ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने जार्डीनवर केलेला अखिलाडूवृत्तीचा आरोप मागे घेतल्याने ब्रिस्बेन आणि सिडनी इथे मालिकेतील उर्वरीत दोन टेस्ट खेळल्या जाणार हे निश्चित झालं.
अॅडलेड टेस्टच्या दरम्यान बिल वूडफूल आणि पेल्हॅम वॉर्नर यांच्यादरम्यान झालेली बोलाचाली वॄत्तपत्रांपर्यंत पोहोचवण्यात जॅक फिंगल्टनचाच हात असावा अशी बर्याच जणांची खात्री झाली होती. त्यातच अॅडलेड टेस्टच्या दोन्ही इनिग्जमध्ये फिंगल्टनला भोपळाही फोडता आला नव्हता. ब्रिस्बेनच्या चौथ्या टेस्टसाठी त्याला संघातून डच्चू देण्यात आला. बर्ट ओल्डफिल्ड अद्यापही डोक्याला झालेल्या दुखापतीतून सावरला नसल्याने त्याच्याजागी दुसरा विकेटकीपर शोधणं क्रमप्राप्तंच होतं. ऑस्ट्रेलियन निवडसमितीने क्लॅरी ग्रिमेटलाही वगळण्याचा निर्णय घेतला! फिंगल्टन, ग्रिमेट आणि ओल्डफिल्ड यांच्याऐवजी लेन डार्लिंग, अर्नी ब्रॉमले आणि विकेटकीपर हॅमी लव्ह यांना टेस्टमध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली! डार्लिंग आणि ब्रॉमले दोघेही डावखुरे असल्याने लारवूडच्या बॉडीलाईन बॉलिंगचा ते योग्यप्रकारे मुकाबला करु शकतील अशी सिलेक्टर्सना अपेक्षा होती!
इंग्लंडच्या टीममध्ये केवळ एकच बदल करण्यात आला तो म्हणजे आजारी असलेल्या बिल व्होसच्या जागी लेगस्पिनर टॉमी मिचेलची वर्णी लावण्यात आली! मेलबर्नच्या टेस्टमध्ये ब्रॅडमनला शून्यावर बाद करणारा बिल बोस तसंच मॉरीस टेट यांना संधी न देता मिचेलची निवड केल्याबद्दल समिक्षकांना आश्चर्यच वाटलं होतं!
लारवूड पुन्हा बॉडीलाईन बॉलिंग करणार याची ब्रॅडमन आणि पॉन्सफोर्ड दोघांनाही पक्की खात्री होती. ब्रिस्बेन टेस्टच्या आदल्या दिवशी आपल्या एका मित्राशी बोलताना ब्रॅडमन म्हणाला,
"I would sooner return from Brisbane with a pair of ducks than a pair of broken ribs."
ब्रॅडमनच्या नेमक्या याच वक्तव्याचा आधार घेऊन बॉडीलाईन बॉलिंगकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यासाठी अॅडलेडच्या प्रकरणात तोच जबाबदार आहे असा जॅक फिंगल्टनने नंतर आरोप केला!
१० फेब्रुवारी १९३३...
बिल वूडफूलने टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतला! फिंगल्टनला ड्रॉप केल्यामुळे आणि पॉन्सफोर्डने मधल्या फळीतच खेळण्यास पसंती दिल्याने वूडफूलच्या जोडीला सलामीला आला तो व्हिक्टर रिचर्डसन!
रिचर्डसनला सलामीला बढती देण्याची वूडफूलची चाल चांगलीच यशस्वी ठरली. लारवूडच्या बॉडीलाईन बॉलिंगचा आणि गबी अॅलनच्या स्विंगचा समर्थपणे मुकाबला करत रिचर्डसनने अडीच तासात ८३ रन्स फटकावल्या आणि वूडफूलसह १३३ रन्सची खणखणीत सलामी दिली! वूडफूलने आपल्या झुंजार खेळाचं पुन्हा एकदा प्रदर्शन घडवलं. लारवूडचे अनेक चेंडू त्याच्या सर्वांगावर आदळूनही वूडफूल निश्चलपणे उभा होता! वॉली हॅमंडला पुढे सरसावून फटकवण्याचा रिचर्डसनचा प्रयत्न फसल्याने अखेर ही जोडी फुटली. लेस अॅमेसने रिचर्डसनला आरामात स्टंप केलं!
तिसर्या क्रमांकावर खेळायला आलेल्या ब्रॅडमनचं स्वागत जार्डीनने केलं ते लेग ट्रॅप लावूनच! लारवूडच्या शॉर्टपीच चेंडूना अॅडलेड इतकी उसळी मिळत नसली तरी ब्रॅडमनला ते आरामात खेळता येत नव्हते. मेलबर्न आणि अॅडलेडप्रमाणेच लेगस्टंपच्या बाहेर जाऊन ऑफला फटके मारण्याचं तंत्र ब्रॅडमनने इथे अंमलात आणलं. वूडफूल-ब्रॅडमन यांनी ६७ रन्स जोडल्यावर टॉमी मिचेलने वूडफूलला बोल्ड करुन ही जोडी फोडली! चार तासात २३२ चेंडूंचा सामना करत वूडफूलने ६७ रन्स काढल्या होत्या! ऑस्ट्रेलिया २००/२!
स्टॅन मॅकेबने आपला नेहमीचा आक्रमक पवित्रा घेत लारवूड आणि अॅलनवर प्रतिहल्ला चढवण्यास सुरवात केली. २८ चेंडूत ४ चौकारांच्या सहाय्याने त्याने २० रन्स फटकावल्या, परंतु अॅडलेडप्रमाणेच इथेही पूल करण्याचा प्रयत्न त्याच्या अंगाशी आला. मिडविकेटला जार्डीनने झेप घेत त्याचा कॅच घेतला. ऑस्ट्रेलिया २३३/३!
ब्रॅडमन आणि पॉन्सफोर्ड यांनी दिवसाअखेरीपर्यंत आणखीन पडझड होणार नाही याची काळजी घेत ऑस्ट्रेलियाला २५१/३ अशा सुस्थितीत आणलं होतं. बॉडीलाईनचा मुकाबला करत ब्रॅडमनने ७१ पर्यंत मजल मारली होती, पण ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांच्या दृष्टीने खास आनंदाची बाब म्हणजे..
लारवूडला दिवसभरात एकही विकेट मिळाली नव्हती!
परंतु दुसर्या दिवशी लारवूडने आपला इंगा दाखवलाच!
ब्रॅडमन आणि पॉन्सफोर्डने सावधपणे खेळत ऑस्ट्रेलियाला २६४ पर्यंत पोहोचवलं. जार्डीनने बॉडीलाईन बॉलिंग करण्याची लारवूडला सूचना केली, परंतु लेग ट्रॅप लावण्यापूर्वीच लारवूडच्या आऊटस्विंगरवर ब्रॅडमनचा ऑफस्टंप उखडला गेला! आदल्या दिवशीच्या ७१ रन्समध्ये ब्रॅडमन फक्तं ५ ची भर घालू शकला होता! ब्रॅडमन बाद झाल्याच्या धक्क्यातून ऑस्ट्रेलिया सावरते तोच लारवूडने इनस्विंगवर पॉन्सफोर्डचा (१९) मिडलस्टंप उडवला! ब्रॅडमन-पॉन्सफोर्ड हे अनुभवी बॅट्समन लागोपाठ बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाची अवस्था २६७/५ अशी झाली!
