श्रीगणेश लेखमाला ५ : माझी पत्रकारिता

pradnya deshpande's picture
pradnya deshpande in जनातलं, मनातलं
22 Sep 2015 - 12:04 am

माझी पत्रकारिता

राष्ट्रीय वाहिनीवरील सलमा सुलतान, मराठी दूरदर्शनवरील प्रदीप भिडे, स्मिता तळवलकर, ज्योस्त्ना किरपेकर, नलिनी सिंग यांच्यानंतर ९०च्या दशकातील बरखा दत्तपर्यंत तमाम पत्रकारांचे आणि वृत्तनिवेदकांचे लहानपणापासून प्रचंड आकर्षण होते. ३१ डिसेंबरला दिल्ली दूरदर्शनवरून सादर होणारा 'अराऊंड द वर्ल्ड' कार्यक्रम असो वा साप्ताहिकी, प्रत्येक कार्यक्रम लहानपणापासून मनावर नकळत पत्रकारितेचे संस्कार घडवत होता. खांद्याला झोळी, हातात नोट पॅड आणि पेन, समोरच्या भ्रष्ट नेत्याला अडचणीत आणणारे प्रश्न विचारणारा किंवा अंडरवर्ल्डमध्ये फिरून बातम्या काढणारा फिल्मी पत्रकार पाहिला की आपणही पत्रकारच व्हायचे असे पुन्हा पुन्हा वाटायचे. स्व. प्रमोद नवलकर यांचे 'भटक्यांची भटकंती' वाचले. त्यातील त्यांच्या शोधपत्रकारितेच्या प्रेमात पडले. पत्रकार होण्यासाठी काय करावे लागेल, कोणता अभ्यासक्रम निवडावा लागेल याची काहीही माहिती नसताना मी पत्रकारच होणार असे ठामपणे सांगू लागले.

१९८६-८७चा तो काळ होता. खरे तर पंधरा-सोळा वर्षाचे ते वय होते. आतासारखे इंटरनेट, ज्ञान देणार्‍या भरमसाठ टी.व्ही. वाहिन्या नव्हत्या. पुस्तके आणि वर्तमानपत्रे ही दोनच माध्यमे जगाशी जोडत होती. अधाशीपणे त्यावर तुटून पडायचे. मुंबईहून निघणारा महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया नांदेड येथे एक दिवस उशिरा यायचा. घरी चक्क संध्याकाळी पेपर टाकला जायचा. वडील केव्हा पेपर खाली ठेवतात आणि तो आपल्याला वाचायला मिळतो याची घाई व्हायची. नुकतीच दहावी झाली आणि पुढे काय करायचे ते वडिलांनी विचारले. क्षणाचाही विलंब न लावता मी मला पत्रकार व्हायचे आहे असे सांगून टाकले. काळाचा महिमा बघता अस्मादिकांना पत्रकारितेत पडायची संधी मिळणार नव्हतीच. "आधी बी.ए. पूर्ण कर" असा वडिलांनी हूकूम सोडल्याने निमूटपणे पदवीला प्रवेश घेतला.

पत्रकारितेचा किडा डोक्यात होताच. दरम्यान साहित्याचीही गोडी लागली होती. त्यामुळे बी.ए.नंतर एम.ए. पूर्ण केले. आता मात्र मनातील चलबिचल वाढली होती. लेखणी चालवायची हौस कॉलेजच्या मासिकांमध्ये पूर्ण करत होतेच. एम.ए.ला असताना नांदेड येथील प्रसिद्ध दैनिक 'गोदातीर समाचार'मध्ये स्तंभलेखकाची जागा आहे असे कळले. वडिलांच्या एका मित्रानेच ही माहिती दिली असल्याने "बघ जमते का" म्हणत त्यांनी परवानगी दिली आणि वृत्तपत्र क्षेत्रात चंचुप्रवेश झाला. वेध या सदराखाली दररोज दोनशे शब्दांचा एक कॉलम लिहावा लागत असे. त्यासाठी महिन्याला पगार मिळे चारशे रुपये. वडील प्राध्यापक होते. आपल्या मुलीनेही प्राध्यापक व्हावे असे त्यांना वाटे. त्यांनी बी.एड. करण्यासाठी मला प्रवृत्त केले. सकाळी ९ ते १२ नोकरी, त्यानंतर साडेबारा ते पाच बी.एड. कॉलेज असा दिनक्रम सुरू झाला. बी.एड. केल्यानंतर माझे पत्रकारितेचे वेड कमी होईल असे वडिलांना वाटले असावे. पत्रकार होणे हे शाळकरी वयात बघितलेल्या स्वप्नाएवढे सोपे नाही, हे तोपर्यंत समजले होते.

