थोडे अद्भुत थोडे गूढ ही लेखमालिका आज संपली. ही लेखमालिका प्रकाशीत करु दिल्याबद्दल मी मिसळपाव प्रशासनाचा मनापासून आभारी आहे. या लेखमालेच्या निमित्ताने माझ्या संग्रही असलेल्या आणि नसलेल्याही अनेक पुस्तकांच्या पुनर्वाचनाचा योग आला.
ही लेखमालीका आपल्याला कशी वाटली हे कळवावे ही नम्र विनंती.
भाग १०, भाग ९, भाग ८, भाग ७, भाग ६, भाग ५, भाग ४, भाग ३, भाग २, भाग १.
*********************************************************************************************
दुसर्या महायुद्धाला नऊ वर्ष उलटली होती.
अमेरीकेने केलेल्या हिरोशिमा आणि नागासाकी वरच्या अणुबाँबच्या हल्ल्यांमधून जपान अद्यापही सावरत होता. तीन लाखांवर माणसांचा बळी गेलेला दुसरा कोणताही देश कितीतरी वर्षे खचून गेला असता... पण जपान? अविश्रांत मेहनत आणि जिद्द याच्या जोरावर जपान पुन्हा उभा राहत होता.
युद्धानंतरही पाश्चात्य देशांशी उत्तम राजकीय आणि आर्थिक संबंध टिकवून ठेवण्यात जपान यशस्वी झाला होता. त्यामुळे जपानमध्ये विविध कामांसाठी येणार्या लोकांचा आणि पर्यटकांचा ओघही कायम असे. टोकीयो इथला आंतरराष्ट्रीय विमानतळ कायमच प्रचंड गर्दीने ओसंडून जात होता! अनेकदा तर मुंबईतील उपनगरीय स्थानकाला गर्दीच्या वेळेला येते तशी कळा हॅनेडा विमानतळाला येत असे!
१९५४ चा जुलै महीना.
सकाळपासूनच टोकीयोच्या हॅनेडा विमानतळावर नेहमीप्रमाणेच गर्दी होती. अनेक वेगवेगळी विमानं टोकीयो इथे येऊन पोहोचत होती. टोकीयोवरुन अनेक विमानं वेगवेगळ्या दिशांना उड्डाण करत होती. वेगवेगळ्या विमानांतून आलेले प्रवासी इमिग्रेशन आणि कस्टम्सच्या अधिकार्यांसमोर तपासणीसाठी रांगा लावत होते. पासपोर्ट आणि व्हिसा तपासणी केल्याविना अर्थातच कोणालाही जपानमध्ये प्रवेश मिळू शकत नव्हता! कोणत्याही आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसणारं हे नेहमीचंच दृष्यं होतं.
दुपारच्या सुमाराला पश्चिम युरोपातून येणारं एक विमान रनवेवर उतरुन नुकतंच थांबलं होतं. विमानातील प्रवासी आपापले पासपोर्ट आणि व्हिसा याच्यासह इमिग्रेशन आणि कस्टम्सच्या अधिकार्यांसमोर रांगा लावत होते. एकेका प्रवाशाची तपासणी करुन अधिकारी त्याला जपानमध्ये प्रवेश देत होते.
एक माणूस असाच एका इमिग्रेशन अधिकार्यासमोर जाऊन उभा राहीला. आपला पासपोर्ट त्याने तपासणीसाठी त्या अधिकार्याच्या हवाली केला. अधिकार्याने तो पासपोर्ट पाहीला आणि तो चक्रावून गेला...
तो पासपोर्ट 'टॉर्ड' या देशाचा होता...
...परंतु अशा नावाचा कोणताही देश अस्तित्वातच नव्हता!
त्या माणसाकडे तो पासपोर्ट आला कुठून?
तो माणूस सुमारे साडेसहा फूट उंच आणि धिप्पाड होता. त्याने दाढी राखलेली होती. साधा कोट-शर्ट आणि पँट असा पोशाख त्याने घातलेला होता. वयाने तो साधारण चाळीशीचा असावा!
जपानी अधिकार्यांनी त्याला इमिग्रेशन काऊंटरवरुन वेगळ्या केबिनमध्ये आणलं आणि त्याच्याकडे चौकशीस प्रारंभ केला.
