अगदी नेहमीसारखाच दिवस होता. नेहमीसारखाच प्रवास; नेहमीच्याच दोन ठिकाणांमधला. घर ते कामाचं ठिकाण. तोच ट्रॅफिक, तेच सगळं. पण कधीकधी अशी एखादी छोटीशी गोष्ट, तीही नेहमीचीच, अगदी नव्याने समोर येते आणि बाकी सगळ्या नेहमीच्या गोष्टींवर हळुवार फुंकर मारून जाते. आणि दीर्घकाळ मग तो गारवा पुरतो.
तर, गाडीतल्या स्टिरिओवर हरिहरनची एक ग़ज़ल लागली. तसा ग़ज़ल हा मुळातच हळुवार विषय आणि त्यात ग़ुलाम अली, मेहदी हसन, किंवा तसे नव्या पिढीचे हरिहरन असतील तर मग आवाजाबररोबर शब्दांचा अर्थही अॅम्प्लिफाय होऊन तुमच्यापर्यंत येतो.
काश ऐसा कोई मंज़र होता, मेरे कांधे पे तेरा सर होता
इस बलंदी पे बहोत तनहा हूं, काश मैं सबके बराबर होता
जमाकर ताजोमें आए हुए संग, सर छुपानेके लिए घर होता
उसने उलझा दिया दुनियामें मुझे, वरना इक और कलंदर होता..
वरना इक और कलंदर होता...
गाणी पुढे सरकत राहिली पण माझी कॅसेट इथेच अडकली. वरना इक और कलंदर होता. आणि आजवर भेटलेल्या 'वरना एक और...' म्हणाव्या अशा कलंदर व्यक्ती डोळ्यापुढे यायला लागल्या. शीघ्रकवी असलेला कोपर्यावरचा वाणी, कॅरममधे स्टार्ट टू फिनिश मारणारे आमच्या शेजारचे काका, एकदा एका बसमधे भेटलेले सुरेख गाणं म्हणणारे कंडक्टर, उत्तम क्रिकेट खेळणारा एक सहकर्मचारी, चित्र काढण्यात रमणारा पण आता नोकरी करणारा एक मित्र, अॅक्टिंग सोडून अर्थार्जनासाठी नोकरीला लागलेले एक स्नेही, असे किती कलंदर फुकट येऊन जात असतील या जगात हे जेंव्हा जाणवलं तेंव्हा विचित्र वाईट वाटायला लागलं. जवळात जवळच्या व्यक्तींपासून नावही माहीत नसलेल्या पण एखाद्या खुबीमुळे लक्षात राहिलेल्या अनोळखी व्यक्ती या यादीत मोडत होत्या. यादी संपतच नव्हती.
माणसं खरंच काहीतरी होण्याच्या नादात वाया जातात. परवाच नेटवर एक लेख वाचला होता ज्यात एका माणसाने त्याचा स्वानुभव लिहिला होता. त्याचा मुलगा जो अतिशय हुशार होता, नोकरी करत होता आणि कामाच्या स्ट्रेसमुळे त्याच्यावर शारिरिकच नव्हे मानसिक परिणाम झाला आणि त्या अनुषंगाने त्याने लिहिलं होतं की when you start measuring yourself in terms of money and belongings, your mental health deteriorates. शंभर टक्के खरं आहे हे. आणि याची जाणीवही अनेकांना होत नसेल. पैसा अनेक जाणिवा मारतोच म्हणा.
मी आजवर अशी अनेक माणसं बघितली आहेत, की ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्वातला स्वयंप्रकाशी भाग एका आभासी प्रतिमेने झाकून ठेवलेला असतो. त्याला हुडकून त्या विषयाला हात घातला की ती माणसं वेगळीच भासायला लागतात. 'अरे तुला काय सांगू.....', 'आता जमत नाही रे...', 'खरं तर मी....' अशी वाक्य आली की समजावं; हा 'वरना इक और...' वाला प्रकार आहे. खरं तर आपण प्रत्येक जण, अगदी काही अपवाद सोडले तर असेच असू. कारण समाज नावाच्या एका अस्तित्वात नसलेल्या कायद्याचे आपण गुलाम होतो, जन्मतःच. आणि मग त्याच्या तरतुदीच पुढे आपल्या अपेक्षा आणि ध्येय बनतात. म्हणजे, 'चित्र काढून पोट भरणारंय का?...' किंवा 'जग फिरायचंय, मग लाईटची बिलं कशी भरणार??...' अशा काय काय विचारणा आपल्या आजूबाजूचे वकील लोक करतात आणि मग आपण एका दुष्टचक्रात स्वतःला अडकवून टाकतो. एक छान संदेश वाचनात आला होता, ज्यात एक महत्वाकांक्षी मित्र आपल्या फिशिंग करत बसलेल्या मित्राला म्हणतो की तू पैसे कमवायला हवेस. त्यावर तो दुसरा मित्र विचारतो, 'कशाकरता?'. तेंव्हा पहिला मित्र म्हणतो, 'म्हणजे मग तुला जे हवं ते करता येईल'. हे ऐकून फिशिंग करणारा मित्र म्हणतो, 'मग मी आत्ता काय करतोय?'
त्या फिशिंग करणार्या मित्रासारखे लोक बघितले की फार असूया वाटते खरंच. सहा महिने पैसे साठवून, सहा महिने भटकत बसणारे, आली लहर म्हणून असलं नसलं विकून बाईकने जगाची सफर करणारे, किंवा हाडाचे कलाकार, खेळाडू मंडळी या सगळ्यांबद्दल वाचलं की आतल्या आत जळफळाट होतो. त्यांच्याबद्दल वाईट विचार येणारा जळफळाट नव्हे; स्वतःची कीव वाटणारा जळफळाट. मग असा विचार येतो की ही लोकं नसतील तर जग कसं असेल? म्हणजे एखाद्या फॅक्टरीत जशा वस्तू असेंबल होतात तशी माणसं असेंबल होतील, जगात येतील, आणि वस्तू जशा एकेका लॉटमधे फिट होतात तशी एकेका व्यवसायधंद्यात फिट होतील. आयुष्य एखाद्या कन्व्हेअर बेल्टसारखं एका लयीत चालत राहील. सगळे समान, एकसारखे. नथिंग डायनॅमिक. जन्म - लहानपण - तरूणपण - मोठेपण - म्हातारपण - मृत्यू अशी सगळ्यांची युनिफॉर्म लाईफसायकल.
पण तसंही होत नाही ना. चढाओढीचं गणित आड येतं. आधीच दुष्टचक्र असतं त्यात चढाओढ आली की पार वावटळ होते आणि मग जो काय भरकटतो माणूस, त्याला उपमा नाही. इथे तुम्हाला एक दुसरी संधी असते खरं तर. पण इतकं पुढे आल्यावर मागे फिरायचं धैर्य फार जण दाखवू शकत नाहीत, आणि मग पुढे गेल्यावर मागे फिरायचा मार्ग बंद होणार हे कटुसत्य कवटाळलं जातं. आणि एक खून होतो. आयुष्यातल्या या क्षणी, 'वरना इक और....' वाल्या प्रत्येकाने एक खून केलेला असतो. स्वतःचाच.
आणि मग 'त्या' स्वतः ची भेट, पुस्तकं, गाणी, खेळ, पिक्चर, अशा असंख्य माध्यमातून किंवा खाणं, फिरणं, हसणं, रडणं, अशा विविध कृतींमधून किंवा मुलं, नातवंड, मित्र, नातेवाईक, अनोळखी माणसं अशा अनेक व्यक्तींमधून आपल्याला अखेरपर्यंत होत रहाते. माझ्या मते, the most unprofitable transaction in the world is when one trades who he/she is, for who he/she does the world see becoming.