टेस्टमध्ये पदार्पण करणार्या लेन डार्लिंग आणि अर्नी ब्रॉमले यांनी लारवूड आणि कंपनीचा कसून मुकाबला केला. परंतु दोघांनी ३५ रन्स जोडल्यावर विकेटकिपर अॅमेसने अॅलनच्या बॉलिंगवर डार्लिंगचा कॅच घेतला. ब्रॉमलेने लव्हच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु लारवूडच्या शॉर्टपीच बॉलवर व्हॅरेटीने लेग ट्रॅपमध्ये त्याचा कॅच घेतला. एका बाजूने बचावात्मक खेळणार्या लव्हला मिचेलने एल बी ड्ब्ल्यू केल्यावर लारवूड आणि हॅमंडने ३४० वर ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज संपुष्टात आणली.
ऑस्ट्रेलियाच्या ३४० रन्सच्या प्रत्युत्तरादाखल जार्डीन-सटक्लीफ यांनी सावधपणे सुरवात करत दिवसाअखेरीस ९९/० पर्यंत मजल मारली. दुसर्या दिवशी इंग्लंड ११४ वर पोहोचल्यावर बिल ओ रेलीच्या बॉलिंगवर विकेटकिपर लव्हने जार्डीनचा कॅच घेऊन ही जोडी फोडली. सव्वातीन तासातील १९१ चेंडूत जार्डीनने ४६ रन्स काढल्या! जार्डीन परतल्यावर सटक्लीफ-हॅमंड यांनी ४३ रन्स जोडल्यावर ओ रेलीनेच सटक्लीफला एल बी डब्ल्यू पकडलं. साडेचार तासात १० चौकारांसह सटक्लीफने ८६ रन्स काढल्या होत्या!
सटक्लीफ परतल्यावर इंग्लंडच्या मधल्या फळीतील एकाही बॅट्समनला मोठी इनिंग्ज खेळता आली नाही. हॅमंडला (२०) मॅकेबने बोल्ड केल्यावर वॅट (१२), लेलँड (१२) आणि अॅलन(१३) ठराविक अंतराने बाद झाल्यामुळे इंग्लंडची अवस्था २१६/६ अशी झाली होती! त्यातच एडी पायन्टर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असल्याने तो बॅटींगला येण्याची शक्यता नव्हती!
परंतु पायन्टर ही काय चीज आहे हे ऑस्ट्रेलियाला माहीत नव्हतं!
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंग्जमध्ये दिवसभर फिल्डींग केल्यावर एडी पायन्टरची तब्येत बिघडली होती. डॉक्टरी तपासणीनंतर पायन्टरला अॅक्यूट टॉन्सिल्सने ग्रासलं असल्याचं निदान झालं होतं! पायन्टरची रवानगी ताबडतोब ब्रिस्बेनच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली! इंग्लंडच्या पहिल्या इनिंग्जमध्ये तरी तो बॅटींगला येण्याची शक्यता नाही असं टाईम्सने नमूद केलं होतं!
दुसर्या दिवसाचा खेळ संपल्यावर जार्डीन पायन्टरला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा त्याची परिस्थिती बरीच सुधारलेली असल्याचं जार्डीनला आढळलं. इंग्लंड ९९/० अशा सुस्थितीत असल्याने जार्डीनला फारशी चिंता वाटत नव्हती. त्याने गमतीच्या सुरात पायन्टरला गरज पडल्यास बॅटींगला जाशील का असं विचारल्यावर परिणामांचा विचारही न करता पायन्टर उत्तरला,
"Even if I have to break bounds and bat on crutches I would do so, if it is humanly possible."
दुखापतीमुळे या मॅचमध्ये खेळू न शकलेला बिल व्होस पायन्टरच्या जोडीला हॉस्पिटलमध्ये थांबला होता. ९९/० पासून इंग्लंडची घसरगुंडी उडाल्याची बातमी कळताच पायन्टर व्होसबरोबर टॅक्सीने हॉस्पिटलमधून थेट मैदानात पोहोचला! पायन्टर ड्रेसिंगरुममध्ये आला तेव्हा मॉरीस लेलँडच्या रुपात नुकतीच इंग्लंडची ५ वी विकेट गेली होती. २१६ वर अॅलन बाद झाल्यावर लेस अॅमेसच्या जोडीला पायन्टर मैदानात उतरला!
पायन्टर हॉस्पिटलमधून मैदानावर येऊन थेट बॅटींगला उतरेल अशी ब्रिस्बेनवर हजर असलेल्या प्रेक्षकांपैकी कोणालाही अपेक्षा नव्हती!
तो खेळायला आल्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं!
एका इंग्लिश खेळाडूच्या जिद्दीला आणि ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी मनापासून दिलेली दाद होती ती!
ती देखिल अशा मालिकेत जिथे इंग्लिश खेळाडूंच्या नावाने प्रेक्षकांनी अनंत शिव्याशाप दिले होते!
आयर्नमाँगरच्या बॉलिंगवर डार्लिंगने अॅमेसचा (१७) कॅच घेतला तेव्हा इंग्लंडची अवस्था २२५/७ अशी झाली होती. पायन्टरला साथ देण्यास उतरलेला लारवूड क्रीजमध्ये पोहोचला तेव्हा पायन्टरची अवस्था पाहून तो हादरलाच!
"I'll never forget his face," लारवूड म्हणतो, "He looked white and ill. At no time a great talker, he had even less to say that day than usual. He had the shakes. He remained pale throughout but never wavered. I also recall how considerate Woodfull was to him every moment of his innings!"
वूडफूलची रनर घेण्याची सूचना पायन्टरने नाकारली. कमालीच्या तीव्र उकाड्यात बॅटींग करताना सुरवातीचा तासाभर पायन्टरला बराच त्रास होत होता, परंतु त्याला कसलीच पर्वा नव्हती. तासाभरात त्याने अवघ्या १० रन्स काढल्या होत्या! परंतु महत्वाचं म्हणजे तो ठामपणे एका बाजूला उभा होता! मॅकेबने लारवूडला (२३) बोल्ड केल्यावर पायन्टरने व्हॅरेटीच्या साथीने दिवसाचा उरलेला वेळ खेळून काढला! इंग्लंड २७१/८!
पायन्टर पुन्हा हॉस्पिटलमध्ये परतला तेव्हा तो २४ वर नाबाद होता!
चौथ्या दिवशी सकाळी पायन्टर पुन्हा हॉस्पिटलमधून बॅटींग करण्यास मैदानावर हजर झाला होता! ऑस्ट्रेलियन बॉलिंगचा समर्थपणे समाचार घेत व्हॅरेटीच्या सहाय्याने त्याने ९२ रन्स जोडल्या! त्यात व्हॅरेटीचा वाटा होता २३! कमालीच्या उष्ण हवामानात केवळ जिद्द, झुंजार वृत्ती आणि आपल्या टीमसाठी काहीही करण्याची तयारी याच्या बळावर शारिरीकदृष्ट्या सक्षम नसतानाही पायन्टरने चार तासात १० चौकारांच्या सहाय्याने ८३ रन्स फटकावल्या! आयर्नमाँगरच्या बॉलिंगवर अखेर रिचर्डसनने त्याचा कॅच घेतला तेव्हा इंग्लंडचा स्कोर होता ३५६/९!