"तुझं नाव काय?"
त्याने आपलं नाव सांगीतलं खरं, पण ते इतकं विचित्रं होतं, की जपानी अधिकार्यांना ते नेमकं कोणत्या अक्षरांनी लिहावं हेच कळेना.
"तू कुठून आलास?"
"मी मूळचा टॉर्ड देशाचा रहिवासी आहे!" तो ठामपणे म्हणाला, "यापूर्वीही मी अनेकदा जपानला आलेलो आहे. या वर्षीच माझी जपानला येण्याची ही तिसरी खेप आहे!"
जपानी अधिकार्यांनी त्याचा पासपोर्ट नीट तपासला. पासपोर्ट तपासल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला...
तो माणूस नुकताच दोन वेळा जपानला येऊन गेल्याची पासपोर्टवरील शिक्क्यांवर नोंद होती! इतकंच नव्हे तर युरोपातील अनेक देशांमध्येही त्याने नियमीत प्रवास केल्याचे शिक्के पासपोर्टवर उमटलेले होते. अनेक देशांच्या व्हिसाचे स्टँप त्याच्या पासपोर्टवर आढळून आले होते. जपानचा व्हिसा अर्थात त्याला देण्यात आला होता!
जपानी अधिकार्यांनी त्याच्याजवळील पाकीटाची तपासणी केली. अनेक वेगवेगळ्या देशांच्या चलनी नोटा त्याच्या पाकीटात होत्या! जपानी येन अर्थातच होतेच!
"तुझी मूळ भाषा कोणती?"
"फ्रेंच! जगातील अनेक भाषा मी बोलू शकतो!" अस्खलीत जपानी भाषेत तो बोलत होता!
"जपानमध्ये कोणत्या कामासाठी आला आहेस?"
"अर्थात बिझनेसच्या! माझ्या कंपनीने मला एका बिझनेस मिटींगसाठी पाठवलं आहे!"
जपानी अधिकारी या विलक्षण प्रवाशाच्या उत्तरांनी चक्रावून गेले होते.
"तुझा हा जो देश आहे, टॉर्ड, तो नेमका कुठे आहे?" एका अधिकार्याने विचारलं.
"तुम्हाला टॉर्ड माहीत नाही?" त्याने आश्चर्याने आणि काहीशा रागीट स्वरात विचारलं.
जपानी अधिकार्यांनी नकारार्थी माना हलवल्या.
"स्पेन आणि फ्रान्सच्या सीमेवर माझा देश आहे! टॉर्ड! गेल्या हजार वर्षांपासून!"
जपानी अधिकार्यांनी युरोपचा नकाशा त्याच्यापुढे पसरला आणि त्याला त्याचा देश नकाशावर दाखवण्याची विनंती केली.
एका क्षणाचाही विलंब न लावता त्याने एका ठिकाणी आपलं बोट ठेवलं.
"हे बघा! हाच माझा देश! टॉर्ड!"
त्याने दाखवलेल्या ठिकाणी जपानी अधिकारी पाहतच राहीले! त्याने स्पेन आणि फ्रान्सच्या दरम्यान असलेल्या आंडोरा या लहानशा देशावर बोट ठेवलं होतं.
"हा आंडोरा देश आहे!" जपानी अधिकारी म्हणाला, "टॉर्ड नाही!"
"याचं नाव तर नकाशात आंडोरा दिसतं आहे!" तो गोंधळून म्हणाला, "पण...पण हे कसं शक्यं आहे? हा माझा टॉर्ड देशच आहे! तुमच्या नकाशात याचं नाव का बदललं आहे?"
जपानी अधिकारी पार गोंधळून गेले होते! त्यांनी एक-दोन नाही तब्बल दहा नकाशे त्याच्यासमोर आणून ठेवले, पण प्रत्येक नकाशात तो आंडोरा देशावर बोट ठेवून हाच टॉर्ड देश आहे हे ठामपणे सांगत होता. त्या नकाशांत टॉर्ड देश नाही हे पाहून तो देखील चकीत झाला होता!
जपानी अधिकार्यांनी आता त्याची खोलवर चौकशी करण्यास सुरवात केली. त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्याच्या पाकीटातून टॉर्ड देशाचं ड्रायव्हींग लायसन्स आढळून आलं! त्याच्या जोडीला त्याच्या बँकेचे कागदपत्रं आणि चेकबुकही होतं.