१९९६ साल उजाडले. नावापुढे सौ.ची उपाधी लावून औरंगाबादेत आले. नव्याने नोकरी शोधण्यास सुरुवात झाली. तोपर्यंत शिक्षणाचा बाजार जोरात सुरू झाला होता. आपण एवढे श्रीमंत नाही त्यामुळे पत्रकारिताच बरी, असे वाटत होते. त्याच दरम्यान ज्येष्ठ आणि मान्यवर पत्रकार निखिल वागळे यांनी औरंगाबाद येथून त्यांचे 'आपलं महानगर' हे दैनिक सुरू केले. अनुभव गाठीशी असल्याने उपसंपादकपदावर सहज नेमणूक झाली. या वेळी पगार चक्क तीनशे रुपयांनी वाढला होता. सातशे रुपयातही खूश होते, कारण मी आता खर्‍या अर्थाने पत्रकार झाले होते. महानगर दोन वर्षात बंद पडले, तरी पत्रकारितेतील खाचाखोचा माहीत झाल्या होत्या. औरंगाबादेत नव्याने सुरू झालेल्या 'सांजवार्ता'त रुजू झाले. उपसंपादकापासून वृत्तसंपादकापर्यंतची जबाबदारी पार पाडताना पत्रकारितेत बीट म्हणजे काय येथपासून ते बातमीचे संपादन, मुख्य मथळ्याची बातमी, पानाचे लेआऊट, विशेष पुरवण्या, दिवाळी अंक, जाहिरात अंक अशा एक एक पायर्‍या सर केल्या. नव्याने सुरू झालेल्या या दैनिकाला एका उंचीवर नेऊन ठेवल्याचे समाधान तर मिळत होतेच, त्याचबरोबर माझ्या पत्रकारितेलाही नवे धुमारे फुटत होते.

आजची पत्रकारिता खरे तर वेगवेगळ्या बिटांमध्ये बांधली गेलेली. बीट म्हणजे एक क्षेत्र. शिक्षण, ग्रामीण, शेती, गुन्हेगारी, महापालिका, जिल्हा परिषद.. प्रत्येक क्षेत्राचे एक बीट आणि तो बीट बघणारा एक पत्रकार. मला बिटकरी पत्रकार व्हायचे नव्हते. त्यातच ज्या काळात मी पत्रकारितेच्या क्षेत्रात औरंगाबादेत काम करत होते, त्या वेळी फक्त एक-दोन मुलीच या क्षेत्रात होत्या, त्याही ऑफिसमध्ये बसून टेबलवर काम करणार्‍या. प्रत्यक्ष फील्डवर जाऊन वार्तासंकलन करणे ही पुरुष पत्रकारांचीच मक्तेदारी होती. आजही ती काही प्रमाणात आहे. हे आव्हान स्वीकारले. स्पेशल फीचरसाठी फील्डवर जाणे सुरू केले, तसे पुरुष पत्रकारांनाही सुरुवातीला आश्चर्य वाटले, पण नंतर त्यांनी माझे फील्डमध्ये येणे स्वीकारले. 'गावगाडा' आणि 'महानगराचा गाडा' ही दोन साप्ताहिके माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतील 'माईलस्टोन' ठरली. औरंगाबादेतील ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी ही साप्ताहिके सुरू केली आणि त्यांची पूर्ण जबाबदारी माझ्यावर टाकली. 'गावगाडा'च्या निमित्ताने ग्रामीण पत्रकारितेचे धडे मिळाले. संपूर्ण मराठवाड्याचे ग्रामीण विश्व जवळून बघता आले. औरंगाबाद शहराचे चांगलेपण आणि येथील माणसाचे चांगुलपण टिपण्याचा प्रयत्न 'महानगराचा गाडा'मधून केला. नकारात्मक पत्रकारितेच्या काळात सकारात्मक पत्रकारितेचा केलेला प्रयोग खर्‍या अर्थाने समाधान देऊन गेला.

