१८५२ सालची गोष्ट..
लंडन शहरातील हाईड पार्क चांगलेच गजबजलेले होते. विविध प्रकारच्या इमारतींचे आणि बांधकामक्षेत्रातील तत्कालीन चमत्कारांचे मोठे प्रदर्शन तिथे भरले होते. अनेक प्रकारच्या बांधकामाचे लहान-मोठ्या आकारातील नमुने तिथे ठेवण्यात आलेले होते. चोखंदळ ब्रिटीश नागरीक प्रत्येक बांधकामाचं चिकीत्सकपणे निरीक्षण करत होते. मात्रं सर्वांची राहून राहून नजर जात होती ती मधोमध करण्यात आलेल्या एक मोठ्या बांधकामावर...
१५२ फूट उंचीचा एक लोखंडी टॉवर!
प्रदर्शनाला आलेले सर्वजण उत्सुकतेने त्या टॉवरचं निरीक्षण करत होते. काही जणांनी त्या टॉवरच्या शेवटच्या टोकावर असलेल्या प्लॅटफॉर्मवरुन दिसणारं लंडन शहराचं विहंगम दृष्यही डोळ्यात साठवून घेतलं!
लंडनमधील हे प्रदर्शन संपल्यावर इतर बांधकामांचे नमुने जमिनदोस्त करण्यात आले. परंतु हा टॉवर मात्र कित्येक महिने तिथेच उभा होता.
काही वर्षांनी हा टॉवर खाली उतरवण्यास सुरवात झाली. टॉवरच्या माथ्यापासून सुरवात करुन अत्यंत काळजीपूर्वक त्याचा एकेक भाग खाली उतरवण्यास सुरवात झाली. टॉवरचा एकेक भाग खाली उतरवला की त्यावर विशीष्ट खूण करण्यात येत होती. हा संपूर्ण टॉवर दुसरीकडे जसा च्या तसा उभारण्याची योजना होती. संपूर्ण टॉवर खाली उतरवल्यावर लोखंडाच्या तुकड्यांचं एखादं भलंमोठं जिग-सॉ पझल असल्यासारखं ते दृष्यं दिसत होतं!
टॉवरचे सर्व भाग खाली उतरवल्यावर ते थेम्स नदीतील अनेक पडावांवर चढवण्यात आले. पडावांवरुन हे तुकडे खुल्या समुद्रात असलेल्या तीन मोठ्या बोटींवर चढवण्यात आले. हे काम पूर्ण होताच या बोटींनी नांगर उचलले आणि बहामा बेटांच्या दिशेने मोर्चा वळवला.
बहामा बेटातील बिमिनी कीज चा परिसर म्हणजे अनेक लहान-मोठ्या बेटांचा समुह आहे. फ्लोरीडाच्या पूर्व किनार्यावरील फोर्ट लॉडरडेल च्या पूर्वेला सुमारे ५५ मैलांवर आणि बिमीनी कीजच्या उत्तरेला असलेलं एक लहानसं बेट म्हणजे ग्रेट आयझॅक रॉक! या बेटाची जास्तीत जास्त रुंदी सुमारे पाऊण मैल इतकीच आहे! या बेटाभोवती कोरल रीफचं जाळं पसरलेलं असल्याने त्यातून मार्ग काढणं हे मोठं जिकीरीचं आहे.
लंडनहून टॉवरचे भाग घेऊन निघालेल्या तीन बोटी या बेटापाशी आल्या. टॉवर खाली उतरवण्याच्या कामात भाग घेतलेले बहुतेक कामगार बोटींवर होते. या बेटावर तो टॉवर पुन्हा उभारण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली होती. या टॉवरचा उपयोग दीपस्तंभ म्हणून करण्याची योजना होती. टॉवरची सर्व सामग्री आणि कामगारांना बेटावर उतरवल्यावर तीनही बोटी इंग्लंडला परतल्या.
पुढे घडणार्या प्रकाराची त्यांच्यापैकी कोणालातरी पुसटशी कल्पना होती का?
