प्राचीन काळी उत्तर अमेरीकेतील कॅनडाच्या प्रदेशात ऑन्गीएर्स नावाची एक जमात राहत होती. या जमातीत एक सुंदर तरुणी होती. त्या तरूणीच्या वडिलांनी तिचा विवाह तिच्या मनाविरुद्ध आपल्या जमातीच्या वयोवृद्ध राज्याशी लावून देण्याचा निर्णय घेतला. परंतु तिला हा निर्णय मान्य नव्हता! तिचं एका दुसर्या तरुणावर प्रेम होतं. हा तरुण एका प्रचंड मोठ्या धबधब्याजवळ असलेल्या गुहेत राहत असे. तो गर्जणार्या वार्याचा देव म्हणून ओळखला जात होता!
आपल्या मनातील राजाविषयीचा तिटकारा तिने व्यक्त करताच मोठा गहजब झाला. जमातीतल्या लोकांनी तिला वाळीत टाकण्याची शिक्षा फर्मावली. आपल्या प्रियकराला शोधून काढण्याच्या निश्चयाने तिने एका लहानशा नावेतून त्या धबधब्याच्या दिशेने प्रयाण केलं. धबधब्याच्या टोकाला येताच आपल्या नावेसह ती खाली कोसळली, परंतु धबधब्याच्या खाली असलेल्या तिच्या प्रियकराने तिला अलगद झेललं....
त्या तरुण-तरुणीची ही दंतकथा आज शेकडो वर्षांनीही त्या धबधब्याच्या परिसरात अजरामर आहे. असं म्हणतात की धबधब्यामागच्या त्या गुहेत आजही त्या तरुण-तरुणीचं वास्तंव्य आहे!
या तरुणीचं नाव होतं लीलावाला!
लिलावाला आणि तिचा प्रियकर हे-नो यांची कहाणी आजही ज्या धबधब्याच्या परिसरात एक दंतकथा बनलेली आहे तो जगप्रसिद्ध धबधबा म्हणजेच...
नायगरा!
कॅनडा आणि अमेरीकेच्या सीमेवर असलेला हा जगप्रसिद्ध धबधबा माहीत नसलेला माणूस विरळाच. हॉर्स शू फॉल, अमेरीकन फॉल आणि ब्रायडलवेल फॉल हे तीन भाग असलेला हा धबधबा एरी सरोवरापासून ऑन्टारीयो सरोवराकडे वाहणार्या नायगरा नदीवर आहे. जगातील सर्वात जास्त वेगाने पाणी कोसळणार्या या धबधब्यात नायगरा नदी स्वत:ला तब्बल ५० मीटर (१६५ फूट) खाली झोकून देते!
१९६० सालचा जुलै महिना. अमेरीकेतील नायगरा फॉल्स शहरातील एक माणूस नायगरा नदीच्या वरच्या भागात बोटीने फेरफटका मारण्यास निघाला होता. त्या माणसाचं नाव होतं जिम हनीकट. आपल्या शेजारच्या दोन भावंडांना त्याने आपल्यासोबत घेतलं होतं. १७ वर्षांची डीनी वुडवर्ड आणि तिचा ७ वर्षांचा भाऊ रॉजर वुडवर्ड. लहानगा रॉजर त्यापूर्वी कधी बोटीत बसला नव्हता. त्याला पोहताही येत नव्हतं! त्यामुळे त्याच्या आईने त्याला लाईफजॅकेट घालण्याविषयी बजावलं होतं. डीनीच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमीत्त त्यांना बोटीतून फिरायला नेण्याचं जिमने कबूल केलं होतं.
जिमच्या बारा फूट लांबीच्या अॅल्युमिनीयमच्या बोटीतून ते तिघं नायगरा नदीच्या वरच्या भागातील पात्रात शिरले. ९ जुलैच्या त्या शनिवारी दुपारी बोटीतून चक्कर मारण्यास वातावरण एकदम अनुकूल होतं. आकाशात ढगांचा मागमूस नव्हता. नदीवर वार्याचा जोरही फारसा नव्हता.
काही वेळाने ते ग्रँड आयलंडला जोडणार्या पुलाच्या कमानीखालून पुढे सरकले. या पुलापासून काही अंतरावर नायगरा नदीच्या पात्रात पाण्याचे खळखळणारे जोरदार प्रवाह (रॅपीड्स) आहेत. ग्रँड आयलंडचा हा पूल म्हणजे नदीवरील सुरक्षीत नौकाविहाराची जणू अलिखीत सीमारेषाच आहे. फार थोडे धाडसी लोक हा पूल ओलांडून पाण्याच्या खळाळत्या प्रवाहांजवळ जाण्याचा धोका पत्करतात.
नदीच्या पात्रात नांगरलेल्या अनेक बोटींवरील खलाशी हनीकटच्या पुढे जाणार्या बोटीकडे आश्चर्याने पाहत होते. जिमने ७ वर्षांच्या रॉजरला एक अनुभव म्हणून बोटीला दिशा देण्याची जबाबदारी दिली होती. परंतु वेग पकडत असलेल्या प्रवाहातून मार्ग काढणं लहानग्या रॉजरला शक्यच नव्हतं. अखेर ज्या गोष्टीची धास्ती होती तेच झालं!
एका वाळूने भरलेल्या टेकडाला बोटीचं इंजिन आदळलं!
इंजिन आदळताच त्याचा कर्कश्श आवाज झाला. त्या आवाजाने भेदरुन त्या टेकडावर असलेला पक्षांचा थवा घाबरुन हवेत उडाला!
जिमने ताबडतोब इंजिन बंद केलं. परंतु त्याची बोट आता हळूहळू उग्र बनत चाललेल्या प्रवाहात सापडली होती. दुर्दैवाने बोटीवर नांगर नव्हता. किनार्यावर एखाद्या मजबूत आधाराला बांधण्याच्या दृष्टीने दोरीही नव्हती. कुठेही बोट चालवण्यासाठी आवश्यक असणार्या या पूर्वतयारीविना नायगरा नदीसारख्या ठिकाणी शिरणं म्हणजे तर निव्वळ आत्महत्या ठरणार होती.
याची किंमत आता कोणाला चुकवावी लागणार होती?
जिमची बोट आता धबधब्याच्या दिशेने जाणार्या प्रवाहात सापडली होती. जोराने वल्ही मारत बोट विरुध्द दिशेला नेण्याचा तो जिवाच्या आकांताने प्रयत्न करु लागला. परंतु आता उशीर झाला होता! क्षणोक्षणी वाढत असलेल्या प्रवाहाच्या ताकदीपुढे त्याची शक्ती किती पुरेशी पडणार होती?
त्याही परिस्थितीत जिमच्या डोक्यात मुलांच्या सुरक्षीततेचा विचार सुरु असावा. रॉजरने लाईफजॅकेट घातलेलं होतं. बोटीत उरलेलं एकमेव लाईफजॅकेट घालण्याची जिमने डीनीला सूचना केली!
जिम डीनीला लाईफजॅकेट घालण्याची सूचना करत असतानाच प्रवाहाच्या एका जोरदार लाटेने बोटीला तडाखा दिला!
"आपण आता मरणार!" रॉजर भयाने किंचाळला.
डीनीने लाईफजॅकेट चढवलं आणि त्याचं एक बक्कल जेमतेम लावलं न लावलं तोच आणखीन एका लाटेचा तडाखा बोटीला बसला आणि....
... तुफान वेगाने वाहणार्या प्रवाहात बोट उपडी झाली!
जिम, डीनी आणि रॉजर तिघंही रोरावणार्या प्रवाहात फेकले गेले! नायगरा नदीचा तुफान वेगाने वाहणारा प्रवाह त्यांना धबधब्याच्या दिशेने खेचून नेऊ लागला!
एका क्षणी ते पाण्याखाली खेचले जात होते, तर दुसर्याच क्षणी हवेत भिरकावले जात होते. कधी खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत पाण्यात आपटत होते! श्वास घेणंही अशक्यं होत होतं. नदीपात्रात असलेल्या दगडांवर मधूनच ते आदळले जात होते! भितीने त्यांच्या तोंडून आवाजही फुटत नव्हता..
समोर काही अंतरावर १६५ फूट खोल कोसळणारा धबधबा आSSS वासून उभा होता!
डीनी पाण्याच्या प्रवाहाशी झगडत किनार्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होती. धबधब्याच्या अमेरीकेकडील बाजूस असलेल्या 'गोट आयलंड'वर आलेल्या पर्यटकांची वाहून चाललेल्या या तिघांकडे नजर जाताच त्यांना जबरदस्त हादरा बसला!
डीनी वेगाने धबधब्याच्या टोकाकडे खेचली जात होती. गोट आयलंडच्या दिशेने पोहत जाण्याचा ती आकांती प्रयत्न करत होती, परंतु तिची शक्ती अपुरी पडत होती...
धबधब्याची कड जवळ येत चालली होती!
न्यूजर्सीहून सुटीवर आलेल्या जॉन हेसची डीनीवर नजर जातात काही क्षण तो जागीच खिळून उभा राहीला. भानावर आल्यावर त्याने धबधब्याच्या कडेला असलेल्या रेलींगवर पाय ठेवला आणि वाकून डीनीच्या दिशेने हात पुढे केला.
"लवकर!" हेस ओरडला, "वाट्टेल ते करुन इकडे ये आणि माझा हात धर!"
डीनी त्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करु लागली, परंतु प्रवाहापुढे आपली शक्ती अपुरी पडणार याची तिला खात्री पटच चालली होती.
"हरी अप! इकडे ये! कम ऑन! फॉर हेवन्स सेक!" हेस तिला पुन्हा पुन्हा हाका मारत होता.
हेसच्या या काकुळतीने मारलेल्या हाकांनी डीनीला नवसंजीवनी मिळाली जणू! धबधब्याच्या टोकाकडे रोरावत चाललेल्या प्रवाहातून आडवा हात मारत ती हेसच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करु लागली.
"आणखीन थोडी पुढे ये! कम ऑन!" हेस ओरडतच होता.
याच वेळी हेसच्या जोडीला न्यूजर्सीहूनच आलेला जॉन क्वात्रोचीही येऊन पोहोचला!
धबधब्याची कड डीनीपासून अवघ्या चार फूट अंतरावर होती! चार फुटांवर मृत्यूने आपला अक्राळविक्राळ जबडा डीनीचा घास घेण्यासाठी उघडला होता....
.... आणि डीनीच्या हातात जॉन हेसचा अंगठा सापडला!
हेस आणि क्वात्रोची धबधब्याच्या टोकावरून डीनीला पाण्याबाहेर खेचण्यात यशस्वी झाले होते!
पाण्याबाहेर येताच नुकत्याच प्राणसंकटातून वाचलेल्या डीनीला रॉजरची काळजी लागली होती!
"त्याच्यासाठी आपण फक्तं प्रार्थना करू शकतो!" हेस पुटपुटला!
डीनीचा हात दगडामुळे कापला गेला होता. परंतु दुसरी कोणतीही जखम तिच्या अंगावर नव्हती!
रॉजर आणि जिम हनीकटच्या नशिबात काय लिहीलं होतं?
डीनीला मदत करणार्यांना लहानगा रॉजर दिसत होता. परंतु तो प्रवाहाच्या मधोमध होता. त्याच्यापाशी पोहोचणं निव्वळ अशक्यं होतं. मदतीसाठी तो हाका मारत असाव. परंतु रोरावणार्या पाण्याच्या आवाजात त्याचा आवाज ऐकू येत नव्हता!
गोट आयलंडवरुन विस्फारलेल्या नजरेने पाहणार्या लोकांच्या डोळ्यांदेखत रॉजर नायगरा धबधब्यातून १६५ फूट खाली कोसळला!
नायगरा नदीच्या खालच्या अंगाला धबधब्याचं जवळून दर्शन घडवून आणणारी 'मेड ऑफ द मिस्ट' ही बोट आपल्या नेहमीच्या फेरीवर होती. धबधब्याच्या वरच्या अंगाला सुरू असलेल्या या थरार नाट्याची बोटीवरील कोणालाही तिळमात्रंही कल्पना नव्हती. कॅप्टन क्लीफर्ड कीच कॅनडाच्या किनार्यावरुन पर्यटकांना घेऊन आपल्या नेहमीच्या सफरीवर आला होता. हॉर्स शू फॉलचं डोळेभरुन दर्शन घेऊन तृप्त झालेल्या पर्यटकांसह तो परत फिरत होता.
अचानक नदीतून जोराने किंकाळ्यांचा आवाज ऐकू येऊ लागला!
बोटीवरील पर्यटकांनी आवाजाच्या दिशेने पाहीलं आणि ते आश्चर्याने थक्कं झाले!
केवळ लाईफजॅकेट आणि पोहण्याची चड्डी घातलेला लहानसा मुलगा पाण्यात काही अंतरावर तरंगत होता. मदतीसाठी तो जोरजोराने हाका मारत होता!
रॉजर वुडवर्ड!
नायगरा धबधब्याच्या रोरावणार्या प्रवाहातून १६५ फूट केवळ एका लाईफजॅकेटच्या सहाय्याने कोसळूनही तो अद्याप जिवंत होता! ...आणि पूर्ण शुध्दीवर होता!
कॅप्टन कीचने पाण्याच्या प्रवाहात आपली बोट न भरकटण्याची काळजी घेऊन शक्य तितकी रॉजरच्या जवळ नेली. मोठी दोरी बांधलेली हवा भरून फुगवलेली रिंग त्याच्या दिशेने टाकण्याची त्याने सूचना केली.
पहिल्या खेपेला रिंग रॉजरपासून दूर पडली.
दुसर्या खेपेलाही तोच प्रकार झाला.
तिसर्या खेपेला मात्रं निसटती का होईना रॉजरच्या हाताला रिंग लागली!
रिंग हातात येताच रॉजरने ती घट्ट धरुन ठेवली! काही क्षणातच कॅप्टन कीचच्या सहाय्यकांनी त्याला बोटीवर ओढून घेतलं!
रॉजर वुडवर्डला मेड ऑफ द मिस्टवर उचलून घेताना
रॉजर भयाने थरथरत होता. आपण किती मोठ्या संकटातून जिवानीशी बचावलो होतो याची त्याला कल्पनाही नव्हती! केवळ एका लाईफजॅकेटच्या आधारावर नायगरा धबधब्यातून कोसळल्यावरही कोणतीही मोठी दुखापत न होता तो वाचला होता!
रॉजरला कॅनडातील नायगरा फॉल्स इथल्या जनरल मेडीकल हॉस्पीटलमध्ये नेण्यात आलं. तिथे तीन दिवस राहील्यावर तो खडखडीत बरा झाला! दरम्यात अमेरीकेकडील नायगरा फॉल्स शहरातील हॉस्पीटलमध्ये भरती असलेल्या डीनीला रॉजर नायगरातून खाली पडल्यावरही बचावल्याचं कळल्यावर तिला झालेल्या आनंदाची कल्पना करणंही अशक्यं होतं!
नायगरातून वाचल्यावर डीनी आणि रॉजरची पुनर्भेट
कॅप्टन कीचचे आभार मानताना रॉजर वुडवर्ड
डीनी आणि रॉजरला नदीवर बोटींगला नेणारा जिम हनीकट मात्रं वाचू शकला नाही! नायगरा धबधब्याच्या खालील भागात तीन दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला!
"मी धबधब्याच्या टोकाशी खेचला जात असताना मला किनार्यावरची माणसं दिसत होती!" पुढे त्या घटनेबद्दल बोलताना रॉजर वुडवर्ड म्हणाला, "ते सर्वजण डीनीला मदत करण्यात गर्क होते. माझ्या मदतीला मात्रं कोणीही येत नव्हतं! त्या वेळी मला त्यांचा प्रचंड राग आला होता! अर्थात हे चुकीचं होतं हे आता मला कळतं आहे! कितीही प्रयत्न केला तरी प्रवाहाच्या मधोमध माझ्यापर्यंत पोहोचणं त्यांना शक्यं झालं नसतंच!
मी धबधब्याच्या कडेला पोहोचलो आहे हे माझ्या लक्षातंच आलं नव्हतं! आपला मृत्यू आता निश्चित आहे याची मला खात्री पटली! माझ्या मनात आई-वडीलांचा विचार आला. त्यांना किती दु:ख होईल याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो!
एका क्षणी मी एकदम ढगात शिरल्याची मला जाणिव झाली! माझ्या आजूबाजूला फक्तं धुकं होतं! क्षणभरच का होईना, पण लीलावाला आणि हे-ना यांच्या आकृती माझ्या नजरेसमोर तरळून गेल्या!"
रॉजर या क्षणी खाली धबधब्याच्या टोकावरुन खाली कोसळला होता. परंतु आपण खाली फेकलो गेलो आहोत हेच त्याच्या ध्यानात आलं नाही! भरवेगाने तो पाण्यात कोसळला आणि पृष्ठभागाच्या बराच खाली गेला! परंतु अंगात असलेल्या मोठ्या माणसाच्या लाईफजॅकेटने त्याला पुन्हा पाण्यावर आणून सोडलं! परंतु वरुन पडणार्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तो इकडे-तिकडे फेकला जात होता. तशातच त्याला एका मोठ्या बोटीची कड दिसली.
"मला एकच गोष्ट करणं शक्यं होतं आणि मी ती केली. जीव खाऊन ओरडणं!"
"जॉन हेसच्या आवाजातील आर्जवाने मला जिवंत राहण्याची उमेद दिली!" डीनी वुडवर्ड नंतर म्हणाली, "त्याच्या दिशेने येण्यासाठी तो पुन्हा-पुन्हा देत असलेल्या प्रोत्साहनामुळेच मी आज जिवंत आहे! हेस आणि क्वात्रोचीने मला पुनर्जन्मच दिला आहे!"
२०१० मध्ये या घटनेला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने रॉजर, डीनी, जॉन हेस आणि जॉन क्वात्रोची यांची नायगरा धबधब्यावर पुन्हा भेट झाली! ५० वर्षांपूर्वीची ती घटना आदल्या दिवशी घडल्यासारखी सर्वांच्या स्मृतीत ताजी होती!
रॉजर आणि डीनी - २०१०
******************************************************************************
( भाग १०, भाग ९, भाग ८, भाग ७, भाग ६, भाग ५, भाग ४, भाग ३, भाग २, भाग १. )
प्रतिक्रिया
25 Aug 2014 - 7:37 am | इनिगोय
लेखनविषय कथा?
25 Aug 2014 - 7:38 am | राघवेंद्र
पिच्चर बघितला होता पण आता पुर्ण समजला.
25 Aug 2014 - 8:05 am | खटपट्या
मस्त !! खिळवुन ठेवणारे लिहीलय!!
25 Aug 2014 - 8:17 am | अजया
मजा आली वाचायला.पुभाप्र.
25 Aug 2014 - 8:44 am | पोटे
छान
25 Aug 2014 - 10:35 am | क्रेझी
मस्तच..अगदी थरारक वर्णन आहे पण आवडलं. नविन लेखमाला चालू केल्याबद्दल धन्यवाद पुढचे भाग लवकर येऊ देत :)
25 Aug 2014 - 11:25 am | आयुर्हित
केवळ अद्भुत कथा!
अप्रतीम लिखाण.
जाको राख्ये साइंइया, मार सको न कोय!
25 Aug 2014 - 12:35 pm | प्यारे१
मस्तच
25 Aug 2014 - 12:49 pm | श्रीगुरुजी
मस्त लिहिलंय. वाचताना मजा आली.
25 Aug 2014 - 9:50 pm | मुक्त विहारि
अप्रतिम....
26 Aug 2014 - 1:34 am | अनन्त अवधुत
चला , आता नवीन प्रवासाला सुरुवात झाली :)
मस्त झालाय हा भाग.
27 Aug 2014 - 4:43 pm | खुशि
देव तारी त्याला कोण मारी.
27 Aug 2014 - 7:07 pm | रेवती
असेच म्हणते.
27 Aug 2014 - 10:53 pm | विअर्ड विक्स
तुमच्या लेखनाचा मी पंखा आहे. ADRENALIN RUSH म्हणजे काय हे सर्व तुमच्या कथांतून कळते.
28 Aug 2014 - 6:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नवी लेखमालिकाही खासच.
-दिलीप बिरुटॅ
30 Aug 2014 - 9:31 pm | माझीही शॅम्पेन
केवळ चित्तथरारक , दुसर्या महा-युद्धात विमानातून पॅराशुट शिवाय पडून , बर्फाच्या अलगद थरात अडकून वाचला होता ती कथा आठवली
3 Aug 2024 - 10:07 am | कर्नलतपस्वी
नायगारा फाॅल्स खुप जवळून अनुभवला ( अनुभवायचा आसतो तो बघायचा नसतो) आसल्याने त्या मधे आडकलेला कुणी वाचू शकेल हे कपोलकल्पित वाटते.
मस्त लेख.
धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद.