एका मोठ्या शहरात जत्रा भरली होती. एक अवखळ सुंदरी शेजारच्या खेड्यातून त्या जत्रेस आली.
खळाळणाऱ्या निर्झराप्रमाणे तिचे हसू होते. गालांवर गुलाबाच्या कळ्यांची लाली विलसत होती.
सूर्यास्ताची सोनेरी हुरहूर तिच्या रेशमी, भुरभुरणाऱ्या केसांत रेंगाळत होती.
उषेप्रमाणे तिचे मुखमंडल अगदी प्रसन्न होते.
सूर्याने पृथ्वीचे चुंबन घेताच, क्षितिजाचे ओठ विलग व्हावेत, त्यातून केशरी हसू निसटावे, तसे तिचे हसरे ओठ!
कुणालाही वेड लागावे असेच तिचे अस्तित्व होते.
ही मुग्ध अनामिका जत्रेत येते न येते, तोच साऱ्या तरुणांची नजर तिच्यावर खिळली.
जो तो तिच्याभोवती रेंगाळू लागला.
तिचे किणकिणणारे बोल आपल्याला ऐकायला मिळावेत म्हणून प्रत्येक तरुणाचे प्राण कानात जमा झाले.
तिच्या करकमलांचा कोमल स्पर्श व्हावा म्हणून प्रत्येक तरुण धडपडत होता.
तिने आपल्याकडे एखादा तरी कटाक्ष टाकावा, म्हणून प्रत्येकाचा जीव कसा तगमगत होता!
..... आणि प्रत्येकाला तिचे एक तरी चुंबन घ्यावेसे वाटत होते! त्यानंतर मरण आले, तरी ते पत्करायची तयारी होती.प्रत्येकाची रित पतंगासारखी होती.
आता, प्रत्येक तरुणमनाला तसे वाटणे साहजिकच होते, कारण ती बोलूनचालून सुंदरी होती!
आपल्यासाठी कोण कोण कसे कसे उसासत आहे, याची पूर्ण जाणिव त्या चतुरेला होती.
मग, त्यांच्यापैकी काही जणांबरोबर ती उंच उंच पाळण्यात बसली.
काही जणांबरोबर मुग्धपणे नाचली. काही जणांबरोबर थोडेसे खाल्ले.
काहींनी तिच्यासाठी उंची पोशाख घेतले. काहींनी तिच्यासाठी किंमती दागिने खरेदी केले.
... या सगळ्यात, काही तरुणांनी अनावर होऊन तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. ---- तेव्हा मात्र तिला एकदम धक्का बसला. ती दचकली, रागाने लालेलाल झाली. रागाच्या भरात एकाच्या कानशिलात भडकावली.
तिला एकदम कसेसेच वाटले. सारे तिथल्या तिथे टाकून ती आपल्या गावच्या दिशेने पळत सुटली.
सूर्यास्ताच्या कातरवेळी दमून गेलेल्या त्या रमणीच्या मनात विचार आला, ‘छे! वैताग आला या सगळ्यांचा! माझ्यासारख्या सुंदरीस कसे वागवावे, हे यापैकी एक्कालाही कळू नये? या पुरुषजातीला साधे शिष्टाचारही माहित असू नयेत! हे सगळे माझ्या सहनशक्तीपलीकडचे आहे!’
वर्ष उलटून गेले.
त्या वर्षभरात ती जत्रा, ते तरुण, आणि स्वतःचे सौंदर्य यांचा विचार करण्यातच ती सुंदरी गढून गेलेली असायची.
यावर्षी परत जत्रा भरली.
ती परत जत्रेस आली -----
तेच निर्झराप्रमाणे हसू, तीच गालांवरची लाली, सूर्यास्ताची तीच हुरहूर सोनेरी केसांत , तेच प्रसन्न मुखमंडल, तेच हसरे ओठ, तेच वेडावून टाकणारे तिचे अस्तित्व!
पण तिला पाहताच आता प्रत्येक तरुण पाठ फिरवू लागला. जो तो तिला टाळू लागला.
दिवसभर ती एकटीच फिरली. तिच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. भरल्या जत्रेत ती सैरभैर होऊन हिंडत होती.
संध्याकाळ झाली. सूर्यास्ताच्या कातरवेळी तिला आणखी एकाकी वाटू लागले. घराकडे परतताना ती मनात चरफडत म्हणत होती, , ‘छे! वैताग आला या सगळ्यांचा! माझ्यासारख्या सुंदरीस कसे वागवावे, हे यापैकी एक्कालाही कळू नये? या पुरुषजातीला साधे शिष्टाचारही माहित असू नयेत! हे सगळे माझ्या सहनशक्ती पलीकडचे आहे!’
खलील जिब्रानच्या ‘At the Fair’ या रूपक कथेचा भावानुवाद.
प्रतिक्रिया
25 Mar 2015 - 11:59 pm | एस
:-)
26 Mar 2015 - 6:49 am | मनीषा
नाजो अंदाज से कहते है की जीना होगा
जहर भी देते है, तो कहतें है की पीना होगा
जब मैं पीता हू तो कहतें है की मरता भी नहीं
जब मैं मरता हू तो कहतें है की जीना होगा ....
हे माहीत नव्हतं वाटतं त्या जत्रेतील लोकांना?
------------
मार्मिक कथा
मला कळलेले ताप्तर्य म्हणजे--
कुणालाही इतकं जास्तं गृहीत धरू नका, की ज्या योगे तुमचा अपेक्षाभंग होईल.
कारण तुमच्या प्रमाणे इतरांच्याही तुमच्याकडून काही अपेक्षा असू शकतात.
26 Mar 2015 - 8:13 am | अनुप ढेरे
हा हा,,, मस्तं!
9 Apr 2016 - 4:47 pm | lgodbole
छान
12 Apr 2016 - 1:13 am | पद्मावति
:)
12 Apr 2016 - 1:35 pm | निर्धार
मला कळलेला अर्थ:
लोक तुमच्या वागण्याचा मनाप्रमाणे अर्थ लावुन मोकळे होतात, आणि त्यापैकी काही तुमच्या बद्दल अफवा पसरवण्यात तरबेज असतात.
अशीच काही अवस्था त्या तरुणीची झाली असावी.
12 Apr 2016 - 8:30 pm | पैसा
:)
12 Apr 2016 - 9:25 pm | जव्हेरगंज
ख्खिक्क!
म्हणजे खलिल जिब्रान पण जिलब्या टाकायचा तर ;)
( ह. घ्या )
अवांतर : आवडली !