बॉडीलाईन - ३

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
7 Jul 2015 - 2:28 am

बॉडीलाईन - ,

अ‍ॅशॅस मालिकेत आतापर्यंत १-१ बरोबरी झाली होती.
नाटकाचा तिसरा अंक रंगणार होता तो अ‍ॅडलेडच्या मैदानात!

मेलबर्न टेस्टमधील विजयामुळे बॉडीलाईन बॉलिंग सुरवातीला वाटली तितकी धोकादायक नाही असा ऑस्ट्रेलियन प्रेक्षक, पत्रकार आणि क्रीडासमीक्षकांचा ग्रह झाला होता. त्यातच दुसर्‍या इनिंग्जमध्ये ब्रॅडमनने शतक झळकावल्यामुळे तर त्याला बॉडीलाईनवर उपाय सापडला आहे अशी सर्वांची पक्की खात्रीच पटली होती. ब्रॅडमनचं शतक वादातीत असलं तरी एका गोष्टीची मात्रं कोणालाही फारशी कल्पना नव्हती.

मेलबर्नच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये लारवूड त्याला देण्यात आलेल्या बुटांमुळे वैतागला होता. नेहमीच्या लयीत बॉलिंग करणं त्याला जमत नव्हतं! इतकंच नव्हे तर त्याच्या पायाला त्या बुटामुळे जखमही झालेली होती. सिडनीच्या आणि एकूणच इतर ऑस्ट्रेलियन विकेट्सच्या तुलनेत मेलबर्नची विकेटही काहीशी संथच होती.

ऑस्ट्रेलियन पत्रकारांशी जार्डीनचं असलेलं वितुष्टं दिवसेदिवस वाढतच होतं. आपल्या संघाची प्रॅक्टीस सुरु असताना पत्रकारांना आणि सामान्य प्रेक्षकांना हजर राहण्यास जार्डीनने मज्जाव केला! परिणामी इंग्लिश संघातील संभाव्य बदलांचा कोणालाही काहीच अंदाज बांधता येईना! त्यातच जार्डीन आणि मॉरीस टेट हे दोघं हमरातुमरीवर आल्याच्या बातमीची रसभरीत चर्चा ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांत सुरू झाली होती! टेटने मात्रं स्पष्टपणे याचा इन्कार केला. टेट म्हणतो,

"The speculation that I came to blows with Mr.Jardin are totally baseless and are not even realistic in the wildest of the dreams."

दौर्‍याच्या सुरवातीला जोरदार फॉर्ममध्ये असलेल्या जार्डीन टेस्ट मॅचेसमध्ये पार ढेपाळला होता. सिडनी आणि मेलबर्न इथल्या दोन टेस्टमधील तीन इनिंग्जमध्ये मिळून जार्डीनने केवळ २८ रन्स केल्या होत्या. तिसर्‍या टेस्टसाठी टीमची निवड होण्यापूर्वी जार्डीनने स्वतःला ड्रॉप करण्याचा विचार आपल्या सहकार्‍यांना बोलून दाखवला. परंतु दौर्‍यावरील निवड समितीचे उर्वरीत सदस्य असलेल्या वॉली हॅमंड, बर्ट सटक्लीफ, व्हाईस कॅप्टन बॉब वॅट आणि मॅनेजर पेल्हॅम वॉर्नर यांनी जार्डीनला ड्रॉप करण्यास नकार दिला. त्यांनी जार्डीनला सटक्लीफच्या जोडीला सलामीला येण्याचा सल्ला दिला!

पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये इंग्लंडच्या संघात एकही डावखुरा बॅट्समन नव्हता. मेलबर्न टेस्टच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये लेगस्पिनर बिल ओ रेली आणि आयर्नमाँगर यांनी इंग्लिश बॅट्समनना जवळपास जखडून टाकलेलं होतं. यावर उपाय म्हणून तिसर्‍या टेस्टमध्ये डावखुर्‍या एडी पायन्टरची नवाब पतौडीच्या जागी इंग्लंडच्या संघात वर्णी लावण्यात आली. मेलबर्नच्या टेस्टमध्ये पतौडी अपयशी ठरलेला असला तरी सिडनीच्या पहिल्या टेस्टमध्ये त्याने शतक झळकावलेलं होतं. पतौडीची बॅटींग अपेक्षेपेक्षा खूपच धीमी असल्याने त्याला ड्रॉप केल्याचा जार्डीनने दावा केला! जार्डीनच्या सूचनेप्रमाणे ऑस्ट्रेलियनांचा तिरस्कार करण्यास पतौडीने साफ नकार दिला होता! पतौडीचे ऑस्ट्रेलियन संघातील कित्येक खेळाडूंशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यातच बॉडीलाईन बॉलिंगवर लेग ट्रॅपमध्ये फिल्डींग करण्यास पतौडीने दिलेला नकार जार्डीनला झोंबला होताच! याचीच परिणीती पतौडीच्या गच्छन्तीत झाली होती! आपल्याला ड्रॉप केल्याचं कळल्यावर पतौडी म्हणाला,

"It's a dangerous thing to score a century in our team. You'll get yourself dropped quickly if you do."

मेलबर्नला बिल बोसने ब्रॅडमनला शुन्यावर बोल्ड केलेलं असलं तरीही दुसरी एकही विकेट त्याला मिळाली नव्हती. अ‍ॅडलेडच्या विकेटवर बोसपेक्षा स्पिनर असलेला व्हॅरेटी जास्तं प्रभावी ठरेल असं जार्डीनचं मत होतं त्यामुळे बोसच्या जागी त्याची निवड करण्यात आली होती.

ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात केवळ एकच बदल केला. पॉन्सफोर्डच्या जागी वर्णी लावण्यात आलेला लिओ ओब्रायन मेलबर्नला अपयशीच ठरला होता. त्यातच पॉन्सफोर्डला ड्रॉप केल्यामुळे फिंगल्टनला ओपनिंगला यावं लागलं होतं. अ‍ॅडलेड टेस्टसाठी ओब्रायनच्या जागी पॉन्सफोर्ड पुन्हा टीममध्ये परतला.

१३ जानेवारी १९३३...

अ‍ॅडलेडच्या मैदानावर जार्डीनने प्रथमच टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. टॉस करुन जार्डीन आणि वूडफूल परत येताना जार्डीनची गाठ क्लेम हिल याच्याशी पडली. जार्डीनने टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतलेला कळल्यावर हिल उद्गारला,

"It should be a close game!"

"Looks like you have not seen who had won the toss!" जार्डीनने त्याला ऐकवलं.

सटक्लीफ आणि जार्डीन इंग्लंडची सुरवात करण्यास मैदानात उतरले. ऑस्ट्रेलियाने आपल्या टीममध्ये टिम वॉलच्या जोडीला दुसरा फास्ट बॉलर न घेता तीन स्पिनर खेळवले होते! त्यामुळे वॉलच्या जोडीला लेगस्पिनर बिल ओ रेलीने बॉलिंगला सुरवात केली!

आदल्या दिवशी आणि पहाटे पडलेल्या पावसामुळे विकेट काहीशी कठीण झाली असावी असा क्लेम हिलचा अंदाज होता. तो अचूक होता हे पहिल्याच ओव्हरमध्ये सिद्ध झालं.

टिम वॉलचा चौथाच बॉल अनपेक्षीतपणे उसळून सटक्लीफच्या खांद्यावर आदळला!
अ‍ॅडलेडवर हजर असलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला!

वॉल म्हणतो,
"The crowd burst into huge round of applause the moment I hit Sutcliff on shoulder. It was payback time!"

वॉलनेच जार्डीनला बोल्ड करुन सलामीची जोडी फोडली. जार्डीन बाद झाला तेव्हा इंग्लंडच्या केवळ ४ रन्स झाल्या होत्या. तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या वॉली हॅमंडला वॉलचा सामना करणं चांगलंच कठीण जात होतं. वॉलने त्याला शॉर्टपीच बॉलिंगने हैराण केलं होतं! वॉलला हूक करण्याच्या नादात बर्ट ओल्डफिल्डने त्याचा कॅच घेतला. इंग्लंड १६/२!

""If that's what the bloody game's coming to, I've had enough of it." बाद होऊन परत जाताना सततच्या शॉर्टपीच बॉलिंगमुळे वैतागलेला हॅमंड उद्गारला!

