तो आला पण नेहमीप्रमाणे घुश्शातच होता …. तोंडाने नेहमीची बडबड चालली होती, हातवारे चालले होते ….
आमचं भेटायचं ठरतं नेहमी… मी वेळेवर पोचतो पण ह्याचा उशीर कायम ठरलेला…कारण ह्याचे समाजकार्य ! त्याला काहीच वेळ काळ नसतो…सदानकदा कुठेतरी वाहिलेलाच…. जिथे कुठे काही चुकीचं चाललं असेल तिथे हा बरोब्बर पोचतो …. मला नेहमी कुतूहल वाटतं ह्याचं पण त्यावर त्याचं ठरलेलं उत्तर …"अरे, सध्या वेळच अशी आहे की कुठेतरी काहीतरी चाललेलं असतंच… इतरांनी झापडं लावून घेतली आहेत , फक्त माझे डोळे उघडे असतात !"
अरे पण तू कशाला तुझा जीव धोक्यात घालतोस नाहक ?? आपण बरं आणि आपलं काम बरं….
काय बोलतोस तू ??… त्यात काय झालं ? आणि जीव बीव काही धोक्यात जात नसतो रे असा …. काही होत नाही मला …कोणीतरी आवाज उठवलाच पाहिजे नाहीतर ह्या सगळ्या हरामखोरांच फावतंय….अराजक माजवून ठेवतील हे सगळे एक दिवस…कोणीतरी आवाज उठ्वायलाच हवा रे !!
ह्याचं हे वागणं माझ्या कल्पनेपलीकडचं आहे… एक साधारण पदवीचे शिक्षण… नोकरीचा पत्ता नाही…दिसायला अतिशय सर्वसाधारण, चार चौघांसारखा पण त्याचे हे वागणे मात्र त्याला इतरांपासून वेगळे पाडते…… तसा हा रूढार्थाने मित्रही नव्हता माझा पण अशाच एका रस्त्यावरील माजोरड्या आणि आडदांड माणसाबरोबरच्या भांडणाच्या प्रसंगात त्याने मला साथ दिली आणि तो मला मनापासून भावला म्हणून मी स्वताहून त्याची ओळख करून घेतली होती आणि त्यानंतर इकडे तिकडे भेटतच राहिलो आम्ही…कधी ठरवता तर कधी न ठरवता !!
माझा स्वभाव त्याच्या बरोबर उलट …. आपल्याच सुरक्षित कोषात जगायचं… आजूबाजूला चक्क दुर्लक्ष करायचं … उद्या आपण काही कोणाला बोललो आणि त्याचा राग ठेवून कोणी आपल्या जीवावर उठलं तर???? … साधी गाडी चालवतानाही सगळे जणू काही आपल्याच मार्गात येउन आडवे पडणार असल्यासारखं वागणं… संयत आणि तोलूनमापून… त्यामुळे मला त्याचा प्रचंड हेवा वाटतो …. मी कधी होणार असा ?? छे … फार अवघड आहे बुवा !
"आता आज काय केलंस ???"
एक नीच माणूस होता रेल्वेच्या डब्यात… एक जोडपे घाईघाईने पुरुषांच्या डब्यात चढले रेल्वे सुटली म्हणून… ती मुलगी बिचारी अंग अवघडून उभी होती … तिची अवस्था बिकट होती… मुलगा असहाय्यपणे तिला जमेल तसे वाचवायचा प्रयत्न करत होता पण तो एक हरामखोर तिलाच जाऊन जाऊन नको तिथे खेटत होता तरी तो मुलगा त्याला म्हणाला की, "जरा नीट उभा राहा"… तर हा तोंड वर करून त्याला म्हणतो कसा…. अरे ए …. इतका हिरो बनायची हौस आहे तर रिक्षाने घेऊन जा न तिला …इथे कशाला चढलात? जास्त शानपना नाय करायचा !! आजूबाजूचे मक्ख नुसते मजा पाहत होते ….मुलगा रडवेला झाला होता आणि म्हणाला पण त्याला मी पोलिसात तक्रार करीन तुझी …. तसा तो माजोरडा खवळला आणि आई बहिणीच्या शिव्या द्यायला लागला तशी माझी तारच सटकली… मग हाणला साल्याला… कोणीही मध्ये पडला नाही… मी आणि त्या मुलाने त्याला पुढच्या स्टेशन वर उतरून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिला आणि विनयभंगाची तक्रार नोंदवलीये … मी साक्षीदार म्हणून नाव लिहून आलोय न माझं !!