१८४५ मध्ये एक इंग्लीश जहाज ग्रेट आयझॅक रॉकच्या परिसरातील दगडांवर आपटून फुटलं होतं. या अपघाताची माहिती मिळताच बिमीनी बेटावरील रहिवाशांनी जहाजातील प्रवाशांचा शोध घेण्यास सुरवात केली. शोध घेणार्यांपैकी एक तुकडी दोन दिवसांनी आयझॅक रॉक बेटावर पोहोचली. बेटावर एक पिंप वाहत आलेलं त्यांच्या दृष्टीस पडलं. पिंपात डोकावून पाहताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला...
एक तान्हं मूल!
कापडांत व्यवस्थित गुंडाळलेलं ते बाळ पाहून सर्वजण चकीत झाले. ती एक मुलगी होती. तिला बिमीनी बेटावर आणण्यात आलं. पुढे पूर्ण तपासाअंती तिला इंग्लंडमधील तिच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आलं! जहाजावरील इतर एकाही माणसाचा काहीच पत्ता लागला नाही!
ग्रेट आयझॅक रॉकवर उतरलेल्या कामगारांचं टॉवर उभारण्याचं काम जोरात सुरु झालं. टॉवरचा पहिला मजला जवळपास उभारुन पूर्ण झाला होता. एव्हाना दोन आठवडे उलटले होते. लवकरच पौर्णिमा येणार होती. अशातच एक दिवस...
रात्रीच्या पहार्यावरील दोन गार्डस आपसात गप्पा मारत होते. टॉवरच्या उभारणीला अद्याप किती दिवस लागतील याबद्दल त्यांची आपसात चर्चा सुरु होती. त्यांच्या गप्पा रंगात आलेल्या असतानाच अचानक...
....एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला!
या अनपेक्षीत प्रकाराने दोघं पाहरेकरी गोंधळून गेले. इंग्लंडहून त्यांच्याबरोबर आलेल्या कामगारांत एकाही स्त्रीचा समावेश नव्हता. तसंच त्या बेटावर कोणतीही वस्ती नव्हती, त्यामुळे हा आवाज नेमका कोणत्या स्त्रीचा असावा हे त्यांच्या ध्यानात येईना.
त्या आवाजाचा कानोसा घेत ते दोन पहारेकरी घेत असतानाच...
एक धुरकट आकृती त्यांच्या नजरेस पडली!
ती आकृती एका स्त्री ची होती!
... आणि दु:खाने रडण्याचा आवाज त्या आकृतीकडूनच येत होता!
हा प्रकार पाहून त्या दोन्ही पहारेकर्यांची वाचाच बसायची वेळ आली. काही क्षण खिळल्यागत ते हा प्रकार पाहत राहीले आणि मग टॉवरच्या दिशेने धूम पळत सुटले! टॉवरमध्ये पोहोचल्यावरही किती तरी वेळ तो आवाज त्यांना ऐकू येत होता!
सुरवातीला त्या पहारेकर्यांच्या कहाणीवर कोणीही विश्वास ठेवला नाही. परंतु त्यानंतर पौर्णिमेपर्यंत त्या स्त्रीच्या रुदनाचा आवाज अनेकांच्या कानावर पडला होता! अशातच एक दिवस त्या स्त्रीची आकृती तिथल्या मुख्य इंजिनिअरच्या दृष्टीस पडली!
मुख्य इंजिनिअरने बिमीनी बेटांवरील रहिवाशांकडे त्या स्त्रीच्या आवाजाची आणि आकृतीची चौकशी केली. त्यांनी सांगितलेली माहिती ऐकल्यावर तो स्तंभितच झाला.
बिमीनीच्या रहिवाश्यांच्या मते ती आकृती म्हणजे दुसरी-तिसरी कोणीही नसून त्या वाचलेल्या तान्ह्या मुलीची आई होती! आपल्या मुलीपासून ताटातूट झाल्यावरही तिच्या काळजीने ती परतून आली होती! परंतु बिमीनी आणि आजूबाजूच्या बेटांवर मुलीचा शोध न लागल्याने दर पौर्णिमेच्या आधी काही रात्री ती आपल्या मुलीच्या शोधात विलाप करत फिरत असे!