अंपायर जॉर्ज हेलच्या मते हॅमंडने वॉलच्या शॉर्टपीच बॉलिंगला वैतागून मुद्दामच विकेट फेकली होती!

हॅमंड पाठोपाठ एकाही रनची भर न पडता सटक्लीफ बाद झाल्याने इंग्लंडची १६/३ अशी दारूण अवस्था झाली! बिल ओ रेलीच्या बॉलिंगवर शॉर्ट स्क्वेअरलेगला वॉलने सटक्लीफचा कॅच घेतला. विकेटकीपर लेस अ‍ॅमेसने ३९ मिनीटं खेळून काढली, परंतु एकही बॉल तो व्यवस्थित मारू शकला नव्हता! बिल ओ रेलीने त्याची दांडी उडवली होती, पण दुर्दैवाने तो नोबॉल होता! अखेर बर्ट आयर्नमाँगरने त्याला बोल्ड करुन इंग्लंडची अवस्था ३०/४ अशी करुन टाकली!

इंग्लंडच्या प्रत्येक विकेटबरोबर प्रेक्षकांचा जल्लोष वाढत होता! आपली अशी घसरगुंडी उडेल अशी जार्डीनच काय पण कोणालाही कल्पना नव्हती. हॅडली व्हॅरेटी आणि गबी अ‍ॅलन ड्रेसिंगरुममध्ये न बसता सीमारेषेपार गवतावर बैठक मारुन बसले होते. परंतु इंग्लंडची उडालेली घसरगुंडी पाहता त्यांनी बॅटींगला जाण्याची वेळ आली तर तयारीत असावं म्हणून जवळपास धावतच ड्रेसिंग रुम गाठली! सुदैवाने मॉरीस लेलँड आणि बॉब वॅट यांनी लंचपर्यंत आणखीन पडझड होणार नाही याची काळजी घेतली. इंग्लंड ३७/४!

मॉरीस-वॅट जोडीने लंचनंतर इंग्लंडचा डाव सावरण्यास सुरवात केली. सुदैवाने एव्हाना विकेट बर्‍यापैकी धीमी झाली होती. जार्डीनने दोघांनाही सावधपणे खेळण्याची सूचना दिली होती. लेलँडने वॉलच्या बंपरवर हूक मारून आपला इरादा जाहीर केला. जम बसल्यावर त्याने ग्रिमेटच्या फिरकीवर पुढे सरसावत हल्ला चढवला! बॉब वॅट कोणतीही रिस्क न घेता आणि धीमेपणाने बॅटींग करण्याबद्द्ल मशहूर, परंतु अ‍ॅडलेडवर मात्रं ऑस्ट्रेलियाला त्याचा रुद्रावतार पाहण्यास मिळाला! ग्रिमेटच्या स्पिनवर पुढे सरसावत वॅटने दोन तडाखेबंद षटकार खेचले!

वॅटने दुसरा षटकार मारल्यावर सहज पॅव्हेलियनकडे नजर टाकली तेव्हा इतका वेळ खुर्चीवर बसून खेळावर लक्षं ठेवून असलेला जार्डीन विषादाने मान हलवत ड्रेसिंग रुममध्ये जाताना त्याच्या दृष्टीस पडला! अर्थात वॅटवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही! टिम वॉलच्या शॉर्टपीच बॉल हूक करत वॅटने तिसरा षटकार खेचला, परंतु लाँगलेगला ब्रॅड्मनने कॅच पकडण्यापासून तो थोडक्यात वाचला होता!

लेलँड-वॅट जोडीने १५६ रन्सची पार्टनरशीप करुन इंग्लंडचा डाव सावरला. त्यापैकी शेवटच्या १०० रन्स दोघांनी जेमतेम ९० मिनीटांत ठोकल्या होत्या!

हे दोघं आरामात फटकेबाजी करत असताना लेलँडने अंपायर जॉर्ज हेलजवळ बर्ट आयर्नमाँगरची तक्रार केली.

"He is using resin on the ball for better grip!" लेलँड तक्रार करत म्हणाला.

उत्तरादाखल आयर्नमाँगरने आपला डावा खिसा उलटापालटा करुन लेलँडला दाखवला, परंतु त्याचा खिसा पूर्णपणे रिकामा होता! लेलँडने दिलगीरी व्यक्त केली आणि पुढे खेळण्यास सुरवात केली खरी परंतु त्याच्या तक्रारीचा योग्य तो परिणाम लगेच दिसून आला! आतापर्यंत आयर्नमाँगरच्या बॉलिंगमध्ये असलेली अचूकता अचानक पार हरवून गेली!

अंपायर जॉर्ज हेल या प्रकरणाचा उलगडा करताना म्हणतो,

"लेलँडने दिलगीरी व्यक्तं केल्यावर पुन्हा बॉलिंगला जाण्यापूर्वी बर्टच्या चेहर्‍यावर मिष्कील भाव उमटले होते. लेलँडने बर्टचा डावा खिसा तपासला होता, परंतु त्याच्या उजव्या खिशात काय आहे हे पाहण्यास तो विसरला होता! अर्थात सावध झालेल्या बर्टने नंतर रेझिनचा प्रयोग करण्याचं टाळल्यामुळे त्याच्या बॉलिंगमधली अचूकता कमी झाली!"

बिल ओ रेलीने अखेर लेलँडला बोल्ड करुन ही जोडी फोडली. लेलँडने १३ चौकारांच्या सहाय्याने ८३ रन्स फटकावल्या! आणखीन १० रन्सची भर पडते तोच ग्रिमेटच्या बॉलिंगवर ड्राईव्ह मारण्याचा वॅटचा (७८) प्रयत्न फसला आणि मिडऑनला रिचर्डसनने त्याचा कॅच घेतला. इंग्लंड १९६/६.

जार्डीन म्हणतो,

"मॉरीस आणि बॉब यांची ती पार्टनरशीप म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघासाठी केलेली उत्कृष्ट खेळी होती. It was truely a magnificent partnership by Maurice and Bob at a critical time! मॉरीसचे ड्राईव्हज् आणि बॉबचा आक्रमकपणा केवळ खास असाच होता! बॉबची ही इनिंग्ज त्याची सर्वोत्कृष्ट इनिंग्ज नक्कीच ठरावी!"

भूतपूर्व इंग्लंड कॅप्टन विल्फ्रेड र्‍होड्सने तर लेलँडने सटक्लीफबरोबर सलामीच्या जोडीत खेळावं असं प्रतिपादन केलं!

अद्यापही इंग्लंड सुस्थितीत पोहोचलेलं नव्हतं. त्यातच इंग्लंडच्या २०० रन्स पूर्ण होतात तोच ऑस्ट्रेलियाने नवीन बॉल घेतल्यामुळे जार्डीन काहीसा चिंतेतच होता. डावखुर्‍या एडी पायन्टरने आपल्या पदार्पणाच्या टेस्टमध्ये आत्मविश्वासाने सुरवात केली आणि गबी अ‍ॅलनच्या जोडीने ३२ रन्सची भर घातली. परंतु ग्रिमेटने अ‍ॅलनला एल बी डब्ल्यू करुन ही जोडी फोडली. दिवसाअखेरीस पायन्टर २५ तर व्हॅरेटी ५ रन्सवर नाबाद होते. ३०/४ अशा अवस्थेत सापडलेल्या इंग्लंडने पुन्हा आपलं वर्चस्वं प्रस्थापित करताना २३६/७ अशी मजल मारली होती.

दुसर्‍या दिवशी अ‍ॅडलेडच्या मैदानावर विक्रमी ५०,९६२ प्रेक्षक हजर होते! इंग्लंडला झटपट गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाला यश आल्यावर ऑस्ट्रेलियाची विशेषतः ब्रॅडमनची बॅटींग पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी झालेली होती!

एडी पायन्टर मैदानाच्या वाटेवर असताना एका माथेफिरुने अचानक त्याच्यावर हल्ला केला होता! पायन्टरला मोठी दुखापत झाली नसली तरी तो समूळ हादरला होता! मात्रं त्याच्या बॅटींगवर याचा कोणताही परिणाम झाला नाही! ग्रिमेट, आयर्नमाँगर आणि बिल ओ रेलीच्या फिरकीचा समर्थपणे मुकाबला करत त्याने आक्रमक फटकेबाजी करण्यात कोणतीही कसूर केली नाही! पायन्टर-व्हॅरेटी यांनी लंचपर्यंत एकही इंग्लंडला ३१५/७ अशा सुस्थितीत आणून ठेवलं होतं!

लंचनंतर टिम वॉलला हूक करण्याचा पायन्टरचा प्रयत्न फसला आणि फिंगल्टनने त्याचा कॅच पकडला. आपल्या पहिल्याच टेस्ट इनिंगमध्ये खेळताना पायन्टरने ९ चौकारांसह ७७ रन्स काढल्या होत्या! व्हॅरेटीबरोबर ९६ रन्सची पार्टनरशीप करुन त्याने इंग्लंडचा डाव लवकर संपुष्टात येणार नाही याची खबरदारी घेतली होती!

पायन्टर परतल्यावर वॉलने व्होसचाही अडसर दूर केला. पायन्टरला समर्थपणे साथ देत व्हॅरेटीने ४५ रन्स काढल्या, परंतु वॉलच्याच बॉलिंगवर रिचर्डसनने व्हॅरेटीचा कॅच पकडून इंग्लंडची इनिंग्ज संपुष्टात आणली! ३०/४ अशा घसरगुंडीनंतर लेलँड, वॅट, पायन्टर आणि व्हॅरेटीमुळे इंग्लंडने ३४१ पर्यंत मजल मारली होती! टिम वॉलने ५ विकेट्स काढल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाच्या इनिंग्जची सुरवात करण्यासाठी वूडफूलच्या जोडीला पॉन्सफोर्ड येईल अशी बहुतेकांची अपेक्षा होती. परंतु वूडफूलने आपल्याबरोबर फिंगल्टनलाच सलामीला येण्याची सूचना केली! मेलबर्न टेस्टमध्ये फिंगल्टनची ८३ रन्सची अत्यंत जबाबदार इनिंग्ज त्याला कारणीभूत होती. मुख्य म्हणजे लारवूड-व्होस यांची बॉडीलाईन बॉलिंग फिंगल्टनने आरामात खेळून काढली होती. परंतु गबी अ‍ॅलनचा सामना करताना मात्रं फिंगल्टन अनेकदा गडबडून गेला होता!

जार्डीनच्या चाणाक्षं नजरेतून ही गोष्टं सुटणं अर्थातच शक्यं नव्हतं!

फिंगल्टन सलामीला आलेला पाहून त्याने लारवूडच्या जोडीला दुसर्‍या बाजूने अ‍ॅलनला बॉलिंगला आणलं! अर्थात त्याला अपेक्षीत परिणाम ताबडतोब घडून आला. अ‍ॅलनच्या दुसर्‍याच ओव्हरमध्ये विकेटकिपर लेस अ‍ॅमेसने फिंगल्टनचा कॅच घेतला.

फिंगल्टन बाद होऊन परतत असताना टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला!
ऑस्ट्रेलियाची अवस्था १/१ अशी असताना टाळ्या वाजण्याचं कारण एकच असू शकत होतं..

डॉन ब्रॅडमन बॅटींगला आला होता!

लारवूडचं मुख्यं अस्त्रं होतं ते म्हणजे आऊटस्विंग! तुफान वेगात बॉल बाहेर काढण्यात तो पटाईत होता. परंतु अ‍ॅडलेडच्या विकेटवर आपला बॉल इनस्विंग होत असल्याचं ध्यानात आल्यावर तो स्वतःही चकीत झाला होता. त्याच्या तिसर्‍या ओव्हरचा पाचवा बॉल इतक्या वेगाने उडाला की वूडफूलला जेमतेम खाली वाकून तो डक् करण्यास वेळ मिळाला!

शेवटचा बॉल मिडल स्टंपवर पडला आणि आधीच्या इतकाच तुफान वेगाने उसळला..
वूडफूलने बचावात्मक खेळण्याचा पवित्रा घेतला खरा पण..

तुफान वेगात उसळलेला लारवूडचा बॉल त्याच्या छातीवर हृदयाच्या किंचीत वर आदळला!

वूडफूलने हातातली बॅट टाकून दिली आणि दोन्ही हात छातीवर आवळून तो धडपडत बाजूला झाला!
वेदनेने त्याचा चेहरा पार पिळवटून निघाला होता!

x
लारवूडचा बॉल लागलेला बिल वूडफूल

ब्रॅडमनने त्याच्याकडे धाव घेतली. इंग्लंडचे सर्व खेळाडूही सहानुभूतीने त्याच्याजवळ आले. एव्हाना काय घडलं आहे हे प्रेक्षकांच्या ध्यानात आलं होतं. त्यांनी इंग्लिश खेळाडूंच्या नावाने शिव्या घालण्यास आणि निदर्शनं करण्यास सुरवात केली होती!

कसाबसा तोल सावरत आणि छातीवर हात आवळत पुढे झुकून वूडफूल वेदना सहन करण्याचा प्रयत्न करत असतानाच...

"वेल बोल्ड हॅरॉल्ड!"

गरमागरम शिसं ओतलं जावं तसे जार्डीनचे शब्दं वूडफूलच्या कानात शिरले!

वास्तविक जार्डीनने मुद्दाम ब्रॅडमनला घाबरवण्यासाठी हे वक्तव्यं केलं होतं, परंतु ते कानी पडल्यावर वूडफूलच्या अंगावर शिसारी आली!

प्रेक्षकांचा आवाज एव्हाना टीपेला गेला होता! वूडफूल पुन्हा खेळण्यास सज्ज होईपर्यंत काही मिनीटं खेळ थांबवावा लागला! परंतु पॅव्हेलियनमध्ये न परतता पुढे बॅटींग करण्यास वूडफूल सज्ज होतात टाळ्यांच्या गजरात प्रेक्षकांनी त्याच्या धैर्याचं कौतुक केलं!

गबी अ‍ॅलनची पुढची संपूर्ण ओव्हर ब्रॅडमनने खेळून काढली. वूडफूल नॉनस्ट्रायकर एन्डला आपल्या बॅटवर झुकून उभा होता!

पुढच्या ओव्हरच्या सुरवातीला लारवूडच्या समोर पुन्हा वूडफूल!

जार्डीनने मानेनेच आपल्या सहकार्‍यांना इशारा केला..
हॅमंड, सटक्लीफ, व्हॅरेटी, अ‍ॅलन आणि लेलँड लेग ट्रॅपमध्ये गेले!

लारवूडने लेग ट्रॅपची मागणी केली होती असं जार्डीनने नंतर नमूद केलं, परंतु लारवूडने जार्डीनचा हा दावा खोडून काढताना हा जार्डीनचा निर्णय होता असं स्पष्टं केलं!

जार्डीनच्या या पवित्र्यानंतर कॉमेंटेटर्सनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली. आधीच जखमी झालेल्या वूडफूलला लेग ट्रॅप लावून बॉडीलाईन बॉलिंग टाकणं हे खिलाडूवृत्तीला धरुन नव्हतं आणि खेळाला लांच्छनास्पद आहे असं त्यांनी रेडीओवरुन कॉमेंट्री करताना जाहीरपणे ठणकावलं!

ऑस्ट्रेलियन सिलेक्टर बिल जॉन्सन प्रेक्षकांमध्ये हजर होता. जार्डीनच्या बॉडीलाईन बॉलिंगच्या पवित्र्यावर टीका करताना तो म्हणाला,

"It was the most unsportsmanlike act ever witnessed on an Australian cricket field."

खवळलेल्या ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचा आवाज तर पूर्वीपेक्षाही जास्तंच वाढला! इंग्लिश खेळाडूंच्या नावाने उघडपणे शिमगा करण्यास त्यांनी सुरवात केली. त्यांचा संताप शीगेला पोहोचला होता. वूडफूलला बॉडीलाईन बॉलिंग करणं म्हणजे घायाळ झालेल्या माणसावर अधिक वार करण्यासारखं होतं अशी प्रेक्षकांची भावना होती! लारवूडच्या बॉडीलाईन बॉलिंगमुळे कदाचित वूडफूल आणि ब्रॅडमनच्या जीवाला धोकाही निर्माण होईल अशी भिती प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती!

लारवूडच्या प्रत्येक बॉलबरोबर इंग्लिश खेळाडूंच्या नावाने शिव्याशापांच्या फैरी झडत होत्या!

अंपायर जॉर्ज हेल म्हणतो,

"अ‍ॅडलेडला झाला तसा प्रकार मेलबर्नला झाला असता तर लोकांनी मैदानात येऊन लारवूड, जार्डीन आणि कदाचित संपूर्ण इंग्लिश संघाला कापून काढलं असतं!"