जार्डीन म्हणतो,
"Had he been stronger, he would probably have added considerably to this number, but he was still a sick man and the weather was tropical as ever!"
वूडफूलनेही पायन्टरची मुक्त कंठाने स्तुती केली. तो म्हणतो,
"Eddie's innigs was one of the most brilliant display of shear grit, determination & bloody minded dedication for the team!"
मितभाषी पायन्टरची प्रतिक्रीया अगदीच साधी होती.
"It was not more than a sore throat!"
पायन्टरपाठोपाठ मिचेल बाद झाल्याने इंग्लंडची इनिंग्ज ३५६ वरच संपुष्टात आली. पहिल्या इनिंग्जमध्ये इंग्लंडला १६ रन्सचा लहानसाच लीड मिळाला होता!
पायन्टरचं अद्यापही समाधान झालेलं नव्हतं. इंग्लंडच्या दुसर्या इनिंग्जमध्ये दोन तास फिल्डींग केल्यावर तो अखेर हॉस्पिटलमध्ये परतला!
दुसर्या इनिंग्जमध्येही ऑस्ट्रेलियाची सुरवात चांगली झाली. रिचर्डसन-वूडफूल यांनी ४६ रन्सची सलामी दिल्यावर व्हॅरेटीच्या बॉलिंगवर जार्डीनने रिचर्डसनचा (३२) कॅच पकडला. ब्रॅडमनने बॉडीलाईनविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला खरा, परंतु ३१ चेंडूत २४ रन्स केल्यावर मिचेलने लारवूडच्या बॉलिंगवर लेग ट्रॅपमध्ये ब्रॅडमनचा कॅच घेतला! ऑस्ट्रेलिया ७९/२!
ब्रॅडमन परतल्यावर आलेला पॉन्सफोर्ड केवळ ४ चेंडू टिकला! गबी अॅलनच्या बॉलिंगवर लारवूडने त्याचा कॅच घेतला. पॉन्सफॉर्डला भोपळाही फोडता आला नाही. आणखीन १० रन्सची भर पडते तोच मिचेलच्या बॉलिंगवर हॅमंडने वूडफूलचा (१९) कॅच घेतल्यावर ऑस्ट्रेलियाची अवस्था ९१/४ अशी झाली होती!
मॅकेब आणि डार्लिंगने ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज सावरण्याचा प्रयत्न करण्यास सुरवात केली. आपल्या आक्रमक पवित्र्याला मुरड घालून मॅकेबने बचावात्मक खेळावर भर दिला. जार्डीनच्या लेग ट्रॅपचा मॅकेब आणि डार्लिंगवर कोणताही परिणाम झाला नाही. ते दोघं लारवूडचं बॉडीलाईन आक्रमणा आरामात खेळून काढत आहेत असं निदर्शनास आल्यावर जार्डीनने व्हॅरेटी आणि मिचेल यांच्या स्पिनचा आधार घेतला.
जार्डीनची ही चाल यशस्वी ठरली. मॅकेब आणि डार्लिंगने ४५ रन्स जोडल्यावर व्हॅरेटीने गुगलीवर मॅकेबची ऑफस्टंप उडवली! ब्रोमले फारसं काही करु शकला नाही. अॅलनच्या बॉलिंगवर हॅमंडने त्याचा कॅच घेतला. हे कमी होतं म्हणूनच की काय एका बाजूने अगदी आरामात खेळत असलेला डार्लिंग लव्हच्या चुकीमुळे रन आऊट झाला! ८० चेंडूत ३ चौकारांसह डार्लिंगने ३९ रन्स काढल्या होत्या. इंग्लंड १६९/७!
डार्लिंग परतल्यावर लारवूड आणि अॅलन यांनी ऑस्ट्रेलियाला फारशी संधीच दिली नाही. लारवूडने लव्हला एल बी ड्ब्ल्यू पकडलं. अॅलनच्या बॉलिंगवर जार्डीनने वॉलचा कॅच घेतल्यावर बिल ओ रेलीला बोल्ड करुन लारवूडने ऑस्ट्रेलियाला १७५ मध्ये गुंडाळलं!
अॅशेस जिंकण्यासाठी चौथ्या इनिंग्जमध्ये इंग्लंडला १६० रन्सची आवश्यकता होती!
इंग्लंडच्या इनिंग्जची सुरवात अडखळतीच झाली. सटक्लीफ सुरवातीपासूनच चाचपडत होता. टिम वॉलच्या बॉलवर डार्लिंगने त्याचा कॅच घेतला. इंग्लंड ५/१!
सटक्लीफ परतल्यावर आलेल्या मॉरीस लेलँडने मात्रं कोणताही धोका न पत्करता फटकेबाजीला सुरवात केली. लेलँड-जार्डीन यांनी ७३ रन्सची पार्टनरशीप केली. यात जार्डीनचा वाटा होता तो २४ रन्सचा. परंतु या २४ रन्स काढण्यासाठी त्याला अपरिमीत संघर्ष करावा लागला होता. एका वेळेस तर तब्बल तासाभरातील ८२ चेंडूत त्याने एकही रन काढली नव्हती! अखेर सव्वादोन तासात ११२ चेंडूत २४ रन्स केल्यावर आयर्नमाँगरच्या बॉलिंगवर जार्डीन एल बी डब्ल्यू झाला!
जार्डीन बॅटींग करत असताना त्याच्या कमालीच्या धीमेपणाने खेळण्यामुळे प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडवण्यास सुरवात केली. आपल्या या इनिंग्जवर स्वतः जार्डीनही कमालीचा नाखूष होता. दिवसाचा खेळ संपल्यावर बिल ओ रेलीशी गाठ पडल्यावर आपल्या इनिंग्जचं वर्णन करताना जार्डीन उद्गारला,
"I was batting like an old maid defending her virginity!"
दिवसाअखेरीस इंग्लंडने १०७/२ अशी मजल मारलेली होती!
लेलँड ६६ रन्स काढून नाबाद होता!
अॅशेस जिंकण्यासाठी इंग्लंडला अवघ्या ५३ रन्सची आवश्यकता होती!
आतापर्यंतच्या चार टेस्टसमध्ये लारवूडने २८ विकेट्स घेतल्या होत्या. बॉडीलाईन बॉलिंगचा वापर करुनही त्याची ही कामगिरी दुर्लक्षण्यासारखी नव्हती. ब्रिस्बेनला पाचव्या दिवसाअखेरीस लारवूडला एक अनपेक्षीत तार आली. त्यात लिहीलं होतं,
"Congratulations magnificent bowling. Good luck all matches."
ही तार पाठवली होती ती शेफील्ड शील्डमध्ये ब्रॅडमनच्या तोडीस तोड म्हणून ओळखला जाणारा तरूण तडफदार बॅट्समन आर्ची जॅक्सन याने! जॅक्सन टी बी च्या विकारामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होता. तिथूनच त्याने लारवूडला ही तार पाठवली होती! दुर्दैवाने त्याच रात्री अवघ्या २३ वर्षांच्या जॅक्सनचं टी बी मुळे निधन झालं!
