✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बोटीवरील जीवन

स
स्वीट टॉकर यांनी
गुरुवार, 03/10/2016 - 06:54  ·  लेख
लेख
जर तुम्हाला कोणी म्हणालं की उद्यापासून तुमच्या आयुष्यात पाण्याचा तुटवडा असणार नाही, लाइट जाणार नाही, हवा आणि पाणी यांचं प्रदूषण असणार नाही, ट्रॅफिकची कोंडी असणार नाही, भ्रष्टाचार असणार नाही, मराठी - अमराठी किंवा जात - धर्माचा भेदभाव असणार नाही, त्याचं राजकारण असणार नाही, कोणीही रांग मोडणार नाही, थुंकणार नाही, दारू पिऊन कामावर येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार नाही, जोरात संगीत लावून दुसर्‍याची झोपमोड करणार नाही, कचरा खिडकीतून बाहेर अथवा रस्त्यावर फेकणार नाही, “हे माझं काम नाही” असं कोणी म्हणणार नाही, तुमचं घर चुकून उघडं राहिलं तरी कोठल्याही वस्तूची चोरी होणार नाही, प्रत्येक जण दिलेली वेळ पाळेलंच, आणि काही कारणामुळे पाळणं शक्य नसेल तर आधी तुम्हाला फोन करून जरूर कळवेलंच, आणि जर एखादा मनुष्य वरीलप्रमाणे वागू शकत नसेल, आणि त्याला दोन संधी देऊनही सुधारत नसेल तर त्याला खड्याप्रमाणे उचलून अलगद या समाजातून काढून टाकलं जाईल, एकंदर काय, तर उद्यापासून रामराज्य असणार आहे, तर कोणीही असाच समज करून घेईल की बोलणार्‍याच्या डोक्यावर परिणाम तरी झाला आहे किंवा निवडणुका जवळ आल्या आहेत. (उफ्फ! आयुष्यात पहिल्यांदाच इतकं लांबलचक वाक्य लिहिलं.) मात्र मला जर कोणी असं म्हणालं तर माझ्या दृष्टीनी त्याचा अर्थ असा की माझी सुट्टी संपवून मी उद्या बोटीवर परत रुजू होणार आहे. बोटीवरची जीवनपद्धती इतकी स्वच्छ आणि सरळसोट असते! मात्र या बोटीवरच्या जीवनाबद्दल इतके गैरसमज आहेत की सॅम्युअल जॉन्सन सारख्या लेखकानी लिहिलं आहे, “बोटीवर राहाणं म्हणजे तुरुंगात राहाण्यासारखंच. वर बुडायची भीती. मात्र बोटीपेक्षा तुरुंगात जागा जास्त, जेवण जास्त चवदार आणि मित्रमंडळी जास्त सभ्य!” बिचारा सॅम्युअल जॉन्सन! बोटीवरची जीवनपद्धती इतकी नाकासमोर आणि सरळसोट असते याची कारणं काय? एक म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक वातावरणात राहायचं तर बेशिस्त राहून चालणारच नाही. जे दूरच्या ट्रेक वा गिर्यारोहणाला गेले आहेत त्यांना याचा चांगला अनुभव असतो. एकदा मनुष्यवस्ती सोडली की काहीही मदत मिळण्याची शक्यता संपते. म्हणजे आपल्याला काय काय लागण्याची शक्यता आहे याची जमवाजमव आधीच व्यवस्थित करायला तर लागतेच, शिवाय असलेली सामुग्री, शिधा, पाणी वगैरे मोहीम संपेपर्यंत पुरवण्याच्या दृष्टीनी रोजच्या वापरावर नियंत्रण ठेवावंच लागतं. ‘ठेवावंच लागतं’ हे म्हणणं सोपं आहे. पण ह्या म्हणण्याला अर्थ केव्हां प्राप्त होतो? जेव्हां आपण ‘न