"मैदानावरचं वातावरण अत्यंत स्फोटक झालं होतं!" इंग्लंडला परतल्यावर पत्रकारांशी बोलताना बर्ट सटक्लीफ म्हणाला, "कोणत्याही क्षणी लोकांच्या रागाचा उद्रेक होईल आणि ते मैदानावर धावत येतील अशी आम्हाला भिती वाटत होती! तसं झालं असतंच, तर हजर असलेले पोलिस त्यांना आवरण्यास असमर्थ ठरले असते. आमच्यापैकी प्रत्येकाचे लोकांनी अक्षरशः तुकडे केले असते!"

"वूडफूल खेळण्यास असमर्थ होता तर तो रिटायर होऊ शकत होता!"

जार्डीनने आपल्यावर टीका करणार्‍या समिक्षकांना सुनावलं! In Quest of the ashes या आपल्या पुस्तकात मात्रं नंतर त्याने त्यावेळी बॉडीलाईन बॉलिंगसाठी लेग ट्रॅप लावण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल खेद व्यक्तं केला!

या सगळ्या परिस्थितीत वूडफूलची अवस्था कशी होती?

लारवूडच्या प्रत्येक शॉर्टपीच बॉलचा वूडफूल धैर्याने मुकाबला करत होता!
अनेकदा बॉल लागूनही त्याने हूं का चूं केलं नाही!

दुसर्‍या बाजूने ब्रॅडमन सरळ बॅटने बचावात्मक पवित्रा घेऊन खेळत होता. परंतु लारवूडच्या तुफान वेगाने उसळणार्‍या बॉलवर नियंत्रण ठेवणं ब्रॅडमनला जड जात होतं. लारवूडचा असाच एक शॉर्टपीच बॉल उसळला आणि बचावात्मक पवित्र्यात असलेल्या ब्रॅडमनच्या बॅटची कड घेऊन शॉर्टलेगला असलेल्या गबी अ‍ॅलनच्या हातात गेला! ऑस्ट्रेलिया १८/२!

ब्रॅडमनच्या जागी खेळायला कोण यावं?

स्टॅन मॅकेब!

सिडनीच्या पहिल्या टेस्टमध्ये जवळपास अशाच परिस्थितीत बॅटींगला आलेल्या मॅकेबने लारवूड आणि कंपनीची धुलाई करत १८७ रन्स फटकावल्या होत्या. बचावात्मक खेळून काहीही उपयोग होणार नाही याची खात्री पटलेल्या मॅकेबने इथेही आक्रमक पवित्रा घेतला. लारवूडच्या तिसर्‍याच बॉलवर त्याने हूकचा चौकार वसूल केलाही..

परंतु आजचा दिवस मॅकेबचा नव्हता!

लारवूडचाच एक शॉर्टपीच बॉल हूक करण्याच्या प्रयत्नात मॅकेबचा अंदाज चुकला आणि मिडविकेटला जार्डीनने त्याचा कॅच घेतला! मॅकेब परतल्यावर ऑस्ट्रेलियाची अवस्था ३४/३ अशी झाली होती!

वूडफूल अद्यापही एका बाजूला ठामपणे उभा होता!

मॅकेब परतल्यावर वूडफूलच्या जोडीला आला तो पॉन्सफोर्ड. पॉन्सफोर्ड आल्यावर दुसर्‍याच ओव्हरमध्ये लारवूडच्या एका तुफानी वेगाने आलेल्या बॉलच्या आघातामुळे वूडफूलची बॅट त्याच्या हातातून उडाली!

परंतु वूडफूल बधला नाही!

छातीवर झालेल्या पहिल्या आघातानंतरही लारवूड आणि व्होसचे बॉल अनेकदा त्याच्या शरीरावर आदळले होते, परंतु प्रत्येक वेळी वेदना दाबून पुढचा बॉल खेळण्यास तो सज्ज होत होता! मूर्तिमंत धैर्याचा आणि झुंजार वृत्तीचा त्याने वस्तुपाठच घालून दिला होता!

तब्ब्ल ८९ मिनीटं आणि ६५ चेंडू लारवूड आणि व्होसच्या बॉडीलाईन बॉलिंगसमोर वूडफूल निश्चलपणे उभा होता!

गबी अ‍ॅलनने अखेर वूडफूलला २२ वर बोल्ड केलं! ऑस्ट्रेलिया ५१/४!

ऑस्ट्रेलियन ड्रेसिंगरुममध्ये अत्यंत तणावपूर्ण वातावरण होतं. याचं वर्णन करताना बिल ओ रेली म्हणतो,

"We bade sentimental farewells to each other as each batsman made his way out to bat. We had a genuine feeling they were making a journey from which they might be borne back on a stretcher."

वूडफूलच्या जागी आलेल्या व्हिक्टर रिचर्डसन मात्रं पॉन्सफोर्डच्या जोडीत आत्मविश्वासाने बॉडीलाईनचा मुकाबला करत खेळत होता. पॉन्सफोर्डने लारवूड आणि व्होसच्या बॉडीलाईन बॉलिंगला तोंड देण्याचा एक वेगळाच मार्ग शोधून काढला होता. लारवूड आणि व्होसने शॉर्टपीच बॉल टाकला की पॉन्सफोर्ड त्या बॉलचा फटका पाठीवर किंवा खांद्यावर सहन करत होता! कोणत्याही परिस्थितीत कॅच उडू द्यायचा नाही असा त्याने ठाम निश्चय केला होता! अत्यंत सावधपणे आणि जिद्दीने बॅटींग करत रिचर्डसनच्या साथीने त्याने दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाला १०९/४ अशा स्थितीत आणलं!

वूडफूल बाद होऊन परतल्यावर काही वेळातच फिल्डींग करताना बिल व्होसला दुखापत झाली. व्होसच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी मैदानात कोणी डॉक्टर हजर असल्यास त्याने पॅव्हेलियनमध्ये यावं असं जाहीर आवाहन करण्यात आलं!

ही घोषणा होताच प्रेक्षकांचा आवाज पुन्हा एकदा वाढीस लागला!

इंग्लिश खेळाडूंच्या नावाने पुन्हा शिव्याशापांची बरसात होण्यास सुरवात झाली. बहुसंख्य प्रेक्षकांची धारणा डॉक्टरच्या मदतीचं आवाहन हे व्होससाठी नसून वूडफूलसाठी करण्यात आलं आहे अशीच झाली होती!

दरम्यान...

ऑस्ट्रेलियन ड्रेसिंगरुममध्ये एका वेगळ्याच नाट्यावरुन पडदा उचलला गेला होता!

ऑस्ट्रेलियाचा बारावा खेळाडू असलेल्या लिओ ओब्रायनकडून वूडफूल गंभीर जखमी झाल्याचं इंग्लंडचा मॅनेजर पेल्हॅम वॉर्नरला समजलं होतं. चहापानाच्या वेळेनंतर पॉन्सफोर्ड आणि रिचर्डसन बॅटींग करत असतानाच, वॉर्नर आणि रिर्चड पॅलारेट वूडफूलच्या समाचारासाठी ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंगरुममध्ये आले.

वूडफूल नुकताच स्नान आटपून बाहेर आला होता. वॉर्नरने त्याच्या प्रकृतीची चौकशी करत सहानुभूती व्यक्तं करताच वूडफूलने त्याला सुनावलं,

"I do not want to see you, Mr Warner. There are two teams out there. One is playing cricket and the other is not!"

जॅक फिंगल्टनच्या मते वूडफूल पुढे म्हणाला,

"This game is too good to be spoilt. It's time some people got out of it!"

वूडफूलचं हे विधान म्हणजे बॉडीलाईन बॉलिंगच्या निषेधार्ह संघाने खेळण्यास नकार देण्याचा पवित्रा होता असं फिंगल्टनने प्रतिपादन केलं आहे.

वूडफूलने आतापर्यंत एकदाही जार्डीनच्या बॉडीलाईन डावपेचांबद्द्ल टीका केली नव्हती. ऑस्ट्रेलियन पत्रकार, समिक्षक आणि त्याच्या संघसहकार्‍यांनी दबाव आणूनही त्याने बॉडीलाईन डावपेचांचा वापर करण्यास ठाम नकार दिला होता. त्यामुळे बॉडीलाईन बॉलिंगला प्रोत्साहनच मिळत असल्याची टीकाही वूडफूलवर करण्यात आली होती! एक अत्यंत गंभीर, प्रामाणिक आणि विनयशील माणूस म्हणून प्रसिद्ध असलेल्या वूडफूलची ही प्रतिक्रीया वॉर्नर आणि पॅलारेटच काय पण त्याच्या सहकार्‍यांनाही अनपेक्षीत होती!

