१९ व्या शतकाच्या उत्तरार्धाचा काळ.
१८४० मध्ये युरोपात आयर्लंडमध्ये भयानक दुष्काळ पडला होता. आयरीश लोकांच्या जेवणाचा मुख्य भाग म्हणजे बटाटा! या बटाट्याच्या पीकावर पडलेला भयंकर रोग या दुष्काळाला मुख्यतः कारणीभूत होता. या काळात आयर्लंडमधील अनेकांवर उपासमारीची वेळ आली. बटाट्याच्या शेतीवर अवलंबून असलेली सुमारे ४० ते ५०% आयरीश जनता देशोधडीला लागली! या दुष्काळातून वाचण्यासाठी अखेरचा उपाय म्हणजे दुसर्या देशांत स्थलांतर करणं! १७०० पासून सुरू असलेल्या आयरीश लोकांच्या स्थलांतराला या दुष्काळानंतर वेग आला.
आयर्लंडमधून आलेला हा निर्वासीतांचा लोंढा सर्वात जास्तं गेला तो अमेरीकेकडे आणि त्याच्या खालोखाल शेजारीच असलेल्या ग्रेट ब्रिटनकडे. आजच्या घडीलाही किमान १०% ब्रिटीश नागरीक हे आयरीश वंशाचे आहेत!
आयर्लंडमधून आलेल्या या निर्वासितांनी ब्रिटनमधील सर्वच मोठ्या शहरांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याला लंडनही अपवाद नव्हतं. लंडनच्या पूर्व भागात (इस्ट एन्ड) आयरीश निर्वासीत स्थिरावले. १८८२ मध्ये रशियन साम्राज्यातून पळून आलेल्या ज्यूंची त्यात भर पडली. झारच्या ज्यूंविरोधी मोहीमेला घाबरुन ज्यूंनी ब्रिटनमध्ये आश्रय घेतला होता.
पूर्व लंडनमधील व्हाईटचॅपलचा परीसर या सगळ्या निर्वासीतांनी गजबजलेला होता. तत्कालीन लंडनमध्ये हा परिसर म्हणजे गुन्हेगारीचं आगर होतं! फ्लॉवर स्ट्रीट आणि डीन स्ट्रीटचा भाग सर्वात धोकादायक समजला जात असे. सर्वात वाईट रस्ता म्हणून डोर्सट स्ट्रीट कुप्रसिध्द होती! व्हाईटचॅपलचा हा परिसर गरीबीने गांजलेला होता. त्यामूळे रस्त्यावरील मारामार्या आणि लुटालूट नित्याचीच होती. गलिच्छ वस्तीतून राहणारे गुन्हेगार, भटके आणि बेघर आणि वेश्यांचा इथे सुळसुळाट होता. लंडनच्या मेट्रोपॉलीटन पोलीस सर्व्हीसच्या माहीतीनुसार व्हाईटचॅपलमध्ये सुमारे ६२ वेश्यागृह होती. त्या वेश्यागृहांत आणि इतरत्र सुमारे १२०० वेश्या त्यावेळी या परिसरात वास्तव्याला होत्या. वाढती गरीबी, बेकारी, भरीला वाढता ज्यूविरोध (अँटी सेमिटीझम) आणि वंशभेद यामुळे हा भाग कुप्रसिद्धच होता. व्हाईटचॅपल हे गुन्हेगारीचं विश्वविद्यालयच होतं जणू!
लंडनमध्ये त्याकाळी दोन पोलीसदलं अस्तित्वात होती. सिटी ऑफ लंडन पोलीस हे लंडनच्या मुख्य भागाती सिटी सेंटरच्या परिसरात कार्यरत होते. उरलेल्या सर्व लंडंनची जबाबदारी मेट्रोपोलीटन पोलीसांवर होती. व्हाईटचॅपलचा हा परिसर म्हणजे पोलीसांसाठी कायमची डोकेदुखी होती.
एम्मा स्मिथ ही एक वेश्या होती. ३ एप्रिल १८८८ या दिवशी पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान ती स्पिटलफिल्ड विभागातील जॉर्ज स्ट्रीटवरील आपल्या घरी परतत होती. आपल्याच नादात चालत ती ब्रिक लेन आणि ओस्बॉर्न स्ट्रीट याच्या चौकात पोहोचली असताना अचानक तिच्यावर हल्ला करण्यात आला!
स्मिथ जबर जखमी झाली होती. परंतु तशाही अवस्थेत तिने आपलं बोर्डींग हाऊस गाठलं. मॅनेजर मेरी रसेल स्मिथला जखमी अवस्थेत पाहून हादरलीच! स्मिथने आपल्यावर दोन-तीन जणांनी हल्ला केल्याचं तिला सांगितलं. त्यापैकी एक अगदीच तरूण टीनएजर असावा असाही तिचा अंदाज होता.
मेरी रसेलने स्मिथला ताबडतोब लंडन हॉस्पीटलमध्ये नेलं. डॉक्टरांच्या तपासणीत स्मिथच्या जननेंद्रियात तीक्ष्ण टोकाची काहीतरी वस्तू खुपसल्याचं निष्पन्न झालं! या भयानक प्रकारामुळे तिला जबरदस्त अंतर्गत दुखापत झालेली होती. असह्य वेदनांनी तडफडत सकाळी ९ वाजता स्मिथने डोळे मिटले.
स्मिथच्या मृत्यूचा तपास सुरु असतानाच व्हाईटचॅपलमध्ये दुसर्या वेश्येची हत्या झाली!
७ एप्रिल १८८८ रोजी - स्मिथच्या खुनानंतर चार दिवसांनी - पहाटे अडिचच्या सुमाराला ३९ वर्षांच्या मार्था टॅब्रम हिचा खून झाला! व्हाईटचॅपलमधील जॉर्ज यार्ड परिसरातील इमारतीत तिचा मृतदेह मिळून आला.
मार्थाच्या शरीरावर लहान आकाराच्या चाकूने ३९ ठिकाणी भोसकल्याच्या खुणा होत्या!
मार्था टॅब्रम
मार्थाबरोबर असलेली आणखीन एक वेश्या आणि थॉमस बॅरेट या पोलीस कॉन्स्टेबलने टॉवर ऑफ लंडन आणि वेलींग्टन बॅरॅक्समधील सैनिकांवर आपला संशय व्यक्त केला. इन्स्पेक्टर रीडने या सर्वांची ओळखपरेड घेतली, परंतु यातून काहीच निष्पन्न झालं नाही.
टॅब्रम आणि स्मिथच्या खुनाचा परस्पर संबंध होता का?
३१ ऑगस्टला व्हाईटचॅपलमधील बक् रो या तुलनेने लहानशा गल्लीत मेरी अॅन निकोलस हिचा खून झाला!
पहाटे पावणेचारच्या सुमाराला घोड्याची बग्गी चालवणार्या चार्ल्स क्रॉस याला एका तबेल्याच्या फाटकाबाहेर मेरीचा मृतदेह आढळून आला. मेरीच्या मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट होती. तिचा गळा डावीकडून उजवीकडे असा कापण्यात आलेला होता. पोट वाईट प्रकारे फाडून टाकण्यात आलं होतं. पोटावर एकूण सात वेगवेगळ्या आकाराच्या जखमा आढळून आल्या. ज्या सुरीने तिचा गळा कापण्यात आला होता, त्यानेच तिच्या पोटाचीही चिरफाड करण्यात आली होती. ४३ वर्षांची निकोलस ही स्मिथ आणि टॅब्रमप्रमाणेच वेश्याव्यवसाय करत होती.
मेरी अॅन निकोलस
एकापाठोपाठ घडलेल्या या तीन खुनांच्या घटनांनी लंडन हादरुन गेलं होतं. त्यातच मेट्रोपोलीटन पोलीस कमिशनर सर चार्ल्स वॉरेन याच्याशी मतभेद झाल्यामुळे असिस्टंट कमिशनर जेम्स मुनरो याने ३१ ऑगस्टलाच राजीनामा दिला! वृत्तपत्रांनी या तिनही खूनांमागे एकाच व्यक्तीचा हात असावा असा संशय व्यक्तं केला. लंडनमध्ये सिरीयल किलर मोकाट सुटलेला असल्याची बातमी येताच स्कॉटलंड यार्ड सतर्क झालं!