जॅक्सनच्या स्मरणार्थ दुसर्या दिवशी सर्व खेळाडू काळी पट्टी लावून मैदानात उतरले. आयर्नमाँगरच्या बॉलिंगवर ब्रोमलेने हॅमंडचा (१४) कॅच घेतला. लेलँडने अॅमेसच्या साथीने २० रन्स जोडल्यावर बिल ओ रेलीच्या बॉलिंगवर मॅकेबने लेलँडचा कॅच घेतला. लेलँडने १० चौकारांसह ८६ रन्स फटकावल्या! इंग्लंड १३८/४!
अद्याप विजयासाठी इंग्लंडला २२ रन्सची आवश्यकता होती. अशा वेळी बॅटींगला कोण यावं?
एडी पायन्टर!
स्टॅन मॅकेबच्या बॉलिंगवर मिडविकेटवरुन षटकार खेचत पायन्टरने इंग्लंडला विजय मिळवून दिला!
"Eddie was the reason we won the Brisben test!" लारवूड म्हणतो, "Without his score England would not have won the match".
इंग्लंडने अॅशेस मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली असली तरी जॅक्सनच्या दुर्दैवी मृत्यूमुळे विजयाचं सेलिब्रेशन मात्रं फारसं झालं नाही!
ऑस्ट्रेलियन संघातील काही खेळाडू जॅक्सनच्या कॉफीनबरोबर दुसर्या दिवशी सिडनीला परतले!
मालिकेतली पाचवी आणि शेवटची टेस्ट पुन्हा सिडनीच्या मैदानात रंगणार होती!
जगातील सर्वात फास्ट आणि बाउन्स असलेली विकेट म्हणून विख्यात असलेल्या पर्थला या मालिकेतली एकही मॅच नव्हती. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या टोकाला असलेल्या पर्थला पोहोचणं हे त्याकाळी जिकीरीचं होतं. ट्रान्सकॉन्टीनेंटल रेल्वे सुरु झाल्यावरही पर्थला पोहोचण्यास अनेक दिवस लागत होते. नियमित विमानसेवा सुरु झाल्यावर १९७० च्या डिसेंबरमध्ये पर्थला पहिली टेस्टमॅच खेळवण्यात आली!
पर्थच्या विकेटवर लारवूड आणि व्होसला तोंड देताना ऑस्ट्रेलियाची काय अवस्था झाली असती याची कल्पनाही करणं अशक्यं आहे!
इंग्लंडने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतलेली होती. अॅशेस परत मिळवण्याचं जार्डीनचं उद्दीष्टं पूर्ण झालं होतं. त्यामुळे सिडनीतील मॅचमधून आपल्याला विश्रांती मिळावी अशी लारवूडने जार्डीनला विनंती केली. जार्डीन उत्तरला,
"We've got the bastards down there, and we'll keep them there."
(सुमारे ४३ वर्षांनी १९७६ मध्ये वेस्ट इंडीजचा संघ इंग्लंड दौर्यावर येण्यापूर्वी इंग्लिश कॅप्टन टोनी ग्रेगने जवळपास याच स्वरुपाचं आणि अत्यंत वादग्रस्तं ठरलेलं वक्तव्यं केलं होतं.
"These guys, if they get on top they are magnificent cricketers. But if they're down, they grovel, and I intend, with the help of Closey (Brian Close) and a few others, to make them grovel."
ग्रॉव्हेल हा शब्द वेस्ट इंडीयन माणसाच्या दृष्टीने अत्यंत अपमानास्पद आहे आणि तो देखिल जिथे अपार्थाईड व्यवस्था जोरात होती, तिथला मूळचा दक्षिण आफ्रीकन असलेल्या टोनी ग्रेगने वापरल्यामुळे भडकलेल्या वेस्ट इंडीज संघाने ग्रेग आणि कंपनीचे जे काही हाल केले ते सर्वांनाच माहीत आहे! )
शेवटच्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन संघाच ४ बदल करण्यात आले होते. अॅडलेडला अपयशी ठरलेल्या पॉन्सफोर्डच्या जागी लिओ ओब्रायन संघात परतला होता. ब्रोमलेल्या जागी पर्कर ली ची निवड करण्यात आली होती. एव्हाना बरा झालेला बर्ट ओल्डफिल्ड परतल्यामुळे विकेटकीपर लव्हला आपली जागा खाली करावी लागली. (लव्हची पुन्हा कधीच ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली नाही!). टिम वॉलचा पाय दुखावला होता त्यामुळे त्याच्या ऐवजी फास्ट बॉलर हॅरी 'बुल' अॅलेक्झांडरची निवड करण्यात आली होती!
१९२८-२९ च्या मोसमात इंग्लिश संघ ऑस्ट्रेलियात आलेला असताना व्हिक्टोरीयाविरुद्धच्या सामन्यात अॅलेक्झांडरची जार्डीनशी गाठ पडली होती. अॅलेक्झांडर बॉलिंग टाकताना मुद्दाम विकेटवर धावून ती खराब करण्याचा प्रयत्न करत आहे अशी जार्डीनने तेव्हा अंपायरकडे तक्रार केली होती. अंपायरने अलेक्झांडरला राऊंड-द-विकेट बॉलिंग करण्याची सूचना दिली! परिणामी त्याच्या बॉलिंगमध्ये असलेली अचूकता खूपच कमी झाली. जार्डीनने त्या मॅचमध्ये ११५ रन्स फटकावल्या होत्या!
सिडनी टेस्टमध्ये अलेक्झांडरची निवड झाली तेव्हा चार वर्षांपूर्वीची ही घटना ऑस्ट्रेलियन संघातील प्रत्येकाच्या स्मरणात होती!
इंग्लिश संघात एकच बदल करण्यात आला तो म्हणजे लेगस्पिनर टॉमी मिचेलच्या जागी दुखापतीतून सावरलेला बिल व्होस परतला होता!
२३ फेब्रुवारी १९३३...
बिल वूडफूलने मालिकेतील आपला चौथा टॉस जिंकला! टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने बॅटींग घेतली खरी पण पहिल्याच ओव्हरमध्ये एकही रन होण्यापूर्वीच जार्डीनने लारवूडच्या बॉलिंगवर रिचर्डसनचा कॅच घेतला!
ब्रॅडमन खेळायला आल्याबरोबर जार्डीनने लारवूड आणि व्होस यांच्या बॉलिंगवर लेग ट्रॅप लावला! बॉडीलाईन!
ब्रॅडमनने लेगसाईडला मागे सरकून ऑफला रन्स काढण्याचं आपलं तंत्रं इथेही अंमलात आणलं. दुसर्या बाजूने बॉडीलाईनचा मारा झेलतही वूडफूल ठामपणे उभा होता! वूडफूल-ब्रॅडमन यांनी सुमारे सव्वा तासात ५९ रन्स जोडल्यावर लारवूडने वूडफूलला (१४) बोल्ड करून ही जोडी फोडली. आणखीन ५ रन्सची भर पडते तोच लारवूडने ब्रॅडमनचा (४८) ऑफ स्टंप उखडला! ऑस्ट्रेलिया ६४/३!
मॅकेब आणि लिओ ओब्रायन यांनी ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज सावरण्यास सुरवात केली. ओब्रायनने आक्रमक धोरण स्वीकारत लारवूड आणि व्होसच्या बॉडीलाईन बॉलिंगवर प्रतिहल्ला चढवला! मॅकेब एका बाजूने आपल्या आक्रमक स्वभावाला मुरड घालून शांतपणे खेळत होता, परंतु लारवूडने लागोपाठ चार बंपर टाकल्यावर मॅकेबची सहनशीलता संपली! लारवूडच्या पुढच्या ओव्हरमध्ये त्याने सलग ३ हूक-पूलचे चौकार ठोकले!
