि हार्मनीयुक्त आहेत. एक ‘झिंगाट’ सोडलं तर इतर कुठलेही गीत प्रत्यक्षपणे नायक नायिकेच्या मुखी उमटलेले नाही. पण त्या त्या प्रसंगातील नायक नायिकेच्या भावना संगीत आणि दृश्य माध्यमातून अगदी चपखलपणे उतरल्या आहेत.
मात्र एक विसंगती मला खटकली. चित्रपटातून वेगळी काढून डोळे मिटून ही गाणी इन्स्ट्रुमेन्ट्ल मोडमध्ये ऐकली तर ती खरंच अवीट गोडी देतात. पण संगीताचा पाश्चात्य धर्तीचा बाज आणि वाद्यमेळ यांच्यामुळे ग्रामीण मराठी शब्द त्यात ‘फिट्ट’ होत नाहीत. खऱ्या अर्थानं ही ‘गावाकडची गाणी’ वाटतच नाहीत. सुमधुर असूनही ही गाणी चित्रपटात वरून दिलेल्या देखण्या पॅचेससारखी वाटतात.
तसेच अर्चीच्या घराचे वातावरण प्रतिगामी असूनही एकट्या अर्चीलाच बुलेट, ट्रॅक्टर चालवणे, कधीही कुठेही भटकणे हे स्वातंत्र्य दिलेले आहे. तसेच परशा आणि अर्ची यांची प्रेमकहाणी आख्ख्या गावाला दिसत असूनही अर्चीच्या घराच्या लोकांना समक्ष दिसेपर्यंत समजत नाही. या किरकोळ चित्रपटीय विसंगती सोडल्या तर बाकी सर्व चित्रपट जवळ जवळ वास्तवाला धरून आहे.
एकूण, सगळी बेरीज-वजाबाकी करूनही मला ‘सैराट’ भन्नाट आवडला आहे. आणि सैराट फ्यान क्लबच्या आग्रहास्तव इथे माझंबी मत लिवलं आहे. :)
प्रतिक्रिया
18 May 2016 - 1:51 pm | नंदा
जरा ओवरहाईप झालं आहे . पण आजकालच्या मार्केटिंगच्या जमान्यात हे चालणारच. चित्रपटातली प्रेमकथा नवीन नाही. अखेरही नवीन नाही . Old wine in a new bottle आहे . पण या नवीन बाटलीला रिअलिझमची झळाळी आहे. मराठी मातीचा वास आहे. सादरीकरण आणि दिग्दर्शन मराठी चित्रपटसृष्टीतल्या अग्रेसर अशा काही चित्रपटांपैकी एक म्हणता येईल. मनोरंजन करताना डोके बाजूला ठेवायची आवश्यकता नसते असा एक निश्चित दृष्टीकोन प्रत्येक प्रसंगातून दिसतो. मला हा चित्रपट पुढील मुद्द्यांमुळे विशेष वाटतो:
- जशी अे. आर. रेहेमानची गाणी त्याचीच गाणी म्हणून ओळखली जातात - सर्वसाधारणपणे गाणारे कोण हे फारसे कोणाला माहित नसते, तसे ह्या दिग्दर्शकाचे आहे. तस पाहिल तर हा फँड्रीचाच पुढचा भाग आहे (जर फँड्रीतल्या जब्याच प्रेम उच्चवर्णीय शालूनी स्वीकारल असत तर काय होऊ शकल असत हे आपण सैराट मध्ये बधतो). पण फँड्रीतले कलाकार इथे वापरले नाहीत . या मागची कारण व्यापारी असतीलही, पण नागराजच्या पुढच्या चित्रपटात आकाश ठोसर किंवा रिंकू राजगुरू आपल्याला पुन्हा दिसतील ही शक्यता कमीच. ही स्टार सिस्टिमची अखेर जवळ येण्याची चिन्हे आहेत. एका जमान्यातली गाणी आपण लता किंवा आशाबाईंची म्हणून ओळखत असू. त्या गाण्यांमागले संगीतकाराचे किंवा गीतकाराचे नाव सामान्य रसिकांना माहितही नसायचे. ती एक प्रकारची स्टार सिस्टिम होती. ती अे. आर. रेहेमान सारख्यांनी मोडून काढली . चित्रपट हे मुख्यत: दिग्दर्शकाचे सृजनमाध्यम असते. अभिनेत्यांचे काम हे निमित्यमात्र असते. त्यासाठी स्टार्सची आवश्यकता नाही. हे नागराज आपल्याला फँड्री आणि सैराट मधल्या अतिशय नवख्या कलाकारांतून उत्तम काम करवून घेऊन दाखवतो आहे. स्टार सिस्टिमवरचा खर्च कमी होऊन या मुळे आपल्याला जर उत्तमोत्तम चित्रपट पाहायला मिळणार असतील तर ते नागराजचे सैराटपलीकडचे यश.
- मराठी माध्यमांवर जे पुणे - मुम्बई आणि पश्चिम महाराष्ट्राचे सांस्कृतिक वर्चस्व दिसते त्याचा सैराटमध्ये खास इन्कार आहे . पात्रांची बोली मध्य महाराष्ट्री आहे . पुण्या मुंबईतले शहरी कलाकार ग्रामीण लहेजा घेऊन बोलत आहेत असा नाटकीपणा नाही. वर उल्लेखलेल्या मराठी मातीचा वास तो हा. उदारणार्थ, मुक्ता बर्वेनी आर्ची केली असती तर इतकी अस्सल वाटली नसती (पण गिरीश कुलकर्णीचा देउळ मधला केश्या चांगला उतरला होता). लोकेशन्स पुणे - मुम्बई आणि पश्चिम महाराष्ट्राबाहेरची आहेत . महाराष्ट्राच्या या भागाला बऱ्याचदा पुण्या-मुम्बईपेक्षा हैदाराबाद / तेलंगण जवळचे वाटते . त्या दृष्टीकोनातून नायक नायिकेचे मुंबई (पळून जाणाऱ्यांचे खास डेस्टिनेशन) ऐवजी हैदाराबादला जाणे योग्यच. नागराजकडून महाराष्ट्रातल्या अशा दुर्लक्षलेल्या लोकांच्या / भागाच्या / जीवनपद्धतीच्या कथा सैराट सारख्या निर्मितीमूल्यांसह सर्वांसमोर येत राहतील ही अपेक्षा.
- लैला मजनू / रोमिओ जुलिएट / वासू सपना यांच्यासारखी तरूण प्रेमीजीवांना आदर्श वाटावी अशी आर्ची परशाची खास मराठमोळी ट्रेजिरोमंटिक जोडी मिळाली
अजय अतुलच्या संगीतात मेलडी थोडी पण प्रभावी असते, तालाच वर्चस्व अधिक. आणि ओर्केस्ट्रेशन / अरेंजमेंट अति असते. त्यामुळे अकलूजपासून सिलिकॉन व्हलीपर्यंतचा सैराटचा तरुण प्रेक्षक झिंगाट वर पिटात न नाचता तर नवल. पण लॉस अन्जेलीस जाऊन करून आणलेली सिंफ़ोनिक अरेंजमेंट अनावश्यक आणि विरूप . त्यावर निळ्या डोळ्यांची सोनेरी केसांची एखादी गौरवर्ण युवती डेझी फुललेल्या कुरणामधून बागडती बघायला योग्य वाटले असते. आर्ची परश्याच्या ऊसातल्या शेतातील स्लो मोशन धावांसाठी आम्हाला सतारीचा एखादा फ्युजन तुकडा चालला असता.
18 May 2016 - 1:56 pm | सस्नेह
यथार्थ प्रतिसाद !
18 May 2016 - 3:37 pm | झेन
आपले रसग्रहण __/\__ सटीक, ते पण वेगळा धागा न काढता
18 May 2016 - 2:35 pm | साहेब..
_/\_
18 May 2016 - 3:58 pm | भिंगरी
आणखी एक अतिशय उल्लेखनीय विशेष म्हणजे व्हायोलन्सच्या सर्व प्रसंगात पार्श्वसंगीत शून्य आहे ! ना कर्णकर्कश्श वाद्यमेळ ना तारस्वरातील किंचाळ्या ना ड्रम्सचा टिपेचा धडधडाट. पण कोणताही बटबटीत म्युझिक इफेक्ट न देताही त्यातली हिंसा जाणिवांना हादरवून जाते.
या शांततेमुळेच तो प्रसंग आपल्याला स्तब्ध करून टाकतो.
18 May 2016 - 4:01 pm | धनंजय माने
एखादी मुलगी जास्त आवडली म्हणून दुसरीला नावं का ठेवतात लोक कोण जाणे?
आमच्या कथेबाबत काही जाणवलं का? उगाचच कुठल्याही प्रकारचा अतिरंजित प्रकार आम्ही केलेला नाही.
दोन घटका विरंगुळा मायबाप प्रेक्षकांना मिळावा एवढीच इच्छा.
- आपलाच धनंजय माने
18 May 2016 - 4:29 pm | पथिक
छन लिहिलय
18 May 2016 - 4:29 pm | पथिक
छान लिहिलंय
18 May 2016 - 4:36 pm | समीरसूर
जरा कन्फ्युजन झाल्यासारखं वाटतंय. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक काळ असा होता की काही 'बरे' अपवाद सोडले तर बाकी मराठी चित्रपटांच्या नावाने आनंदच होता. मला वाटते ८० आणि ९० चे दशक वाईट होते. 'घनचक्कर', 'इना मीना डिका', 'धुमाकूळ', 'चल गंमत करू', 'घोळात घोळ', 'सासरचं धोतर', 'माहेरची साडी', 'हळद रुसली कुंकू हसलं', 'वाहिनीच्या बांगड्या', ''येडा की खुळा', 'शेम टू शेम', 'डॉक्टर डॉक्टर', 'डोक्याला ताप नाही', 'आता होती गेली कुठे?' ही प्रातिनिधिक उदाहरणे पाहिली तर त्या काळात ९०% चित्रपट अत्यंत भिकारच असायचे. या काळात मराठी चित्रपट चित्रपटगृहात खूप कमी चालायचे. लेखात म्हटल्याप्रमाणे ढिसाळ पटकथा, चुकीचे गावरान उच्चार, भडक आणि संतापजनक अभिनय, आक्रस्ताळ्या आया, सासवा, नायिका, कृत्रिम रांगडा नायक, गचाळ चित्रण, अतिशय टुकार आणि पाचकळ कथा अशा कित्येक दोषांमुळे मराठी चित्रपट मरणासन्न झाला होता.
