पावसाला बोलवायला हवे आता

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
23 Feb 2013 - 11:54 pm

पावसाला बोलवायला हवे आता
-------
तुझ्यासोबत पहिल्या पावसात भिजतांना
तुझ्या पैंजणांची नादनक्षी मनावर
कोरली होतीस
त्या नक्षीतल्या कुयऱ्यांच्या
चक्रव्युहात अभिमन्यु झाला
होता माझा...
-------
अंगणातला पारिजातकही आता फारच
काकुळतीला आला आहे
तुला आठवतं?
पावसाची रिपरिप चालू झाल्यानंतर
इवलेसे थेंब निथळणाऱ्या पारिजातकाजवळ
तुझ्या ओढणीखाली
ते तुझ्या सुगंधी श्वासात भिजणे
.
.
खरचं पावसाला बोलवायला हवे आता
-------
कोसळणाऱ्या धारांमध्ये
खिडकीतुन हात बाहेर काढून
ओंजळीतले छोटेसे तळे
तुझ्या मेहंदीभरल्या हातात ओतल्यावर
फक्त निखळ आनंद उरायचा
माझ्या हातात
---------
कुठे दडलाय तो कुणास ठाऊक?
---------
नखशिखांत भिजल्यावर
ओठांवर अडकलेली
तुझ्या केसांची एक चुकार बट
उचलून मी कानामागे सरकवतांना
तुझ्या डोळ्यात फुललेला गुलाब
.
आणि मग त्या गुलाबाचा तो काटा
असा खोलवर गेला होता कि काय सांगू
.
.
स्स... अजुनही बोचतोय..
---------
जातांना तो पाऊस घेऊन गेलीस
निदान त्या पारिजातकाची
समजूत काढून तरी जायचे होतेस...
फारच काकुळतीला आला आहे तो
---------
बस्स
पावसाला बोलवायलाचं हवे आता

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२३/०२/२०१३)

करुणकविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रतिक्रिया

लौंगी मिरची's picture

24 Feb 2013 - 12:09 am | लौंगी मिरची

अतिसुंदर .

तुमच्या शक्यतो सगळ्या कविता वाचते . ओठांवर हसु फुलवण्यापासुन ते डोळ्यात पाणि उभं करण्याची ताकद तुमच्या शब्दरचनेत असते .

शुभेच्छा आणि अनेक धन्यवाद .

अभ्या..'s picture

24 Feb 2013 - 12:19 am | अभ्या..

मिका रे. ___/\___
कसं लिहितोस रे असं?
कसं जमतं?
आम्हाला प्रतिसाद द्यायला पण शब्द सापडत नाहीत,

प्रचेतस's picture

26 Feb 2013 - 8:59 am | प्रचेतस

अगदी हेच बोलतो.

फिझा's picture

26 Feb 2013 - 11:47 am | फिझा

खूप दिवसांनी नेहमीसारखी छान कविता वाचायला मिळाली ....मस्त !!!

पैसा's picture

26 Feb 2013 - 12:30 pm | पैसा

फारच छान झाली आहे कविता.

साला या मिका मुळे कविता कळायला लागल्या असे म्हणावे लागेल

क्या बात लिहितोस रे
उगाच जड जड शब्द नाहीत , उपमा नाही, जबरदस्ती यमक जुळवण्याचा प्रयत्न नाही

सहज सुंदर सोप्प
पण तितकच प्रभावी

अवांतर : पावसाला बोलवायला हवे आता
शीर्षक वाचून वाटलेलं चक्क मिकाने विदर्भ , मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळावर काही लिहिलेय काय
थोडा अपेक्षाभंग झालाय

परिकथेतील राजकुमार's picture

26 Feb 2013 - 1:54 pm | परिकथेतील राजकुमार

जातांना तो पाऊस घेऊन गेलीस
निदान त्या पारिजातकाची
समजूत काढून तरी जायचे होतेस...
फारच काकुळतीला आला आहे तो

___/\___

अनिदेश's picture

26 Feb 2013 - 2:09 pm | अनिदेश

मस्त कविता....शेवट झकास आहे :)

स्पंदना's picture

26 Feb 2013 - 2:18 pm | स्पंदना

नादनक्षी?

व्वा! क्या बात है ! नादनक्षी. सुरेख! सगळी कविता वाचुन झाली तरी मी याच शब्दात अडकुन राहिलेय. नादनक्षी.

क्रान्ति's picture

26 Feb 2013 - 3:38 pm | क्रान्ति

मिकाची कविता म्हणजे नेहमीच काहीतरी वेगळं, सुंदर, विलक्षण वाचायला मिळणार याची खात्री असते पक्की. ही कविता तशीच! :)

क्रान्ति's picture

26 Feb 2013 - 3:38 pm | क्रान्ति

मिकाची कविता म्हणजे नेहमीच काहीतरी वेगळं, सुंदर, विलक्षण वाचायला मिळणार याची खात्री असते पक्की. ही कविता तशीच! :)

अत्रुप्त आत्मा's picture

26 Feb 2013 - 4:06 pm | अत्रुप्त आत्मा

खल्ला..............स!!!

पावसाची रिपरिप चालू झाल्यानंतर
इवलेसे थेंब निथळणाऱ्या पारिजातकाजवळ
तुझ्या ओढणीखाली
ते तुझ्या सुगंधी श्वासात भिजणे
>>> http://www.sherv.net/cm/emoticons/hearts/happy-love-heart-smiley-emoticon.gif आह्हह्ह्ह्ह्हाहाहाहा.... पावसापेक्षा हजारपट श्रेष्ठ आहे हे...!!!

ते नादनक्षी अन कुयर्‍यातला चक्रव्यूह अन डोळ्यातला गुलाब हे लैच लैच भारी आहे. नादनक्षी तर फारच खास!!!! कविता कशी असावी याचा उत्तम वस्तुपाठ आहे ही कविता म्हंजे.

"ना वृत्त ना शब्दजंजाळ काही | आस्वादितां पैं न उणेंचि काही |
वाचेसवे तो जणु अर्थ धावे | प्रणाम त्वां आमुचे स्वीकरावे ||"

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Feb 2013 - 8:12 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

इतक्या सुंदर प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे.

"ना वृत्त ना शब्दजंजाळ काही | आस्वादितां पैं न उणेंचि काही |
वाचेसवे तो जणु अर्थ धावे | प्रणाम त्वां आमुचे स्वीकरावे ||"

पहिला या साठी दंडवत स्विकार बाबा!

अत्रुप्त आत्मा's picture

28 Feb 2013 - 11:30 am | अत्रुप्त आत्मा

"ना वृत्त ना शब्दजंजाळ काही | आस्वादितां पैं न उणेंचि काही |
वाचेसवे तो जणु अर्थ धावे | प्रणाम त्वां आमुचे स्वीकरावे ||" >>> वा...! वा...! वा...!वा...! वा...! वा...!.........http://www.sherv.net/cm/emo/happy/big-grin-smiley-emoticon.gif वृत्तराजा .... सानंद दंडवत रे तुला...!!!

सस्नेह's picture

26 Feb 2013 - 4:29 pm | सस्नेह

याला कल्पनेचे ऐश्वर्य म्ह्णावे की काव्याची श्रीमंती ?

इनिगोय's picture

26 Feb 2013 - 8:59 pm | इनिगोय

लाजवाब.. मिका, ही खरी व्हॅलण्टाईन डेची कविता.

जशा बाकीबाब बोरकरांच्या कविता जीव लावतात, अगदी तसा तुझ्या कवितांनी जीव लावला आहे..!

पक पक पक's picture

26 Feb 2013 - 9:09 pm | पक पक पक

फर्स्ट क्लास.... :)

त्यातल्या त्यात सरफरोश चं ... 'जो हाल दिलका' खटकन डोळ्यासमोर उभं राहिलं.

