वामा- स्त्री.
डाव्याबाजूला (पुरूषाच्या) असते ती, खास करून कलश पूजन करताना..(वामा म्हणजे रूक्मिणी ..)
जगत-जननी, माता, भगीनी
बंध नवे तू जोडीत ये
घेत भरारी क्षितिजाशी त्या
नवे नाते जोडीत ये
अलका, अचला, कोमल गंधा
अभिसारीका झळकत ये
विश्वस्वरूपा, दुर्गा, अंबा
अग्निशलाका तळपत ये
स्नेहसुमना, अधोवदना
कमल नयना अलगद ये
मौक्तिक मुक्ता, रूप कांचना
सुवर्णलता उमलत ये
चाल हंसिनी, रूप कामिनी
विश्वमोहीनी , सजून ये
गजगामिनी, दिप्ती दामिनी
चंचल हरिणी, बनून ये
रण चंडीका, मुंड मुंडीका
दैत्य दंडीका, जिंकूनी ये
जगतकारिणी, गर्भ धारिणी,
दु:ख सोषिणी, होऊन ये
रूप गर्विता, तनू अर्पिता
झुळझुळ सरीता, फ़ुलवित ये
लीन रुजूता, मूक नम्रता
जीव अमृता, शिंपित ये
गीत माधुरी, श्याम बासरी
सूर आसावरी, छेडीत ये
शुभ्र मोगरी, कृष्ण मंजिरी
रंग शर्वरी, खुलवित ये..
- प्राजु
अलका - लक्ष्मी, अचला - अढळ असलेली. ठाम..
शर्वरी - पहाट..
प्रतिक्रिया
22 Dec 2008 - 7:38 am | मदनबाण
ज बर द स्त.....:)
(देवकी नंदन भक्त)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
22 Dec 2008 - 7:43 am | मनीषा
गीत माधुरी, श्याम बासरी
सूर आसावरी, छेडीत ये
शुभ्र मोगरी, कृष्ण मंजिरी
रंग शर्वरी, खुलवित ये.. ..................हे खूप आवडलं
22 Dec 2008 - 7:53 am | बट्टू
कविता आवदली.
22 Dec 2008 - 8:12 am | विसोबा खेचर
गीत माधुरी, श्याम बासरी
सूर आसावरी, छेडीत ये
शुभ्र मोगरी, कृष्ण मंजिरी
रंग शर्वरी, खुलवित ये..
क्या बात है!
शब्दसौंदर्याने नटलेली एक सुरेख कविता..!
तात्या.
22 Dec 2008 - 9:05 am | यशोधरा
छान, आवडली कविता.
22 Dec 2008 - 9:24 am | रामदास
लक्ष्मी पूजनात हीच आरती म्हणावी काय ?
22 Dec 2008 - 12:24 pm | दत्ता काळे
प्रत्येक कडवं खूप सुंदर बांधलय. ग्रेट
रण चंडीका, मुंड मुंडीका
दैत्य दंडीका, जिंकूनी ये
जगतकारिणी, गर्भ धारिणी,
दु:ख सोषिणी, होऊन ये
आणि
गीत माधुरी, श्याम बासरी
सूर आसावरी, छेडीत ये
शुभ्र मोगरी, कृष्ण मंजिरी
रंग शर्वरी, खुलवित ये..
केवळ अप्रतिम
22 Dec 2008 - 2:06 pm | स्मिता श्रीपाद
किती सुरेख आहे कविता..आणि प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आहे...
मला हे जास्त आवडलं :-
गीत माधुरी, श्याम बासरी
सूर आसावरी, छेडीत ये
शुभ्र मोगरी, कृष्ण मंजिरी
रंग शर्वरी, खुलवित ये..
-स्मिता
22 Dec 2008 - 2:26 pm | अवलिया
मस्तच
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
22 Dec 2008 - 2:47 pm | मृगनयनी
अलका, अचला, कोमल गंधा
अभिसारीका झळकत ये
विश्वस्वरूपा, दुर्गा, अंबा
अग्निशलाका तळपत ये
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
केवळ अप्रतिम!
चाल हंसिनी, रूप कामिनी
विश्वमोहीनी , सजून ये
गजगामिनी, दिप्ती दामिनी
चंचल हरिणी, बनून ये
मस्तच!
शब्द नाहीत गं प्राजु.. .. ..
खूप सुन्दर वर्णन आहे, देवीचे...
मनातले पवित्र भाव आपोआप जागृत झाले.
:)
22 Dec 2008 - 5:17 pm | चेतन
सुरेख झालेय कविता
सगळिच कडवी आवडली
एक शंका दु:ख सोषिणी, होऊन ये मध्ये सोषिणी हा शब्द बरोबर आहे का? (मला माहिते मिपावर शुध्दलेखनाचे नियम नाहीत)
पण
शोषण किंवा सोसणे हे दोन वेगळे शब्द आहेत. सोषिणी चा अर्थ काय होतो?