अर्थात अपवाद होते पण ते अगदीच कमी होते. 'सवत माझी लाडकी', 'अशी ही बनवाबनवी', 'धूमधडाका', 'गंमत जंमत', 'धडाकेबाज' वगैरे मोजके अपवाद होते. त्यामानाने देमार चित्रपटांची संख्या खूपच जास्त होती. या कालखंडात आणि नंतरही मराठी चित्रपटांकडे हजारो प्रेक्षकांनी पाठ फिरवली. पैसे मोजून जर भिकार दर्जाचे मनोरंजन मिळणार असेल तर का चित्रपटगृहात जाऊन वेळ आणि पैसे दवडा असा सरळ हिशेब होता.
'श्वास' (२००४) आल्यानंतर चित्र किंचित बदलले. 'श्वास' हा गंभीर चित्रपट होता. राष्ट्रीय पुरस्कार जरी त्याला मिळाला असला तरी लोकाश्रय त्याला लाभला नाहीच. ऑस्करसाठी त्याची रवानगी झाली याचा 'ऑस्करला गेला' म्हणजे नॉमिनेशन मिळालं असा चुकीचा अर्थ काढण्यात आला. ऑस्करसाठी भारताने 'बीवी नं. १' देखील पाठवला होता. पुणे - मुंबई आणि थोडा शहरी भाग वगळता 'श्वास' हा मुख्यत्वेकरून ट्रॉफी मूव्हीच बनून राहिला. त्यानंतर मराठी चित्रपटांनी झटकन कात टाकली आणि मराठी चित्रपटाची पताका जगभर फडकू लागली हे जरा अतिशयोक्त आहे असे वाटते. 'श्वास' इतका नक्कीच लोकप्रिय नव्हता. त्यानंतर २००५ मध्ये आलेला 'डोंबिवली फ़ास्ट' खर्या अर्थाने खूप लोकप्रिय ठरला. एव्हाना तांत्रिक सफाई आलेली होती परंतु आशयामध्ये आणि सादरीकरणामध्ये तितकीशी सफाई दिसत नव्हती. याबाबतीत थोडा उजवा ठरला 'काय द्याचं बोला' पण तो 'माय कझिन विनी'ची कॉपी होता. मला वाटते 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' ने (२००९) ती आशयाची आणि पैशाची श्रीमंती मराठी चित्रपटांमध्ये आणली. हा चित्रपट तुफान चालला. २०१० मध्ये आलेल्या 'नटरंग'ने मराठी चित्रपटांना एक आगळाच दर्जा मिळवून दिला.
'अगं बाई अरेच्चा' 'सावरखेड एक गाव' (२००४) पासून मराठी चित्रपटातली गाणी हिट व्हायला लागली होती. थोड्या-फार फरकाने मराठी चित्रपटांमधली गाणी ही २००४ पासूनच लोकप्रिय व्हायला सुरुवात झाली. त्या आधी मराठी चित्रपट संगीत तितके लोकप्रिय नव्हते.
वास्तवतेशी नातं सांगणारा, तद्दन फिल्मी वगैरे विषय तूर्तास बाजूला ठेवून चित्रपटाचे मनोरंजन मूल्य, गुणवत्ता, आणि त्या आधारावर चित्रपटाला मिळालेली लोकप्रियता आणि त्याद्वारे होणारी कमाई फक्त याच घटकांचा विचार करता 'डोंबिवली फास्ट'ने मराठी चित्रपटांना ऊर्जितावस्था देण्यात मोलाचा वाटा दिला असे मला वाटते.
आणि आतादेखील दर्जेदार आणि लोकप्रिय मराठी चित्रपटांच्या तुलनेत सुमार मराठी चित्रपटांची संख्या कमी नाही. जवळपास ८०% च्या वर मराठी चित्रपट अजूनही सुमार, बाळबोध, आणि कंटाळवाणे असतात हे वास्तव आहे. नुसती तांत्रिक सफाई असून चालत नाही हे या चित्रपटनिर्मात्यांना कळत नाही. अर्थात यात अनुदान, काळ्या पैशाचे पांढऱ्या पैशात रुपांतर करणे अशी बरीच समीकरणे असतात हा भाग वेगळा.
'निशाणी डावा अंगठा', 'बीपी', 'टाईमपास', 'मुंबई पुणे मुंबई', 'नटरंग', 'बालगंधर्व', 'कट्यार...', 'नटसम्राट', 'काकस्पर्श' असे मोजके चित्रपट सोडले तर बाकी अजूनही आनंदीआनंदच आहे. एकेका आठवड्यात चार-चार मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. कधी येतात आणि कधी जातात कळत देखील नाही. 'लावू का लाथ', 'टाटा बिर्ला आणि लैला', 'कमिंग सून', 'नवरा अवली, बायको लवली', 'चल धर पकड, 'चाहतो मी तुला', 'मराठी टायगर्स', जस्ट गंमत', 'सासूचं स्वयंवर', वांण्टेड बायको नं. वन', 'वाजलाच पाहिजे', 'दगडाबाईची चाळ', 'बाई गो बाई', 'ऊर्फी' आणि असे बरेच सुमार, भिकार चित्रपट मराठीत कधी आले आणि कधी गेले कळलंच नाही. अजूनही अशा चित्रपटांची संख्या एकूण मराठी चित्रपटांच्या ८०-९०% सहज असावी.
थोडक्यात काय तर चित्रपट नुसता चकचकीत झाला म्हणजे चित्रपटांनी उत्तुंग झेप घेतली असे नाही. एकूण संख्या खूप वाढली आणि दर्जेदार, वेगळ्या धाटणीच्या, आशयसंपन्न तरीही मनोरंजक अशा मराठी चित्रपटांची संख्यादेखील निश्चितच वाढली आहे आणि त्यामुळे मराठी सिनेमा जगभर पोहोचला आहे, मराठी चित्रपटात सुखद असे ग्लेमर आणि पैसा आलेला आहे, मराठी चित्रपट आता दीन वाटत नाही हे मात्र १००% खरे! आणि अभिमानास्पददेखील!
19 May 2016 - 6:11 pm | मराठी कथालेखक
१)
It was the film Shwaas in 2004 which reignited the spark and everything began to change and a handful of films achieved commercial success, including Harishchandrachi Factory, Natrang, Vihir, Zenda, Jhing Chik Jhing and Mee Shivajiraje Bhosale Boltoy
http://www.boxofficeindia.co.in/aamcha-cinema/
२)
Shwaas was acknowledged as a "significant turn for Marathi cinema" which had been going through a low patch. After its success, it was released in Hindi, Bengali and Tamil languages.
https://en.wikipedia.org/wiki/Shwaas
20 May 2016 - 11:00 am | समीरसूर
हो, असं मी ऐकलं आहे खरं पण हे तितकसं खरं नाही असं मला वाटतं. 'श्वास' हा व्यावसायिक पातळीवर अगदी मर्यादित यश मिळवू शकला. पुणे, मुंबई, आणि थोडा-फार बाकीचा शहरी भाग याच सेक्टर्समध्ये श्वास बऱ्यापैकी चालला. त्यात ऑस्करच्या चुकीच्या हाईपचादेखील थोडा वाटा होता. अर्थात, नीटनेटके सादरीकरण, चांगली पटकथा, सकस अभिनय इत्यादी बाबींवर 'श्वास'ने मोठी मजल मारून निदान त्या बाबतीत तरी मराठी चित्रपटांना थोडे हलवून अधिक जागे केले हे मान्य आहेच! पण म्हणून मराठी चित्रपट 'श्वास'नंतरच घोडदौड करू लागले हे थोडेसे अतिशयोक्त वाटते. त्याआधी 'वास्तुपुरुष', 'दहावी फ', 'सरकारनामा' वगैरे चांगले चित्रपट आले होतेच. 'श्वास'ला लहान मुलाची करुण कहाणी, आजोबाची मानसिक ससेहोलपट, ऑस्करवारी या घटकांचा खूप फायदा झाला. प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळलं की चित्रपटाच्या यशाचे प्रमाण आणि शक्यता वाढते.
20 May 2016 - 1:23 pm | मराठी कथालेखक
मान्य.
मला पण हेच म्हणायचे आहे. श्वासला सुवर्ण कमळ मिळाले होते 'श्वास बघायलाच हवा (भले पायरेटेड सीडी मिळवून)' या भावनेने अनेकांनी तो पाहिला, अर्थात मल्टिप्लेक्स वगैरेतून मिळणारा भरपूस पैसा श्वासला नाही मिळाला पण पायरसीतून का होईना पण चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहीला गेला आणि तिथून बदलाची सुरवात झाली.
मला वाटतं व्यावसायिक यशाच्या बाबतीत 'दे धक्का' महत्वपूर्ण ठरला. विकीपीडीयावरील माहितीनूसार 'दे धक्का' ने सहा कोटींचा धंदा केला. सैराटच्या साठ कोटींची पायाभरणी केली अस म्हणता येईल..
20 May 2016 - 1:47 pm | चांदणे संदीप
हा एक वाईट धक्का होता
ला... ज्याचे मला खूप वाईट वाटलेले त्यावेळी!
Sandy
20 May 2016 - 2:08 pm | मराठी कथालेखक
दे धक्का फारसा काही चांगला चित्रपट नव्हताच.
मला फक्त शिवाजी साटम आणि मकरंदची जुगलबंदी आवडली होती.
20 May 2016 - 2:13 pm | सतिश गावडे
दे धक्का अतिशय टुकार चित्रपट होता.
18 May 2016 - 5:22 pm | अंतरा आनंद
हुश्श. सैराटची सगळी परिक्षणं/ रसग्रहणं का काय ती वाचून काढली आताच. स्नेहांकिता म्हणतात त्याच कारणासाठी मराठी सिनेमा पहायची भिती वाटते.
