The Asiatic Society of Bombay च्या Gallery of Excellence या नावाच्या एका प्रकाशनामध्ये पण्डित भगवानलाल इंद्रजी यांच्या विषयी एक चरित्रात्मक लेख आहे. हे लिखाण प्रताधिकाराखाली असल्याने थेट भाषांतर देता येणार नाही, पण कदाचित गोषवारा देता येईल.
पंडित भगवानलाल यांचा जन्म ७-११-१८३९ रोजी सौराष्ट्रातील जुनागढ येथे झाला. तिथे त्या काळी इंग्रजी शिक्षणाची सोय नव्हती. पण संस्कृत भाषा आणि आयुर्वेदउपचारपद्धतीचे शिक्षण मात्र त्यांना मिळाले. गिरनारच्या वाटेवरील पाषाणलेखाने लहानपणीच त्यांना या विषयी कुतूहल निर्माण झाले आणि पुढे पुराभिलेख आणि नाणकशास्त्राचा अभ्यास हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले. त्यांनी मोठ्या चिकाटीने या लेखाविषयीचे सर्व प्रकाशित वाङ्मय जमा केले आणि ती लिपी आणि भाषा शिकून घेऊन लेखातील मजकुराचा उलगडाही केला. पुराभिलेख वाचनातील त्यांच्या तज्ज्ञतेची माहिती काठियावाड संस्थानचे तत्कालीन पोलिटिकल एजंट ए. के. फोर्ब्स यांच्यापर्यंत पोचली आणि त्यांनी मुंबईचे प्राच्यविद्यातज्ज्ञ डॉ. भाऊ दाजी लाड यांच्याकडे भगवानलाल यांची शिफारस केली. डॉ. भाऊ दाजींनी त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले. बावीस वर्षांचे भगवानलाल मुंबईस आले आणि आयुष्यभर भाऊ दाजींचे परमशिष्य बनून राहिले. भाऊ दाजी एक नामांकित डॉक्टर होते. ग्रँट मेडिकल कॉलेजातून उत्तीर्ण झालेल्या पहिल्या आठ जणांमधले ते एक होते. वैद्यकीच्या अतिशय यशस्वी व्यवसायामुळे त्यांच्या आवडीच्या प्राच्यविद्येमध्ये लक्ष घालण्यास पुरेसा वेळ त्यांना मिळत नसे. तीक्ष्ण प्रज्ञा आणि निरीक्षणशक्ति असलेले भगवानलाल डॉ. भाऊ दाजींचे ज्ञानचक्षु बनले. त्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पुरावे, साधने गोळा करावीत, नोंदी काढाव्यात आणि भाऊंनी त्यांचे विश्लेषण करावे अशी कार्यविभागणी झाली. त्या काळी प्रवास अतिशय खडतर होता. रस्ते, पूल, काहीही नव्हते. तरीही ते अजिंठा, नाशिक, जुन्नर, पितळखोरा, ओडिशा,बनारस, मथुरा, अगदी नेपाळ, तिबेट, बलुचिस्तानपर्यंत हिंडले. त्यांच्या प्रवासाच्या तपशीलवार नोंदी त्यांनी गुजरातीतून लिहून ठेवल्या आहेत.
डॉ. भाऊ दाजींच्या अकाली मृत्यूनंतर त्यांचे कार्य भगवानलाल यांनी पुढे सुरू ठेवले. नाणकशास्त्र-विशेषतः क्षत्रपांची नाणी- आणि भारत व नेपाळातील पुराभिलेख यांवर त्यांनी संशोधन केले, माहिती जमवली आणि ती गुजरातीतून प्रसिद्ध केली. पुढे या लेखनाची इंग्रजीमध्ये भाषांतरे झाली आणि Indian Antiquary मध्ये प्रसिद्ध झाली.