....परंतु ज्या बँकेचं चेकबुक होतं, ती बँक अस्तित्वातच नव्हती!
एका मोठ्या कंपनीशी संलग्नं असलेल्या लहानशा कंपनीत आपण अधिकारी आहोत असं त्या माणसाने जपानी अधिकार्यांना सांगितलं. त्याच्या कामाविषयी अनेक कागदपत्रं त्याच्यापाशी उपलब्धं होते! जपानी कंपनीशी महत्वाच्या मिटींगसंदर्भात आपण टोकीयोला आल्याचा त्याने पुनरुच्चार केला! तसेच टोकीयोतील एका हॉटेलमध्ये आपण रुमचं रिझर्वेशन केल्याचंही त्याने जपानी अधिकार्यांना सांगितलं!
जपानी अधिकार्यांनी त्याच्या माहीतीची खातरजमा करण्यास सुरवात केली. त्याने सांगितलेल्या जपानी कंपनीत चौकशी केल्यावर त्यांना आणखीन एक धक्का बसला....
त्या कंपनीतील एकही माणूस त्याल ओळखत नव्हता!
त्याच्या कंपनीचं नावंही कोणाला माहीत नव्हतं..
इतकंच काय, त्याच्या टॉर्ड देशाचं नावही कोणीही ऐकलेलं नव्हतं!
हॉटेलमध्ये चौकशी केली असता त्याच्या नावाचं कोणतंही रिझर्वेशन आढळून आलं नाही!
या सर्व प्रकाराने तो माणूस मात्रं आता काहीसा वैतागला होता. आपली कोणीतरी मुद्दाम चेष्टा करण्यासाठी हा सगळा प्रकार चालवला आहे अशी त्याची ठाम समजूत झाली! हजार वर्षांची गौरवशाली परंपरा आणि वारसा असलेला आपला देश या लोकांना माहीत नाही याचंच त्याला आश्चर्यं वाटत होतं!
दुसरीकडे जपानी अधिकारी त्याच्यापेक्षाही जास्तं गोंधळून गेले होते. टॉर्ड देशाचा रहिवासी म्हणवणारा तो माणूस नेमका कोण होता आणि कुठून आला होता याचा काहीच पत्ता लागत नव्हता! अस्तित्वात नसलेल्या देशाचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि चक्कं पासपोर्ट त्याच्यापाशी होता. इतकंच नव्हे तर जपानसकट अनेक देशांत पूर्वी तो जाऊन आल्याचं सिद्ध होत होतं!
"हे बघा, तुमची चेष्टा आता पुरे झाली!" आठ तासांच्या उलटतपासणीनंतर रागावून तो जपानी अधिकार्यांना म्हणाला, "मला ताबडतोब तुमच्या वरिष्ठ अधिकार्यांना भेटायचं आहे!"
जपानी पोलीसांनी आणि कस्टम्स अधिकार्यांनी त्याला विमानतळाजवळच असलेल्या हॉटेलमध्ये हलवलं. हॉटेलमध्येच रात्रीचं जेवण आटपल्यावर १० व्या मजल्यावरील एका खोलीत त्याची रवानगी करण्यात आली. खोलीच्या बाहेर दोन पोलीस पाहर्यासाठी ठेवण्यात आले.
दुसर्या दिवशी सकाळी पोलीस आणि कस्टम अधिकारी त्याच्या चौकशीसाठी हॉटेलवर गेले. त्याच्या खोलीत प्रवेश केल्यावर सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला....
खोली पूर्णपणे रिकामी होती!
टॉर्ड देशाचा रहिवासी असलेला एकमेव नागरीक हवेत विरुन जावा तसा अदृष्यं झाला होता!