चेतन
22 Dec 2008 - 5:29 pm | सुवर्णमयी
प्राजु, कविता आवडली
22 Dec 2008 - 6:25 pm | शितल
प्राजु,
कविता खुप आवडली.. :)
मन मंदिराय... ह्या गाणाच्या चालीवर म्हणुन बघ.. कसे फिट बसते ते. :)
22 Dec 2008 - 6:43 pm | लिखाळ
वा .. कविता छान आहे.
आवडली.
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
22 Dec 2008 - 9:03 pm | प्राजु
सर्वांचे मनापासून आभार..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Dec 2008 - 12:48 pm | राघव
नेहमीप्रमाणेच सुंदर कविता! :)
मुमुक्षु
23 Dec 2008 - 3:00 pm | उपटसुंभ
सुंदर..! :)
24 Dec 2008 - 8:39 pm | मिना भास्कर
व्वा,
प्राजू,
कविता सुन्दर करतेस.
तुला जी मेल ची ऍलर्जी आहे का? :W :W
24 Dec 2008 - 10:13 pm | चतुरंग
अतिशय शब्दसमृद्ध काव्याबद्दल अभिनंदन!
चतुरंग
24 Dec 2008 - 10:13 pm | शाल्मली
प्राजु,
कविता फारच आवडली
वाचताना कवितेचा ठेका मस्त वाटतो आहे.
गीत माधुरी, श्याम बासरी
सूर आसावरी, छेडीत ये
शुभ्र मोगरी, कृष्ण मंजिरी
रंग शर्वरी, खुलवित ये..
हे कडवं विशेष आवडले.
--शाल्मली.
25 Dec 2008 - 12:21 am | धनंजय
डमडमत डमरू ये
खणखणत शूळ ये...
तशा झोकाची कविता आहे.
25 Dec 2008 - 1:14 am | बिपिन कार्यकर्ते
सुंदर...
बिपिन कार्यकर्ते
25 Dec 2008 - 1:19 am | घाटावरचे भट
छान कविता....
25 Dec 2008 - 1:29 am | शेणगोळा
देवीचे स्त्रोत्रच वाचतो आहे असे वाटले. एक प्रासादिक आणि शुचिर्भूत काव्य वाचल्याचा आनंद मिळाला.
गणेशरुपाबद्दल असेच काही लिहाल का?
सर्वांचाच लाडका,
शेणगोळा.
25 Dec 2008 - 7:02 pm | जयेश माधव
खुपच छान!!
जयेश माधव
25 Dec 2008 - 7:35 pm | मीनल
वामा चा अर्थ सांगितल्याबद्दल आभार.माझ्यासारख्या अज्ञानी लोकांकडून येणारे प्रश्न टळले.
कविता वाचल्यावर कुसुमाग्रजांच्या काही काव्यपंक्तींची आठवण झाली. म्हणजे लेखनाचा प्रकार!
पण `वामा`ही कविता वेगळ्या अर्थाची आहे.
ब-याचदा स्त्री म्हणजे `अबला` समजली जाते. पुरूषप्रधान भारतात स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण जास्त आहे.
त्या पार्श्वभूमीवर ही कवीता `स्त्री`ला आमंत्रण देणारी आहे.
कवयित्री आग्रहाने तीला बोलावते आहे.``तू ये.``
``तू तशी आहेसच.नसशील तर तू अशी अशी बनून ये.``
:
:
कशी ??????????
:
:
अवनी ( ही पण स्त्री च बरं का!)जशी क्षितीजातर्फे उंच असाध्य अश्या ही आकाशाशी नाते जोडते तशी तू नाती जोडणारी /जपणारी होऊन ये.तूझ्या जन्माने विविध नाती जोडली जाणार आहे. तू बहिण होशिल.त्याच बरोबर नविन जन्म देणारी माता ही होशील.विविध नाते, स्नेह संबंध तू जोडत ये.
दूष्ट दानवांचा नाश करणा-या दूर्गा,अंबा ,लक्ष्मी, चंडिका यासारख्या शौर्यवान शक्तीशाली स्त्री सारखी तू विजयी होऊन (दामिनीसारखी )विजेसारखी लखलखत ये. दूर्गुणांचा अंत करण्याच सामर्थ्य तूझ्यातही आहे.
पण त्याच बरोबर तू नाजूकश्या प्रेमाने गंधित होऊन कोमलतेने अलगद ये. तू तूझा बालिशपणा सोडू नकोस. चंचल हरिणीसारखी अवखळ होऊन ये.येथे विरोधाभास उत्तम साधला आहे.
अजून असे काही विरोधाभास आहे पहा.---
सजून धजून सुंदर रूप घेऊन त्या रूपाचा संपूर्ण जणिवेने या सर्व जगाला मोहीत करण्यासाठी तू गर्वाने ये.पण (लीन रुजूता, मूक नम्रता---) उन्मत्त होऊ नकोस.लीनता /नम्रपणा मात्र सोडू नकोस.
मुंड मुंडिका म्हणजेच मारणारी . आणि गर्भ धारिणी म्हणजे जन्म देणारी .येथे ही उत्तम विरोधाभास आहे.
आपले शरीर अर्पून त्या त्यागाने आनंदाची (सरिता)नदी तू फुलवत ये. गर्भधारण करण्याची तूझी क्षमता आहे. पण जग निर्माण करताना त्यात दु:ख सोसण्याच्या तयारीनिशी ये.
तनु अर्पिता--आपण देवाला फुल, नैवेद्द वगैरे अर्पण करतो तेव्हा ज्याला अर्पण करतो त्याच्या बद्दल प्रेम ,आदर आणि श्रध्दा असते.इथे शरीराचा उल्लेख करतानाही अर्पिता ह्या शब्दामुळे तेच पावित्र्य राखलेले दिसते आहे.
दु:ख सोषिणी--- जीव निर्माण करताना होणा-या वेदनांची कल्पना तुला आहे. ती सहन करण्याची ताकद तुझ्यात आहेच.त्या ताकदीने ये.
मौक्तिक मुक्ता, रूप कांचना
सुवर्णलता उमलत ये
येथे सुवर्ण लतिका अधिक शोभले असत असं वाटत.
पहाट जशी नवी आशा ,उमेद ,उत्साह घेऊन येते तशीच तू `सारे जिवनरंग खुलवत ये `अशी आर्जव शेवटी केली आहे..
इथे `आसावरी `या चार अक्षरांच्या शब्दापेक्षा तीन अक्षरी शब्द ठेक्यात अधिक चांगला बसला असता.
ही जी वामा आहे ती सच्ची आहे.सच्ची म्हणजे खरी खुरी.आपल्या आजबाजूला आईमधे, बहिणीमधे, प्रेयसीमधे ,पत्नीमधे ,लेकी मधे आपण पाहिलेली आहे.
त्यामुळे कुठेही अतिरंजिकता, अतिरेक वाटत नाही.खरी वाटते. नव्हे ,नव्हे आहेच.
या आमंत्रणात जिला आमंत्रित केले आही ती देवी /देवताच असायला हवी असे नाही.
प्रत्येक स्त्रीच तशी असते. अशी खात्री कवयित्रीला आहे असे स्पष्ट होते आहे.
प्रत्येक शब्दात सकारत्मकता आहे. नकरात्मक शब्दांचा कधीही वापर केलेला नाही.
अनुरूप उदाहरणांचा अचूक उपयोग केला आहे.
'उपमान' म्हणजे ज्याची उपमा दिली जाते ते, आणि 'उपमेय' म्हणजे ज्याला ती दिली जाते ते.
अभिसारिका,अग्निशलाका,सुवर्णलता,हंसिनी,कामिनी,गजगामिनी, दिप्ती, दामिनी,सरीता,हरिणी,आसावरी, बासरी , मोगरी,मंजिरी,शर्वरी अशी सर्वच्या सर्व स्त्री वाचक उपमान आहेत.वामा हे उपमेय ही स्त्रीलिंगी. म्हणूनच एकमे़कांशी अनुरूप आहेत.
शब्द, रूपक, प्रतीक आणि प्रतिमा यांचा उत्तम मेळ जमून अर्थपूर्ण अप्रतिम काव्य तयार झाले आहे.
मीनल.
25 Dec 2008 - 9:11 pm | प्राजु
बापरे...
मला अपेक्षित असलेला अर्थ तू लिहिला आहेस या कवितेचा. हे काही देवीचे स्तवन नाहिये.. ही केवळ आणि केवळ स्त्रीला उद्देशून.. तिच्या रूपांचं वर्णन इथे केलं आहे. त्यात मग आई, बहिण, कामिनी, बायको, देवी... मैत्रीण.. सगळीच रूपं आली.
खूप खूप आभारी आहे मी तुझी. तू माझ्या कवितेला वाचक फ्रेंडली केलस असं म्हणेन मी.
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Dec 2008 - 7:45 am | सहज
मीनलताईंनी खुपच छान समजावुन दिली कविता. या काव्याला एखादी शास्त्रिय संगीतातील चाल लावुन कथ्थक नृत्य बसवायला संधी आहे असे वाटते.
26 Dec 2008 - 3:36 am | रेवती
सगळी रूपे कवितेत छान दाखविली आहेस.
आरतीची चाल लावता येइल का? असे वाटले.
रेवती