गुजरातचे गॅझेटिअर लिहिण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. तत्पूर्वी ए.के.फोर्ब्स यांनी लिहिलेला गुजरातचा इतिहास इसवी सनाच्या दहाव्या शतकापासून सुरू होत होता. भगवानलालांचे गिरनारशिलालेखवाचन आणि इतर संशोधन यांमुळे तो मौर्यकाळापर्यंत म्हणजे इसवीसनपूर्व चौथ्या शतकापर्यंत मागे खेचला गेला. भगवानलालांनी भारतीय नाणकशास्त्राची आणि गुजरातच्या इतिहासलेखनाची पायाभरणी केली असे म्हणता येईल.
इ.स. १८८२ मध्ये वसई तालुक्यातल्या नाळा-सोपारा येथे त्यांनी केलेले उत्खनन ही प्राच्यविद्या आणि पुरातत्त्वशास्त्र यांमधील एक अत्यंत महत्त्वाची कामगिरी ठरली. तेथील स्तूपाच्या उत्खननात त्यांना एका दगडी पेटार्यात बुद्धाचे अवशेष आणि त्याभोवती अगदी वेगळे असे आसनस्थ बुद्धाचे इसवीसनाच्या आठव्या नवव्या शतकातले ब्रॉन्झचे आठ पुतळे सापडले. त्यांच्या ह्या संशोधनामुळे भारतीय आणि युरोपीय विद्वद्वर्तुळात आणि श्रीलंकेतल्या बौद्धजनांत प्रचंड खळबळ उडाली. त्यांनी या शोधावर केलेले लेखन अद्यापही प्रमाण मानले जाते आणि संदर्भासाठी वापरले जाते.
त्यांच्या विद्वत्तेचा भारतात आणि भारताबाहेरही सन्मान झाला. मुंबई सरकारने सन १८८२ मध्ये त्यांची मुंबई विश्वविद्यालयाचे फेलो म्हणून नेमणूक केली. इंडियन एपिग्राफीमधल्या त्यांच्या योगदानामुळे Royal Asiatic Society of Great Briton and Northern Ireland मध्ये ते ऑनररी फेलो म्हणून निवडले गेले. इतरही अनेक देशी परदेशी सन्मान त्यांना लाभले.
मुंबई इलाख्याच्या गॅझेटीअरमध्ये गुजरातच्या सर्वंकष इतिहासावर लिहिण्यासाठी ते अनेक वर्षे साधनसामग्री गोळा करीत होते. पण त्यांच्या अकाली मृत्यूमुळे ते काम त्यांच्या हातून पूर्ण होऊ शकले नाही. नंतर त्यांनी जमवलेल्या साधनांनिशी गुजरातचा प्राचीन इतिहास सिद्ध केला गेला.
पंडित भगवानलाल इंद्रजी हे १६-३-१८८८ रोजी वयाच्या अवघ्या एकोणपन्नासाव्या वर्षी मृत्यू पावले. त्यांनी केलेल्या मृत्युपत्रानुसार त्यांचा सर्व नाणेसंग्रह, हस्तलिखिते, पुराभिलेख ,ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तू त्यांनी निर्देशिलेल्या सामजिक संस्थांना दान करण्यात आल्या. त्यापैकी हस्तलिखिते एशियाटिक सोसायटीला मिळाली. त्यांनी असे लिहून ठेवले होते की ही हस्तलिखिते डॉ. भाऊ दाजींच्या हस्तलिखितसंग्रहाशेजारी ठेवावी आणि त्या कपाटावर 'भगवानलाल इंद्रजी, डॉ. भाऊ दाजी यांचे शिष्य' असे लिहिले जावे.
प्रतिक्रिया
4 Feb 2014 - 12:49 am | बॅटमॅन
कायम नाव ऐकतो पण यांच्याबद्दल कधीच काही वाचलेलं नसतं. या लेखासाठी अनेक आभार!!!!
4 Feb 2014 - 7:42 am | आतिवास
नाणकशास्त्राबद्दल काही कानांवर पडताना हे नाव ऐकलं आहे - या सविस्तर माहितीबद्दल आभार.
4 Feb 2014 - 8:06 am | सुनील
चांगली माहिती.
4 Feb 2014 - 8:35 am | राही
मला वाटते हे नाव 'भगवानलाल इंद्राजी' असे लिहायला हवे होते. सूर्याजी, कृष्णाजी, शिवाजी तसे इंद्राजी.
गुजराती स्रोत तपासून खात्री करून घेतली पाहिजे.
4 Feb 2014 - 8:53 am | आतिवास
मराठी विश्वकोशात इंद्रजी असाच उल्लेख आहे, तोच बरोबर असावा. ती नोंद डॉ. शोभना गोखले यांची आहे म्हणून हा विश्वास!
4 Feb 2014 - 8:55 am | प्रचेतस
सहमत.
महामहोपाध्याय वा. वि. मिराशी सुद्धा त्यांचा उल्लेख 'इंद्रजी' असाच करतात.
4 Feb 2014 - 9:50 am | मुक्त विहारि
आवडला...
4 Feb 2014 - 9:59 am | प्रचेतस
परिचय आवडला.
गिरनारचा तो रूद्रदामन क्षत्रपाचा लेख अत्यंत महत्वाचा आहे.
गिरनारजवळच्या उर्जयत पर्वतातून दोन नद्यांना आलेल्या पुरामुळे आणि वादळामुळे बांधाला भगदाड पडल्यामुळे उद्धस्त झालेल्या सुदर्शन नामक तलावाला पुन्हा बांध घालून तिप्पट बळकट करणे हे नमूद करण्याचा त्या लेखाचा उद्देश.
यात त्या तलावाचा पूर्वेतिहास पण दिलेला आहे तो असा की हा तलाव मौर्य सम्राट चंद्रगुप्त याच्यासाठी त्याचा प्रांताधिपती पुष्पगुप्त याने बांधला आणि नंतर मौर्य अशोक याच्या तुषास्फ नामक यवन अधिकार्याने त्याचे कालवे काढले होते.
याच शिलालेखात रूद्रदामनाने दक्षिणापती सातकर्णीचा युद्धात दोनदा पराभव केला तरी त्याच्याशी असलेल्या नातेसंबंधांमुळे त्याला सोडून दिले असाही उल्लेख आहे.
याशिवाय इतरही अनेक शिलालेखांचे वाचन डॉ. इंद्रजी यांनी केले.
4 Feb 2014 - 1:25 pm | राही
नेहेमीप्रमाणे माहितीपूर्ण प्रतिसाद. यामुळे धागा अधिक परिपूर्ण झाला आहे.
7 Feb 2014 - 3:02 pm | बॅटमॅन
या शिलालेखावर लेख लौकर येऊदेत.
संस्कृत भाषेत लिहिलेला सर्वांत पहिला मोठा शिलालेख म्हणून एकूण संस्कृत साहित्याच्या इतिहासातही याचे महत्त्व निर्विवाद आहे. शेल्डन पोलॉकने याची रोचक मीमांसा केलेली आहे.
7 Feb 2014 - 3:15 pm | प्रचेतस
लिहिन लवकरच.
याच्याच जोडीला कान्हेरीतला रूद्रदामन आणि सातकर्णीचे नातेसंबंधाचा उल्लेख असलेला शिलालेख देणे पण अगत्याचे होईल.
शेल्डन पॉलोकची मीमांसा कुठे वाचावयास मिळेल?
7 Feb 2014 - 3:20 pm | बॅटमॅन
शेल्डन पोलॉकची मीमांसा त्याच्या "लँग्वेज ऑफ द गॉड्स इन द वर्ल्ड ऑफ मेन" नामक पुस्तकात वाचावयास मिळेल. संस्कृत भाषा धार्मिक वाङ्मयातून अन्यत्र कशी वापरली जाऊ लागली, त्याच्या सुरुवातीची मीमांसा करणारा सुरुवातीचा एखाददुसरा च्याप्टर आहे. तुला दाखवेन कधी.
4 Feb 2014 - 11:49 am | पिवळा डांबिस
मला अनोळखी असलेल्या पुराणवस्तू संशोधकाचे नांव आणि त्याच्या कार्याची माहिती मिळाली. अनेक धन्यवाद.
बाकी गौतम बुद्धाचे अस्सल अवशेष पहाण्याची आणि त्या महामानवाच्या अवशेषांपुढे नतमस्तक होण्याची संधी सुदैवाने मला लाभली आहे...
मी स्वतः पूर्णपणे नास्तिक असूनही ते अवशेष पहातांना मनात एक विचित्र अशी भावना दाटून आल्याचं अजूनही स्मरण आहे...
4 Feb 2014 - 12:39 pm | प्यारे१
>>>गौतम बुद्धाचे अस्सल अवशेष
नेमकं काय होतं?
>>>>स्वतः पूर्णपणे नास्तिक असूनही
नास्तिक असणं नि भावनाशून्य असणं दोन वेगळ्या गोष्टी आहेत नि त्याबाबत स्वतःला समज असणं ही आणखी वेगळी गोष्ट.
माझा अधिकार नाही पण आपण ते संतुलन नेहमीच सांभाळता असा वाचनांती (योग्य) समज झालेला आहे.
4 Feb 2014 - 11:19 pm | पिवळा डांबिस
अस्थी होत्या. जपानहून आल्या होत्या...
कोणत्यातरी सामाजिक कार्यासाठी ते देणग्या गोळा करीत होते. म्हणून त्या अस्थी लोकांना दर्शनासाठी म्हणुन जगप्रवास करत ठेवत होते. आमच्या जवळच सॅटिकॉय इथे एक बौद्ध पॅगोडा आहे, तिथे दोन दिवस दर्शनासाठी ठेवल्या होत्या...
4 Feb 2014 - 1:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
एक अतिशय महत्वाच्या पण दुर्लक्षित भारतिय संशोधकाबद्दल उत्तम माहिती देणारा लेख ! अनेक धन्यवाद ! भारताच्या इतिहासाबद्दलचे अज्ञान आणि त्याच्याबद्दलची आपली उदासिनता अधेरेखीत झाली :(
या माहितीत जाणकारांनी अजून भर घातल्यास वाचायला खूप आवडेल.
4 Feb 2014 - 7:29 pm | कपिलमुनी
लेख अतिशय आवडला ..
धन्यवाद !
4 Feb 2014 - 7:54 pm | कैलासवासी सोन्याबापु
जबरदस्त आवडला :)
4 Feb 2014 - 8:32 pm | राही
@ इ. ए. आणि पि.डां., एकोणिसावे शतक हे महाराष्ट्र आणि भारताकरिता प्रबोधनाचे शतक होते. या काळी एकापेक्षा एक दिग्गज मंडळी आजूबाजूला वावरत होती. एकट्या मुंबईत बघितले तरी डॉ. भाऊ दाजी, जगन्नाथ शंकरशेठ, न्यायमूर्ति काशिनाथ त्रिंबक तेलंग. डॉ. शंकर पांडुरंग पंडित, न्यायमूर्ति वि.ना. मंडलिक, डॉ. जिवनजी जमशेदजी मोदी, रेव. डॉ. जॉन विल्सन, चंदावरकर, वागळे, दादाभाई नौरोजी, जमशेदजी जीजीभॉय, जांभेकर असे लोक न्याय, वैद्यक, प्राच्यविद्या, समाजसुधारणा, उद्योग, राजकारण या क्षेत्रात अफाट कर्तृत्व गाजवीत होते. पुण्यातली मांदियाळी आणखीनच आगळी. लोकहितवादी, म. फुले, रानडे, आगरकर, टिळक, गोखले, भांडारकर असे अनेक. तिकडे बंगाल्यातही तेच. या लोकांनी भारतीय पुनरुज्जीवनाचा पाया रचला. यातले कित्येक अन्संग हीरोज् आहेत, कित्येक विस्मरणात गेले आहेत. त्यांचे स्मरण हीच त्यांच्या प्रती कृतज्ञता.
4 Feb 2014 - 11:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१००
आणि म्ह्णूनच अश्या धाग्यांचे फार महत्व आहे. अश्यातर्हेने सगळ्यांकडून (काहींकडून कणाने तर काहींकडून मणाने) माहिती जमवून एका ठिकाणी सर्वांना उपलब्ध होईल अशी ठेवणे फार जरुरीचे आहे. नाहीतर वेळेबरोबर त्या महान व्यक्तींचे नाव आणि कार्य विस्मरणात जाईल आणि फार मोठा शास्त्रीय आणि सांस्कृतीक तोटा होईल.
*** सद्याचेच पहाना... आपल्यापैकी किती जणांना या सर्व प्रभृतींबद्दल खात्रीचे चार शब्द माहीत आहेत? मग पुढच्या पिढीचे काय म्हणावे? आणि मग त्यांनी पाश्चिमात्यांचा वरचढपणा सहजगत्या स्विकारला तर त्यांत आश्चर्य कसले?
4 Feb 2014 - 8:42 pm | स्वप्नांची राणी
बापरे...त्याकाळी जवळ जवळ दिडशे वर्षांपुर्वि कसला कठिण प्रवास केलाय त्यांनी!! आणि ते पण केवळ संशोधनासाठी! प्रवासातले हाल आणि आबाळ हेच त्यांच्या अवेळी मृत्युचे कारण असावे का?
पंडित भगवानलाल इंद्रजी यांचे बहुतांश संशोधन गुजरातीमधे प्रसिद्ध झाले आणि केवळ याच कारणामुळे ते कदाचित दुर्लक्षिले गेले. राजस्थानातही त्यांनीच प्रथम शोधलेल्या अशोककालिन पुरातन अवषेशांचे श्रेय त्यांना मिळाले नाहि कारण ते गुजराति दैनिकात प्रसिद्ध झाले आणि दुर्लक्षित राहिले.
संपुर्ण आयुष्य संशोधनाला वाहुनही पुरभिलेख संशोधन्क्षेत्रातिल श्रेय आणि प्रेय घेण्याच्या व्रुत्तिपासुन ते कटाक्षानि दूरच होते. त्यांच्या अंतिम ईछेवरुनही हेच दिसुन येते.
राहि, खुप छान लेख!
4 Feb 2014 - 8:47 pm | बिपिन कार्यकर्ते
सुंदर माहिती, अनेकांनी घातलेली भरही मोलाची!
धन्यवाद!
4 Feb 2014 - 9:58 pm | राही
१)पं. भगवानलाल आपल्या सर्वांना अपरिचित वाटत असले तरी पुरातत्त्व, नाणकशास्त्र आणि अंकशास्त्र, पुराभिलेखवाचन यांमधले त्यांचे काम अतिशय नावाजले आणि वाखाणले गेले आहे. कित्येक पाश्चात्य इंडॉलॉजिस्टसनी त्यांच्या गुजराती लेखांचे इंग्लिशमध्ये भाषांतर करवून घेतले. डॉ. जी ब्युह्लर या सुप्रसिद्ध जर्मन पुराभिलेखतज्ज्ञांनी स्वतः भगवानलालजींच्या अंकशास्त्र आणि जुनागढ कोरीवलेख विषयक लेखांचे इंग्लिश भाषांतर करून ते Indian Antiquary मध्ये छापले. डॉ. ऑलिवर कॉड्रिन्ग्टन (रॉयल एशिआटिक सोसायटी ऑव्ह बॉम्बे चे तत्कालीन ऑनररी सेक्रेटरी) यांनी पुष्कळशा लेखांचे भाषांतर करून सोसायटीच्या जर्नल्समध्ये छापले. परदेशात त्यांना अनेक सन्मान मिळाले. ते रहात होते त्या बाणगंगेनजिकच्या गल्लीला त्यांचे नाव दिले गेले.
२)अल्पायुषी म्हटले तर त्या काळी आयुर्मर्यादा फार कमी होती. आधीच्या माझ्या प्रतिसादात उल्लेखिलेल्या व्यक्तींपैकी फक्त मोदी आणि भांडारकर हेच दीर्घायुषी ठरले. बाकी सारे लोक वयाच्या पन्नाशीतच गेले. तेलंग आणि आगरकर तर त्याहूनही लहान वयात निवर्तले.
4 Feb 2014 - 10:28 pm | राही
'आयुर्मर्यादा'ऐवजी आयुर्मान हा शब्द योग्य झाला असता.
दीर्घायुषींमध्ये दादाभाईंचा समावेश करायचा राहिला.
5 Feb 2014 - 9:31 am | स्वप्नांची राणी
अर्थातच ग राही. राजस्थानातील सम्राट अशोकाचा शिलालेख त्यांनी आधी शोधला पण हे संशोधन गुजरातीतून प्रसिद्ध झाले. परिणामी त्यांन्च्या नंतर तिथे पोचलेल्या Archaeological Survey of India ला ह्या संशोधनाचे श्रेय मिळाले...म्हणजे ते त्यांनी ते लाटले असे म्हणुयात. http://www.hindustantimes.com/comment/columnsothers/buried-over-time/art... हि ती लिन्क. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले हे लिखाण आहे त्यामुळे ते कितपत खात्रिशिर असावे याची कल्पना नाही पण तिथे वाचुनच हे ज्ञान माझ्यासरख्या या विषयाच्या अतिसामान्य वाचकापर्यंत पोचलेय. विश्वसनिय असावे अशी आपली माझी समजुत.
बाकी पाश्चात्यानीच शोधलेल्या आंजामुळे (ओके ओके...शुन्य आपण शोधलाय!!..) माहितीचा ईतका विस्तृत खजिना उपलब्ध झालाय कि आता श्रेय लाटालाटीच्या भानगडि बहुतेक ईथुन पुढे ईतक्या सहजशक्य होणार नाहित.
पं. भगवानलाल यांना हे सन्मान मरणोत्तर दिल्या गेलेत का? तो काळ पाहता तसेच असावे असे वाटले.
4 Feb 2014 - 10:34 pm | अनुप ढेरे
लेख आवडला!
5 Feb 2014 - 12:03 am | बहुगुणी
(नेहेमीप्रमाणेच) अप्रतिम लेख! बरीचशी माहिती मला नवीनच आहे. प्रतिसादांतुनही खूप काही शिकायला मिळतं आहे. धन्यवाद!
(नालासोपार्याला गौतम बुद्धांचे नेमके काय अवशेष आहेत, आणि ते तिथे कसे आले? त्यांचं हे 'वसई-कनेक्शन' अजिबातच माहीत नव्हतं...)
7 Feb 2014 - 2:09 pm | पैसा
अजिबात माहिती नसलेल्या तपस्व्याबद्दल माहिती दिलीत. धन्यवाद!
8 Feb 2014 - 12:03 am | शशिकांत ओक
राहीजी,
पंडित भगवानलाल इंद्रजींच्या कार्याचा धावता आढावा सादर करून वैचारिक खाद्य पुरवल्याबद्दल धन्यवाद. शिवाय त्यात अनेकांनी विशेषतः वल्ली व बॅटमन यानी आपापल्या विचारधनाची भर घातल्याने भारदस्तपणा वाढला.