"Apart from all that, we most sincerely hope you are not too badly hurt." स्वत:ला सावरत वॉर्नर उद्गारला,

"The bruise is coming out." वूडफूलने त्याला सुनावलं!

फिंगल्टनच्या मते वूडफूलने अत्यंत थंडपणे हे सुनावल्यामुळे वॉर्नरवर त्याचा अपेक्षेपेक्षा जास्तं परिणाम दिसून आला. अत्यंत खजिल झालेला वॉर्नर पॅलारेट्सह ड्रेसिंगरुममधून बाहेर पडला तेव्हा तो रडकुंडीला आलेला होता असं लिओ ओब्रायनने नमूद केलं आहे!

ड्रेसिंगरुममध्ये आपण केलेलं वक्तव्यं हे खाजगी स्वरुपाचं असून ते तसंच राहवं अशी वूडफूलची प्रामाणिक अपेक्षा होती, परंतु येऊ घातलेल्या वादळाची त्याला काहीही कल्पना नव्हती!

पेल्हॅम वॉर्नर इंग्लंडच्या ड्रेसिंगरुममध्ये पोहोचला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. खिलाडूवृत्तीचा कट्टर पुरस्कर्ता आणि क्रिकेटवर जीवापाड प्रेम असलेल्या वॉर्नरला वूडफूलची टीका झोंबली नसती तरंच नवल होतं!

दिवसाचा खेळ संपल्यावर वॉर्नरने झाल्या प्रकाराची वाच्यता जार्डीनकडे केली. जार्डीनने त्याकडे साफ दुर्लक्षं केलं! मात्रं या घटनेबद्दल कोणापाशीही एक चकार शब्दही बोलण्याचा प्रयत्न करु नये अशी सक्तं ताकीद आपल्या सहकार्‍यांना देण्यास तो विसरला नाही!

दुसरा दिवस रविवार होता!
मॅचमधला सुटीचा दिवस!
रेस्ट डे!

सोमवारी सकाळी वूडफूल आणि वॉर्नर यांच्यातील बोलाचालीची बातमीऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांत झळकली! मुख्यतः द सन आणि द डेली टेलिग्राफ या वृत्तपत्रांत क्लॉड कॉर्बेटने अत्यंत तपशीलवारपणे साद्यंत वृत्तांत लिहीलेला होता!

ऑस्ट्रेलियन खेळाडू, अंपायर्स आणि संयोजक या अनपेक्षीत प्रकारामुळे नखशिखांत हादरले!

वूडफूल तर सर्दच झाला होता!
ड्रेसिंगरुममधली ही बातमी वृत्तपत्रांपर्यंत कशी पोहोचली?
कोणी पोहोचवली?

ऑस्ट्रेलियन संघात असलेला एकमेव पत्रकार म्हणजे जॅक फिंगल्टन!

संशयाची सुई सर्वप्रथम स्थिरावली ती त्याच्यावरच! परंतु ही बातमी प्रसिद्ध होताच फिंगल्टनने वूडफूलची गाठ घेऊन आपला याच्याशी काहीही संबंध नाही असा दावा केला!

ऑस्ट्रेलियन ड्रेसिंगरुमधली ही बातमी पत्रकारांपर्यंत नेमकी कोणी पोहोचवली याबद्दल पुढे कित्येक वर्षे आरोप-प्रत्यारोप होत राहिले!

फिंगल्टनच्या मते या सार्‍याला ब्रॅडमन जबाबदार होता! त्यानेच कॉर्बेटची भेट घेऊन ही बातमी त्याला सांगितली होती. जार्डीनच्या बॉडीलाईन डावपेचांचा सर्व रोख आपल्यावर आहे हे ब्रॅडमन जाणून होता. वूडफूलने त्याबद्दल जाहीररित्या कोणतीही तक्रार न केल्याने हे डावपेच त्याला मान्य आहेत असा लोकांचा ग्रह होत होता. त्यामुळे त्याविरुद्ध जनमत संघटीत करण्यासाठी वूडफूलचाही बॉडीलाईनला विरोध आहे हे सर्वांपुढे जाहीर व्हावं असा ब्रॅडमनचा हेतू होता असा फिंगल्टनने दावा केला! कॉर्बेटच्या सन वृत्तपत्रासाठीच ब्रॅडमन लिखाण करत होता यावर त्याने बराच जोर दिला होता!

फिंगल्टनचा हा दावा ब्रॅड्मनने साफ खोडून काढला! उलट या सर्व प्रकरणात फिंगल्टनच जबाबदार आहे आणि स्वतःला वाचविण्यासाठी तो आपल्यावर आरोप करत आहे असं ब्रॅडमनने ठणकावलं! दोघा खेळाडूंमधला वाद हा त्यांच्या मृत्यूपर्यंत शमला नव्हता!

फिंगल्टनप्रमाणेच बिल ओ रेलीनेही ब्रॅडमनलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं आहे. रेलीच्या मते ब्रॅडमन दुसर्‍यावर दोष ढकलून स्वतःची प्रतिमा निष्कलंक ठेवण्यात माहीर होता! बिल पॉन्सफोर्डच्या मतेही वूडफूलने ब्रॅडमनला कधीच माफ केलं नाही. अनेक पत्रकारांच्या मते पॉन्सफोर्डच्या या विधानाचा रोख अ‍ॅडलेडच्या या घटनेकडेच होता.

फिंगल्टनने या घटनेचा परिणाम म्हणूनच १९३४ सालच्या इंग्लंड दौर्‍यातून ब्रॅडमनने आपल्याला वगळलं असा दावा केला! अर्थात फिंगल्टन त्यावेळी अजिबात फॉर्ममध्ये नव्हता आणि त्याची निवड होणं तसंही कठीणच होतं!

( बिल ओ रेली आणि फिंगल्टन हे कॅथलिक होते तर ब्रॅडमन प्रॉटेस्टंट! फिंगल्टन आणि ब्रॅडमन यांच्यातील या वादाला धार्मिक किनारही होती! १९३६-३७ च्या अ‍ॅशेस मालिकेत रेली, मॅकेब, ओब्रायन आणि चक फ्लेटवूड्-स्मिथ यांच्याकडे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने धार्मिक कारणावरुन कॅप्टन असलेल्या ब्रॅडमनला जुमानत नसल्याच्या बातम्यांबद्दल स्पष्टीकरण मागितलं होतं! पत्रकार असल्यामुळे फिंगल्टनची यातून सुटका झाली असली तरी या सगळ्या प्रकाराचा मास्टरमाईंड तोच होता असं ब्रॅडमनचं मत होतं!).

लिओ ओब्रायनच्या मते त्यावेळी बॅटींग करत असलेले पॉन्सफोर्ड आणि रिचर्डसन यांचा अपवाद वगळता जवळपास प्रत्येकाने वूडफूल आणि वॉर्नर यांच्यामध्ये झालेलं बोलणं ऐकलं होतं. त्यांच्यापैकी कोणीही ही बातमी पत्रकारांपर्यंत पोहोचवण्याची शक्यता होती!

सोमवारी पॉन्सफोर्ड आणि रिचर्डसन यांनी १०९/४ वरुन पुन्हा एकदा लारवूड आणि कंपनीच्या प्रतिकारास सुरवात केली. दोघांनी ऑस्ट्रेलियाला १३१ पर्यंत पोहोचवल्यावर अ‍ॅलनने रिचर्डसनला (२८) बोल्ड करुन ही जोडी फोडली. पॉन्सफोर्ड-रिचर्डसन यांनी पाचव्या विकेटसाठी ८० रन्सची झुंजार भागीदारी केली होती.

रिचर्डसन परतल्यावर विकेटकीपर बर्ट ओल्डफिल्डने पॉन्सफोर्डला साथ देत इंग्लंडची इनिंग्ज सावरण्याचा प्रयत्न केला. पॉन्सफोर्ड-ओल्डफिल्ड यांनी ६३ रन्स जोडल्यावर व्होसने पॉन्सफोर्डला बोल्ड केलं! साडेतीन तासात ८ चौकारांच्या सहाय्याने आणि पाठ आणि खांद्यावर अनेक घाव झेलत पॉन्सफोर्डने ८५ रन्स काढल्या होत्या! ऑस्ट्रेलिया १९४/६!