स्कॉटलंड यार्डचे डिटेक्टीव्ह फ्रेड्रीक अॅबर्लीन, हेनरी मूर आणि वॉल्टर अॅन्ड्रूज यांनी तपासाची सूत्रं हाती घेतली. मिडलसेक्स काऊंटीचा कॉरोनर वेन बॅक्स्टर याने पोस्टमॉर्टेमनंतर सगळ्या परिस्थितीचा विचार करुन निकोलसच्या खुनाचा स्मिथ आणि टॅब्रम यांच्या खुनाशी काहीही संबंध नाही असा निष्कर्ष काढला. निकोलसची हत्या गळा चिरुन करण्यात आली होती. परंतु स्मिथ आणि टॅब्रमच्या गळ्यावर कोणतेही वार नव्हते. तसंच टॅब्रम आणि निकोलसच्या खुनात वापरण्यात आलेलं हत्यारं वेगळी होती असंही त्याला आढळलं. निकोलसचा खून पहाटे ३ च्या सुमाराला करण्यात आला होता.
१ सप्टेंबरला जेम्स मुनरो याच्या जागी रॉबर्ट अँडरसन याची नेमणूक करण्यात आली. परंतु प्रकृतीच्या कारणास्तव तो ७ सप्टेंबरला रजा घेऊन स्वित्झरलंडला गेला! त्याच्या जागी डोनाल्ड स्वॅन्सनची नेमणूक करण्यात आली.
निकोलसच्या खुनाचा तपास सुरू असतानाच पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने व्हाईटचॅपल हादरलं!
८ सप्टेंबरला सकाळी सहा वाजता स्पिटलफिल्ड विभागातील हॅनबरी स्ट्रीटवरील एका घराच्या मागे असलेला लहानशा ग्राऊंडवर अॅनी चॅपमनचा मृतदेह आढळला!
४७ वर्षांची अॅनी चॅपमन ही देखील वेश्या होती. आपल्या लॉजमधून ती रात्री दोन वाजता बाहेर पडली होती. लॉजचं भाडं भरण्यासाठी एखादं गिर्हाईक गाठणं तिला अत्यावश्यक होतं!
अॅनी चॅपमनचा गळा चिरलेला होता!
मेरी निकोलसचा चिरला होता तसाच! डावीकडून उजवीकडे!
अॅनी चॅपमन
अॅनीचं पोट फाडण्यात आलेलं होतं! तिची आतडी बाहेर काढून तिच्या दोन्ही खांद्यांवर टाकण्यात आली होती!
पोस्ट मॉर्टेमच्या दरम्यान अॅनीच्या गर्भाशयाचा एक भाग काढून घेण्यात आल्याचं निष्पन्न झालं! जॉर्ज फिलीप्स या पॅथॉलॉजीस्टच्या मते खुन्याला मानवी शरीररचनेची पूर्ण माहीती असावी. सुमारे ६ ते ८ इंचाच्या पात्याने एकाच घावात चॅपमनचं गर्भाशय कापण्यात आलेलं पाहून फिलीप्सने हा तर्क केला होता! परंतु पोस्टमार्टेम करणार्या डॉक्टरनी फिलीप्सचं हे मत धुडकावून लावलं!
१० सप्टेंबरला पोलीसांनी जॉन पाईझर नावाच्या एका व्यक्तीला अटक केली. लेदर अॅप्रन या नावाने ओळखला जाणारा जॉन वेश्यांना धमक्या देण्यामुळे कुप्रसिध्दच होता. परंतु तीनही खुनांच्या वेळेस तो वेगळ्याच ठि़काणी असल्याचं पुराव्यानिशी आढळून आल्याने पोलीसांनी त्याची मुक्तता केली.
पोलीस चौकशीत एलिझाबेथ लाँग हिने चॅपमनला ज्या घरामागे तिचा मृतदेह आढळला होता त्या घरामागेच एका माणसाशी बोलताना पाहील्याचं कबूल केलं. हा माणूस चाळीशीचा आणि वर्णाने काळा होता. तो चॅपमनपेक्षा उंच होता. त्याचा पोशाख अगदीच गबाळा होता. त्याने मोठी हॅट आणि गडद रंगाचा ओव्हरकोट घातला होता. अल्बर्ट कॅडॉश या सुताराने घरामागे मोठ्याने बोलण्याचा आणि कोणीतरी खाली पडल्याचा आवाज ऐकल्याचं पोलीसांना सांगीतलं. कॉरोनर बॅक्स्टरच्या मते लाँगने चॅपमनबरोबर पाहिलेला माणूस हाच खुनी असावा!
व्हाईटचॅपलमधील या खूनसत्राने संपूर्ण लंडन शहरावर दहशतीची छाया पसरली होती. व्हाईटचॅपलचा पार्लमेंट मेंबर असलेल्या सॅम्युएल माँटेग्यू याने खुन्याबद्दल माहिती देणार्यास १०० पौंडांचं बक्षीस देण्याची घोषणा केली. या हत्या हे ज्यू लोकांची एक परंपरा होती अशीही बातमी लंडनभर पसरली! ज्यूंच्या विरोधार्थ मोठा मोर्चा काढण्यात आला होता. व्हाईटचॅपलच्या रहिवाशांनी गेराल्ड लस्कच्या नेतृत्वात व्हाईटचॅपल दक्षता समितीची स्थापना केली. खुन्याविषयी माहीती देणार्यास बक्षीस जाहीर करण्याची त्यांची योजना मात्रं पोलीसांनी फेटाळून लावली. बक्षीसाच्या आशेने मिळणार्या खोट्या माहितीमुळे पोलीस तपास भऱकटण्याची शक्यता नाकारता येत नव्हती! पोलीसांवर अवलंबून न राहता समितीने दोन खाजगी डिटेक्टीव्हवर खुन्याचा शोध घेण्याची कामगिरी सोपवली.
दरम्यानच्या काळात पोलीसांचा शोध सुरुच होता. पोलीसांना खुनी कोण असावा याबद्दल संशय व्यक्त करणारी आणि तपासात 'मार्गदर्शन' करणारी अनेक निनावी पत्रं आली होती. यापैकी काही पत्रं पोलीसांच्या तपासाला मदत करणारी असली, तरी बहुतेक सर्व पत्रं सनसनाटी निर्माण करण्याच्या हेतूनेच लिहीली गेली होती. या पत्रांतून एकापेक्षा एक अचाट तर्क मांडण्यात आलेले होते.
२७ सप्टेंबरला असंच एक पत्रं लंडनच्या सेंट्रल न्यूज एजन्सीला मिळालं. एजन्सीने हे पत्रं ताबडतोब स्कॉटलंड यार्डच्या हवाली केलं. सुरवातीला स्कॉटलंड यार्डच्या अधिकार्यांनी आणखीन एक भंपक पत्रं म्हणून त्याकडे दुर्लक्षंच केलं परंतु....
३० सप्टेंबरला व्हाईटचॅपल पुन्हा एकदा हादरलं..
४० बर्नर स्ट्रीट इथल्या फाटकाच्या आतील बाजूला लुईस डिमशुत्झ याला रात्री एक वाजता एलिझाबेथ स्ट्राईड या ४० वर्षांच्या वेश्येचा मृतदेह आढळला! तिचा गळा डावीकडून उजवी़कडे असा चिरण्यात आलेला होता! अवघ्या काही मिनीटांपूर्वीच तिचा खून करण्यात आला असावा. तिच्या शरीरावर दुसरी कोणतीही जखम आढळून आली नाही! तिचा खून केल्यावर शरीराची चिरफाड करण्यापूर्वीच कोणाच्यातरी येण्याची चाहूल लागल्याने खुनी पसार झाला असावा!
एलिझाबेथ स्ट्राईड
स्ट्राईडचा मृतदेह दिसून आल्यावर अवघ्या पाऊण तासात - पावणेदोन वाजता ४६ वर्षांच्या कॅथरीन एडोजचा मृतदेह आढळला!
बर्नर स्ट्रीटपासून चालत १२ मिनीटांच्या अंतरावर लंडन शहरातील मिट्री स्क्वेअर चौकाच्या नैऋत्येला असलेल्या कोपर्यात एडोजचा खून करण्यात आलेला होता. डावीकडून उजवीकडे गळा चिरुन! एडोजच्या चेहर्यावरही अनेक जखमा होत्या. तिचं पोट फाडण्यात आलेलं होतं. तिची आतडी काढून उजव्या हातावरुन डाव्या खांद्यावर टाकण्यात आली होती! तिची डावी किडनी आणि गर्भाशयाचा बहुतेक सर्व भाग काढून घेण्यात आला होता. तिच्या एका कानाची पाळीही कापण्यात आलेली होती!
कॅथरीन एडोज
पॅथॉलॉजीस्ट फ्रेड्रीक ब्राऊनच्या मते खुन्याला मानवी शरीराची चांगलीच माहीती होती. शरीराच्या अंतर्भागात कोणता अवयव नेमका कोणत्या जागी आहे याची कल्पना असल्याशिवाय इतक्या सफाईदारपणे हे अवयव काढून घेणं अशक्यं आहे असं त्याचं मत होतं. परंतु सर्वप्रथम मृतदेह पाहणार्या डॉक्टरच्या मते खुन्याला शरीररचनेची कल्पना नसून पोट फाडल्यावर दिसतील ते अवयव तो कापून काढत असावा! मेडीकल ऑफीसर विल्यम साँडर्सचंही असंच मत पडलं!
एडोजचा खून लंडन शहरात झाल्यामुळे तपासपथकात आता इन्स्पेक्टर जेम्स मॅकविल्यमची भर पडली!
पहाटे तीनच्या सुमाराला एडोजच्या कपड्याचा एक रक्ताळलेला तुकडा गॉल्स्टन स्ट्रीटकडे जाणार्या दरवाजाजवळ मिळून आला! शेजारील भिंतीवर खडूने एक संदेश लिहीण्यात आला होता. त्यात म्हटलं होतं,
The juves are the men that will not be blamed for nothing.
(विनाकारण कोणी ज्यूंना दोष देणार नाही!)
मेरी निकोलसच्या खुनापासूनच ज्यूविरोधी वातावरण तापलं होतं. कोणत्याही क्षणी ज्यू विरुद्ध ख्रिश्चन असा धर्मयुद्धाचा भडका उडेल अशी शक्यता होती. पहाटे पाच वाजता कमिशनर वॉरेनने तो संदेश वाचल्यावर धर्मयुद्धाला आणखीन कारण मिळू नये म्हणून तो पुसून टाकण्याचा हुकूम दिला!
मिडलसेक्सचा कॉरोनर वेन बॅक्स्टरच्या मते स्ट्राईडवरचा हल्ला इतक्या अचानक करण्यात आला होता की तिला खुन्याला प्रतिकार करण्याची किंवा स्वतःचा बचाव करण्याची संधीच मिळाली नव्हती. स्ट्राईडच्या डाव्या हातात मुखशुध्दीकरण करणार्या गोळ्यांचं पाकीट तसंच धरलेलं आढळून आलं होतं!
मॅथ्यू पॅकर नावाच्या एका वाण्याने स्ट्राईड आणि तिच्याबरोबरील माणसाला द्राक्षं विकल्याचं दक्षता समितीच्या डिटेक्टीव्हला सांगितलं. परंतु पोलीसांना दिलेल्या जबानीत मात्रं आपण आपलं दुकान बंद केल्याचं त्याने मान्य केलं होतं. पोस्टमॉर्टेमच्या दरम्यान स्ट्राईडच्या पोटात द्राक्षाचा अंशही आढळून आला नाही.
जोसेफ लेवाँड आपल्या दोन साथीदारांसह एडोजच्या खुनापूर्वी काही मिनीटेच मिट्री स्क्वेअर चौकातून पुढे गेला होता. त्याने एडोजला एका पस्तीशीच्या माणसाबरोबर पाहीलं होतं. हा माणूस अगदीच गबाळा दिसत होता. त्याने एक पी-कॅप घातली होती. त्याला चांगल्या जाडजूड मिशा होत्या. परंतु पुन्हा तो माणूस आढळल्यास त्याला ओळखण्यास लेवाँडने असमर्थता व्यक्त केली. त्याच्या दोन्ही साथीदारांनी तो माणूस नीट पाहीला नसल्याने ते वर्णन करण्यास असमर्थ होते.
लेवाँडने एडोजबरोबर पाहीलेल्या माणसाचं जे वर्णन केलं होतं, तेच वर्णन स्ट्राईडबरोबरच्या माणसाचं दुसर्या एका साक्षीदाराने केलं होतं!
लंडन पोलीसांवर कोणत्याही खुनाच्या तपासात प्रगती न झाल्याने टीकेचा भडीमार सुरू होता. लंडनच्या मेयरने खुन्याबद्दल माहिती देण्यार्यास ५०० पौंडांचं बक्षीस जाहीर केलं. खुन्याच शोध घेण्यासाठी ब्लडहाऊंड जातीच्य कुत्र्यांचा वापर करण्याचीही कल्पना पुढे आली, परंतु खुन्याने कोणतीच वस्तू मागे न ठेवल्याने त्याचा फारसा उपयोग होण्यासारखा नव्हता. त्यातच खुनी कुत्र्यांवर विषप्रयोग करेल या भितीने कुत्र्यांच्या मालकांनी या योजनेला साफ नकार दिला!
एडोजचं पोस्टमॉर्टेम करताना तिच्या कानाची पाळी कापल्याचं ध्यानात आल्यावर स्कॉटलंड यार्डला २७ सप्टेंबरला आलेल्या पत्राची आठवण झाली! हे पत्रं खुनी व्यक्तीने स्वतः लिहीलं होतं असा त्यात उल्लेख केलेला होता. पत्रात म्हटलं होतं -
डिअर बॉस,
आमचा तपास योग्य मार्गाने चालू आहे आणि आम्ही खुनी माणसाच्या जवळ पोहोचलो आहोत असं माझ्या कानावर आलं की मला हसू आवरत नाही! लेदर अॅप्रनच्या विनोदाने तर माझी चांगलीच करमणूक झाली. वेश्यांविरुध मी ही मोहीम उघडली आहे आणि मी पकडला जात नाही तोपर्यंत मी ती थांबवणार नाही. शेवटचा खून केला तेव्हा मी तिला कसलीच संधी दिली नाही. आता पोलीस मला कसे पकडू शकतील? माझ्या आवडत्या कामाल मी पुन्हा सुरवात केलेली लवकरच तुमच्या कानावर येईलच. गेल्या वेळच्या त्या बाईचं थोडंसं रक्तं मी बीअरच्या बाटलीत साठवून ठेवलं होतं, परंतु ते गोठून गेलं त्यामुळे त्याचा मी लिहीण्यासाठी वापर करु शकत नाही. पण रक्ताऐवजी लाल शाई चालू शकेल. पुढला खून केला की मी तिच्या कानाच्या पाळ्या कापून गंमत म्हणून पोलीसांना पाठवून देईन! माझं पुढचं काम होईपर्यंत हे पत्र जपून ठेवा. मग कोणालाही दिलंत तरी चालेल. पुढचं काम करायला माझे हात आणि सुरी दोन्ही शिवशिवत आहेत. गुड लक.
तुमचा
जॅक द रिपर
माझं खरं नाव वापरलं तर चालेल ना?
ता.क. माझ्या हाताला पडलेले रक्ताचे डाग वाळण्यापूर्वीच हे पत्रं पाठवण्याची इच्छा होती. परंतु जमलं नाही. मला ते चक्कं डॉक्टर समजतात!
पत्राच्या शेवटी खुनी व्यक्तीने आपली जी सही केली होती, त्याच नावाने खुनी प्रसिद्ध होणार होता...
जॅक द रिपर!
पत्रात कानाच्या पाळ्या कापून पोलीसांना पाठवण्याचा इरादा व्यक्त करण्यात आला होता....
.... आणि एडोजच्या कानाची पाळी कापलेली होती!
प्रत्यक्षात मात्रं पोलीसांना कानाची पाळी पत्राद्वारे पाठवण्यात आली नाही.
जॅक द रिपरचं डियर बॉस पत्रं - पुढील बाजू
जॅक द रिपरचं डियर बॉस पत्रं - मागील बाजू
(डिअर बॉस या नावाने प्रसिद्ध असलेलं हे मूळ पत्रं तपास बंद झाल्यावर स्कॉटलंड यार्डच्या फाईलमधून गायब झालं होतं! १९८७ मध्ये एका निनावी पत्राद्वारे ते पुन्हा लंडन मेट्रोपोलीटन पोलीसांना पाठवण्यात आलं!)
स्ट्राईड - एडोज या दुहेरी खुनांचा तपास सुरू असतानाच जॅक द रिपरचं दुसरं पत्रं येऊन धडकलं!
पहिल्या पत्राप्रमाणेच हे पत्रं सेंट्रल न्यूज एजन्सीला पाठवण्यात आलं होतं. १ ऑक्टोबरला आलेल्या या पोस्टकार्डमध्ये लिहीलं होतं -
तुम्हाला सॉसी जॅकीच्या कामगिरीबद्दल लवकर ऐकायला मिळेल असं मी म्हटलं होतं ते फुशारकी म्हणून नव्हे बॉस! यावेळी दोन! डबल इव्हेंट! पहिलीचं काम पटकन संपवता आलं नाही. पोलीसांसाठी तिचे कान कापता आले नाहीत. पुढच्या कामगिरीपर्यंत हे पत्रं जपून ठेवा. धन्यवाद.
जॅक द रिपर
या पत्रातील हस्ताक्षर आणि पहिल्या पत्रातील हस्ताक्षर तंतोतंत जुळत होतं. तसंच एडोजच्या कानाची पाळी कापलेली आढळून आली होती. स्ट्राईड - एडोज यांच्या दुहेरी खुनाचा डबल इव्हेंट असा उल्लेख करण्यात आला होता!
सॉसी जॅकी पोस्टकार्ड
स्ट्राईड आणि एडोजच्या खुनापूर्वी १८ सप्टेंबरला चार्ल्स लुडविग या जर्मन हेअरड्रेसरला संशयावरुन अटक करण्यात आली होती. परंतु दुहेरी खुनाच्या या घटनेनंतर लुडविगचं निर्दोषत्वं आपसूकच सिद्ध झालं होतं!
२ ऑक्टोबरला बांधकाम सुरू असलेल्या स्कॉटलंड यार्डच्या नवीन इमारतीच्या तळघरात एका स्त्रीचं फक्तं धड आढळलं! या धडाचे हात-पाय तोडण्यात आलेले होते. या खुनाचा व्हाईटचॅपल विभागातील इतर खुनांशी काहीच संबंध नसावा असा पोलीसांचा अंदाज होता. याच दिवशी रॉबर्ट जेम्स लीस नावाचा एक माणूस स्कॉटलंड यार्डमध्ये जाऊन पोहोचला. आपण अतिंद्रीय शक्तींशी संपर्क करुन खुनी माणसाला पकडू शकतो असा त्याचा दावा होता! स्कॉटलंड यार्डने त्याची साभार परत पाठवणी केली!
३ ऑक्टोबरला स्कॉटलंड यार्डने जॅक द रिपरच्या नावाने आलेली दोन्ही पत्रं प्रसिद्ध केली. पत्रांतील हस्ताक्षर पाहून पत्रं लिहीणार्याची आणि पर्यायाने खुन्याची ओळख पटावी हा त्यामागे हेतू होता. ही पत्रं प्रसिद्ध केली असली तरी ती प्रत्यक्षात खुनी व्यक्तीने लिहीली असतील यावर वरिष्ठ अधिकार्यांचा विश्वास नव्हता! पोलीसांच्या दाव्यानुसार १९३१ मध्ये एका पत्रकाराने आपण ही पत्रं लिहील्याचं कबूल केलं!
स्वित्झरलंडला गेलेला रॉबर्ट अँडरसन ६ ऑक्टोबरला परतला आणि त्याने तपासाची सूत्रं हातात घेतली.
१६ ऑक्टोबरला व्हाईटचॅपल दक्षता समितीचा अध्यक्ष जॉर्ज लस्क याला एक पत्रं आलं! पत्रात लिहीलं होतं -
फ्रॉम हेल
मि. लस्क
सर,
एका स्त्रीच्या शरीरातून मी काढून घेतलेल्या किडनीचा अर्धा भाग पत्राबरोबर पाठवत आले. उरलेला अर्धा भाग मी तळून खाऊन टाकला. एकदम चविष्ट लागला. काही वेळ वाट पाहीलीत तर तुम्हाला मी ती सुरी सुद्धा पाठवेन.
सही
जेव्हा शक्यं होईल तेव्हा पकडा मला मि. लस्क
या पत्राबरोबर एक लहानसा खोका आला होता. त्यात एका बाटलीत इथेनॉलमध्ये बुडवून ठेवलेला किडनीचा अर्धा भाग होता!
फ्रॉम हेल पत्र
लस्कला सुरवातीला हा सगळा प्रकार वेडगळपणाचा वाटला होता. एखाद्या वैद्यकीय विद्यार्थ्याला शरिराचा एखादा अवयव मिळवणं अशक्यं नव्हतं. तसंच तो भाग खोटा असण्याचाही संभव होता. परंतु आपल्या मित्रांच्या सल्ल्यावरुन लस्कने ते पत्रं आणि तो खोका स्कॉटलंड यार्डच्या हवाली केला.
जॅक द रिपरच्या नावे आलेल्या पहिल्या दोन पत्रांतील हस्ताक्षर लस्कला आलेल्या पत्रातील हस्ताक्षराशी तंतोतंत जुळत नसलं तरी लिहीण्याची धाटणी आणि अक्षरांचं वळण साधारणतः सारखंच होतं. लंडन हॉस्पीटलमधील डॉक्टर थॉमस ओपेनशॉ याने किडनीच्या अर्ध्या भागाची नीट तपासणी केली. ती किडनी मानवी शरीरातील असल्याचं आणि डाव्या बाजूची असल्याचं त्याच्या ध्यानात आलं, परंतु ती स्त्रीची अथवा पुरुषाची असावी हे नेमकं सांगणं शक्यं नव्हतं!
२९ ऑक्टोबरला डॉक्टर ओपेनशॉला जॅक द रिपरचं पत्रं आलं!
हे पत्रं इस्ट लंडन इथून २९ ऑक्टोबरलाच पाठवण्यात आलं होतं. पत्राच्या लिफाफ्यावर डॉ. ओपेनशॉ, पॅथॉलॉजीकल क्युरेटर, लंडन हॉस्पीटल, व्हाईटचॅपल असं लिहीलेलं होतं.
पत्रात लिहीलं होतं -
तुमचा अंदाज बरोबर आहे बॉस. ती डावी किडनीच आहे. माझ्या पुढच्या कामगिरीवर मी तुमच्या हॉस्पीटलसमोरच आलो होतो. पण मी तिच्या गळ्यात सुरा खुपसण्यापूर्वीच पोलीसांची चाहूल लागल्याने माझा खेळ अर्ध्यावर सोडावा लागला. पण लवकरच मी पुन्हा कामगिरीवर निघेन. तुम्हाला पुन्हा काहीतरी आतलं पाठवेनच.
जॅक द रिपर
मायक्रोस्कोप आणि स्काल्पेल हातात घेऊन अर्ध्या तळलेल्या किडनीकडे पाहणारा माणूस तुम्ही पाहीला आहे काय?
ओपेनशॉला आलेल्या पत्राचा लिफाफा
ओपेनशॉला आलेलं पत्र
स्ट्राईड आणि एडोजच्या दुहेरी हत्येनंतर सुमारे पाच आठवड्यांनी व्हाईटचॅपल पुन्हा एकदा हादरलं..
स्पिटलफिल्ड भागात डॉर्सेट स्ट्रीटच्या मागे असलेल्या मिलर कोर्ट या लॉजमध्ये मेरी जेन केली या २५ वर्षांच्या वेश्येची हत्या करण्यात आली! सकाळी पावणेअकराच्या सुमाराला केलीचा मृतदेह तिच्या खोलीत आढळून आला!
केलीची हत्याही गळा चिरुन करण्यात आली होती!
डावीकडून उजवीकडे!
केलीच्या मृतदेहाची यथेच्छ चिरफाड करण्यात आलेली होती. तिचा चेहरा ओळखू येण्यापलीकडे गेला होता. पोटातील आतडी काढून सगळ्या खोलीभर इतस्ततः फेकली होती. तिची वक्षस्थळं कापण्यात आली होती. दोन्ही मांड्या हाडापर्यंत चिरण्यात आल्या होत्या. मांड्यांचं काही मांसा आणि स्नायू काढून घेण्यात आलेले होते. इतर बळींच्या तुलनेत केलीच्या देहाची सर्वात जास्तं विटंबना करण्यात आलेली होती. मोकळ्या रस्त्याच्या तुलनेत बंद खोलीत खुनी व्यक्तीला कोणाचाही व्यत्यय न येता मोकळं रान मिळालं होतं!
बाकीच्या सर्व मृतदेहांशी विसंगत एक गोष्ट म्हणजे एका अंतर्वस्त्राचा अपवाद वगळता केलीचे सर्व कपडे काढून टाकण्यात आलेले होते. तिची सर्व वस्त्रं जवळच असलेल्या खुर्चीवर नीट घडी करून ठेवलेली आढळली. केलीची हत्या करणारी व्यक्ती गिर्हाईक म्हणून तिच्याबरोबर खोलीत आली असावी आणि आपला कार्यभाग साधल्यावर तिची हत्या केली असावी असा पोलीसांचा कयास होता. केलीची काही वस्त्रं जाळण्यात आलेली होती! एका मिणमिणत्या मेणबत्तीचा उजेड पुरेसा नसल्यामुळे पुरेसा प्रकाश मिळण्यासाठी खुनी माणसाने ही वस्त्रं जाळली असावी अशी शक्यता होती.
केलीच्या खुनाच्या आदल्या दिवशीच ८ नोव्हेंबरला कमिशनर चार्ल्स वॉरेनने होम सेक्रेटरीशी झालेल्या मतभेदांमुळे राजीनामा दिला होता! वॉरेनशी झालेल्या मतभेदांमुळे नोकरी सोडून गेलेल्या जेम्स मुनरोची वॉरेनच्या जागी नेमणूक करण्यात आली!
१० नोव्हेंबरला पोलीस सर्जन थॉमस बाँड याने रॉबर्ट अँडरसनला लिहीलेल्या पत्रात निकोलस, चॅपमन, स्ट्राईड, एडोज आणि केली यांच्या हत्येमधील सुसुत्रता व्यक्तं करणारं तपशीलवार पत्रं लिहीलं. या पाचही स्त्रियांचे खून एकाच पध्दतीने गळा चिरुन करण्यात आलेले होते. हे पाचही खून एकाच व्यक्तीने केले आहेत अशी बाँडची पक्की खात्री होती. १० तारखेलाच खुन्याला मदत करणारा कोणीही साथीदार त्याच्याविषयी माहिती देण्यास पुढे आल्यास त्याला संपूर्ण माफी देण्याचा ठराव मंत्रीमंडळाने एकमताने मंजूर केला!
केलीच्या हत्येनंतर महिन्याभराने व्हाईटचॅपल पुन्हा एकदा हादरलं...
गस्तं घालणार्या एका पोलीस कॉन्स्टेबलला पोप्लर हाय स्ट्रीटला लागून असलेल्या क्लार्क्स यार्ड भागात २० डिसेंबरला रोझ मिलेट या २९ वर्षांच्या वेश्येचा मृतदेह आढळून आला. मिलेटचा गळा आवळण्यात आला होता असं सकृतदर्शनी दिसून येत असलं, तरी तिने आत्महत्या केली असावी अथवा दारूच्या नशेत स्वत:च्याच ड्रेसचा गळ्याभोवती फास बसून तिचा मृत्यू झाला असावा असा अँडरसनला संशय आला. डॉक्टर बाँडने मृतदेहाची तपासणी केल्यावर हा आत्महत्येचा किंवा अपघाती मृत्यूचा प्रकार असावा याची त्याला खात्री पटली. कॉरोनर वेन बॅक्स्टरच्या मते मिलेटच्या मृत्यूमागे कोणताही घातपात असल्याचं आढळून आलं नव्हतं. परंतु तरीही व्हाईटचॅपल विभागातील इतर खुनांबरोबर याचाही तपास करण्याचा कोर्टाने आदेश दिला!
रोझ मिलेटच्या मृत्यूनंतर व्हाईटचॅपल विभागातील खुनाचं सत्रं अचानकपणे थांबलं!
या खूनसत्रात १८८८ या एकाच वर्षात आठ बळी पडले होते. रोझ मिलेटचा खून अथवा आत्महत्या याबद्दल साशंकता होती. स्कॉटलंड यार्डच्या नवीन इमारतीच्या तळघरात सापडलेल्या धडाचा व्हाईटचॅपल विभागातील या खुनांच्या केसमाध्ये समावेश करण्यात आलेला नव्हता.
या पैकी निकोलस, चॅपमन, स्ट्राईड, एडोज आणि केली यांच्या हत्या जॅक द रिपर या एकाच खुन्याने केल्या आहेत याबद्द्ल सर्वच पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांचं एकमत होतं. या सर्व हत्या एकाच पद्धतीने डावीकडून उजवीकडे गळा चिरुन करण्यात आल्या होत्या. स्ट्राईडचा अपवाद वगळता सर्व मृतदेहांची चिरफाड करुन आतील काही ना काही अवयव गायब करण्यात आलेले होते. स्मिथ आणि टॅब्रम यांच्या हत्येमागे जॅक द रिपरचा कोणताही हात नसावा असा पोलीसांचा अंदाज होता. व्हाईटचॅपलमधील वेश्याव्यवसायावर गुन्हेगारी टोळ्यांचं नियंत्रण होतं. या टोळ्यांपैकी कोणाशीतरी मतभेद झाल्यामुळे स्मिथ आणि टॅब्रमची हत्या करण्यात आली असावी.
रोझ मिलेटच्या मृत्यूनंतर ७ महिन्यांनी व्हाईटचॅपलचे रस्ते पुन्हा रक्तरंजित झाले..
१७ जुलै १८८९ या दिवशी व्हाईटचॅपलमधील कॅसल अॅली या रस्त्यावर रात्री पाऊण वाजण्याच्या सुमारास अॅलीस मॅकेन्झी या ४० वर्षांच्या वेश्येची हत्या करण्यात आली. जॅक द रिपरच्या पद्धतीनेच डावीकडून उजवीकडे गळा चिरुन मॅकेन्झीचा खून करण्यात आला होता. तिच्या पोटावरही वार करण्यात आले होते. मॅकेन्झीचा मृतदेह पाहील्यावर कमिशनर मुनरो आणि डॉक्टर बाँड यांची हा जॅक द रिपरचाच बळी असावा अशी पक्की खात्री झाली. परंतु डॉक्टर फिलीप्सचं मत मात्रं वेगळं होतं. मॅकेन्झीच्या पोटावर असणार्या जखमा या वरवरच्या आणि लहानशा चाकूने केलेल्या दिसत होत्या. त्याच्या मते खुनी व्यक्तीने या खुनाचा संशय जॅक द रिपर वर जाईल या हेतूने या जखमा केलय असाव्या. फिलीप्सच्या या मताशी रॉबर्ट अँडरसन आणि इन्स्पेक्टर अॅबर्लीन सहमत होते.
पोस्टमॉर्टेमच्या दरम्यान कॉरोनर बॅक्स्टरने दोन्ही शक्यतांचा विचार केला. आपल्या रिपोर्टमध्ये तो म्हणतो,
"व्हाईटचॅपलमधील जॅक द रिपरच्या १८८८ मधील हत्यासत्राशी साधर्म्य सांगणाराच हा खून होता. हा खून रिपरने केला नसला तर त्याची पद्धत वापरूनच करण्यात आला होता."
मॅकेन्झीच्या खुनानंतर दोन महिन्यांनी पुन्हा एकदा व्हाईटचॅपलला हादरा बसला..
१० सप्टेंबरला पिन्चीन स्ट्रीटजवळील रेल्वे पुलाच्या कमानीखाली पहाटे सव्वापाचच्या सुमाराला एका स्त्रीचं फक्तं धड आढळून आलं! इन्स्पेक्टर स्वॅन्सन आणि मुनरो यांनी हा खून जॅक द रिपरने केला असल्याची शक्यता फेटाळून लावली. या धडामधून रक्तस्त्राव कमी प्रमाणात झालेला असल्याने गळा चिरुन हत्या झालेली नसल्याचा स्वॅन्सनचा अंदाज होता. हे धड घरातून पळून गेलेल्या लिडीया हार्ट हिचं असावं असं वृत्तपत्रांचं मत होतं, परंतु चौकशीअंती हार्ट हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असल्याचं आढळून आलं! हे धड एमिली बार्करचं असावं असाही अंदाज व्यक्तं करण्यात आला, परंतु बार्कर वयाने अगदीच तरूण होती. हा मृतदेह ज्या महिलेचा होता ती कमीतकमी पस्तीशीची असल्याचं आढळलं होतं. हे धड नेमकं कोणाचं होतं याचा कधीच पत्ता लागला नाही!
इन्स्पेक्टर स्वॅन्सनच्या मते हा खून जॅक द रिपरने केला नसून रेनहॅम, चेल्सी आणि व्हाईटहॉल इथल्या खुनांशी साधर्म्य दाखवणारा होता. या तीनही खुनांमध्येही फक्तं हात-पाय तोडलेलं धड सापडलं होतं!
२१ जून १८९० मध्ये मुनरोने राजीनामा दिला. त्याच्या जागी सर एडवर्ड ब्रॅडफर्डची नेमणूक करण्यात आली.
पाच महिन्यांनी पुन्हा एकदा व्हाईटचॅपल चर्चेत आलं...
१३ फेब्रुवारी १८९१ या दिवशी चेंबर स्ट्रीट आणि रॉयल मिंट स्ट्रीटच्या दरम्यान असलेल्या रेल्वेपुलाच्या कमानीखाली एका वेश्येची हत्या झाली! पोलीस कॉन्स्टेबल एर्नेस्ट थॉमसनला पहाटे सव्वादोनच्या सुमाराला, हत्येनंतर अवघ्या काही मिनीटात स्वॉलो गार्डन्स या कमानीखालील रस्त्यावर २५ वर्षांच्या फ्रान्सिस कोल्सचा मृतदेह आढळला! कोल्सच्या डोक्याच्या मागील भागात लहान-सहान जखमा झालेल्या दिसत होत्या. तिला मारण्यापूर्वी जोरात खाली ढकलून दिलं असावं असा त्यावरुन अंदाज बांधता येत होता.
कोल्सचा गळा चिरण्यात आला होता!
डावीकडून उजवीकडे आणि परत उजवीकडून डावीकडे!
गळ्यावरील जखमांव्यतिरीक्त कोल्सच्या देहावर दुसरी कोणतीही जखम आढळली नाही. इन्स्पेक्टर रीडने आदल्या रात्री कोल्सबरोबर असलेल्या जेम्स सॅडलरला अटक केली. स्वॅन्सन आणि मुनरो यांनी सॅडलर जॅक द रिपर असावा या संशयाने त्याचा पूर्वेतिहास चाळून काढला. परंतु सॅडलरविरुद्ध कोणताही पुरावा मिळाला नाही! ३ मार्चला त्याला सोडून देण्यात आलं.
या सर्व खुनांपैकी पाच खून निश्चीतच जॅक द रिपरने केलेले होते. परंतु बाकीच्या खुनांत त्याचा हात असण्याची शक्यता पोलीसांना वाटत नव्हती. २९ डिसेंबर १८८८ मध्ये जॉन गिल या सात वर्षांच्या मुलाचा खून करण्यात आला होता. त्याचे दोन्ही पाय तोडण्यात आले होते. पोट फाडण्यात आलं होतं. त्याची आतडी बाहेर काढून बाहेर पसरवण्यात आली होती. एक कान आणि हृदय काढून घेण्यात आलं होतं. हा खून रिपरने केला असावा असा संशय होता, परंतु तसा निर्णायक पुरावा आढळून आला नव्हता.
२५ फेब्रुवारी १९८८ या दिवशी अॅनी मिलवूड हिच्यावर हल्ला करण्यात आला होता. तिच्या पायाला आणि पोटाला जखमा झाल्या होत्या. अॅनी हा हल्ल्यातून वाचली होती. ३१ मार्चला दुसर्या कारणाने अॅनीचा मृत्यू झाला. जॅक द रिपरचा हा पहिला हल्ला असावा असा कयास होता, परंतु रिपरच्या बाकी खुनांशी याचा संबंध जोडण्याइतका निर्णायक पुरावा मिळाला नाही. अॅडा विल्सनवर २८ मार्च १८८८ ला हल्ला करण्यात आला होता. तिच्या मानेला दोन जखमा झाल्या होत्या, परंतु त्यातून ती वाचली होती.
२४ एप्रिल १८९१ ला न्यूयॉर्कमध्ये कॅरी ब्राऊनची हत्या करण्यात आली. तिच्या मांड्यांवर आणि पायावर मोठ्या जखमा आढळून आल्या. तिच्या शरीराचा कोणताही अवयव गायब झाला नसला तरी हा खून जॅक द रिपरने केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. लंडन पोलीसांनी मात्रं तशी शक्यता फेटाळून लावली.
खुनी व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी जोरदार मोहीम उघडली होती. व्हाईटचॅपलमधील घरा-घरातून तपास करण्यात आला. मृत स्त्रियांच्या देहांमधून काही अवयव गायब झाल्याने पोलीसांचा मुख्यत्वे खाटीक आणि डॉक्टर यांच्यावर संशय होता. व्हाईटचॅपल परिसरातील खाटकाच्या ७६ दुकानांंत काम करणार्या प्रत्येक व्यक्तीची आणि गेल्या सहा महिन्यात काम सोडून गेलेल्यांचीही पोलीसांनी तपासणी केली.
त्यावेळच्या अनेक मान्यवर व्यक्तींना खुनी व्यक्ती ही इंग्लंड आणि युरोपच्या मुख्य भूमीवर ये-जा करणार्या जहाजावरील एकादा खाटीक अथवा गुराखी असावा असा संशय होता. खुद्द राणी व्हिक्टोरीयाचंही हेच मत होतं! लंडन बंदरावरील धक्क्यांपासून व्हाईटचॅपल विभाग तसा जवळच होता. या बोटी नेहमी गुरवार अथवा शुक्रवारी लंडनला येत असत आणि शनिवार किंवा रविवारी परत फिरत असत. या बोटींची आणि त्यावरील माणसांचीही तपासणी करण्यात आली. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या दिवशी व्हाईटचॅपलमध्ये हे खून झाले, त्या दिवशी यांतील एकही बोट लंडन बंदरात नव्हती! बोटीवरील खलाशांचा यात हात असल्याची शक्यताही फेटाळण्यात आली.
रॉबर्ट अँडरसनच्या सूचनेवरुन थॉमस बाँडने व्हाईटचॅपल विभागातील सर्व खुनांचा आणि मृतदेहांचा पद्धतशीरपणे अभ्यास केला. मेरी अॅन निकोलस, अॅनी चॅपमन, एलिझाबेथ स्ट्राईड, कॅथरीन एडोज आणि मेरी जेन केली यांचा खून एकाच व्यक्तीने केला आहे हे निर्विवादपणे सिद्ध होत असल्याचं त्याचं ठाम मत होतं. निकोलस, चॅपमन, स्ट्राईड, एडोज यांचा गळा डावीकडून उजवीकडे चिरला होता. केलीच्या मृतदेहाची इतकी चिरफाड करण्यात आली होती, की नक्की कोणत्या दिशेने तिचा गळा चिरला गेला असावा हे सांगणं मुश्कीलच होतं. सर्व स्त्रियांचे गळे त्या जमिनीवर पडल्यावर चिरण्यात आलेले होते. बाँडच्या मते खुन्याला शरीर संरचनेची काहीच माहीती नसावी. तसेच खाटीकाला आवश्यक असलेल्या मूलभूत माहीतीचाही खुनी व्यक्तीकडे आभाव होता. खुनी एकांडा शिलेदार असावा आणि काही काळानंतर आलेल्या विकृतीच्या झटक्यात तो या हत्या करत असावा असाही बाँड्चा अंदाज होता! स्त्रियांविषयी आणि विशेषतः वेश्यांविषयी त्याला घृणा वाटत असावी! कोणत्याही स्त्रीशी शरीससंबंध ठेवण्यात आलेले नसल्याचं बाँडला आढळलं होतं.
१८८८ च्या ऑक्टोबर महिनाअखेरीपर्यंत पोलीसांनी सुमारे २००० संशयितांची चौकशी केली होती. यापैकी सुमारे ८० जणांना अटक करण्यात आली होती. परंतु एकाही व्यक्तीवर आरोप ठेवण्याइतका निर्णायक पुरावा आढळून आला नाही.
पोलीसांच्या संशयितांपैकी एक म्हणजे माँटेग्यू जॉन ड्रईट. ड्रईट पेशाने वकील होता. लंडनमधील ब्लॅकहीथ इथल्या शाळेचा तो उपमुख्याध्यापकही होता. ३१ डिसेंबर १८८८ ला थेम्स नदीत त्याने आत्महत्या केली! जॅक द रिपरच्या पाच मुख्य खूनांनंतर लगेच ड्रईटने आत्महत्या केल्याने तो जॅक द रिपर असावा असा कॉन्स्टेबल मेल्वील मॅक्नॅग्टन याने १८९४ मध्ये संशय व्यक्तं केला. मॅक्नॅग्टनने ड्रईट हा ४१ वर्षांचा डॉक्टर असावा असा अंदाज केला होता. प्रत्यक्षात ड्रईट ३१ वर्षांचा होता. तसेच ड्रईट व्हाईटचॅपलपासून दूर थेम्सनदीपलीकडे केंट परगण्यात राहत होता तर खुनी व्हाईट्चॅपलचाच रहीवासी असावा असा पोलीसांचा अंदाज होता. इस्पेक्टर अॅबर्लीनने ड्रईटला संशयितांच्या यादीतून वगळलं होतं.
दुसरा संशयीत म्हणजे सेव्रीन क्लॉसोव्स्की अथवा जॉर्ज चॅपमन. हा मूळचा अमेरीकेतील पोर्टलँडचा, पण १८८७ मध्ये तो ब्रिटनमध्ये आला. १८९३ मध्ये त्याने आपलं मूळ नाव बदलून जॉर्ज चॅपमन हे नाव धारण केलं. आपल्या तीन बायकांना त्याने विषप्रयोग करुन मारलं होतं! १९०३ मध्ये त्याला फासावर चढवण्यात आलं. व्हाईटचॅपलमधील खूनसत्राच्या वेळेस तो व्हाईटचॅपलमध्येच राहत होता. इन्स्पेक्टर अॅबर्लीनचा त्याच्यावर दाट संशय होता, परंतु त्याची खून करण्याची पद्धत जॅक द रिपरपेक्षा वेगळी असल्याने तो रिपर नसावा असं सर्वांचं मत होतं.
अॅरन कोमिन्स्की हा मूळच पोलीश ज्यू देखिल संशयितांच्या यादीत होता. अँडरसनच्या मते कोनिन्स्की हाच जॅक द रिपर होता. स्वॅन्सनचाही त्याच्यावरच संशय होता. अँडरसनने आपल्या वृत्तामध्ये एका ज्यू संशयित आहे, परंतु दुसरा कोणत्याही ज्यू त्याच्याविरुद्ध साक्ष देण्यास तयार नसल्याने केस उभी करता येणार नाही असं लिहीलं होतं. परंतु कोणत्याही एका संशयितावर अंतिम आरोप ठेवण्याइतका सबळ पुरावा मिळालेला नाही असं स्वॅन्सनने नमूद केलं होतं.
पोलीसांनी यांच्या व्यतिरीक्त जॉन पाईझर, जेम्स सॅडलर, मायकेल ऑस्ट्रँग यांच्यावरही संशय व्यक्त केला होता, परंतु यांच्याविरुद्ध कोणताच पुरावा मिळाला नाही.
आणखीन एक संशयीत म्हणजे फ्रान्सिस टंबल्टी! टंबल्टीने अमेरीका आणि कॅनडामध्ये आपण भारतीय आयुर्वेदीक डॉक्टर असल्याचं भासवून अनेकांना गंडा घातला होता. १८६५ मध्ये तर त्याला अब्राहम लिंकनच्या खुनात सहभागी असल्यावरुन अटक करण्यात आली होती, परंतु पुराव्याअभावी त्याची निर्दोष सुटका झाली. १८८८ मध्ये तो इंग्लंडमध्ये होता. ७ नोव्हेंबरला त्याला समलिंगी संबंध ठेवल्यावरुन अटक झाली होती! (तत्कालीन इंग्लंडमध्ये हा गुन्हा मानला जात असे). खटला सुरू होण्यापूर्वीच तो फ्रान्स आणि तिथून अमेरीकेत पसार झाला. ब्रिटन सरकारने त्याल इंग्लंडमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशीच ठरला.
विल्यम हेनरी बरी याने इस्ट लंडन मधून डंडी इथे स्थलांतर केल्यावर आपली पत्नी एलीन इलियट हिचा ४ फेब्रुवारी १८८९ ला गळा आवळून खून केला होता. तिच्या मृतदेहाचं पोट त्याने फाडून काढलं होतं. आपली पत्नी हरवल्याची तक्रार करण्यासाठी तो पोलीस स्टेशनलाही गेला होता! यथावकाश त्याला अटक करण्यात आली. इलियट ही पूर्वाश्रमीची वेश्या असल्याने बरी हा जॅक द रिपर असल्याची शक्यता पडताळून पाहण्यात आली, परंतु त्यातून काही निष्पन्न झालं नाही. इलियटच्या खुनासाठी बरीला फासावर चढवण्यात आलं. बरीला फाशी देणारा जल्लाद (हँगमन) जेम्स बॅरी याने मात्र बरीने आपल्याजवळ जॅक द रिपर असल्याची कबूली दिल्याचं प्रतिपादन केलं.
थॉमस नील हेनरी हा डॉक्टर होता. कॅनडा आणि शिकागो इथे वैद्यकीय व्यवसाय करताना त्याने आपल्या रखेलीच्या पतीवर विषप्रयोग केला होता. या आरोपाखाली १८८१ ते १८९१ पर्यंत तो तुरुंगात होता. १८९१ मध्ये इंग्लंडमध्ये परतल्यावर एका खुनाच्या प्रकरणात त्याला फाशी देण्यात आलं. फाशी जाण्यापूर्वी त्याने आपण जॅक द रिपर असल्याचं सांगितलं असलं तरी त्यावेळेस तो तुरुंगात असल्याने ही शक्यता खूपच कमी होती.
फ्रेड्रीक डीमींगने आपल्या पहिल्या पत्नीचा आणि चार मुलांचा खून केल्यावर दुसर्या पत्नीसह ऑस्ट्रेलिया गाठलं! दुसर्या पत्नीचीही त्याने मेलबर्न इथे हत्या केली. त्याच्या खुनाच्या तपासात पहिली पत्नी आणि चार मुलांचे मृतदेह त्याच्या इंग्लंडमधल्या घरात पुरलेले आढळले. आपण जॅक द रिपर असल्याची त्याने बढाई मारलेली असली तरी प्रत्यक्षात त्यावेळेस तो द्क्षिण आफ्रीकेत असल्याचं आढळून आलं. मेलबर्न तुरुंगात त्याला फासावर चढवण्यात आलं.
रॉबर्ट स्टीफन्सन हा मूळचा पत्रकार होता. त्याला अतिंद्रीय शक्ती आणि जादूटोणा यात रस होता! व्हाईटचॅपलमधील खुनाचं सत्रं चालू होण्यापूर्वी तो हॉस्पीटलमध्ये भरती झाला तो रोझ मिलेटच्या मृत्यूनंतर हॉस्पीटलमधून बाहेर पडला! जॅक द रिपरच्या खुनसत्रामागे काळ्या जादूत प्रवीण असणारी व्यक्ती होती असा त्याचा दावा होता! हॉस्पीटलचा डॉक्टर मॉर्गन डेव्हीस हाच रिपर आहे असा त्याचा दावा होता. परंतु डेव्हीसला नाईट शिफ्टमध्ये असताना हॉस्पीटलमधून बाहेर पडणं शक्यं नव्हतं. स्वतः स्टीफन्सन हाच रिपर असल्याचीही शक्यता फेटाळण्यात आली.
कार्ल फेगेन्बॅम हा जर्मन खलाशी होता. १८९४ मध्ये न्यूयॉर्क सिटीत जुलीया हॉफमनची त्याने गळा चिरुन हत्या केली होती. २७ एप्रिल १८९६ मध्ये त्याला मृत्यूदंड देण्यात आला. त्याचा वकील विल्यम लॉटनने फेगेन्बॅम हा जॅक द रिपर असल्याचा दावा केला. सुमारे १०० वर्षांनी ट्रेव्हर मॅरीयॉट्ने ही कल्पना उचलून धरली. फेगेन्बॅमने १८९१ आणि ९४ मध्ये अमेरीका आणि जर्मनीतही अनेक खून केले होते व्हाईटचॅपल खूनसत्रात त्याचाच हात होता असा मॅरीयॉटचा दावा होता. परंतु मॅरीयॉटने नमूद केलेले अनेक खून झालेच नव्हते असं आढळून आलं.
थॉमस हेनरी कटबुश याला १८९१ मध्ये सिफ्लीस रोगाच्या प्रादुर्भावामुळे लॅम्बेथ हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. दोन स्त्रियांवर चाकूने हल्ला केल्यावर त्याला वेडा ठरवून १८९१ मध्ये ब्रॉडमूर हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलं. कटबुश हाच रिपर असावा असा सन च्या पत्रकारांचा अंदाज होता, पण तसा कोणताही पुरावा आढळून आला नाही.
डेव्हीड कोहेन हा पोलीश ज्यू होता. लंडनच्या पूर्व भागाचा रहिवासी असलेला कोहेन एकलकोंडा आणि अत्यंत रागीट स्वभावाचा होता. १८८८ च्या डिसेंबरमध्ये त्याला वेड्यांच्या इस्पितळात भरती करण्यात आलं. जेक द रिपरच्या पद्धतीने केलेल खून कोहेनला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आल्यावर बंद पडले होते. परंतु कोहेन हा रिपर असल्याची शक्यता पोलीसांनी विचारात घेतली नव्हती.
शेरलॉक होम्सचा जनक सर ऑर्थर कॉनन डॉयल यानी एक वेगळीच कल्पना मांडली. त्यांचामते जॅक द रिपर ही एक स्त्री होती! आपल्या या खुन्याला डॉयलनी 'जिल द रिपर' असं नाव दिलं. डॉयलच्या सिद्धांतानुसार ती सुईण म्हणून काम करत असावी अथवा तसा आव आणत असावी. सुईणीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग असल्याचा कोणालाही संशय येण्याची शक्यता नव्हती! डॉयलच्या या सिद्धांतानुसार अनेक स्त्रियांवर संशय व्यक्त करण्यात आला, परंतु निर्णायक पुरावा कोणालाही मिळाला नाही!
विसाव्या शतकातही जॅक द रिपर असल्यावरुन अनेकांवर संशय व्यक्त करण्यात आला. जोसेफ बार्नेट, लुईस कॅरॉल, विल्यम गल, जॉर्ज हचिन्सन, जेम्स केली, जेम्स मेब्रीक, अलेक्झांडर पेडचेन्को, वॉल्टर सिकर्ट, जोसेफ सिल्व्हर, जेम्स स्टीफन, फ्रान्सिस थॉम्सन, सर जॉन विल्यम्स इतकंच काय खुद्द ब्रिटीश राजपुत्र प्रिन्स अल्बर्ट व्हिक्टर याचावरही तो जॅक द रिपर असल्याचा संशय घेण्यात आला!
अद्यापही जॅक द रिपर कोण होता यावर संशोधन सुरु आहे!
पोलीसांच्या मते जॅक द रिपर हा व्हाईटचॅपलचा रहिवासी होता. ज्या तर्हेने खून केल्यावर तो चटकन अदृष्य होत असे त्यावरुन त्याला व्हाईटचॅपलच्या रस्त्यांची आणि लहानमोठ्या गल्ल्यांची खडान् खडा माहीती होती हे उघड होतं. तसेच व्हाईटचॅपल भागात लपून राहण्याच्या प्रत्येक जागेची त्याला माहीती होती!
जॅक द रिपर नेमका कोण होता याचा कधीच पत्ता लागला नाही. अनेक संशयितांपैकी कोणीही रिपर असल्याचा निर्णायक पुरावा कधीच मिळाला नाही!
जॅक द रिपर नेमका कोण होता याचा आजतागायत पत्ता लागलेला नाही!
********************************************************************************************
(या लेखासाठी अनेक पुस्तके, वेबसाईट्स आणि विकीपिडीया यांचा वापर केला आहे. सर्वांचा संदर्भ इथे देणं शक्यं नाही).
( भाग १०, भाग ९, भाग ८, भाग ७, भाग ६, भाग ५, भाग ४, भाग ३, भाग २, भाग १. )
प्रतिक्रिया
29 Aug 2014 - 4:30 pm | प्यारे१
मिपावरचा सगळ्यात जास्त रक्तरंजित लेख. तोही अनुत्तरीत. :(
6 Sep 2014 - 5:43 pm | इनिगोय
+१
भीषण.
6 Sep 2014 - 5:43 pm | इनिगोय
+१
भीषण.
29 Aug 2014 - 5:19 pm | एसमाळी
जॅक द रिपर बद्दल वाचल होत इंग्रजीत,फारस काही समजल नाही. मराठीत दिल्याबद्दल आभार.
लेख आवडला.
29 Aug 2014 - 6:04 pm | क्रेझी
बापरे!! किती क्रूर असू शकते ती व्यक्ती!
29 Aug 2014 - 9:47 pm | दशानन
खूपच कष्ट घेऊन लेख लिहिला आहे, तुमचे मागील लेखन देखील वाचले, अतिशय उत्तम!
*जॅक द रिपर एक चित्रपट पाहिल्याचे आठवत आहे, त्यात एक डॉक्टर हे सर्व खून करत असतो व मानवी शरीराचा अभ्यास करत असतो असे काही कथानक होते.
29 Aug 2014 - 10:07 pm | मुक्त विहारि
जबरदस्त....
29 Aug 2014 - 11:41 pm | आसिफ
एक नंबर लेख..
हा लेख वाचुन आरुषी तलवार आणि त्यांच्या नोकराच्या हत्याकांडाची आठवण झाली. काही वर्षांपुर्वी झालेल्या या हत्याकांडाबद्दल पोलिसांनी अनेक थिअरी मांडल्या पण पुढे काय झाले याचा काही पत्ता नाही.
त्या दुहेरी खुनाच्या आरोपाखाली तिच्या आई वडिलांना अटक झालेली पण त्यांनी त्या खुनांची कबुली दिलेली नव्हती.
~आसिफ.
30 Aug 2014 - 3:02 am | खटपट्या
जबरदस्त झाला आहे हा भाग !!
पु. भा. प्र.
30 Aug 2014 - 7:36 am | मदनबाण
रक्तरंजित घटनेचा माहितीपूर्ण लेख !
मात्र या नावाशी साधर्म असलेले एक पासवर्ड क्रॅकिंग टुल आठवल्र जे कित्येक वर्षांपुर्वी मी जालावर शोधले होते.
John the Ripper
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टिम टिम टंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}
30 Aug 2014 - 9:57 am | प्रचेतस
भयानक आहे.
8 Sep 2014 - 9:40 am | अनन्त अवधुत
जॅक द रिपर सापडला :) बातमी.
9 Sep 2014 - 4:26 pm | प्रमोद देर्देकर
भयानक हा एकच शब्द!
7 Dec 2016 - 3:32 pm | हकु
खतरनाक !!!
29 Aug 2021 - 8:32 pm | गामा पैलवान
स्पार्टाकस,
विन्स्टन चर्चिलचा बाप रँडॉल्फ स्पेन्सर-चर्चिल याच्या चमूने ही हत्याकांडे घडवली असा जॉन हेमर ( John Hamer ) याचा दावा आहे. त्यासंबंधी इंग्रजी लेख इथे सापडला : https://robscholtemuseum.nl/john-hamer-jack-the-ripper-was-winston-churc...
बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या.
या वेश्यांना ब्रिटीश राजघराण्याचं एक गुपित ठाऊक होतं. त्याच्या आधारे त्यांनी राजघराण्यास ओलीस धरलं ( = ब्लॅकमेल केलं). त्यामुळे या वेश्यांचा काटा काढायची जबाबदारी रँडॉल्फ स्पेन्सर-चर्चिलने स्वीकारली. हा फ्रीमेसन नामे गुप्तसंस्थेचा सदस्य होता. तिच्या इतर सदस्यांना हाताशी धरून त्याने हे कुकृत्य केलं. मात्र यात क्याथरीन एडौजचा चुकून बळी गेला. बाकी सर्वजणी राजघराण्यास ओलीस ठेवू पहात होत्या. (असा दावा आहे.)
तुमच्या लेखात आलेली नावं वॉल्टर सिकर्ट, अॅबरलाईन, डॉक्टर गल, वगैरे परिचित व्यक्तींवर नवा प्रकाश पडतो.
असं म्हणतात की या कामगिरीच्या बदल्यात रँडॉल्फचा पोरगा विन्स्टन यांस पंतप्रधानपद मिळालं.
आ.न.,
-गा.पै.