माझी पत्रकारिता : पाडगावकरी शब्द मैफल
फेब्रुवारी २०१३ मधील पंधरा सोळा तारिख असेल. रात्रीचे सात साडेसात झालेले. दुसऱ्या दिवशी विकली ऑफ असल्याने आज कुठल्याही परिस्थितीत साडेनऊपर्यंत कार्यालयाच्या बाहेर पडायचेच असे ठरवून संगणकासमोर नेहमीप्रमाणे तबला बडवणे सुरु झाले. (पत्रकारितेत की बोर्डला तबला म्हणतो आम्ही पत्रकार). हातावर बऱ्याच बातम्या असल्याने आज तरी ब्युरो चिफने ऐनवेळी नवी असाईनमेन्ट देऊ नये अशी मनोमन प्रार्थना करत होते. तेव्हढ्यात ब्युरो चिफने हाक मारलीच. चरफडत त्याच्या टेबलपाशी गेले. जवळच्याच एका हॉटेलमध्ये कविवर्य मंगेश पाडगावकर उतरले आहेत. त्यांचा पत्रकारांशी वार्तालाप आहे ताबडतोब निघ. रात्री सातसाडेसात वाजता असे फर्मान सुटताच कोणताही रिपोर्टर प्रथम मनातल्या मनात चरफडतो. माझेही अनेकदा असेच झालेले पण त्या दिवशी मात्र ब्युरो चिफला थॅक्यू थॅक्यू सर असे म्हणत पटकन नोटपॅड उचलले आणि दुचाकीकडे धावले.
मंगेश पाडगावकर उतरलेल्या हॉटेलचा दहा मिनीटांचा रस्ताही खूप मोठा वाटू लागलेला.ऐनवेळी मिळालेली असाईनमेंट, त्यांना जाऊन काय बोलायचे? कुठले प्रश्न विचारायचे याचे विचार मनात घोळत होते. हॉटेलवर पोहचले. समोर आणखी एक पत्रकार हजर. पुन्हा चरफडले. एसक्लूझिव्ह मुलाखतीची संधी हुकली होती. दोघांचीही मनःस्थिती सारखीच झालेली. आदयुक्त भितीने कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या हॉटेल रुममध्ये प्रवेश केला. या या पत्रकारांची भेट म्हणजे मोठे भाग्यच असे हसत स्वागत झाले . त्यानंतर पाडगावकरी शब्दमैफलीत असे काही रंगलो की दोन तास केव्हा सरले कळलेही नाही.
पाडगावकरांशी झालेला संवाद (खरं तर तो संवाद नव्हताच आम्ही फक्त श्रवणभक्ती केली) स्वतःच्या शब्दात लिहणे माझ्याच्याने तरी शक्य नाही. त्यामुळे त्यांच्याच शब्दात या लेखाचा पुढचा भाग.
वा.लं.चा राग....
. अहो, परवा मी एका मिलिंद नावाच्या मुलावर भडकलो. त्याने त्याच्या नावातले ‘ली’ दीर्घ लिहिले होते हो! मराठी भाषा जाऊ द्या हो, पण स्वत:ची नावेतरी शुद्ध लिहिता आली पाहिजेत. मी वा. ल. कुलकण्र्यांचा विद्यार्थी. ते शुद्ध मराठीबाबत अतिशय आग्रही. १४-१५ वर्षांचा असताना मला कसले तरी बक्षीस मिळाले. पैशांऐवजी पुस्तक बक्षीस द्यायचं ठरलं. मी कागदावर नाव लिहून दिलं. फडक्यांचं ‘प्रतिभासाधन’ हे पुस्तक मागितलं. तो कागद देताच वा. लं.नी वाचून त्याचा बोळा करून माझ्या अंगावर फेकला. मी त्यात ना. सी. फडक्यांमधलं ‘सी’ Nहास्व लिहिलं होतं. ते म्हणाले, तुला नाव शुद्ध लिहिता येत नाही? त्यानंतर मी नाही चुकलो. मराठी हा भाषेचा नाही तर भावनेचा प्रश्न आहे. माझी मातृभाषा आहे ती. इंग्रजी जगाची वगैरे भाषा असो, पण जोपर्यंत तुम्ही पाळण्यातील बाळाचा ‘किस’ न घेता ‘पापा’ घ्याल तोपर्यंत मराठीला मरण नाही! मराठी भाषा टिकणारच. कारण ती समाजाची भाषा आहे. पण मराठीचे पावित्र्य सर्वांनीच राखायला हवे.