माझ्या पत्रकारितेला पैलू पाडण्याचे काम केले ते ज्येष्ठ पत्रकार विद्याभाऊ सदावर्ते यांनी, 'सांजवार्ता'मध्ये असताना त्यांनी फोटो एडिटिंगपासून ते फीचर रायटिंगपर्यंत सगळ्यांची मांडणी कशी करायची ते शिकवले. संजीव उन्हाळे यांनी माझी पत्रकारिता अधिक पॉलिश्ड केली. शोधपत्रकारिता आणि विविध संदर्भ देत बातमी, लेख कसे लिहायचे, संपादन कसे करायचे याचे ज्ञान मला त्यांच्याकडे मिळाले. या दोघांमुळे खरे तर मला पत्रकारितेची पदवी घेण्याचीही गरज पडली नाही. पदवी असावी म्हणून एकदा विद्यापीठात जर्नालिझमला प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा "तुम्हाला पंधरा वर्षांचा अनुभव असताना पदवीची गरज काय?" असा प्रश्न प्राध्यापकांनी विचारला. त्यानंतर पत्रकारितेची पदवी घेण्याचा विचार सोडून दिला.

अलीकडची काही वर्षे महाराष्ट्रातील अग्रगण्य 'दैनिक लोकमत'मधील अनुभव खर्‍या अर्थाने समृद्ध करून गेले. लोकमतमध्ये विविध विषयांचे वार्तांकन करण्याची संधी मिळाली. महिला पत्रकार म्हटली की तिच्याकडे हमखास महिलाविषयक बातम्यांचे संकलन करण्याचे काम देण्यात येत असे. लोकमतमध्ये सुखद धक्का मिळाला. उद्योग, शिक्षण यासारखे महत्त्वाचे विषय सोपवण्यात आल्याने पुन्हा एकदा या क्षेत्रातील पुरुषांच्या भुवया उंचावल्या. लोकमतने पत्रकारितेतले सुख दिले. बायलाईन बातमी हा प्रत्येक पत्रकाराच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो. लोकमतमध्ये अनेक बायलाईन बातम्या प्रकाशित झाल्या. प्रत्येक वेळी वृत्तपत्रातील आपल्याच नावावरून हळुवार बोट फिरवताना लहानपणी उच्चारलेले "मी पत्रकार होणार" हे शब्द आठवतात. मागच्या वर्षी माझ्या वडिलांनी माझ्या लेखांची व बातम्यांच्या कात्रणांची फाईल सजवून मला भेट दिली, तो दिवस माझ्यासाठी बायलाईन बातमीपेक्षाही जास्त समाधान देणारा होता.

समाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

22 Sep 2015 - 12:09 am | जव्हेरगंज

लेखन आवडले....!!!

बोका-ए-आझम's picture

22 Sep 2015 - 12:28 am | बोका-ए-आझम

बायलाईनचं सुख प्रिंट मिडियामधल्या पत्रकाराशिवाय कुणाला समजणार? जशी नटाची खरी कसोटी नाटकात लागते, तशी पत्रकाराची खरी कसोटी वर्तमानपत्रे किंवा नियतकालिके यात लागते. आवडला लेख. पण थोडे अनुभव अजून असते तर बरं झालं असतं.

अगदी खर बोललात,बायलाईन येण परमोच्च सुख त्याला स्वर्ग अगदी २ बोट उरतो.

लेखन आवडले. तुमच्या आवडत्या क्षेत्रात काम करतानाचे समाधान लेखातून व्यक्त होत आहे.

छान लेख. विवाहानंतरही तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रात उडी घेतली आणि उत्तुंग यश मिळवलं. प्रेरणादायक लेख. या क्षेत्रातील अनुभवांवर सविस्तर लिहावे अशी विनंती.

