युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-१
युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-२
युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-३
युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-४
युद्धकथा १० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर......... भाग-५
युद्धकथा-१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - ६
.......................त्या शांततेचा भंग करत राईशफ्युरर हिमलर एकदम काल्टेनब्रुनरला म्हणाला, ‘ काल्टेनब्रुनर, कर्स्टननंतर तू एक तासही जिवंत राहिला नसतास !’ ते ऐकताच काल्टेनब्रुनरचा चेहरा पांढराफटक पडला. त्याला काय बोलावे ते कळेना.....................
‘तुम्हा दोघांनाही दीर्घ आयुष्य लाभावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही दोघेही मला हवे आहात. कुठल्याही प्रकारच्या अपघाताला मी क्षमा करणार नाही. डॉ. कर्स्टनला काही झाले तर तुझ्यासाठी ती वाईट बातमी असेल ! मला वाटते याहून स्पष्ट करुन सांगण्याची आवश्यकता नसावी.’
‘अजिबात नाही राईशफ्युरर !’ काल्टेनब्रुनर खाली मान घालून पुटपुटला.
कर्स्टनच्या या हत्येच्या प्रयत्नानंतर कर्स्टनला हिमलरची जास्त सहानुभूती मिळू लागली. तो या प्रयत्नात मेला असता या कल्पनेनेच हिमलरच्या अंगावर काटा आला. कर्स्टन म्हणजे त्याच्या जीवनमरणाचाच प्रश्न आहे हे त्याला उमगले. हे त्याला उमगले आहे हे उमगून कर्स्टनने स्वीडनची योजना पुढे काढली. या योजनेला हिमलरची परवानगी मिळविण्यासाठी त्याला झगडावे लागणार होते. हिमलरने कर्स्टनला याबाबतीत अनेकवेळा झिडकारले. पण ८ डिसेंबर १९४४ रोजी एका प्रसंगात कर्स्टनचा तोल सुटला व त्यामुळेच त्याला त्याच्या प्रयत्नात थोडे यश मिळाले असे म्हणण्यास हरकत नाही. जर्मनीमधे त्या काळात शब्दाला जागणे हे स्वत:च्या प्राणापेक्षाही महत्वाचे होते त्या काळात घडलेला हा प्रसंग आहे.
कर्स्टनचा एक मित्र होता ‘कार्ल वेंट्झेल’. या माणसाला हिटलरच्या हत्येच्या कटात सामील असल्याच्या संशयावरुन मृत्युद्ंडाची शिक्षा ठोठावून तुरुंगात डांबले गेले होते. त्याच्या गुन्ह्याचे स्वरुप बघता त्याला तुरुंगातून सोडता येणार नाही याबाबतीत दोघांचे एकमत झाले पण कर्स्टनने हिमलरच्या बोकांडी बसून त्याचा जीव वाचेल असे वचन घेतले. आता एका जर्मन पुढार्याचा तो शब्द असल्यामुळे कर्स्टन निश्चिंत झाला.
८ डिसेंबरला डॉ. कर्स्टनला त्याच्या मित्राला फाशी झाल्याची बातमी कळली आणि त्याचे डोके सरकले. पाय आपटत कर्स्टनने हिमलरच्या खोलीचे दार उघडले. राग अनावर झाल्यामुळे त्याच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या.
‘तुझ्या शब्दाची ही किंमत आहे तर ! एका जर्मन नेत्याची सभ्यता ती हीच का ?’ रागामुळे त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.
त्याचे बोलणे ऐकून हिमलरच्याही तोंडातून शब्द फुटेना. त्याला आत्तापर्यंत कोणी खोटारडा म्हटले नव्हते व या माणसाने ते धाडस केले होते. क्षणभर त्याला वाटले की याला ठारच मारावे.
‘माझ्यावर विश्वास ठेव मी खूप प्रयत्न केले पण हिटलरने त्याच्या फाशीत त्याचे वैयक्तिक लक्ष घातले होते’
कार्स्टनने मान हलविली व तो जाण्यासाठी वळाला.
‘कृपया जाऊ नकोस !’ हिमलर म्हणाला ‘जरा ऐक !’
कर्स्टन मात्र रागाने फणफणत बाहेरच्या खोलीत ब्रान्टजवळ जाऊन बसला.
‘जर हिटलरनेच ते ठरविले असेल तर कर्स्टन हिमलरच्या हातात काही करण्यासारखे उरले असेल असे मला वाटत नाही. जरा समजून घे !’ ब्रान्ट म्हणाला.
कर्स्टनलाही तोपर्यंत त्याने केवढी मोठ्ठी चूक केली होती हे उमजले होते. त्याने त्वरित हिमलरचा दरवाजा ठोठावला व हिमलरची माफी मागून म्हणाला,
‘हिटलरमुळे तुला तुझा शब्द पाळता आला नाही हे मी मान्य करतो. पण जेथे तुझी हुकमत चालते तेथे तू तो पाळशील अशी मी आशा करतो’.
‘कर्स्टन मी तुला तसा शब्द देतो’. असे म्हणून त्याने तेथेच पन्नास नॉर्वेचे विद्यार्थी, पन्नास डेनमार्कचे पोलिस यांची सुटका करण्यास मान्यता दिली. एवढेच नाही तर ३००० डच, फ्रेंच, बेल्जियन व पोलिश स्त्रियांची मुक्तता करण्याचे मान्य केले. सर्व स्कॅन्डेनेव्हियन कैद्यांना गोळा करुन जेथे दोस्तांची विमाने बाँबहल्ले करत नाहीत अशा विभागातील एका तुरुंगात ठेवण्याचेही मान्य केले. कर्स्टनच्या दृष्टीने हे मोठेच यश होते पण त्याला तेवढ्यावर थांबायचे नव्हते. त्याला स्वीडनमधून नुकताच निरोप आला होता की त्यांची २०००० ज्यूंना आसरा देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. हिमलर त्याला मान्यता देईल का ? त्याच्या मनात विचार चालू झाले.
‘तेवढे सोडून बोल ! हिटलरला जर ते समजले तर माझी जागेवरच हत्या होईल’ जेव्हा कर्स्टनने हा विषय हिमलरपाशी काढला तेव्हा तो म्हणाला. जेव्हा कर्स्टनने त्याला फारच पिडले तेव्हा तो म्हणाला,
‘ठीक आहे जास्तीत जास्त २००० ज्यू फारच झाले तर ३०००. यापुढे काही मागू नकोस !’
जवळजवळ दोन महिने हा विषय परत निघाला नाही. एका दिवशी जवळच्याच तुरुंगात २७०० ज्यू कैदी छळछावण्यात पाठविण्यासाठी गोळा करण्यात आले होते. त्यांची रवानगी करण्याच्या परवानगीचे कागद जेव्हा ब्रान्टने हिमलरसमोर ठेवले तेव्हा त्याच्या डोक्यात एकदम त्याने कर्स्टनला दिलेले वचन चमकले.
‘ब्रान्ट, किती म्हणालास २७०० ? ही आगगाडी स्वित्झरलंडकडे वळवा. त्यांना, आपल्या सीमेवरील सैन्याला व गेस्टापोंना तसे कळवा.’
या सर्व कैद्यांना स्विट्झरल्ंडच्या प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आले.
‘बरोबर २७०० ज्यू ! कमाल आहे ! जास्त नाही कमी नाही ! एका डॉक्टरची इच्छेसाठी !’ हिमलर म्हणाला.
जसा जर्मनीभोवती दोस्तांचा पाश आवळला जाऊ लागला तसे हिटलरच्या संतापाच्या झटक्यांमधे वाढ झाली. आगेकूच करणारे दोस्तांचे सैन्य छळछावण्यांपासून पाच मैलांवर आली की ते तुरुंग सुरुंगांनी उडवून लावण्याची आज्ञा हिटलरने हिमलरला दिली. या तुरुंगात सगळे मिळून आठ लाख कैदी असल्यामुळे दोस्तराष्ट्रांनी स्वीडनला हे हत्याकांड टाळण्याचे प्रयत्न करण्याची विनंती केली. कर्स्टनच्या एका स्टॉकहोमच्या भेटीत स्वीडनच्या मत्र्यांनी ही विनंती कर्स्टनच्या कानावर घातली. कर्स्टनने एका उपचारादरम्यान हा विषय काढला.
‘मी ऐकले आहे ते खरे आहे का ?
‘काय?’
‘तुला सर्व छळछावण्या उडवून लावण्याचे हुकूम मिळाला आहे ते ?’
‘हो! जर आम्ही युद्ध हरलो तर त्यांनाही आमच्याबरोबर मरावे लागेल!’
‘जर्मनीचा कुठलाही थोर नेता असा वागला नसता. आज तुझ्या हातात हिटलरपेझाही जास्त सत्ता आहे. तुझा शत्रू दरवाजात येऊन ठेपला आहे. विरोध करण्यास तुमचे सैन्य उरले नाही. जे काही उरले आहे ते म्हणजे एस् एस्.’
हिमलरने काहीच उत्तर दिले नाही. उत्तर देण्यासारखे काही नव्हते. कर्स्टन जे म्हणत होता ते सत्य होते व हिमलरला ते चांगलेच माहीत होते.
‘हे खरे असेल तर जरा औदार्य दाखव !’ कर्स्टन म्हणाला.
‘आणि त्यासाठी मला कोण शाबासकी देणार ?’ हिमलरने विचारले.
‘इतिहास ! या आठ लाख लोकांचे जीव तू वाचविलेस अशी नोंद इतिहासात होईल व ते पुढच्या पिढीत वाचले जाईल.’
हिमलरने खांदे उडविल्यावर कर्स्टनने तो विषय तेथेच सोडला पण दुसर्या दिवशी त्याने तोच विषय परत हिमलरपाशी काढला. आता त्याने आपल्या प्रयत्नात ब्रान्ट व शेलेनबर्गलाही सामिल केले. यावर आता रोजच चर्चा होऊ लागली. शेवटी एकदाचे, १२ मार्च १९४५ रोजी हिमलर या गोष्टीला तयार झाला व त्याने स्वअक्षरात एक मसूदा कागदावर तयार केला. एक आगळावेगळा करार जन्माला आला. त्याचे शिर्षक होते,
‘मानवतेशी करार’
१ छळछावण्या सुरुंग लावून उडविण्यात येणार नाहीत
२ यापुढे ज्यूंची हत्या होणार नाही
३ स्वीडनमधून ज्यू कैद्यांना टपाल व वस्तू पाठविण्याची मुभा देण्यात येईल
या कागदावर पहिल्यांदा हिमलरने सही केली व नंतर कर्स्टनने.
ही बातमी कर्स्टनने स्टॉकहोममधे संबंधितांच्या कानावर घातली. त्या निरोपात त्याने असेही म्हटले होते की त्याला जागतिक ज्यू काँग्रेसच्या प्रतिनिधीला हिमलरची भेट घालून देण्यासही परवानगी मिळालेली आहे.
‘अशक्य ! मला माहिती आहे तू तो प्रसिद्ध कर्स्टन आहेस पण तुलाही हे शक्य आहे असे मला वाटत नाही’ ख्रिश्चन गुंथेर म्हणाला. (स्वीडनचा परराष्ट्रमंत्री)
पण कर्स्टनला ते अशक्य नव्हते. या कराराबरोबर त्याने हिमलरकडून अजून ५००० ज्यूंची मुक्तता करण्याचा आदेश मिळवला आणि एक दिवस धाडस करुन त्याने हिमलरला स्पष्टच विचारले की त्याची एका ज्यूला या सर्व मुक्तताअभियानाबद्दल चर्चा करण्यास भेटायची तयारी आहे का. कर्स्टनला मनापासून वाटत होते की ज्या माणसाने ज्यूंच्या कत्तलींचे आदेश काढले होते त्यालाच या पुण्यकर्माचे श्रेय मिळायला हवे.
हिमलरने नेहमीप्रमाणे पहिल्यांदा कटकट केली व शेवटी होकार दिला. स्वत:पेक्षा जास्त इच्छाशक्ती असलेल्या माणसाचे ऐकणे ही आता हिमलरची मानसिक गरज बनली होती. ही भेट कर्स्टनच्या बर्लिनबाहेर असलेल्या फार्महाऊसवर ठरली. जागतिक ज्यू काँग्रेसने ताबडतोब त्यांचा एक प्रतिनिधी निवडला ज्याचे नाव होते नॉरबर्ट मसूर. या माणसाने त्याच्या बांधवांसाठी त्या काळात फार मोठा धोका पत्करला होता.
कर्स्टनने त्याची स्टोकहोममधे गाठ घेतली आणि १९ एप्रिलला त्यांनी हिमलरने पाठविलेल्या विमानाने बर्लिनला प्रस्थान ठेवले. बर्लिनवर त्यांचे विमान आले आणि त्यांना परिस्थितीची त्वरित जाणीव झाली. त्यांच्या स्वागताला रशियन तोफखाना हजर होता तर खाली बंकरमधे हिटलर मानसिक संतुलन गेलेला हिटलर काहीही आज्ञा देत सुटला होता.
ते हार्ट्झवाल्डेला मध्यरात्री पोहोचले. दोन तासांनी शेलेनबर्ग नागरी पोषाखात तेथे अवतरला.त्याच्या चेहर्यावर काळजी व चिंता दिसत होती. खचलेलाच वाटत होता तो. त्याने एक वाईट बातमी दिली की बोरमन हिमलरच्या मागे लागला होता की त्याने सर्व कैद्यांना संपवायची हिटलरची आज्ञा लगेच अमलात आणावी.
‘मला अशी भीती वाटते की हिमलर या दबावाला बळी पडेल व तशी आज्ञा देणार कारण हिमलरला बोरमन हिटलरच्या जास्त जवळ चाललाय असे वाटते. हिटलरची मर्जी राखण्यासाठी हिमलर काहीही करु शकतो’ नाझींचा अस्त होत असताना नेत्यांची ही आपापसातील चढाओढ बघून कुणाचेही मन विटले असते.
‘काहीतरी करुन हिमलरलकडून तो करार वदवून घेण्याची गरज आहे. पण समजा त्याने त्याचा शब्द फिरवला तर मी व ब्रान्ट त्याचे ते हुकूम बाहेर जाणार नाही याची काळजी घेऊ.’ शेलेनबर्गने त्याची कल्पना मांडली.
दुसर्या दिवशी सकाळी शेलेनबर्ग हिमलरला आणण्यासाठी शहरात गेला पण त्याने बातमी आणली की हिमलरला बराच उशीर होणार आहे कारण तो एका महत्वाच्या खाजगी कर्यक्रमात भाग घेणार आहे ‘हिटलरचा वाढदिवस’ कर्स्टन व मसूरने अस्वस्थतेत तो दिवस घालविला. अखेरीस रात्री हिमलर शेलेनबर्ग व ब्रान्टबरोबर आला. त्याने त्याची सर्व पदके त्याच्या काळ्या गणवेषावर परिधान केली होती व त्याचे बूट चमकत होते. त्याच्या चेहर्यावर कसलीही खळबळ किंवा युद्ध हरत आल्याची चिन्हे दिसत नव्हती. ते सगळे टेबलाभोवती बसल्यावर हिमलरने शांतपणे त्याची ज्यूंबद्दल मते मांडली व त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी काय करावे लागेल याची यादी मांडली.
कर्स्टन व मसूर शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होते. कर्स्टनला मसूरने त्याच्या रागावर जो ताबा मिळवला होता त्याचे कौतुक वाटले. पण जेव्हा हिमलरने ज्यूंना त्यांच्या रोगांपासून मुक्ती देण्यासाठी त्या छावण्यांमधे ठेवण्यात आले आहेत व रोगांचा फैलाव व्हायला नको म्हणून त्यांना जाळण्यात येत आहे असे सांगायला सुरुवात केली तेव्हा मात्र कर्स्टनने त्याचे भाषण मधेच तोडले.
‘आपण भूतकाळाबद्दल चर्चा करण्यास जमलेलो नसून लाखो जीव वाचविण्यासाठी काय करायचे हे ठरवूयात.’
‘बरोबर आहे. जे काही ज्यू आत्ता जर्मनीमधे उरले आहेत त्यांना तर वाचविता येईल.’ मसूर.
यानंतर लांबलचक चर्चा झाली. या अशावेळीसुद्धा हिमलरला हिटलरला हे सर्व कळेल व त्याचा शोध घेईल अशी भीती वाटत होती. शेवटी सकाळी सहा वाजता हिमलरने मसूरच्या योजनेला मंजूरी दिली.
स्वीडनमधे परतलेले ज्यू व त्यांना वाहून नेणार्या रेडक्रॉसच्या गाड्या.....
त्यानंतर थोड्याच वेळात कर्स्टन हिमलरला निरोप देण्यासाठी त्याच्याबरोबर त्याच्या गाडीपर्यंत गेला. थंडगार वारे सुटले होते व त्या वार्यात झाडांच्या फांद्या हलत होत्या. दोघेही न बोलता स्तब्द्ध होते. त्यांना माहीत होते की यानंतर ते परत भेटण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. गाडीचा दरवाजा उघडताना हिमलर कर्स्टनकडे वळत म्हणाला, ‘मी किती दिवस जगणार आहे हे मला माहीत नाही. पण मी एक वाईट माणूस होतो असा गैरसमज कृपया करुन घेऊ नकोस. मला माहीत आहे माझ्या हातून असंख्य चूका घडल्या आहेत पण हिटलरला मी निष्ठूरपणे त्याचे निर्णय राबवावे असे वाटत होते. नव्हे तशा मला आज्ञाच होत्या. पण ते जाऊ देत. आमच्या बरोबर जर्मनीचा उज्वल भविष्यकाळ भूतकाळात जमा होणार आहे !’ हिमलर गाडीत बसला व त्याने त्याच्या डॉक्टरचा हात हातात घेतला.
‘कर्स्टन तू जे काही माझ्यासाठी केले आहेस त्यासाठी मी तुझे आभार मानतो. मला माफ कर. मी माझ्या कुटुंबियांचे काय होणार या काळजीने ग्रासलो आहे.’
ज्या माणसाने आत्तापर्यंतच्या मानवी इतिहासात सगळ्यात जास्त कत्तलींचे हुकूम जारी केले होते त्या हिमलरच्या डोळ्यात तरारलेले अश्रू पहाटेच्या मंद प्रकाशात कर्स्टनला स्पष्ट दिसले.......
त्या गाडीचा दरवाजा लागला आणि थोड्याच वेळात ती त्या अंधारात गुडूप झाली..................
जर्मनीच्या बिनशर्त शरणागतीनंतर हिमलर अजूनही दोस्तांना सापडत नव्हता. जवळजवळ सगळे महत्वाचे नाझी नेते ताब्यात आले होते पण हिमलरचा पत्ता नव्हता. २१ मे रोजी एका ब्रिटिश तपासणी नाक्यावर एका माणसाला ताब्यात घेण्यात आले. त्याने त्याची ओळख हाइनरिश हिट्झिंगर असे सांगितले. त्याची एवढी चकचकीत व एकही चूक नसलेली ओळखपत्रे बघून ब्रिटिश सैनिकाला शंका आली. कारण हजारो जर्मन सैनिकांच्या कागदपत्रात काहीना काहीतरी उणीव सापडत असे. पण या माणसाच्या कागदपत्रात एकही चूक नव्हती. शेवटी तो हिमलर आहे हे निष्पन्न झाले. त्याने त्याच्या मिशा काढून टाकल्या होत्या व एका डोळा पट्टीने झाकला होता. त्याला पकडून एका छावणीत डांबण्यात आले. तेथे त्याने सायनाईडची कुपी चाउन आत्महत्या केली व न्युरेंबर्गच्या खटल्यातून स्वत:ची सुटका करुन घेतली.
न्युरेंबरगच्या खटल्यात गॉटलॉब बर्गरला २५ वर्षाची शिक्षा झाली. त्याला पाच वर्षांनंतरच सोडण्यात आले. शेलेनबर्गला सहा वर्षाची शिक्षा ठोठाविण्यात आली. त्यालाही दोन वर्षांनंतर सोडण्यात आले. तुरुंगातून बाहेर आल्यावर एका वर्षातच तो मृत्यु पावला.
रुडॉल्फ ब्रान्टवर न्युरेंबर्गमधे खटला चालविला गेला व त्याला दोषी ठरविले गेले कारण हिमलरच्या सहीबरोबर त्याच्या सह्या बर्याच आदेशांवर होत्या. कर्स्टनने त्याला वाचविण्याचे बरेच प्रयत्न केले पण शेवटी त्याला फासावर लटकविण्यात आले.
फेलिक्स कर्स्टन युद्धानंतर स्वीडनमधे स्थायीक झाला पण बराच काळ तो प्रकाशात आला नाही कारण शेवटी त्याने अनेक नाझी अत्याचार्यांवर उपचार केले होते. त्याची ही अवस्था बघून त्याच्या काही मित्रांनी त्याच्या युद्धकाळातील आयुष्याची चौकशीची मागणी केली. त्यात अर्थातच तो निर्दोष आढळला. उलट त्याच चौकशीत त्याने केलेले प्रयत्न उजेडात आले. १९४९ मधे त्याला सर्व संशयातून मुक्त करुन डच सरकारने त्याला राष्ट्रीय सन्मान प्रदान केला.
१९५३ मधे त्याला स्वीडनचे नागरिकत्व देण्यात आले व स्वीडनच्या परराष्ट्र खात्याने त्याच्या कामगिरीवर एक श्वेतपत्रीका काढून त्याचे जाहीर कौतुक केलच. स्टॉकहोममधे राहून त्याने परत एकदा जर्मनी, स्वीडन, हॉलंड व फ्रान्स्मधे आपले दवाखाने उघडले व रुग्णांची सेवा चालू केली.....
कर्स्टनने १९५७ मधेच त्याच्या आठवणी लिहिल्या पण त्या प्रकाशित झाल्या २००२ मधे. र्दैवाने त्याचा मृत्यु त्या अगोदरच झाला. १९६०च्या वसंतऋतूत फ्रान्स सरकारचा सर्वोचा बहुमान स्वीकारण्यास जात असताना या डॉक्टरचे तीव्र ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.........
ज्या पत्यावर ही कहाणी चालू झाली त्या इमारतीचे हे चित्र - एस एस् चे कार्यालय
समाप्त.
जयंत कुलकर्णी.
मित्रहो,
अशा रितीने ही दहा युद्धकथांची भली मोठी मालिका येथे संपली असे जाहीर करतो. या दहा युद्धकथांचे एक पुस्तक काढावे असा विचार आहे. .............:-) आता परत भेट केव्हा.......ते माहीत नाही.....
प्रतिक्रिया
12 Dec 2013 - 10:40 am | जेपी
मस्त लेखमाला झालि.
12 Dec 2013 - 11:01 am | लॉरी टांगटूंगकर
अप्रतीम लेखमाला. अतिप्रचंड आवडली.
परत लवकरच भेट व्हावी..
12 Dec 2013 - 4:54 pm | मी-सौरभ
सहम्त
12 Dec 2013 - 11:04 am | विनोद१८
श्री. जयन्त कुलकर्णी,
एव्हढी सुन्दर व सकस लेखमाला सादर केल्याबद्दल आपले शतशः आभार व धन्यवाद. !
पुन्हा पुन्हा वाचुन काढावे असे आपले लेखन असते हे निर्विवाद, आपली लेखनशैली ओघवती, उत्कन्ठा वाढविणारी, खिळवून ठेवणारी, आनन्द देणारी व उच्च दर्जाची हा माझा अनुभव.
याबद्दल आपल्याला मनापासून शुभेच्छा. ! पुस्तक काढाच.
असे का ????
पुन्हा आभार व धन्यवाद.
विनोद१८
12 Dec 2013 - 11:04 am | टिवटिव
सुंदर लेखमाला...
12 Dec 2013 - 11:10 am | मुक्त विहारि
"आता परत भेट केव्हा.......ते माहीत नाही....."
हे मात्र नामंजूर....
तुम्ही आणि तुमच्या सारखी असंख्य मंडळी इथे लिहीता म्हणून तर माझ्या सारखी मंडळी इथे टिकून आहेत.
त्यानुळे निदान आमच्या सारख्या वाचकांसाठी तरी लिहा, ही जाहीर विनंती आहे.
12 Dec 2013 - 11:53 am | अनिरुद्ध प
+१११ पुर्णपणे सहमत
12 Dec 2013 - 11:55 am | जयंत कुलकर्णी
म्हणजे लिहिण्यासारखे काही मिळाले तर लिहिणार ना.....
12 Dec 2013 - 11:12 am | पद्माक्षी
आभार एका सुन्दर लेखमालेबद्दल..
12 Dec 2013 - 11:12 am | आनन्दा
मी ही लेखमाला पहिल्यापासून वाचत होतो. छानच आहे. पुस्तक काढाच. पहिला नंबर माझा असेल.
12 Dec 2013 - 11:40 am | अर्धवटराव
नुसती लेखमाला वाचतानाच कसंनुसं होत होतं... तुम्ही तर या सगळ्याचा अभ्यास करता, त्यावर मनन चिंतन करता. आणि कुठलाही अभिनिवेष न आणता शक्य तेव्हढं न्युट्रल राहुन हा जहाल इतीहास आमच्या पुढे ठेवता. हॅट्स ऑफ्फ टु यु सर.
12 Dec 2013 - 11:55 am | जयंत कुलकर्णी
सर्व वाचकांचे येथे जाहीर आभार मानतो............:-)
12 Dec 2013 - 12:14 pm | मृत्युन्जय
लेखमाला मस्त रंगली. पुढच्या लेखमालेच्या प्रतिक्षेत
12 Dec 2013 - 2:17 pm | सौंदाळा
जबरदस्त लेखमाला
दंडवत स्वीकारा.
12 Dec 2013 - 2:38 pm | मोदक
अप्रतीम लेखमाला. आवडली..!!!!
पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत. अमेरीका रशीया शीतयुद्धावर लिहाल प्लीज..?
12 Dec 2013 - 4:19 pm | कवितानागेश
भारल्यासारखे सगळे भाग परत वाचून काढलेत.
भीषण काळ होता तो. कर्स्टनचे कौतुक आहे खरोखरच.
ब्रान्टला फाशी दिली गेली हे वाचून फार वाईट वाटलं...
12 Dec 2013 - 5:10 pm | प्रचेतस
अत्यंत सुरेख लेखन.
धन्यवाद जयंतकाका या लेखमालेबद्दल.
12 Dec 2013 - 5:27 pm | चावटमेला
एवढ्या सुंदर लेखमालिकेसाठी आभार आणि अभिनंदन.
12 Dec 2013 - 5:41 pm | Dhananjay Borgaonkar
_/\_ जबरदस्त.
पुस्तकासाठी शुभेच्छा.
12 Dec 2013 - 6:19 pm | मधुरा देशपांडे
इतक्या सुंदर लेखमालेसाठी मनःपूर्वक आभार.
12 Dec 2013 - 6:21 pm | प्यारे१
>>> आता परत भेट केव्हा.......
आरामात होऊ द्या. असल्या लिखाणाने शीण जाणवणारच. आम्हाला नुसतं वाचून दडपायला होतं.
-पुढची चांगली मालिका येणार ह्याबद्दल निश्चिंत असलेला प्यारे
12 Dec 2013 - 6:22 pm | लाल टोपी
क्रौर्याची परिसीमा गाठणा-या काळात प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून माणूसकीचा झरा वाहत ठेवणा-या कर्स्टनला खरोखरीच मानाचा मुजरा..
जयंतजी अफलातून लेख मालीका प्रचंड आवडली.. मात्र अशाच घडमोडींवर आपले लेख वाचत रहायला आवडेल.
12 Dec 2013 - 8:53 pm | जुइ
सग्ळे भाग वाचले.त्याकाळात असेही काही लोक होते हे पाहुन चांगले वाटले.परंतु ब्रान्टला फाशी दिली गेली हे वाचून फार वाईट वाटलं. तुम्ही पुस्तक अवश्य लिहा!!
12 Dec 2013 - 9:08 pm | वाटाड्या...
सगळ्या मालिका आवडल्या. अप्रतिम ओघवत्या भाषेत लिहील्या आहेत. जणु काही आपण त्या त्या पात्रांबरोबरच त्या त्या प्रसंगात आहोत असं वाटत होतं. मला वाटत यातच लेखमालिकेचं यश आहे. पु.ले.शु.
- वाट्या..
12 Dec 2013 - 9:30 pm | पिंगू
अप्रतिम लेखमाला. सुरुवातीपासून वाचतच होतो..
12 Dec 2013 - 10:07 pm | जानु
"युध्दस्य कथा रम्या" हे फक्त वाचणार्या व्यक्ती साठीच लागु असते. त्यातील पात्रास मात्र ती जीवघेणी असतात.
12 Dec 2013 - 10:36 pm | आबा
जयंत साहेब, कथा आवडली.
पुस्तकाकरीता शुभेच्छा
13 Dec 2013 - 1:05 am | खटपट्या
धन्यवाद सर,
पुस्तक काढाच, संग्रही ठेवण्यासारखे होईल
13 Dec 2013 - 1:38 am | यशोधरा
सुरुवातीपासून लेखमाला वाचत आहे. केवळ सुरेख.
15 Dec 2013 - 12:06 pm | डॉ.प्रसाद दाढे
खूप आवडले सर.. पण काही शंकासुद्धा आहेत. कर्स्टनने मदत नक्कीच केली असणार पण थोडीशी अतिशयोक्तिसुद्धा वाटत आहे. जर त्याने एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर ज्यू वाचविले होते तर त्याला युद्ध संपल्यावर दोस्त राष्ट्रांनी विशेषकरून इस्त्रायलने डोक्यावरच घ्यायला हवे होते. गूगलवरसुद्धा ही शंका व्यक्त केली आहे. अर्थात इतिहास लेखन हा प्रकार फार क्वचितच प्रांजळपणे व त्रयस्थ दृष्टिकोनातून केला जातो. अगदी ह्यात अमेरिकन वा ब्रिटिश इतिहासकारसुद्धा अपवाद नाहीत. डिस्कव्हरी हिस्टरी चॅनल्सवरच्या कितीतरी डॉक्युमेंटरी पाहताना हे सहज उमजून येते. दोस्त राष्ट्रांना मोठे करण्यासाठी अगोदर जर्मनी किती शक्तिशाली आणि तितकाच क्रूर दाखवायचा मग नंतर देवदूतासारखे दोस्त सैन्य (त्यातही शक्यतो अमेरिकनच.. इतर अनेक जसे फ्रेंच, ऑस्ट्रेलियन, न्यूझीलंड्स, भारतीय सैनिकांच्या शौर्याला अश्या माहितीपटांमध्ये फारसे स्थान नसते) अवतरते आणि मग परिकथेच्या शेवटासारखा आनंदीआनंद होतो. मी जर्मनीच्या वा हिटलरच्या क्रूरतेची भलावण करत नाही पण तथाकथित दोस्त राष्ट्रांचे (इंग्रज आपले दोस्त नव्हतेच, आपण त्यांचे गुलाम म्हणूनच दुसर्या महायुद्धात पहिल्या दिवसापासून होतो) मातीचे पाय कधीच दाखविले जात नाहीत ह्याबद्दल माझा आक्षेप आहे.
19 Dec 2013 - 5:56 am | जयंत कुलकर्णी
माझी जनरल होमाची कथा आपण वाचली असेल तर.......
15 Dec 2013 - 12:07 pm | सचिन कुलकर्णी
शेवटी कर्स्टनचा उचित सन्मान झाला हे वाचून बरे वाटले. __/\__ .
15 Dec 2013 - 12:20 pm | विजुभाऊ
सुंदर लेखमाला. खूप चांगली माहिती मिळाली
18 Dec 2013 - 6:16 pm | मंदार दिलीप जोशी
अप्रतीम
19 Dec 2013 - 11:44 am | सुहास झेले
नेहमीप्रमाणे अप्रतिम :) :)
19 Dec 2013 - 12:42 pm | वैनतेय
पुस्तक काढाच, संग्रही ठेवण्यासारखे होईल
16 Jan 2014 - 1:46 am | अलगुज
अतिशय उत्तम लेखन शैली. वाचकाला पकडून ठेवण्याची ताकद नक्कीच आहे. ह्या आधीच्या कथांच्या links एकत्र मिळतील का कुठे?
4 Feb 2014 - 5:54 am | श्रीरंग_जोशी
जयंत कुलकर्णी यांचे सर्व लेखन - http://www.misalpav.com/user/9199/authored
4 Feb 2014 - 3:51 am | भ ट क्या खे ड वा ला
अतिशय सुंदर ,लेखमाला.
शतश : धन्यवाद .
6 Apr 2016 - 10:29 pm | urenamashi
sundar lekhmala ... Asech lihit raha ....trvar vandan tumhala