आणि मग अशा कुड बी कलंदर व्यक्तिमत्वांनी फार पिंगा घातला मनात. चुकलं कोण सांगणं कठीण आहे, पण मुकले मात्र सगळेच, अशा कलंदरांना. मग कँटीनमधला बनित आठवला, जो नोकरी सोडून पिक्चरमधे काम करण्यासाठी गेला, मग भीमसेन जोशी आठवले ज्यांनी प्रचंड कष्ट करून अतिशय कठीण परिस्थितीतून जाऊन गाणं शिकलं, मग पेले आठवला जो मोज्यात कपटे भरून त्याने फुटबॉल खेळायचा, सावरकर, टिळकांसारखे क्रांतिकारक आठवले, रामानुजन, कलामांसारखे वैज्ञानिक, गणिती आठवले, विझनेसमनही आठवले, राजकारणीही आठवले. जे व्हायचे ते कलंदर होतातच असं जाणवल्यावर जरा बरं वाटलं. पण नाही; जे नाही होऊ शकत त्यांचं काय? सामान्यत्वाच्या लाटेत ज्यांचं असामान्यत्व त्यांच्या हातातून निसटून जातं, त्यांचं काय? म्हणजे जग अशा कलंदरांसाठी बनलेलं नाही म्हणावं की ते कलंदर या जगासाठी बनलेले नाहीत असं म्हणावं? विधात्याचा पत्ता चुकतो की माणसं पत्ता विसरतात? उत्तर काही मिळालं नाही, प्रश्न अनेक पडत राहिले.
अशा प्रत्येक हरवलेल्या कलंदराला त्याचं कलंदरत्व कधीतरी योग्य वाटेवर आणूदे अशी प्रार्थना मात्र मनापासून केली मी.
गाणं पुन्हा लावलं. मनात घुमत होतंच...वरना इक और कलंदर होता...
प्रतिक्रिया
18 May 2016 - 5:53 pm | मुक्त विहारि
मस्त...
18 May 2016 - 5:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडलं. चांगलंच लिहिता.
-दिलीप बिरुटे
18 May 2016 - 6:00 pm | एस
lekh aavaDalaa.
gamabhama gaMDalaa! :-(
18 May 2016 - 6:13 pm | स्वामिनी
विधात्याचा पत्ता चुकतो की माणसं पत्ता विसरतात? खरच एक कोड आहे. मस्त लिहिल आहे.
23 May 2016 - 12:13 pm | कपिलमुनी
विधात्याचा code डिबग करणार अवघड आहे ;)
18 May 2016 - 6:57 pm | बाबा योगिराज
लेख आवडला, वाखूसा.
मस्त लिहिलय.
18 May 2016 - 7:18 pm | चांदणे संदीप
लेख आवडला!
Sandy
18 May 2016 - 7:39 pm | अंतरा आनंद
आवडलं.
18 May 2016 - 9:14 pm | रातराणी
सुरेख! _/\_
18 May 2016 - 9:18 pm | कानडाऊ योगेशु
छान लिहिले आहे. शालेय्/कॉलेज जीवनात अभ्यास वगैरे सांभाळून्/वगळुन इतर छंदाकंडे/खेळाकडे झोकुन देणारे कलंदर पाहीले आहे. पण आता जगण्याच्या रहाटगाड्यात गुंतलेल्या त्यांना जेव्हा पाहतो तेव्हा हेच का ते? असा प्रश्न पडतो.
एकजण कॉलेजची द्वितीय वर्षाची परिक्षा बुडवुन नागालँड का कुठे स्केटींगच्या नेशनल लेवलच्या स्पर्धेसाठी गेला होता व प्राईज मिळवुन आला होता. आता आय.टी हमाल आहे. घर गाडी बंगला सबकुछ है पण पुन्हा स्केटींगचे बुट चढवले असतील का पायात हा प्रश्न पडतो?
19 May 2016 - 12:11 pm | वेल्लाभट
असे किती वल्ली लोक होते कॉलेजमधे, शाळेतही की खात्री वाटायची अमका अमकाच होणार हा. पण आता फेसबुकवर काहीतरी कोटाबिटातला फोटो घालून 'न्यू जॉब, न्यू चॅलेंजेस' असं काहीतरी स्टेटस लिहिणारा तो बघितला की याने अशी **गिरी का केलीन असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. स्वतःला फसवणार्यांची कमी नाही जगात. कळून सवरून फसवतो आपण.