हे मस्तच.
मोठ्या दिमाखात आलेल्या अनेक चित्रपटांनी पुरती निराशा केली. केवळ चांगला विषय किंवा नावाजलेले कलाकार घेतले की पटकथा, एडिटिंग, संवाद, सशक्त व्यक्तीरेखा या चित्रपटाच्या मुख्य भागांकडे दुर्लक्ष केले तरी चालते असा खाक्या दिसून येतो. हिंदीचे ही तेच, ’पा’ किंवा ’तारे..’ सारखे गाजलेले चित्रपटही त्यात ठळक दिसून येणारा अभिनिवेशामुळे खूप आवडले नाहीत. ("बा प्रेक्षका, आम्ही ही महान गोष्ट सांगतोय" असा आव) अगदी ’प्रकाश आमटे’ किंवा ’कट्यार..’ सारख्या सिनेमातही पात्रांच्या स्वभावाची व्यवस्थित मांडणी, स्वाभाविक अभिनय यावर काहीही मेहनत घेतल्याचं जाणवलं नाही. नुसतं नवीन तंत्रज्ञान आणि चकचकीतपणा काय कामाचा? "मी शिवाजीराजे.. ", काकस्पर्श डोंबिवली फास्ट ह्यासारखे सिनेमे मला आक्रस्ताळी वाटतात. ’कोर्ट’ खूप आवडलेला. पण तो वेगळया प्रकारचा होता. ’मसाला’ हा सुद्धा एक चांगला सिनेमा होता तो मी टीव्हीवर पाहिला तरी आवडला होता. ’फॅन्ड्री’ सुद्धा टीव्हीवर आणि तो ही सलग पाहिला नसल्याने फार बोलू नाही शकणार पण तेवढ्यातही तो आवडला होता असं आठवतय. ’रात्र आरंभ’ हा असाच एक काळाआधी आलेला चांगला चित्रपट. टीव्हीवरच पाहिलाय दोनदा. पण अलिकडे बरेचदा जेवढा गाजावाजा केला जातो तेवढा सिनेमा चांगला नसतो असं बरेचदा होतं. एलिझाबेथ एकादशी आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी हे ही असेच खूप आवडलेले सिनेमे. पण त्यातील विषयाच्या वेगळेपणा हा त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट होता. (यादी लिहीता लिहीता मी स्नेहांकिताच्या मताशी फारकत घ्यायला लागलेय. आहेत हो मराठीतही मोजके असले तरी चांगले सिनेमे. ) मात्र व्यावसायिकतेशी तडजोड करूनही, नेहमीच्याच गोष्टीत आपल्याला हवं तेच परिणामकारकपणे मांडणं यात हा सिनेमा बाजी मारून जातो. इथे काहीजणांच्या प्रतिक्रियेत राष्ट्रिय पातळीवर दखल घेतले गेलेले म्हणजे चांगले असा सूर दिसतोय. असे कित्येक पुरस्कारप्राप्त, पण न बघवले जाणारे सिनेमे आहेतच.
सैराटमध्ये मात्र पात्रांचे स्वभाव फार व्यवस्थितपणे मांडले आहेत. यात आर्चीचा बिनधास्त, बेधडकपणा सुरुवातीच्या विहिरीच्या सीनपासून ते शेवटच्या "माझ्या माहेरची माणसं आहेत, तू नेऊन दे चहा" असं परश्याला सांगेपर्यंत तोच आहे, आणि अर्थात परश्याचंही तसंच. आर्चीची खूप स्तुती होतेय, पण परश्यानेही (आकाश ठोसर) खुप छान काम केलय. त्याचे डोळे फार सुंदर आहेत. ही आपल्या भोवताली घडणारी (थोडी आपलीही) प्रेमकथा वाटते.
मी लहानपणातील सुटीचे दिवस वगळता गावी राहिलेले नाही. ज्या गावी राहिले ती तळकोकणातली गावं, त्यात असं वातावरण नव्हतंच. ही भाषाही फारशी परिचयाची नाही. पण ग्रामिण जीवनावर बेतलेल्या चित्रपटातल्या कृत्रिमपणे बोललेल्या ग्रामिण ढंगापेक्षा यातली भाषा रसरशीत आणि जिवंत वाटली. गाणीही आवडली विशेषत: त्याचं चित्रीकरण.
मी सिनेमा आवर्जून दुसर्यांदा पहात नाही. पण एकेकांची मतं ऐकून हा आपल्यालाच कसा काय एवढा आवडला अशी शंका आली (आणि अनायसे वेळही मिळाला) म्हणून दुसर्या वेळी पाहिला. तेव्हाही आवडलाच. ज्या जोड्यांमध्ये पुरुष थोडा हळवा असतो आणि स्त्री थोडी बोल्ड त्या जोड्या मला प्रत्यक्षात आणि पडद्यावरही आवडतात तशी ही परश्या- आर्चीची जोडी आवडली. ते स्वभाव सिनेमाभर -परिस्थिती बदलूनही- कायम राहिले म्हणूनही आवडला. छोटे आणि परिणामकारक संवाद. "लसूण सोलता यीना व्हय तुला" सारख्या एकेका वाक्यातून फुलत जाणार्या व्यक्तीरेखा आणि प्रसंग. सुरुवातीच्या भागात स्वप्नाळू वाटणारे परश्याचे डोळे उत्तरार्धात विझू-विझू दिसतात, आईशी बोलताना आर्चीच्या डोळयात पाणी येतं असे कितीतरी प्रसंग सिनेमाचे हायपॉईंट आहेत. मी सिनेमा पाहिला तेव्हा त्यावर एवढी चर्चा होत नव्हती म्हणून शेवट माहिती नव्हता पण त्याने सुन्न केलं. "हे बरोबर नाहीय" ह्याची जाणीव काहीजणांना नक्कीच झाली असेल एवढा प्रभाव हा शेवट पाडून जातो.
अवांतर: इथे त्या छोट्या मुलाची रिऍक्शन वैगेरे गोष्टींवर आक्षेप आहेत, त्यांना कट्यार पहाताना "असं रेकॉर्डींग करता येत होतं का? टेकडीवर ग्रामोफोन कसा काय वाजत होता? काजव्यांना मानवी रेंजमधले आवाज ऐकू येतात का? खाँसाहेबाचा स्वभाव नक्की कसा आहे? " इत्यादी प्रश्न पडले होते का? (हे प्रश्न मला सिनेमा बघताना पडत होते आणि असे प्रश्न पडू न देणे यात सिनेमाचं यश असतं. सैराटमध्ये हे प्रश्न मला नाही पडले.). अगदी ’गाभ्रीचा पाऊस’ मध्ये सोनाली कुलकर्णी कोणत्या बाजूने शेतकर्याची आणि ती ही परिस्थितीने गांजलेली बायको वाटत होती?
19 May 2016 - 1:21 pm | पूर्वाविवेक
@अंतरा आनंद, बऱ्याच गोष्टींशी सहमत. मलाही असेच वाटते.
18 May 2016 - 7:44 pm | सिरुसेरि
टिंग्या , दहावी फ , धुडगुस , दोघी , रावसाहेब , भेट , धरलं तर चावतय , चंगु मंगु , घराबाहेर हे काही लक्षात राहिलेले इतर मराठी चित्रपट .
सैराटमधील बिटरगावच्या बिली बोडेनच्या आईच्या छोट्या पण मजेशीर भुमिकेत ज्योती सुभाष लक्षात राहतात .
18 May 2016 - 8:41 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
चित्रपट हे मनोरंजनाचे साधन आहे,तेव्हा तो वास्तववादीच असावा हा काहीजणांचा हट्ट चुकीचा आहे.
मराठीमध्ये पिंजरा आणि हिंदीमध्ये शोले हे एवरग्रीन सिनेमे आहेत आणि राहणार.
.
.
.
.
हे मिपा लै न्यारं इथं थंडगार वारं याला गरम शिनगार सोसना
18 May 2016 - 10:06 pm | सस्नेह
या काहीजणांना वास्तववादी चित्रपटांची नुसती आवड नसून हट्टच असावा असा तुमचा हट्ट दिसतो :)
पसंद अपनी अपनी...
19 May 2016 - 11:22 am | सस्नेह
वरती काही प्रतिसादांमधून काही मराठी चित्रपटांबद्दल खूपच चांगले अभिप्राय लिहिले आहेत. त्यावरून या चित्रपटांची यादी बनवून सवडीने पाहायचे ठरवले आहे. पूर्वग्रहामुळे मी जे मराठी चित्रपट पाहण्याचे बंद केले आहे, त्यामुळे मी हे चित्रपट गमावले असावेत.
आता लेखाबद्दल. सैराट ला नावाजण्यासाठी इतर चित्रपटांना नावे ठेवण्याची मुळीच गरज नाही. मी आपले एक जनरल इंटरप्रिटेशन सांगितले. हे मत कोणताही एक किंवा दोन मराठी चित्रपट पाहून घाईघाईने बनवलेले नसून काही काळापूर्वी म्हंजे साधारण अलका कुबल इ. च्या काळात आलेल्या अनेक चित्रपटांवरून बनले आहे. तसेच लेखात मी माझी मते लिहिली आहेत याचा अर्थ इतरांची मते चूक असा होत नाही.
अर्थात अशा चित्रपटांनाही काही अपवाद आहेतच आणि ते मलाही आवडले आहेत. त्यांची यादी टाकणे हा लेखाचा विषय नसून सैराट हा विषय आहे.
हे सगळे असूनही नमूद करते की एकूणच वर समीरसूर म्हणतात तसे नवीन येणाऱ्या एकूण मराठी चित्रपटांपैकी ८० ते ९० टक्के मराठी चित्रपट अतिशय सुमार दर्जाचे आहेत. आता सुमार याचे निकष व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकतात. काहींना दे धमाल हाणामारी, तर काहींना विनोदी फुल्ल करमणूकवाले चित्रपट चांगले वाटू शकतात तर काहींना संथ कलात्मक चित्रपट आवडतील. सरासरी मराठी चित्रपटातील चित्रण वास्तवापासून खूप दूर असते. आता काही जण म्हणतात तसे ते वास्तवाशी सुसंगत असावेच असा आग्रह का. आग्रह अर्थात नाहीच. पण जर तसा असेल तर सामान्य लोक त्याच्याशी सहज रिलेट होऊ शकतात असे वाटते.