हा अकल्पीत प्रकार पाहून सगळेच बुचकळ्यात पडले. त्या खोलीतून बाहेर पडण्याची एकमेव वाट म्हणजे खोलीचा दरवाजा. परंतु दरवाज्यातून तो बाहेर पडलेला नाही हे पहार्यावर असलेल्या पोलीसांनी छातीठोकपणे सांगितलं. खोलीला एक खिडकी होती. परंतु त्या खिडकीतून बाहेर जाणं हे निव्वळ अशक्यं असल्याचं पोलीसांना तपासणीअंती आढळून आलं! खोलीची बारकाईने तपासणी करता त्याचं सर्व सामनही तिथून गायब झाल्याचं पोलीस आणि कस्टम्स अधिकार्यांच्या ध्यानात आलं!
स्वत:ला टॉर्डचा रहिवासी म्हणवणारा तो माणूस नेमका कुठून आला होता आणि हॉटेलच्या खोलीतून गायब कसा झाला याचा तपास घेण्याचा जपानी अधिकार्यांनी खूप प्रयत्नं केला, परंतु त्यांच्या हाती काहीही लागलं नाही!
त्याच्या पासपोर्टवर असलेल्या देशांकच्या इमिग्रेशन खात्याकडे चौकशी केली असता अशी कोणतीही व्यक्ती आपल्या देशात आल्याची त्यांच्याकडे नोंद नव्हती!
जपानी अधिकार्यांच्या मतानुसार टॉर्ड देशाचा रहिवासी असलेला तो माणूस निश्चीतच खरं बोलत होता! नकाशात आपला देश न दिसल्यावर तो खरोखरच आश्चर्यचकीत झाला होता. आपला देश नकाशावर कसा दिसून येत नाही याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं. त्याच्या पासपोर्टची काळजीपूर्वक तपासणी केली असता, तो पासपोर्ट नकली नसल्याचं जपानी अधिकार्यांना आढळून आलं! त्याचं ड्रायव्हींग लायसन्संही नकली नसल्याचं त्यांना आढळलं!
टॉर्डचा रहिवासी असलेला तो माणूस नेमका कुठून आला होता याविषयी अनेक तर्क मांडण्यात आले.
काही संशोधकांच्या मते, आपल्या जगाप्रमाणेच एक वेगळंच जग वेगळ्या मितीत आणि प्रतलावर अस्तित्वात आहे. त्या जगातील बरेचसे व्यवहार आपल्याप्रमाणेच होत असले, तरी काही बाबतीत फरक आहे. स्वत:ला टॉर्डचा रहिवासी म्हणवणारा हा माणूस त्या वेगळ्या समांतर जगतातून काही कारणाने आपल्या जगात आला असावा आणि परतीची वाट सापडतात अदृष्य झाला असावा!
दुसर्या एका तर्कानुसार टॉर्ड देशाचा रहिवासी म्हणवणारा हा माणूस एखाद्या गुप्त संघटनेचा सदस्यं असावा आणि कोणत्यातरी विशिष्ट कामगिरीवर त्याची जपानमध्ये पाठवणी करण्यात आली असावी! तो टॉर्डचा रहिवासी असल्याचं आणि आंडोरा देश हाच टॉर्ड असल्याचं त्याच्या मनावर ब्रेनवॉशिंग करुन बिंबवण्यात आलं असावं!
मात्रं तरीही अनेक प्रश्न अनुत्तारितच राहतात...
त्याच्याजवळचा पासपोर्ट अस्सल असल्याचं तांत्रिक तपासणीत निष्पन्ना झालं होतं. परंतु टॉर्डचा पासपोर्ट आला कुठून?
त्याच्या ड्रायव्हींग लायसन्सचं काय?
पासपोर्टवर असलेल्या इमिग्रेशनच्या शिक्क्यांचं काय?
इमिग्रेशनचे शिक्के आढळल्यावरही कोणत्याही देशात त्याच्या आगमनाचं रेकॉर्ड का नव्हतं?
हॉटेलच्या खोलीतून बाल्कनी नसताना आणि बाहेर दोन पोलीस पाहर्यावर असताना तो सामानासकट कसा गायब झाला?
टॉर्ड देशाचा रहिवासी म्हणवणारा तो माणूस होता तरी कोण?
प्रतिक्रिया
16 Sep 2014 - 8:43 pm | S.प्रशांत
मस्त series होती.
16 Sep 2014 - 8:51 pm | उन्मेष दिक्षीत
हा शेवटचा लेखही तितकाच (जरा जास्तच) रोचक ! :)
आणखी एका अतिशय रंजक लेखमालेबद्दल धन्यवाद !