विशाखातील कविता तोंडपाठ..
आजकाल लोक वाचत नाहीत हो. कवीही वाचत नाहीत. आम्ही त्या काळी प्रेमाने कविता वाचायचो. कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’मधल्या जवळपास सगळय़ा कविता अशा तोंडावर असायच्या माझ्या. अभ्यास म्हणून सकाळी उठून पाठ नाही करीत बसलो. अहो, मी एका विद्यापीठात निवड समितीवर होतो. एका उमेदवाराला विचारले, कुसुमाग्रजांचं कोणतं पुस्तक वाचलंय? तर म्हणाला, ‘गर्जा जयजयकार’! म्हटलं, ती एका पुस्तकातील कविता आहे. त्यावर तो म्हणाला,‘काय असेल काहीतरी. मी फक्त कविता वाचतो. पुस्तकाचं नाव थोडेच वाचतो?’ आता बोला!
तु अशी जवळी रहा....
मला माझ्या सगळय़ाच कविता आवडतात. अमुक एक असं कसं सांगणार? कारण ‘शुक्रतारा’ आणि ‘सलाम’ या अगदी भिन्न प्रकृतीच्या कविता आहेत. पण मला ‘शुक्रतारा’ खूप आवडते श्रीनिवास खळय़ांनी काय सुंदर चाल दिलीय. ‘वाकला फांदीपरी फुलांनी जीव हा, तू अशी जवळी राहा’ ही त्यातली काय सुंदर ओळ आहे! मला माझ्या कुठल्याच गाण्यानं ते साकार होत असताना त्रास दिला नाही. खरं सांगायचं तर माझ्या गाण्यानं इतरांनाच फार त्रास होतो!
साहित्य संमेलनापासून दूर
मी साहित्य संमेलनांना फारसा जात नाही. दोनदाच गेलेलो आहे. एकदा कुसुमाग्रज अध्यक्ष असताना गेलो होतो. विश्व साहित्य संमेलन वगैरे ठीक आहे. यानिमित्तानं त्या त्या देशातील मराठी माणसं एकत्र येतात, आपल्या आवडत्या लेखकाला भेटतात, ऐकतात. आपल्याकडे त्यात नवं नाही, पण त्यांना त्यांचं खूप कौतुक असतं.
अखेरची वही
सध्या बालकवींवर एक पुस्तक लिहायला घेतलंय. रजिस्टरची १२८ पानं लिहून झाली आहेत. मोठं पुस्तक होणार आहे ते! आणि हो, एक कवितांचं पुस्तक छापायला जातंय. नाऊ आय अँम ८४ इयर्स ओल्ड. आता लिहिणं होईल की नाही सांगता येत नाही. म्हणून त्या संग्रहाचं नाव ठेवलंय ‘अखेरची वही’. पण शंकर वैद्य मला म्हणाले, ‘पाडगावकर, तुम्ही कविता लिहीतच राहणार हो. तुम्ही पुस्तकाचं नाव ‘अखेरची वही भाग १’ असं ठेवा!’