ग्रेट आयझॅक बेटावरील कामगारांमध्ये चांगलीच दहशत पसरली होती. परंतु डोकं शांत ठेवून त्या इंजिनिअरने त्यांना लवकरात लवकर टॉवरचं काम पूर्ण करण्यास प्रवृत्त केलं. त्यांना आणून सोडणार्या बोटी इंग्लंडला परत गेल्याने त्यांना परतीचा दुसरा मार्गही नव्हता. तसंच टॉवर पूर्ण न झाल्यास त्यांना भयंकर शिक्षेला सामोर जावं लागेल आणि कायमचं या बेटावर राहवं लागेल अशीही त्याने भिती घातली! त्या स्त्रीने आतापर्यंत कोणालाही कसलाही त्रास दिलेला नाही हे सांगण्यासही तो विसरला नाही.
इंजिनिअरच्या बोलण्याचा आणि त्याने घातलेल्या भितीचा परिणाम म्हणून टॉवरचं काम पुन्हा पुढे सुरु झालं. परंतु पुन्हा एकदा पौर्णिमेच्या आधी काही दिवस त्या आकृतीने त्यांना दर्शन दिलंच!
काही काळाने एकदाचा तो दीपस्तंभ बांधून पूर्ण झाला!
दीपस्तंभाच्या सर्वात शेवटच्या - पंधराव्या मजल्या वरती एक अत्यंत प्रखर प्रकाशाचा लाईट बसवण्यात आला. दीपस्तंभाला बाहेरुन लाल आणि पांढरा रंग देण्यात आला. त्याला व्हिक्टोरीया राणीचं नाव देण्यात आलं!
दिपस्तंभाचं काम पूर्ण झाल्यावर कामगारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्या स्त्रीच्या आकृतीपासून त्यांची आता सुटका होणार होती!
ग्रेट आयझॅक बेटावरील दीपस्तंभ
दीपस्तंभ तयार झाल्यावर तिथे काम करण्यासाठी दोन माणसांची नेमणूक करण्यात आली. या दोघांचाही भुता-खेतांवर अजिबात विश्वास नव्हता.
लवकरच पौर्णिमा येत होती...
एक दिवस रात्री दोघं गप्पा मारत बसलेले असतानाच त्यांच्या कानावर स्त्रीच्या रडण्याचा आवाज पडला!
सुरवातीला आपल्याला भास झाला असावा अशीच त्यांची कल्पना झाली. पौर्णिमेच्या आधीचे काही दिवस आणि ऐकलेल्या कथा यामुळे आपल्या मनाचे ते खेळ आहेत अशी त्यांनी स्वतःची समजूत घातली. काही काळाने तो रुदनाचा आवाज आपोआप थांबला!
पौर्णिमेच्या रात्री पंधराव्या मजल्यावर असणारा दिवा बंद झाल्याचं त्यांच्या ध्यानात आलं! काहितरी बिघाड झाला असावा या कल्पनेने दोघं वर गेले. दिव्याला प्रकाश देणार्या विजेच्या सर्कीटमध्ये कोणताच बिघाड दिसून आला नाही. नेमकं काय झालं असाव याची ते चर्चा करत असतानाच...
स्त्री च्या आवाजातील रडण्याचा तोच आवाज त्यांच्या कानावर पडला!
दोघांपैकी एकाने सहज दिव्याच्या दिशेने पाहीलं....
स्त्री ची आकृती!
धुरकट रंगाची ती आकृती नेमकी दिव्याशेजारीच उभी होती! आपल्या मुलीच्या आठवणीत आर्तपणे रडत..
हा प्रकार पाहून दोघं धूम पळत सुटले! दीपस्तंभाच्या खालील मजल्यावरुन बाहेर पडून त्यांनी वर नजर टाकली तो ती आकृती गायब झाली होती!
दीपस्तंभावरील दिवा प्रखर तेजाने उजळला होता!
दोघांनीही दुसर्याच दिवशी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि तिथून पोबारा केला!