ओब्रायन-मॅकेब यांनी ९९ रन्सची आक्रमक पार्टनरशीप केल्यावर व्होसने ही जोडी फोडली. त्याचा शॉर्टपीच बॉल हूक करण्याचा ओब्रायनचा प्रयत्न फसला आणि लाँगलेगला लारवूडने त्याचा कॅच घेतला. ८८ चेंडूत ७ चौकारांसह ओब्रायनने ६१ रन्स तडकावल्या होत्या! ओब्रायन परतल्यावर मॅकेबची जोडी जमली ती लेन डार्लिंगशी. या दोघांनी ८१ रन्स जोडल्यावर व्हॅरेटीच्या बॉलिंगवर हॅमंडकडे कॅच देऊन मॅकेब परतला. तीन तासात १२९ चेंडून ११ चौकारांसह मॅकेबने ७३ रन्स फटकावल्या होत्या! शतक झळकावण्यात मॅकेब अपयशी ठरला असला तरी त्याच्या प्रतिहल्ल्यामुळे जार्डीनला बॉडीलाईन बॉलिंग बंद करणं भाग पडलं होतं!
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा डार्लिंग आणि ओल्डफिल्ड यांनी ऑस्ट्रेलियाला २९६/५ अशा सुस्थितीत आणलं होतं!
दुसर्या दिवशी सकाळी ऑस्ट्रेलिया ३२८ वर पोहोचल्यावर व्हॅरेटीला ड्राईव्ह मारण्याचा डार्लिंगचा प्रयत्न पार फसला आणि तो बोल्ड झाला! अडीच तासात ८ चौकारांसह डार्लिंगने ८५ रन्स ठोकल्या होत्या! डार्लिंग परतल्यावर आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये खेळणार्या फिलीप 'पर्कर' लीने इंग्लिश बॉलिंगवर हल्ला चढवला! अवघ्या ३५ मिनीटांत लीने ओल्डफिल्डसह ५७ रन्स जोडल्या, त्यात ली चा वाटा होता ४२! अवघ्या ४४ चेंडून ७ चौकार ठोकणार्या ली चा व्हॅरेटीच्या बॉलवर जार्डीनने कॅच घेतला तेव्हा इंग्लंडला हायसं वाटलं असावं! ऑस्ट्रेलिया ३८५/७!
ली परतल्यावर बिल ओ रेली खेळायला आला तेव्हा लारवूड जबरदस्त वेगाने बॉलिंग टाकत होता. खेळायला सुरवात करण्यापूर्वी आपल्या स्टंप्सकडे निर्देश करत रेली लारवूडला म्हणाला,
"Here they are, Harold, you can have them!"
बॉडीलाईनला तोंड देण्यापेक्षा बाद होणं श्रेयस्कर आहे असा बहुतेक त्याने विचार केला असावा!
ओल्डफिल्डने बिल ओ रेलीसह २९ रन्स जोडल्या, परंतु मिडविकेटवरुन जार्डीनने केलेल्या डायरेक्ट थ्रो मुळे ओल्डफिल्ड रन आऊट झाला. मेलबर्नला कवटीचं हाड फ्रॅक्चर होऊनही पुन्हा बॉडीलाईनचा मुकाबला करत ओल्डफिल्डने अडीच तासात ५२ रन्स काढल्या होत्या! ओल्डफिल्ड परतल्यावर बुल अलेक्झांडरने थोडीफार फटकेबाजी केली, पण गबी अॅलनने ओ रेलीची दांडी उडवली! लारवूडने आयर्नमाँगरला बोल्ड करुन ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज संपुष्टात आणली!
ओब्रायन, मॅकेब, डार्लिंग, ओल्डफिल्ड आणि नंतर लीच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंग्जमध्ये ४३५ पर्यंत मजल मारली!
या मालिकेतला त्यांचा हा सर्वोच्च स्कोर होता!
अर्थात ऑस्ट्रेलियन बॅट्समनच्या कौशल्याइतकाच इंग्लंडच्या गचाळ फिल्डींगचाही त्यात महत्वाचा वाटा होता. इंग्लिश फिल्डर्सनी एकूण चौदा कॅच सोडले होते!
ऑस्ट्रेलियाच्या ४३५ रन्सच्या प्रत्युत्तरादाखल खेळायला उतरलेल्या इंग्लंडला जार्डीन-सटक्लीफ यांनी ३१ रन्सची सलामी दिल्यावर बिल ओ रेलीच्या बॉलिंगवर ओल्ड्फिल्डने जार्डीनचा कॅच घेतला. जार्डीन परतल्यावर आलेला हॅमंड मात्रं सुरवातीपासूनच आत्मविश्वासाने खेळत होता. हॅमंड-सटक्लीफ यांनी सुमारे दोन तासात १२२ रन्सची पार्टनरशीप केल्यावर बिल ओ रेलीने ही जोडी फोडली. १३७ चेंडूत ५६ रन्स करणार्या सटक्लीफचा रिचर्डसनने कॅच घेतला. सटक्लीफ बाद झाल्यावर नाईटवॉचमन म्हणून जार्डीनने कोणाला पाठवावं?
हॅरॉल्ड लारवूड!
चौथ्या दिवशी सकाळी १५९/२ वरुन हॅमंड-लारवूड यांनी खेळण्यास सुरवात केली. आदल्यादिवशी सहजपणे ७२ रन्स काढणारा हॅमंड सकाळपासून सकाळपासून अडखळतच खेळत होता. बिल ओ रेली, आयर्नमाँगर आणि ली यांच्या स्पिन बॉलिंगला तोंड देणं त्याला चांगलंच कठीण जात होतं.
आणि लारवूड?
नाईटवॉचमन म्हणून आलेला लारवूड आरामात खेळत होता! ऑस्ट्रेलियन स्पिनर्सना फटकावून काढण्याचं त्याने धोरण अवलंबलं होतं! आयर्नमाँगरच्या एका बॉलवर त्याने पुढे सरसावत जोरदार षटकार चढवला! फास्ट बॉलर अलेक्झांडरला बिनधास्तपणे फ्रंटफूटवर येत तो ड्राईव्ह करत होता! आपल्याला बंपर टाकण्याची अलेक्झांडर आणि मॅकेबची हिम्मत होणार नाही याची त्याला पक्की खात्री होती! हॅमंडबरोबरच्या त्याच्या ९२ रन्सच्या पार्टनरशीपमध्ये हॅमंडचा वाटा होता फक्तं २९!
लंचपूर्वी हॅमंडने या मालिकेतलं दुसरं शतक पूर्ण केलं. मात्रं पुढच्याच ओव्हरमध्ये लीच्या बॉलिंगवर हॅमंड एल बी डब्ल्यू झाला. साडेतीन तासात १० चौकारांसह हॅमंडने १०१ रन्स काढल्या होत्या.
लंचनंतर लारवूड आणि लेलँडनी तासाभरात ६५ रन्स जोडल्या. नाईटवॉचमन म्हणून आलेला लारवूड एखाद्या बॅट्समनप्रमाणे मोठ्या झोकात खेळत होता. तो शतक झळकावणार असं वाटत असतानाच ली ला फ्लिक मारण्याचा लारवूडचा प्रयत्न फसला आणि शॉर्टलेगला आयर्नमाँगरने त्याचा कॅच घेतला. इंग्लंड ३१०/४!
