आपल्यापैकी काहीजण व्यवसाय करतात, काही जण नोकरी करतात, तर काही जणांनी या पैकी एक केलेलं आहे. पैसे मिळवायला तुम्हाला ते करणं भाग असतं. आणि यात विशेषत: ज्यांनी नोकरी केलेली आहे, म्हणजे जे ऐलतीरावर राहिलेले आहेत त्यांना पैलतीरावरच्या माणसांचा नेहमीच (अपवाद असतीलच) त्रास झालेला आहे. सांगायचंच झालं तर ज्या प्राण्याला बॉस म्हणतात त्या प्राण्याचे लाड करण्यात, नखरे सहन करण्यात, एम्प्लॉयी किंवा कर्मचारी नामक व्यक्तीची काय तारांबळ होते, किती त्रास होतो, किती मनस्ताप होतो, राग येतो, हे ज्याचं त्याला ठाऊक आहे. आणि तो राग, मनस्ताप अधून मधून फेसबुक किंवा व्हॉट्सअॅप्प मधील विनोदांमार्फत बाहेर पडत असतोच; शिव्या, आय मीन, शिवाय इतरही माध्यमं आहेत बाहेर पडण्याची.
ही बॉस मंडळी खरंच फार विचित्र असतात कधीकधी. बोलण्यात बोलणं नसतं, मॅनेजमेंट वाहील तसं ही वाहत असतात, अवास्तव अपेक्षा धरून असतात आणि काय नि काय. तसे अनेक अनुभव येत असतात, त्या अनुभवांच्या खिचडीतून झालेला हा गोडाचा शिरा.
बॉस कर्मचा-याला गोडाचा शिरा बनवायला सांगतो. 'एकदम मस्त गोडाचा शिरा बनव छान खमंग'
कर्मचारी कढई घेतो, तूपावर रवा भाजून बिजून मस्त गोडाचा शिरा बनवतो. आणि सर्व्ह करतो.
बॉस (घास घेऊन मख्ख चेह-याने बघत) 'म्म्म ठीक आहे, पण रिच हवा अजून. बेदाणे बिदाणे टाक जरा'
कर्मचारी बदाम, पिस्ते, बेदाणे घालून शिरा बनवतो. दाखवतो.
बॉस (कपाळावर आठ्या आणून) 'ओके... पण यात वेगळं काय आहे?... इट शुड बी डिफरंट. फ्लेवर टाक. अॅड बटर स्कॉच'
कर्मचारी (नाईलाजाने) 'ओ या! गुड आयडिया. मस्त वाटेल काँटिनेंटल टच'
मग 'तसा' बटरस्कॉच ड्रायफ्रूट शिरा घेऊन कर्मचारी येतो.
बॉस (दाढी (नसलेली) खाजवत) यात थोडा टँगीनेस आणला तर...? हं? अॅड स्पाईस टू इट. अॅड चिली.
कर्मचारी (तोंड न उघडता दात-ओठ चावत) सुपर्ब! आजकाल तसंही लोकांना स्पायसी आवडतं सगळं. धिस विल बी अ हिट !
बॉस 'मग! मला तेच.... काहीतरी कमी वाटत होतं पहिल्यापासून'
कर्मचारी शि-यात मिरची घालून आणतो.
बॉस 'हा! आता मस्त. पण जाम तिखट झालाय. तिखट ओव्हरपॉवर करतंय गोडाला. असं नको होतं. तू जास्त टाकलस. यू शुड नो हाउ मच टू अॅड. असो. आता एक काम कर, थोडा चिंचेचा कोळ घाल त्यात. त्याने न्यूट्रलाईज होईल.'
कर्मचारी गप्प.
बॉस 'काय झालं? बरोबर ना मी म्हणतोय ते?'
कर्मचारी (दचकून) 'हो येस. ऑफकोर्स! ऑफकोर्स!.... करतो'
त्या शि-यात चिंचेचा कोळ घालून कर्मचारी घेऊन येतो.
बॉस 'वेल... ठीक आहे, पण... स्टिल... वी हॅव टू डू समथिंग टू मेक इट स्टँड आउट. शिरा विथ आईस्क्रीम कसं वाटेल?
कर्मचारी (उपहासाने) यू आर अ जिनियस! जस्ट फँटॅस्टिक !लेट्स डू इट.
बॉस 'देअर यू गो...'
कर्मचारी त्या शिरानामक पदार्थावर आईस्क्रीमचा गोळा घालून आणतो.
बॉस एक घास घेतो. 'ह्म्म्म्म्म डिलिशियस'
कर्मचारी (बोडक्याचं डिलिशियस साल्या ओकारी येईल खाऊन)
बॉस दुसरा घास घेतो. 'धिस इज ..... गुड!'
बॉस आणखी एक घास घेतो. ( चेहरा जरा चिंतित)
बॉस आणखी एक घास घेतॉ (कपाळाला आठ्या)
काही सेकंद शांत. आणि म्हणतो 'पण... हा गोडाचा शिरा नाही वाटत. गोडाचा शिरा शुड बी लाईक गोडाचा शिरा.'
कर्मचारी 'फुली फुली फुली फुली फुली फुली फुली फुली फुली फुली फुली फुली फुली फुली फुली फुली'
असे असतात बॉस नामक प्राणी. या शि-याची चव ओळखीची वाटली असेल तर सांगा. :)
प्रतिक्रिया
24 Jun 2014 - 2:15 pm | टवाळ कार्टा
मी पयला :)
24 Jun 2014 - 2:18 pm | मुक्त विहारि
घरी बायकोला अन ऑफीसात साहेबाला, खूष ठेवणारा प्राणी अद्याप आम्हाला भेटलेला नाही.
24 Jun 2014 - 2:22 pm | सविता००१
आणि दररोज नवा गडी नवा राज सारखं नवीन पदार्थाबद्द्ल हाच खेळ खेळतो आम्ही. :(
24 Jun 2014 - 2:24 pm | त्रिवेणी
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म *yes3*
24 Jun 2014 - 2:46 pm | शिद
"थोडा अलग सोचो, थिंक आऊट ऑफ द बॉक्स" असं बोलून कैच्याकै आयडिया समोर मांडत असतो. आणि आपण काही आयडिया दिली कि लगेच "कस्टमर को ये पसंद नही आयेगा" असंं म्हणत तिच आयडिया स्वःताच्या नावावर खपवतो.
24 Jun 2014 - 3:19 pm | पिलीयन रायडर
म्हणुन आधी ती आयडिया मेल करायची.. तेही बॉस च्या बॉसला सीसी मध्ये ठेवुन.. वर चार ओळी बॉस कसं माझं प्रेरणास्थान आहे हे लिहायचं.. मग खाली "पण मला काय वाटतं... " असं म्हणुन मग आपली आयडिया सांगायची..
24 Jun 2014 - 5:10 pm | धन्या
नेमकं हेच मुलांना जमत नाही. :)
24 Jun 2014 - 5:14 pm | पिलीयन रायडर
हुषार एम्प्लोयी आणि मठ्ठ एम्प्लोयी असतात.. त्यात मुलगा किंवा मुलगी असं काहीही नसतं..
24 Jun 2014 - 5:30 pm | धन्या
असं आहे होय. माहिती नव्हतं मला.
24 Jun 2014 - 5:42 pm | पिलीयन रायडर
मलाही आत्तच कळालयं.. चांगलं किंवा वाईट असं असतं.. स्त्री - पुरुष असं काही नसतं..
सोप्पच झालं माझं आयुष्य!!
24 Jun 2014 - 2:53 pm | दिपक.कुवेत
कितीहि तुपात घोळवुन, सजवुन दिला तरी "बॉस" नामक प्राण्याला तो पसंत पडणं म्हणजे कर्मकठिण!!! छानच जमलाय लेख. त्या बरोबर मुविं म्हणतायेत त्याला +१.
24 Jun 2014 - 5:24 pm | अनुप ढेरे
जिलबी.. आपलं ते हे.. शिरा छान झालाय
24 Jun 2014 - 6:31 pm | ह भ प
असा एक लेख वाचला होता.. त्यात कंपनी एम्प्लोयॆला सायकल देते तिला केरॆअर नसत; स्टेंड नसता. तो विचारतो मला दोन्ही लावून दया.. कम्पनी केरॆअर लावून देते; स्टेंड नै देत .. तो परत म्हणतो स्टेंड लावून दया तर कम्पनी स्टेंड लावून देते अन कैरॆअर काढून घेते.
तो म्हणतो असं का तर कम्पनी म्हणते दोन्ही एकदम मिळनार नै.. कैरीअर हवं असेल तर स्टेंड मिळ नार नै अन स्टेंड हवा असेल तर कैरीअर सोडावं लागेल..
24 Jun 2014 - 6:37 pm | एस
लेख आवडला वेल्लाभट. करिअरमधील स्टँड आता सोप्पा होणार. नव्याने कळलं.
24 Jun 2014 - 7:38 pm | स्पा
हाहा लय भारी
24 Jun 2014 - 7:41 pm | यशोधरा
वेल्लाभट, मस्त लिहिलं आहे, आवडलं. :)
24 Jun 2014 - 10:06 pm | वेल्लाभट
थेंक्यू थँक्यू ! सर्वांनाच.
24 Jun 2014 - 10:54 pm | जोशी 'ले'
सह्हि.. *ok*
25 Jun 2014 - 11:23 am | मित्रहो
मस्त जमला शिरा, गोड नसला म्हणून काय झाले. शिराच्या उपमा झाला तरी तो शिराच असतो कारण बॉसने सांगितले म्हणून.
आवडला. खूप आवडला.
एक जुना विडीओ आठवला
http://www.youtube.com/watch?v=AHSjpFUKQR4
असाच शिरो पकतो.
मित्रहो
www.mitraho.wordpress.com
25 Jun 2014 - 12:39 pm | कवितानागेश
गमतीदार शिरा(?) :)
25 Jun 2014 - 12:45 pm | पैसा
एकदम हटके चवदार शिरा!
25 Jun 2014 - 12:56 pm | प्यारे१
सध्या अनुभव घेतो आहे.
शिरा चांगला झाला तर 'मी' केला नि नाही चांगला झाला तर 'सामूहिक जबाबदारी'.... :(
25 Jun 2014 - 1:13 pm | खबो जाप
आमच्यकडे ह्या विदेओ सारखे डिक्टो चालू असते
http://www.youtube.com/watch?v=BKorP55Aqvg
25 Jun 2014 - 3:04 pm | कंजूस
मला वाटलं मिपाकर आपापले किस्से सांगतील पण कसचे काय ?मी पयला आणि दुसराच्या पुढे जात नाही .प्रत्येक जण आपला शिरा जिलबी वेगळी पाडणार ?
25 Jun 2014 - 3:43 pm | वेल्लाभट
उगाच दुस-याच्या धाग्यात का 'शिरा'?
लोल