राजवाड्यात जंगी मेजवानी चालू होती, तेव्हा एक माणूस तिथे घाईघाईने आला आणि त्याने राजपुत्राला लवून मुजरा केला. सगळे पाहुणे त्याच्याकडे टकामका पाहू लागले कारण त्याचा एक डोळा निखळला होता, रिकाम्या खोबणीतून रक्त ठिबकत होते.
राजपुत्राने त्याला विचारले, ‘ही आपत्ती तुझ्यावर कशी काय कोसळली?’
त्यावर तो सांगू लागला, ‘ हे राजपुत्रा, मी व्यवसायाने चोर आहे. आज अमावस्या! आकाशात चंद्र नव्हता म्हणून मी चोरी करण्यासाठी एका दलालाच्या घरात घुसायचे ठरवले. पण अंधारात चूक झाली. दलालाच्या घराऐवजी मी विणकराच्या घरात शिरलो. अंधारात उडी मारताना तिथल्या हातमागाला माझा धक्का लागला आणि माझा डोळा निखळून पडला. हे राजपुत्रा, मला तुझ्या कडून योग्य न्याय हवा. त्या विणकराला शिक्षा तर झालीच पाहिजे आणि माझी नुकसानभरपाई पण मिळाली पाहिजे.’
राजपुत्राने लगेच विणकराला बोलवून घेतले. तो येताच, त्याचा एक डोळा काढण्याची आज्ञा दिली. ते ऐकून विणकर न डगमगता, आत्मविश्वासाने म्हणाला, ‘ राजपुत्रा, तू दिलेला निर्णय योग्यच आहे. माझा एक डोळा काढून घ्यायला काहीच हरकत नाही. पण माझी एक अडचण आहे! हातमागावर विणून तयार झालेले कापड दोन्ही बाजूंनी बघण्यासाठी मला दोन्ही डोळ्यांची गरज भासते.... हो, पण यावर एक उपाय आहे!’
‘तो कोणता?,’ राजपुत्राने विचारले.
‘माझ्या शेजारी एक कुंभार राहतो. त्यालाही दोन डोळे आहेत. पण मला माहितीय, त्याच्या व्यवसायात त्याला दोन डोळ्यांची गरज नाही पडत!’
राजपुत्राने लगोलग त्या कुंभाराला बोलावून घेतले. तो येताच, त्याचा एक डोळा काढून घेण्यात आला.
---------- मग उच्चासनावरील न्यायदेवता समाधानाने हसली.
खलिल जिब्रानच्या 'War' या रूपककथेचा भावानुवाद.
प्रतिक्रिया
31 Mar 2015 - 1:40 am | सांगलीचा भडंग
हि कथा काय समजली . युद्धाचा आणि कथेचा नक्की काय संबंध आहे ते कळले नाही
31 Mar 2015 - 10:00 am | असंका
हातमागाला धक्का लागला आणि डोळा निखळून पडला...!!!
31 Mar 2015 - 9:55 pm | शिव कन्या
रूपक कथांचा काढू तसा अर्थ निघतो.तसे साधे आहे... सत्ता आणि गुन्हेगारी यांचा घनिष्ठ संबंध असतो. गुन्हेगार आपल्यासाठी काम करणाऱ्या दलालांना कसेही करून वाचवत असतात. स्वतःचे महत्व कायम टिकवण्यासाठी कांगावा करतात.[ .... नाहीतर, हातमागाचा धक्का लागून कुणाचा डोळा निखळतो का?!] अशा वेळेस, सत्ताधार्यांची विवेकबुद्धी हरवलेली असते. निरपराध विणकर बळीचा बकरा ठरणार असतो.... पण तो बुद्धिवादी! युक्तिवाद करून स्वतः वाचतो, पण ज्याला काही आवाजच नाही अशा अतिसामान्य कुंभाराला फशी पाडतो. गुन्हेगाराला तथाकथिक न्याय देऊन सत्ताधारी स्वतःला सेफ करून घेतो...... सत्ता टिकवण्यासाठी शांतता काळातील हे 'युद्ध'आहे, असे समजायला हरकत नाही! 'बळी तो कानपिळी'हा आणखी एक अर्थ.... जाणकार मिपाकारांना आणखी अर्थ लागत असेल तर जरूर लिहावा.
31 Mar 2015 - 10:11 pm | पॉइंट ब्लँक
+१
1 Apr 2015 - 3:42 pm | मराठी_माणूस
कुंभार , त्यालाही दोन्ही डोळ्यांची गरज आहे असे सांगत का नाही ? विणकराला आवाज आहे आणि कुंभाराला आवाज नाही असे गृहीतक आहे का ? का, जो आवाज करत नाही त्यावर नेहमीच अन्याय होत राहील असे सुचवायचे आहे
1 Apr 2015 - 10:02 am | मदनबाण
सगळीकडेच युद्ध आणि मरणारे अनेक निरपराध मनुष्य प्राणी आणि त्यांची बालके ! उरलेली लुळी / पांगळी प्रजा...:(
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..
1 Apr 2015 - 1:58 pm | hitesh
कुंभाराचे दु:ख मीही भोगलेले आहे.
ज्याच्या हातात सत्ता / न्युसन्स व्यालु असते तो आपल्या ताटाखालच्या मांजराला दुसर्या कुणाचा तरी बळी देऊन वाचवतो.
1 Apr 2015 - 4:24 pm | मनीषा
++१
1 Apr 2015 - 4:05 pm | एस
अॅप्ट!
1 Apr 2015 - 4:29 pm | मनीषा
लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार
असा एकंदरीत प्रकार दिसतो आहे.
किंवा, यथा राजा तथा प्रजा --- असेही म्हणता येईल.
1 Apr 2015 - 7:52 pm | विवेकपटाईत
अपघाताच्या वेळी सुपर स्टारचा ड्राईवर गाडी चालवीत होता, त्याला दंड होणार.
7 Apr 2015 - 7:59 am | शिव कन्या
बरोबर विवेक पटाईत.....
इतके अर्थ उलगडलेत मिपाकरांनी....... खलिल जिब्रान अचंबित.. :-)
7 Apr 2015 - 4:55 pm | उमा @ मिपा
झणझणीत अंजन!
सुरेख!