सव्वादोन तासात १४८ चेंडूत १० चौकार आणि आयर्नमाँगरला मारलेल्या षटकारासह लारवूडने ९८ रन्स फटकावल्या होत्या!
लारवूड ड्रेसिंगरुममध्ये परतल्यावर जार्डीन त्याला म्हणाला,
"You little bastard, I knew you could play!"
लारवूड परतल्यावर इंग्लंडच्या मधल्या फळीतील बॅट्समन ठराविक अंतराने बाद होत गेले. लेलँड आणि वॅट यांच्यात उडालेल्या गोंधळाची परिणीती लेलँड रन आऊट होण्यात झाली. अॅमेसही वॅटबरोब उडालेल्या गोंधळामुळेच रन आऊट झाला. पायन्टरला ली ने बोल्ड केल्यावर वॅट आणि गबी अॅलन यांनी ४४ रन्स जोडल्या. बॉब वॅटने आपल्या लौकीकाला साजेशी सथ इनिंग्ज खेळत सव्वातीन तासात ५१ रन्स केल्या! दिवसाच्या अखेरच्या ओव्हरमध्ये अखेर बिल ओ रेलीच्या बॉलवर आयर्नमाँगरने त्याचा कॅच घेतला तेव्हा इंग्लंड ४१८/७ अशा सुस्थितीत आलेलं होतं.
चौथ्या दिवशी सकाळी गबी अॅलनच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडने ४५४ पर्यंत मजल मारली! ६ चौकारांसह अॅलनने ४८ रन्स फटकावत इंग्लंडला पहिल्या इनिंग्जमध्ये १९ रन्सचा लीड मिळवून दिला!
पहिल्या इनिंग्जप्रमाणेच दुसर्या इनिंग्जमध्येही ऑस्ट्रेलियाला सुरवातीलाच पहिला धक्का बसला. एकही रन काढण्यापूर्वी लारवूडच्या बॉलवर लेग ट्रॅपमध्ये अॅलनने रिचर्डसनचा कॅच घेतला! दोन्ही इनिंग्जमध्ये रिचर्डसनला भोपळा फोडता आला नाही!
रिचर्डसन परतल्यावर आलेल्या ब्रॅडमनने मात्रं सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. लारवूड आणि व्होसच्या बॉडीलाईन बॉलिंगला लेगस्टंपच्या बाहेर जात ऑफसाईडला फटकवण्याचं धोरण त्याने इथेही अवलंबलं होतं! वुडफूलबरोबर त्याने ११५ रन्सची आक्रमक पार्टनरशीप केली. गोल्फ आणि टेनिसशी साधर्म्य सांगणारे शॉट्स मार्त ब्रॅडमनने दीड तासात ६९ चेंडूत ९ चौकारांसह ७१ रन्स फटकावल्या!
ब्रॅडमन पूर्ण भरात बॅटींग करत असताना लारवूडचा पाय दुखावला होता! जार्डीनकडे त्याने ड्रेसिंगरुममध्ये परत जाऊन पायावर उपचार करुन घेण्याची परवानगी मागितली तेव्हा जार्डीन तीक्ष्ण सुरात त्याला म्हणाला,
"You can't go off while the little bastard''s in!"
लारवूडच्या दुखावलेल्या पायाची यत्किंचीतही पर्वा न करता जार्डीनने त्याला फिल्डींग करण्याची सक्त सूचना केली! लारवूडला बॉलिंग करायला लावणं त्याला शक्यं नसलं तरी ब्रॅडमनवर दडपण ठेवण्यासाठी लारवूड मैदानात हजर राहणं आवश्यक आहे असं जार्डीनचं मत होतं!
अखेर हॅडली व्हॅरेटीच्या एका बॉलवर फ्लाईटचा अंदाज न आल्याने ब्रॅडमन फसला आणि त्याचा ऑफस्टंप उडाला!
लारवूड आणि ब्रॅडमन दोघंही मैदानातून एकाच वेळेस बाहेर पडले!
एकमेकाकडे लक्षं ही न देता!
एकमेकाच्या अस्तित्वाची दखलही न घेता!
ब्रॅडमन परतल्यावर ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली! ओब्रायन (५), मॅकेब (४), डार्लिंग (७), ओल्डफिल्ड (५) एकापाठोपाठ एक परतले. एका बाजूने ठामपणे खेळत असलेल्या वूडफूलला अॅलनने बोल्ड केल्यावर इंग्लंडची अवस्था १७७/७ अशी झाली! तीन तासात १६८ चेंडूत वूडफूलने ६७ रन्स काढल्या होत्या!
वूडफूल परतल्यावर आणखीन ५ रन्सची भर पडल्यावर ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज संपुष्टात आली. हॅडली व्हॅरेटीच्या स्पिनपुढे रेली, अलेक्झांडर टिकाव धरणं कठीणच होतं. गबी अॅलनने लीला बोल्ड करुन ऑस्ट्रेलियाला १८२ मध्ये गुंडाळलं!
टेस्ट जिंकण्यासाठी इंग्लंडला १६२ रन्सची आवश्यकता होती.
जार्डीनने इनिंग्जची सुरवात करण्यासाठी आपल्याबरोबर सटक्लीफच्या जागी वॅटला येण्याची सूचना केली! जार्डीनच्या या लहरीपणाने सटक्लीफ चकीत झाला परंतु तो काहीच बोलला नाही.
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर बुल अलेक्झांडर आणि जार्डीन यांच्यात चार वर्षांपूर्वी झालेल्या चकमकीच्या आठवणी सर्वांच्या मनात अद्यापही रेंगाळत होत्या. इंग्लंडच्या दुसर्या इनिंग्जमध्ये हा वाद पुन्हा उफाळून आला!
अलेक्झांडर मुद्दाम विकेटवर धावत जात ती खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचे जार्डीनने अंपायर जॉर्ज हेलकडे तक्रार केली!
जार्डीनची ही तक्रार सर्वस्वी चुकीची नव्हती परंतु आधीच बॉडीलाईन डावपेचांनी भडकलेल्या सिडनीच्या प्रेक्षकांनी जार्डीनला उद्देशून सरळ शिव्या घालण्यास सुरवात केली! वैतागलेला जार्डीन अंपायर हेलला म्हणाला,
"All these uneducated and unruly people don’t know a thing about cricket!"
अंपायर हेलने अलेक्झांडरला विकेटवर न धावण्याबद्दल आणि राऊंड द विकेट बॉलिंग करण्याची सूचना दिली. भडकलेल्या अलेक्झांडरने जार्डीनवर शॉर्टपीच बॉलिंगने हल्ला चढवला! तीन ओव्हर्समध्ये त्याने जार्डीनला १६ बंपर्स टाकले! अलेक्झांडरच्या प्रत्येक बंपरला सिडनीचे प्रेक्षक प्रोत्साहन देत होते!
जार्डीनच्या बॉडीलाईन डावपेचांना थोडंफार प्रत्युत्तर दिलं ते अलेक्झांडरनेच!
फक्तं त्याने लेग ट्रॅप लावलेला नव्हता!
अलेक्झांडरच्या या बंपर्सपैकी वेगात आलेला एक बॉल जार्डीनच्या कमरेवर बसला!
सिडनीच्या प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलियाने अॅशेस जिंकल्याच्या अविर्भावात जल्लोष केला!