सौंदाळा's picture

22 Sep 2015 - 10:21 am | सौंदाळा

+१

चित्रगुप्त's picture

22 Sep 2015 - 6:38 am | चित्रगुप्त

लेख आवडला. तुमच्या विषयाबद्दल आणखी सखोल माहिती देणारे आणखी लेख अवश्य लिहावेत.

लेख आवडला. पण या लेखनासाठी शब्दमर्यादा नसतानाही हात आखडता का बरं घेतला ?

छान लेख
अनुभव विश्वात रस वाटत होता.
फारच आखडता हात घेतलात तुम्ही.
कधी तरी विस्ताराने लिहा
धन्यवाद

सिरुसेरि's picture

22 Sep 2015 - 8:35 am | सिरुसेरि

+१. दुष्काळाबद्दल माहिती देणारे आपले लेख खुप सविस्तर , माहितीपुर्ण होते. या लेखातही आपले पत्रकारितेतले अनुभव , मते अधिक सविस्तरपणे वाचायला आवडले असते .

नाखु's picture

22 Sep 2015 - 9:26 am | नाखु

पण बातमी मागची बातमी,एखाद्या संवेदन्शील बातमी बाबतचा किस्सा (अर्थात चालू नोकरीवर परीणाम करणार नाही असाच ) वाचकाना सांगीतलात तर आवडेल.

सोन्याबापूंनी मिपाकरांना अ‍ॅकेडमीत घुमवले तसं तुम्ही पत्रीकरीतेच्या जगात न्यावे ही मागणी.

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Sep 2015 - 9:31 am | ज्ञानोबाचे पैजार

हा पाचवा मोदकही स्वादिष्ट असला तरी फारच छोटा होता.

या क्षेत्राबद्दल अजून माहिती मिळाली तर वाचायला नक्की आवडेल.

(बातमी मागची बातमी आवडीने वाचणारा) पैजारबुवा,

लेख आवडला.बायलाईन म्हणजे काय?

संपादकांनी बायलाईन म्हणजे काय विचारल्यावर पत्रकारांनी काय उत्तर द्यावे? ;)

मुक्त विहारि's picture

22 Sep 2015 - 10:16 am | मुक्त विहारि

पण

बराच त्रोटक वाटला.बहूदा वेळेची कमतरता असावी.

जमल्यास कधी तरी सविस्तर लेख लिहिलात तर उत्तम.

(अज्ञानी) मुवि

चाणक्य's picture

22 Sep 2015 - 10:21 am | चाणक्य

लहानपणीच आपला कल कळणं किंवा आपल्याला मोठं होऊन काय करायचंय हे कळणं फार महत्त्वाचं. मला तर तुमच्यासारख्या लोकांचा हेवाच वाटतो.

विजुभाऊ's picture

22 Sep 2015 - 10:35 am | विजुभाऊ

सुंदर लेख.
जरा सविस्तर लिहा की. रीपोर्टर म्हणून तुम्हाला माणसांचे विवीध अनुभव आले असतील. तुमचे कार्यविश्व सम्रुद्ध आहे. सर्व सामान्याम्च्या नजरेतून बघताना आणि रीपोर्टर च्या नजरेतुन बघताना त्यात बराच फरक असतो.
असे अनुभव वाचायला आवडेल

वेल्लाभट's picture

22 Sep 2015 - 10:36 am | वेल्लाभट

लिखाण उत्तम पण अजून खूप रंजक अनुभव तुमच्या गाठीशी नक्कीच असणार. कधीतरी तेही लिहा निवांत. वाचायला आवडेल. हे क्षेत्र जितकं रोचक तितकंच खडतर आहे, त्यामुळे, तुमच्या यशाबद्दल तुमचं मनापासून कौतुक !

चौथा कोनाडा's picture

22 Sep 2015 - 10:38 am | चौथा कोनाडा

सर्वांग सुंदर लेख !
"पत्रकार व्हायचे आहे" ते प्रत्यक्ष पत्रकारी यातला अवघड प्रवास आवडला.
बायलाईन म्हंजे काय हे मीही विचारणार होतो !

