ब. र. ता.
दिनांक : 8 जानेवारी 2045
प्रिय मित्रा ,
आज 8 जानेवारी 2045. बघता बघता ८० वय झाले . जुलै २०१३ साली तारेची अखेर झाली आणि २०२३ साली पोस्ट ऑफिस चे ब्यान्केत रुपांतर झाले . पत्र पाठवणे वगैरे कालबाह्य झाले म्हणून सरकारने पोस्त ऑफिसच बंद करायचा निर्णय घेतला . इमेल चा पण जमाना आता गेला . जुन्या दिवसांची खूप आठवण येते .
वीस वर्षांपूर्वी तुमची सर्व फ्यामिली ऑस्ट्रेलियाला स्थाईक झाली . त्यानंतर आपला फार काही संपर्क राहिला नाही . नाही म्हणायला कधी कधी माझ्या वाल स्क्रीन वर तुम्ही संदेश पाठवता . पण क्वचितच. vidio chatting साठी मी तुम्हाला पकडायचा प्रयत्न करतो,पण तुम्ही खूप रात्री मला स्क्रीन वर दिसता . नशीब काही जवळच्या मित्रांना (च) तुमच्या क्यामेराचा access दिलाय. पण खूप रात्र झाल्यामुळे मला तुम्हाला डिस्टर्ब करणे प्रशस्त वाटत नाही. तुम्हाला इतरही कामे असतात. मी रिकामा म्हणजे जग रिकामे असे नाही .
चिरंजीवांची व्यावसायिक requirement होती कि या देशातील भ्रष्टाचार , अनागोन्दीला कंटाळून तुम्ही ऑस्ट्रेलियास स्थलांतर करायचे ठरवलेत ?
आता मी मजकूर सांगतोय आणि माझा बंटी माझ्या वाल स्क्रीन वर (भिंतीत बिल्ट इन ) फटाफट उतरून घेतोय. बंटी म्हणजे माझा यंत्र सचिव (रोबो म्हण हवे तर . पण हा शब्द आता जुना झाला. आता तो कुटुंबातीलच एक झाल्यामुळे त्यालाही लडिवाळ नावे ठेवतात.) तर माझा हा बंटी. अंबानी ग्रुपच्या नीता ह्युमनो सर्विस लिमिटेड (कोलाब्रेशन वुईथ – मुनीमाची टीनाअनुची (प्रा.) लिमीटेड, (MTAL) जपान ) या कंपनीचा मेक आहे. (MTAL कंपनी जपानी असली तरी मालक भारतीयच आहे हे नाव बारकाईने वाचल्यावर लक्षात येइलच ).
चीनी बनावटीचे पण यंत्र सहायक मिळतात पण ते आउमाऊचाऊ (चीनी ) अजून रेपुटेशन टिकवून आहेत. थोडक्यात किंमत कमी पण नो ग्यारंटी ! साले अजूनही बेडकाच्या तंगडी साठी कुठल्याही किमतीला वस्तू विकायला तयार असतात . परवा तर आमच्या इथे धमालच झाली.समोरच्या मारवाडनीच्या दोन वर्षाच्या नातवाला त्यांचा "च्यांग " चमच्याने दुध पाजत होता. मधेच च्यान्गची ब्याटरी संपली . झालं, चमच्या नातवाच्या तोंडात तसाच. पोरगा ठण ठना बोंबलतोय आणि च्यांग सुम्भा सारखा उभाच.
आम्ही आवाज ऐकून त्याच्या आजीला वाल स्क्रीन वरून मेसेज दिला. आजी शेअर मार्केट वर नजर लावून बसली होती . नशीब वाल स्क्रीन वरच होती . मग रोबो स्पेशालीस्ट डॉक्टरला फोनाफोनी, त्याची हजार नाटके. जेव्हा मारवाडीन उन्नीस हजार रुपया विजीट फी द्यायला तयार झाली तेव्हा कुठे तो त्याच्या फ्लायिंग कार मधून आला आणि पोराची सुटका केली. आमच्या बंटीला मी च्यान्ग् पासून लांबच ठेवतो. न जाणो एखादा चीनी व्हायरस त्याला बाधायचा. बर चीनी व्हायरस मुळे झालेले सर्दी पडसे सहजा सहजी बरे होत नाही . त्यांच्या डॉक्टरची विजीट फी तू वर बघितलीच . आणि तसही बंटीचं च्यांगशी पटत नाही. चिन्यांनी त्यांच्या जॉब वर गदा आणली म्हणून तो त्याच्यावर खार खावून आहे.
तर मारवाडणीची धमाल सांगायची राहिलीच. रो.स्पे. डॉ. गेल्यानंतर तिने सुनेच्या नावाने शंख करायला सुरवात केली. सुनेने पोराला सासूला सांभाळायला सांगितले आणि ती गेली जवळच्या मॉल मध्ये बिकानेरचे फरसाण आणि पापडी खायला. सून आल्यानंतर जे मारवाडणीच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला! हा सगळा एकता कपूरच्या सास बहु सिरिअलचा परिणाम . एकता कपूरची सास बहु सिरिअल काही संपायला तयार नाही. बहुतेक वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत मालिका थांबवायची नाही असा तिचा पण असावा. गम्मत म्हणजे वडील शंभरीतही अजून तरुण दिसतात .
एका सिनेमात तर तुषार कपूरने त्यांच्या वडिलांची भूमिका केली. (तुषारला बिचाऱ्याला अजूनही " ए इ आ ई ओ " असलेच डायलॉग बोलायला देतात. खर पाहिलं तर वडिलांपेक्षा त्याची डायलॉग फेक चांगली आहे.)
जी तऱ्हा एकता कपूरची , तीच गत बॉलीवूडचे शहेनशाह बच्चन आणि भारतरत्न स. तेंडुलकर यांची. रिटायरमेन्टचे नावच नाही ! शंभरी ओलांडली तरी शहेनशाह अजून सिनेमात कामच करताहेत आणि मुलगा ऐश करतोय बापाच्या जिवावर. नशीबवान आहे लेकाचा. स्वतःचे सिनेमे काही चालले नाहीत पण बापाच्या कृपेने ऐश्वर्य आणि ऐश्वर्या दोन्ही मिळाले .
सचिनजी अजून खेळताहेत. वडील आणि मुलगा अर्जुन राष्ट्रीय टीम मध्ये एकत्र खेळले, त्यानंतर आजोबा-नातू राष्ट्रीय टीम मध्ये खेळले - सगळे रेकॉर्ड करून झाले. भारतरत्न दिले .तरी रिटायरमेन्ट नाही. शेवटी भारतीय क्रिकेट वेड्यांनी सरकारवर त्याला "महात्मा" पदवी देण्यासाठी दबाव आणला. सरकारने ते पण ऐकले . पण निवृत्तीचा प्रश्न कुणी केला कि ते मौन धरतात. मनमोहन सिंघांच्या काळात ते राज्यसभेवर खासदार होते ना. त्यामुळे मौनाची कला त्यांनी चांगली आत्मसात केलीय .
तसे तुला बरेच अपडेट देता येतिल. तुम्ही पक्के ओस्ट्रेलियन झाल्यामुळे भारतातील घडामोडी तुम्हास माहित नसतील.
राजकारणाचा विषयच निघालाय तर तेही अपडेट देतो. सध्या भारतात PENTAGON ची सिस्टीम आहे . एक पंतप्रधान ही सिस्टीम आता नाही . PENTAGON मध्ये युवानेते राहुल गांधी (ह्यांनी लग्नच केले नसल्यामुळे अजूनही युवा नेते ), प्रियांका गांधी-वद्रा , रोबर्ट वद्रा , वरूण गांधी आणि सुप्रिया सुळे आहेत. सगळे मिळून राष्ट्र "हिताचा" निर्णय घेतात. आता तुम्ही म्हणाल गांधी कुटुंबीया मध्ये पाचवे नाव सुळे कसे ? तर त्याचा पण इतिहास आहे. पाचवे सीट नुकतेच खाली झाले आहे. कारण सोनियाजी खूपच वृद्ध झाल्यामुळे नाईलाजास्तव त्या बाजूला झाल्या. पाचव्या सीट साठी वद्रांच्या मुलाचा विचार चालला होता, पण त्याला अजून समज नसल्यामुळे सध्या बाजूला ठेवले आहे. अजूनही आईच्या पदरा आड लपतो. मामाच्या वळणावर गेलाय.
तर पाचव्या जागेसाठी सुप्रिया सुळे, अखिलेश यादव , सचिन पायलट , लालू प्रसादांचा नऊ नंबरचा मुलगा (नाव आठवत नाही. लालूंना तरी आठवते कि नाही शंका आहे.), पंकजा मुंडे-पालवे , ज्योतिद्य राजे शिंदे, सम्राट भाऊ मोझे (महाराष्ट्राचे गोल्ड मिनिस्टर ) असे बरेच साठी सत्तरीतले नेते मैदानात होते. पण सुप्रिया सुळेन्ना राजकारणातील ऐन वेळी "धोबी पछाड " डाव खेळण्याचे बाळकडू घरीच मिळाले असल्यामुळे त्यांनी इतरांवर बाजी मारली. अखिलेश यादवला वडिलांनी फक्त कुस्तीचे डावपेच शिकवले. सुप्रिया सुळ्यांच तसं नव्हतं. पंकजा पालवेंना वडिलांनी फक्त सभेत याव करू , ट्याव करू , दावूदच्या मुसक्या बांधू असल्या वल्गना करायला शिकवल्या . राष्ट्रीय पातळीवर ते काही उपयोगी पडले नाही. तसेच ठाकरे काका- पुतण्यांनी (राजसाहेब ठाकरे - आदित्य ठाकरे) त्यांचा ऐनवेळी कात्रजचा घाट (घात ? ) केला. दोन थोरल्या साहेबांच्या (बाळासाहेब - शरदराव ) जुन्या मैत्रीला जागून त्यांनी सुप्रीयांना पाठींबा दिला.
बाकी सर्व ठीक . पुण्यातले ट्राफिक सोडून. आता रस्त्याप्रमाणेच हवाई ट्राफिक ने पण वैताग आणलाय. तीच बेशिस्त आणि तोच गोंधळ. हवाई ट्राफिक पोलिस सिग्नल सोडून कुठेतरी प्याराशूट आड लपलेला असतो . एखाद्या फ्लायिंग कार वाल्याने सिग्नल तोडला रे तोडला कि त्याची असिस्टन पोरे हवेतच बरोबर कार च्या तंगडीत गळ फेकतात आणि कारवाल्याला "जमिनीवर " आणतात. हवाई तोडपानी पण लय हाय आहे. खाली ५ हजारात होते. पण वरचे तोडपानी वीस हजाराच्या आत नाही .
असो. पत्र आता खूपच लांबत चालले आहे . बंटी पण वैतागलेला दिसतोय.
जाता जाता . तुमच्या प्रशस्त रूमचा क्यामेरा एकदा तुम्ही रात्री ऑफ करायचे विसरला होतात. मी त्यावेळी सहज चाळा म्हणून सर्फ करत होतो तर तुमचा सिग्नल मिळाला . पाहतो तर तुम्ही मस्त एकटेच सत्यम शिवम सुंदरम पिक्चर वालस्क्रीन वर बघत बसले होते. तुम्हाला मला डिस्टर्ब करायचे नव्हते म्हणून मी लगेच दुसरीकडे गेलो पण झीनत अमानचे दर्शन झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावरचे व्याकूळ भाव बघवत नव्हते. कॉलेजला दांडी मारून ब्ल्याक मध्ये तिकीट घेऊन पिक्चर पहिला होता. झाली पंचावन साठ वर्षे त्या गोष्टीला! असो. पुढच्या वेळी पिक्चर पाहताना क्यामेरा ऑफ करायची खबरदारी घ्या.
सत्यम शिवम सुंदरमचा पण रिमेक आलाय. पण त्यात कालानुरूप बदल करण्यात आलेत. म्हणजे राज कपूर साहेबांनी झीनत अमानचे धबधब्या खाली ओलेते सौंदर्य दाखवले होते. रिमेक मध्ये हिरोइन पूर्ण अंगभर जाड कपड्यानिशी धबधब्या खाली आंघोळ करताना दाखवली आहे. असे दृश्य आता दुर्मिळ असल्यामुळे पिक्चरला खूप गर्दी आहे.
आता मात्र आवरते घेतो.
कळावे,
अस्साच लोभ असावा .
आपला ,
ब. र . तां .
प्रतिक्रिया
4 Oct 2013 - 3:11 pm | अभ्या..
आमच्या युवा नेत्या मा. प्रनितीतैंचे नाव कुठल्याच घडामोडीत नसल्याने निशेध निशेध निशेध.
तुमचे हे सारे कल्पनारंजन असल्यामुळे माफ करण्यात आलेले आहे. ;)
4 Oct 2013 - 3:31 pm | दादा कोंडके
अहो हे पत्र आहे का यत्ता चौथीतला 'अजून पण्णासवर्षानी असणारा आपला देश' असा निबंध?
4 Oct 2013 - 3:39 pm | बबन ताम्बे
चालेल निबन्ध म्हट्ले तरी . किती मार्क देताय ? :-)
4 Oct 2013 - 4:37 pm | मुक्त विहारि
आवडले,,
4 Oct 2013 - 5:17 pm | अनिरुद्ध प
खरच चान्गला लिहिला आहे,पु ले शु
4 Oct 2013 - 11:43 pm | अग्निकोल्हा
लेख फाट्यावर मारणेत आला आहे ;)
5 Oct 2013 - 8:56 am | चौकटराजा
सचिन व आमिताभ यांचे लायनीत शरद पवार यांचे नाव घालायचे राहिले आहे. त्याना २०४५ साली देखील सत्ता सोडवत
नाही. असे असावयास हवे.
बाकी ह ह पु वा ! २०४५ साली पुणे मेट्रोचे उदघाटन कृपाचार्य.... यांच्या हस्ते होणार आहे म्हणे .
5 Oct 2013 - 12:37 pm | पैसा
पण २०४५ साली मिपा बंद न पडता चालत आहे का याबद्दल का लिहिले नाही?
5 Oct 2013 - 11:26 pm | मनीषा
ते अमृत की काय सापडलेले दिसते आहे...
6 Oct 2013 - 12:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त ! राजकारणावरच्या टपल्या खूप जमल्यात !
6 Oct 2013 - 1:42 pm | सोत्रि
निर्वाण प्राप्त झाले आहे!
- (बरीच कामे असणारा) सोकाजी
6 Oct 2013 - 1:50 pm | चौकटराजा
@ सोत्री २०४५ साल झाले म्हणून काय झाले. " सनातन उद्यम" माणसाला काही चुकणार नाही असे त्याना सुचवायचे आहे.
तिथे रोबोचे काम नोहे |
7 Oct 2013 - 5:50 pm | बॅटमॅन
रोबोचे काम आहे की नोहे हे उद्देशानुरूप बदलते असे युवरूप आणि आम्रविका खंडातल्या रहिवाश्यांच्या वर्तनावरून कळते.
8 Oct 2013 - 2:42 pm | बबन ताम्बे
धन्यवाद मित्रान्नो. आपल्या प्रतिसादामुळे अजुन प्रोत्साह्न मिळाले लिहायला.
13 Apr 2014 - 12:59 pm | चौथा कोनाडा
खुसखुशीत कल्पनारंजन ! मजा आली. या लेखातल्या घराणेशाहीच्या मल्लीनाथीवरच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकिय पटलावर मा. पार्थ अजितदादा पवार प्रकट झालेले आहेत हे जाणवून फिस्सकन हसू आले. ही ब्र्यान्च अॅड करावी लागणार ताम्बेसाहेब तुम्हाला, मित्राच्या पुढील पत्रात !
पु.ले.शु.
14 Apr 2014 - 1:09 pm | बबन ताम्बे
श्री. चौथा कोनाडा ,
थँक यु. तुम्ही म्हणता तशी ब्रँच नक्किच अॅड करावी लागणार. सध्या महाराष्ट्रात निवडणूकीमधे दोन भावांचा कलगीतुरा रंगला आहे. त्यावर पण लिहीन म्हणतो.
13 Apr 2014 - 1:38 pm | माहितगार
आमचा धागा १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश किमान इ.स.२९४७ पर्यंत चर्चेत असणार असल्यामुळे त्या पुर्वीच्या सर्व तारखांच्या भविष्यकालिन काल्पनिक लेखनात मिसळपाव या संकेतस्थळाचा उल्लेख असणे अत्यंत आवश्यक आणि अत्यावश्यक आहे. तो तसा आपल्या लेखनात न आढळल्यामुळे आम्ही या लेख धाग्यावर सख्त नाराज आहोत.
बाकी ले.आ.पु.ले.शु.
14 Apr 2014 - 1:12 pm | बबन ताम्बे
श्री. माहितगार ,
मिसळपाव या संकेतस्थळाचा उल्लेख नसल्याबद्द्ल सॉरी.सन २०४५ च काय, २१४५ पर्यंत मि.पा. असणार आहे.
13 Apr 2014 - 6:24 pm | संपत
मस्त लेख.पुलेशु
14 Apr 2014 - 1:13 pm | बबन ताम्बे
श्री. संपतराव,
धन्यवाद.
14 Apr 2014 - 7:42 pm | रेवती
लेखन आवडले, मनोरंजक आहे.
14 Apr 2014 - 8:03 pm | बबन ताम्बे
रेवतीजी,
धन्यवाद .
आपणा सर्वांच्या लाडक्या सचिन वरील कॉमेंट्सबद्दल एक गोष्ट सांगायची राहून गेली. हा लेख सचिन तेंडुलकरने रिटायरमेंट जाहीर करण्याच्या आधी लिहीला आहे.
18 May 2024 - 5:34 pm | चौथा कोनाडा
लिंक :
https://www.facebook.com/reel/292472316999354
31 May 2024 - 9:25 am | १.५ शहाणा
आमचे संजय काका यांना नाम उल्लेख न करता मारले , आपला तिव्र णीषेध .................................
31 May 2024 - 5:32 pm | चौथा कोनाडा
जय हो संक्षि !
हा .... हा .... हा .... !