मौजे चढेवाडी, जातिवंत प्रतिनिधीकडून: देशातल्या पहिल्या आणि एकमेव सरकारमान्य महिष्यौच्चवंशरेतन केंद्राचे काल मौजे चढेवाडी येथे भव्य उद्घाटन झाले. आपल्या म्हशींच्या पोटी जातिवंत अवलादी पैदा व्हाव्यात म्हणून व्याकुळ झालेल्या पंचक्रोशीतल्या शेतकर्यांना यामुळे फार मोठा आधार मिळाला आहे असे मानले जाते. हे केंद्र उभारले जाईल असे माननीय खासदार श्री. गोरक्षनाथ गोर्हे यांनी गेल्या निवडणुकीत दिलेले आश्वासन अशारितीने पूर्ण करून आपल्या समाजसेवेच्या व्रताचे उदाहरणच लोकांसमोर ठेवले आहे असे चढेवाडीचे सरपंच माननीय श्री. सखाराम दामोदर चढे यांनी आवर्जून सांगितले. यापूर्वी चांगल्या वाणाच्या बीजाची पंचक्रोशीत वानवाच होती आणि स्थानिक हल्यांच्या पैदाशीवर लोकांना अवलंबून राहावे लागत असे; परंतु या केंद्रातल्या उच्च तंत्रज्ञानाने बनवलेल्या अतिकार्यक्षम शीतगृहामुळे उच्चवंशाच्या हल्यांचे बीज वर्षभर जतन करणे व तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या हल्यांच्या अनुपस्थितीतही म्हशींचे रेतन करणे सुलभ झाले असून पंचक्रोशीतल्या सगळ्या म्हशींना आता त्याचा लाभ होईल असेही ते म्हणाले. अतिशय जास्त मागणी असलेल्या पैठणी व ब्याण्णवकुळी या दोन जातींच्या रेड्यांचे वीर्य या वीर्यसंचयनीत उपलब्ध असेल असे कळते.
या प्रसंगी सुप्रसिद्ध गर्भहुंकारफेम सौ. सोनाली तांबे व सातारचे सुप्रसिद्ध गोठापती श्री. रेवणनाथ डेबूजी म्हस्के यांनीही उपस्थित राहून महिषीपालकांना मार्गदर्शन केले. पैठणी जातीच्या रेड्यांची माहिती सांगताना सौ. सोनाली तांबे भावुक झाल्या होत्या. "प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांना वेद घडाघडा म्हणून दाखवणारा पैठणचा रेडा हा या वंशाचा आदिपुरुष. अत्यंत सात्त्विक अशी ही जात असून यातले काही रेडे आपल्या पांढुरक्या रंगामुळे अत्यंत तेजःपुंज दिसतात. या जातीचे रेडे इतर जातीच्या रेड्यांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात असे माझे निरीक्षण आहे.", असे त्या म्हणाल्या.
त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल अधिक विचारले असता त्या म्हणाल्या, "यावर अधिक संशोधन सुरु आहे पण या रेड्यांची स्मरणशक्ती अतिशय तल्लख असून एकदा एका रस्त्याने गेल्यावर तो रस्ता त्यांच्या लगेच लक्षात राहतो. शिवाय मालकाच्या मनःस्थितीप्रमाणे वागणे व मालक बदलल्यास नव्या मालकाशी जुळवून घेणे या बाबतीत हे रेडे अतिशय चलाख असतात. मुख्य म्हणजे आपणच बुद्धिमान आहोत अशी जाणिव व अभिमान या जातीतल्या काही रेड्यांना असतो, त्यामुळे इतर सामान्य रेड्यांना यांच्या बरोबरीने गोठ्यात जागा दिल्यास त्यांच्या सात्त्विक भावात उणिव निर्माण होण्याचा धोका असतो."
पैठणी रेड्यांच्या बीजारोपण प्रक्रियेबद्दलही त्यांनी माहिती दिली. "गर्भहुंकारच्या माध्यमातून आम्ही या रेड्यांच्या बीजाचे सिंचन करून उत्तम महिषीसंतती निर्माण करण्याची प्रक्रिया विकसित केली आहे. कोणत्याही महिषीच्या गर्भाशयात या रेड्याचे वीर्य टाकण्याची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे ब्राह्ममुहूर्ताची होय. यावेळी या रेड्यांच्या शुक्रजंतूंमध्ये अष्टसात्त्विक भाव असतात व त्यांचा वेगही स्त्रीगर्भधारणेसाठी योग्य असा असतो. या वेळी रेतन करताना गोठ्यात गायत्री मंत्राचे पठण केल्यास होणारी संतती निरोगी, तेजःपुंज व बहुदुधी निपजते असे आमचे प्रयोग सांगतात. या रेड्यांच्या शुक्रजंतूंना समजेल अशा आवाजातल्या गायत्री मंत्राच्या सीडीजही या केंद्रात विक्रीस उपलब्ध आहेत.", असे त्या म्हणाल्या.
श्री. म्हस्के यांनी ब्याण्णवकुळी जातीच्या रेड्यांचा रोचक इतिहास खुलवून सांगितला. "देवगिरीच्या रामदेवराव यादवाची तिसरी मुलगी लहानपणापासून आपलं एक लाडकं रेडकू खांद्यावर घेऊन रोज सकाळी देवगिरीचा किल्ला चढून जाण्याचा व्यायाम करत असे. मुलगी वयात आली आणि रेडकाचा रेडा झाला तरी तो क्रम चुकला नाही. पुढे युद्धात देवगिरीचा पाडाव झाला आणि अल्लाउद्दीन खिल्जीचे सैनिक यादवांच्या आया-बहिणींची इज्जत लुटण्यासाठी धावत किल्ल्यात शिरले तेव्हा त्यांना रेडा खांद्यावर घेऊन जाणारी ही मुलगी दिसली आणि ते अक्षरश: स्तंभित झाले. तेवढ्या वेळात किल्ल्यावरच्या सगळ्या स्त्रियांना जोहार करायला अवधी मिळाला आणि त्यांची इज्जत वाचली. रेडाही त्या सैनिकांशी लढता लढता वीरगतीस प्राप्त झाला. परंतु युद्धापुर्वी हा रेडा रामदेवरावाच्या प्रिय व इमानी ब्याण्णव सरदारांच्या ब्याण्णव म्हशींना लावण्यात आला होता आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्या प्रत्येक म्हशीला हुबेहुब त्या रेड्यासारखा दिसणारा रेडाच झाला. तेव्हापासून ही ब्याण्णवकुळी जात निर्माण झाली."
"अतिशय राजबिंडी, निधड्या छातीची, रागीट व टोकदार शिंगांची ही जात आहे असे आमचे निरीक्षण आहे. मालकाव्यतिरिक्त इतर कोणाही व्यक्तीने यांच्या गोठ्यात शिरताना आपले डोके यांच्या उंचीपेक्षा जास्त वरती जाणार नाही याची दक्षता घेत झुकून जायचे असते व यांच्या डोळ्याला डोळा भिडणार नाही याचीही काळजी घ्यायची असते.", असे ते म्हणाले.
"या रेड्यांची त्वचा कुळकुळीत व चमकदार काळी असते आणि यांच्या बीजात कोणतीही जर्सी भेसळ नसल्याने त्यांच्यात पांढुरकेपणा नसतो.", असा टोमणाही त्यांनी मारला.
या रेड्यांच्या बीजारोपण प्रक्रियेबद्दल माहिती देताना ते म्हणाले,"हे रेडे स्वभावतःच वीरश्रीयुक्त असल्याने सतत फुरफुरत असतात. स्वतःच्या वंशाचा यांना रास्त अभिमान असल्याने यांना रेडकू होण्याचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. रेडकाऐवजी रेडी झाल्यास हे अत्यंत नाखूश होऊन अनावर होऊन हल्ला करू शकतात, पण आता कृत्रिम रेतन असल्याने तो धोका नाही. रेडीच हवी असल्यास बीजारोपण प्रक्रियेच्यावेळी कोणत्याही प्रकारचे वीरश्रीयुक्त संगीत म्हणजे पवाडा किंवा तुतार्यांचे आवाज यांच्या शुक्रजंतूंना ऐकू येणार नाही याची काळजी घ्यावी; आसपास तलवारी, भाले, बंदुका किंवा स्कॉर्पिओ गाडी नसेल याची काळजी घ्यावी. शक्यतो मध्यरात्रीच्या नीरव शांततेत कार्यभाग उरकल्यास उत्तम. बीजारोपण करताना म्हशीने संपूर्ण डोके झाकले जाईल असा चादरीचा पदर घेणे आवश्यक आहे. यांच्या शुक्रजंतूंना असा कुठलाही आवाज ऐकू येऊ नये वा शस्त्रास्त्रे दिसू नयेत म्हणून आम्ही विकसित केलेली अपारदर्शक व ध्वनिनिरोधक रेतन यंत्रे या केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध आहेत."
उद्घाटनाचा कार्यक्रम चालू असतानाच बाहेर अनेक म्हशींची रांग लागलेली दिसत होती. आम्ही रांगेत ताटकळणार्या महिषीपालकांशी बातचीत केली. बहुतेक सगळ्यांनीच अशा जातिवंत रेड्यांचे बीज मिळणार म्हणून आत्यंतिक संतोष व्यक्त केला. पैठणी किंवा ब्याण्णवकुळीच का असे विचारले असता श्री. दुष्यंत धनाजी खुळे नावाचे महिषीपालक म्हणाले, "आमच्या परंपरेत या गोष्टी चालत आलेल्या आहेत. मोठ्यांच्या तालेवार घरी या जातीच्या रेड्यांच्या अवलादींना वाढताना आम्ही पाहिलेलं आहे. कशी गोजिरवाणी दिसतात. आमच्या म्हशींनापण अशीच गोजिरवाणी लेकरं व्हावी असं आमच्या बापजाद्यांना वाटायचं. आता आम्हाला ती संधी चालून आली आहे. म्हणून आम्ही या जातिवंत रेड्यांचेच बीज घेणार, मग बघा आमची म्ह्सरं कशी तगडी आणि हुशार होतात ते."
नीट खाऊ-पिऊ घातलं तर सगळीच म्हसरं तगडी होणार नाहीत का असे विचारल्यावर "काय येडे का खुळे तुम्ही" असे म्हणून ते चालू लागले.
चढेवाडीच्या प्राथमिक शाळेचे विद्यार्थीही कार्यक्रमाला आलेले दिसत होते. त्यांचे शिक्षक श्री. पावन टिकोजी टाके यांच्याशी संपर्क साधला असता, "विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या प्रगतीचे महत्त्व कळावे म्हणून मी त्यांना इथे घेऊन आलो आहे.", असे ते म्हणाले. "विज्ञानाने सकल समाजाचे कल्याण होत आहे. गरिबाच्या घरी कल्पवृक्षाप्रमाणे विज्ञान येऊन ठाकले आहे. लवकरच विज्ञान-तंत्रज्ञानाने सर्व प्रश्न सुटतील असा मला विश्वास वाटतो." असे त्यांनी सांगितल्यावर शाळेतील सर्व मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
केंद्राच्या समोरच्या रस्त्यापलीकडे मात्र काही लोक पोलिस बंदोबस्तात उकिडवे बसलेले होते. सरपंचसाहेबांनी त्यांचा म्होरक्या भिक्या धनगराची भेट घेतली तेव्हा त्याने आपले गार्हाणे त्यांच्याकडे मांडले.
"एवढासा होता तवापासून प्वाटच्या पोरावानी सांबाळला मी त्याला, या हातानी जोंधळा भरिवला मी त्याला. त्याला बगून आमच्या म्हशी येड्या व्हतात असा दिस्तो तरणाबांड माजा राजा; पन या लोकास्नी खूळ लागलंया खूळ. या लोकान्ला पैठनी आन् ब्यान्नवकुळीच पायजेत भले मंग नळ्या घालून का व्हईना! मनभर दूध देत्यात आमच्याबी म्हशी पन आमच्या राजाला हे काऊन हल्का समजू राह्यले बरं?", असे तो म्हणाला.
चढेवाडीच्या महिष्यौच्चवंशरेतन केंद्राबद्दल अधिक माहितीसाठी संपर्कः
maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13158217.cms
प्रतिक्रिया
24 Nov 2013 - 1:51 pm | प्यारे१
ननि,
रितसर प्रिंटाउट काढून बसला होतात काय 'ज्ञानसाधने'ला?
नाई, तुमची लि़ंक डायरेक्ट प्रिंट काढा म्हणतेय! ;)
बाकी लेख चान चान! गायत्री वगैरे टाळता आले तर बघा जरा.
24 Nov 2013 - 2:16 pm | नगरीनिरंजन
लिंक दुरुस्तीस टाकली आहे.
बाकी काय काढायचं आणि काय ठेवायचं यासाठी संपादकांशी संपर्क साधावा ही विनंती.
25 Nov 2013 - 1:11 am | विश्वनाथ मेहेंदळे
का ???
27 Nov 2013 - 12:32 pm | प्यारे१
गायत्री मंत्राचा उल्लेख न करता आणखी काही वापरता आलं असतं असं वैयक्तिक मत आहे. टाळावा हा निव्वळ एक सूचनावजा सल्ला होता. तरीही उगाच्च स्वतःचा अभ्यास दाखवण्यासाठी लेखाचा फोकस दुसरीकडे वळवण्याचा कोणताही मानस अथवा हेतू नव्हता, नाही, नसेल. लेखकाचं मत आलेलं आहेच. त्यानुसार आवश्यक वाटल्यास संपादकांना सांगता येण्याचा पर्याय खुला आहेच. कुणालाही अनुचित वाटल्यास संपादकांना सांगून देखील माझा प्रतिसाद संपादित करता येईलच.
24 Nov 2013 - 2:04 pm | बॅटमॅन
लेख उत्तम =))
अन काडीची विनोदबुद्धी नसलेल्या सांस्कृतिक तालिबान्यांना फाट्यावर मारणेच उत्तम.
24 Nov 2013 - 2:20 pm | पैसा
जबरदस्त लिहिलंय! सुरुवातीपासून ते शेवटच्या लिंकपर्यंत!!
24 Nov 2013 - 3:16 pm | चित्रगुप्त
अलिकडेच अमेरिकेतील म्हैषाचुस्टेट्स युनिव्हर्सिटीत झालेल्या संशोधनानुसार याकामी 'गाय'त्री मंत्रा ऐवजी 'म्हैसत्री' मैत्र जास्त पॉवरर्फुल असल्याचे सिद्ध झालेले आहे. सदर मंत्राच्या सीड्या लवकरच चीनमधून भारतात येत आहेत.
24 Nov 2013 - 3:25 pm | बॅटमॅन
निव्वळ थोर =))
काका, खपल्या गेले आहे _/\_ साष्टांग दंडवत.
24 Nov 2013 - 4:07 pm | अत्रुप्त आत्मा
@'म्हैसत्री' मैत्र जास्त पॉवरर्फुल असल्याचे सिद्ध झालेले आहे>>>
24 Nov 2013 - 4:10 pm | बॅटमॅन
म्हैषाचुस्टेट्स सुद्धा तितकेच जबरी!!!
24 Nov 2013 - 4:19 pm | पाषाणभेद
प्रिय चित्रगुप्त साधक,
सदरहू मंत्र म्हैस-त्री मंत्र असा नसून महिषीत्रीमंत्र असा आहे.
पुढे वाचा....http://www.misalpav.com/comment/338404#comment-338404
24 Nov 2013 - 4:23 pm | बॅटमॅन
निव्वळ धन्य _/\_
24 Nov 2013 - 4:13 pm | प्यारे१
=))
ह्याला आमचा विरोध नाही.
-तालिबानी प्यारे ;)
24 Nov 2013 - 3:40 pm | इष्टुर फाकडा
काय सटायर आहे ! ननि चरणांचा फोटो पाठवून द्या :)
24 Nov 2013 - 4:27 pm | पाषाणभेद
+१ खंग्री म्हणजे काय खंग्रीच!
24 Nov 2013 - 5:19 pm | टवाळ कार्टा
:)
24 Nov 2013 - 5:27 pm | प्रभो
हुच्च!!!
24 Nov 2013 - 5:29 pm | तिमा
हाण तिच्यायला! जबरी जोडे मारले आहेत राव.
ते पैठणी अंमळ बावन्नखणी च्या वळणाने वाटतंय बगा!
24 Nov 2013 - 5:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
24 Nov 2013 - 6:20 pm | भीडस्त
>>रेडकाऐवजी कालवड झाल्यास हे अत्यंत
नाखूश होऊन अनावर होऊन हल्ला करू शकतात,<<
नाखूश नाय व्हतीन त मंग काय व्हतीन सोयरं....
म्हसाडाला कालवड कुढं व्हत आस्ती का राव...
त्ये डोबाड येक तं टोणगा देयीन नाहयतं पारडू तरी....
म्हशीला कालवड म्हयी लयीच फापाललो ना राव...
बाकी लेख मात्र य्येक लंबर....
पिढ्यानपिढ्यांचा पांढरपेशा मावळी शेतकरी
25 Nov 2013 - 4:14 am | इष्टुर फाकडा
तेवढंच थोडं दाताखाली खडा आल्यागत टोचलं, पण दुर्लक्ष करता येण्याजोगं.
27 Nov 2013 - 3:27 pm | नगरीनिरंजन
पारडी शब्द काय आठवला नाय गड्या हो.
सगळं आयुष्य शहरात गेल्यावर कालवड शब्द आठवला हेच काय कमी आहे?
बाकी म्हैस म्हणजे प्रतिसृष्टीतली गाय आणि पारडी म्हणजे प्रतिसृष्टीतली कालवड असं पुराणात म्हटलेलंच आहे ना!
27 Nov 2013 - 3:44 pm | बॅटमॅन
रिअली? रेफ्रन्स बघायला आवडेल, कारण इतर ग्रंथांच्या तुलनेत माझे पुराणांचे वाचन अगदीच तुटपुंजे आहे.
27 Nov 2013 - 3:53 pm | पैसा
विश्वामित्र त्रिशंकूसाठी प्रतिसृष्टी निर्माण करायला गेला त्यात मूळ वस्तूंच्या बिघडलेल्या प्रतिकृती तयार झाल्या असं काहीसं वर्णन आहे.
27 Nov 2013 - 3:58 pm | बॅटमॅन
धन्यवाद. विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली इतपत ऐकून होतो पण त्यापुढचे डीटेल्स माहिती नव्हते.
27 Nov 2013 - 6:22 pm | प्रचेतस
असे काही नाही.
त्रिशंकूचा उल्लेख रामायणात आला आहे. त्यात बिघडलेल्या प्रतिकृतींचे वर्णन कोठेही नाही. उलट विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीमुळे सर्व देवता, असूर, ऋषीलोक लै घाबरले आणि विश्वामित्राला शरण गेले आणि त्यांनी ती नक्षत्रे तशीच ठेवून त्यात खाली डोके केलेल्या त्रिशंकूला प्रकाशमान ठेवण्यात अनुमती दिली.
हा पहा खाली डोके केलेला त्रिशंकू (crux)
चित्र विकीपेडियावरून
27 Nov 2013 - 6:47 pm | पैसा
कोणत्या पुराणात आहे माहित नाही पण माझ्या आईकडून त्रिशंकूची गोष्ट ऐकली होती तिच्यात असंच सांगितलं होतं. लोकांमुखी अशा कथा गंमतीदार स्वरूपात रहातात.
27 Nov 2013 - 6:58 pm | प्रचेतस
रामायण.
बालकांड, सर्ग ६०
http://www.sacred-texts.com/hin/rama/ry060.htm
25 Nov 2013 - 4:02 am | स्पंदना
गुण विशेष आणखी थोडे घालता आले असते. पण राहू दे.
सगळ कस टप्प्या टप्प्याने व्हावं नाही का?
ननी रॉक्स!
27 Nov 2013 - 7:07 pm | कवितानागेश
भारी. :)
27 Nov 2013 - 8:34 pm | मंदार कात्रे
लई भारी गड्या !
;)
28 Nov 2013 - 11:03 am | मृत्युन्जय
लेख भारीच.
फक्तः
बीजारोपण करताना म्हशीने संपूर्ण डोके झाकले जाईल असा चादरीचा पदर घेणे आवश्यक आहे.
हे नक्की कशाचे विडंबन होते ते झेपले नाही.
28 Nov 2013 - 12:56 pm | सुहास..
ही ही ही ही