वूडफूल परतल्यावर आलेला क्लॅरी ग्रिमेटही फार काळ टिकला नाही. अ‍ॅलनच्या बॉलिंगवर व्होसने त्याचा कॅच घेतला. ग्रिमेटच्या जागी ओल्डफिल्डला साथ देण्यास आला तो टिम बॉल. ओल्डफिल्ड एका बाजूने कणखरपणे खेळत होता. ११३ चेंडूंचा सामना करत त्याने ४१ रन्स काढल्या होत्या.

लारवूड यावेळी लेग ट्रॅप लावून बॉडीलाईन बॉलिंग न करता नेहमीच्या फिल्डींगनुसार बॉल स्विंग करण्याच्या प्रयत्नात होता. त्याचा एक बॉल शॉर्टपीच पडताच ओल्डफिल्डने झटकन हूक मारण्याचा पवित्रा घेतला,

परंतु...

ओल्डफिल्डच्या अपेक्षेप्रमाणे बॉल उडालाच नाही!
परिणामी त्याच्या बॅटची आतली कड लागून बॉल उडाला तो थेट त्याच्या डोक्यात बसला!

लारवूडचा तुफान वेगात आलेला आणि बॅटची कड लागल्यामुळे अचानक उसळलेला बॉल डोक्यात बसताच ओल्डफिल्डच्या हातातली बॅट उडाली. कसंबसं डोकं धरुन धडपडत तो बाजूला झाला आणि गवतावर कोसळला. जार्डीन आणि लारवूडसह सर्व इंग्लिश खेळाडू, अंपायर्स आणि ओल्डफिल्डचा जोडीदार टिम वॉल यांनी ओल्ड्फिल्ड्कडे धाव घेतली.

x
लारवूडचा बॉल डोक्याला लागलेला बर्ट ओल्डफिल्ड

आपलं डोकं धरुन तो सुन्नपणे गवतात आडवा झाला होता!

ओल्डफिल्ड कोसळताच प्रेक्षकांनी पुन्हा जोरदार निदर्शनांना सुरवात केली. अर्थात ओल्डफिल्डला जखमी करणारा बॉल हा बॉडीलाईन बॉल नसला तरी प्रेक्षकांचा राग अनावर झाला होता. भानावर आल्यावर ओल्डफिल लारवूडला म्हणाला,

"It wasn't your fault Harold."

वूडफूल स्वत: जखमी ओल्डफिल्डला आधार देऊन मैदानातून घेऊन आला! ओल्डफिल्डला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्या कवटीचं हाड फ्रॅक्चर झालं होतं!

ओल्डफिल्डला झालेल्या दुखापतीचा परिणाम म्हणून खेळाडूंच्या विम्याची रक्कम दुपटीने वाढवण्यात आली!

जार्डीनने कोणाच्याही नकळत हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असलेल्या ओल्डफिल्डच्या पत्नीला सहानुभूती व्यक्तं करणारी तार केली! ओल्डफिल्डच्या लहान मुलींना भेटवस्तू देण्याची व्यवस्था करण्यासही तो विसरला नव्हता!

ओल्डफिल्ड रिटायर होऊन परतल्यावर हॅमंड आणि लारवूडने ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज २२२ मध्ये गुंडाळली. इंग्लंडला पहिल्या इनिंग्जमध्ये ११९ रन्सचा लीड मिळाला होता.

इंग्लंडच्या इनिंग्जची सुरवात अडखळतीच झाली. टिम वॉलने अवघ्या ७ रन्सवर सटक्लीफला बाद केलं. ओल्डफिल्डच्या जागी फिल्डींगला आलेल्या ओब्रायनने त्याचा कॅच घेतला. सटक्लीफ बाद झाल्यावर जार्डीन आणि बॉब वॅट यांनी कोणताही धोका न पत्करता दिवसाअखेर इंग्लंडला ८५/१ अशा सुस्थितीत आणून ठेवलं होतं.

चौथ्या दिवशी सकाळी बिल ओ रेलीच्या बॉलिंगवर वॉलने वॅटचा (४९) कॅच घेऊन ही जोडी फोडली. गबी अ‍ॅलनला अनपेक्षीतपणे चौथ्या क्रमांकावर बॅटींगला बढती देण्यात आली. परंतु तो केवळ १५ रन्स काढून ग्रिमेटच्या बॉलवर एल बी ड्ब्ल्यू झाला. इंग्लंड १२३/३!

जार्डीन एका बाजूने कमालीच्या धीमेपणे खेळत होता. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी जार्डीनच्या धीम्या खेळाबद्द्ल त्याची बरीच टर उडवली परंतु जार्डीनवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही! बर्ट आयर्नमाँगरच्या बॉलवर तो एल बी डब्ल्यू झाला तेव्हा सव्वाचार तासात २६६ चेंडूत त्याएन ५६ रन्स काढल्या होत्या! अर्थात जार्डीन अजिबात फॉर्मात नव्हता हे खरं असलं तरी तो कमालीच्या कूर्मगतीने खेळला होता हे नि:संशय!

जार्डीन परतल्यावर हॅमंड आणि लेलँड यांनी आक्रमक पवित्रा घेत अवघ्या दीड तासात ९१ रन्स जोडल्या! आयर्नमाँगरनेच ही जोडी फोडली. वॉलने लेलँडचा (४२) कॅच घेतला. लेलँड परतल्यावर हॅमंडने लेस अ‍ॅमेसच्या साथीने ५१ रन्स जोडल्या परंतु ८५ रन्स काढल्यावर हॅमंड बोल्ड झाला! हॅमंड्ची विकेट घेणारा लेगब्रेक बॉलर होता...

डॉन ब्रॅडमन!

(ब्रॅडमनने ५२ टेस्टच्या आपल्या करीअरमध्ये केवळ २ विकेट्स घेतल्या. हॅमंड ही त्याची दुसरी विकेट! १९३० च्या मालिकेत वेस्ट इंडीजचा विकेटकीपर इव्हान बॅरोला ब्रॅडमनने एल बी डब्ल्यू केलं होतं!)

हॅमंड परतल्यावर अ‍ॅमेस (६९) आणि हॅडली व्हॅरेटी (४०) यांनी ९८ रन्स जोडल्या! बिल ओ रेलीने अखेर अ‍ॅमेसला बोल्ड करुन ही पार्टनरशीप तोडली. अ‍ॅमेस बाद झाल्यावर ओ रेली आणि आयर्नमाँगर यांनी लारवूड, व्होस यांना फारसं काही करण्याची संधी दिली नाही. मजेदार बाब म्हणजे पहिल्या इनिंग्जमध्ये ७७ रन्स करणार्‍या एडी पायन्टरला जार्डीनने लारवूडनंतर १० व्या क्रमांकावर बॅटींगला पाठवलं होतं!

इंग्लंडची इनिंग्ज ४१२ रन्सवर संपली.
जार्डीनने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ५३१ रन्सचं अशक्यप्राय टार्गेट दिलं होतं!

बिल वूडफूलबरोबर आपल्या भेटीची आणि बोलाचालीची बित्तंबातमी फिंगल्टननेच वृत्तपत्रांना कळवली याबद्दल पेल्हॅम वॉर्नरची पक्की खात्री झाली होती. वूडफूलच्या वक्तव्यामुळे व्यथित झालेल्या वॉर्नरच्या मते या सगळ्या प्रकाराला फिंगल्टनच जबाबदार होता. फिंगल्टनला शून्यावर बाद केल्यास १ पौंड बक्षीस देण्याचं त्याने लारवूडला कबूल केलं!

लारवूडने आपल्या दुसर्‍याच ओव्हरमध्ये फिंगल्टनची दांडी उडवून हे बक्षीस वसूल केलं!

फिंगल्टनपाठोपाठ लारवूडच्या उसळत्या चेंडूवर जार्डीनने पॉन्सफोर्डचा कॅच घेतला तेव्हा इंग्लंडची अवस्था १२/२ अशी झाली होती. वूडफूल एका बाजूला उभा होता, त्याच्या जोडीला आला ब्रॅडमन!

ब्रॅडमन येताच जार्डीनने लेग ट्रॅप लावला आणि लारवूडला बॉडीलाईन बॉलिंगची सूचना दिली!

