जिद्द, आत्मविश्वास या गोष्टी शोधायच्या असतील तर थोरांची आत्मचरित्रच वाचावी लागतात, त्यांचे शब्द ऐकावे लागतात असं नाही. अगदी साध्या सोप्या माणसांशी केलेल्या संवादातूनही अशा मूल्यांची ओळख होते. असाच एक माणूस मला भेटला. हा माणूस म्हणजे आमच्या कँटीन स्टाफ मधला एक जण.
अगदी ४-५ महिनेच झाले असतील त्याला कँटीन मधे लागून. इथे एका केटरर चं कंत्राट आहे, ज्याच्याकडे हा कामावर आहे. तसेही कँटीनमधले चेहरे नियमितपणे बदलत असतात त्यामुळे सुरुवातीला 'आणखी एक नवीन चेहरा' म्हणून त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही कुणी आणि मीही. पण जेंव्हा जेंव्हा नाश्ता, जेवण घ्यायला जायचो तेंव्हा हा एकच माणूस अतिशय शुद्ध हिंंदीत बोलायचा. त्याच्या बोलण्यात अदब असायची, वाढण्यात आदळआपट नसायची. त्यामुळे तो इतर कँटीन स्टाफपेक्षा वेगळा वाटू लागला.
कँटीनबॉइज, ऑफिसबॉइज यांच्याशी माझं नेहमीच कंपनीतल्या इतर कुणाहीपेक्षा चांगलं जमतं. मला यांच्याशी बोलायला आवडतं. त्यामुळे, या सवयीनुसार मी दर टी ब्रेकला हळू हळू या माणसाशी बोलू लागलो. त्याची वृत्ती फार चौकस आहे. एक दिवस मी मोबाईलवर काहीतरी करत चहा पीत होतो, तेंव्हा हा माझ्या बाजूला येऊन बसला. दोन मिनिटं शांत राहून म्हणाला, 'आपके मोबाईल में.... वो.... जो रहता है...... वो.... नक्शा है?' (तो असा प्रत्येक वाक्य तोडून तोडून म्हणतो. 'मैने जो है.... एक दिन..... ऐसा किया था' असं काहीसं.) 'मॅप्स???' मी म्हटलं, 'हां है ना. देखना है?' असं म्हणून मी मॅप्स उघडले. 'क्या दिखाउं? कौनसा नक्शा?', मी विचारलं. 'सर... वो... मुझे है ना.... मुंबई का नक्शा देखना है. माने, हम जिस जगह अभी है, और हमारे इर्द-गिर्द क्या है, कहां से कैसे जाए, ये सब देखना है'. 'अच्छा.... मुंबई का मॅप. ओके. ये देखो.', असं म्हणून मी भारतापासून झूम इन करत करत एक एक दाखवायला सुरुवात केली. हा भारत... हा कच्छ चा आकार, इथून खाली आलं की मुंबई, हे कसं बेट आहे, दक्षिण मुंबई कुठे, चर्चगेट कुठे, गेटवे कुठे असं करत करत कर्जत कसारा डहाणू पर्यंत दाखवून झालं. मग तो अजून नेमकं बोलता झाला. त्याला मुंबईतली प्रसिद्ध देवळं फिरायची होती. मुंबईत येऊन चारच महिने झाले होते त्यामुळे नीट काही माहित नव्हतं. मग एक्स्टेन्डेड टी ब्रेक मधे हे सगळं जमेल तसं मी त्याला सांगितलं. दुस-या दिवशी गूगल मॅपचा प्रिंटआउटही आणून दिला.