जार्डीनच्या नावाने जोरदार शिमगा सुरु झाला!
अलेक्झांडर अत्यानंदाने चित्कारला,
"I've killed him! I've killed him!"
जार्डीनच्या चेहर्यावर वेदनेचा लवलेशही नव्हता!
कमरेवर बॉल बसल्यावर निश्चितच त्याला चांगलाच मार बसला होता. परंतु फास्ट लेग थिअरी यशस्वीपणे खेळता येऊ शकते या आपल्या ठाम मताच्या पुष्ट्यर्थ वेदनेचं प्रदर्शन करणं बहुधा त्याला कमीपणाचं वाटत असावं!
दिवसभराचा खेळ संपला तेव्हा जार्डीन आणि वॅट दोघंही नाबाद होते!
अनेक वर्षांनंतर त्या घटनेबद्दल आणि जार्डीनबद्दल बोलताना अलेक्झांडर म्हणाला,
"Jardine pissed me off by accusing that I was intentionally running on the pitch. I tried to knock his head off, but he was a bloody tough bloke with tons of guts!"
शेवटच्या दिवशी जार्डीन-वॅट यांनी ऑस्ट्रेलियाचा स्कोर ४३ पर्यंत पोहोचवल्यावर आयर्नमाँगरच्या बॉलिंगवर रिचर्डसनने जार्डीनचा (२४) कॅच घेतला. एकाही रनची भर पडण्यापूर्वीच आयर्नमाँगरने मॉरीस लेलँडची दांडी गुल केल्यामुळे इंग्लंडची अवस्था ४३/२ अशी झाली. आयर्नमाँगरचे बॉल सिडनीच्या विकेटवर प्रचंड प्रमाणात वळत होते आणि मधूनच उसळी मारून वर येत होते. लेलँडनंतर खेळायला आलेला हॅमंड पहिल्याच बॉलवर बोल्ड होताहोता कसाबसा वाचला!
इंग्लंडवर दडपण आणण्यासाठी वूडफूलने सर्व फिल्डर्स बॅट्समनला घेरुन उभे केले होते!
वॅट आणि हॅमंड यांनी सावधपणे खेळत बॉलर्सना दमवण्याचा आणि निष्प्रभ करण्याचा पवित्रा घेतला! पहिल्या तासाभरात केवळ ३० रन्स काढल्यावर हॅमंडने आक्रमक पवित्रा घेत आयर्नमाँगरला मिडऑनवरुन तडाखेबंद षटकार खेचला! हॅमंडच्या आ अनपेक्षित पवित्र्याने गोंधळलेल्या आयर्नमाँगरची लय पार बिघडून गेली! हॅमंड आणि वॅट यांनी मग आक्रमक फटकेबाजी करत जेमतेम तासाभरात ९२ रन्स फटकावल्या! वॅट ६१ तर हॅमंड ७५ वर नाबाद राहिला! आयर्नमाँगरलाच दुसरा षटकार खेचत हॅमंडने इंग्लंडला विजय मिळवून दिला!
जार्डीनच्या नेतृत्वाखाली खेळणार्या इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ४-१ असा पराभव करुन अॅशेस मालिका जिंकली!
बॉडीलाईन बॉलिंगचं - इंग्लिश खेळाडूंच्या शब्दात फास्ट लेग थिअरीचं मुख्य टार्गेट होता तो म्हणजे ब्रॅडमन!
आतापर्यंतच्या कारकिर्दीत सुमारे १०० च्या अॅव्हरेजने खेळणार्या ब्रॅडमनने या मालिकेत ५६.५७ च्या अॅव्हरेजने ३९६ रन्स फटकावल्या खर्या, परंतु ज्या पद्धतीने तो खेळला त्यामुळे त्याचावर बरीच टीका करण्यात आली. क्रीजमध्ये ताठ उभं राहून बॉलचा मुकाबला न करता बॉलच्या लाईनमधून बाजूला लेगसाईडला जात मोकळ्या असलेल्या ऑफसाईडला बॉल फटकावण्याच्या त्याच्या तंत्रावर अनेकांनी नापसंती व्यक्तं केली. टेनिस आणि गोल्फ प्रमणे क्रिकेट खेळल्याबद्दल अनेक समिक्षकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली. वूडफूलमध्ये असलेलं धैर्य किंवा स्टॅन मॅकेबमध्ये असलेली धडाडी आणि प्रतिहल्ला करण्याची जिगर न दाखवता बॉल लागू नये म्हणून कचखाऊ बॅटींग केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला!
ऑस्ट्रेलियन बॅट्समनपैकी स्टॅन मॅकेबचा अपवाद वगळता केवळ ब्रॅडमननेच या मालिकेत शतक ठोकलं होतं! स्टॅन मॅकेबने ब्रॅडमनच्या तोडीस तोड खेळ करत मालिकेत ३८५ रन्स काढल्या होत्या!
जॅक फिंगल्टनच्या मते या मालिकेनंतर ब्रॅडमनच्या तंत्रात काही स्वाभाविक बदल घडून आला. तो म्हणतो,
"Bodyline was specially prepared, nurtured for and expended on him and, in consequence, his technique underwent a change quicker than might have been the case with the passage of time. Bodyline plucked something vibrant from his art."
जार्डीनच्या फास्ट लेग थिअरीचा सर्वात जास्तं प्रभावी वापर करण्यात यशस्वी ठरला तो लारवूडच!
लारवूडने १९.५१ च्या अॅव्हरेजने या मालिकेत तब्बल ३३ विकेट्स घेतल्या होत्या! बॉडीलाईन बॉलिंगमध्ये लारवूडचा पार्टनर असलेल्या बिल व्होसने १५ विकेट्स घेतल्या परंतु संपूर्ण मालिकेत बॉडीलाईन बॉलिंग टाकण्यास ठाम नकार देत २१ विकेट्स काढण्यात गबी अॅलन यशस्वी ठरला होता!
इंग्लंडसाठी सर्वात यशस्वी बॅट्समन ठरले ते म्हणजे हॅमंड आणि सटक्लीफ. दोघांनी नेमक्या ४४० रन्सच काढल्या होत्या! हॅमंडने २ तर सटक्लीफने १ शतकही झळकावलं होतं. या दोघांव्यतिरिक्त अशी कामगिरी केली होती ती फक्त नवाब पतौडीने! परंतु जार्डीनने मेलबर्नच्या दुसर्या टेस्टनंतर पतौडीला पुन्हा एकाही टेस्टमध्ये निवडलंच नाही!
कॅप्टन म्हणून जार्डीन यशस्वी झाला असला तरी बॅट्समन म्हणून संपूर्ण मालिकेत तो साफ अपयशी ठरला होता. संपूर्ण मालिकेत २२ च्या अॅव्हरेजने त्याने फक्तं १९९ रन्स काढल्या होत्या!
ऑस्ट्रेलियातील मालिकेत फास्ट लेग थिअरीचा सढळ वापर करुन जार्डीनने मालिका जिंकली होती खरी. पण या फास्ट लेग थिअरीचे पडसाद कुठवर उमटणार होते?
क्रमशः
प्रतिक्रिया
8 Jul 2015 - 7:58 am | श्रीरंग_जोशी
नेहमीप्रमाणेच एकदम रंगतदार वर्णन.
