'गॉन विथ द विंड' या नावाने नेहमीच एक रहस्यमय मोहिनी घातली होती. ठिकठिकाणी हे नाव वाचले, ऐकले होते. कधी खोलात जाऊन या नावाभोवतीचं वलय काय आहे हे बघावं असं मनापासून वाटलं नाही. उत्सुकता होती पण आळस म्हणा किंवा बाकीचं नीरस जगणं जास्त आवडलं होतं म्हणा, बरीच वर्षे टंगळमंगळ करण्यात गेली. दोन-तीन वर्षांपूर्वी माझा एक परममित्र किरण गायकवाड याने विश्वास पाटलांचं ' नॉट गॉन विथ द विंड' हे पुस्तक वाढदिवसाची भेट म्हणून दिलं. या पुस्तकाच्या मात्र मी अक्षरशः प्रेमात पडलो. सलग दोन वेळा वाचून काढलं. जगभरातल्या उत्तमोत्तम साहित्यकृतींवर आधारलेले उत्तमोत्तम चित्रपट घेऊन विश्वास पाटलांनी साहित्यचित्रसृष्टीची जणून मनोरम सैरच या अप्रतिम पुस्तकातून घडवली आहे. 'अॅना कुर्निकोव्हा', 'गॉन विथ द विंड', 'मॉबी डिक', 'द गॉडफादर', 'द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय', 'देवदास', 'अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर' अशा अनेक सरस कादंबर्यांची आणि त्यावर बेतलेल्या चित्रपटांची सफर विश्वास पाटील त्यांच्या पुस्तकातून घडवून आणतात. मग मात्र मी उशीर लावला नाही. ताबडतोब 'गॉन विथ द विंड' ची एक नवीकोरी प्रत मागवली. मुखपृष्ठावर क्लार्क गेबल आणि विवियन ली या दोघांमधल्या उत्कट प्रसंगाचं चित्र होतं. पुस्तकाची जाडी बघून (जवळपास १००० पाने) माझी इच्छाशक्तीची गाडी पंक्चर होईल की काय असे वाटू लागले पण मी धीर सोडला नाही. सुरुवातीची पाच-दहा पाने वाचून संपल्यावर मात्र मी अधाशासारखं हे पुस्तक वाचून संपवलं. पुस्तक वाचत असतांना मी पूर्णपणे 'गॉन विथ द विंड'मय झालो होतो. अगदी दहा मिनिटे जरी मोकळा वेळ मिळाला तरी मी पुस्तक काढून वाचत बसे. संपूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर मला एक वेगळेच समाधान मिळाले. साधारण दहा-बारा दिवस झाले असतील आणि मी पुन्हा एकदा 'गॉन विथ द विंड' संपूर्ण वाचलं. वाचनाचा अत्युच्च अशा प्रकारचा आनंद आणि अतीव समाधान देणारं दुसरं एखादं पुस्तक मी क्वचितच वाचलं असावं.
'गॉन विथ द विंड' ही कादंबरी मार्गारेट मिशेल या अमेरिकन लेखिकेने साधारण १९३६ साली लिहिली. अमेरिकन यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या दक्षिण भागातल्या जॉर्जिया राज्यातल्या एका अतिशय सुंदर, कमनीय, तरुण, आणि सधन अशा स्कारलेट ओ'हारा या नायिकेची ही कहाणी. गुलामगिरीच्या प्रथेच्या विरुद्ध उत्तर अमेरिकेतली राज्ये दक्षिणेकडच्या राज्यांवर हल्ला करतात आणि याच पार्श्वभूमीवर स्कारलेटच्या रंगीबेरंगी आयुष्याचा पट उलगडत जातो. 'गॉन विथ द विंड' ही फक्त स्कारलेटच्या आयुष्याची कहाणी नाही; अमेरिकन यादवी युद्ध, त्याकाळचे जीवनमान, गुलामगिरीची प्रथा, त्याकाळातल्या चालीरीती, १८६१ ते १८६५ या काळात असणारी अमेरिकेची सामाजिक, आर्थिक, आणि सांस्कृतिक परिस्थिती, औद्योगिकिकरणाची मुहुर्तमेढ, स्कारलेटच्या आयुष्यात आलेली माणसे, त्यांचे स्वभाव, स्कारलेटच्या आयुष्यात प्रेमाचे महत्व, त्याकाळातली प्रेमाची परिभाषा, युद्धामुळे झालेला नाश अशा कित्येक गोष्टींचा मार्मिक ऊहापोह करणारी कादंबरी म्हणून 'गॉन विथ द विंड' या कादंबरीकडे आदराने पाहिले जाते. अमेरिकन साहित्याची भक्कम मुहुर्तमेढ रोवणारी कादंबरी म्हणून देखील 'गॉन विथ द विंड' या कादंबरीकडे पाहिले जाते.
चैनीचं आयुष्य जगणारी कमालीची सुंदर आणि अल्लड स्कारलेट जगाच्या दाहक वास्तवापासून शतयोजने दूर असते. आपल्या सौंदर्याने तरूण मुलांना भुरळ घालणे आणि त्यांना घायाळ करत राहणे हा तिचा आवडता छंद असतो. मग युद्ध सुरु होते आणि त्यासोबतच सुरु होतो स्कारलेटच्या आयुष्याचा एक काळाकुट्ट अध्याय. तिचं मनापासून प्रेम ज्या अॅश्लीवर असतं तो तिच्याशी लग्न न करता तिच्या होणार्या नवर्याच्या बहिणीशी लग्न करतो आणि युद्धावर जातो. इकडे अटलांटा शहर आणि जॉर्जिया राज्यातली गावे हळूहळू भस्म होत जातात. अन्नाची भयंकर अशी टंचाई भेडसावू लागते. सगळे मृत्यूच्या कराल छायेत भयभीत होऊन कसेबसे मृत्यूला हुलकावण्या देत जगत असतात. हजारो सैनिक प्राण गमवतात. स्कारलेटच्या शिरावर अचानक मोठ्या जबाबदार्या येऊन पडतात. दारिद्र्याचे चटके अनुभवत असतांनादेखील तिच्या मनाच्या एका कोपर्यात अॅश्लीच्या प्रेमाच्या हळुवार भावना असतातच. किंबहुना त्या नाजूक भावनांच्या बळावर स्कारलेट मोठ्या मोठ्या संकंटांना समर्थपणे तोंड देते.
मार्गारेट मिशेलचे लिखाण, कल्पनाशक्ती, पात्रांची रचना, प्रसंग रंगवून लिहिण्याची क्षमता हे सगळं अत्युच्च कोटीचं आहे. वाचतांना आपण प्रत्यक्ष अटलांटा शहरातच आहोत असा भास व्हावा इतके हे लिखाण जिवंत आणि रसरशीत आहे. या लेखिकेने हे एकच पुस्तक लिहिले. आजारी असतांना वेळ घालवण्यासाठी म्हणून मार्गारेटने हे लिखाण सुरु केले. तिच्या कल्पनेच्या कितीतरी पट यश या कादंबरीने मिळवले. मुळात प्रकाशित करण्यासाठी म्हणून मार्गारेटने ही कादंबरी लिहिलीच नव्हती. मित्राच्या आणि नवर्याच्या आग्रहाखातर तिने ही कादंबरी प्रकाशनासाठी मोठ्या नाखुशीने दिली. त्याआधी प्रकाशनचे विषय टळावेत म्हणून तिने तिचे हस्तलिखित आधी कचर्याच्या डब्यात टाकून दिले. तिच्या नवर्याने ते काढले आणि सांभाळून ठेवले. मार्गारेट मिशेलने स्वतः अमेरिकन यादवी युद्धाचा अनुभव घेतला होता. तिच्या अनुभवांवर आधारित अशा या कादंबरीने प्रकाशित झाल्या झाल्या दहा लाख प्रतींच्या विक्रीचा पल्ला सहजी गाठला. मार्गारेट मिशेल ही अमेरिकेतली सगळ्यात लोकप्रिय लेखिका ठरली. अजूनही कादंबरीलेखनाच्या ७८ वर्षांनंतर 'गॉन विथ द विंड' या कादंबरीच्या विक्रीचे आकडे आश्चर्यचकित करणारे आहेत.