ठेवणार्‍या’वर कारवाई करू शकतो तेव्हांच. आज जर आपल्या शेजार्‍यानी कचरा डब्यात टाकण्या ऐवजी खिडकीतून बाहेर टाकला तर आपण त्याला सांगू शकतो, पटवू शकतो, त्यावर सामाजिक दबाव टाकू शकतो. तितकी रग असली तर त्याच्या कानाखाली आवाजही काढू शकतो. पण निर्लज्जम् सदा सुखी! तरीही तो बधला नाही तर आपण काही करू शकंत नाही. त्याला त्या घरातून आपण हाकलू शकंत नाही. बोटीवर आपण त्याला त्या घरातून हाकलू शकतो. आमच्या बोटीवरच्या बोलीभाषेत त्याला “Next port to be airport.” असं म्हटलं जातं. (पुढच्या बंदराला बोट पोहोचली की विमानाचं तिकिट देऊन त्याची रवानगी केली जाते.) मग युनियन काही करंत नाही? इतकी नेभळट आहे की काय ही युनियन? तसं नाही. ही युनियन आंतरराष्ट्रीय स्थरावर आहे आणि तिचे व्यवहार आपल्या नेहमी बघण्यात येणार्‍या युनियन्सपेक्षा खूपच प्रगत आणि पारदर्शक आहेत. याला देखील कारण आहे. भारतात राहून ही युनियन परदेशात असलेल्या बोटींवर कसा वचक ठेवणार? ते केलं जातं जागतिक युनियन्सशी संलग्न राहून. त्यांच्याशी संलग्न राहायचं तर त्यांचे नियम पाळावेच लागतात. याचा अर्थ एखाद्याने बोटीवर धोकादायक वर्तन केलं आणि कंपनीने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून त्याच्यावर कारवाई केली तर युनियन त्यालाच समज देते. त्याची बाजू घेऊन भांडत बसत नाही. जर का केस लढण्याची वेळ आली तर ती बाहेरच्या कोर्टात होते. त्यामुळे धाकधपटशा, लाचलुचपत, राजकारण वगैरे देखील वापरता येत नाही. तात्पर्य, नाकासमोर कार्यपद्धती. भरपूर काम करा, शुद्ध मोकळ्या हवेत रहा, दुसर्‍याच्या खर्चानी जग बघा, बायकामुलांनाही जग दाखवा, सलग पाच पाच महिने सुट्टी एन्जॉय करा, वर चांगल्यापैकी पैसेही कमवा! त्यावर आयकर भरू नका ! (परदेशी चलन कमावणारे हे सरकारचे जावई असल्यामुळे त्यांना आयकरही माफ आहे!) बोटीवरची करियर जर इतकी स्वप्नवत् आहे तर प्रत्येक मुलगाच ही घेत का नाही? गेली चाळीस वर्षं हाच प्रश्न माझ्या डोक्यात घोंघावतोय. (जस्ट जोकिंग.) फार वर्षांपूर्वी ‘मार्मिक’ मध्ये ‘मराठी तरुणांसाठी करियर’ या सदरात एक लेख होता. त्यात एक ओळ होती - “मराठी पालकांच्या दृष्टीने प्रत्येक सैनिक हा रणांगणावर मरतोच, प्रत्येक बोट ही बुडतेच आणि प्रत्येक विमान हे कोसळतंच.” दुसरं कारण म्हणजे तिकडचं काम. जेव्हां एखादा मुलगा बी.ई. (मेकॅनिकल) होतो तेव्हां त्याची अपेक्षा असते की आपण ज्या फॅक्टरीत काम करू तिथे आपलं वेगळं ऑफिस नसलं तर निदान टेबल असावं, आपल्या हाताखाली खूपसे कामगार आणि दोन चार फोरमन असावेत. दिवसभर काम केल्यानंतर आपल्या कपड्यांची इस्त्री टिकली नाही तरी चालेल, पण ते निदान स्वच्छ तरी रहावेत. (आणि ती बहुतांशी पूर्ण देखील होते). बोटीवरचा माहोल वेगळा असतो. इंजिन रूममध्ये साधारणपणे नऊ जण असतात. पाच इंजिनियर्स आणि चार खलाशी. खलाशांचं काम इंजिनियरांना मदत, साफसफाई आणि रंगरंगोटी वगैरे. प्रत्यक्ष काम इंजिनियरनीच करायचं. मुख्य काम काय? तर मशिनरी चालवणं आणि त्याचा मेंटेनन्स करणं. बोटीवर एकंदर मशिनरी भरपूर आणि मोठी थोरली असते. आपल्या इथल्या गाडीच्या मेकॅनिकला हेल्मेट, हातमोजे आणि स्टीलच्या चवड्यांचे सेफ्टी शूज् घातले तर तो जसा दिसेल तसा एखादा टिपिकल मरीन इंजिनिअर दिसतो. बोटीवरची नव्वद टक्के मशिनरी इंजिनरूममध्ये ठासून भरलेली असते. त्यामुळे तिथे तापमान गरमागरम आणि आर्द्रता भरपूर. त्यामुळे बदाबदा घाम येत असतो. विषुववृत्तीय प्रदेशात अर्ध्या दिवसात ओव्हरऑल (याला ‘बॉयलरसूट’ असंही म्हणतात) ओलाचिंब झाल्यामुळे बदलायला लागतो. इंजिनरूम वातानुकूलित कधीही नसते. ती अशक्यप्राय गोष्ट आहे. बंदिस्त जागेत इतकी मशिनरी चालल्यामुळे प्रचंड आवाज होत असतो त्यामुळे कानावर ear muffs लावावे लागतात. साधं संभाषण म्हणजे उंच स्वरातच. वातावरण वादळी असलं तर बोट हलते. त्याचा देखील सुरवातीला त्रास होतो. इंजिनरुमची उंची साधारणपणे सहा मजल्यांएवढी असते त्यामुळे चढणं उतरणं खूपच होतं. पोट सुटलेला मरीन इंजिनिअर क्वचितच. एकंदर काय, तर शारिरिक मेहनत भरपूर. कामाच्या कपड्यांना डाग असणं आणि नखं काळी असणं नॉर्मल. सुशिक्षित मुलांना ते जमतंच असं नाही. कित्येक मुलं सोडूनही जातात. मी ज्युनिअर इंजिनिअर म्हणून दीड वर्ष काम करून सुट्टीवर आलो तेव्हां माझ्या वडिलांनी मला ओळखलंच नाही ! इतका बारीक झालो होतो. पण अशक्त बारीक नव्हे. मला कोणीतरी विचारलं, “काय रे तुला तिथे काय काम असतं?” मी विनोद करण्याच्या दृष्टीनी उत्तर दिलं पण ते सत्यापासून फारसं दूर नव्हतं. “इंजिनिअरिंग रामा गडी. दोन वेळ जेवण. राहायला जागा. पडेल ते काम!” ---------------------------------------------------------------------------------------------------------------------- त.टी. कार्यबाहुल्यामुळे खूपच महिन्यात कीबोर्ड हातात घेतला नव्हता. आता लिहायला सुरवात केल्यावर असं लक्षात आलं की बाकी सर्वांप्रमाणेच बोटीवरच्या जीवनाला देखील इतके कंगोरे आहेत की एका लेखात ते कोंबता येणार नाहीत. प्रत्येक कंगोर्‍यासाठी एक एक लेख लिहीन. मात्र ही लेखमालिका असणार नाही. प्रत्येक लेख स्वतंत्र. पुढचा लेख कळण्यासाठी आधीचा वाचायची अजिबात जरूर नाही.
  • बोट - वादळवारा
  • दैव जाणिले कुणी (आमच्या बोटीवर झालेल्या हल्ल्याची हकीकत)
  • बोट - अग्निशमन (Fire Fighting)
  • बोट - व्यसनं
  • गरीब-श्रीमंत
  • बोट – Girl In Every Port
  • बोट - आयजीच्या जिवावर बायजी उदार