अरे मूर्ख आहेस का तू? आता तो माणूस डूख धरणार तुझ्यावर …. आता पुढचा महिनाभर त्या रेल्वेने जाऊ नकोस….
हट …. येडा आहेस काय तू? मी त्याला कशाला घाबरू ? मी काय चुकीचं केलंय ? उलट निदान पुढच्या वेळी तोच असलं काहीतरी करण्याआधी दहा वेळा तरी विचार करेल … एवढी दहशत बसली त्याला तरी पुरे आहे…
"अरे पण एखाद दिवशी कोणी न कोणीतरी धरेल रे तुला अशाने …तेव्हा काय करशील ?? लोक किती वाईट असतात तुला माहित नाहीये अजून…"
चल रे…. ज्याने जन्माला घातलंय तोच सुरक्षेची जबाबदारीही घेतो…. कोणीतरी कधीतरी आपल्याला मारेल म्हणून रोज मुर्दाडासारखं का जगायचं? जो पहिला आवाज उठवतो तोच खरा शक्तिमान … आणि शक्ती ही मनाची हवी रे … शरीराची संपते तेव्हाच मनाची सुरु होते… मी हा असा जगतोय म्हणून मला रात्रीची शांत झोप येते कारण कुठलीही टोचणी माझ्या मनाला लागलेली नसते… मी असं करू शकलो असतो आणि तसं करू शकलो असतो हे नंतर मनात घोकण्यापेक्षा त्याच वेळी कृती करून मोकळं व्हावं सरळ !!
त्यानंतर बरेच दिवस तो मला दिसला नाही… इतकंच नव्हे तर त्याची काहीच खबरबात नव्हती म्हणून मी थोडा चिंतीत होतो. असाच एक दिवस तो मला भेटला पण त्याची पार रया गेली होती पण डोळ्यातला आत्मविश्वास तसूभरही ढळला नव्हता.
मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला विचारलं , हे काय करून घेतलंयस स्वतःच ??
तो म्हणाला …. असाच एका ठिकाणाहून रात्रीचा चाललो होतो …. रस्ता सुनसान होता… माझ्या पुढचा माणूस स्वतःची हातातली पिशवी जर जास्तच कवटाळून चालला होता इतक्यात अंधारातून ४-५ माणसं हातात चाकू सुरे घेऊन आली आणि त्यांनी त्याच्या हातातली पिशवी हिसकावून घेतली. मी ते पाहताच ओरडा आरडा करत त्याच्या दिशेने पळत गेलो त्यावर त्यांच्यातल्या एकाने माझ्या मांडीत त्याच्या हातातला चाकू खुपसला आणि म्हणाला, गप्प बस… नाहीतर तुला पण ठार मारेन. मी ऐकलं नाहीच उलट अजून जोरात ओरडलो … माझा आवाज ऐकून अजून दोघे तिघे हातात काठ्या घेऊन माझ्यासाठी धावून आले आणि खूप मोठी हाणामारी झाली…. त्यांच्यातल्या एकाला आम्ही पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले … आता तो जेलमध्ये आहे… मला त्या माणसानेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते … इतके दिवस तिथेच होतो …
अरे का असा स्वतःच्या मरणाला आमंत्रण देतो आहेस सतत? तू काय ठेका घेतलायस का सगळ्यांना वाचवायचा ??
हे बघ …. मी काही देव नाही…. पण जे डोळ्यासमोर चालेल ते बघत राहावं इतका भ्याडपण नाही… मी फार शिकलो नाहीये पण जो काही थोडाफार कायदा पोलिसांकडे सतत जाऊन माहित झालाय तो असंच सांगतो की "देशाचा कायदा कोणीही हातात घेऊ नये पण म्हणून काही त्या देशातल्या नागरिकांनी भेकड आणि भ्याड व्हावं असं नाही … तुम्ही तुमचा जीव, तुमची मालमत्ता , इतर कोणाचा जीव आणि त्याची मालमत्ता वाचवण्यासाठी जर काही कृत्य करत असाल तर तो गुन्हा नाही. उलट त्याने देशाच्या कायद्याला मदतच होते. दिसतोय न तुमच्यासमोर मोबाइल वापरत गाडी हाकणार माणूस…थुंकणारी लोकं …. शिवीगाळ करणारे नरपुंगव … निदान हटका की त्यांना … कोण थांबवत तुम्हाला ?? सततची भीती कसली आणि कशाची ?? तीही माणसंच आहेत की हाडामासाची …तिथे सीमेवर आपले जवान त्यांचा जीव धोक्यात घालून आपलं रक्षण करतायत आणि आपण देशात उघड्या डोळ्याने चाललंय ते फक्त बघायचं ? त्यांच्या समर्पणाचा आणि हौतात्म्याचा अपमान आहे हा…. पुढल्या वेळेस एकदातरी माझ्यासारखा वागून पहा… आतून एक आगळं समाधान लाभेल … पण लक्षात कोण घेतो ???
प्रतिक्रिया
10 Sep 2015 - 4:38 pm | द-बाहुबली
_/\_
10 Sep 2015 - 4:47 pm | कैलासवासी सोन्याबापु
सुंदर मांडणी आहे सिटीजन एक्टिविज्म ची
10 Sep 2015 - 4:53 pm | सोत्रि
लेखन मस्त!
असं मी स्वत: वागू शकतो का? असा विचार करून बघितला ... सामाजिक षँढ असल्याची जाणिव प्रबळ झाली :(
- (भ्याड) सोकाजी
10 Sep 2015 - 4:59 pm | कपिलमुनी
सिर सलामत तो पगडी पचास !
10 Sep 2015 - 5:06 pm | मी-सौरभ
सहमत आहे..
आपण स्वतः चुकीचे वागत नाही एवढी शिस्त तरी पाळायलाच हवी.
10 Sep 2015 - 6:58 pm | प्यारे१
+१११
बहुतेक असंच आहे.
11 Sep 2015 - 10:53 pm | माम्लेदारचा पन्खा
हे कशापायी आनि !
12 Sep 2015 - 1:02 am | प्यारे१
अहो आम्ही सुद्धा फट्टूच आहोत.
10 Sep 2015 - 5:05 pm | नाखु
छोट्या समस्या सोडवता सोडव्ता चांगला आरसा दाखवलात की !!!
लश्कर भाकरी भाजणे अनुभवी नाखुस
10 Sep 2015 - 5:17 pm | जेपी
आवडल.
पण लक्षात कोण घेत ?
10 Sep 2015 - 5:26 pm | ब़जरबट्टू
खरेय, मनस्थिती असते, पण परिस्थिती मन बदवतेच... :( ..
आणि कदाचित म्हणूनच रंग दे बसंती आवडला होता.. जब तक खुद के नीचे आग नही लगती, तब तक नही समजता. :(
10 Sep 2015 - 5:31 pm | शीतल जोशी
छान लिहिलंय, आणि पटलय सुद्धा
10 Sep 2015 - 5:31 pm | कंजूस
या एअरिआत आगावूपणा खपवून घेतला जात नाही ,पोकल बांबूचे ----- वगैरे पाट्या लावून काही होत नाही. इकडे तुडवतात हाणतात ही दहशत बसली पाहिजे.नखे काढून बसलेल्या वाघाच्या वाटेला कोणी जात नाही.
10 Sep 2015 - 6:34 pm | पद्मावति
खूप मस्तं लिहिलय. मनापासून पटलं.
10 Sep 2015 - 7:39 pm | सस्नेह
खरं आहे. खूप खंत वाटते या सामाजिक षंढतेची !