अप्रतिम कविता,नाजूक नि सुंदरही! :)

वेल्लाभट's picture

26 Feb 2013 - 10:23 pm | वेल्लाभट

गुड आहे !

ई-पूर्वाई's picture

27 Feb 2013 - 11:17 am | ई-पूर्वाई

फेसबुक प्रमाणे इथे लाईक हवे होते...

नगरीनिरंजन's picture

27 Feb 2013 - 11:33 am | नगरीनिरंजन

सुरेख!

मृत्युन्जय's picture

27 Feb 2013 - 1:34 pm | मृत्युन्जय

सुरेख. अतिशय सुंदर कविता. कविता प्रकाराकडे फार दुर्मिळपणे लक्ष जाते. पण जेव्हा जाते तेव्हा त्यात बर्‍याचदा मिकांची कविता असते. खुपच सुंदर.

नावातकायआहे's picture

27 Feb 2013 - 2:03 pm | नावातकायआहे

मृत्युन्जयशी प्रचंड बाडिस!!

विलासराव's picture

8 Mar 2013 - 9:58 pm | विलासराव

+११११११११११

ऋषिकेश's picture

27 Feb 2013 - 1:48 pm | ऋषिकेश

सुरेख!

किसन शिंदे's picture

27 Feb 2013 - 2:46 pm | किसन शिंदे

खरंतर वेगळं काही लिहण्याची गरज नाही, जे लिहायचं होतं त्याच्यापेक्षा अनेक पटींनी चांगलं वरच्या प्रतिसादातून वाचायला मिळालं.

मिका, अशाच अनेक उत्तमोत्तम कवितांची मेजवानी तुझ्याकडून आम्हाला कायमच मिळत राहो.

प्रीत-मोहर's picture

27 Feb 2013 - 2:50 pm | प्रीत-मोहर

आह्ह्ह!!!
नेहमीप्रमाणे क्लासच :)

रेवती's picture

27 Feb 2013 - 7:18 pm | रेवती

फारच आवडली कविता. पराने फेस्बुकावर तसे लिहिले म्हणून लगेच वाचायला आले.

आबा's picture

28 Feb 2013 - 6:56 am | आबा

कविता, मुक्तक जे काही आहे ते प्रचंड आवडलं

अवांतरः तुम्ही गुलजार यांचे चाहते दिसताय !?

लई भारी मिका, खुप खुप धन्यवाद.

आधिच पारिजातक जवळचा आणि त्यात पाउस...

संजय क्षीरसागर's picture

28 Feb 2013 - 10:37 am | संजय क्षीरसागर

आणि मग त्या गुलाबाचा तो काटा
असा खोलवर गेला होता कि काय सांगू
.
.
स्स... अजुनही बोचतोय..

तो काटा अजून काही निघण्याच नांव घेत नाही...म्हणून प्रतिसादाला वेळ लागला!

खुप सुरेख झाली आहे कविता....

चाणक्य's picture

6 Mar 2013 - 8:14 am | चाणक्य

पाणी झिरपावं तश्या तुझ्या कविता वाचता वाचता सबंध शरीरात झिरपत राहतात.

जेनी...'s picture

8 Mar 2013 - 10:37 pm | जेनी...

सह्ही ....
सेम चनुकाकांसारखच बोलते ..
दाद्या मस्त कविता आणि भौरायाचा प्रतिसादहि एकदम चिकना ...:)

पाषाणभेद's picture

13 Mar 2013 - 6:18 am | पाषाणभेद

--^--
खरंच कविता एकदम मनाला टोचली !

चिगो's picture

16 Mar 2013 - 12:17 am | चिगो

अत्यंत सुंदर..

ओंजळीतले छोटेसे तळे
तुझ्या मेहंदीभरल्या हातात ओतल्यावर
फक्त निखळ आनंद उरायचा
माझ्या हातात

स ला म..

सुमीत भातखंडे's picture

19 Mar 2013 - 11:08 am | सुमीत भातखंडे

आवडली कविता