हे चक्रं पुढे कित्येक दिवस सुरु राहीलं! महिन्या-दोन महिन्यावर एकही कर्मचारी त्या दीपस्तंभात टिकू शकला नाही! त्यांच्यापैकी जवळपास प्रत्येकाने त्या स्त्रीच्या रुदनाचा आवाज स्पष्ट ऐकला होता. तसंच काही जणांच्या दृष्टीस ती धुरकट आकृतीही पडली होती!
अखेरीस बिमीनी बेटावरील चर्चच्या प्रमुख पाद्र्याने तिथे येऊन काही धार्मिक विधी केले. त्या स्त्रीची मुलगी सुखरुप आहे अशी तिची खात्री पटवण्याचे सर्व विधी आपण केले आहेत असं त्या पाद्र्याने सर्वांना सांगितलं. परंतु त्यानंतरही काही दिवस ती आकृती दृष्टीस पडत असे. यथावकाश ती आकृती दिसेनाशी झाली.
मात्रं त्या स्त्रीच्या रुदनाचा आवाज ऐकू येण्याचं कधीच थांबलं नाही!
अनेक वर्षांनी ४ ऑगस्ट १९६९ मध्ये त्या दीपस्तंभावर काम करणारे दोन कर्मचारी इव्हान मेजर आणि ब्रायन मिलींग्ज कोणताही मागमूस न ठेवता गायब झाले! ग्रेट आयझॅक रॉक बेट बर्म्युडा ट्रँगलमध्येच असल्याने त्यांच्या गायब होण्याचा संबंध त्याच्याशीच जोडण्यात आला.
ग्रेट आयझॅक बेटावरील हा दीपस्तंभ आजही दिमाखात उभा असून कार्यरत आहे. परंतु आता त्याचं पूर्ण काम ऑटोमॅटीक चालतं! तिथे कोणीही कर्मचारी नाही!
आजही पौर्णिमेच्या अगोदर काही दिवस त्या स्त्रीच्या रुदनाचा आवाज येतो असं बिमीनी कीजवरील लोक सांगतात!
१९७८ च्या उन्हाळ्यात बॉब फाऊलर अटलांटीक महासागर ओलांडण्याच्या मोहीमेवर निघाला होता! फाऊलर हा हरहुन्नरी आणि अनुभवी दर्यावर्दी होता. आपल्या अठरा फूटी नौकेतून संपूर्ण जगप्रदक्षिणा करण्याची त्याची मनिषा होती! अटलांटीक पार करण्याची ही सफर म्हणजे जगप्रदक्षिणेच्या मोहीमेची पूर्वतयारी होती!
१० जून १९७८ ला फाऊलरने आपल्या मिस्कीटर या नौकेतून पाम बीच इथे फ्लोरीडाचा किनारा सोडला आणि इंग्लंडमधील प्लायमाऊथ बंदराचा मार्ग धरला. हवामान पूर्ण अनुकूल होतं. आकाशात ढगांचा मागमूस नव्हता. प्रखर सूर्यप्रकाशाने सर्व दिशा उजळून निघाल्या होत्या.
मात्रं दुसर्याच दिवशी हवामान बिघडलं! फोर्ट पिअर्सजवळून जात असतानाच वादळाने फाऊलरच्या मिस्कीटरची पाठ धरली. फाऊलर बिमीनी कीजच्या मार्गावर होता. ग्रेट आयझॅक बेटावरील दीपस्तंभाचा प्रकाश त्याच्या नजरेस पडला.
काही वेळातच तो चव्वेचाळीस अंश उत्तरेला पोहोचला. रेडीओ चालू केल्यावर त्याला येत असलेल्या वादळाची खबर मिळाली! अटलांटीक मधून जाणार्या दोन महत्वाच्या मार्गांवरच वादळ घोंघावत होतं! फाऊलरने आपली बोट जास्तीत जास्तं दक्षिणेकडे नेण्याचा प्रयत्न करण्यास सुरवात केली, परंतु जेमतेम चाळीस डीग्रीपर्यंत तो पोहोचतो न पोहोचतो तोच वादळाने त्याला गाठलं!
वार्याचा वेग एव्हाना ताशी साठ मैलांवर पोहोचला होता! पंधरा ते वीस फूट उंचीच्या लाटा उसळण्यास सुरवात झाली होती! फाऊलरने चोवीस फूटाचं एक शिड वगळता सर्व शिडं उतरवली, परंतु तरीही आपली बोट भरकटत असल्याची भयावह जाणिव त्याला झाली होती! लाटांच्या मार्यात मिस्कीटरची अवस्था फारच दयनीय झाली होती. एखाद्या जोरदार लाटेवर स्वार झाल्यामुळे जरा सुटकेचा नि:श्वास टाकावा तोच पुढची लाट पार डोलकाठीच्या टोकावर आदळून बोटीला हादरवत होती! सागराच्या या झंझावाती थैमानापुढे मोठ्या बोटींचीही बिकट अवस्था झाली होती तर अवघ्या अठरा फुटांच्या बोटीची काय अवस्था झाली असेल याचा विचारही करवत नाही!
वादळाचं हे थैमान पुढचे चार दिवस सुरु राहीलं!
फाऊलरच्या अडचणीत एकामागून एक भर पडत होती. त्याच्या सर्व खाद्यपदार्थांची समुद्राचं खारं पाणी शिरल्यामुळे पार वाट लागली होती! एकूण एक कपडे ओलाचिंब झालेले होते! पिण्याच्या पाण्यातही समुद्राचं पाणी शिरलं होतं! अतीश्रमांमुळे त्याच्या अंगात आता अजिबात त्राण उरलं नव्हतं! गेल्या चार दिवसांपासून अन्न-पाण्याविना त्याची अत्यंत कठीण अवस्था झाली होती. वादळातून आपली बोट बाहेर काढण्याचा त्याने आकांती प्रयत्न केला होता, परंतु त्याला कणभरही यश आलं नव्हतं! अखेर निरुपायाने तो आपल्या केबिनमधील बिछान्यावर पडून राहीला!
जगण्याच्या प्रबळ इच्छेने त्याने आतापर्यंत वादळाशी सामना केला होता. पण आपली ही झुंज अपेशी ठरणार ही जाणिव त्याच्या मनात मूळ धरु लागली!
'आता मृत्यूच माझी यातून सुटका करेल!' फाऊलर स्वतःशीच म्हणाला.
दमलाभागलेला फाऊलर झोपेच्या अधीन होण्याच्या बेतात असतानाच त्याची नजर आपल्या केबीनच्या एका कोपर्यात गेली आणि समोर दिसलेलं दृष्य पाहून तो विलक्षण दचकला...
त्या कोपर्यात तीन उंचेपुरे खलाशी उभे होते! आणि ते त्याच्याकडेच रोखून पाहत होते!
ते तिघं खलाशी आपल्या बोटीवर कुठून टपकले असावेत याचा फाऊलरला अंदाज येईना. क॑दाचित हा आपला भ्रम असावा असं समजून त्याने स्वतःलाच चिमटा काढला, परंतु तरीही ते तिघंही तिथेच होते! फाऊलरने त्यांचे चेहरे निरखण्याचा प्रयत्न केला, पण केबिनमधील मंद उजेडाचा प्रकाश त्यांच्या चेहर्यांपर्यंत पोहचत नव्हता.
फाऊलरचं आपल्याकडे लक्ष्यं गेलेलं पाहताच ते आपापसात वादळातून बाहेर पडण्याच्या उपायांची चर्चा करु लागले!
"आपण दुसरी डोलकाठी उभारली तर?" पहिल्या खलाशाने प्रश्न केला.
"डोलकाठी न उभारताच पुढे मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला तर?" दुसर्या खलाशाने शंका काढली.
"पुढे धावण्यात काहीच अर्थ नाही!" तिसरा खलाशी उद्गारला, "ही बोट इतकी छोटी आहे की ती मागच्या बाजूने उचलली जाईल आणि कलंडेल!"
"त्यापेक्षा डोलकाठी आणि आणखीन एक शिडही उभारू! निदान वार्याच्या दिशेने तरी जाता येईल!" पहिला खलाशी.
"ए! उठ रे! चल कामाला लाग!" दुसरा खलाशी फाऊलरला उद्देशून म्हणाला!
"त्याचा काही उपयोग नाही!" तिसरा खलाशी उद्गारला, "आतापर्यंत त्याने या बोटीची कशी वाट लावून ठेवली आहे पाहताय ना? याच्या भरवशावर राहीलो तर सगळेच समुद्राच्या तळाशी जाऊ!"
त्या खलाशांच्या बडबडीने फाऊलर चांगलाच वैतागला होता. एकतर हे त्याच्या बोटीवर न बोलावता टपकले होते आणि त्याच्यावर खुशाल टीका करत सुटले होते.
"चालू लागा इथून!" फाऊलर ओरडला, "गेट आऊट! एकतर माझ्या बोटीवर घुसता आणि मलाच अक्कल शिकवता? चला निघा!"
परंतु त्या खलाशांनी त्याच्या ओरडण्याला काडीचीही किंमत दिली नाही!
"असा कसा रे तू बोटीचा कॅप्टन झालास?" पहिला खलाशी म्हणाला, "तुला साधं सुकाणूही नीट वळवता येत नाही!"
"नाही तर काय!" दुसरा खलाशी, "आम्ही इथे वादळातून बाहेर पडायचा मार्ग शोधतोय आणि हा इथे आरामात पहुडला आहे!"
"पुढच्या वेळी बोटीवर काम पत्करण्यापूर्वी कॅप्टन याच्यासारखा झोपाळू नाही ना याची खात्री करुन घ्यायला हवी!" तिसर्या खलाशाने मल्लीनाथी केली!
एव्हाना फाऊलरचा पारा चांगलाच चढला होता. त्याच्या बोटीवर येऊन हे उपटसुंभ खुशाल त्यालाच वाट्टेल ते बोलत होते!
"तुम्ही आधी इथून काळं करा!" आपली सगळी ताकद एकवटून तो ओरडला.
तीनही खलाशी ढिम्म!
"ए बाबा! तुझ्याइतका बेजबाबदार कॅप्टन मी अद्याप पाहीलेला नाही!" पहिला खलाशी उद्गारला, "आता उठ आणि वर जा! तू नीट न बांधलेली रडारची लिव्हर निसटली आहे! लवकर हालचाल केली नाहीस तर रडार गमावून बसशील. मग सगळाच बट्ट्याबोळ होईल! उठ!"
फाऊलरला खरंतर त्यांच्यावर कणभरही विश्वास बसत नव्हता. पण तरी धडपडत तो डेकवर गेला आणि पाहतो तो काय....
रडारची लिव्हर खरंच निसटली होती! आणि ते इकडून तिकडे आपटत होतं!
आणखी काही मिनीटांचा उशीर झाला असता तर रडारने समुद्रात गटांगळी खाल्ली असती!
स्वतःशीच आश्चर्य करत फाऊलर आपल्या केबिनमधे परतला आणि त्याने बिछान्यावर अंग टाकलं. एकदम काही आठवल्याप्रमाणे त्याने त्या कोपर्यावर नजर टाकली...
अद्यापही ते तिघं खलाशी तिथेच होते!
"पाहीलस ना? किती बेजबाबदार आहेस तू हे कळलं?" पहिल्या खलाशाने खोचकपणे विचारलं.
फाऊलर काहीच बोलला नाही. खरंतर तो आता पार दमला होता. त्याला झोपेची नितांत आवश्यकता होती.
"प्लीज!" तो म्हणाला, "इथून निघून जा! मला शांतपणे झोपू द्या!"
"मुळीच नाही!" तिघं खलाशी ठामपणे उद्गारले!, "तुला काय वाटलं, तू इतक्या सहजासहजी हार मानलीस म्हणून आम्ही पण मानावी की काय? आम्ही काही तुझ्यासारखे आळशी नाही!"
फाऊलर झोपण्याचा प्रयत्न करु लागला, पण ते तिघं त्याच्या पार खनपटीलाच बसले होते!
"असा कसा रे तू मूर्ख!" पहिला खलाशी उद्गारला, "या एवढ्याश्या बोटीतून अटलांटीक पार करणं म्हणजे खायची गोष्ट वाटली का तुला?"
"नाही तर काय!" दुसर्याने त्याची री ओढली, "त्यातच तुझ्यासारखा आळशी कॅप्टन म्हणजे संपलंच सगळं!"
"बोट चालवण्याची काहीही माहीती नाही आणि निघाला अटलांटीक पार करायला!" तिसर्या खलाशाने फाऊलरचा पार निकाल लावला!
"चल ऊठ! बॅटरीची कॅप निघाली आहे! त्यातील अॅसीडला गळती लागली आहे! खाली जा आणि ती कॅप लाव! ऊठ!"
परंतु फाऊलर इतका दमला होता की त्याला जागेवरुन उठण्याचीही इच्छा होत नव्हती!
"तुझ्यासारखा आळशी माणूस मी जन्मात कधी पाहीला नाही!" पहिला खलाशी, "झक मारली आणि आम्ही तुझ्याबरोबर या भानगडीत पडलो!"
"नाहीतर काय!" दुसरा खलाशी, "चांगली लहानशी सफर करायची सोडून निघाला इंग्लंडला, आणि ते पण हे असलं डबडं घेऊन!"
"तुझ्यासारखा कॅप्टन असताना इंग्लंड काय, परत फ्लोरीडाला सुखरुप पोहोचलो म्हणजे मिळवली!"
पुढचे कित्येक तास हा प्रकार सुरु होता!
फाऊलरला झोप असह्य झाली होती, परंतु ते तिघं खलाशी सतत बडबड करुन त्याला झोपू देण्यास तयार नव्हते!
"हे बघ, आता तुझा हट्टीपणा पुरे झाला!" शेवटी तिसरा खलाशी अधिकारवाणीने उद्गारला, "तुझी फ्लेअर गन उचल आणि मुकाट्याने डेकवर जा! जवळून एक मोठं जहाज जात आहे! त्याचं लक्षं वेधून घे! ऊठ! ही शेवटची संधी देतोय तुला!"
त्या खलाशाच्या आवाजात अशी काही जरब होती की अंगातली उरली-सुरली ताकद गोळा करुन फाऊलर उठला आणि आपली फ्लेअर गन घेऊन डेकवर गेला. डेकवर जाऊन त्याने फ्लेअर गन आकाशात रोखली आणि एकापाठोपाठ एक सहा गोळ्या झाडल्या...
....आणि काही मिनीटांतच बाल्टीमोरच्या दिशेने जाणारं एम.व्ही. अँड्र्यू हे फिनीश जहाज मिस्कीटरजवळ आलं!
अँड्र्यूवरील खलाशांनी फाऊलर आणि मिस्कीटरला आपल्या जहाजावर घेण्याचा प्रयत्न केला, परंतु वादळाचं थैमान सुरू असल्याने त्यांना ते कठीण जात होतं. अखेर वादळाचा जोर कमी होण्याची वाट पाहत ते जहाज तिथेच थांबून राहीलं. खबरदारीचा उपाय म्हणून मिस्कीटरला एका दोरखंडाने जहाजाशी बांधून ठेवण्यात आलं होतं.
सुटकेच्या आनंदात फाऊलर आपल्या केबिनमध्ये परतला आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला...
गेल्या कित्येक तासांपासून अखंड बडबड करुन त्याचं डोकं उठवणारे ते तिघं खलाशी... अदृष्यं झाले होते!
अँड्र्यू जहाजावर काही तास आराम केल्यावर फाऊलरने आपल्या बोटीची तपासणी केली.
बॅटरीची कॅप निघाली होती आणि त्यातील अॅसीड गळून गेलं होतं!
"ते तिघं खलाशी कोण होते आणि माझ्या बोटीवर कसे आले हे मला माहीत नाही!" त्या घटनेबद्दल बोलताना फाऊलर नंतर म्हणाला, "माझ्याशी सतत बोलून, मला सतत डिवचून त्यांनी मला झोपू दिलं नाही! अर्थात त्यामुळेच माझा जीव वाचला! ते मानवी योनीतील नसावे हे मात्रं निश्चित! जे कोणी असतील, पण माझ्यासाठी ते देवदूत ठरले होते!"
ते तीन खलाशी नेमके होते तरी कोण?
*********************************************************************************************
संदर्भ :-
Ghost Ships - रिचर्ड वायनर
Florida mysteries
Ghosts of Florida
( भाग १०, भाग ९, भाग ८, भाग ७, भाग ६, भाग ५, भाग ४, भाग ३, भाग २, भाग १. )
प्रतिक्रिया
7 Sep 2014 - 7:43 am | खटपट्या
खूपच छान !!!
खर तर या दोन वेगवेगळ्या कथा आहेत...
7 Sep 2014 - 9:55 am | स्पा
जबराट
7 Sep 2014 - 12:58 pm | कल्पतरू
खूप छान लेख आहेत. प्रत्येक लेख वाचल्यावर त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन आल्यासारखं वाटतं. ते 3D पिच्चर असतातना अगदी समोर घडल्यासारखं वाटतं तशिच ही 3D मालिका वाचताना अगदी डोळ्यासमोर घडणारी. फोटो आणि व्हीडीओ गूगल करायचा मोह आवरत नाही.
9 Sep 2014 - 12:42 am | मुक्त विहारि
झक्कास...
9 Sep 2014 - 7:46 am | कैलासवासी सोन्याबापु
स्पार्टाकस उत्तम जमले आहे नेहेमीप्रमाणे, एक सजेशन होते, आपल्याकडे सिक्किम मधे चाइना बॉर्डर ला नथुला जवळ एक बाबा मंदिर आहे एका आर्मी जेसीओ ला समर्पित, ह्याच विषयाला धरुन! जमल्यास त्यावर पण लिहा
9 Sep 2014 - 7:49 am | कैलासवासी सोन्याबापु
स्पार्टाकस उत्तम जमले आहे नेहेमीप्रमाणे, एक सजेशन होते, आपल्याकडे सिक्किम मधे चाइना बॉर्डर ला नथुला जवळ एक बाबा मंदिर आहे एका आर्मी जेसीओ ला समर्पित, ह्याच विषयाला धरुन! जमल्यास त्यावर पण लिहा
17 Aug 2024 - 7:12 pm | diggi12
बाबा हरभजन ?
9 Sep 2014 - 9:52 am | योगी९००
छान..!!
आजही पौर्णिमेच्या अगोदर काही दिवस त्या स्त्रीच्या रुदनाचा आवाज येतो आणि दर पौर्णिमेच्या आधी काही रात्री ती आपल्या मुलीच्या शोधात विलाप करत फिरत असे!
प्रत्येक भूत अमावस्येला किंवा पौर्णिमेलाच कसे काय दिसते हो? भूत बहूतेक कालनिर्णय किंवा पंचाग पाहत असावे. किंवा ते भूतच असल्याने त्याही गोष्टीची गरज पडली नसावी. जर मुलीला शोधायचेच असेल तर पौर्णिमेपर्यंत थांबायची काय गरज?
9 Sep 2014 - 11:38 pm | स्पार्टाकस
या प्रश्नाचं उत्तर ते भूतच देऊ शकेल!
मी स्वतः भूत नसल्याने आणि भुतांशी व्यक्तिगत संपर्कात नसल्याने यावर काही बोलू शकत नाही :)
9 Sep 2014 - 9:57 am | मदनबाण
वाचतोय...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!
10 Sep 2014 - 1:19 am | काउबॉय
पण सत्य आहे का ? बहुदा देवधरांच्या कोणत्यातरी पुस्तकात तीन खालाशांची कथा वाचली आहे. अजुन येउदे अगदी तीच क्वालिटी आपल्या लिखाणाला आहे