18 May 2016 - 9:38 pm | सतिश गावडे
लेख आवडला.
18 May 2016 - 10:17 pm | प्राची अश्विनी
मस्त लिहिलेय.
19 May 2016 - 9:23 am | समीरसूर
छान.
पण मला वाटतं दुर्दम्य महत्वाकांक्षा असेल तर स्वत:मधले असे गुण ओळखून आणि अपार कष्ट करून यश मिळवावे लागते. त्यासाठी तेवढा फोकस हवा, passion हवे, आणि प्रचंड मेहनत घेण्याची तयारी हवी. patience देखील हवा. एकाच झटक्यात यश मिळेल याची शाश्वती नाही. इतर बऱ्याच क्षणिक सुखांवर पाणी सोडण्याची तयारी हवी. ज्यांना एखाद्या क्षेत्रात असे दिव्य यश मिळते त्यांची मोठी तपश्चर्या असते; ज्यांना नाही मिळत त्यांची महत्वाकांक्षा तितकी ज्वलंत नसते आणि त्यांची तितकी मेहनत घेण्याचीदेखील तयारी नसते. यात नशीबाचा भाग खूप कमी आहे असे वाटते.
19 May 2016 - 12:08 pm | वेल्लाभट
नक्कीच कमी आहे नशिबाचा भाग. पण नाही असं नाही.
खरं कारण मात्र हेच की आगीला पुरेशी हवा मिळत नाही.
19 May 2016 - 9:26 am | नाखु
मनासारखं म्हणजे नक्की कसं जगायचंय हे नीट समजएपर्यंत बरीच इनिंग झालेली असते.
लेख मस्त आणि पुन्हा स्वतःमध्ये डोकावयाला लावणारा.
19 May 2016 - 9:49 am | अजया
लेख आवडला.
19 May 2016 - 10:06 am | मेघना मन्दार
खरच खूप छान लेख !!
लेख वाचून आताच येउन गेलेला ' तमाशा ' या चित्रपटाची आठवण झाली.. या चित्रपटामध्ये याच विषयावर भाष्य केले आहे.
19 May 2016 - 10:07 am | अत्रन्गि पाउस
आमचे गाण्याचे गुरुजी म्हणायचे गाणे (आयुष्य भर) करणे म्हणजे एक तर अमिरी हवी नाही तर फकिरी...
19 May 2016 - 12:04 pm | वेल्लाभट
१००% खरं आहे
19 May 2016 - 12:03 pm | वेल्लाभट
सगळ्यांचे मनापासून आभार प्रतिक्रियांबद्दल.
19 May 2016 - 12:28 pm | भुमी
लेख आवडला.
19 May 2016 - 12:43 pm | रंगासेठ
लेख आवडला!
19 May 2016 - 1:06 pm | पाटीलभाऊ
'सामान्यत्वाच्या लाटेत ज्यांचं असामान्यत्व त्यांच्या हातातून निसटून जातं'
१०१ टक्के सहमत...
तसे पहिले तर प्रत्येक व्यक्ती हि असामान्य असते, फक्त फरक इतकाच कि (अ)सामान्य लोक असामान्य लोकांच असामान्यत्व स्वीकार करत असतात. आणि (अ)सामान्य लोकांना स्वतःच्या असमान्यात्वाची जाणीवही नसते कारण ते दुसर्यांच्या असामान्यत्वाचा जयजयकार करण्यात गुंतलेले असतात.
19 May 2016 - 1:14 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मस्त लेख.
19 May 2016 - 3:43 pm | चलत मुसाफिर
फारच छान लिहिलंयत
19 May 2016 - 3:49 pm | अनिरुद्ध प्रभू
लेख प्रचंड आवडला वेल्ला शेठ
19 May 2016 - 4:05 pm | सस्नेह
विचार आवडले.
कलंदरपणा सिद्ध करण्यासाठी फार काही भव्य विरत असंच करायला हवं का ? किंवा सुरक्षित जीवन सोडून भटकायला हवं का ? अर्थार्जनाचा आणि अपरिहार्य गोष्टींचा वेळ सोडून इतर वेळात आपण कलंदरपणा करू शकतो ना ?
मी तरी करते. वेळ मिळाला की आवडीच्या ठिकाणी भटकते, काहीतरी रिकाम्या खटपटी करते.
19 May 2016 - 4:27 pm | अभ्या..
कलंदरपणा सिध्द करायची गोष्ट नसते. एकतर तो असतो किंवा नसतो.
ओढून ताणून ठरवून कलंदरपणा नाही करता येत. किंबहुना त्याला कलंदरपणा नाही म्हणत.
19 May 2016 - 4:48 pm | चांदणे संदीप
विषय संपला!
Sandy
19 May 2016 - 5:30 pm | सस्नेह
ठरवून त्याला वाव तर देता येतो ? का काही माथेफिरूपणानेच कलंदरपणा सिद्ध होतो ?
19 May 2016 - 4:45 pm | वेल्लाभट
अभ्याशी सहमत. असं काही सिद्ध करायचं नसतं. काहीतरी सिद्ध करायला जाताना जे मागे राहतं, त्याबद्दल म्हणालो मी. आणि असं स्वच्छंदी, कलंदर नाही झालं कुणी म्हणजे गुन्हाही नव्हे; पण शिक्षा मात्र आहे नीट बघितलं तर.
नेमकं हेच म्हणालो मी. ९९% लोकं आपली आयुष्य 'प्रोव्हायडेड इफ....' या क्लॉजखाली जगतो आपण.
19 May 2016 - 4:51 pm | सस्नेह
'प्रोव्हायडेड इफ....' पाळलं तर कलंदर पणाला तडा जातो का ?
कलंदर पणाची नेमकी व्याख्या आपण काय करता हे जाणून घ्यायला आवडेल.
19 May 2016 - 5:00 pm | वेल्लाभट
साध्या शब्दात - कशाचीही पर्वा न करता मनाला आवडेल तस वागणं, तसं जगणं.
19 May 2016 - 5:30 pm | सस्नेह
पटली !
पण मग त्यासाठी इतर 'सगळं' सोडून दिलं पाहिजे हा आग्रह का ?
19 May 2016 - 5:50 pm | वेल्लाभट
काहीही आग्रह वगैरे नाहीये हो! तुम्हाला नसेल सोडायचं नका सोडू सगळं. बिग डील.
सिद्ध काय, व्याख्या काय....मी माझा विचार मांडला. धागा जनातलं मनातलं मधे आहे. काथ्याकुटात नव्हे.
19 May 2016 - 10:22 pm | सस्नेह
इतकंच म्हणायचं आहे की तुमच्यातला कलंदरही व्यक्त होऊ शकतो.
नाही आवडलं तर द्या सोडून :)
25 May 2016 - 8:14 am | चलत मुसाफिर
कुणाची पत्रास न बाळगता मनाला आवडले तसे कलंदर प्रतिसाद टाकले तर ते मात्र उडवले जातील याची कृ. नों. घ्या.
23 May 2016 - 10:32 am | वपाडाव
नेमका हाच मुद्दा आहे ना...!
१. पैसा + फ्यामिली + करियर + घर + छंद = ब्यालंस्ड लाइफ [समाज]
२. छंद = लाइफ [कलंदर]...
नवाजुद्दिन सिद्दिकी, जादव पायेन्ग(जंगल मॅन), ए.आर, मेरी कोम etc
19 May 2016 - 4:53 pm | ब़जरबट्टू
ओढून ताणून ठरवून कलंदरपणा नाही करता येत आवडले..
19 May 2016 - 5:37 pm | राहुल मराठे
http://sandeepachetan.com/about/
19 May 2016 - 7:20 pm | चतुरंग
कलंदरपणाची बरीचशी बीजं ही लहानपणीच रुजतात आणि योग्य संधी मिळताच तरारून येतात, ही तशीच उगवत राहिली तर माणूस कलंदर होतो, कोमेजली तर कलंदर बनत नाही पण बर्याचदा काही छंद, हौस असे करुन तहान भागवून घेतो...