पण....
10 Sep 2015 - 7:39 pm | मित्रहो
पटलय सुद्धा
आम्ही स्वतःसाठी सुद्धा आपला जीव धोक्यात घालत नाही इतरांसाठी काय घालनार.
10 Sep 2015 - 8:16 pm | मम्बाजी सर्वज्ञ
देशाचा कायदा कोणीही हातात घेऊ नये पण म्हणून काही त्या देशातल्या नागरिकांनी भेकड आणि भ्याड व्हावं असं नाही - अगदी सत्य परिस्थिती आहे. रस्त्यावर अशा कित्येक घटना बघितल्या आणि आग नुसती मस्तकाला जाऊन पोचली. पण केलं काहीच नाही. कधी कधी वाटते 'सरळमार्गी' लोकांना खरा शाप दिला आहे देवाने. आणि त्यांची केलेली 'स्तुती' हि खरं तर चेष्टा आहे त्यांच्या असहाय्य परिस्थितीची.
10 Sep 2015 - 8:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आवडला.
10 Sep 2015 - 10:33 pm | मांत्रिक
मापं! सुंदर रे! आपण सर्वचजण या परिस्थितून कधी ना कधी जातो! त्यामुळंच कुठं तरी आतपर्यंत भिडते कथा! आवडली!
10 Sep 2015 - 10:39 pm | कविता१९७८
कथा म्हणुन आवडली पण प्रत्यक्षात आपण मदत केलेली लोक आपल्यालाच शिव्या घालतात असा जमाना आहेआजकालचा हेही तितकच खर
10 Sep 2015 - 10:40 pm | मांत्रिक
:) कधी कधी हे पण खरं!!! :)
10 Sep 2015 - 11:00 pm | जानु
आपल्या मनात अशी मदत करायचे आणि उगाच माज करणार्यांना पोकळ नाही तर भरीव फटके द्यायचे मनात सतत येतात पण त्याद्रुष्टीने शारीरिक सपोर्ट नाही. आम्ही जरा सडपातळ ना. पण मनाचा पक्केपणा कुठेही नडायला भाग पाडतो. त्या बाबत घराच्या खिडकीच्या काचा फोडुन घेतल्या आहेत. हायवेवर रिक्षावाल्याशी भांडुन शर्ट फाडुन घेतला आहे. मारही खाल्ला आहे. पण आता आमच्या अर्धांगाकडुन सक्त सुचना व ताकीद मिळाल्याने, आणि अस्मादिक बरोबरच प्रवास करीत असल्याने कुठेही नाक खुपसता येत नाही.
11 Sep 2015 - 11:51 pm | रातराणी
आवडलं!
13 Sep 2015 - 12:26 pm | एक एकटा एकटाच
चांगला लेख आहे.
लेखाबर हुकुम सगळ जमेल की नाही हे वेगळ
पण निदान प्रयत्न करून बघेन नक्की
15 Sep 2015 - 12:58 pm | तुडतुडी
एकाने आवाज उठवला कि बाकीच्यांनीही साथ द्यायला हवी . बाकीचे नुसते बघत बसतात .समाजात हा घाणेरडेपणा वाढला तर उद्या आपल्या बहिणीवर, मुलीवरही अशी वेळ येवू शकते हे आपण सोयीस्कर विसरतो . अश्या गोष्टींना विरोध करण्याची हिम्मत नसेल तर आपण हिजडे आहोत हे लक्षात घ्यावं . रिक्षाने घेवून जा म्हणणार्याला तू पैसे दे मग घेवू जातो असं उत्तर द्यायला हवं .
19 Sep 2015 - 4:05 pm | सतिश पाटील
मस्तच..
19 Sep 2015 - 7:16 pm | ज्योति अळवणी
आवडल आणि पटलसुद्धा. कधीतरी प्रयत्न केला आहे एखादी चूक थांबवायचा. पण 'मी' सारखेच जास्त भेटले. तरीही अजूनही जमेल तशी तेव्हा मदत करायचा प्रयत्न करते. असतात असेही.