युद्ध आणि छोटेसे देश...... [ खलील जिब्रान ]

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
20 Mar 2015 - 9:56 am

एका कुरणात एक कोकरू आपल्या आईबरोबर चरत होते.
त्याचवेळी एक गरुड, उंच आकाशातून वखवखलेल्या नजरेने त्या कोकराभोवती घिरट्या घालू लागला.
गरुड खाली झेपावून कोकरावर झडप घालणार, इतक्यात आकाशात दुसरा एक गरुड हावरट पणे गिरक्या घेऊ लागला.
त्याचीही नजर त्या कोकरावर अन त्याच्या आईवर!
ते पाहून पहिला गरुड खवळला.
त्या दोन पक्षीराजांमध्ये जमिनीवरील कोकरासाठी आकाशातच युद्ध सुरु झाले.
त्यांच्या कर्कश आवाजाने आसमंत भरून गेला.

कोकराच्या आईने वर पाहिले. त्यांच्यातले भयाण भांडण पाहून ती आपल्या कोकराजवळ आली,
म्हणाली,
'मुला, या दोन महान पक्षीराजांनी एकमेकांवर आक्रमण करावे, हे किती विचित्र आहे!
हे अमर्याद आकाश याना पुरेसे नसेल काय!
माझ्या पिल्ला, मनातल्या मनात तू देवाला प्रार्थना कर की,
देवदूतासारखे पंख लाभलेल्या तुझ्या आकाशातील भावंडांमध्ये शांतता निर्माण होऊ दे.
त्यांच्यातील भांडण मिटू दे!'

....... आणि त्या निष्पाप कोकराने पटकन डोळे मिटून परमेश्वरापाशी प्रार्थना करायला सुरुवात केली!

- 'War and the Small Nations' या खलील जिब्रानच्या रूपक कथेचा भावानुवाद.

कथासद्भावनाभाषांतर

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Mar 2015 - 10:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडला भावानुवाद.

-दिलीप बिरुटे

अत्रन्गि पाउस's picture

20 Mar 2015 - 11:30 am | अत्रन्गि पाउस

भयचकीत करणारे सत्य किती नेमकेपणाने मांडले आहे !!

त्या कोकराला हे ठाऊक नाही की काहीही झाले कोणीही जिंकले किंवा आकाशातील भावंडांमध्ये सलोख झाल्यानंतर कोकराचाच बळी जाणार आहे. आकाशातील दोन्ही भावंडे जर दोघेही हरली ( जखमी झाली ) तरच कोकरु वाचू शकेल. त्या दोघात सत्ता संघर्ष चालू असेल तोवर कोकराला भय नाही. ही वस्तुस्थिती आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Mar 2015 - 12:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१ पण...

त्या दोघात सत्ता संघर्ष चालू असेल तोवर कोकराला भय नाही.

हे पण तेव्हाच खरे आहे जेव्हा तुम्ही दोन हत्तींच्या मारामारीच्या ठिकाणापासून सुरक्षित अंतरावर असाल !

पॉइंट ब्लँक's picture

20 Mar 2015 - 6:00 pm | पॉइंट ब्लँक

+१

प्राची अश्विनी's picture

20 Mar 2015 - 12:11 pm | प्राची अश्विनी

वाह!

विशाखा पाटील's picture

20 Mar 2015 - 1:51 pm | विशाखा पाटील

छान अनुवाद!
या रुपकाला युद्धांमध्ये वेळोवेळी होरपळून निघालेल्या जिब्रानचा देश, लेबनॉनचा संदर्भही असावा, असे शिर्षकावरून वाटते.

शिव कन्या's picture

20 Mar 2015 - 2:15 pm | शिव कन्या

विशाखा.... आजही त्या किंवा तत्सम देशांची स्थिती तशीच आहे ...

सिरुसेरि's picture

20 Mar 2015 - 2:55 pm | सिरुसेरि

कथेवरुन समजते की कोकरु आणि त्याची आई हे दोघेही संभाव्य धोक्यापासुन अनभिज्ञ आहेत . त्यामुळे कोकराला सावध करु शकेल असेही तेथे कोणी नाही .