काहींचे मत असे दिसते की निव्वळ मनोरंजन म्हणून चित्रपट पाहायचा तर तो वास्तवाला धरून नसलेलाच बरा. पुन्हा पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना !
आता अभिनयाबद्दल. फारच कमी मराठी चित्रपटांमधला अभिनय नैसर्गिक किंवा सहज स्वाभाविक असलेला दिसतो. हिंदी चित्रपटांच्या बाबतीतही बऱ्याच प्रमाणात तीच गोष्ट आहे. पण मराठीपेक्षा अलीकडे हिंदीत खरोखर चांगले चित्रपट येऊ लागले आहेत. ए वेन्सडे, हॉलिडे, ओ माय गॉड हे काही मला आवडलेले हिंदी चित्रपट (बरेच आहेत, यादी कुणाला हवी असेल तर सवडीने टंकते), जे कलात्मक नसूनही वास्तविकपणे चित्रित केलेले आणि स्वाभाविक अभिनय असलेले वाटतात. निदान अभिनय आणि चित्रण मराठीपेक्षा निश्चित सरस असते. ( आता ओ माय गॉड हा वास्तवाला धरून कसा हे जर कुणी विचारणार असेल तर नमस्कार ! )
चित्रणाबद्दल बोलायचे तर मराठी चित्रपटांमध्ये एकच सीन फार कमी फ्रेम्स वापरून चित्रित केलेंला दिसतो. हिंदीसारखे विविध अँगल्सनी कॅमेरा फिरवण्याचे कसब मराठीत का आणता येऊ नये ?
असो. हा काही लेखाचा विषय नाही पण काहींनी उपस्थित केलेल्या शंकांना उत्तर देणे जरुरी वाटले.
19 May 2016 - 12:05 pm | शब्दबम्बाळ
मला तुमच मत वगैरे काही बदलायचं नाहीये पण तुम्ही पुन्हा पुन्हा परस्परविरोधी विधाने करत आहात!
"हे मत कोणताही एक किंवा दोन मराठी चित्रपट पाहून घाईघाईने बनवलेले नसून काही काळापूर्वी म्हंजे साधारण अलका कुबल इ. च्या काळात आलेल्या अनेक चित्रपटांवरून बनले आहे."
म्हणजे बराच काळ उलटून गेला नाही का, तुमच्या अनुभवाला!
आणि असे असून परत तुम्ही म्हणता:
"हे सगळे असूनही नमूद करते की एकूणच वर समीरसूर म्हणतात तसे नवीन येणाऱ्या एकूण मराठी चित्रपटांपैकी ८० ते ९० टक्के मराठी चित्रपट अतिशय सुमार दर्जाचे आहेत."
"सरासरी मराठी चित्रपटातील चित्रण वास्तवापासून खूप दूर असते" (हे वाक्य वर्तमान काळातले असावे असे वाटते, अलका कुबलच्या काळातले नाही)
हे मत कुठून बनवलत? म्हणजे स्वतः चित्रपट पाहून एखादा असे म्हणत असेल तर समजू शकते पण तुम्ही तर चित्रपट पाहिले हि नाही म्हणताय! परत ते सुमार दर्जाचे आहेत हे हि म्हणताय!
बर परत सिनेमाचा दर्जा वगैरे प्रत्येकाच्या आवडी निवडीवर अवलंबून हे हि म्हणताय!!
आखिर केहना क्या चाहते हो??
holiday हा सिनेमा वास्तवदर्शी वगैरे वगैरे वाटला असेल तर काय बोलणार आता!
पसंद अपनी अपनी!
"सनम रे" हा चित्रपट पाहून आजारी पडता पडता राहिलो! असे चित्रपट प्रत्येक सिने सृष्टीत असतातच! :)
19 May 2016 - 12:14 pm | रमेश भिडे
Men to left.
Women to RIGHT for obvious reasons.
19 May 2016 - 1:21 pm | अभ्या..
परफेक्ट भिडेसाहेब
19 May 2016 - 11:30 am | भोळा भाबडा
100
सैराटची पायरेटेडे सीडी देवून स्नेहांकिता ताईंचा सत्कार
19 May 2016 - 11:36 am | सस्नेह
देऊन देऊन पायरेटेड ?? :(
19 May 2016 - 11:51 am | वेल्लाभट
पायला आवडला. बास.
19 May 2016 - 5:15 pm | सप्तरंगी
लिहिलेच आहे तर पोस्ट करते आहे… इथेच :)
काही movies निखळ आनंद देतात, काही कर्णमधुर गाणी ऐकवतात, काही विचार करायला लावतात, काही सुन्न करतात, काही सैरभैर करतात तर काही movies हे सगळेच करतात, सैराट मध्ये हे सगळेच दिसले. मग सैराट मध्ये अजून काय आहे जे इतर मराठी movie मध्ये नाही ? तर सैराटमध्ये आजपर्यंत कधीही न दिसलेले खेडवळ, नुकतेच वयात आलेले, कुठेही college च्या कट्ट्यावर दिसणारे कोवळे युगुल आहे, थोडा जातीयवाद , थोडी जिगरी यारी, थोडी ढिन्चाक theater डोक्यावर घेऊ पाहणारी अजय-अतुल ची थिरकवणारी झिंगाट गाणीही आहेत. थोडे अजून वेगळे म्हणून मुलगी- गावातली मुलगी असुन जरा वेगळी- हटके , बुलेट-ट्रक्टर चालवणारी, मुलालाच पळवून नेणारी dashing अशी आहे तर मुलगा जरा लाजरा-बुजरा, सोशिक, समजूतदार आणि जबाबदारी घेणारा , प्रेमापोटी अगदी रडवेला होणारा आहे. ती movie आर्ची-परशा च्या खेडवळ संवादात, आर्चीच्या रांगड्या तर परशाच्या साध्या स्वभावात आपल्याला अडकवत राहते, जिंकूनही घेत राहते. दिल दोस्ती नंतर मग climax मध्ये दुनियादारी दुष्मनी सुरु होते तेंव्हा मात्र वास्तवाची धग आपल्यापर्यंत पोहोचवु पाहते.
एक कलाकृती म्हणून, commercial film म्हणून movie उत्तम आहे. पण सुरुवातीपासूनच खूप काही आवडु आणि खटकूही लागलेले असते. काय आवडले तर तर फार सरळ सोपे असते पण काय खटकले हे जर क्लिष्ट.
movie चा नेमका उद्देश काय असतो, काय असावा. movie हे entertainment चे एक प्रभावी माध्यम. पण अशा कलाकृतीतून आपण फक्त कलाकृती घेऊन झिंगाट , सैराट होवून theater मधून बाहेर पडत नाही, तरी आपण नेमके ते उचलतो का जे नागराज मंजुळे ना अपेक्षित आहे ? त्यांना तरी तेच अपेक्षित आहे का ? असते तर त्याने गाणी, ग्रामीण पार्श्वभूमी , कोवळे प्रेम आणि honer killing यांचा एकत्रित भरणा का केला असावा. कारण वास्तववादी असली तरी ती एक commercial film आहे, गल्लाही भरायचा आहे मग commercial film म्हणली कि हे सगळे करावेच लागते. आणि त्यामुळेच तर ती इतकी चालतेय. बरोबर, पण मग यश कसे मोजायचे, कशात आहे यश- ४० कोटीत कि एक विचार पोहोचवण्यात. दोन्ही म्हणाल तर खरेच दोन्हीही साध्य करते का कि movie? उदाहरणार्थ : ज्या वस्तीतील, गावातील लोकांना अनुसरून हे चित्रण केले आहे किमान त्यांचे तरी विचार बदलतील का हि movie पाहून कि गावचा पाटील अजुनही म्हणेल की - आता पोर अशी वागली तर हेच होणार न राव ! कट्टावर बसलेली मुले फक्त आर्ची-परशाचे प्रेमच बघतील आणि त्यांना पटेल त्या मुलांचे पैसे घेऊन पळुन जायचा सैराट प्रयत्न की त्यांना दिसेल आर्ची-परशाचे प्रेमानंतरचे वास्तव , वणवण आणि अजाण वयातल्या प्रेमातला फोलपणा? कि त्यांना वाटेल कि हे सगळी मोठी माणसे वैरी असतात प्रेमाचे..
movie पाहुन गाणी, भन्नाट काम करणारे आर्ची-परशा , त्यांची भाषा गावरान चिकन आणि हुरडा सारखे लक्षात राहत असतील आणि फार फार तर एक सुस्कारा, हळहळ वाटत असेल तर ते का अशा movie चे यश मानायचे कि आपल्या मनाची- भावनेची नस अचूकपणे पकडून आपल्याला जरा खेळवण्यात, जरा सुन्न करण्यात ऐन दुष्काळात ४० कोटी कमवण्यात नागराज मंजुळे यशस्वी झाले असे म्हणायचे? कि - यार असे जबरी स्क्रिप्ट हवे ४० कोटी काढायचे असतील तर - असे अजून विचार करणारे निर्माते निर्माण झाले तर ते यश मानायचे?
movie movie म्हणुन चांगलीच आहे. आजच्या प्रेक्षकांना काय भन्नाट वाटू शकते याचा विचार करून जनजागृती करू पाहणाऱ्या इतर वास्तववादी commercial movies इतकीच चांगली आहे पण त्यातून जनजागृती करणे हाच एकमेव उद्देश होता असेल म्हणाल तर ते फार चुकीचे ठरेल, आणि जनजागृती होते आहे असे म्हणणे हि तितकेसे बरोबर ठरणार नाही. नागराज मंजुळे च्या म्हणण्यानुसार त्यांना खेड्यातले हिरो- हिरोईन अचानक स्वित्झरलंडला बर्फात जाऊन गाणे म्हणतात हे खटकते, बरोबरच आहे. त्यांना काय कसे पोहोचवायचे याची उत्तम जाण आहे पण मग त्यांनी त्यासाठी सामान्य प्रेक्षकाला अवांतर गोष्टीत जास्त न अडकवता त्यांच्यापर्यंत एक अतिशय clear असा संदेश पोहोचवणे हे ही तितकेच जरुरी होते असे कुठेतरी वाटते.