नोव्हेंबर २०१३ मध्ये माझ्या सुदैवाने मला अटलांटा शहराला भेट देण्याची संधी मिळाली. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. अटलांटा शहरात पोहोचल्या पोहोचल्या आम्ही पिचट्री स्ट्रीटवरच्या मार्गारेट मिशेल यांच्या जतन करून ठेवलेल्या घराकडे मोर्चा वळवला. इतक्या वर्षांनतरही हे घर आहे तसे जतन करून ठेवले आहे. अर्थात कालानुरुप काही बदल करावे लागले आहेत. मार्गारेट मिशेल यांची पुस्तके, त्यांचा टाईपरायटर, स्वयंपाकाची खोली, फर्निचर असे सगळे व्यवस्थित ठेवले आहे. मार्गदर्शकाच्या सेवेसह या भेटीसाठी प्रतिव्यक्ती १५ डॉलर्स आकार घेतात. त्या मोहक गाईडने आम्हाला त्याकाळचे मार्गारेटचे फोटो, लिखाणसाहित्य इत्यादी व्यवस्थित दाखवले. एका छोट्या स्टोअरमध्ये 'गॉन विथ द विंड'च्या नव्या प्रती विक्रीसाठी उपलब्ध होत्या. या स्मारकाला भेट देणार्या लोकांची संख्या लक्षणीय होती. पिचट्री स्ट्रीटवर उभं राहून मी 'गॉन विथ द विंड' चा काळ कल्पून बघत होतो. आसपासची घरे, रस्ते त्याकाळी कसे असेल या विचाराने अंगावर रोमांच उभे राहत होते. बरेच फोटो काढून आणि तिथल्या वातावरणाचा आनंद उपभोगून आम्ही तिथून बाहेर पडलो. माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय अनुभव होता. मार्गारेटच्या टाईपरायटरला प्रत्यक्ष स्पर्श करून मी मार्गारेट मिशेल तिथं असल्याचा आभास निर्माण करू पाहत होतो.
आणि काल मी 'गॉन विथ द विंड' हा चित्रपट पाहिला. माझी कित्येक दिवसांची इच्छा पूर्ण झाली. जवळ-जवळ २३५ मिनिटाच्या या महाचित्रपटाची महती काय वर्णावी! एक एक फ्रेम म्हणजे उत्कृष्ट कलानिर्मितीचा जणू जिवंत झरा! १९३९ मधल्या या चित्रपटाने कमाईचे, दर्जाचे सगळे उच्चांक मोडले. जगातला आतापर्यंतचा सगळ्यात यशस्वी चित्रपट म्हणून 'गॉन विथ द विंड' चे नाव घेतले जाते. संपूर्ण कादंबरी चित्रपटात साकारणे केवळ अशक्य आहे परंतु हा चित्रपट कादंबरीच्या मूळ आशयाला न्याय देतो. या चित्रपटाने पहिल्यांदा कृष्णवर्णीय अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला ऑस्करसारखा प्रतिष्ठेचा सन्मान मिळवून दिला. हॅटी मॅक्डॅनियल या कृष्णवर्णीय अभिनेत्रीला तिच्या मुख्य नॅनीच्या भूमिकेसाठी ऑस्कर पारितोषिक मिळाले.
अल्लड, व्यावहारिक, चैनीची सवय जडलेली परंतु आपल्या माणसांवर मनापासून प्रेम करणारी आणि त्यांच्या सुखासाठी जीवाचं रान करणारी, प्रसंगी समर्थपणे उभी राहणारी आणि कधी कधी निर्लज्जपणे सोपे मार्ग निवडणारी स्कारलेट विवियन ली या अभिनेत्रीने जबरदस्त उभी केली. तिला ऑस्कर मिळ्णारच होतं आणि मिळालंच. भारतात जन्मलेली विवियन ली काय कमालीची सुंदर दिसली आहे म्हणून सांगतो! चित्रपट बघत असतांना मी (बायकोच्या उपस्थितीला न जुमानता) तिचे क्लोज-अप पॉज करून निरखून बघत होतो. क्लार्क गेबलने धूर्त तरीही हळव्या मनाचा र्हेट बटलर सुरेख रंगवला आहे. त्याचा रापलेला चेहरा, मिश्कील आणि छद्मी हसू, भुवयांची विशिष्ट हालचाल त्याच्या व्यक्तिरेखेला एक वेगळेच परिमाण देतात.
अतिशय सुंदर चित्रण आणि परिणामकारक पार्श्वसंगीत चित्रपटाची रंगत आणखीनच वाढवतात. स्कारलेटचे घर, र्हेटचे आलिशान घर, मधोमध असणारे भव्य जिने, मुलायम गालिचे कलादिग्दर्शानातील श्रीमंती दर्शवतात. युद्धाचे प्रसंग अतिशय जिवंत साकारले आहेत. भय वाटावे अशी बॉम्बफेक, आगीचे लोण, मरून पडणारे सैनिक, विव्हळत असलेले हजारो सैनिक असा युद्धाचा थरारक प्रत्यय हा चित्रपट पाहून येतो. चित्रपटाचा कॅनव्हास खूप भव्य आहे. त्याला उत्तम पटकथालेखनाची आणि दिग्दर्शनाची जोड मिळाली आहे. एक परिपूर्ण चित्रपट पाहिल्याचं समाधान 'गॉन विथ द विंड' देतो.
माझे नशीब थोर की मला हे पुस्तक वाचायला मिळाले, लेखिकेच्या मूळ घरी जाण्याची संधी मिळाली, ज्या शहरात ही कांदबरी घडते ते शहर बघायला मिळाले आणि इतका सर्वांगसुंदर चित्रपट बघायला मिळाला. खरंच 'गॉन विथ द विंड' हा एक उत्कट, अद्भुत अनुभव आहे. प्रत्येकाने तो अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा.
आणि मार्गारेट मिशेल म्हणते, "इन अ वुईक मोमेंट, आय हॅव रिटन अ बुक"...संकटांच्या काळात संकटांशी समर्थपणे सामना करत ही अद्भुत कलाकृती निर्माण करणारी मार्गारेट मिशेल कमकुवत कशी असेल? आणि होच की ती कमकुवत नव्हतीच, तिच्यावरची संकटे तिला कमकुवत करू पाहत होती पण मार्गारेट खंबीरपणे त्या संकटांना सामोरी गेली आणि इतकी परिपूर्ण कलाकृती निर्माण करून जगाचं भलं करून गेली...
प्रतिक्रिया
11 Feb 2014 - 4:02 am | आत्मशून्य
हजारो वेळा सहमत.
11 Feb 2014 - 5:15 am | बहुगुणी
पुस्तक वाचून आणि चित्रपट पाहून खूप वर्षं झालीयेत, तुमचं उत्कटतेने लिहिलेलं परीक्षण वाचून पुन्हा दोन्हींचा शांतपणे उपभोग घेतला पाहिजे असं वाटून गेलं! धन्यवाद!
11 Feb 2014 - 5:50 am | अनन्त अवधुत
असेच म्हणतो.
11 Feb 2014 - 5:27 am | मदनबाण
सुंदर अनुभव आणि लेखन... :)
12 Apr 2014 - 2:56 pm | बालगंधर्व
अपर्तिम लेकहन अनि अनुबहव. थे ग्रेअत मर्गरते मदम. अझुन येउ दया.
11 Feb 2014 - 5:45 am | कंजूस
फारच ओघवतं आणि उत्कट परीक्षण .
आपल्याकडच्या लेखकांची घरे त्या त्या राज्यांच्या पर्यटनात दाखवायला हवीत .
11 Feb 2014 - 6:40 am | सस्नेह
एखफे पुस्तक वाचल्यावर किंवा आवडलेला चित्रपट पाहिल्यावर दाटणार्या भावनांना याहून सुंदर शब्दांत वाट देता येईल काय ? चला, आज 'गॉन...' मिळवणार अन सुरू करणार वाचन.
(शब्द्वेडी अन पुस्तकप्रेमी) स्नेहांकिता
11 Feb 2014 - 8:47 am | सुनील
परीक्षण आवडले.
वर बहुगुणी यांनी म्हटल्याप्रमाणे पुस्तक आणि चित्रपट शेवटचे पाहून बरीच वर्षे झालीत (खरे तर, पुस्तकाची पेपरबॅक आवृत्ती आणि DVD दोन्ही घरी आहेत!), आता पुन्हा एकवार दोन्हीचा निवांत उपभोग घ्यावा असे वाटतेय!
मला स्वत:ला पुस्तक अधिक आवडले. चित्रपटाला, त्या माध्यमाच्या मर्यादेमुळे, थोडी तडजोड स्वीकारावी लागली.
अवांतर १ - ऐतिहासीक घटनेवर आधारीत असले तरी, हे वास्तविक ललित वाङ्मय आहे. तरीही, मार्गारेट मिशेलने कादंबरीतील पात्रांना नावे देताना, अटलांटाच्या तत्कालीन मतदारयांद्यांचा आधार घेतला होता आणि एकही नाव तंतोतत तसेच कादंबरीत येणार नाही याची काळजी घेतली होती! एका कादंबरीकाराने एवढी काळजी घ्यावी, हे कौतुकास्पदच.
अवांतर २ - गॉन विथ द विंड हे नाव एर्नेस्ट डॉसन ह्या ब्रिटिश कवीच्या एका प्रसिद्ध कवीतेतील ओळीतून घेतले गेले आहे.
11 Feb 2014 - 9:03 am | मुक्त विहारि
धन्यवाद,
एक विनंती....
मार्गारेट निशेलच्या घराचे आणि तिथल्या साहित्याचे फोटो टाकलेत तर फार उत्तम....
(ह्या लेखाच्या निमीत्ताने आपण परत लिहीते झालात.आता असेच उत्तम लिखाण परत परत येवू देत.)
11 Feb 2014 - 9:14 pm | समीरसूर
लिखाण सुरु ठेवण्याचा प्रयत्न नकीच करेन. आपल्या उत्तेजनाबद्दल धन्यवाद.
अटलांटाचे काही फोटो इथे बघता येतील.माझ्या फेबुवर आहेत.
11 Feb 2014 - 9:40 am | मितान
अगदी अक्षराअक्षराशी सहमत.
मी ङोन विथ द विंड वाचले तेव्हा काही दिवस एवढे भारावलेले होते की स्वप्नही स्कार्लेट नि र्हेट बटलरची पडायची.
या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही व्यक्तिरेखा पूर्ण पांढरी किंवा पूर्ण काळी नाही. स्वभावाचे, भावभावनांचे, यात होणार्या स्थित्यंतरांचे एवढे गुंतागुंतीचे तरीही विलक्षण मनोहारी असलेले वर्णन क्वचितच वाचायाला मिळते. स्कार्लेट ओ'हाराची मनस्विता जेवढी मनावर ठसते तेवढेच अॅश्लेचे भावनाविश्व आणि तेवढाच र्हेट बटलरचा महत्त्वाकांक्षी स्वभाव!
निव्वळ अप्रतिम पुस्तक !
चित्रपट बघण्याची अजून इच्छा झाली नाही. तुमच्या परिक्षणामुळे कुतुहल चाळवले गेले.
11 Feb 2014 - 10:20 am | ज्ञानव
'अॅना कुर्निकोव्हा',
कि
"अॅना कॅरेनिना" लिओ टोल्स्तोयचे
11 Feb 2014 - 8:46 pm | समीरसूर
ज्ञानव साहेब,
होय, अॅना कॅरेनिना असायला पाहिजे होते; चुकून 'अॅना कुर्निकोव्हा' झाले. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद! त्या दिलखेचक रशियन टेनिस खेळाडूच्या नावाशी मी धडपडलो बहुधा ;-) आणि चूक झाली.
समीर
12 Feb 2014 - 9:36 am | ज्ञानव
किती छान आहे न !? दोघीही रशियन आणि दोघीही "संग्रही" ठेवाव्या अशा आहेत.
बाकी चूक लक्षात आणून देणे वगैरे उद्देश नव्हता. मी जरा डळमळलो कि आपलेच काही चुकले कि काय असे वाटले कारण दोन्ही पुस्तके मी वाचली नाहीत पण सिनेमा पहिले आहेत महाविद्यालयीन काळात (तेव्हा संगत चांगली होती.....नंतर...लग्न झाले.).
13 Feb 2014 - 12:19 am | समीरसूर
प्रतिसाद आवडला. :-)
11 Feb 2014 - 12:23 pm | बॅटमॅन
परीक्षण आवडले. कादंबरी पकड घेते ती पहिल्या २०० पानांनंतर. तोपर्यंत स्कार्लेटच्या नखर्यांची वर्णने वाचता वाचता वीट येतो. पण यादवी युद्धाचे वर्णन अन ती 'तारा' चे रक्षण कसे करते ते पाहिले तर कळायचं बंद होतं. मेलॅनीचा मृत्यू तिला सर्वांत जास्त हलवून सोडतो. संधीसाधू र्हेट बटलर तिला अन ती र्हेटला पुरेपूर ओळखून असतात. प्रेम जमले तरी त्यांचे कायम जमणे शक्यच नसते, तरी र्हेट शेवटी निरोप घेतो तरी ती घट्ट असते ते विशेष वाटलेलं. पण सर्वांत आवडलेला भाग म्हणजे यादवी युद्धावेळी तिने 'तारा' ची ठेवलेली व्यवस्था अन तेव्हा दाखवलेले धैर्य. ते विशेष भावले.
10 Apr 2014 - 10:42 pm | शुचि
कादंबरी अनेक अनेक वेळा प्रयत्न करुनही वाचता आलेली नाही. या वेळी कुठेतरी अज्ञात निर्जन्वासातच जाईन अन वाचेन म्हणते.
पण सिनेमा पाहीला आहे अन तु म्हणतोस तस्सेच -
खरच पकड घेते.
शिवाय सगळे तिला सोडून जातात तरी मेलनीला मूल होताना तिने दाखविलेले धैर्य, हे देखील कमाल आहे. हा माझा आवडता सिनेमा आहे.
11 Feb 2014 - 12:53 pm | पैसा
एका सार्वकालीक श्रेष्ठ कलाकृतीची सर्व अंगांनी, आणि २ माध्यमातून झालेल्या आविष्काराची करून दिलेली सुरेख ओळख.
11 Feb 2014 - 1:16 pm | ढब्बू पैसा
मस्तच लिहीलंय. ह्याहून चांगल्या शब्दात मला लिहीता येणार नाही, पण परीक्षणात र्हेट बटलरचा उल्लेख नाही ह्याची चुटपुट राहील.
ह्या पुस्तकाचं गारूड प्रचंड असतं. मितान ताई म्हणते तसं, मलाही स्कार्लेट आणि र्हेट्ची स्वप्न पडायची कित्येक दिवस!
अर्थात पुस्तकाच्या काही बाबी खटकतातच , कारण अप्रत्यक्षपणे पुस्तकात गुलामगिरीचं समर्थन आहे, रादर पुस्तक "सदर्नर्स"च्या दृष्टीकोनातून असल्यानेही तसं असेल.
13 Feb 2014 - 12:44 am | समीरसूर
र्हेटचा उल्लेख ओझरता आहे. त्याची व्यक्तिरेखा जबरदस्त आहे. आणि गुलामगिरीचं समर्थन आहे असं वाटत नाही. कृष्णवर्णीयांना तिथे अगदी कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे वागवलं जायचं असं चित्रण आहे. तेच यांकीज (उत्तर भागातले गोरे) त्यांना दूर ठेवणं पसंत करायचे असा कुठेतरी उल्लेख असल्याचे स्मरते. यादवी युद्ध हे काही खूप उदात्त हेतूने लढले गेले नव्हते; त्या युद्धात बरीच स्वार्थी आर्थिक, राजकीय, सामाजिक, आणि जातीय कारणे दडलेली होती असे मी कुठेतरी वाचले होते. दक्षिणेकडे कृष्णवर्णीयांच्या गोर्या लोकांकडे काम करण्याला गुलामगिरी म्हणत असत खरे पण त्यांना वागणूक कधी गुलामांसारखी क्रूर मिळत नसे. याउलट उत्तरेकडचे गोरे गुलामगिरी मोडून काढण्याच्या नावाखाली कृष्णवर्णीयांविरुद्ध असणारी त्यांची खरी भावना लपवत असत. कृष्णवर्णीयांचे हक्क त्यांना मिळवून देणे, त्यांच्या जगण्याची सोय करणे, त्यांना जमिनी देणे, त्यांना राजकीय हक्क देणे इत्यादी गोष्टींमध्ये मुबलक पैसा होता आणि राजकारण देखील होते. अर्थात ही माझी वाचीव माहिती; खरे खोटे अब्राहमला माहिती.
11 Feb 2014 - 2:52 pm | संजय क्षीरसागर
कादंबरी, चित्रपट आणि लेखिकेच्या घरला दिलेली प्रत्यक्ष भेट सगळंच उत्तम जमलंय.
11 Feb 2014 - 3:19 pm | जयंत कुलकर्णी
याचा पुढचा भाग वाचला का नाही..........मला तरी ती माती उचलून जी प्रतिज्ञा करते ते फारच भावले.......भूक म्हणजे काय असते याची दोन उदाहरणे देतो......
१) पाडसमधे जेव्हा ज्योडी त्या बोटीवर भुकेने मरायला टेकतो तेव्हा त्याला " आपण भुकेने मरु '' असे त्याचा पा सांगायचा त्याचा अर्थ कळतो. तो पर्यंत त्याला भूक म्हणजे आता काहीतरी चांगले चुंगले खायला मिळणार एवढाच अर्थ माहीत असतो.
२ दुसर्या महायुद्धात फ्रान्समधे जेव्हा स्त्रियांनी अन्नासाठी त्यांचे शरीरही विकायला कमी केले नाहे तेव्हा इंग्लंडमधे बरीच टिका झाली पण जेव्हा चर्चिलने म्हटले, "इंग्लंडमधे जनतेने अशा परिस्थितीत काय केले असते हे कोणी सांगू शकत नाही. भुकेचा खरा अर्थ आपल्याला अजून माहीत नाही' तेव्हा ती टिका बंद झाली....असो..असा भुकेचा प्रसंग कोणावर्ही न येवो.......
11 Feb 2014 - 9:21 pm | समीरसूर
याचा पुढचा भाग पण आहे? मला माहित नव्हता. पण मार्गारेट मिशेलने एकच कादंबरी लिहिली ना?
12 Feb 2014 - 9:06 am | जयंत कुलकर्णी
याचा दुसरा भाग छोटा आहे आणि दुसर्याने लिहिला आहे. आता नाव आठवत नाही........
11 Feb 2014 - 3:47 pm | कवितानागेश
फार दिवसांपासून उत्सुकता होती. पण अजूनही वाचलं नाहीये.
आता नक्कीच वाचेन. :)
12 Feb 2014 - 5:59 am | आनन्दिता
आता परत एकदा हा चित्रपट पाहणे आले..
13 Feb 2014 - 3:56 am | मयुरा गुप्ते
चित्रपट पाहुन बरिच वर्ष झाली, पुस्तक पूर्ण वाचु शकले नव्हते. कदाचित सुरुवातीची पानं खुपचं कंटाळ्वाणी वाटली होती. परंतु जस-जसे यादवी युध्द्दाबद्दल माहीती मिळ्वत गेले तेव्हा हळुहळु चित्रपट उलगडत जातोय असं वाटायला लागलं. स्कार्लेट आणि र्हेट बटलर ह्यां मधलं नातं म्हणजे "फ्रेंडशिप विथ बेनीफीट" आहे.
--
मयुरा.
13 Feb 2014 - 9:58 am | प्रमोद देर्देकर
एकदा वाचली होती कॉलेजात असताना. आता आठवत नाहिये नीट्सं तेव्हा पुन्हा वाचेन.
धन्स
16 Feb 2014 - 4:40 pm | सुहास झेले
सुंदर परीक्षण... पुस्तक वाचेन आता नक्कीच :)
19 Feb 2014 - 6:46 pm | रमताराम
एका उत्तम कादंबरीची आठवण पुन्हा ताजी करून दिलीत. धन्यवाद.
10 Apr 2014 - 10:43 pm | शुचि
परीक्षण खूप आवडले.
11 Apr 2014 - 12:30 am | सखी
हे राहुनच गेलं वाटतं वाचायचं. वॅल्हटाईन डेचा परिणाम असावा :(
खूपच मस्त लिहलं आहे. त्यातही तुम्ही मुळ कांदबरी सगळी वाचलीत, कांदबरी/लेखिकेच्या मूळ घरी जाण्याची संधी मिळाली, ज्या शहरात ही कांदबरी घडते ते शहर बघायला मिळाले, आणि मग चित्रपट पाहीला हा प्रवास खूपच आवडला. आता सवड काढायलाच पाहीजे यातल्या काही गोष्टी तरी करायला.
11 Apr 2014 - 9:28 am | चौकटराजा
लेखिका कोणत्या तरी अपघाताने जायबंदी झाली घर सोडून कुठे बाहेर जाउ शकत नव्हती. आता काय करायचे घरात बसून तरी म्हणून लेखन करायला घेतले व ही कादबरी जन्माला आली .
12 Apr 2014 - 12:43 pm | भाते
परिक्षण आवडले.
पुस्तक वाचले नाही आहे अजुन पण चित्रपट पुर्वी पाहिला होता. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.