Book traversal links for बोटीवरील जीवन

  • बोट - वादळवारा ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
समाज
जीवनमान
kathaa
प्रवास
देशांतर
नोकरी
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव
माहिती

प्रतिक्रिया द्या
45735 वाचन

💬 प्रतिसाद (73)

प्रतिक्रिया

:)

तुषार काळभोर
Sat, 03/12/2016 - 11:40 नवीन
:) सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ग्रेट लिहिताय. आणखी लेखनाची

रेवती
Sat, 03/12/2016 - 02:20 नवीन
ग्रेट लिहिताय. आणखी लेखनाची वाट पाहते.
  • Log in or register to post comments

धडाक्यात सुरुवात

श्रीरंग_जोशी
Sat, 03/12/2016 - 02:41 नवीन
या विषयावर फारसं पूर्वी वाचलेलं नसल्याने तुम्ही तुमचे अनुभवकथन मिपावर लिहिणे सुरु केल्यामुळे खूप आनंद झाला. मिपावर स्वागत आहे. मिपावर धडाक्यात सुरुवात झाली आहे. तुमचे पुढील लेखन वाचण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments

एका भन्नाट लेखमालेचा सुरुवात...

इडली डोसा
Sat, 03/12/2016 - 08:37 नवीन
मर्चंट नेव्ही बद्दल सहा महिने बोटीवर आणि सहा महिने सुट्टी असं ऐकुन आहे... जर खरच सहा महिने सुट्टी मिळत असेल तर बोटीवरच्या सहा महिन्यात कोणत्या दिव्यातून जावं लागतं ते वाचायला आवडेल. पुलेप्र.....(पोहता येत नसल्यामुळे) लाईफ जॅकेट घालून बसलेली इ.डो.
  • Log in or register to post comments

माझी एक मैत्रीण इंजिनीअर

यशोधरा
Sat, 03/12/2016 - 08:40 नवीन
माझी एक मैत्रीण इंजिनीअर म्हणून बोटीवर काम करते आणि उरलेल्या ६ महिन्यांत हिमालयात ट्रेकींग करत फिरते! :)
  • Log in or register to post comments

ती मीच आहे यशो

इडली डोसा
Sat, 03/12/2016 - 08:46 नवीन
फक्त भविष्यातली मी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हीहीही! तथास्तु ;)

यशोधरा
Sat, 03/12/2016 - 11:13 नवीन
हीहीही! तथास्तु ;) ही उल्लेखलेली मैत्रीण खरंच फिरते मस्त. खूप ट्रेक्सही झालेत करुन तिचे. ६ महिन्यांच्या सलग सुट्टीमुळे २ -२ ट्रेक्स होतात एका सुट्टीत तिचे. हे तर केवळ स्वप्नवत वाटते मला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा

इंजिनियर मुलगी

स्वीट टॉकर
Sat, 03/12/2016 - 11:58 नवीन
यशोधरा, अजून या करियरमध्ये मुली अगदी अभावानेच आढळतात. त्यात ती सुट्टीत हिमालयात ट्रेकिंग करते म्हणजे खरोखरच वंदनीय आहे. तिला माझा मनापासून नमस्कार सांगा! अशा मुलींचा आयुष्याकडे बघण्याचा एक हटके अँगल असतो. तिला लिहितं करता आलं तर बघा ना. तेवढा पेशन्स तिच्याकडे नसला तर मुद्दे लिहून माझ्याकडे पाठवू दे. मी लेख लिहून तिला परत पाठवीन. पटला तर तिला पब्लिश करू दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

विचारुन बघते.

यशोधरा
Sat, 03/12/2016 - 13:01 नवीन
विचारुन बघते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीट टॉकर

मस्त, मजा आली वाचून. कोणीतरी

विद्यार्थी
Sat, 03/12/2016 - 08:47 नवीन
मस्त, मजा आली वाचून. कोणीतरी हे सगळे समोरासमोर बसून सांगताय असे वाटले. लेखनाच्या शैलीला १० पैकी १० :-)
  • Log in or register to post comments

गोडबोले साहेब

सुबोध खरे
Sat, 03/12/2016 - 11:20 नवीन
गोडबोले साहेब बोटीवरच्या माणसांची प्रत्येक बंदरात एक बायको असते अशी वदंता आहे या बद्दल तुमचे काय मत आहे?
  • Log in or register to post comments

डॉक, लष्कराच्या का होईना पण

सतिश गावडे
Sat, 03/12/2016 - 11:25 नवीन
डॉक, लष्कराच्या का होईना पण तुम्हीही बोटीवर होतात असे म्हणण्याचा मोह होतोय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

गावडे साहेब

सुबोध खरे
Sat, 03/12/2016 - 12:38 नवीन
गावडे साहेब आमची कसली बोट हो? उणी पुरी १००० माणसं आणी मी एकटा डॉक्टर. प्रत्येक माणूस मला ओळखत असे. वार्षिक वैद्यकीय तपासणी किंवा सुटी वर जाण्य़ाअगोदर माझ्या कडे येत असत दोन दोन महिने समुद्रात फिरून कोणत्याच बंदरात न शिरता परत मुंबईत येत होतो. नुसत्या मार्मागोवा बंदरात ६ तास विक्रांत उभी करण्याचे भाडे ५०००० होते( १९९०) तेंव्हा सकाळी सात वाजता पोहोचलो तर विमानाचे सुटे भाग बोटीवर चढवून बारा वाजेपर्यंत बंदर सोडायचो. कसलं काय? एकदा कोची बंदरात दोन दिवस थांबलो होतो तेंव्हा बाजारात जा किंवा हॉटेलात. आमचेच नौसैनिक दिसत होते आणी प्रत्येक सैनिक गुड मोर्निंग गुड आफ्टर नून करत असे. एकटाच डॉक्टर असल्याने सगळेच मला ओळखत होते. त्यातून एखाद्या डॉक्टर मैत्रिणी बरोबर बोलताना आढळलो कि लगेच संध्याकाळी कोणतरी इंजिनियर नाही तर पायलट , "डॉक्टर, आज सकाळी तुम्हाला "गर्ल फ्रेंड" बरोबर बोलताना पाहिले" म्हणून (हेवा वाटलेल्या) स्वरात आठवण करून देत असे कि तुमच्या वर लक्ष आहे म्हणून. कसलं काय? जाऊ द्या. उगाच जखमेवरील खपली काढलीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हाहा..

सतिश गावडे
Sat, 03/12/2016 - 12:46 नवीन
आमची कसली बोट हो?
एकंदरीत तुमची बोट शब्दशः लष्कराच्या भाकर्‍या होती. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

स्तुतिप्रिय प्राणी

स्वीट टॉकर
Sat, 03/12/2016 - 12:49 नवीन
मनुष्य कसला स्तुतिप्रिय प्राणी आहे! तुम्ही सगळ्यांनी इतकं कौतुक केलं आहे की नवीन लेखन करण्याऐवजी माझा बराच वेळ पुनःपुन्हा चांगले प्रतिसाद वाचण्यात मी घालवतो! सु ख - कुठलाच विषय वर्ज्य नाही. त्यामुळे 'बंदरातल्या बायका' हा देखील हाताळला जाईलच! इ डो - बोटीवर नोकरी करण्यासाठी पोहता येणं सक्तीचं आहे पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. जीव वाचवायला लाइफ जॅकेटच खरं! त्याहीबद्दल येईलच.
  • Log in or register to post comments

मस्त।।।।

वगिश
Sun, 03/13/2016 - 17:45 नवीन
मस्त।।।।
  • Log in or register to post comments

लेखमाला जबरदस्तच होणारे.

गामा पैलवान
Sun, 03/13/2016 - 23:45 नवीन
स्वीट टॉकर, यापूर्वी तुमची मालिका वाचलीये. परत वाचायला आवडेल. :-) याअगोदर बंदरातल्या बायका हा विषय मालिकेत नव्हता मात्र! त्यामुळे अधिक उत्सुकता आहे. ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

छान सुरवात!

जुइ
Mon, 03/14/2016 - 06:40 नवीन
पुढील लेखाच्या प्रतीक्षेत!
  • Log in or register to post comments

या सीरीजनंतर बोटींचे अपघात,

गवि
Mon, 03/14/2016 - 23:22 नवीन
या सीरीजनंतर बोटींचे अपघात, बुडणं यावर काही माहिती देणारी मालिका लिहीण्याचा विचार करा. विमानाबाबत एनटीएसबी, डीजीसीए, आयकाओ अशा संस्था असतात तशा बोटींबाबत कोणत्या? अपघातांचं इनव्हेस्टिगेशन आणि रिपोर्टिंग (आणि अनुषंगिक सुरक्षिततेसाठी सूचना) हे काम कोण करतं?
  • Log in or register to post comments

___/\___

स्वराजित
Tue, 03/15/2016 - 14:52 नवीन
___/\___
  • Log in or register to post comments

बोटींचे अपघात

स्वीट टॉकर
Tue, 03/15/2016 - 16:17 नवीन
गवि - बोट ज्या देशाची असते (म्हणजे ज्या देशात ती रजिस्टर झालेली असते) त्या देशाचे व ज्या देशात अपघात झालेला आहे त्या दोन्ही देशांचे डी.जी.शिपिंग अपघाताचं विश्लेषण करतात.
  • Log in or register to post comments

मस्त...

मदनबाण
Wed, 03/16/2016 - 09:59 नवीन
मस्त...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-विकिपिडीया पे चेक कर ले, गुगल तू सर्च कर ले, बेबी जरा लुक अराउंड कर ले...नैयो मिलेगा ऐसा यार सोणिये...इक नंबर. इक नंबर. इक नंबर... :- Sanam Teri Kasam
  • Log in or register to post comments

इंटरेस्टींग.

धनंजय माने
Wed, 03/23/2016 - 00:55 नवीन
इंटरेस्टींग.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा