हेनरी मॉरीसन फ्लॅगर हा एकोणिसाव्या शतकातील एक द्रष्टा अमेरीकन उद्योगपती. स्टँडर्ड ऑईल कंपनीचा एक प्रमुख भागीदार असलेल्या फ्लॅगरला १८७८ मध्ये पहिल्या पत्नीच्या आजारानिमीत्त फ्लोरीडात आल्यापासून त्या प्रदेशाने आकर्षीत केलं होतं. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर यथावकाश त्याने फ्लोरीडाला कायमचं वास्तव्यास येण्याचा निर्णय घेतला.
त्या काळी फ्लोरीडा हा गरीब आणि मागासलेला प्रदेश होता. परंतु पर्यटकांना आकर्षीत करण्याची फ्लोरीडाची क्षमता फ्लॅगरने अचूक ओळखली. मात्रं त्या काळात फ्लोरीडात उत्तमपैकी हॉटेल आणि वाहतुकीच्या साधनांची वानवाच होती. १८८५ मध्ये फ्लॅगरने सँट ऑगस्टीन या उत्तर फ्लोरीडातील शहरात पॉन्स डी लीऑन हॉटेल बांधण्यास सुरवात केली. परंतु वाहतुकीच्या सोई तुटपुंज्या असल्याने आवश्यक ते सामान आणण्यासाठी त्याला बरेच श्रम पडत होते.
फ्लॅगरने यावर नमुनेदार उपाय शोधला. त्याने जॅक्सनव्हील आणि सेंट ऑगस्टीन यांच्या दरम्यान वाहतूक करणारी सेंट ऑगस्टीन अॅण्ड हॅलीफॅक्स रेल्वे लाईन नावाची रेल्वेकंपनी विकत घेतली! परंतु त्याच्या पुढच्या समस्या संपलेल्या नव्हत्या. फ्लोरीडातील अनेक रेल्वेलाईन वेगवेगळ्या रुंदीचे (गेज) ट्रॅक वापरत होते. या समस्येवर उपाय म्हणून त्याने सर्व रेल्वेलाईन एकाच प्रकारच्या ट्रॅकवर आणण्याचा उद्योग आरंभला!
सेंट ऑगस्टीन अॅण्ड हॅलीफॅक्स रेल्वे लाईन ३ फूट ट्रॅक वरून ४ फूट ८ १/२ इंचात परावर्तीत करण्यात आली. सेंट ऑगस्टीनमध्ये फ्लॅगरने मोठा रेल्वे डेपो उभारला. त्याच्या जोडीला शाळा, हॉस्पीटल, चर्च असा बांधकामांचा धडाका सुरु केला. एकेकाळी ओसाड असलेल्या सेंट ऑगस्टीनचं वेगाने पुनर्वसन सुरु झालं. त्याच जोडीला फ्लॅगरने आणखीन तीन रेलरोड कंपन्या विकत घेतल्या! या सर्व रेल्वेमार्गांचं परावर्तन पूर्ण झाल्यावर सेंट ऑगस्टीन पासून दक्षिणेला डेटोना बीचपर्यंत रेल्वेमार्ग सुरू झाला!
१८९४ मध्ये फ्लॅगरच्या रेल्वेमार्गाचा पाम बीचपर्यंत विस्तार झाला. पाम बीचवर फ्लॅगरने दोन मोठी हॉटेल्स आणि स्वत:साठी आलीशान घर बांधलं. पाम बीचच्या पुढे रेल्वे नेण्याचा फ्लॅगरचा विचार नव्हता, परंतु १८९४-९५ च्या गोठवणार्या हिवाळ्याने त्याला आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास भाग पाडलं. फ्लोरीडाच्या दक्षिणेला असलेल्या बिस्केन बे परिसरात थंडीचा फारसा परिणाम झालेला नव्हता.
७ सप्टेंबर १८९६ मध्ये फ्लॅगरची रेल्वेलाईन बिस्केन बे इथे पोहोचली! आपल्या सर्व रेल्वेकंपन्या एकत्रं करुन फ्लॅगरने त्याचं नाव बदललं आणि फ्लोरीडा ईस्ट कोस्ट रेल्वे कंपनी असं त्याचं नामकरण केलं! बिस्केन बे च्या परिसरात सुरवातीला अवघ्या ५० माणसांसह लहानशी वसाहत उभारली गेली. फ्लॅगरच्या सन्मानार्थ या शहराला त्याचं नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्रं फ्लॅगरने या प्रस्तावाला नकार दिला. त्या परिसराचं प्रचलित नावच त्याने या नवीन शहराला दिलं...
मियामी!
मियामी पर्यंत रेल्वेलाईन पोहोचल्यावरही फ्लॅगरचं समाधान झालेलं नव्हतं! फ्लोरीडा कीज मधील की वेस्ट या वसाहतीच्या शेवटच्या टोकापर्यंत रेल्वे नेण्याचं त्याचं स्वप्नं होतं! १९०४ मध्ये त्याने हा रेल्वेमार्ग बांधण्यास सुरवात केली! त्या काळात पनामा कालव्याचं बांधकाम सुरु होतं. या कालव्याच्या कामावर ये-जा करण्याच्या दृष्टीने मियामी पेक्षा की वेस्ट हे सुमारे १०० मैल दक्षिणेला असल्याने जास्तं सोईचं होतं. की वेस्ट पर्यंत जाणार्या रेल्वेला पनामा कालव्याच्या कामावर जाणारे आणि परतणारे हे कामगार हे हमखास मिळणारे प्रवासी ठरणार होते. पुढे पर्यटनाच्या दृष्टीनेही या रेल्वेचा उपयोग होणार होता.
मियामीहून की वेस्ट पर्यंत रेल्वेमार्गाची उभारणी करणं हे अत्यंत जिकीरीचं काम होतं. मियामीच्या दक्षिणेला १५ मैल अंतरापासून की वेस्टपर्यंतचा फ्लोरीडा कीजचा प्रदेश म्हणजे अनेक लहानमोठ्या बेटांचा समुह होता. त्यापैकी प्रत्येक बेटावरुन दुसर्या बेटावर जाताना पूल बांधणं क्रमप्राप्तं होतं. नाईट आणि लिटील डक बेटांना जोडणारा पूल तर तब्बल सात मैल लांबीचा होता! त्याला सेव्हन माईल ब्रिज असं सार्थ नाव पडलं होतं!
हेनरी फ्लॅगरचं हे भव्य स्वप्नं १९१२ मध्ये पूर्णत्वाला गेलं!
२१ जानेवारी १९१२ या दिवशी फ्लॅगरची रेल्वे की वेस्ट इथे पोहोचली!
दुर्दैवाने आपल्या या रेल्वेचं यश फार काळ पाहणं फ्लॅगरच्या नशीबात नव्हतं. २० मे १९१३ मध्ये ओव्हरसीज रेल्वेचा हा जनक पाम बीच इथे मरण पावला.
बावीस वर्षांनंतर....
१९३५ साली जगभरात जबरदस्त आर्थिक मंदी पसरली होती. आर्थिक मंदीच्या फेर्यातून सावरण्यासाठी अमेरीकन सरकारने अनेक कामं सुरू केली होती. रस्ते बांधणं, पूल उभारणं अशा कामांचा त्यात समावेश होता. फ्लोरीडा कीजमधील अनेक बेटांवरही ही कामं सुरू होती. सुटीच्या दिवशी पत्त्यांचा जुगार किंवा फुटबॉल खेळणं आणि मारेमारी करणं हीच मौजेची साधनं होती!
२९ ऑगस्ट १९३५ ला बहामाच्या पूर्वेला एक लहानसं वादळ आकार घेत होतं. हळूहळू फ्लोरीडाच्या दिशेने सरकणार्या या वादळाचा जोर चांगलाच वाढत होता !
फ्लोरीडा कीजच्या अनेक बेटांपैकी एक लहानसे बेट म्हणजे इस्लामरदा. इस्लामरदावरही अनेक कामगार वास्तव्यास होते. सप्टेंबर महिन्यातील पहिला सोमवार हा जगभर कामगार दिवस (लेबर डे) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कामाला सुटी असल्याने इस्लामरदा इथे असणारे सर्वच कामगार आरामात होते. मात्रं हळूहळू वार्याचा जोर वाढू लागला होता. त्यातच आता जोरदार पावसाला सुरवात झाली!
फुटबॉलचा खेळ आवरता घ्यावा लागल्याने काही कामगार कुरकुर करत कॅन्टीनमध्ये बसले होते. सुटीच्या दिवशी आलेल्या वार्याला आणि पावसाच्या नाबाने बोटं मोडण्याचा कार्यक्रम अव्याहतपणे सुरु होता. त्यांच्यातच कार्ल सुडोरचा समावेश होता. आपल्या सहकार्यांप्रमाणे फुटबॉल न खेळता कार्ल मासेमारीला गेला होता. परंतु एकही मासा गळाला न लागल्याने तो जाम वैतागला होता! एव्हाना वार्याचा वेग चाळीस मैलांवर गेला होता! जोरदार वादळाची चिन्हं दिसत असल्यावर कॅन्टीनमधील सर्वांचं एकमत झालं.
इस्लामरदा स्टेशनवर तारमास्तर असलेला हॅरी पिन पावसातून धडपडत कॅन्टीनमध्ये आला. त्याने सांगितलेल्या बातमीने तर तिथे एकच गोंधळ उडाला. मियामीहून एक अत्यंत धोकादायक बातमी आलेली होती. बहामाच्या पूर्वेकडून फ्लोरीडाकडे सरकत असलेल्या त्या वादळाने आता रुद्रावतार धारण केला होता! वादळाचा वेग १०० मैलांवर गेला होता आणि ते इस्लामरदावर चाल करुन येत होतं! की वेस्टपर्यंतच्या भागातील सर्व कामगारांना सुरक्षीत ठिकाणी हलवण्यासाठी मियामीहून खास ट्रेन सोडण्यात आली होती.
वास्तविक फ्लोरीडाच्या रहिवाशांना दोन दिवसांपूर्वीच सरकारने येणार्या वादळापासून सुरक्षीत ठिकाणी आसरा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या, परंतु बहुतेकांनी तिकडे कानाडोळा केला होता.
हॅरीकडून हे वृत्त कळताच कार्ल सुडोर आपला मित्र लुईस याच्यासह किनार्यावर आला. मासेमारीची बोट सुरक्षीत ठिकाणी भक्कम बांधून आणि शक्यं ते सर्व सामान घेऊन ते रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाले. एव्हाना वार्याचा वेग सत्तर मैलांपार गेला होता!
साडेचार वाजता मियामीहून सुटलेली ट्रेन सव्वापाचच्या सुमाराला होमस्टेड इथे पोहोचली. परंतु एव्हाना वार्याचा जोर असा काही वाढला होता, की गाडीचे दहा डबे ओढणं इंजिनाला जमेना! अखेर इंजिन गाडीच्या मागच्या बाजूला जोडण्यात आलं. गाडीचे दहाही डबे वार्याच्या झंझावातामुळे गदागदा हलत होते! स्नेक क्रीक इथे गाडी पोहोचेपर्यंत सात वाजून गेले होते. वार्याच्या तडाख्यात सापडलेला एक साखळदंड गाडीच्या चाकात अडकून बसला! तो साखळदंड असा काही गुरफटला होता, की तो निघेपर्यंत दीड तास गेला!
इस्लामरदा स्टेशनवर हजारेक माणसं ट्रेनची वाट पाहत होती! एव्हाना वार्याचा वेग एकशेवीस मैलांपार गेला होता! या वादळात आपण उडून जाऊ नये म्हणून लोकांनी स्वतःला झाडाला, फोनच्या खांबांना, इतकंच काय रेल्वेच्या ट्रॅकलाही बांधून घेतलं होतं! वार्याच्या तडाख्यात सापडलेली कोणतीही गोष्ट वाचू शकत नव्हती! नारळाच्या झाडांवरचे नारळ चेंडूसारखे फेकले जात होते! घरांची छपरं उडून गेली होती. रेल्वे स्टेशनच्या दगडी फरशाही या वादळात उखडून फेकल्या जात होत्या!
इस्लामरदा स्टेशन आणि रेल्वेचा ट्रॅक हा समुद्रपातळीपासून सुमारे सात फूट उंचीवर होता. परंतु आता ट्रॅकवर लाटा आपटण्यास सुरवात झाली होती! त्यातच ट्रेन येण्यास उशीर झाल्यामुळे अफवांचं पेव फुटलं.
'ट्रॅक पूर्णपणे उध्वस्त झाला आहे', 'पूल कोसळला आहे', 'आपल्याला सोडवण्यासाठी कोणीच येणार नाही!', 'ट्रेन समुद्रात कोसळून वाहून गेली आहे!' अशा एकापेक्षा एक अफवा पसरु लागल्या.
ट्रॅकवर वाढत चाललेल्या पाण्याबरोबर लोकांचा धीर खचू लागला. तरीही अनेकांनी झाडाच्या शेंड्यापर्यंत चढून स्वतःला तिथे बांधून घेण्यास सुरवात केली. परंतु वादळाचा जोर असा काही वाढला होता की मोठमोठी झाडं उखडून दूर फेकली जात होती!
वादळाचा वेग दोनशे मैलांवर पोहोचला!
स्नेक क्रीकहून निघालेली ट्रेन पाण्यात बुडालेल्या ट्रॅकवरून अखेर इस्लामरदा स्टेशनात शिरली. ट्रॅकला बांधून घेतलेले कित्येक जण गाडीखाली चिरडले गेले होते! त्यातच इंजिन मागच्या बाजूला असल्याने स्टेशन आल्याचं इंजिन ड्रायव्हरला आधी ध्यानातच आलं नाही. गडद काळोखात आणि वार्या-पावसाच्या थैमानात रात्री साडे आठला ट्रेन स्टेशनवर उभी राहीली!
ट्रेन थांबताच आधीच गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये शिरण्यासाठी लोकांची गर्दी झाली. सर्वजण गाडीत शिरण्याच्या गडबडीत असतानाच.....
सतरा फूट उंचीची एक प्रचंड लाट अंधारातून गाडीवर येऊन आदळली!
... आणि पाठोपाठ आणखीन मोठ्या लाटा येऊन आदळतच राहील्या!
वादळाचा धुमाकूळ शांत झाला तेव्हा ट्रॅकवर केवळ एकशे दहा टन वजनाचं इंजिन आणि वाळूने भरलेल्या पोत्यांचा एक डबा उभा होता!
ट्रेनचे बाकीचे सर्व डबे तीस मीटरपर्यंत भिरकावले गेले होते!
इस्लामरदा स्टेशनच्या अस्तित्वाची कोणतीही खूण शिल्लक नव्हती!
भिरकावले गेलेले रेल्वे डबे
स्टेशनजवळचे फोनचे तीन खांब या वादळातून शिल्लक राहीले होते. सुदैवी कार्ल यातल्याच एका खांबावर होता! वादळ क्षमल्याची खात्री झाल्यावर खाली उतरणार्या कार्लला जवळच्या झाडावर असलेल्या लुईसने धोक्याची सूचना दिली. वादळाचा जोर पुन्हा वाढत होता!
पुन्हा एकदा वादळाने इस्लामरदावर आक्रमण केलं. परंतु आता नष्टं करण्यासरखं काही शिल्लक राहीलेलं नव्हतं. जो विध्वंस व्हायचा होता तो आधीच झालेला होता.
वादळाचा मुख्य केंद्रबिंदू इस्लामरदाच्या परिसरात असला तरी क्रेग की, लाँग की, अप्पर आणि लोअर मेटकम्ब की या बेटांवरही हाहा:कार उडाला होता. सर्वत्र प्रेते विखुरली होती. वादळानंतर तीन दिवसांनी अनेक प्रेते फाटून आतला दुर्गंधीयुक्तं वायू बाहेर पडला होता! इस्लामरदा इथे शिल्लक राहीलेल्या झाडांतही प्रेते अडकली होती. इस्लामरदा इथले तीनशेच्यावर कामगार आणि गाडीतील चारेकशे प्रवासी यांचा वादळात बळी गेला होता! कित्येक दिवस वेगवेगळी प्रेतं फ्लोरीडाच्या किनार्याला लागत होती!
पिजन की इथला उध्वस्त रेल्वे ट्रॅक
अमेरीकेच्या किनार्यावर आदळलेलं सर्वात जास्तं विध्वंसक क्षमता असलेलं हे वादळ होतं!
१९३५ लेबर डे हरिकेन!
हेनरी फ्लॅगरची फ्लोरीडा ईस्ट कोस्ट ओव्हरसीज रेल्वे या वादळात पूर्णपणे उद्धव्स्त झाली! रेल्वे कंपनीने मियामी ते की वेस्ट या परिसरातील रेल्वेमार्गाची पुनर्बांधणी करण्याचा विचार सोडून दिला. उरलेले रेल्वे ट्रॅक उखडून त्या जागी मियामी पासून की वेस्टपर्यंत हायवे बांधण्यात आला. अनेक ठिकाणी बांधण्यात आलेल्या कठड्यांसाठी रेल्वेच्या उखडलेल्या रुळांचा वापर केला गेला होता.
फ्लोरीडा कीजवरील रेल्वेमार्गाऐवजी रस्ता बांधण्यात आला तरी फ्लोरीडाच्या रहिवाशांच्या मनातून रेल्वेच्या स्मृती कधीच पुसल्या गेल्या नाहीत. १९३५ च्या वादळात जलसमाधी मिळाल्यानंतर तर ही रेल्वे भुताळी रेल्वे म्हणून प्रसिध्द पावली! वादळानंतर दोन वर्षांतच या रेल्वेच्या गूढ अस्तित्वाच्या अनुभवाच्या बातम्या येऊ लागल्या! वारा आणि पावसाची वादळी रात्रं असली की हमखास रेल्वेची शिटी ऐकू येते असा अनेकांनी शपथपूर्वक दावा केला!
१९४३ मध्ये जुन्हा सेव्हन माईल ब्रिजखाली असलेल्या खाडीच्या भागात दोन कोळी तरुणांनी संध्याकाळी साडेसात-आठच्या सुमाराला पाण्यात जाळं टाकलेलं होतं. दोन-तीन तासांनी जाळ्यात सापडलेले मासे घेऊन परत फिरण्याचा त्यांचा विचार होता. परंतु निसर्गाला मात्रं त्यांचा हा बेत मान्य नसावा. वादळाची चिन्हं दिसू लागली होती! पावसाचे ढग झपाट्याने किनार्याच्या दिशेने सरकत होते.
मासेमारीचा आपला कार्यक्रम रद्द करून परत फिरण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आपलं जाळं आवरुन ते परत निघाले, परंतु पावसाने त्यांना गाठलंच! सुरवातीला रिमझिम पडणारा पाऊस चांगलाच कोसळू लागला होता. त्यातच ढगांचा धडकी भरवणारा गडगडाट आणि लखलखणार्या विजांमुळे त्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. कोणत्याही क्षणी वीज कोसळण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे शक्यं तितक्या वेगाने ते पुलाचा उतार चढण्याचा प्रयत्न करत असतानाच...
त्यांच्यापासून अवघ्या काही यार्डांवर विजेचा लोळ कोसळला!
आपल्या मानेवरचे केस ताठ उभे राहत आहेत असा दोघांनाही भास झाला! पुलाचा कठडा त्यांच्यापासून अवघ्या काही फुटांवर होता. परंतु विषाची परिक्षा नको म्हणून पुलाच्या सिमेंटच्या खांबाच्या पायाशी असलेल्या लहानशा खड्ड्यात त्यांनी आश्रय घेतला. या खड्याच्या बाजूला असलेल्या ग्रॅनाईटच्या दगडांमुळे त्यांना संरक्षण मिळणार होतं! वादळाचा जोर कमी होण्याची दोघं वाट पाहत असतानाच....
दूरवरून येणार्या ट्रेनच्या इंजिनाच्या शिट्टीचा आवाज त्यांच्या कानावर आला!
दोघांनीही एकमेकांकडे पाहीलं. एकाला भास होऊ शकतो, पण एकाचवेळी दोघांनाही? निश्चितच तो भास नव्हता. अद्यापही शिट्टीचा आवाज येतच होता!
गेल्या आठ वर्षांत कोणतीही ट्रेन तिथून गेलेली नव्हती. आताही येण्याचा संभव नव्हता!
खड्ड्यातून बाहेर पडून मोठ्या हिमतीने त्यांनी पुलाचा कठडा पकडला आणि दूरवर नजर जाताच त्यांना दुसरा धक्का बसला.
अंधार चिरत येत असलेला इंजिनाच्या हेडलाईटचा प्रखर प्रकाशझोत त्यांच्या नजरेस पडला!
त्या पुलावरुन त्यांच्याच दिशेने तो प्रकाशझोत पुढे येत होता! त्याच्या जोडीला गाडीच्या इंजिनाचा आवाजही येऊ लागला!
हा अकल्पित प्रकार पाहून हादरलेल्या दोन्ही कोळ्यांनी पुन्हा खांबाजवळचा खड्डा गाठला. इंजिनच्या आवाजावरुन ती ट्रेन भरवेगाने धावत असावी याची त्यांना कल्पना आली.
दोघांनी पुलाच्या दुसर्या बाजूकडे पाहीलं आणि अचानक एका भयावह गोष्टीची त्यांना जाणिव झाली...
पुलावर ट्रॅकच नव्हता!
आणि
पूल तुटलेला होता!
१९३५ च्या वादळात हा रेल्वेचा पूल तुटल्यावर हायवे साठी शेजारी नवीन पूल बांधण्यात आलेला होता!
याचाच अर्थ भरवेगाने येणारी ती ट्रॅकवरुन घसरुन पाण्यात पडणार होती! एक भयंकर अपघात काही क्षणांत घडणार होता! इंजिनाचा आवाज क्षणाक्षणाला जवळ येत होता!
पुढे घडणार्या आक्रीताच्या भयाने ते दोन्ही तरूण जागीच खिळले होते. ट्रेन घसरल्याचा भयानक आवाज कोणत्याही क्षणी आपल्या कानावर आदळणार होता परंतु....
इंजिनाचा आवाज दूर जात हळूहळू ऐकू येईनासा झाला!
काही क्षण दोघं स्तब्धं बसले होते. आपण अनुभवलं ते सत्यं का स्वप्न हेच त्यांना कळेना. पुलावर चढून त्यांनी दोन्ही दिशांना नजर टाकली. परंतु रेल्वे ट्रॅक अथवा ट्रेनचा कोणताही मागमूस त्यांना आढळला नाही.
दुसर्या क्षणी दोघं आपल्या घराकडे धूम पळत सुटले!
फ्लोरीडाच्या भुताळी रेल्वेच्या अनुभवकथांमध्ये आणखीन एक भर पडली!
१९३५ च्या वादळानंतर बहुतेक सर्व कामगार फ्लोरीडा कीज सोडून गेले. कार्ल सुडोरचा सहकारी लुईसही फ्लोरीडा सोडून निघून गेला. कार्ल आणि हॅरी पिन मात्रं की वेस्टमध्ये राहत होते. कार्ल दुसर्या महायुध्दात की वेस्टला असलेल्या दोस्त राष्ट्रांच्या नौदलात होता. नौदलातून बाहेर पडल्यावर एक बोट विकत घेऊन तो ती भाड्याने देत असे. १९५० च्या अपघातात त्याचा डावा डोळा आणि डोक्याची डावी बाजू निकामी झाली. बोट विकावी लागल्यामुळे त्याची आणखीनच बिकट अवस्था झाली. परंतु लोकांच्या मदतीने त्याने पुन्हा एक बोट विकत घेतली आणि हॉटेलना मासे पुरवण्याचा व्यवसाय सुरु केला.
फ्लोरीडाच्या भुताळी ट्रेनच्या कथेवर कार्लचा पूर्ण विश्वास होता. फ्लोरीडा ईस्ट कोस्ट रेल्वेने सर्व ट्रॅक्स उखडले असले तरी अद्याप एका जागी पन्नास-साठ फूट ट्रॅक्स शिल्लक आहेत असं तो छातीठोकपणे सांगत असे! अंधार्या वादळी रात्री ट्रेनची शिट्टी आपण अनेकदा ऐकली आहे असाही त्याचा दावा होता. या त्याच्या बोलण्यामुळे कार्लला सर्वजण विक्षिप्त समजत असत! एक हॅरी पिन सोडला तर त्याला दुसरा मित्रं नव्हता. हॅरी आणि कार्ल यांच्यात नेहमी भुताळी रेल्वेवर चर्चा होत असे!
१ डिसेंबरच्या संध्याकाळपासून पाऊस कोसळत होता. त्यातच वार्याचा जोर वाढला होता. हॅरीच्या घरी कार्ल आणि हॅरी फाईव्ह कार्ड ड्रॉ हा पत्यातील खेळ खेळत होते. एका डावातले चार पत्ते पाहील्यावर आपण घरी चक्कर मारुन येत असल्याचं हॅरीला सांगून कार्ल बाहेर पडला! हॅरीने पाहू नयेत म्हणून आपले पत्तेही त्याने खिशात टाकले होते.
बाहेर गेलेला कार्ल दुप्पट वेगाने आत आला आणि हॅरीला ओढतच बाहेर घेऊन गेला! त्याला रेल्वेची शिट्टी आणि इंजिनाचा आवाज ऐकू येत होता!
"ऐक हॅरी.. नीट ऐक! इंजिनाचा आवाज!"
"अरे कसला आवाज?" हॅरीने गोंधळात पडून विचारलं, "हा वार्याचा आवाज आहे!"
"नाही रे! नीट ऐक! इंजिनाच्या शिट्टीचा आणि गाडीचा आवाज येतो आहे!"
"सोड रे! मला आत जाऊ देत!" हॅरी कार्लला समजावत उद्गारला!
"प्लीज हॅरी! डोन्ट लीव्ह मी अलोन...." कार्ल केविलवाण्या सुरात म्हणाला पण...
हॅरी कधीच आत निघून गेला होता!
कार्लने आपला ट्रक सुरु केला आणि तो घराकडे निघाला.
दुसरा संपूर्ण दिवस कार्लचा पत्ता नव्हता. हॅरीला आदल्या रात्रीचा प्रसंग आठवून उगाचच वाईट वाटत होतं. दुपारनंतर कार्लची समजूत काढण्याच्या हेतूने तो कार्लच्या घरी गेला. कार्लचा ट्रक घरासमोर होता, पण कार्ल गायब होता! त्याच्या घराच्या आसपास कार्लने पाळलेले कुत्रे अस्वस्थपणे घोटाळत होते.
कार्ल बोटीवर असावा या कल्पनेने हॅरी बंदरावर गेला. कार्लची बोट जाग्यावर होती, पण कार्लचा बोटीवरही पत्ता नव्हता!
हॅरीने थेट पोलीस स्टेशन गाठलं! पोलीस कॅप्टन जोसेफ हॅरी आणि कार्लचा मित्रं! हॅरी आणि जोसेफने मिळून कार्लचा बोटीवर आणि घरी शोध घेतला, परंतु कार्लचा कुठेच पत्ता नव्हता. अखेर ते कार्लच्या घरामागच्या झाडीच्या दिशेने निघाले आणि...
झुडूपात पडलेला एक पत्ता हॅरीला दिसला!
आदल्या रात्री कार्ल आपले पत्ते खिशात घालून निघाला होता तेच हे पत्ते होते. हॅरीने एकेक पान पाहण्यास सुरवात केली.
किलवर एक्का..
इस्पीक एक्का..
किलवर अठ्ठी..
इस्पीक अठ्ठी..
हॅरीने सावकाश पाचवं पान उघडलं..
चौकटचा गुलाम!
डेड मॅन्स हॅण्ड! मृत्यूचा डाव!
वाईल्ड बिल हिकॉक हा गनफायटर आणि पोलीस मार्शल पत्ते खेळत असताना पाठीमागून गोळी घालून डाकोटा राज्यातील डेडवूड इथे जॅक मॅकॉलने त्याचा खून केला होता. त्यावेळी हिकॉकच्या हातात हेच पत्ते होते. त्यामुळे हा डाव डेड मॅन्स हॅण्ड म्हणून प्रसिध्द झाला होता.
हॅरी पत्ते पाहत असतानाच जोसेफची हाक त्याच्या कानी आली. हॅरीने धावत जाऊन तो दाखवत असलेल्या दिशेला नजर टाकली आणि...
समोरच्या झाडीत रेल्वे ट्रॅक दिसत होता! सुमारे पन्नास-साठ फूट लांब!
"माय गॉड!" हॅरी भयचकीत होऊन उद्गारला
कार्लच्या वक्तव्यातील सत्यता हॅरीला आता पटली. कार्ल चक्रमपणे बडबडत नव्हता! त्याच्या सांगण्याप्रमाणे खरोखरच रेल्वे ट्रॅक आढळून आले होते.
हॅरीने ट्रॅकचं लक्षपूर्वक निरीक्षण केलं. खाली बसून ट्रॅकवरुन सहज बोट फिरवून पाहील्यावर त्याला आणखीन एक हादरा बसला..
ट्रॅकवर एक कण धूळ अथवा गंज नव्हता! नुकतीच एखादी गाडी गेल्याची थरथर अद्याप ट्रॅकमध्ये जाणवत होती!
ट्रॅकच्या निरीक्षणात हॅरी गुंतलेला असतानाच जोसेफची किंकाळी त्याच्या कानावर आली..
"ओ माय गॉड! हॅरी.."
हॅरीने जोसेफकडे धाव घेतली. तो दाखवत असलेल्या दिशेने हॅरी डोळे विस्फारुन पाहत राहीला.
रेल्वे ट्रॅकच्या दोन बाजूला कार्लच्या शरीराचे दोन तुकडे पडले होते...
नुकतेच ट्रेन अंगावरुन गेल्यासारखे...
********************************************************************************************************
संदर्भ :-
Ghosts of Florida
( भाग १०, भाग ९, भाग ८, भाग ७, भाग ६, भाग ५, भाग ४, भाग ३, भाग २, भाग १. )
प्रतिक्रिया
26 Aug 2014 - 7:52 am | पेरु
भितीदायक ....
26 Aug 2014 - 8:31 am | टवाळ कार्टा
कोणत्या तरी मराठी पुस्तकात हीच कथा जश्शीच्या तशी वाचलेली आठवते...१५-२० वर्षांपुर्वी
26 Aug 2014 - 8:49 am | पिंपातला उंदीर
ओशन ट्रन्गल- लेखक देव्धर. जसच्या तस
26 Aug 2014 - 8:57 am | स्पार्टाकस
ओशन ट्रँगल हे पुस्तक देवधरांचं नाही. बाळ भागवतांचं आहे. हे पुस्तक रिचर्ड वायनरचं फ्रॉम डेव्हील्स ट्रँगल टू डेव्हील्स जॉ आणि चार्ल्स बार्लीत्झचं बर्म्युडा ट्रँगल यांचं एकत्रीत भाषांतर आहे. तसंच त्यात या रेल्वेच्या इतिहासाचा आणि पुलावरच्या अनुभवाचा कुठेही उल्लेख नाही.
26 Aug 2014 - 10:45 am | इरसाल
हे मी पण वाचलय, पत्ते खेळताना मित्राने चावटपणाकरुन ते पत्ते मला अॅरेंज करायचा केलेला प्रयत्न आठवतोय पण ते पत्ते तसे मला पडले नव्हते. आजच बोलतो त्या मित्राशी ज्याय्ला इतक्या वर्षांनी हे वाचायला मि़ळेल असे वाटले नव्हते.
स्पार्टा भाउ तुम्ही लोकांचा कस काढताय ;)....मस्त खुपच छान.
26 Aug 2014 - 9:05 am | अजया
मस्त रे स्पार्टाकस ! आमचे जाण्या येण्याचे सगळे मार्ग हळूहळू बंद करतोस् की काय भिती घालून?
26 Aug 2014 - 9:07 am | पिंपातला उंदीर
मी हे प्रकरण मराठी पुस्तकात वाचल आहे . येस लेखक भागवत होते . त्यात रेल्वे चा इतिहास नव्हता हेमान्य . पण शेवटचे कार्ल चे प्रकरण आणि पुलावरचा किस्सा मात्र होता . असाच
28 Aug 2014 - 7:35 pm | llपुण्याचे पेशवेll
माझ्या माहीती नुसार ओशन ट्रँगल असे पुस्तकाचे नाव आहे. आणि रेल्वेचे भूत असा त्यात पहीलाच चॅप्टर आहे. लेखक कोण ते आता नक्की आठवत नाही. त्यात पुलावरचा किस्सा नाही.
26 Aug 2014 - 9:15 am | इनिगोय
भीषण. आधी समुद्र झाला, आता रेल्वे..
दोन लेखांमध्ये अजिबात अंतर न ठेवण्याचं काय कारण? डेलीसोपसारखे लेख प्रकाशित न करता थोड्या अंतराने प्रकाशित केलेत तर?
26 Aug 2014 - 2:50 pm | विश्वनाथ मेहेंदळे
असू द्यात हो. क्वालिटी मध्ये फरक पडत नाहीये ना. बाकी तसे खास वाचण्यासारखे चालू पण नाहीये मिपावर सध्या.
26 Aug 2014 - 9:23 am | पिंपातला उंदीर
राग येणार नसेल तर एक विचारू का ? हे भुताळी रेल्वे च प्रकरण तुम्ही माफक फेरफार करून जसच्या तस टंकल आहे का ? माझ्याकडे ओशन ट्रँगल हे पुस्तक आहे म्हणून म्हंटल . तस असेल तर श्रेय संबंधित लेखकाला द्यायला हवे . भुताळी जहाजांची जी तुम्ही मालिका तुम्ही लिहिलीत त्यात पण मला थोडा असा भास झाला होता . लहान तोंडी मोठा घास घेत असल्यास क्षमस्व
26 Aug 2014 - 9:32 am | स्पार्टाकस
सर्वप्रथम मी भागवतांच्या पुस्तकातून हे प्रकरण कॉपी केलेलं नाही हे स्पष्ट करतो. आधीच म्हटल्याप्रमाणे भागवतांचं पुस्तकही रिचर्ड वायनर आणि चार्ल्स बार्लीत्झच्या पुस्तकांवर आधारीत आहे. माझ्याकडे ही दोन्ही पुस्तकं मूळ इंग्लीशमधे आहेत. त्याच्या जोडीला इतरही अनेक पुस्तकांचा वापर मी वेगवेगळ्या लेखांसाठी संदर्भ म्हणून केला आहे. माझ्या माहीतीप्रमाणे भागवतांच्या पुस्तकातही पुलावरील अनुभवाचा उल्लेख नाही.
मी ज्या कथांचं भाषांतर केलं आहे, त्यात मूळ लेखकाचं नाव अर्थातच स्पष्टपणे लिहीलं आहे. वाड.मयचौर्याचा माझा कोणताही हेतू नाही. त्याला माझा विरोधच आहे.
26 Aug 2014 - 9:35 am | पिंपातला उंदीर
योगायोग असेल कदाचित . असो . भागवत याचं भाषांतर आणि तुमच् लिखाण यात अति साम्य आहे हे खर. असो
26 Aug 2014 - 12:54 pm | टवाळ कार्टा
+१११
26 Aug 2014 - 10:43 am | क्रेझी
विश्वास बसत नाही की असं खरंच झालं असेल! भयंकर आहे हे सगळं!! पण कथा वाचायला मजा येत आहे आणि हो स्पार्टाकस आपण रोज लेख प्रकाशित करा नाहीतर मजा निघून जाईल सगळी
:)
26 Aug 2014 - 7:31 pm | राघवेंद्र
मागच्या वर्षी या दिवसात कि वेस्ट ला गेलो होतो. हा लेख वाचला असता तर गेलोच नसतो. :)
रेल्वे ट्रॅकचा इतिहास माहिती नव्हता.
खुप धन्यवाद. मजा येत आहे.
पुढील कथेच्या प्रतिक्षेत.
26 Aug 2014 - 8:39 pm | बहिरुपी
खत्री लिहिता तुम्ही स्पार्टाकस. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
26 Aug 2014 - 10:18 pm | मुक्त विहारि
मस्त...
झक्कास...
अजून लेख येवू देत...
27 Aug 2014 - 4:44 pm | काळा पहाड
कदाचित असंही असेल की स्पार्टाकस हा आयडी कै.विजय देवधरांनीच घेतला असेल लिहिण्यासाठी.
28 Aug 2014 - 8:22 am | टवाळ कार्टा
भारीच _/|\_
27 Aug 2014 - 7:18 pm | रेवती
बाबौ!
28 Aug 2014 - 6:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खतरनाक. येऊ दे अजून.
-दिलीप बिरुटे
28 Aug 2014 - 7:43 pm | llपुण्याचे पेशवेll
खतरनाक. यातले काही रेल्वेपूल अजूनही असावेत. कदाचित वर्चे रूळ उखडले असतील. आम्ही की वेस्टाला गेलो होतो तेव्हाच्या लाँग ड्राईव्हमधे असे बरेच वापरात नसलेले पूल हायवेच्या पुलाशेजारी असलेले पाहीले होते. कदाचित ते तेच पूल असतील.
5 Sep 2014 - 6:02 pm | काव्यान्जलि
फार छान… मज्जा येते आहे… येउद्या अजून ….
10 Mar 2015 - 3:04 pm | चाफा
http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5415099490333145052...
10 Mar 2015 - 3:17 pm | सुहास झेले
कमाल... कमाल !!
इतकं साम्य की भागवतांचा डू आयडी शोभावे. फार वाईट वाटले स्पार्टाकस. तुमच्या लेखणीचा जबर पंखा होतो मी राव...
असो !!
10 Mar 2015 - 3:36 pm | प्रीत-मोहर
यातले जसेच्या तसे नाहीये ना पण!!! डिटेलींग आहे जास्त.
10 Mar 2015 - 4:31 pm | खंडेराव
धन्य! सेम सेम!
12 Mar 2015 - 5:19 pm | अत्रन्गि पाउस
हे सगळे मान्य कारणे ...
अरे अरे ....
12 Mar 2015 - 9:12 pm | कवितानागेश
दोन्ही कथा पूर्ण वाचल्या.
जरी एकाच कथेचे भाषांतर असले तरी लिखाणात पुष्कळच् फरक आहे. लेखनशैलीतही.
........ माझ्या मते.
13 Mar 2015 - 12:47 pm | विशाखा पाटील
या कथेच्या बाबतीत सहमत! हीच कथा Florida's Ghostly Legends and Haunted Folklore: South and Central Florida - Greg Jenkins यातही आहे. ती अनेकांनी थोडी वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेली दिसते.