पत्रकारीतेतल्या जगातल्या थरारक गोष्टी वाचण्यास आमच्या सारखे मिपाकर ( विशेषत : नॉन-पत्रकारीता वाले) आतुर आहेत, तेंव्हा, आणखी लेखांचे स्वागतच होइल.

मित्रहो's picture

22 Sep 2015 - 11:45 am | मित्रहो

लग्न झाल्यानंतरही तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम केले .
तुमचे लेख असेच येऊ द्या.

पैसा's picture

22 Sep 2015 - 12:20 pm | पैसा

लेख आवडला. तुमच्या आवडीच्या आणि कामाच्या क्षेत्राबद्दल अजून लिहा!

अनोखी कहाणी आहे पत्रकारितेची.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Sep 2015 - 12:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! पत्रकारीतेत इतके सुयश मिळवलेली सभासद मिपाकरांत आहे हे वाचून आनंद आणि अभिमान वाटला ! तुमच्या भविष्यातल्या उत्तम वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा ! तुमच्या अनुभवांबद्दल विस्ताराने वाचायला आवडेल.

कर्मक्षेत्र या केंद्रकाभोवती गुंफलेल्या गणेशलेखमालेच्या या आवृत्तीमुळे ज्यांच्याबद्दल अगदीच अनभिज्ञ आहोत किंवा जुजुबी माहिती आहे अश्या एकाहून एक अनुभवी आणि कर्तबगार मिपाकर रत्नांची माहिती मिळत आहे !

सुबोध खरे's picture

22 Sep 2015 - 1:03 pm | सुबोध खरे

+१

रुस्तम's picture

22 Sep 2015 - 2:08 pm | रुस्तम

+१ सहमत

बाबा योगिराज's picture

22 Sep 2015 - 12:55 pm | बाबा योगिराज

लेख खरच चांगला आहे. अजुन थोडा मोठा असायला हवा होता. प्रत्यक्षात फिल्ड वर जाऊन काम करण्याचा अनुभव आहे तुम्हाला.त्या अनुभवाच्या पोतडीतून अजुन काही हिरे मोती येऊ द्या.
पुढील लिखानासाठी शुभेच्छा.

प्यारे१'s picture

22 Sep 2015 - 12:57 pm | प्यारे१

+१

राही's picture

22 Sep 2015 - 1:14 pm | राही

लेख आवडला पण आणखी बरेच काही लिहिता आले असते. या क्षेत्रात बरेच काही टेबलाखाली, रंजक, रोमांचक, चित्तथरारक असे घडत असते. मोठ्यांचे छोटे अनुभव, छोट्यांचे मोठे अनुभव हे नेहमीचेच. व्यवसायाला धोका न पोहोचवता यावर लिहिता आले असते.
ता. क. बाय लाइन म्हणजे बातमीदाराच्या नावानिशी छापली गेलेली बातमी अथवा स्फुट. हा मोठाच सन्मान असतो कारण बहुतेक वेळा 'आमच्या बातमीदाराकडून' किंवा 'विश्वसनीय सूत्रांकडून' असे म्हणण्याची पद्धत असते. एक कारण असेही असते की गौप्यस्फोटात्मक शोधपत्रकारितेत बातमीदाराच्या जिवाला धोका असू शकतो, त्यापासून त्याला वाचवणे. पण इतर वेळी सररास नाव लिहिले जात नाही. छोट्या पत्रकारांना तो प्रिविलेज नसतो.

अजया's picture

22 Sep 2015 - 2:34 pm | अजया

धन्यवाद!

प्रभाकर पेठकर's picture

22 Sep 2015 - 2:55 pm | प्रभाकर पेठकर

??

एस's picture

22 Sep 2015 - 4:25 pm | एस

अजया - Tue, 22/09/2015 - 09:34
लेख आवडला.बायलाईन म्हणजे काय?

ह्या प्रश्नाचे उत्तर राहीताईंनी दिल्यामुळे अजयाताईंनी त्यांचे आभार मानले आहेत.

प्रभाकर पेठकर's picture

22 Sep 2015 - 7:52 pm | प्रभाकर पेठकर

ओके. संभ्रम दूर झाला. धन्यवाद.

अनुप ढेरे's picture

22 Sep 2015 - 1:47 pm | अनुप ढेरे

लेख आवडला.

पद्मावति's picture

22 Sep 2015 - 1:51 pm | पद्मावति

सुंदर लेख.
लहान पणापासून एका क्षेत्रात काम करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेऊन मेहेनत करणे आणि जिद्दीने ते स्वप्न साकारणे ही फार मोठी गोष्ट आहे. ती तुम्ही करून दाखविली त्याबदद्ल तुमचे अभिनंदन. तुमचे अनुभव इतक्या छान शैलीत आमच्या बरोबर शेअर केल्याबद्दल आभार.

पिशी अबोली's picture

22 Sep 2015 - 7:23 pm | पिशी अबोली

+१
असंच म्हणते.

प्रभाकर पेठकर's picture

22 Sep 2015 - 2:03 pm | प्रभाकर पेठकर

'बायलाईन' म्हणजे काय हा प्रश्न मलाही पडला होता. राही ह्यांनी तो सोडवला.
लेखन त्रोटक पण खुप छान आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यात खरेतर चॅलेंज आहेच आणि कदाचित त्यामुळेच यश मिळाल्याचे समाधान कितीतरी जास्त असते. पुरुषांची मक्तेदारी, पुरुषांच्या भुवया उंचावणे हे व्यावसायिक प्रगतीतील अडथळे न मानता आव्हान म्हणून स्विकारावे (तसे तुम्ही स्विकारले आहेच) त्याने यशाचा आनंद द्विगुणित होतो.

छान लेख.अजून या क्षेत्रातले तुमचे अनुभव जरुर लिहा.
बाकि
मलाहि बायलाइन माहित न्हवते.धन्यवाद राहि.

शंतनु _०३१'s picture

22 Sep 2015 - 5:56 pm | शंतनु _०३१

लेख आवडला, पुलेशु

सानिकास्वप्निल's picture

22 Sep 2015 - 6:20 pm | सानिकास्वप्निल

लेख आवडला, ह्या क्षेत्राबद्दल आणखी माहिती पुढे नक्की द्या, वाचायला आवडेल :)

pradnya deshpande's picture

22 Sep 2015 - 8:08 pm | pradnya deshpande

स्वतः विषयी लिहण्याची सवय नसल्यामुळे कदाचित लिखाण मयाादीत आहे. पण आता नक्की अधिक लिहणार.

प्रभाकर पेठकर's picture

22 Sep 2015 - 8:21 pm | प्रभाकर पेठकर

व्यवसाय क्षेत्रात आपलेच ब्युगल आपणच वाजवावे लागते. इंग्रजीत वाक्प्रचार आहे 'Blowing your own trumpet.' तेंव्हा संकोच बाळगू नये.

लेख चांगलाच त्रोटक वाटला. पत्रकारितेतले शैक्षणिक टप्पे अधिक चांगल्या तर्‍हेने व्यक्त झाले असते तर बरं झालं असतं, असं वाटलं....

त्यांनी ऐनवेळी, एका दिवसाच्या डेडलाईनवर लेख लिहून दिला. त्यामुळे थोडासा त्रोटक वाटत असावा. नंतरही त्या लिहितीलच.

@देशपांडेमॅडम, उत्स्फूर्तपणे लेख दिल्याबद्दल आभार.

सस्नेह's picture

23 Sep 2015 - 2:54 pm | सस्नेह

उस्फूर्त लेख आहे हे खरेच. त्यामानाने चांगलेच लिहिले आहे.
प्रज्ञाताई खुलासा करतीलच असे वाटते.

रातराणी's picture

23 Sep 2015 - 12:49 am | रातराणी

आवडला तुमचा प्रवास! अजून वाचायला आवडेल :)

लाल टोपी's picture

23 Sep 2015 - 10:56 am | लाल टोपी

आवडत्या क्षेत्रात काम करायला मिळाले हे भाग्यच!

सूड's picture

23 Sep 2015 - 3:22 pm | सूड

सुंदर!!

मृत्युन्जय's picture

28 Sep 2015 - 11:59 am | मृत्युन्जय

छान लेख.अजून या क्षेत्रातले तुमचे अनुभव जरुर लिहा.