अन्या दातार's picture

20 Mar 2015 - 4:07 pm | अन्या दातार

छान रुपक कथा.

प्राची अश्विनी's picture

20 Mar 2015 - 5:28 pm | प्राची अश्विनी

याला प्राक्तन सुद्धा म्हणता येईल नाही का?

रूपक अतिशय चपखल आहे.
अवांतर : युद्धे फक्त छोट्या राष्ट्रांनाच परवडतात असे युद्धशास्त्रात म्हटले जाते.

बॅटमॅन's picture

20 Mar 2015 - 6:38 pm | बॅटमॅन

अवांतर : युद्धे फक्त छोट्या राष्ट्रांनाच परवडतात असे युद्धशास्त्रात म्हटले जाते.

असहमत. नेपोलियनच्या क्यांपेन्स पाहत ते तितकेसे खरे वाटत नाही. विशेषतः रशियन कँपेनमध्ये नेपोलियनला सुरुवातीला यश मिळाले पण रशियनांनी मोठ्या भूभागाचा फायदा उठवत नेपोलियनच्या सैन्याला उपाशी मारले. त्या धक्क्यातून फ्रान्सला सावरायला लै उशीर झाला. तिथून पुढे नेपोलियनला कधीच निर्भेळ यश मिळाले नाही. 'ग्रँड आर्मी' ४-५ लाखांवरून १-१.५ लाखांवर आली होती.

तीच गत पहिल्या व दुसर्‍या महायुद्धाचीही. ज्यांची औद्योगिक व मनुष्यबळक्षमता जास्त असेल अशा राष्ट्रांनाच युद्ध परवडू शकते- दॅट इज़, सस्टेन्ड बेसिसवर. महायुद्धांत युरोपीय देश लढू शकले कारण तंत्रज्ञान व वसाहतींद्वारे मनुष्यबळ आणि इतर सोयी मिळू शकल्या म्हणूनच.

मराठा-मुघल केस याला अपवाद आहे असे एखादवेळेस म्हणता येईलही. पण तिथेही मुघली छावण्यांमधला ढिसाळ कारभार, मराठ्यांनी केलेली लूटमार वगैरे अनेक गोष्टी त्यामागे आहेत. शिवाय तेव्हा मराठे फक्त महाराष्ट्रात नसून कर्नाटक व तमिळनाडूतही पसरले होते आणि तिथून अ‍ॅडिषनल रिसोर्सेस त्यांना मिळत होते.

शेवटी रिसोर्स मोबिलायझेशन ज्यांना पटकन मोठ्या प्रमाणावर जमू शकते ते जिंकतात. मोठी राष्ट्रे कैकदा छोट्या राष्ट्रांकडून हरतात, पण झालेले नुकसान भरून काढणे हे मोठ्या राष्ट्रांना तुलनेने सहज जमते. एक उदा. म्हणजे स्पेनने १५७१ साली तुर्कांचा बॅटल ऑफ लेपांटो मध्ये पराभव केला पण तुर्कांनी लगेचच काही वर्षांत त्याची भरपाई केली.

http://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Lepanto#Aftermath

हा फारच अभ्यासपूर्वक बोलण्याचा विषय आहे. काही दिवसांत सविस्तर प्रतिसाद देतो. सध्या फक्त मोबाइलवरून मिपा-मिपा सुरू आहे.

बॅटमॅन's picture

25 Mar 2015 - 1:32 pm | बॅटमॅन

अवश्य.

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Mar 2015 - 6:34 pm | कैलासवासी सोन्याबापु

खलील जिब्रान!!! _/\_

विवेकपटाईत's picture

21 Mar 2015 - 9:25 pm | विवेकपटाईत

उजवी अमेरिका आणि डावी रशिया , चीन यांच्या भांडणात बेचार्या विएतनामची राखरांगोळी झाली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Mar 2015 - 10:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

इतक्या सगळ्या इतिहासातून तावून सुलाखून निघालेला व्हिएतनाम सद्या उत्तर्पूर्वेतील चीनला भिक न घालणारी एक ताकद म्ह्णून उदयाला आली आहे आणि अमेरिका त्याच्याशी मित्रत्वाचे संबंध स्थापित व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. किंबहुना व्हिएतनाम सर्व जगात असा एकुलता चिमुकला आशियाई एक देश आहे की ज्याने दोन प्रबळ आधुनिक सामरीक सत्तांना युद्धात घूळ चारली आहे... अमेरिकेला व्हिएतनाम युद्धात आणि चीनला कंबोडियन युद्धात !

शिव कन्या's picture

22 Mar 2015 - 10:05 pm | शिव कन्या

राष्ट्र छोटे वा मोठे कसेही असो..... युद्ध कुणालाच कुठल्याही अर्थाने परवडत नसते .
तरी ती होत राहतात, होऊ दिली जातात, घडवून आणली जातात....
रूपकाचा उलगडा करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार.

मदनबाण's picture

22 Mar 2015 - 10:11 pm | मदनबाण

भावानुवाद आवडला... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Ye Naa Gade... ;) { हंटर }

व्हिएतनाम युद्धात सर्वात अधीक हानी झाली ती अमेरीकेचीच.
धरले तर चावते सोडले तर पळते अशी अवस्था होती त्यांची. केनेडी च्या कर्माची फळे तो आणि त्याच्या नंतरच्या तीन राष्ट्राध्यक्षानी भोगली

केनेडींच्या काळात अमेरिकन्स दक्षिण व्हिएटनाममध्ये सल्लागार या भूमिकेत होते. व्हिएटनाममध्ये अमेरिकन सैन्य घुसवलं लिंडन जाॅन्सन यांनी. त्यांचे सेक्रेटरी आॅफ स्टेट डीन रस्क आणि सेक्रेटरी आॅफ डिफेन्स राॅबर्ट मॅकनामारा यांनी त्यांना भरीस पाडलं. टोन्किन आखातात उत्तर व्हिएटनामी नौदलाने एक अमेरिकन बोट बुडवल्याच्या निमित्ताने जाॅन्सननी थायलंड हा बेस ठेवून अमेरिकन सैन्य घुसवलं. तोपर्यंत सीआयएचा फिनिक्स प्रोग्राम तिथे चालू होता, ज्याअंतर्गत दक्षिण व्हिएटनाममधल्या कम्युनिस्ट सहानुभूतीदारांविरुद्ध गुप्त कारवाया होत होत्या. अमेरिकन सैन्याने तिथे येऊन सरळ हल्ला चालू केला. त्याविरूद्ध उत्तर व्हिएटनामी सैन्याने केलेलं आक्रमण म्हणजे टेट आॅफेन्सिव्ह (Tet Offensive) ज्यात अमेरिकन सैन्याची खूप हानी झाली आणि अमेरिकेतील जनमत युद्धविरोधी झालं. त्यात मी लाई हत्याकांडासारख्या घटनांची भर पडली. जाॅन्सन यांनी फेरनिवडणूक न लढवता निवृत्ती स्वीकारली. मग अध्यक्ष निक्सन आणि त्यांचे परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांनी अमेरिकन सैन्याची माघार घडवून आणली. अमेरिकेचा आधार गेल्यावर दोन वर्षांत दक्षिण व्हिएटनामचा पाडाव झाला आणि दोन्ही व्हिएटनाम देश एकत्र आले. ही बहुधा १९७५ ची गोष्ट आहे. त्यामुळे जाॅन्सननाच तुम्ही म्हणता तसं फळं भोगायला लागली. निक्सन उलट युद्ध संपवलं म्हणून लोकप्रिय होते. त्यांना वाॅटरगेट प्रकरणामुळे जावं लागलं. नंतरच्या जेराल्ड फोर्ड आणि जिमी कार्टर यांचा युद्धाशी काहीच संबंध नव्हता.

खंडेराव's picture

25 Mar 2015 - 1:45 pm | खंडेराव

खलिल जिब्रान ग्रेटच..अनुवादाबद्द्ल आभार. आवडले.

सविता००१'s picture

9 Apr 2016 - 1:09 pm | सविता००१

भावानुवाद. अतिशय आवडला

जव्हेरगंज's picture

9 Apr 2016 - 3:02 pm | जव्हेरगंज

अशी ताकद पाहिजे कथेत...!!!

झणझणीत..!!