त्या काळात आयसीसी, मोठमोठी बक्षिसे अन प्रायोजकांचा थरार नसूनही कदाचित गेल्या वीस पंचवीस वर्षांमधल्या क्रिकेटपेक्षाही अधिक थरार त्या वेळच्या क्रिकेटमध्ये असावा असे वाटत आहे.
8 Jul 2015 - 10:33 am | सौंदाळा
मस्तच.
आज चालु होणार्या अॅशेससाठी तुम्ही वातावरण मस्त तापवले आहे.
अॅशेस मधल्या प्रत्येक चकमकीच्या वेळी ही लेखमाला आठवेल.
नाय माहीत हो. याबद्दल पण सविस्तर लिहले तर मजा येईल.
8 Jul 2015 - 12:39 pm | अविनाश पांढरकर
आज चालु होणार्या अॅशेससाठी तुम्ही वातावरण मस्त तापवले आहे.
मला पण नाही माहीत, याबद्दल पण सविस्तर लिहले तर मजा येईल.
8 Jul 2015 - 10:58 am | मृत्युन्जय
जार्डीन आणि वुडफुल या दोन्ही कप्तानांबद्दल अचानक आदर वाटायला लागला आहे. दोघेही आपापल्या जागी दर्जेदार होते. पण जार्डीनने वेळोवेळी अचानक केलेले बदल स्पृहणीय आहेत. तो एक उच्च दर्जाचा कप्तान होता असे का म्हणतात ते आत्ता कळाले.
8 Jul 2015 - 2:16 pm | पेरु
हे कमी होतं म्हणूनच की काय एका बाजूने अगदी आरामात खेळत असलेला डार्लिंग लव्हच्या चुकीमुळे रन आऊट झाला! ८० चेंडूत ३ चौकारांसह डार्लिंगने ३९ रन्स काढल्या होत्या. इंग्लंड १६९/७!>>> इथे ऑस्ट्रेलिया हवं ना?
8 Jul 2015 - 11:07 pm | स्पार्टाकस
ऑस्ट्रेलियाच!
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्हीत लिहिण्याच्या ओघात तीन-चार वेळा गल्लत झाली आहे. सगळी नावं सारखीच :)
8 Jul 2015 - 2:45 pm | चौकटराजा
या सगळ्या प्रकरणात ब्रिटनचे लॉर्ड हॅरिस यांची काही भूमिका होती. त्यांची आठवण म्हणून पुणे येथील दापोडी पुलाला हॅरोस ब्रिज असे नाव देण्यात आले आहे. भारतात क्रिकेट रुजविण्याचे श्रेय हॅरिसना दिले जाते.
8 Jul 2015 - 2:50 pm | कपिलमुनी
आवडला
8 Jul 2015 - 4:49 pm | सुधीर कांदळकर
उत्कंठावर्धक मालिका.. मूळ इंग्रजी संवाद दिल्यामुळे लज्जत वाढली. झकास. आवडली मालिका.
गबी अॅलनचे यश पाहाता कांगारूंना फांदाजी करता आली नाही हे सिद्ध होते. काही जणांच्या मए एडी पेन्टरच्या फलंदाजीने मालिकेला वेगळे वळण दिले.
मार खायला लागल्यावर कांगावा करणे ही कांगारूंची जुनीच खोड आहे. तेव्हा लारवूड, हल्लीहल्ली लंकेचा मुरलीधरन, आपला ऑफ स्पिनर आता नाव आठवत नाही. (त्याने आगरकरसोबत फलंदाजी करतांना शेवटच्या चेंडूवर सकलेनला षटकार मारून एक दिवसीय सामना जिंकून दिला होता) आणि हरभजनविरुद्धही असेच रान उठवले होते.
इंग्लंड देखील रडेगिरीत कमी नाही. त्यांच्या वृत्तपत्रांनी १९८६ मअध्ये चेतन शर्माला पण चकी म्हटले होते.
परंतु दुसरी बाजू अशी की उपासमारीची पाळी आलेल्या लारवूड आणि वर्णभेदी दक्षिण आफ्रिकेच दौरा केल्याबद्दल वेस्ट इंडीजमधून डी-पोर्ट केलेला त्यांचाच माजी यष्टीरक्षक डेव्हिड स्मिथ यांना कांगारूंनीच प्रशिक्षक म्हणून नोकर्या दिल्या. वरचढ झाले तर ते शत्रू होतात, पडलात तर हात देतात असे माजोरी आहेत.
कांगारू पंच देखील रडेच. १९७९ ची कसोटी मालिका जिंकूनही लॉईडने पंचकगिरीबद्दल तक्रार केली होती. कांगारू १३ जणांच्या चमूने झेळतात हे सर्वच देशांनी म्हटलेले आहे. ब्रॅडमनच्या मायदेशीच्या मोठ्या खेळीत त्याला पंचांनी किती साहाय्य केले कळायला मार्ग नाही.
जाता जाता. फायर इन बॅबिलोन हा चित्रपट पण असाच थरारक आहे.
8 Jul 2015 - 6:11 pm | श्रीरंग_जोशी
सकलेनच्या गोलंदाजीवर विजयी षटकार मारणारा फलंदाज राजेश चौहान होता (फक्त चेंडू शेवटचा नव्हता). पाकीस्तानात आपल्या १९९७च्या दौर्यातली गोष्ट आहे. परंतु तेव्हा अजित आगरकरचे पदार्पण (१ एप्रिल १९९८) व्हायचे होते. (चु.भू.दे.घे.)
हॄषिकेश कानिटकर पण उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करायचा व त्याने ढाक्यामधील तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात (जाने १९९८) २ चेंडूत ३ रन हवे असताना चौकार मारून विजय मिळवून दिला होता.
राजेश चौहानच्या शैलीवर आक्षेप घेतला गेल्याचे स्मरते.
8 Jul 2015 - 11:10 pm | स्पार्टाकस
लारवूड ऑस्ट्रेलियात सेटल झाला असला तरी त्याने कोचिंग केल्याचं आढळत नाही. तो ऑस्ट्रेलियात गेल्यावर एका कोल्ड्रींक कंपनीत नोकरी करुन तिथूनच रिटायर झाला. त्याचबरोबर अॅशेस मालिकेत अनेकदा तो कॉमेंटेटर आणि अॅनालिस्ट म्हणून काम करत होता.
9 Jul 2015 - 5:15 pm | सुधीर कांदळकर
@ श्रीजो - बरोबर. आणि समोर आगरकर नसणार. आगरकर १९९९ मध्ये आला. टीव्हीवर इतक्या मॅचेस दाखवतात की आठवणीत सरमिसळ होते.
फायर इन बॅबिलॉन मात्र छानच आणि थरारक आहे. कदाचित स्पार्टॅकससाहेब नवी मालिका देखील त्यावर लिहीतील.
@स्पार्टॅकस. लारवूड प्रशिक्षक होता असे वाटले होते. नक्की ठाऊक नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद. फायर इन बॅबिलॉनवर खरेच नवी मालिका लिहा.
9 Jul 2015 - 8:11 pm | श्रीरंग_जोशी
आगरकरने पहिला आंतरराष्ट्रीय सामना १ एप्रिल १९९८ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोचिन येथे खेळता. एकदिवसीय सामना होता तो.
सचिनने ३२ धावांत ५ बळी मिळवून सामनावीराता किताब मिळवला होता.
13 Jul 2015 - 2:29 pm | पैसा
हा पण भाग मस्त!