समोरचा महान कवी दिलखुलासपण स्वतःच स्वतःची गुपितही फोडत होता. कधी भूतकाळात रमत होता तर कधी वर्तमानकाळातील मराठीची काळजी करत होता. आम्ही मात्र निःशब्द होतो. फक्त ऐकत होतो. कार्यालयातील तबल्याची आणि दुसऱ्या दिवशीच्या सुटीचे विचार कुठल्या कुठे विरुन गेले होते. अशी संधी पुन्हा नाही. पाडगावकर पुस्तकातून पुन्हा पुन्हा भेटत राहतील पण प्रत्यक्षात अशी संधी क्वचित मिळणार हे माहित असल्याने प्रत्येक शब्द कानात, मनातून Nहदयात साठवत होतो. ती शब्दमैफल संपल्यानंतर भानावर यायला काही वेळ गेला. नोटपॅडवरच पाडगावकरांची स्वाक्षरी घेतली आणि निघालो. आजही त्या मैफलीची झिंग उतलेली नाही. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर
अपुल्या हाती नसते काही हे समजावे
कुणी दिले जर हात आपुले, हाती घ्यावे
कधीच नसतो मातीवरती हक्क आपुला
पाण्याने जर लळा लाविला, रुजून यावे
भिरभिरणाNया फूलपाखरा नसे नकाशा
विसावले जर, ओंजळीचे तर फूल करावे
नको याचना जीव जडवुनी बरसातीची
मेघच जर जाहले अनावर, भिजून घ्यावे
नकोच मनधरणी अर्थाची, नको आर्जवे
शब्दांनी जर मिठी घातली, गाणे गावे
प्रतिक्रिया
9 Oct 2015 - 3:13 pm | एस
वा! शब्दमैफल आवडली.
9 Oct 2015 - 3:14 pm | जगप्रवासी
वाह छान, नशीबवान आहात
9 Oct 2015 - 4:19 pm | बाबा योगिराज
चांगला अनुभव आहे. अजुन येऊ द्या.
पुढील लिखानासाठी शुभेच्छा.
9 Oct 2015 - 4:27 pm | नाखु
कृष्ण धवल जमान्यात सह्याद्रीने एकदा बापट-पाडगांवकर अदींचा करेक्रम प्रसारीत केला होता त्यात काही गीतांची जन्मकहाणीही विशद केली होती.
चांगला अनुभव. आणि पत्रकारीते बरोबर रसिकताही असल्याने तुम्हाला ही भेट जास्त भावल असणार.
पुलेशू.
9 Oct 2015 - 5:33 pm | चांदणे संदीप
मी कविवर्य मंगेश पाडगावकरांचा निस्सीम चाहता असल्याने, ही तुमची भेट अगदी, मी तिथे तुमच्या सोबत बसून अनुभवल्यासारखी वाटली!
खूप खूप धन्यवाद, तुमचा अनुभव इथे शेअर केल्याबद्दल! :)
Sandy
9 Oct 2015 - 5:46 pm | मित्रहो
छान अनुभव
पाडगावकरांसोबत गप्पा मारीत त्यांच्या कविता आणि इतर गोष्टींविषयी जाणून घेणे. वॉ आयुष्यभर लक्षात राहण्याजोगा अनुभव.
9 Oct 2015 - 8:45 pm | सानिकास्वप्निल
वाह!! सुरेख लिहिले आहे, खूप आवडले.
खरचं नशीबवान आहात.
पुलेशु
9 Oct 2015 - 9:23 pm | टवाळ कार्टा
व्वा
10 Oct 2015 - 9:15 am | बोका-ए-आझम
पाडगावकर _/\_
10 Oct 2015 - 10:44 am | अजया
सुरेख शब्दानुभव!
12 Oct 2015 - 1:08 am | दिवाकर कुलकर्णी
काही दिवसापूर्वी म्हणजे तसं अलिकडेच कोल्हापूर ला त्यांची एक मुलाखत ऐकली , त्याना
आता ऐकू खूपच कमी येतं त्या साठी एक मदतनीस ठेवला होता पण त्यांची मुलाखत,
क्किस्से ,काव्य वाचन अविस्मरणीय झाले,
त्यागी पुलंचा (आपण त्याला पी एल म्हणायचो, बोलले) एक क़िस्सा सांगीतला ,तो नंतर सांगेन
12 Oct 2015 - 12:04 pm | दिवाकर कुलकर्णी
कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी
मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी
संजीवनी मराठे
पाटगावकरजीनाहि कविता कशा स्फुरत असतील नं
12 Oct 2015 - 2:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
अश्या अनुभवांची शिदोरी आयुश्यभर पुरते ! नशीबवान आहात.
12 Oct 2015 - 2:29 pm | दमामि
वा!
12 Oct 2015 - 6:07 pm | आनंदराव
क्या बात है !
सम्रुद्ध आयुष्य म्हणतात ते हेच नाही का?
12 Oct 2015 - 6:43 pm | शुचि
वा! फारच सुंदर वर्णन केलत. वाचताना, हरवुन गेले.