असाच एक किस्सा. एक दिवस अगदी वरच्याप्रमाणेच, मी मोबाईल बघत असताना बाजूला येऊन हा माणूस बसला. 'बोलिये, कहां कहां घूमें इस शनिवार रविवार?' मी मागचा संदर्भ घेत विचारलं. उत्तर इंग्रजीत आलं. लेहजा हिंदीचाच. 'आय.... वेन्ट... दॅट.... बाबुलनाथ. देन... ओलसो... महालक्ष्मी.' 'वाह! इंग्लिश?' 'येस सर' (हसत म्हणाला). 'आय वान्ट टू नो... हाउ मच फार... इज... नासिक.' 'नाशिक?? क्यूं? कुंभ जाना है क्या?', मी अजूनही हिंदी ट्रॅकवर होतो. 'येस सर. आय गो देअर, टेक शाही स्नान', इंग्लिशच बोलायचं होतं याला. मग मीही सुरू केलं हळू वेगात. 'इफ यू गो बाय ट्रेन, इट विल टेक थ्री अवर्स टू रीच नाशिक. देअर आर बसेस अवेलेबल अॅज वेल. अनदर वे इज टू गो कसारा ऑन सेन्ट्रल लाईन अँड टेक अ शेअर टॅक्सी.' इट विल बी इकॉनोमिकल टू.' याची पुन्हा एकदा उजळणी त्याने केली आणि ओके सर, थेंक यू म्हणून कामाला गेला.
या दोन प्रसंगानंतर मला त्याच्या कँटीनमधे काम करण्याबाबत शंका यायला लागली. इंग्लिश येतं म्हणजे हा शिकलेला आहे हे नक्की. मग इथे काय करतोय? हा प्रश्न पडला. काही दिवसानंतर पुन्हा जेंव्हा असाच टी ब्रेक ला गेलो, तेंव्हा हा एकटा बसलेला होता सगळं काम आटपून. या वेळी मी त्याच्या बाजूला जाऊन बसलो. त्याला विचारलं, '(इंग्लिश चं लक्षात होतं.) सो...हाउ वॉज कुंभ?' 'नाईस सर' 'आय डिड शाही स्नान, देन वेंट टू ....दॅट...त्रिंब्केश्वर (मधलंच अक्षर असं अर्ध करणं हा अॅक्सेंट चा भाग आहे). देन... आय... ऑल्सो वेन्ट टू.... द.... ब्रम्ह् गिरी. जहां... गोदाव्री जो है.. उसका... जो है... उगमस्थान है.' 'वा आप तो बहोत घूमे. मस्त.' 'जी सर. आय केम बॅक फोर थर्टी इन द मॉर्निंग.' 'ओह. सही है सही है'. मग मी माझी शंका विचारली, 'वैसे आप हो कहांसे, और यहां कैसे आना हुआ?'
उत्तरादाखल कळलेली त्याची संक्षिप्तशी वाटचाल चकित करून गेली. तो मूळचा आसामचा. शिक्षण बीए फर्स्ट क्लास. मी कसा मॅट्रिक आणि बीए झालो हे तो अभिमानाने सांगतो. मैं पढा लिखा हूं सर... हे सांगतानाची त्याची कळकळच त्याला कँटीनचं काम करताना होणा-या मनस्तापाचा अंदाज देते. त्याने चौदा वर्ष शिक्षक म्हणून काम केलं आसाम मधल्याच एका छोट्या शहरात. काही वर्ष शिकवण्या घेतल्या आणि काही वर्ष एका कॉन्व्हेंट मधे गणित विषय शिकवला. 'मगर मुझे बडे शहर में कुछ करना था, अपना नाम कमाना था. इसलिये मैं यहां आया, मुंबई. ये मजबूरी है के मैं आज ये काम कर रहा हूं.' या माणसाला काँप्यूटर येतो. काँप्यूटर च्या केलेल्या कोर्स चं नाव, अभ्यासक्रम त्याने सांगितला. तरीही मला विचारलं, ये जो है... एम एस... सी... आय... टी... ये करूंगा तो सर अच्छा जॉब मिलेगा यहां?... मी म्हटलं नाही रे बाबा, प्रामाणिकपणे, तू जो कोर्स केलायस त्यात सगळं आलंय. एमएससी आयटी काही वेगळं नाही.
यानंतर चार दिवसांनी मला त्याने विचारलं, 'ये जो टॅब होता है.... कितनेमें आएगा? 'आपको लेना है? किसलिये?' 'नही अब जो कंप्यूटर सिखा हूं... उसको प्रॅक्टिस करना है. वर्ड एक्सेल इंटरनेट सब.' 'ओह... फिर आप टॅब पे वो सब इतने अच्छेसे नही कर पाओगे, जितना डेस्क्टॉप या लॅपटॉप पे कर पाओगे.' तो विचारात पडला. 'अच्छा, आपका बजेट कितना है?' 'सर पंधरा....तक है.' 'ओके, तो एक काम करो, सेकंड हँड लॅपटॉप देखो या डेस्क्टॉप.', मी सुचवू लागलो. त्याला काही फॅक्ट्स सांगितल्या, लॅमिंगटन रोड बद्दल सांगितलं, आणि निर्णय तू घे म्हटलं. वाटल्यास थोडं थांब आणि लॅपटॉप घे एन्ट्री लेव्हल पुरेल तुला इत्यादी इत्यादी.
हे सगळे प्रसंग सांगण्याचा हेतू इतकाच की त्या माणसाची चौकस वृत्ती, जिद्द, काहीतरी करून दाखवण्याची इच्छा या गोष्टी वरील संभाषणांतून मला जाणवत गेल्या, आणि त्याच्याबद्दल एक वेगळं कौतुक वाटत राहिलं. परवा जेंव्हा ऑफिसजवळच्या देवळात मी गेलो तेंव्हा तिथे हा मी यायच्या एक क्षणापूर्वी तरातरा चालत आला होता आणि त्याचा चेहरा लाल लाल आणि रडवेला झालेला होता. 'क्या हुआ?' 'कुछ नही सर... हमें ये काम नही करना.' 'कोई कुछ बोला क्या?' 'हा... किचकिच हुआ. हमें पता था ये होगा. ये जो अबक है ना वो हमेंशा ऐसाही करता है. हमेशा मुझे झूठा बताता है. वो सब समझतेहै के हम ## है पर हम को सब समझता है. बोलके आया हूं अब्भी सेठ को, के नही करना है मुझे काम', तो काप-या आवाजात माझ्याशी (की स्वतःशीच) बोलत होता. 'अछा...' 'सर यहां मुझे और अच्छा काम मिल सकता है ना? नही तो मैं अपने गांव चला जाऊंगा' मला काय बोलावं कळत नव्हतं. तो अतिशय अगतिक झाला होता. 'हां मिलेगा ना. लेकिन थोडा समय लग सकता है इसलिये ये कहूंगा के हडबड में कोई निर्णय मत लो. अब आपने यहां पेपर दे दिया है तो ठीक है. नया ढूंढना चालू करो. मिलना मुश्किल नही है पर प्रयास अच्छा करना होगा. टेन्शन मत लो.' थोडं बोलून मी तिथून निघालो.
आज तो मला म्हणाला मैं सोच रहा हूं, क्या मुझे टीचर का जॉब मिल सकता है? मी म्हटलं टीचर होना है तो बी एड होना जरूरी है. खास करके अगर मुंबई की स्कूल में पढाना है तो, वो भी अच्छे स्कूल में. अच्छा.... थोडा वेळ विचार केला त्याने, आणि म्हणाला, 'बस सर ये मेरा लक्ष्य है अब के मुझे बी एड करना है.' दरम्यान बी एड आणि लागणारा अवधी, पुढच्या संधी याबद्दल थोडं आणखी तपशीलवार बोलणं झालं, ते इथे लिहीत नाही. पण तो म्हणाला की शायद तबतक किसी अच्छे होटल में काम करूंगा, या जो भी मिलेगा वो करूंगा, पर मुझे बी एड बनना है. मुझे १४ साल का टिचिंग का एक्स्पिरियन्स है. और मुझे आगे जाके किसी अच्छे स्कूल में पढाना है.
त्याला मुंबई विद्यापीठ, इग्नोऊ, वायसीएमओयू बद्दल सांगून आलोय. फोन नंबर पत्ते कागदावर लिहून देऊन आलोय.
झोपडपट्ट्यात शौचालयं, व्हॉट्सॅप मेसेज वर पहारा, एक्सप्रेसवे वर अपघात, सिंचन घोटाळा अशा अनेक उद्विग्न करणा-या विषयांवर लिहायचं टाळलं आणि म्हटलं या माणसाबद्दल मला जे कळलं, वाटलं ते लिहावं. त्याला कदाचित कुठली गणेश लेखमाला मिळायची नाही आपला प्रवास लिहायला. आणि कदाचित मिळेलही; त्याहून मोठं व्यासपीठ, आणि ख-या अर्थाने प्रेरणा घेणारा श्रोतावर्ग. खोटं वाटेल, पण मला त्याचं नाव हे वाक्य लिहीपर्यंत ठाऊक नव्हतं. हे लिहायच्या आधी एका दुस-या व्यक्तीला आडून विचारलं मी त्याचं नाव. पण तरीही लिहावसं वाटत नाही. कारण जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी अशा गोष्टींना नावाचं कोंदण नसतं.
टीपः नवीन कळलेल्या माहितीनुसार लेखात एक दोन तपशील बदलले आहेत. त्या माहितीमुळे या व्यक्तीबद्दलच्या कौतुकात आणिक भरच पडली आहे.
प्रतिक्रिया
24 Sep 2015 - 11:45 am | आनन्दा
मस्तच..
24 Sep 2015 - 11:47 am | एस
त्या अनामिक लढवय्याला सलाम! तुमचेही कौतुक.
24 Sep 2015 - 11:49 am | अभिजितमोहोळकर
त्या माणसाची जिद्द, चिकाटी कौतुकास्पद आहे.
24 Sep 2015 - 11:53 am | किसन शिंदे
जॉब लागला का त्याला?
24 Sep 2015 - 11:56 am | gogglya
आपल्या स्वभावाला सुद्धा !
24 Sep 2015 - 11:58 am | चांदणे संदीप
अशी काही माणसे आपल्यालाही उर्जा देउन जातात.
आशा आहे त्याच ध्येय साध्य होईल.
अशीच माणस पाहावीत आणि दुस-यांना दाखवावीत!
24 Sep 2015 - 12:04 pm | खटपट्या
त्याची पुढची वाटचाल ऐकायला आवडेल.
24 Sep 2015 - 12:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर ! अश्याच जिद्दीची माणसं काहीतरी करून दाखवू शकतात !
.
"त्याला" यशस्वी होण्यासाठी मनःपूर्वक अनेकानेक शुभेच्छा !
.
24 Sep 2015 - 12:17 pm | अजया
_/\_ त्याला आणि
हे लिहिणाऱ्या तुम्हालाही
24 Sep 2015 - 5:23 pm | मधुरा देशपांडे
+१
24 Sep 2015 - 12:22 pm | वेल्लाभट
"त्याची पुढची वाटचाल"....ती लिहायची मला संधी मिळेल असा विश्वास वाटतो. मला जेवढी जमेल तेवढी मदत माझ्याकडून त्याला होईलच. त्यात माझा आनंद असेल.
24 Sep 2015 - 12:56 pm | शिव कन्या
असे हिरे असतातच आसपास.
त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा .
24 Sep 2015 - 1:05 pm | उगा काहितरीच
असं काही वाचलं की मनाला आलेली मरगळ नाहीशी होते. त्याला शुभेच्छा .
24 Sep 2015 - 1:24 pm | नीलमोहर
चौदा वर्ष शिक्षक म्हणून काम केल्यावर कँटीन मध्ये काम करतांना काय वाटत असेल त्या माणसाला,
कुठलंही काम मोठं किंवा छोटं नसतं असं म्हणायला खूप सोपं, पण प्रत्यक्षात योग्यतेपेक्षा कमी दर्जाचे काम करायला लागणे यापेक्षा वाईट काही नसावं.
त्यांची जिद्द पाहता ते यातूनही मार्ग काढतील आणि पुढील आयुष्यात प्रगती करतील हे नक्की..
24 Sep 2015 - 1:29 pm | रातराणी
सुरेख लिहलय !
24 Sep 2015 - 1:30 pm | पैसा
आता कोणाला निर्भेळ मदत करणेही धोक्याचे वाटते. असा हात पुढे करणे फार कठीण आहे. अजून किती वर्षे असा झगडणार आहे तो? १५/१६ वर्षे काम करून झाले म्हणजे वय ३५ ला टेकले असेल. बी एड करून चांगली नोकरी मिळेल का?
24 Sep 2015 - 1:50 pm | वेल्लाभट
शिकवायचंय, शिक्षक म्हणून कार्य करायचंय हे पक्कं आहे त्याचं. आणि शिवाय क्लासेस मधे विचार, अगदीच चांगली शाळा जर संधी देत नसेल तर, किंवा तुझा जागेचा प्रश्न नसेल तर तू वैयक्तिक क्लास सुरू कर साइड बाय साइड, असे अनेक पर्याय सुचवलेत त्याला. 'हॉटेल सारखंच असतं क्लासचं. एकदा चव आवडली की माणसं जशी पुन्हा पुन्हा येतात, तसंच शिकवणं आवडलं की विद्द्यार्थी येत राहतात, आणि माउथ पब्लिसिटी ने संख्या वाढत जाते' हे म्हटल्यावर सॉल्लिड पटलंय त्याला.
बी एड नंतर किंवा आधी, पण चांगली नोकरी कदाचित मिळेलच असं वाटतंय. रादर, मिळावी.
24 Sep 2015 - 5:55 pm | मुक्त विहारि
एकदा चव आवडली की माणसं जशी पुन्हा पुन्हा येतात, तसंच शिकवणं आवडलं की विद्द्यार्थी येत राहतात, आणि माउथ पब्लिसिटी ने संख्या वाढत जाते'
+ १
24 Sep 2015 - 1:53 pm | वेल्लाभट
ती एक रिस्कच आहे आजकाल. असो. मदत केली आणि फायदा घेतला असेही अनुभव येतात. पण केवळ सायकॉलॉजिकली मद केली तर त्यात काहीच धोका नाही.
24 Sep 2015 - 3:46 pm | नया है वह
बाकी मदत(आर्थिक) बहुतेक वेळा माणसाला कुचकामी, कमजोर अथवा कृतज्ञ बनविते.
बाकी लेखन आवडले.
हा लेख म्हणजे गणेश ले़खमालेतला एकलव्य! :)
25 Sep 2015 - 2:42 pm | राजाभाउ
+१
आसेच म्हणतो
24 Sep 2015 - 2:24 pm | द-बाहुबली
तो हुशार आहे, गुणी आहे.. पण मोठ्याशहरातील स्पर्धेला सपशेल अनभिज्ञ. जर त्याचे समवयस्क सोबत असतील तर तो काहीकाळ निभावुन न्हेइलही पण जर तो स्वतःला बदलु शकला नाही तर इथे फक्त आयुष्यभर स्वप्नांचा पाठलाग होत राहील... कारण त्याच्यासारखे वा त्यापेक्षा जास्त हुशार इथे हजारो भेटतील म्हणुनच म्हणतो मोठ्याशहरातील स्पर्धेला तो टिकणार आहे काय ? नशिबाची त्याला तगडी साथ हवी अन्यथा त्याचा स्ट्रगल जो आज स्फुर्तीदायक वाटतो तो उद्या निराशादायक चित्राचे उदाहरण न बनो...
कंत्राटी शिक्षक बनायचे ध्येय नक्किच आशादायक नाही. :(
24 Sep 2015 - 9:11 pm | वेल्लाभट
त्याच्यासाठी ते आशादायक आहे हो; कारण ते 'त्याचं' ध्येय आहे.
तुमच्या म्हणण्यात अंशतः तथ्य आहे, नाही असं नाही. पण मला इथे त्याला परावृत्त करावंसं नाही वाटलं. कारण एकंदरित गावाकडची परिस्थिती बघून तो काहीतरी ठरवून इथे आला आहे. सो...
24 Sep 2015 - 3:45 pm | रेवती
त्या मनुष्याला यश मिळो. लेखन आवडले.
24 Sep 2015 - 3:52 pm | विशाल कुलकर्णी
मस्तच...
अशी माणसं बसून राहत नाहीत. तो नक्कीच यशस्वी होइल. त्याला शुभेच्छा !
24 Sep 2015 - 3:53 pm | सूड
सुंदर लिहीलंयत!!
24 Sep 2015 - 4:30 pm | सस्नेह
मस्त लेख !
24 Sep 2015 - 4:37 pm | अद्द्या
हि अशी जिद्दीने हवं ते मिळवणारी लोक पहिली कि स्वतःची लाज वाटायला लागते काही काळ .
एखादी गोष्ट पूर्ण का केली नाही याची दुसर्यापेक्षा स्वतःला दिलेला कारणं आठवायला लागतात . .
पण काही काळच . . मग परत येतो तोच निर्ढावलेला आळशीपणा आणि निर्लज्य स्वभाव
असो
मस्त लिहिलंय
24 Sep 2015 - 4:40 pm | सानिकास्वप्निल
साधं, सरळ, सुरेख लेखन.
त्याच्या प्रयत्नांना यश मिळो __/\__
अनेक शुभेछा !!
24 Sep 2015 - 6:08 pm | बहुगुणी
सर विन्स्टन चर्चिल यांचं वाक्य आणि त्यावर आधारित गाण्याच्या ओळी आठवल्या:
If you're goin' through hell, keep on going
If you're goin' through hell, keep on going
Don't slow down if you're scared don't show it
You might get out before the devil even knows you're there
त्याच गाण्यात ओळी आहेतः
But the good news is there's angels everywhere out on the street
Holdin' out a hand to pull you back up on your feet
वेल्लाभटः त्या माणसासाठी You are one of those angels!
24 Sep 2015 - 9:06 pm | वेल्लाभट
I do not know if I am, but I hope I am.
Thanks for sharing the song.
24 Sep 2015 - 9:23 pm | स्रुजा
वाह !!
वेल्लाभटांचा लेख आणि तुमचा प्रतिसाद दोन्ही अत्यंत सुरेख, सकारात्मक. "त्या" च्या पदरात निराशा न पडता कधी तरी " याच साठी केला होता अटटाहास" अशी सुखाची भावना दाटुन यावी ही शुभेच्छा.
वेल्लाभट या लेखासाठी तुम्हाला ___ /\ ____
24 Sep 2015 - 8:09 pm | पद्मावति
खूप छान लिहिलंय. सकारात्मक. आवडलं.
24 Sep 2015 - 8:18 pm | निनाव
Tumche tar abhinandan aahech, shivaay tya saathi khoop shubhhechha.
24 Sep 2015 - 8:23 pm | राही
गणेश लेखमालेत अगदी उठून दिसला असता हा लेख.
त्याच्या जिद्दीला सलाम आणि 'जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी या गोष्टींना नावाचं कोंदण नसतं' या वाक्यालाही.
पूर्वी मुंबईत हॉटेलव्यवसायातले पोर्ये मंगळूर, उडिपी, आंध्रमधून येत. पण आता ही आणि मणिपाल, हैदराबाद, बंगळुरु, मैसुरु येथे चांगल्या नोकर्या उपलब्ध आहेत आणि शिक्षणाची सोयही चांगली आहे. त्यामुळे अशा हलक्या कामांसाठी दक्षिणेतून आवक बंद झाली आहे. आता अस्सम, उदिशा, झारखंड इथून मुलं येतात. डोळ्यात स्वप्नं घेऊन. एकदा गोव्याच्या किनार्यावर एक असाच फेरीवाला मुलगा भेटला होता. लहान आणि निरागस. त्याचा फोटो काढून त्याला दाखवल्यावर खुश झाला खरा, पण म्हणाला, यह फोटो आप गाँव भेजेंगे? माँ देखेगी की मैं कमाने लगा हूं. अगदी गलबललं काळजात. पत्ता वगैरे घेतला त्याच्या घरचा पण त्याला नीट सांगता आला नाही आणि नंतर ते गाव नकाशावर शोधण्याचा प्रयत्न मीही केला नाही याचं अजूनही वाईट वाटतं. ते अर्थातच बिहारमधलं गाव होतं.
24 Sep 2015 - 9:03 pm | एस
:-(
24 Sep 2015 - 9:04 pm | वेल्लाभट
.............
24 Sep 2015 - 8:54 pm | विवेकपटाईत
साध आणि हृदयाला भिडणारे लेखन , आवडले.
24 Sep 2015 - 9:43 pm | आदूबाळ
एक नंबर लिहिलंय. आणि मुख्य म्हणजे नाव लिहिलं नाही ते एक बरं केलं. उगाच पूर्वग्रह नको चिकटायला.
25 Sep 2015 - 12:18 pm | पिशी अबोली
खूप सुंदर लिहिलंय. तुम्ही वेळ काढून त्याला जो मानसिक आधार देताय त्याबद्दल तुम्हालापण सलाम.
हल्ली असे सकारात्मक धागे दिसतायत मेन बोर्डावर तर खूप छान वाटतंय.
25 Sep 2015 - 12:56 pm | नाखु
त्याबद्दल कडक सलाम दोघांनाही
नेमस्त नाखु
25 Sep 2015 - 1:49 pm | शित्रेउमेश
अशी माणसे कुठुन आणतात एवढी उर्जा??
बी. एड. करण्या आधीच खूप काही शिकवुण गेला...
25 Sep 2015 - 2:11 pm | प्रभाकर पेठकर
वेल्लाभटसाहेब,
हे व्यक्तिमत्व बरेच इंटरेस्टींग वाटत आहे. त्याला उपहारगृह व्यवसायात यायचे असेल आणि आखातात काम हवे असेल तर मी मदत करू शकेन. पासपोर्ट तयार असावा. महिना २०-२२ हजारापार्यंत कमवू शकेल. येत्या २-४ महिन्यात माझ्याकडे २५-३० व्हेकन्सीज निर्माण होतील. सुपरवाझरी जॉब किंवा कॅप्टन म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर बोलून पाहावे.
25 Sep 2015 - 2:55 pm | वेल्लाभट
पेठकरसाहेब तुमचे अनेक धन्यवाद या प्रस्तावाबद्दल. पण धाग्यात लिहिल्याप्रमाणे त्याची शिक्षक होण्याची इच्छा आहे इव्हेन्च्युअली. त्यामुळे तो सद्ध्या जिच्या शोधात आहे ती त्याच्यासाठी गॅप टाईम अरेंजमेंट असेल. काही महिने, फार तर एक दीड वर्ष. त्यामुळे तुमचा पर्याय कदाचित त्याला स्वागतार्ह नसेल. आणि त्याचं लाँग टर्म ऑब्जेक्टिव्ह बघता तुम्हालाही ते स्वागतार्ह नसेल. चुकत असल्यास सांगा.
तरीही नक्कीच त्याला विचारेन मी ही गोष्ट. पुन्हा थँक्स :)
25 Sep 2015 - 6:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
या पर्यायासाठी पेठकरसाहेबांचे खास अभिनंदन.
वेल्लाभटसाहेब, तुम्ही फार चांगले काम करत आहात. हा पर्याय त्याला जरूर सांगाच.
माझे आपले एक फुकटचे मनोगत :
कोणतेही धेय साधण्यासाठी योग्य तेवढे तरी आर्थिक बळ जरूर असतेच. आता जरी तो शिक्षक बनण्यासाठी अत्युस्तुक असला तरी त्याचे सद्याचे वय व शिक्षण पाहता त्या क्षेत्रात तो (आर्थिक व व्यावसायिक समाधान या दोन्ही आघाड्यांवर) किती पुढे जाईल यावर काहीएक मर्यादा असणारच. पेठकरसाहेबांनी दिलेला पर्याय काही काळ वापरला तर त्याला बर्यापैकी आर्थिक स्थैर्य लाभेल. त्याचबरोबर तो ऑनलाईन / करस्पाँडन्स बी एड करू शकेल... Top 5 Universities offering B.ed through Correspondence इथे काही उत्तम पर्याय आहेत, इतरही अनेक असू शकतात.
कोणी सांगावे ? पेठकरसाहेबांसारखा सहृदय वरिष्ठ मिळाल्यावर आणि त्याच्या अभिमानाला धक्का न लावणार्या इतर व्यावसायिक शक्यता/अनुभव समोर आल्यावर त्याचे व्यवसायासंबंधीचे मत बदलूही शकते... आणि नवीन पर्यायांत त्याला जास्त वरचे प्राविण्य, पद, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान मिळुही शकते.
(आयुष्यातल्या व्यवसायध्येयांचे अनेकदा पुनरावलोकन करून ती अमुलाग्र बदलण्याच्या स्वानुभवावर आधारीत)
25 Sep 2015 - 7:16 pm | द-बाहुबली
येस धिस इज वाट पाउलो कोल्युओ काल (इन अल्केमीस्ट) अ बिगीनर्स लक... काकांकडे जर त्याने नोकरी केली तर त्याचे आयुष्य अमुलाग्र बदलुन जाइल. तो वैतागला आहे इथल्या अप्रामाणीकपणाला आणी काकांनाही नेमक्या विनयशील, सुसंस्कृत, प्रामाणीक व्यक्तीची आवश्यकतासुधा तितकीच आहे. त्यामुळे तो नक्किच लाइफ रॉक करु शकेल. त्याने ही संधी सोडू नये.
25 Sep 2015 - 2:44 pm | बॅटमॅन
एक नंबर लिहिलंय. बाकी पेठकरकाकांचा प्रतिसाद पाहून तर "आंधळा मागतो एक डोळा अन मिपा देते दोन" असेच वाटले.
25 Sep 2015 - 2:57 pm | वेल्लाभट
दॅट्स सो ग्रेट ऑफ हिम.
25 Sep 2015 - 3:20 pm | बोका-ए-आझम
अशा self-motivated लोकांचा हेवा वाटतो. त्याला शिक्षक होण्याची इच्छा असेल आणि क्लासेसमध्ये शिकवण्याची तयारी असेल तर मीही मदत करु शकतो. विचारून पहा. १४ वर्षांचा अनुभव आहे तर नक्कीच काहीतरी होऊ शकतं.
25 Sep 2015 - 4:40 pm | बहुगुणी
अनोळखी पण जिद्दी व्यक्तीला दीर्घकालीन मदत करण्याची तुमची तयारी पाहिली आणि मिपा या व्यासपीठाचा अभिमान वाटला.
25 Sep 2015 - 7:37 pm | यशोधरा
कौतुक आहे त्या व्यक्तीचे आणि वेल्ला, मदत केली हे खूपच छान.
25 Sep 2015 - 11:40 pm | श्रीरंग_जोशी
एकदम अवलिया माणूस वाटत आहे तुमचा हा मित्र. तो चांगली प्रगती करेल असा विश्वास वाटतो.
या लेखनासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
लेखावरचे विविध प्रतिसाद अन प्रत्यक्ष मदत करण्याचे प्रस्ताव पाहून खूप बरे वाटले.
26 Sep 2015 - 5:34 pm | वेल्लाभट
सगळ्यांना मनापासून अनेक धन्यवाद...
28 Mar 2016 - 6:02 pm | वेल्लाभट
धागा काढल्यानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात म्हणून हा संक्षिप्त प्रतिसाद.
- टॅलीचा क्लास लावला
- पैसे साचवून लेटेस्ट कॉन्फिगचा लॅपटॉप घेतला जेणेकरून टॅलीची प्रॅक्टिस करता यावी.
- साधारण १० दिवसांपूर्वी कँटीनमधे या व्यक्तीचा वाद झाला. भांडी घासण्यास या व्यक्तीने नकार दिल्याने मतभेद होऊन ही व्यक्ती नोकरी सोडून निघाली होती. कर्मधर्मसंयोगाने कार्यालयातील एका व्यक्तीने विचारपूस करता त्या व्यक्तीला सगळी कहाणी कळली. भांडी न घासण्यामागचं कारण कळलं. (या माणसाने मला आधीही अनेकदा सांगितलं होतं की मेरी एक ही शर्त है जो मैने उनको पहलेही बता दी थी. के मै बर्तन नही धोऊंगा. वो मुझसे नहीं होगा.) (मे बी द प्रोफेसर इन हिम फाउंड इट टू बी बिलो हिज डिग्निटी). ते कळता त्या व्यक्तीने तातडीने मदत करत आमच्या कंपनीच्याच एका गोडाऊनमधे या माणसाला डेस्क जॉबवर घेतलं आहे.
परवाच फोन आला होता, म्हणाला, 'अब हमे हमारे कॅलिबर के मुताबिक काम मिल गया है और फिलहाल हम इससे बहुत खुश है. आगे हम बहुत मेहनत करेंगे और इसमे आगे बढेंगे. आप अबतक जैसे हमें गाइड किये है, ऐसीही उम्मीद आगे भी हम आपसे रखते है! और आपका बहुत धन्यवाद करते है'
आणि मिपाकरांनी जी मदतीची तयारी दाखवली त्याबद्दल मी मिपाकरांना धन्यवाद म्हणू इच्छितो.
28 Mar 2016 - 9:40 pm | श्रीरंग_जोशी
फारच सकारात्मक घडामोड. इथे लिहिल्याबद्द्ल खूप आभार.
28 Mar 2016 - 9:23 pm | बहुगुणी
या माणसाची वाटचाल पाहण्यास उत्सुक आहे, तुम्ही मदत करणं चालू ठेवलंय याचंही कौतुक करायला हवं.