यावर अजूनच हाईट म्हणजे नुकतेच सैराट च्या शेवटच्या दृष्यावरील विनोदही वाचनात आले, यावरूनच प्रेक्षक कसा विचार करतो आहे, हे समजते.
प्रेक्षकांना मुलांचे पळून जाणे, मुलांचे गोळी चालवणे, मुलांना मारून टाकणे हे जास्त खटकायला हवे होते पण एकंदरीत reviews वरून त्याऐवजी सगळे गाण्यात, कधी आर्ची-परशाच्या वेडावणाऱ्या प्रेमात तर कधी रांगड्या संवादातच गुंतुन गेले आहेत असे वाटते आहे. ते कुठेतरी पटत नाहीये, हे नाहीये जे आपल्याला घ्यायचेय - असे वाटतेय. पटकथा, अभिनय , दिग्दर्शन , संगीत आवडणे हा तर फक्त मनोरंजनाचा भाग झाला , अश्या विषयाचे चित्रपट आपले मनोरंजन करतात याचा खेद वाटतो. खरे तर सैराट पेक्षा कितीतरी चांगल्या विषयाचे आशयाचे चित्रपट मराठीत आले (उदा. एक कप च्या, नितळ ) त्याचा तितके उत्तम (actually उत्तम नव्हे तर ढिनचाक ) संगीत नसल्यामुळे कथानक आणि संवाद इत्यादी सर्व उत्तम असली तरी त्यांचा सगळ्यांवर इतका प्रभाव पडला नाही, कारण एक तर त्याचा focus प्रेम (तेही कॉलेज कुमारांचे ) हा नव्हता आणि दुसरे म्हणजे ते त्या चित्रपटातील संवाद, विषय आणि संगीत सगळ्याच प्रेक्षकांना सहजासहजी आवडेल , आकर्षित करेल असे नव्हते.
मतितार्थ हा की ४०-४२ कोटीवर किंवा सध्या सैराटची जी हवा सुरु आहे त्यावर चित्रपटाचे यश अवलंबून नसावे. शेवटी ज्याने त्याने पटेल तसा बोध घ्यावा.
19 May 2016 - 9:13 pm | रेवती
जे आवडले नाही त्याची चर्चा सुरु केल्याबद्दल धन्यवाद. मी सिनेमा पाहिला नाही पण तो चाम्गला असणार असे दिसतेय. यूट्यूबवर बरेच काही आले आहे. सीन्स पाहीलेत पण एकसंधपणा न अनुभवता आल्याने मत व्यक्त करत नाही.
यातील गाणीही आवडली. ती अजय अतुलनेच लिहिली आहेत असे ऐकले एका मुलाखतीत. संगीत देण्याआधी ती एक कविता असते व ती जितकी अर्थपूर्ण तितके गाणे तयार झाल्यावर आशय पोहोचवण्यात यशस्वी वगैरे आहेच.
अजय अतुल जोडीने आपल्याला गाणी लिहिता येतात त्याबद्दल ब्लेस्ड मानले आहे. चाली चांगल्या लावल्या आहेत, तो प्रश्न नाही. काहीवेळा "हे कुठेतरी ऐकलय" असं वाटून जातं पण गाण्यांचे शब्द..............रिपिटीशन करून करून लोकांच्या डोक्यावर घण घातले आहेत.
'सैराट झालं जी' चिन्मयीने गायलेल्या गाण्यात स्पष्टता नाही, जशी अतुलनं म्हटलय त्यात आहे.
'आत्ताच बया का बावरलं' या गाण्यात मन बावरण्यापेक्षा दे दणादण संगीत आहे. मुलगी साधीसुधी असो नाहीतर आर्चीसारखी धीट, मन बावरल्यावर आरडाओरडा नसतो. तो या गाण्यात आहे त्यामुळे श्रेयाने छान आवाजात गायले असले तरी मेंदूला पटत नाही. त्यातील भाषा जर गावाकडली वापरायची ठरलं असलं तर तशीच वापरावी. "डोळं झाकलेलं बाई, रेघ आखलेलं बाई, माग रोखल्यालं साजना" वगैरे ऐकून व बाकी कंटिन्युटीचा जरा घोळ पाहिल्यानं हिरमोड झाला.
त्या गाण्यात आर्ची मस्त दिसलिये. इतक्या आवडिनं आपण काही ऐकायला घ्यावं तर शब्दांकडेही लक्ष जातच! तिथे घोळ झाला की मूडचा विचका होतो.
'झिंगाट' गाणं आवडलं पण माझ्यापेक्षाही मुलाच्या अमराठी मित्रांना जास्त आवडलं. खेळताना घरात पाणी प्यायला म्हणून आलेली मुलं ते पहात बसली.
'याड लागलं' असं स्वतंत्र गाणं असताना 'बावरण्याच्या' गाण्यात "लागलं सजनीला सजनाचं याड" असं ऐकल्यानं दाताखाली खडा यावा तसं झालं. त्या गाण्यातील कोरस मस्त झालाय.
मूव्ही पाहिल्यावर काय ते कळेलच पण गाणी ऐकताना यावेळी तितकी मजा आली नाही तरी ऐकतेच आहे. अजय अतुलनं गाणी लिहिताना फार काळजी घेण्याची आवश्यकता आहे. संगीत देण्यात मात्र ते तगडे आहेत पण वाद्यांचे आवाज जरा कमी करा की राव! देशात संगीत करा, परदेशात करा, जे काय असेल ते पण जरा हळू. तरीही यशस्वी सिनेमा केल्याबद्दल नागराज व टीमचे अभिनंदन.
20 May 2016 - 10:41 am | समीरसूर
सप्तरंगीचा हा प्रतिसाद मला नीटसा कळला नाही. चित्रपटात प्रबोधन असायला पाहिजे आणि ते प्रेक्षकांनी रिसीव्ह करायला पाहिजे असा काहीसा त्यांच्या प्रतिसादाचा सूर आहे असे मला वाटते. चुकीचा अर्थ काढला असल्यास क्षमस्व!
१. चित्रपट चांगला असण्यासाठी तो रंजक असलाच पाहिजे ही पहिली अट आहे असे मला वाटते. रंजकपणा हा निरनिराळ्या घटकांमधून येतो. विनोद, साहसदृष्ये, गाणी, उत्कंठावर्धक कथानक आणि त्याची तशी हाताळणी, हॉरर चित्रपट असेल तर अंगावर शहारा आणणारी भीती, रहस्य, चित्रपटाचा प्रवाहीपणा, वेग अशा अनेक बाबींवर चित्रपटाची रंजकता अवलंबून असते. आणि प्रत्येक प्रेक्षकाची रंजकतेची व्याख्या निराळी असू शकते. मला हॉरर चित्रपट आवडतात त्यामुळे 'पिझ्झा'मधले भीती वाटायला लावणारे प्रसंग मला मनोरंजक वाटतात. ज्यांना हॉरर चित्रपट आवडत नाहीत त्यांच्या दृष्टीने हॉरर चित्रपट रंजक नसतात. चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग ठरवून त्यानुसार तो रंजक बनवणे हा चित्रपट यशस्वी होण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे असे मला वाटते.
२. चित्रपट हा प्रेक्षकांचा ढोबळ दृष्टीकोन असतो असे मला वाटते कारण प्रेक्षकांनी जर तो पाहिलाच नाही तर मग चित्रपट बनवणे व्यर्थ होय. चित्रपटकर्त्याचा दृष्टीकोनदेखील चित्रपटामधून व्यक्त होत असतो आणि तो जर तितका समर्थ आणि रंजक असेल तर चित्रपटाच्या प्रेक्षकांनादेखील तो दृष्टीकोन आवडू/पटू शकतो. आणि या प्रमाणातच चित्रपट यशस्वी होतात असे मला वाटते.
३. चित्रपटाच्या यशस्वी झाला असे तेव्हाच म्हणता येईल जेव्हा तो चित्रपट जास्तीत प्रेक्षक बघतात आणि त्याचे कौतुक करतात. चित्रपटाने कमावलेला गल्ला हे चित्रपटाच्या यशाचे एकमेव निदर्शक आहे. आणि त्यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही. शेवटी प्रेक्षकच चित्रपटाचे मायबाप असतात.
४. श्याम बेनेगलांचा 'भूमिका' हा कितीही आशयसंपन्न चित्रपट असला तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांच्या रंजकतेच्या कसोटीवर तो उतरत नाही त्यामुळे व्यावसायिक पातळीवर हा चित्रपट यशस्वी झाला असे म्हणता येत नाही. दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनाशी प्रेक्षक सहमत नव्हते हाच त्याचा अर्थ. मग त्यामुळे तो ठराविक वर्तुळात चर्चिला गेला, त्याला पुरस्कार वगैरे मिळाले आणि निराळ्या पद्धतीने 'यशस्वी' म्हणून गणला जाऊ लागला.
५. भारतीय प्रेक्षक अजून चित्रपटांच्या बाबतीत तितका प्रगल्भ नाही. हॉलीवूडमध्ये चित्रपटांच्या विषयात, हाताळणीमध्ये जी प्रगल्भता दिसून येते आणि ज्या पद्धतीने ती तिथल्या प्रेक्षकांना रुचते तशी चित्रपटनिर्मिती अजूनही भारतात फारशी होतांना दिसत नाही. अर्थात याला अपवाद आहेतच. हे चित्र हळूहळू बदलेल. तोपर्यंत तरी निव्वळ गल्लाभरू मनोरंजन यावरच भारतीय चित्रपट यशस्वी होतांना दिसतील व दिसतात.
६. चित्रपटातून भारतात प्रबोधन वगैरे होत नाही आणि चित्रपट हे त्याचे माध्यम नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. चित्रपट हे पहिल्या प्रथम मनोरंजनाचे साधन आहे आणि त्यासोबत एक वेगळा अनुभव देण्याचे साधन आहे असे मला वाटते. त्यातून प्रेक्षकांनी काय घ्यायचे हे प्रेक्षकांनी ठरवायचे. शेवटी चित्रपट ही एक कला आहे. आणि कलेने चांगला अनुभव देणे महत्वाचे. त्यातून धडा, बोध वगैरे घेतला जाणे अभिप्रेत नाहीच.
७. चित्रपटांमधून एखादा सटल संदेश देता येऊ शकतो. तो थेट बटबटीत प्रबोधनापेक्षा जास्त प्रभावी ठरू शकतो. 'सैराट'ने असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. "जातींच्या बीभत्स भिंती तोडून प्रेम करणे आणि ते यशस्वी करून दाखवणे सोपे नाही; तुम्हाला जातींची कुंपणे तोडून टाकायची आहेत की सुखातला जीव दु:खात न लोटता तडजोड करून सोपे आयुष्य जगायचे आहे हे प्रत्येक प्रेम करणाऱ्या तरुण - तरुणीने आपापल्या मगदुरानुसार ठरवावे" हाच तो संदेश! 'सैराट'विषयी मला एक आवडले - सरसकट "प्रेम हे उदात्त असते; खुदा असते; बंड करा; आपले प्रेम श्रेष्ठ आहे हे सिद्ध करून दाखवा. त्यासाठी प्राणांची आहुती द्यायला लागली तरी मागे हातू नका" असा घाऊक, फिल्मी, मनोज कुमार-छाप संदेश हा चित्रपट देत नाही. मी माझ्या परीक्षणामध्ये जे म्हणालो की मंजुळे कुठलीही बाजू घेत नाहीत पण सगळ्या बाजू लखलखीतपणे दाखवतात ते याच कारणासाठी. प्रेक्षक सुबुद्ध आहे; त्याला ठरवू द्या काय घ्यायचं आणि काय टाकायचं ते.
८. सगळ्यात महत्वाचं - शेवटी तो चित्रपट आहे. घरी चार लोकांसाठी केलेलं साधं फोडणीचं वरण बिघडू शकतं. चित्रपटाचं यश-अपयश तर हजार घटकांवर अवलंबून असतं. शिवाय ती प्रोसेस खूप किचकट आणि वेळखाऊ असते, कष्टाची आणि खर्चिकदेखील असते. किरकोळ बाबींवर लक्ष केंद्रित करून दोष काढण्यापेक्षा बाकी जमून आलेल्या ९६-९७% सकारात्मक बाबींवर लक्ष दिलं तर चित्रपट अधिक खुलतो. :-) प्रेक्षकांनी जे घ्यायचं ते चित्रपटातून ऑलरेडी घेतलेलं असतं. :-) सो टेंशन नाही लेनेका...एंजोय करनेका... :-)
23 May 2016 - 4:51 pm | सप्तरंगी
चित्रपटात प्रबोधन असेलच पाहिजे असे मुळीच म्हणणे नाही पण जे सुचवले जाते आहे ते receive करता आले पाहिजे असे जरूर वाटते , अर्थात जे मला समजते आहे किंवा जे मी receive करते तेच सर्वांनी करावे हा अट्टाहास नाही पण तरीही..
" सैराट आवडला, झकास होता, याड लागले " या प्रतिक्रियेपेक्षा
" सैराट पाहून सुन्न झालो, हे बदलायला हवे "
हि माझ्या मनाच्या अधिक जवळ जाणारी प्रतिक्रिया असेल. आणि मग दिग्दर्शक न पटणार्या गोष्टींमध्ये गुंतवू लागेल तर ती चित्रपट चालवण्याची गरज किंवा त्रुटी यापैकी काहीतरी वाटेल. त्यामुळे हे मला तितके किरकोळ दोष वाटत नाहीत.
दुसरे म्हणजे, सगळेच चित्रपट मनोरंजन म्हणुन , डोके बाजूला ठेवून '' टेन्शन नही लेनेका…'' या सुरात मला तरी नाही पाहता येत.
आणि चित्रपट बिघडलेला नाहीच उलट तो तसाच बनवला म्हणून तर चालतो आहे. नाहीतर आर्ट फिल्म बनुन दुर्लक्षित राहिला असता. पण यश-अपयश पैशावर , त्या ५० कोटीवर मोजू नाही शकत तर काय आतपर्यंत पोहोचते आहे , भिडते आहे त्यावर आणि त्यानुसार भारतात थोडे तरी बदल झाले तर त्यावर मोजेन. अर्थात हे माझे मत झाले. बाकी मी वर लिहिले आहेच.
20 May 2016 - 12:37 pm | मित्रहो
कोणत्याही मराठी चित्रपटावर झाली नसेल तेवढी चर्चा सैराटवर होत आहे हेच चित्रपटाचे यश. नुकतेच नागराजने विनोदाने म्हटले मला आता सैराटमधून मुक्त करा. फक्त शेवट सोडला तर मला स्वतःला तरी सैराट भारी आवडला. (स्पॉयलर अलर्ट) मुळात तो चित्रपट ऑनर किलिंग या विषयाला धरुनच बनविण्यात आला होता. शेवट प्रभावी कसा होइल हा विचार करुन इतर कथा लिहिली असे वाटले. तरीही मस्त. माझ्यासाठी तरी नवऱ्याला गाडीवर घेउन फिरनारी आर्ची तिथेच चित्रपट संपला. दुसऱ्यांदा बघितला तर तिथून पुढे बघनार नाही.
पाच सात वर्षापूर्वी आमच्या इथे महेशबाबू किंवा पवन कल्याणचा चित्रपट आला कि असे वाटायचे मराठी चित्रपटाला कधी होनार अशी गर्दी. आपण कितीदिवस मल्टीप्लेक्सवाल्यांनी एक स्क्रिन द्यावी असे भांडत राहनार. किती दिवस त्यांना शिव्या घालत राहनार. आज महेशबाबूचा ब्रम्होत्सवम येतोय मनात विचार आला काय तुम्ही तेच तेच बघताय मराठी सिनेमा बघा किती पुढे गेलाय.
९० च्या दशकाच्या दुसऱ्या भागात मराठी चित्रपटांची अत्यंत दयनीय अवस्था होती. स्मिता तळवलकरांनीच काय तो सिनेमा जिवंत ठेवला होता. एक वर्षी तर फक्त चार मराठी चित्रपट बनले होते. ही परिस्थिती श्वास मुळे बदलली. त्याचे व्यावसायिक यश जरी मर्यादीत असले तरी ऑस्कर नॉमिनेशनमुळे त्याचा प्रभाव खूप होता. बऱ्याच वर्षांनी लोक मराठी चित्रपटाविषयी बोलायला लागले. त्यानंतर मर्यादीत का असेना मराठी चित्रपटांना सातत्याने यश मिळत होत. मला स्वतःला वळू भयंकर आवडला. मी आणि माझ्या मुलाने जवळ जवळ वीस ते पंचवीस वेळा वळू बघितला असेल. आता सिडीही खराब झाली. बाकी वास्तववादी चित्रपट असावे की नसावे, वास्तववादी म्हणजे काय हा मुद्दा वेगळा. चित्रपटातली गोष्ट लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचने हे मह्तावाचे आहे.
सैराटच्या यशामधे फार मोठा हात आहे तो अजय अतुलचे संगीत आणि झी टॉकीजचा. ते नसत तर सैराट सुद्धा वा उत्तम परंतु फेस्टीवला पिक्चर म्हणून राहीला असता. खरे म्हणजे यावर्षी तीन मोठी पावले मराठी सिनेमाने टाकली. पहीले म्हणजे दिवाळीत मराठी सिनेमा रिलीज केला. दिवाळी, इद आणि नवीन वर्ष हे तीन खानानी वाटून घेतले होते. अशा परिस्थितीत ऐन दिवाळीत मराठी सिनेमा रिलिज केला आणि तो हीट करुन दाखविला. अतुशिय टुकार चित्रपट (माझे वैयक्तीक मत) जबरदस्त मार्केटींग करुन यशस्वी करुन दाखविला. सलमानच्या प्रेमरतनपेक्षा कट्यार भारी ठरला. हुकमी एक्का होता मूळ नाटक आणि त्यातली गाणी. त्यानंतर दिलवाले आला, नेहमीप्रमाणे हवा झाली, त्याचे फॅन बघायला गेले. सुरवातीला संथ जानाऱ्या बाजीरावाने नंतर दिलवालेला पंक्चर केला. दिलवालेने धंदा झाला पण हवा तितका नाही. या दोन चित्रपटानंतर थोडा उशीरा का होइना झीने नटसम्राट रिलिज केला. परत प्रसिद्धीची जवळची सारी माध्यमे वापरुन झाने तो चित्रपट यशस्वी केला. यात हुकमी एक्का होता नाना आणि मूळ नाटक. या दोनही चित्रपटांचा गल्ला जरी ४० करोडच्या आसपास असला तरी हे चित्रपट शहरी होते. असे काहीतरी हवे होते जे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील लोकांना अपील करेल. ते सापडल सैराटमधे. चित्रपट यायच्या आधी झीकडे या चित्रपटाविषयी हुकमी अशी एकच गोष्ट होती ती म्हणजी गाणी आणि अजय अतुल. झीने त्याचा भरपूर वापर केला. कमीत कमी चित्रपट येण्याआधी तरी त्याचा ट्रेलर रिलिज करा अशी परिस्थिती होती. झीने फक्त गाणीच वाजवली बरेच दिवस. चित्रपट अफलातून बनवल्यामुळे साऱ्या महाराष्ट्रात धुमधडाका झाला. झी आणि अजय अतुलमुळे हा चित्रपट दहा ते बारा करोडवरुन पन्नास करोडच्या पुढे गेला.
20 May 2016 - 1:48 pm | समीरसूर
एक दुरुस्ती - 'श्वास'ला ऑस्कर नॉमिनेशन नव्हते. दरवर्षी भारत औपचारिकरीत्या ऑस्करला 'परदेशी भाषेतील चित्रपटा'च्या गटात पुरस्काराच्या स्पर्धेत एक चित्रपट पाठवतो. 'श्वास' भारतातर्फे औपचारिकरीत्या स्पर्धेसाठी पाठवलेला चित्रपट होता. असे भारताने आतापर्यंत ४० चित्रपट पाठवले आहेत. 'श्वास' पहिल्या फेरीतच बाद झाला होता.
भारतातून 'मदर इंडिया', 'सलाम बॉम्बे', आणि 'लगान' फक्त याच तीन चित्रपटांना अंतिम ऑस्कर नॉमिनेशन मिळाले होते. अजून भारतातील एकाही चित्रपटाला या गटात ऑस्कर मिळालेला नाही.
20 May 2016 - 2:05 pm | मराठी कथालेखक
पण श्वासच्या लोकप्रियतेत ऑस्करवारी इतकाच किंबहूना जास्त हार राष्ट्रीय पुरस्कारचा (सुवर्ण कमळ) होता
20 May 2016 - 2:36 pm | मित्रहो
भारतातर्फे पाठवण्यात आला होता आणि अंतीम चार कि पाचात नव्हता. जिथे मराठी चित्रपट तयारच होत नव्हते तिथे मराठी चित्रपट ऑस्कर पाठविण्यात आला आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही फार मोठी गोष्ट होती. भरपूर चर्चा होती. मराठीत चांगले चित्रपट बनत नाही असे म्हणता मग बघा आता वगेरे.
20 May 2016 - 6:00 pm | सिरुसेरि
सैराट आणी बाहुबली मधले काही साम्य लक्षात येते .
बाहुबली बेसावध असताना कटाप्पा त्याला कपटाने मारतो . कारण अजुन माहित नाही .
आर्ची बेसावध असताना भाऊ तीला कपटाने मारतो . कारण माहित आहे पण पटत नाही .
20 May 2016 - 6:19 pm | मराठी कथालेखक
असू दे असू दे... :)
21 May 2016 - 12:42 am | रेवती
??
बरं असू दे.
21 May 2016 - 9:54 pm | तर्राट जोकर
छान प्रतिसाद आण चर्चा...
- सैराट तर्राट झिंगाट
23 May 2016 - 2:24 pm | मराठी कथालेखक
पण ते सांगायला अजून एक धागा काढावासा नाही वाटला म्हणून या धाग्यावर लिहित आहे.
परवा पाहिला, पण टाळ्या आणि शिट्ट्यांनी प्रभावित वातावरण टाळून (म्हणजे पायरेटेड कॉपी आणून) पाहिला. आणि म्हणूनच सिनेमाकडे 'फक्त एक सिनेमा' म्हणून पाहात रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला.
मध्यंतरापर्यंत गाणी जास्त वाटलीत. आणि ती ही सगळी प्रेमगीते. म्हणजे प्रेम जुळे जुळे पर्यंत नायकाला एक , नायिकेला एक, दोघांना मिळून एक अशी ३ + प्रेम जुळल्यावर आणखी एक अशी चार गाणी म्हणजे जरा जास्तच वाटलं. नंतर विरह दाखवायचा होता ना मग एखादं गाणं तिथे ठेवलं असतं तर विरहाची वेदना अधोरेखित झाली असती...
खुसखुशीत संवाद/प्रसंग, बोल्ड नायिका , ग्रामीण ठसकेबाज संवादांतून होणारी विनोदनिर्मिती चांगली वाटली तरी त्याचं अगदी अप्रुप वाटण्यासारखं काही नाही.
मध्यंतरानंतरचे भांडणाचे प्रसंग विशेष पटले नाहीत , जमलेही नाहीत असे वाटते (गरीबीत रहावे लागल्यामुळे ती वैतागली असती किंवा तिला स्वयंपाक वगैरे येत नसल्याने फक्त तो तापला असता तर समजण्यासारखे असते. संशय वगैरे अनाठायी वाटला, त्यातही त्याने पासवर्ड विचारल्यावर तिने लगेच तो सांगितला तसेच सिनेमाला चलण्यासाठी तिने आग्रह धरला होता असे असून त्याचे संशयी होणे न पटणारे)
बाकी तिथल्या जगण्यातील त्यांचा संघर्ष मात्र चांगला वाटला आणि मुख्य म्हणजे ते पाहून म्हणजे कोवळ्या वयात घर सोडून पळून जाण्याचा विचार करणारे तरुण तरूणी पुन्हा एकदा विचार करण्यास प्रवृत्त होतील.
वेगळेपण की वेगळेपणाचा अट्टहास ?
चित्रीकरणात काही ठिकाणी वेगळेपण आहे पण त्यात 'मी कसा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने करतो, बघा' असा दिग्दर्शकाचा फालतू अट्टहास वाटला.
(Spoiler Alert)
एका दृश्यात तो तिला थप्पड मारतो.. कॅमेरा कुठे आहे ? ना तिच्या चेहर्यावरचे भाव दिसतात ना त्याच्या .. हो हे नेहमीपेक्षा नक्कीच वेगळे आहे आजपर्यंत कुणा दिग्दर्शकाने असा पांचटपणा केला नसेल.
तीच गोष्ट चित्रपटाच्या शेवटाची.
कुणी मारले दोघांना ? हिंसा दाखवायची नाही मान्य आहे , पण प्रेक्षकांना कळू देत ना की प्रिंस स्वत: मारतो की त्याच्याबरोबरचे दुसरे लोक ? मरणापुर्वीचे मरणाराच्या चेहर्यावरील भाव, मारणार्याच्या चेहर्यावरील भाव , मरणार्या आणि मारणार्यातले शेवटचे संवाद सगळं काही टाळलं.. वेगळेपण आहे हे मान्यच :)
एकूणातच प्रिंस अर्चनाच्या घरी येतो तिथून पुढचे प्रसंग फारच कृत्रिम वाटले, ना तिला भीती वाटली, ना तिला आश्चर्य वाटलं.. आनंदही धड जाणवत नाही...
इतरत्रही पटकथा फुलवायला अजून वाव होता असं वाटतं. पळून गेल्यावर नायकाला घरची/मित्रांची आठवण येत नाही का ? त्याची घालमेल दाखवता आली असती का ?
असो.
23 May 2016 - 3:34 pm | चांदणे संदीप
टेक्निकली, सोशिअली आणि लॉजिकली आणि अजून कसल्यातरी "कली" हा फ़ाऊल आहे! रसग्रहण करायला रसिकता लागते तीच मुळात मिसिंग आहे इथे!
आ. न.
Sandy
23 May 2016 - 4:26 pm | मराठी कथालेखक
टाळ्या शिट्ट्यांनी भरलेलं वातावरण टाळणं म्हणजे रसिकता नसणं ??अवघड आहे ...___/\___
23 May 2016 - 4:35 pm | चांदणे संदीप
हे मी कुठ म्हटल जर दाखवता का..... हा शुद्ध आरोप आहे!!!
Sandy
23 May 2016 - 6:18 pm | मराठी कथालेखक
याचा अर्थ काय मग ?
23 May 2016 - 6:40 pm | चांदणे संदीप
मी एक्स्प्लेन करीन त्याला काय अर्थ आहे?
असो, चित्रपट हा चित्रपटगृहात जाऊन बघायचा असतो असा साधा सरळ अर्थ होता माझ्या म्हणण्याचा! त्यात त्या तिथे शिट्ट्या, गोंगाट, ओरडणे वगैरे प्रकार असावा किंवा नसावा ह्याच्याबद्दल मी, तुम्ही किंवा आणिक कोणी इल्ले करू शकत! तुम्ही नमस्कार वगैरे करून मला कॉलरला धरल्याचा फील आला.
आजही मी दर्जेदार कलाकृती त्यांच्याप्रती सच्ची दाद ठेवण्याकरीता योग्य त्या मार्गानेच त्यांचा आस्वाद घेण्यासाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतो. एक लहान किस्सा सांगतो, एसपीच्या मराठीतल्या "निशिगंध" अल्बमसाठी पुण्यात जंग जंग पछाडले. पिंची आणि इतर बर्याच ठिकाणी "प्लॅनेट एम" वाल्यांनी तर एसपीचा मराठीत अल्बमच नाही असे छातीठोकपणे सांगितले! पुण्यात एका ठिकाणी एक दुकानदार तर एसपीचे नाव ऐकून Trance मध्ये गेला आणि वर मलाच म्हणाला की कुठे मिळाली तर मला प्लीज आणून द्याल का. पुन्हा खूप दिवसांनी एका ठिकाणी मला मिळाल्यावर (विकत) मी त्याच्याकडे गेलो तर त्याने अत्यांदाने मला मिठीच मारली! :)
तर, मुद्दा हा आहे की रसग्रहण करण्यासाठी पायरेटेड कॉपी आणून पाहणे म्हणजे..... यू आर सूज्ञ! :)
आ. न. (हे लिहिताना जाम खवचट लिहिल्याचा फील येतो राव! =)) )
Sandy
23 May 2016 - 6:47 pm | अभ्या..
मा. संदीपराव
जमल्यास त्या निशिगंध आल्बमातल्या एखाद्या गाण्याचा आस्वाद आम्हास घेता येईल का?
.
आ. न.
अ. पै.
23 May 2016 - 7:36 pm | मराठी कथालेखक
हो पण असा अर्थ पहिल्या प्रतिसादात सरळ व्यक्त झाला नाही.
बरं असा अर्थ घेवूनही मी हेच म्हणेन की चित्रपट चित्रपटगृहात पाहिला नाही म्हणजे रसिकतेने पाहिला नाही असं म्हणणं योग्य होणार नाही. थिएटरमध्ये चित्रपट बघणे हा एक खास अनुभव असतो आणि चांगल्या चित्रपटासोबत तो खासच आनंददायी असतो हे मी मान्य करतो. पण त्याशिवाय रसग्रहण होवू शकत नाही हे मात्र अमान्य.
चित्रपट मन लावून , डोळे आणी कान लावून पाहणे/ऐकणे खूप महत्वाचे. येता-जाता, काम करता करता पाहू नये. मी सैराट नीट बसून दिवे मालवून ३२" टीवी पाहिला. मी तलवार घरीच पाहिला (पायरेटेड) आणि खूप आवडला, मितवा (मराठी) , दगडी चाळ, बदलापूर हे काही अलिकडे घरीच बघितलेले (तेही संगणकाच्या १९" स्क्रीनवर) आणि आवडलेले चित्रपट. पुर्वी काही चित्रपट तर मी मोबाईलच्या ४.५" किंवा टॅबलेटच्या ७" स्क्रीनवर पाहिलेत..काही आवडलेत तर काही नाही
बाकी चॅनेलवर आलेले आणि जाहिरातींच्या असंख्य अडथळ्यांसकट बघितलेले अनेक चित्रपटही आवडलेले आहेतच (माझा सर्वात आवडीचा सुंबरान आणि अनेक). माझ्या वयाच्या अनेकांनी शोले ही असाच बघितला असेल.
पायरेटेड कॉपी जरी असली तरी मी प्रिंट चांगली (high resolution आणि बाकीही चांगल्या प्रतीची ) असेल तरच बघतो नाहीतर चांगली कॉपी येईपर्यंत वाट बघतो. मी सेन्सर कॉपी डाऊनलोड केली होती पण तीच रिसोल्यूशन खूप कमी होतं म्हणून थांबलो. मग चांगली कॉपी मिळाल्यावर रात्री दिवे मालवून पाहिला. कुणीही गप्पा मारत नव्हते. मला वाटतं चित्रपटाचं रसग्रहण करण्याकरिता इतकं पुरेसं असावं (स्पेशल इफेक्ट्स बाजूला ठेवले तर , निदान कथा, पटकथा , संवाद, अभिनय , चित्रिकरण यांचे रसग्रहण करण्यात अडथळा येत नाही).
बाकी सैराट न आवडण्याची मी जी कारण लिहिली आहेत त्यात थिएटर की टीवी यामुळे फारसा फरक पडेल असे वाटत नाही.
बाकी चित्रपट बेकार असेल तर थिएटरमध्ये तो बघणे अधिकच त्रासदायक वाटते (उदा: Finding fanny, Fan, Ra-One , अनवट ई काही अलिकडे पाहिलेले).. पटकथा , संवाद यांत दम नसल्याने मला बाहूबली थिएटरमध्ये पाहूनही फारसा नाही आवडला.
म्हणजे चोरी.. माहीत आहे मला...
पुन्हा एकदा दंडवत देण्याचा मोह आवरतो (तुम्ही बुवा उगाच मनाला लावून घेता) .. पण मला खरंच सांगा तुमच्याकडे असलेली , तुमच्या संग्रहातली सगळी गाणी खरंच ओरिजिनल सीडीवरुन घेतली आहेत का तुम्ही ? इंटरनेटवरुन डाऊनलोड केलेली गाणी नाहीतच का ? माझ्यकडे तर सगळिच अशी आहेत आणि जर मी ओरिजिनल सीडी आणून गाणी ऐकावी असं ठरवलं तर मला कित्येक गाणी बाजारात अजिबात मिळणारच नाहीत.
अवांतर :एसपी कोण हो ? खरेच माहीत नाही म्हणून विचारत आहे.
23 May 2016 - 7:46 pm | चांदणे संदीप
आता दंडवत देण्याची पाळी माझी :)
बाकी इतर सर्व मुद्द्यांवर, धाग्याचा काश्मीर होऊ नये यास्तव थांबतो. मोशीत या... दोस्ती हॉटेलात जाऊ, निवांत...गिरे भेळ खाऊ आणि चर्चा करू!
एसपी = एस. पी. बालसुब्रमण्यम!
Sandy
23 May 2016 - 7:47 pm | चांदणे संदीप
_______/\________ हा घ्या!
23 May 2016 - 7:49 pm | मराठी कथालेखक
एस. पी. बालसुब्रमण्यम माहीत आहेत की... नुसतच एसपी म्हंटल्याने काही कळालं नाही. मला वाटलं एखादी संगीतकार जोडगळी असेल (जसं एलपी) असो.
24 May 2016 - 12:06 pm | मराठी कथालेखक
बाकी तुम्ही फक्त अवांतरवर प्रतिसाद दिलात हो :)
23 May 2016 - 4:42 pm | _मनश्री_
तुम्ही एकदा थिएटरला जाउन पहा थिएटरमधे असलेला सिनेमा आणि सेन्सॉर कॉपी मध्ये बराच फरक आहे ,सेन्सॉर कॉपी मधे काही सीन्स कमी आहेत , त्यामुळे सेन्सॉर कॉपी पहाताना पिक्चर तितका प्रभावी वाटत नाही
23 May 2016 - 4:46 pm | _मनश्री_
मराठी कथा लेखकांसाठी असलेला प्रतिसाद चुकून ह्या प्रतिसादाखाली टाइप झाला
23 May 2016 - 4:48 pm | चांदणे संदीप
इथ कोण वर्गाबाहेर काढत नाहीत लगेच! ;)
23 May 2016 - 6:22 pm | मराठी कथालेखक
मी सेन्सर कॉपी वाला नाही पाहिला. (सेन्सर कॉपी वर तसा वॉटर मार्क आहे, मी पाहिलेल्य आवृत्तिवर असा मार्क नव्हता).
बाकि चित्रपट कुठेही पाहिला तरी विशेष फरक पडत नाही , फक्त स्पेशल इफेक्ट्स , दॉल्बी साउंड ई प्रभावी पणे पोहोचत नाहि. मात्र पटकथा, संवाद, अभिनय ई च्या रसग्रहणात काही फरक पडत नाही.
23 May 2016 - 4:06 pm | _मनश्री_
आत्तापर्यंत चार वेळा पाहिला थिएटरला जाऊन प्रत्येक वेळा आणखी जास्त आवडला
खरच याड लागलंय सैराटच
23 May 2016 - 4:34 pm | रमेश भिडे
महाराष्ट्र दुष्काळग्रस्त असताना एक घागर पाणी सामान्य जनतेला द्यायचं सोडून चार चार (अंकी ४) वेळा चित्रपट बघणारे लोक याच महाराष्ट्रात आहेत हे बघून....
23 May 2016 - 4:52 pm | _मनश्री_
सिनेमा आणि दुष्काळाच काय कनेक्शन आहे ?
23 May 2016 - 4:59 pm | सप्तरंगी
ऐन दुष्काळात हा सिनेमा , सैराट- झिंगाट , येड लागले करत , लोकांच्या खिशातून ५०एक कोटी काढण्यात यशस्वी झाला. हे connection आहे.
23 May 2016 - 7:49 pm | दुर्गविहारी
गाण्यामधले विषेशता 'याड लागल' व 'सैराट झाल' यातील वाद्यमेळ खटकतो, स्पष्टपणे पाशात्य आ॓र्केस्ट्रॉ जाणवतो. मात्र एक चान्गले झाले, मराठी गाणी डाउन मार्केट आहेत, ती चालावीत म्ह्णुन त्यात हिन्दि शब्द घुसडले पाहिजेत हा भ्रम दुर होइल.
23 May 2016 - 8:05 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
मला सैराट चांगला वाटला नाही,उगाचच ओवरहाईप निर्माण केली असे वाटले.
गाणी बरी आहेत,अभिनय,दिग्दर्शन बर्यापैकि आहे.
कुठे कट्यार,बालगंधर्वसारखे सिनेमे आणि कुठे हा सैराट
24 May 2016 - 12:03 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
कट्यार आणि बालगंधर्व संगितप्रधान चित्रपट आहेत,सैराट हा सामजिक चित्रपट आहे.ज्याला सामाजिक चित्रपट आवडत नाही त्याला सैराट पचायचा नाही.
सैराटमय टफी
24 May 2016 - 4:06 am | खटपट्या
हम्म...
24 May 2016 - 12:02 pm | मराठी कथालेखक
माझ्यामते सैराट हि निव्वळ मनोरंजक प्रेमकथा आहे.
घरातून मुलीच्या प्रेमाला विरोध होतो म्हणून तो कौटुंबिक म्हणता येईल.
बाकी कुणी सैराट आवडला नाही असं म्हंटल म्हणजे 'तुम्हाला सामाजिक चित्रपट आवडत नाहीत' 'सैराट पचला नाही' वगैरे म्हणणे कितपत योग्य आहे ? एखादा चित्रपट आवडलाच पाहिजे असा आग्रह का ?
मला 'डॉ प्रकाश बाबा आमटे' हा चित्रपट चांगला वाटला होता, पण सैराट आवडला नाही तरीही तुम्ही हेच म्हणाल का ?
24 May 2016 - 12:16 pm | रमेश भिडे
शेवट बघण्यासाठी लोक गर्दी करतील असं अजिबात वाटत नाही त्यामुळे हा शेवटची दोन मिनिटं सोडून अजिबात समॅजिक चित्रपट वाटत नाही.
आपापल्या शालांत परीक्षा ते पदवी कालावधी पर्यंत केलेल्या (काही लोक त्या आधी पासून सुरुवात करतात) किंवा न केलेल्यासुद्धा अनेक प्रकरणांचं एक छान प्रतिबिंब या चित्रपटात दिसतं. तसेच मित्र, तशाच कमेंट्स, तसंच पुढचा मागचा विचार न करता 'थेट भेट' घेणं, कधी कधी तसंच मार खाणं वगैरे देखील.
ते आयुष्य पुन्हा जागवायला लोक पुन्हा पुन्हा (चार वेळा किंवा जास्त ;) )जातात.
24 May 2016 - 12:17 pm | रमेश भिडे
That's सामाजिक U see!
24 May 2016 - 12:54 pm | मराठी कथालेखक
मुळात 'आंतरजातीय विवाहाला विरोध असणे' आणि 'जातीभेद (उच्च-नीच भेद) मानण' या गोष्टी काही अंशी वेगळ्या आहेत. पण यांची अनेकदा गल्लत /सरमिसळ होते.
आंतरजातीय विवाह करणारी (स्वतःचा वा अपत्याचा) जातीभेद मानतच नाही किंवा आपल्या अपत्याच्या आंतरजातीय विवाहाला विरोध करणारी व्यक्ती जातीभेद मानणारीच आहे असे सरसकट समज करुन घेता येणार नाही.
24 May 2016 - 5:00 pm | lakhu risbud
जंत बरे झाले का ?