जार्डीनचे डावपेच लक्षात येताच प्रेक्षकांनी पुन्हा निदर्शनास आणि इंग्लंड खेळाडूंच्या नावाने शिमगा करण्यास सुरवात केली. ब्रॅडमनने मात्रं मेलबर्नप्रमाणेच लेगसाईडला सरकून ऑफसाईडला बॉल फटकवण्याची आपली योजन इथेही राबवली. नेहमीच्या पद्धतीने बॅटींग न करता गोल्फ किंवा टेनिस खेळावं अशा स्टाईलने तो खेळत होता!

बॉडीलाईनचा उपयोग होत नाही म्हटल्यावर जार्डीनने हॅमंड आणि व्हॅरेटीला बॉलिंगसाठी पाचारण केलं. ब्रॅडमनने आतापर्यंत ६९ चेंडूत १० चौकारांसह ६० रन्स तडकावल्या होत्या! व्हॅरेटी बॉलिंगला येताच ब्रॅडमनने पुढे सरसावत त्याला थेट लाँगऑफवरुन बाऊंड्रीपार उचललं!

ब्रॅडमनच्या करीअरमधला हा पहिलाच षटकार होता!

पुढच्या बॉलला पुन्हा व्हॅरेटीला षटकार मारण्याचा ब्रॅडमनचा प्रयत्न मात्रं साफ फसला. व्हॅरेटीने त्याचा उडालेला सोपा कॅच आरामात पकडला. ७१ चेंडूत ६६ रन्स केल्यावर ब्रॅडमन परतला. ऑस्ट्रेलिया १००/२!

ड्रेसिंगरुममध्ये परतल्यावर पॉन्सफोर्डला आपल्या फटकेबाजीचं स्पष्टीकरण देताना ब्रॅडमन म्हणाला,

"I wanted to hit one bowler [Verity] before the other [Larwood] hit me."

ब्रॅडमन परतल्यावर आलेला स्टॅन मॅकेबही फारसं काही करु शकला नाही. लेलँडने अ‍ॅलनच्या बॉलिंगवर त्याचा कॅच घेतला. पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वूडफूल ३६ रन्स काढून नाबाद होता!

पाचव्या दिवसाचा खेळ सुरु असतानाच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने एम सी सी ला तार पाठवून बॉडीलाईन बॉलिंगबद्दल अत्यंत स्पष्ट शब्दांत तक्रार केली.

"बॉडीलाईन बॉलिंगच्या डावपेचांमुळे मैदानात खेळताना खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत जटील बनला असून क्रिकेटच्या खेळाची त्यामुळे अपरिमीत हानी होत आहे. या सर्व प्रकरणामुळे दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये परस्परांविषयी अत्यंत कडवट भावना पसरली आहे! हा सर्व प्रकार खिलाडूवृत्तीला धरुन नाही असं आमचं मत आहे. या प्रकाराला प्रतिबंध न घातला गेल्यास इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे!"

सहाव्या दिवशी वूडफूल-रिचर्डसन यांनी ५५ रन्सची पार्टनरशीप केल्यावर अ‍ॅलनने लारवूडच्या बॉलिंगवर लेग ट्रॅपमध्ये रिचर्डसनचा कॅच घेऊन ही जोडी फोडली. बॉडीलाईनचा नेटाने मुकाबला करत रिचर्डसनने २१ रन्स काढल्या. महत्वाचं म्हणजे लारवूडला लागोपाठ दोनवेळा त्याने हूकचे चौकार मारले होते! ऑस्ट्रेलिया १७१/५.

रिचर्ड्सन परतताच ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाली. गबी अ‍ॅलनने एका ओव्हरमध्ये ग्रिमेट आणि वॉल यांना बोल्ड केलं. बिल ओ रेलीने वूडफूलला साथ देण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु लारवूडने त्याची दांडी गुल केली. आयर्नमाँगरचा ऑफ स्टंप उडवत अ‍ॅलनने ऑस्ट्रेलियाच्या पराभवावर शिक्कामोर्तब केलं. कवटीचं हाड फ्रॅक्चर झाल्याने हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असलेला बर्ट ओल्डफिल्ड अर्थातच बॅटींग करण्यास असमर्थ होता.

बिल वूडफूल चार तासात २०८ चेंडूचा सामना करत ७३ रन्स काढून नाबाद राहिला!

लारवूड आणि व्होसचा बॉडीलाईनचा मारा झेलत..
जिद्दीने आणि धैर्याने!

१९३ रन्समध्ये ऑस्ट्रेलियाचा खुर्दा उडवत इंग्लंडने ३३८ रन्सनी मॅच जिंकली आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली!

(बॉडीलाईन मालिकेच्या वेळेस सर्व टेस्ट मॅचेस या 'टाईमलेस' खेळवल्या जात होत्या. पाचच दिवसांचं त्यावर बंधन नव्हतं. एखादा संघ जिंकेपर्यंत मॅच संपत नसे!)

मॅच संपल्यावर सर्वजण परत येताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंपैकी कोणीतरी लारवूडची संभावना 'बास्टर्ड' या शब्दात केल्यांचं जार्डीनच्या कानावर आलं. भडकलेला जार्डीन वूडफूलला याचा जाब विचारण्यास ऑस्ट्रेलियन ड्रेसिंगरुममध्ये गेला असताना त्याचा सामना झाला तो व्हाईस कॅप्टन व्हिक्टर रिचर्डसनशी..

"One of your players called Harold a basturd!" संतापाने धुमसत दारातूनच जार्डीनने तक्रार केली.

"OK, which of you bastards called Larwood a bastard instead of this bastard?" रिचर्डसनने आपल्या सहकार्‍यांकडे वळून विचारलं!

जार्डीन अवाक् झाला!
भानावर येऊन तो काही बोलण्यापूर्वीच रिचर्डसनने त्याच्या तोंडावर दार आपटलं!

आतापर्यंत अनेक ऑस्ट्रेलियन पत्रकार - समिक्षकांनी बॉडीलाईन बॉलिंगवर टीकेची झोड उठवली होती. कित्येकांनी एम सी सी ला वरचेवर तशी पत्रं पाठवून सूचितही केलं होतं. गबी अ‍ॅलनने दौर्‍यावर असताना एम सी सी च्या अनेक पदाधिकार्‍यांना पत्रं पाठवून आपली नापसंती व्यक्तं केली होती. मोजक्याच इंग्लिश पत्रकारांनी आणि माजी खेळाडूंनीही नाराजीचा सूर लावला होता.

एम सी सी च्या पदाधिकार्‍यांना आणि सामान्य इंग्लिश क्रिकेट रसिकांना मात्रं हा प्रकार म्हणजे 'कोल्ह्याला द्राक्षं आंबट' असंच वाटत होतं! त्यांच्या मते अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या लेग थिअरी बॉलिंगच्या डावपेचाचाच इंग्लंडने वापर केला होता. फरक इतकाच की तो वापर फास्ट बॉलर्सच्या माध्यमातून केला होता! ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्याचा मुकाबला करता येत नसल्याने त्यांनी आणि प्रेक्षकांनी तक्रारीचा सूर लावला होता!

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाची तार मिळताच एम सी सी च्या पदाधिकार्‍यांचा राग अनावर झाला! विशेषतः बॉडीलाईन बॉलिंग ही खिलाडूवृत्तीला धरुन नसल्याची ऑस्ट्रेलियन बोर्डाची टिपण्णी एम सी सी ला आणि इंग्लिश क्रिकेट रसिकांना चांगलीच झोंबली होती. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या या आरोपामुळे खवळलेल्या एम सी सी आणि क्रिकेटप्रेमींनी ऑस्ट्रेलियाचा जोरदार निषेध केला.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आपल्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्हं लावताच जार्डीनचा पारा चढला!

"Our tactics are not intended to threaten or hurt any batsman." जार्डीनने ठणकावलं, "It is just variant of the traditional leg theory with fast bowlers. I am leading my team in gentlemanly and in sportsmanlike manner. Its upto Australian batsmen to handle the bowling which they are not able to do because of lack of tactical abilities."

दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने पेल्हॅम वॉर्नरला पाचारण करुन बॉडीलाईन बॉलिंगचा वापर टाळण्याची सूचना केली, परंतु प्रत्यक्ष मैदानावर जार्डीनचा अधिकार चालत असल्याचं सांगून वॉर्नरने कानावर हात ठेवले! ऑस्ट्रेलियन पत्रकार, समिक्षक आणि माजी खेळाडूंनी बॉडीलाईन बॉलिंग आणि डावपेचांवर केलेल्या प्रखर टीकेमुळे जार्डीन खरंतर मनातून हादरला होता. आपल्या सहकार्‍यांबरोबर चर्चा करताना त्याने बॉडीलाईन डावपेच थांबवण्याबाबत विचारणा केली. अ‍ॅलन, पतौडी, वॅट, हॅमंड प्रभृतींचा बॉडीलाईनला वैयक्तीक विरोध असला तरी ऑस्ट्रेलियात असेपर्यंत इंग्लिश संघातून एकही विरोधाचा सूर उमटू न देण्याबाबत ते आग्रही होते. जार्डीन आणि वॉर्नरच्या अनुपस्थितीत इतर सर्वांनी चर्चा करुन बॉडीलाईनला पूर्ण पाठींबा देणारं पत्रक प्रसृत केलं!

आपल्या सहकार्‍यांचा पाठींबा मिळताच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आपल्यावर लावलेला अखिलाडूवृत्तीचा आरोप मागे न घेतल्यास उरलेल्या दोन टेस्ट मॅचेसमध्ये कोणताही भाग न घेण्याची जार्डीनने धमकी दिली!

एम सी सी ने जार्डीनला पूर्ण पाठींबा जाहीर केला!
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे अखिलाडूवृत्तीचे आरोप हे पूर्णपणे खोडसाळपणाचे असून त्यात काहीही तथ्य नसल्याचं एम सी सी ने ठणकावलं! ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने हे आरोप मागे घेतले नाहीत तर दौरा अर्धवट सोडण्याच्या जार्डीनच्या पवित्र्याला एम सी सी ने पाठींबा दिला!

ही सगळी गरमागरमी सुरू असतानाच लारवूड आणि बॉब वॅट अ‍ॅडलेडमध्ये एका थेटरमध्ये पिक्चर पाहण्यास गेले होते. लारवूडला पाहताच एक ऑस्ट्रेलियन स्त्री त्याच्याकडे बोट दाखवून आपल्या मुलाला म्हणाली,

"He's the one who's trying to kill our batsmen!"

"Why, mummy, he doesn't look like a murderer." तो लहान मुलगा निरागसपणे उत्तरला!

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देशांतील सौहार्दपूर्ण असलेले आंतरराष्ट्रीय संबंध या प्रकरणामुळे बिघडण्याची चिन्हं दिसू लागली होती! दोन्ही देशातील सामान्य नागरिकांमध्ये परस्परांबद्दल कमालीच्या रागाची आणि द्वेषाची भावना निर्माण झाली होती! अर्थात हे संबंध बिघडल्यास इंग्लंडपेक्षा जास्तं नुकसान होतं ते ऑस्ट्रेलियाचंच! ऑस्ट्रेलिया अद्यापही ब्रिटीश कॉमनवेल्थचा एक घटक असल्याने अनेक बाबतीत इंग्लंडवर अवलंबून होता!

दक्षिण ऑस्ट्रेलियाचा गव्हर्नर अलेक्झांडर होर-रुथवेन त्यावेळी इंग्लंडमध्ये होता. इंग्लिश वसाहतींचा सेक्रेटरी असलेल्या जेम्स हेनरी थॉमसची भेट घेऊन त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील व्यापारावर याचा परिणाम होण्याची चिंता व्यक्तं केली. राजकीय आघाडीवरही या प्रकरणाचे पडसाद उमटले. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान जोसेफ लियॉन्स यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर व्यापारी निर्बंध घातल्यास आणि ऑस्ट्रेलियाबरोबरचे व्यापारी संबंध संपुष्टात आणल्यास अर्थव्यवस्थेवर होणार्‍या विपरीत परिणामांची त्यांना स्पष्टपणे जाणिव करुन दिली.

पंतप्रधान लियॉन्स यांनी वस्तुस्थितीची जाणिव करुन दिल्यावर ब्रिस्बेनच्या मैदानात चौथी टेस्टमॅच सुरु होण्यापूर्वी अवघे दोन दिवस ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आपला जार्डीनवर लावलेला अखिलाडू वृत्तीचा आरोप अखेर मागे घेतला! आपल्या प्रसिद्धीपत्रकात बोर्डाने नमूद केलं,

"While we still think that bodyline bowling is objectionable, we do not consider the sportsmanship of your team as being in question".

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या या पत्रकानंतर ब्रिस्बेनच्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया चौथ्या टेस्टमध्ये समोरासमोर उभे ठाकणार हे स्पष्टं झालं!

क्रमशः

बॉडीलाईन - ४

कथालेख

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

7 Jul 2015 - 5:47 am | श्रीरंग_जोशी

अप्रतिम झालाय हा भाग. फारच थरारक घडामोडी व कडवट संभाषणांनी भरलेला आहे.

बोका-ए-आझम's picture

7 Jul 2015 - 9:09 am | बोका-ए-आझम

खेळातला थरार मस्त पकडला आहे स्पार्टेशअण्णा!क्रिकेटमध्ये जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाणं हे आजचं नाही, त्याला एवढी जुनी परंपरा आहे हेही त्यावरून सिद्ध होतं. मला वाटतं लारवूडनेही अशी एक प्रतिक्रिया दिली होती - When they called me a killer, they forgot that Bradman was the biggest killer amongst all.अर्थात हे ब्रॅडमनच्या बॅटिंगला उद्देशून होतं.

असा मी असामी's picture

7 Jul 2015 - 9:44 am | असा मी असामी

रिचर्डसन परतल्यावर विकेटकीपर बर्ट ओल्डफिल्डने पॉन्सफोर्डला साथ देत इंग्लंडची इनिंग्ज सावरण्याचा प्रयत्न केला. पॉन्सफोर्ड-ओल्डफिल्ड यांनी ६३ रन्स जोडल्यावर व्होसने पॉन्सफोर्डला बोल्ड केलं!

ईथे ऑस्ट्रेलिया असे म्हणायचे आहे काय?

असा मी असामी's picture

7 Jul 2015 - 9:52 am | असा मी असामी

थरार अनुभवत आहे हे वेगळे सांगायला नको.

एक एकटा एकटाच's picture

7 Jul 2015 - 10:15 am | एक एकटा एकटाच

जबरदस्त

मजा आया

मजा येते आहे वाचताना...मस्तच !!

सौंदाळा's picture

7 Jul 2015 - 10:23 am | सौंदाळा

थ्रीलर सिनेमा पण झक मारेल इतकी उत्कंठावर्धक मालिका.
त्यावेळचे खाजगी, सामाजिक, राजकिय तपशील दिल्यामुळे तर अजुनच मसालेदार झाली आहे.
चौथ्या कसोटीत काय झाले? लवकर लिहा पुढचा भाग.

झकासराव's picture

7 Jul 2015 - 12:09 pm | झकासराव

थरारक आहे.
:)

२ ठिकाणी तरी ऑस्ट्रेलिया ऐवजी इंग्लंड झाल आहे ते बदला फक्त.

मंदार दिलीप जोशी's picture

7 Jul 2015 - 4:37 pm | मंदार दिलीप जोशी

पुढचा भाग?

मृत्युन्जय's picture

7 Jul 2015 - 5:54 pm | मृत्युन्जय

मस्त चालली आहे मालिका. गंमत म्हणजे सरपटी चेंडु टाकुन मॅच जिंकणार्‍या (जरी हे नंतर घडले असले तरी), स्लेजिंग करणार्‍या आणि शिव्या देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडुंनी स्पोर्ट्समनशिप बद्दल गळे काढावे हा एक मोठाच विरोधाभास आहे. लारवूडच्या गोलंदाजीचे उत्तर ऑस्ट्रेलियाकडे नव्हते हेच खरे. हे म्हणजे गल्ली क्रिकेट मध्ये जोरात बॉलिंग केल्यावर लिंबु टिंबुंनी "जोरात बॉलिंग केली तर नो बॉल" असे म्हणण्यासारखे झाले.

Jack_Bauer's picture

8 Jul 2015 - 7:55 pm | Jack_Bauer

मजा आली हा भाग वाचताना ... आणखी येउ देत

पैसा's picture

13 Jul 2015 - 2:18 pm | पैसा

थरारक!