आज्जीबाईंचे लोणचे........... खलिल जिब्रान

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
7 Apr 2015 - 7:56 am

एका सरदाराच्या घरात त्याच्या आज्जीबाई राहायच्या. आज्जीबाईना आपल्या स्वैपाकघरातील ओळीने भरून ठेवलेल्या लोणच्यांच्या बरण्यांचा खूप अभिमान होता. ती लोणची आज्जीबाईंनी स्वतः घातली होती. पण त्यातल्या एका बरणीला मात्र त्या कुण्णाला म्हणून हात लावू द्यायच्या नाहीत. त्यात त्यांनी घातलेले खास लोणचे मुरत होते. ते खास लोणचे त्या खास प्रसंगालाच काढणार होत्या. पण तो ‘खास’ प्रसंग कोणता, त्यांनाच माहित!
एकदा त्या सरदाराकडे, एक विद्वान परदेशी पाहुणा भोजनासाठी आला. आज्जीबाईंच्या मनात आले, ‘एका परदेशी पाहुण्या साठी वर्षानुवर्षे मुरवलेले लोणचे मी का काढू? मुळीच नाही!’
नंतर एक श्रेष्ठ धर्मगुरू भोजनासाठी आले, आज्जीबाईंच्या मनात सन्नकन आले, ‘एवढ्या रुचकर लोणच्याचा वास, त्या संन्याशाच्या नाकाला काय म्हणून? मी काही आत्ता त्या बरणीचे झाकण उघडणार नाही!’
पुढे त्या राज्याचा राजपुत्र भोजनासाठी आला, पण आज्जीबाई काय भुलल्या नाहीत! म्हणाल्या, ‘हूं ! एका क्षुल्लक राजपुत्रासाठी मी माझे ते अनमोल लोणचे बाहेर काढू? छे! माझे लोणचे तर त्याहून राजेशाही आहे!’
एवढेच काय, आज्जीबाईंच्या लाडक्या नातवाचे लग्न झाले, तरी त्यांनी त्या बरणीचे झाकण उघडले नाहीच. स्वतःशीच पुटपुटल्या, ‘ वराती बरोबर आलेल्या या उपटसुंभ पाहुण्यांना मी बरी माझे लोणचे देईन!’
अशीच अनेक वर्षे सरली. ......... इतर चार म्हातार्यांप्रमाणे आज्जीबाईही निजधामास पोहचल्या. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या चौदाव्याला जेवणाची भली मोठी पंगत बसली. घरातल्या बायांनी फडताळावरच्या बरण्या खाली घेतल्या. त्यात ती खास लोणच्याची बरणीही होती. इतर चार पदार्थांबरोबर त्यातले लोणचेही वाढले गेले. कित्ती भारी लोणचे होते ते! आज्जी बाईंसाठी तर जीव कि प्राण! आणि आज?..... तोंडी लावण्यासाठी वाढलेला एक पदार्थ म्हणून सगळे आलेगेले त्यावर ताव मारत होते!
खलिल जिब्रानच्या ‘The Old Old Wine’ या रूपक कथेचा मुक्त अनुवाद.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

hitesh's picture

7 Apr 2015 - 8:13 am | hitesh

..

प्राची अश्विनी's picture

7 Apr 2015 - 9:00 am | प्राची अश्विनी

सुन्दर!

मदनबाण's picture

7 Apr 2015 - 9:14 am | मदनबाण

सुरेख...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Atu Amalapuram Remix... ;) { Kotha Janta }

नाखु's picture

7 Apr 2015 - 9:16 am | नाखु

असेच सुंदर अनुवाद येऊद्या !!!

उमा @ मिपा's picture

7 Apr 2015 - 9:36 am | उमा @ मिपा

गोष्ट छानच! अनुवाद सुरेख.
अजून असे अनुवाद वाचण्यासाठी उत्सुक आहे.

एक एकटा एकटाच's picture

7 Apr 2015 - 6:15 pm | एक एकटा एकटाच

आवडली

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Apr 2015 - 6:59 pm | राजेंद्र मेहेंदळे

सदस्यकाळ 2 months 4 days

मिपावर स्वागत....जरा दमानं घ्या

रुपी's picture

8 Apr 2015 - 12:37 am | रुपी

थोड्याफार फरकाने आपणही या आज्जीबाईंसारखेच वागत असतो - खास प्रसंगासाठी काही गोष्टी जपून ठेवत असतो. ना त्याचा उपभोग आपण स्वत: घेतो, ना आपल्या प्रियजनांना घेऊ देतो, आणि शेवटी पडून पडून त्या वस्तूची रया जाते.

अर्धवटराव's picture

8 Apr 2015 - 2:10 am | अर्धवटराव

फार तर दोन महिने जपुन ठेवलेली एक खास टकीला शुक्रवारी रात्री आमच्या टोळभैरवांच्या संगतीने अगदी शेवटच्या थेंबापर्यंत रिचवली :)

शिव कन्या's picture

10 Apr 2015 - 12:01 am | शिव कन्या

सर्व प्रतिसादकांचे आभार.

वॉल्टर व्हाईट's picture

10 Apr 2015 - 12:09 am | वॉल्टर व्हाईट

असेच पैश्यांचे पण असावे. विशेषतः दागिन्यांचे. लग्नाकार्यात एवढे भारंभार दागिने घेतले जातात आणी ते पिढ्यांपिढ्या तसेच पडुन राहतात.

स्पंदना's picture

13 Apr 2015 - 4:43 pm | स्पंदना