पुन्याच्या आत्याला पोरगी न्हाय.
आत्याची म्या लाडाची हाय.
सुट्टीला पुन्याला नेनार म्हन्ली.
म्या इचारलं, “हिकडं आंबे असत्यात, पुन्याला काय?”
आत्या हसली. मंग हे ते लई सांगितलं तिनं.
तरीबी म्या न्हाई म्हनून रायली.
मंग आत्या म्हन्ली, “बटाट्याची भाजी देईन.”
लई झ्याक बगा.
आमच्या हित सोमेवाडीच्या बाजारात बटाटा न्हाई. फकस्त कांदे.
म्या इचारलं, “रोज देशील?”
हो म्हन्ली.
मंग म्हैनाभर आत्याची पोरं मला पळवत होती.
पानी दे, चा दे, हे दे, ते दे, याला बोलवून आन.
म्या नाय म्हन्ली की फकस्त “बटाट्याची भाजी” म्हनत, की म्या लागलीच कामाला.
त्या दिशी उटले झोपेतून तर आत्या पुन्याला गेलेली.
आयनं बटाटा भाजी दिली.
म्या नाय खाल्ली.
*शतशब्दकथा
प्रतिक्रिया
29 May 2013 - 11:06 am | आदूबाळ
:)
"परचक्र" नावची प्रकाश नारायण संतांची लंपनकथा आठवली.
29 May 2013 - 11:49 am | बॅटमॅन
+१११११११११११११११११११११.
तंतोतंत.
29 May 2013 - 1:26 pm | आतिवास
परचक्र?
हं! लंपनला जिलबीची आशा लावत बाजारभर नुसतेच फिरवून आणणारे ते गृहस्थ,(कुणीतरी अण्णा ?) :-(
आठवले. ती गोष्ट आठवली पूर्ण!
29 May 2013 - 2:49 pm | बॅटमॅन
हो तीच ती गोष्ट :(
29 May 2013 - 11:40 am | ढब्बू पैसा
तुझ्या कथांमध्ये एक काहीतरी किमया आहे. नेमकं काय आवडलं ते शब्दात सांगता येत नाही इतकं सटल आहे. पण हे साधेसे प्रसंग नक्कीच कुठेतरी/कधीतरी अनुभवलेले असतात आणि ते अधिक आवडून, स्पर्शून जातात.
लिहीत रहा!
29 May 2013 - 3:47 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
29 May 2013 - 1:30 pm | मृत्युन्जय
सुंदरच. मला तर सगळ्या कथा / कविता आवडल्या. प्रत्येकवेळेस प्रतिसाद दिलाच असेल असे नाही. पण मान गये.
29 May 2013 - 2:55 pm | तुमचा अभिषेक
मला तर प्रत्येक वेळी काय प्रतिसादात लिहायचे याचाच प्रश्न पडतो.. उगाच तेच तेच लिहिल्याने आपलेच शब्ददारिद्र्य उघडे पडायचे !
29 May 2013 - 5:00 pm | भावना कल्लोळ
माझे पण असेच काहीसे होते
29 May 2013 - 2:44 pm | प्यारे१
:(
29 May 2013 - 3:25 pm | तनुजा महाजन
सुन्दर कविता
29 May 2013 - 4:52 pm | आतिवास
ही कविता नसून 'शतशब्दकथा' आहे.
या फॉर्मॅटविषयी अधिक माहिती इथं आहे.
29 May 2013 - 3:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्या दिशी उटले झोपेतून तर आत्या पुन्याला गेलेली.
हे आठ शब्द एका वेगळ्याच मनःस्थितीत भिरकावतात... आत्या आणि तिच्या पोरांना चांगलंच झोडपून काढायला पाहिजे असं वाटतं.साध्या आणि मोजक्याच शब्दात खूप काही सांगणार्यांचा नेहमीच हेवा वाटत आला आहे.
शतशब्दकथा सांगण्यात एकदम शिरोमणी आहात, अतिवास !
29 May 2013 - 3:40 pm | कोमल
:( :(
29 May 2013 - 3:43 pm | तनुजा महाजन
<blockquote>आत्या आणि तिच्या पोरांना चांगलंच झोडपून काढायला पाहिजे असं वाटतं.</blockquote>
:)
29 May 2013 - 4:56 pm | अविनाशकुलकर्णी
मस्त आवडली बटाच्ट्याची भाजी
29 May 2013 - 5:03 pm | अत्रुप्त आत्मा
झकास!!! :)
29 May 2013 - 6:22 pm | स्पंदना
खवचट मेली.
पुन्हा येइलच की माहेरपणाला.
मस्त हो अतिवास, मस्तच!
29 May 2013 - 6:49 pm | अनन्न्या
मेलं आम्हाला एवढसं काहीतरी दिलं जायचो आम्ही पण कामाला!
29 May 2013 - 8:25 pm | चिगो
तुमच्या शतशब्दकथेतलं नेमकं काय आवडतं, सांगता येत नाही.. पण प्रत्येक कथेत तुम्ही कथा-नायिका तिच्या भावनांसकट हुबेहूब डोळ्यांसमोर उभी करता.. मागे एकदा बोललो होतो तेच पुन्हा, "लोक वाडगंभर लिहून जे सांगू शकत नाही, ते तुम्ही मोजक्या (अक्षरशः)शब्दांत सांगता.."
29 May 2013 - 8:57 pm | किसन शिंदे
यातल्या प्रत्येक शब्दाशी सहमत!!
इस्पिकचा राजा आणि अपर्णा ताईंप्रमाणे त्या आत्याला झोडपावं म्हणतो.
29 May 2013 - 8:51 pm | निवेदिता-ताई
:)
29 May 2013 - 9:45 pm | jaypal
सेंचुरी आवडली
29 May 2013 - 11:07 pm | निवांत पोपट
ही शतशब्दकथा पण आवडली.
'हवे ते' मिळाले तरी 'हवे तेंव्हा' आणि 'हव्या त्या पध्दतीने' मिळतंच असं नाही.मोठ्यांना आपण दुखावले गेलोय हे स्पष्ट कळतं तरी, लहानग्यांना ते न कळता सुध्दा त्याला रिअॅक्ट कसं व्हायचं ते माहीत असतं !
तसे साम्य काहीच नाही पण गविसाहेबांचे "आईसक्रीमवाले गंदे अंकल" नंतर लागोपाठ "बटाटा भाजी" वाचताना काहीतरी जाणवलं..क्षीण का असेना बहूदा "अंडरकरंट" का काहीसे म्हणतात तो एकच असावा !
30 May 2013 - 12:45 pm | सस्नेह
मग आत्याशी गट्टी फू केली नाही का ?
30 May 2013 - 12:57 pm | कवितानागेश
सुंदर कथा.
या गोष्ट सांगणार्या लहान मुलीचे निष्पाप आणि हळ्वं मन नेहमीच प्रभावीपणे दिसतं तुमच्या लेखनात.
2 Jun 2013 - 4:40 pm | आतिवास
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
2 Jun 2013 - 5:23 pm | मनीषा
अशा लोकांचा खूप राग येतो.. पण करू काहीच शकत नाही.