माझी पत्रकारिताः माझे अनुभव
मनाची संवेदनशिलता मरु न देणे आणि सकरात्मकता जपून ठेवणे हे पत्रकारितेतील सर्वात मोठे आव्हान आहे. मागील वीस वर्षाच्या प्रवासात अनेक अनुभवांना सामोरे गेले. प्रत्येक वेळी संवेदनशिलता आणि सकारात्मकतेची कसोटी लागली. पत्रकारितेचे ग्लॅमर भल्या भल्यांना वाहवत नेते. मोहाच्या क्षणी कमजोर न पडता आपले उद्दिष्ट साध्य करणे अवघड असते याचा अनुभव घेताना प्रवाहात टिकून राहणेही आवश्यक असते. अशावेळी प्रवाहाच्या बाहेर फेकले जाण्याची किंवा आपल्याकडे दूर्लक्ष होण्याचीच शक्यता जास्त. माझी पत्रकारिता सुरु झाली त्यावेळचे वातावरण महिलांनी या क्षेत्रात यावे की नाही याविषयीच सांशकतेचे होते. अशा वातावरणात एक एक अनुभव घेत शिकत गेले.
गोदातीर समाचार मधील पहिल्याच नोकरीतील पहिलीच पत्रकार परिषद. थ्री स्टार हॉटेल, आकर्षक सजावट, सर्वत्र एक वेगळाच वास भरुन राहीला होता. पाचच मिनिटात प्रोडक्टची माहिती देऊन पत्रकार परिषद संपली त्यानंतर सुरु झाली ओली पार्टी. अशा पत्रकार परिषदांना सरावलेले अनेक जण आपोआपच त्यात रमले. माझी पंचाईत झाली अखेर आयोजकांचे आभार मानून निघणार तोच हातात एक गिफ्ट ठेवले. आता माझ्या गोंधळात आणखी भर पडली. पहिलीच पत्रकार परिषद त्यात मिळालेले गिफ्ट त्याचे काय करावे हे समजेना. मी गुपचूप ते गिफ्ट तिथेच ठेऊन निघाले. वर्तमानपत्राच्या कार्यालयात आल्यानंतर हा किस्सा सांगितला तेव्हा सगळेजण हसायला लागले. अशा भेटवस्तूंवर आपला अधिकारच असतो असा गुरुमंत्र त्यांनी मला दिला. अशा कमर्र्शियल पत्रकार परिषदांना जाण्याचे नंतर अनेक प्रसंग आले तरी भेटवस्तू घेण्याला माझे हात काही सरावले नाहीत. परंतू प्रवाहाच्या उलटे पोहता येत नाही हेच खरे.
क्राईम हे पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक क्रिम बीट समजले जाते. या क्षेत्रात बातमिदारी करताना संवेदनशिलता आणि प्रामाणिकपणा याची परमोच्च कसोटी लागते. वाहवत जाण्याची शंभर टक्के खात्री. मी क्रिम हा शब्द त्यामुळेच वापरला. कोणत्याही दैनिकात क्राईम बीट बघणाNयाला सर्वोच्च मान मिळतो. हे बीट मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नात असतो. वृत्तपत्राच्या मालकाच्या मर्जीतील व्यक्तीचीच नेमणूक होणार ठरलेले. (मालक हा शब्द मुद्दाम वापरला आहे. आजकाल संपादक आणि मालक यांच्यातील सिमारेषा प्रिंट मिडीयात पुसट होत आहे हे अनुभवानेच सांगते.) मला हे बीट कधी बघायला मिळाले नाही याची खंत आणि आनंद दोन्ही आहे. खंत याच्यासाठी की केवळ महिला म्हणून मी या क्षेत्रापासून दूर राहीले आणि आनंद यासाठी की माझी संवेदनशिलता त्यामुळे टिकून राहीली. त्यामागेही एक विदारक अनुभवच आहे.
एक मोठा अपघात झाला होता. त्यावेळी मी नेमकी औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात ज्याला घाटी म्हणतात तेथे एका डॉक्टरची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने आलेली होते. अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी होते. त्यांना घेऊन एका मागून एक रुग्णवाहिका येत होत्या. मृत्यूमुखी पडलेल्यांचे एकीकडे शवविच्छेदन सुरु होते. आम्ही काही पत्रकार शवागृहाच्या बाहेर चहा पीत अपघातावर गप्पा मारत उभे होतो. संध्याकाळी घरी आल्यानंतर अस्वस्थ वाटायला लागले. मृतांच्या नातेवाईकांच्या आक्रोश सुरु असताना आपण चक्क शवागृहाबाहेर उभे राहून चहा पित होतो याची लाज वाटली. त्याच वेळी क्राईम बीट शक्यतो आपण बघायचे नाही हे मनोमन ठरवून टाकले. गुन्हेगारीविषयक बातम्या देताना रोजच गुन्हेगारांशी, पोलिस ठाण्याशी संबंध येतो. तेथील वातावरणाची सवय होऊन आपणही आपली संवेदनशिलता हरवून बसतो. माझ्या चांगल्या पत्रकार मित्रांची मी माफी मागून सांगते हे बीट बघताना आपण मॅनेजर होण्याचा धोका जास्त असतो. (मॅनेजर हा खास शब्द आहे. बरेच पत्रकार पोलिस, गुन्हेगार यांच्यात समन्वयाचे काम करतात. त्याचा मोबदलाही मिळतो.)
औरंगाबाद मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे विद्यापीठ कमी वादपिठ जास्त आहे. शिक्षण विषयक बातम्यांचे संकलन करताना विद्यापीठातील बरीच प्रकरणे शोधपत्रकारितेच्या माध्यमातून बाहेर काढली. त्यातील सर्वात जास्त गाजले ते बोगस पीएचडी गाईडचे प्रकरण. पात्रता नसतानाही अनेक प्राध्यापकांना गाईडशीप बहाल करण्यात आली होती. याची कुणकुण लागली तशी त्याच्या मुळाशी जाऊन वृत्तमालिका प्रसिध्द केली. विद्यापीठाला त्याची दखल घेणे भाग पडले. चौकशी समिती नेमली गेली. चक्क ४९ प्राध्यापकांचे पीएचडी गाईडचे पद बोगस निघाले. या सर्वांची गाईडशिप काढून घेण्यात आली. माझ्या कारकिर्दीतील हे प्रकरण महत्वाचे ठरले. प्राचार्याविना चालणारी महाविद्यालये ही वृत्तमालिकाही दखल पात्र ठरली. शिक्षण संचालकांनी त्याची दखल घेऊन विद्यापीठ आणि महाविद्यालयांना नोटीसा बजावल्या होत्या. पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मला त्या वर्षी महात्मा गांधी मिशनचा मानाचा पुरस्कार मिळाला.
गावगाडा या साप्ताहिकामागची सांजीव उन्हाळे सरांची भूमिकाच ग्रामिण पत्रकारितेला न्याय देण्याची होती. एडीशन संस्कृतीमुळे मुंबईची बातमी औरंगाबादला त्याच दैनिकात वाचायला मिळत नाही. अशा परिस्थितीत ग्रामिण बातम्या आणि ते देणारे वार्ताहर यांना स्थान ते काय मिळणार? ग्रामिण भागाचे विकासाचे प्रश्न असो वा चांगल्या घटना त्या जिल्हा आवृत्त्यांमध्ये दबून जातात. ग्राामीण पत्रकारितेला स्वतंत्र स्थान देण्याच्या दृष्टीने सुरु झालेले गावगाडा साप्ताहिक औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात कमालिचे लोकप्रिय झाले. साप्ताहिकही व्यावसायिकदृष्टया यशस्वी होऊ शकते हे सिध्द झाले ते या साप्ताहिकाला मिळालेल्या चौथा स्तंभ पुरस्कारामुळे. परदेशातील कम्यूनिटी पेपरच्याधर्तीवर महानगराचा गाडा हे औरंगाबाद शहरापुरते साप्ताहिक सुरु केले. या दोन्हि साप्ताहिकांचा पाया सकारात्मक पत्रकारितेवर घालण्यात आला होता. तो यशस्वी ठरला.
वृत्तसंपादक म्हणून काम करताना राष्ट्रीय स्तरावरील बातम्यांचे संपादन करावे लागे. गुजरातमध्ये झालेला भूकंप, मुंबई मध्ये लोकलमध्ये झालेले बॉम्बस्फोट, त्यानंतर ताज हॉटेलसह अवघ्या मुंबईत दहशतवाद्यांनी घातलेला हैदोस, खूप पूर्वी झालेला संसदेवरील दहशतवादी हल्ला, खैरलांजी हत्याकांडानंतर औरंगाबादसह अनेक जिल्ह्यात उसळलेल्या दंगली त्यानंतरचा कफ्र्यू, दिल्लीतील निर्भया प्रकरण अनेक उदाहरणे देता येतील. अशा बातम्या देताना तारतम्य कायम राखणे वृत्तसंपादकाची जबाबदारी असते. विशेषतः दंगलीच्या बातम्या भडक होऊ न देणे आवश्यक असते. खैरलांजी हत्याकांडानंतरचा असाच एक अनुभव आहे. आम्ही देत असलेल्या बातम्या भडक वाटल्यामुळे औरंगाबादच्या तत्कालीन पोलिस आयुक्तांनी यु विल बी इन असा दम दिला होता. सांजवार्तामध्ये असताना चूकीचा फोटो छापल्या बद्दलही पोलिस केस होता होता राहीली. या घटनांनी पत्रकारितेत लेखणी चालवताना कामाचा कितीही ताण असला तरी जबाबदारीचे भान सुटू देता कामा नये याचा धडा मिळाला.
या प्रवासात महान व्यक्तींना जवळून अनुभवता आले. कवी मंगेश पाडगावकर यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने शब्दमैफल तब्बल दोन तास चालली होती. त्यांच्या सहवासातील ते दोन तास भारावलेले होते. थोर शास्त्रज्ञ अब्दूल कलाम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या निमित्ताने आले. त्यांच्या विचाराचे गारुड आजही मनावर आहे. संतूर वादक पं.शिवकुमार शर्मा, शास्त्रीय संगीत गायक नाथराव नेरळकर, शहनाई वादक उस्ताद बिस्मील्ला खान, तबला वादक उस्तार झाकीर हुसेन अशा अनेकांच्या मैफलिंचा आस्वाद बातमीदारीच्या निमित्ताने घेता आला. पत्रकारितेने माझे नाव कदाचित खूप मोठे केले नसेल, माझ्या संवेदनशिलता जपण्याच्या आणि सकारात्मक पत्रकारितेच्या हट्टाने या क्षेत्रात मला थोडे वेगळे पाडले पण त्याचे दुःख आता जाणवत नाही. कारण अभुभवातून आलेले शहाणपण त्यापेक्षा जास्त महत्वाचे वाटते.
प्रतिक्रिया
23 Sep 2015 - 3:41 pm | मोदक
"क्रमशः" लिहिले नसले तरी पुढील भागांच्या प्रतिक्षेत!!
तुम्ही 'राजधानीतून-अशोक जैन' आणि 'डायरी-प्रवीण बर्दापूरकर' ही पुस्तके वाचली असतीलच.. तशा फॉरमॅटमध्ये पुढील भाग लिहिले तरी चालतील.
23 Sep 2015 - 3:47 pm | बिपिन कार्यकर्ते
छान.
23 Sep 2015 - 4:03 pm | अजया
छानच.अजून वाचायला आवडेल.
23 Sep 2015 - 4:07 pm | बाबा योगिराज
जमेल तस अजुन ही येऊ द्या
23 Sep 2015 - 4:18 pm | खेडूत
हे आठवतंय..
ए बी पी ने सुद्धा हे लावुन धरले होते. याच सगळ्या घडामोडीच्या काळात पीएच डी न करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे लक्ष ठेवून होतो.
बाकी लेखही आवडला.
23 Sep 2015 - 4:27 pm | आनंदराव
अजुन लिहा
23 Sep 2015 - 4:35 pm | प्रचेतस
लेखन आवडले.
पत्रकारिकेतले अजूनही अनुभव वाचायला आवडतील.
23 Sep 2015 - 4:36 pm | सस्नेह
अत्यंत संवेदनशील लेखन व रोचक अनुभव.
23 Sep 2015 - 4:40 pm | द-बाहुबली
आपल्याकडून अशाच लिखाणाची अपेक्षा आहे. अजुन येउद्या...
23 Sep 2015 - 5:25 pm | मुक्त विहारि
जमल्यास अज्जून अनुभव असतील तर जरूर सांगा.
(हावरा वाचक) मुवि
23 Sep 2015 - 5:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
लेख आवडला !
अजून बरेच अनुभव क्रमशः येऊ द्या.
23 Sep 2015 - 5:55 pm | एस
सलाम!
अजून काय बोलणार! आणखी वाचायला आवडेल.
23 Sep 2015 - 10:16 pm | मनिमौ
प्रकरण कसे खणून काढले हे सविस्तर वाचायला आवडेल.बाकी तुमचे लेखन आवडले
23 Sep 2015 - 10:23 pm | पैसा
अजून लिहाल तेवढे आमची भूक वाढतच जाणार!
23 Sep 2015 - 10:43 pm | रेवती
चांगले लिहिताय. क्राईम बीट वगैरे विचारांपलिकडचे आहे.
23 Sep 2015 - 11:33 pm | बोका-ए-आझम
अजून येऊ द्या.
24 Sep 2015 - 11:41 am | पदम
अजून अनुभव येऊ द्या.
24 Sep 2015 - 12:53 pm | gogglya
कृपया लवकर लिहा...
24 Sep 2015 - 1:35 pm | रातराणी
आवडलं अनुभवकथन.
24 Sep 2015 - 1:48 pm | सौंदाळा
वरील सर्व प्रतिसादांशी सहमत.
अजुन लिहा. या लेखात बर्याच मुद्द्यांना धावता स्पर्श केलात.
आता अजुन डीट्टेलवार लिहा.
24 Sep 2015 - 2:05 pm | प्रभाकर पेठकर
संवेदनशीलता हरवते अशाच कारणासाठी चालून आलेली पोलीस सब इन्स्पेक्टरची नोकरी मी नाकारली होती. तुम्हीही संवेदनशीलता जपलीत हे अत्यंत चांगले काम केलेत. अभिनंदन.
व्यवसायाच्या मर्यादा सांभाळून अधिक लिखाण केलेत तर वाचायला नक्कीच आवडेल.
24 Sep 2015 - 3:38 pm | अंतरा आनंद
एका संवेदनाहीनतेकडे वाटचाल चालू असलेल्या क्षेत्रात वीस वर्षं काढून संवेदनाशीलता जपणे हे हरोखर कौतुकास्पद आहे. तुमच्या दुष्काळावरिल लेखमालेवरुन कळतं की तुम्ही नुसत्याच संवेदनाशील नाहेत तर तर तिच्याशी इमान राखणारं काम करताय.
24 Sep 2015 - 7:56 pm | मधुरा देशपांडे
छान अनुभवकथन. अजुन वाचायला आवडेल.
26 Sep 2015 - 1:30 pm | प्रकाश घाटपांडे
या पुर्वी प्रसन्न केसकरांची लेखमाला आठवली http://www.misalpav.com/node/8410
26 Sep 2015 - 11:45 pm | निनाद मुक्काम प...
और आने दो
क्रमशः असायला हवे होते