परवाच उस्ताद झाकीर हुसेनची एक मुलाखत बघत होतो. त्यातला एक किस्सा. अल्लारखांना तबलावादनाची बरीच आमंत्रणे येत. बरीचशी इंग्लिशमध्ये असत. झाकीर एकटाच काँन्वेंट्मध्ये शिकणारा त्यामुळे ती वाचून उत्तरे देणे हे त्याचे काम असे. असेच एक आमंत्रण आले तेव्हा अल्लारखां दौर्यावर होते म्हणून झाकीरने परस्पर लिहिले की ते नाहीत परंतु त्यांचा मुलगा झाकीर साथीला उपलब्ध आहे, कळवा! आयोजकांचं पत्र आलं की चालेल म्हणून. हा कार्यक्रम होता पटण्याला, झाकीर रहायचा मुंबईत त्यावेळी त्याचं वय १२ वर्षे. पठ्ठ्यानं ठरवलं जायचं! इकडून तिकडून पैसे जमवून थर्डक्सासचं तिकिट काढलं. सकाळी शाळेला म्हणून बाहेर पडला तो शाळेनंतर परस्पर वीटी स्टेशनवर तबल्यासकट!
गाडीत बसला, सीटवर अर्थातच जागा नसल्याने खालीच. अब्बूंनी सांगितलेलं की तबला देव आहे त्यामुळे त्याला जमिनीवर ठेवायचं नाही, पाय लावायचा नाही त्यामुळे हा गडी तबला मांडीवर घेऊन बसला! मुंबई ते पटणा प्रवास ४८ तासांचा तेवढावेळ हा खाली बसून होता. मधूनच लहर लागली की मांडीवरच तबला वाजवायचा. बाथरुमला जायचं तर समोरच्याला सांगून तेवढ्यापुरता तबला सीटवरती ठेवायचा..
पटणा आलं गाडी रिकामी झाली. याला कुठं जायचं माहीत नाही. काही लोक शोधक नजरेनं इकडे तिकडे बघत होते. तबल्याची बॅग बघून एकानं विचारलं की झाकीर हुसेन कुठेत? हा म्हणाला मीच झाकीर!!
आयोजकांची पळापळ. पहिल्यांदा याला घरी नेऊन नाष्टा दिला, त्याच्या घरी तार करुन सांगितलं की मुलगा असाअसा पटण्याला आलाय आणि सुखरुप आहे, काळजी करु नका. कारण आईनं हाय खाल्ली की एकुलता एक मुलगा कुठे गायबला?
याने नंतर रीतसर कार्यक्रमात तबलासाथ केली आयोजकांनी व्यवस्थित बुकिंगवगैरे करुन परतीला बसवून दिले.
मुंबईत आल्यावर घरी येताच या पठ्ठ्याने अम्मीला दोनशे रुपये बिदागी काढून दिली. आयोजकांनी प्रवासखर्चा व्यतिरिक्त याला ते जास्तीचे दिले होते!! नंतर आईनं त्याला स्वतःहूनच साथीला पाठवायला सुरुवात केली परंतु जवळपासच जा आणी वेळेवर घ्री परत ये या अटीवरच.....
हा कलंदर पणा..... :)
(तबला न वाज)रंगा
19 May 2016 - 9:59 pm | चाणक्य
वेल्ला, लेखपण छान झालाय. पण चुकीच्या तारा छेडल्या तुम्ही. आता थोडे दिवस परत तीच अस्वस्थता.
19 May 2016 - 10:25 pm | सस्नेह
छान किस्सा !
20 May 2016 - 10:19 am | चांदणे संदीप
+१ दिलसे!
Sandy
20 May 2016 - 10:52 am | नाखु
आणि कलंदरपणा शब्दात नाही पकडता येत.
नेहमीची व्यवधाने संभाळूनही आपाली कला/आवड्/छंद जोपासणारे आहेतच की कधी कधी हेच निव्रुत्तींनतर मनाने निरोगी/समाधानी जगण्याचे कारण बनतात हे ही खरे आहे.
19 May 2016 - 7:29 pm | पैसा
सुरेख लिहिलंय!
23 May 2016 - 11:46 am | पथिक
जरा अवांतर होईल पण तरीही विषयाला थोडे धरूनही आहे म्हणून शरत्चन्द्रांच्या 'श्रीकांत' मधील एक उतारा देतोय. इंग्रजांनी निर्माण केलेलं रेल्वेचं जाळं, व्यापारी संस्कृती यामुळे गावोगावचे जुन्या संस्कृतीत पोसले जाणारे कलंदर कसे संपले ते यातून कळते :
वृद्ध मेरे जवाब से और भी असहिष्णु हो उठे। बोले, ''ये सब विलायती बोलियाँ हैं, नयी रोशनी के अधार्मिक छोकरों के हीले-हवाले हैं। कारण, जब
आप और भी जरा ज्यादा विचारना सीख जाँयगे, तब आप ही को सन्देह होगा कि वास्तव में यह बरबादी है, यह देश का अनाज विदेश भेजकर बैंकों में रुपये
जमा करना सबसे बड़ी बरबादी है। देखिए साहब, हमेशा से ही हमारे यहाँ गाँव-गाँव में कुछ लोग उद्यम-हीन, उपार्जन-उदासीन प्रकृति के होते आए
हैं। उनका काम ही था- मोदी या मिठाई की दुकान पर बैठकर शतरंज खेलना, मुरदे जलाने जाना, बड़े आदमियों की बैठक में जाकर गाना-बजाना, पंचायती
पूजा आदि में चौधराई करना आदि। ऐसे ही कार्य-अकार्यों में उनके दिन कट जाया करते थे। उन सबके घर खाने-पीने का पूरा इन्तजाम रहता हो, सो बात
नहीं; फिर भी बहुतों के बचे हुए हिस्से में से किसी तरह सुख-दु:ख में उनकी गुजर हो जाया करती थी। आप लोगों का, अर्थात् अंगरेजी शिक्षितों का,
सारा-का-सारा क्रोध उन्हीं पर तो है? खैर जाने दीजिए, चिन्ता की कोई बात नहीं। जो आलसी, ठलुए और पराश्रित लोग थे, उन सबों का लोप हो चुका। कारण,
'बचा हुआ' नाम की चीज अब कहीं बच ही नहीं रही, लिहाजा, या तो वे अन्नाभाव से मर गये हैं, या फिर कहीं जाकर किसी छोटी-मोटी वृत्ति में भरती होकर
जीवन्मृत की भाँति पड़े हुए हैं। अच्छा ही हुआ। मेहनत-मजदूरी का गौरव बढ़ा, 'जीवन-संग्राम' की सत्यता प्रमाणित हो गयी- परन्तु इस बात को तो वे ही
जानते हैं जिनकी मेरी-सी काफी उमर हो चुकी है, कि उनकी कितनी बड़ी चीज उठ गयी! उनका क्या चला गया! इस 'जीवन-संग्राम' ने उनका लोप कर दिया है- पर गाँवों का आनन्द भी मानो उन्हीं के साथ सहमरण को प्राप्त हो गया है।''
23 May 2016 - 11:58 am | वेल्लाभट
क्या बात है !
कसली मोठी गोष्ट सांगितलीय यात!!!
पुस्तक बघायला हवे हे.
पथिकभाऊ अनेक आभार हे इथे दिल्याबद्दल.... खरंच
23 May 2016 - 12:03 pm | पथिक
माय प्लेझर. विषय माझ्या जिव्हाळ्याचा आहे :)
नक्की वाचा. पुस्तक अप्रतिम आहे.
23 May 2016 - 12:35 pm | पथिक
प्रतिसाद एडीट करून gaps काढाव्यात अशी विनंती करतो.
24 May 2016 - 3:16 pm | सूड
आवडलं!!
24 May 2016 - 4:14 pm | मितान
लेख आवडला :)
24 May 2016 - 8:44 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मस्त लेख आणी प्रतिक्रिया ही
29 May 2016 - 11:42 am | अभिजीत अवलिया
वा वेल्लाभट वा. अतिशय सुंदर लिहिले आहे.