16 Sep 2014 - 9:45 pm | खटपट्या
नेहमीप्रमाणे हाही भाग आवडला. मालिका संपतेय हे ऐकून निराश झालो.
खरं तर तुम्हि आम्हाला या गोष्टींची सवय लावली होती.
हिमालयातील यति बद्दल बरेच कुतूहल आहे. त्याबद्दल वाचायला आवडेल.
पुढच्या मालिकेच्या प्रतीक्षेत
16 Sep 2014 - 10:16 pm | सुहास झेले
धन्यवाद ह्या लेखमालेसाठी.... आता पुढे काय वाचायला मिळणार याची उत्सुकता आहे :)
16 Sep 2014 - 10:31 pm | विनोद१८
एक उत्तम मालिका सादर केल्याबद्दल. मालिकेचा शेवट तर अप्रतिमच केलात, अतिशय अद्भुत कथा. खरोखरच या अशा कथांची सवय आपण आम्हाला लावली होतीत, अशाच मालिका यापुढेही येउद्यात.
धन्यवाद.
16 Sep 2014 - 10:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारीच !
मस्त लेखमाला !
16 Sep 2014 - 11:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्याचे रेफरन्सेस मिळु शकतील का? मी गुगल वर ह्याविषयी शोधायचा प्रयत्न केला. काहीचं मिळालं नाही.
16 Sep 2014 - 11:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
थोडी माहीती एअरपोर्ट च नाव टाकल्यावर मिळाली.
17 Sep 2014 - 12:09 am | टिल्लू
taured गुगला, बक्कळ माहिती मिळेल
17 Sep 2014 - 8:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
हो. मी स्पेलिंग वेगळं अॅसुम केलं होतं.
17 Sep 2014 - 4:01 am | रेवती
सिरियल किलरचा भाग सोडता सगळी लेखमालिका आवडली. हा शेवटचा भाग पटक आटोपल्यासारखा वाटला तरी आवडला. बुचकळ्यात पाडणारी गोष्ट आहे.
17 Sep 2014 - 4:07 am | रामपुरी
एके ठिकाणी असाही संदर्भ मिळाला कि जसा हा माणूस गायब झाला तशीच त्याची पोलीसांच्या ताब्यातील कागदपत्रेही गायब झाली. जणू असा काही प्रकार घडलाच नव्हता अश्याप्रकारे सगळा मागमूस नाहीसा झाला. त्यामुळे ही सगळी गोष्टच खोटी असावी असाही एक तर्क मांडतात.
17 Sep 2014 - 9:44 am | रघुपती.राज
तुमचे ले़खन वाचायचे व्यसन लागले आहे
17 Sep 2014 - 9:48 am | स्पंदना
काटा येत राहिला लेख वाचताना.
फार सुरेख लिहीता तुम्ही.
17 Sep 2014 - 9:52 am | जेपी
उत्तम लेखमालिका .
इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद
17 Sep 2014 - 10:16 am | सुनील
याच कल्पनेवर आधारीत एक कथा नारळीकरांनी लिहिली आहे.
लेखमाला आवडली.
17 Sep 2014 - 10:48 am | विजुभाऊ
नारळीकरांची कथा " गंगाधरपंतांचे पानिपत "
ही कथा यक्षांची देणगी या संग्रहात आहे
17 Sep 2014 - 11:09 am | स्पार्टाकस
सर्वांचे मनापासून आभार!
पुढची मालिका सध्या डोक्यात आहे. लवकरच सुरु करेन.
बर्फाशी संबंधीत... ओळखा पाहू :)
17 Sep 2014 - 2:22 pm | काउबॉय
की अंटार्टिका ?
17 Sep 2014 - 5:11 pm | स्पार्टाकस
एव्हरेस्ट आणि अंटार्क्टीका-दक्षिण धृवावर लिहून झालंय एकदा. अर्थात हे दोन्ही विषयच असे आहेत की कितीही लिहीलं तरी कमीच आहे. परंतु पुढची मालिका त्यावर नाही :).
17 Sep 2014 - 5:28 pm | गवि
1972 ॲंडीज प्लेन क्रॅश ?
17 Sep 2014 - 5:42 pm | स्पार्टाकस
नाही. त्यावर रविंद्र गुर्जर यांचं सत्तर दिवस हे अप्रतिम सुंदर पुस्तक असताना आणखीन काय लिहीणार?
17 Sep 2014 - 5:55 pm | गवि
दुसरा गेस Dyatlov pass incident.
रशियात बर्फात नऊ हायकर्स गूढपणे मरण पावले.
मिपावरच कोणीतरी त्यावर लिहिलेलं आठवलं.
सापडलं.
http://misalpav.com/node/21803
17 Sep 2014 - 6:38 pm | स्पार्टाकस
गवि,
याच मालिकेतील ९ वा भाग मी त्याच घटनेवर लिहीला आहे. अर्थात आधीच कोणी त्यावर लिहीलेलं मला माहीत नव्हतं.
18 Sep 2014 - 1:48 pm | काउबॉय
नक्कीच कुतूहल निर्माण झालय आपण काय लिहणार या बाबत. वाट बघत आहे.
17 Sep 2014 - 4:14 pm | अजया
:)
17 Sep 2014 - 6:02 pm | शिद
स्पार्टाकस साहेब, आत्ताच पुढच्या लेखमालेचा विषय सांगू नका. लेखमाला येईपर्यंत संबधीत विषय गूढ राहू देत.
17 Sep 2014 - 2:18 pm | काउबॉय
अजुन लिहा.
17 Sep 2014 - 3:38 pm | मृत्युन्जय
खुपच रंजक. मला तर वाटले होते ही लेखमाला अजुनही सुरु राहिल. अजुनही कितीतरी गूढ विषय बाकी आहेत की. पेरुतले डायमेंशनल डोअर्स, फिलाडेल्फिया प्रयोग आहे, लेरिना गार्शिया आहे. तुमच्याकडुन यावर वाचायला आवडेल.
17 Sep 2014 - 4:04 pm | ज्ञानोबाचे पैजार
मस्त लेखमाला, आवडली...
बर्फावरची लेखमाला लवकर सुरु करा.
पैजारबुवा,
17 Sep 2014 - 4:50 pm | शिद
मस्त झाली लेखमाला. शेवटचा भाग अगदीच खिळवून ठेवणारा आहे.
पुढच्या लेखमालेसाठी शुभेच्छा. वाट पहात आहे.
17 Sep 2014 - 6:22 pm | कवितानागेश
सॉलिड आहे हा भाग. एकदा शोधायला पाहिजे हा टॉर्ड. :)
17 Sep 2014 - 6:36 pm | निश
स्पार्टाकस सर फार मस्त लेखमाला आहे. फार सुंदर व तितकीच सही.
18 Sep 2014 - 4:45 am | खटपट्या
मी यती वर लीहा असे सुचवले होते. नवीन मालीका त्यावर तर नाहीना ?
18 Sep 2014 - 7:37 pm | देशपांडे अमोल
ह्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून एक सत्य घटना सांगतो. ही घटना माझ्या वडिलांच्या सोबत घडली आहे. माझे वडील आता हयात नाहीत. परंतु त्यांनी ही घटना खूप वेळेला सांगितली आहे आम्हाला व इतरांना देखील आणि अक्षरश: सत्य आहे.
काळ साधारण १९८५ च्या आस पास.वडील साधारण ३०-३२ चे. आम्ही नांदेड च्या जवळ असलेल्या लोहा ह्या गावी राहत होतो. वडील म. रा. वि. म. मध्ये कामाला असल्या मुळे त्यांची तिथे बदली झाली होती. तेव्हा आम्ही एका वाड्यात राहत होतो, अगदी जुना पद्धतीचा वाडा. त्यात एक मोठ्ठा चौक व मध्यभागी एक विहीर व तिला एक चौथरा.
एका रात्री वडील लघवि साठी कॉमन टॉयलेट कडे गेले. परत येत असतांना त्यांना त्या विहिरी जवळ एक माणूस उभा असलेला दिसला. हा चांगला ६ फुट ऊंच होता. अगदी गोरापान. चेहरा अगदी तेज:पुंज. त्याने एक पीतांबरा सारखे वस्त्रा नेसले होते. त्याचा हातात कमंडलु होता. वेळ रात्रीची होती. सर्व जन झोपलेले होते आणि सर्व काही शांत. त्या माणसाच्या तेजामुळे थोडा प्रकाश निर्माण झाल्या सारखा होता.
हा माणूस कोण आणि हा कोणाकडे आला आहे का? ह्याला कोण हवं आहे? ह्या विचाराने माझे वडील त्याच्या जवळ गेले. त्याला त्यांनी हे प्रश्न विचारले. थोडा वेळ म्हणजे अगदी २-५ मी. मध्ये हे सर्व झाले. वडिलांनी हे प्रश्न विचारले तेव्हा त्याने त्यांच्या कडे बघितले. तो थोडा हसला. स्मित हास्य. पण तो काहीच बोलला नाही. मग वडील त्याच्या थोडं जवळ गेले. आणि अचानक तो अदृश्य झाला. आणि अचानक सगळीकडे अंधार झाला. वडील चक्रावले. हा प्रकार त्यांना एकदम धक्कादायक होता.
त्यांनी हा प्रकार दुसर्या दिवशी वाड्यात सगळ्यांना सांगितला. पण कोणालाच हे एक्सप्लेन करता नाही आलं.
वडील नांदेड ला माझ्या आजोबांकडे गेले. आजोबा थोडे सत् पुरूष किंवा संत ह्या प्रकारातले होते. त्यांना बर्याच गोष्टी कळत ही असत. त्यांना ही गोष्ट वडिलांनी सांगितली. त्या वर ते म्हणाले. अरुण तुझी ही पूर्व जन्मीची पुण्याई आहे. त्या मुळे तुला तो दिसला. झालेली घटना इतकी जबरदस्त होती की ती माझ्या वडिलांच्या मनावर कायम कोरलेली राहिली. ते जेव्हा पण ही घटना सांगत असत तेव्हा त्यांच्या अंगावर काटा येत असे.
थोडं फार ह्या वरील घटने प्रमाणेच ही घडली. मला वाटतं की ही व्यक्ती देखील अशीच ४थ्या मिती तून आलेली वैगेरे असावी.
19 Sep 2014 - 12:53 am | स्पार्टाकस
अमोल,
तुमच्या वडीलांनी पाहीलेला तो पुरुष निश्चितच वेगळ्या जगतातून आला असावा. परंतु माझ्या अंदाजाप्रमाणे तो चुकून न होता काही विशीष्ट कारणासाठी आला असावा.
18 Sep 2014 - 11:39 pm | मुक्त विहारि
संपादकांना एक विनंती...
ह्या लेखमालेचे सगळे भाग एकत्र करता आले तर उत्तम.
परत वाचावीशी वाटली तर मुद्दाम शोधा-शोध करायला नको....
19 Sep 2014 - 12:14 am | कवितानागेश
आता इथेच सगळ्या लिन्क्स दिल्या आहेत.
19 Sep 2014 - 3:46 am | मुक्त विहारि
लगेच वाचनखूण साठवली
19 Sep 2014 - 12:27 am | खटपट्या
खाली दिलेल्या लिंक वर काही अनुभव आहेत. जरूर वाचा
http://9gag.com/gag/aZWBdDz?ref=fb.s
2 Aug 2024 - 11:56 pm | रामचंद्र
यातला शेवटचा तर अरे बापरे!
19 Sep 2014 - 8:17 am | स्पार्टाकस
आर्क्टीक सर्कलमधील नॉर्थवेस्ट पॅसेज
8 Dec 2016 - 2:20 pm | हकु
अगदी अद्भुत!
इतर ९ कथांप्रमाणेच ही कथा ही अतिशय उत्तम.
मजा आली अक्खी लेखमाला वाचताना.
8 Dec 2016 - 4:58 pm | बरखा
सगळेच भाग मस्त झाले आहेत. पुढ्च्या भागांच्या अपेक्षेत...
9 Dec 2016 - 6:01 pm | दीपक११७७
मस्त लेख मलिका
धन्यवाद
13 Dec 2016 - 1:22 pm | बापू नारू
धन्यवाद ,बऱ्याच दिवसांनी मिपा वर जास्त वेळ वाचन झालं :)
13 Aug 2024 - 11:34 pm | diggi12
आपण अजून कुठे लिहिता का ?