===================================================================
ड्रॅगनच्या देशात : ०१... ०२... ०३...०४... ०५... ०६... ०७... ०८...०९...१०...११...१२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...
===================================================================
शांघाईबद्दल इतके काही ऐकून होतो तर इटीनेररीपेक्षा जास्त काहीतरी बघण्यासारखे असेलच आणि ते राहिले म्हणून नंतर हळहळ वाटेल असा विचार करून एक दिवस पूर्णपणे मोकळा ठेवला होता. हा दिवस स्वतःच फिरून घालवायचा असे ठरवले होते. त्यामागे इतके दिवस चीनमध्ये फिरल्यावर शांघाईसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महानगरात फिरायला काहीच अडचण येणार नाही हा कयास होता. आतापर्यंतच्या चीनच्या अनुभवावरून या अंदाजावरचा माझा विश्वास चांगलाच डळमळीत झाला होता. तीन दिवसांच्या तीन गाईडना अजून एका दिवसाकरिता गाईड मिळेल का ही सतत विचारणा करत होतो. पण इंग्लिश बोलणार्या गाइडची शांघाईसारख्या मोठ्या शहरामध्येही एवढी चणचण आहे की काहीही सोय होऊ शकली नाही. सरते शेवटी हर हर महादेव म्हणत एकट्यानेच शांघाईवर स्वारी करायचे ठरवले. काय काय बघायचे त्या स्थळांच्या यादीची लांबी मारुतीच्या शेपटीसारखी वाढत गेली होती :-). तिची एक व्यावहारिक लघुसूची (practical shortlist) बनवली, गूगल नकाश्यावर स्थळांच्या जागा बघून एक साधारण क्रमणमार्ग ठरवला आणि हॉटेलबाहेर पडलो.
हॉटेलच्या दाराजवळच पुढे काय वाढून ठेवले आहे याची नांदी झाली :). मोठ्या आशेने दरवाज्यावरच्या बेलबॉयला विचारले की "ईस्ट नानजिंग रोडला कसे जायचे? टॅक्सीने किती वेळ लागेल?"... तर त्याच्या चेहर्यावर केवळ गोंधळ. मग विचारले, "सबवे, सबवे ?" तरीसुद्धा तोच चेहरा. तेवढ्यात त्याचा सहकारी मदतीला धावून आला आणि त्याने "जर चालत जायची इच्छा असेल तर ५-१० मिनिटात पोचाल असे म्हणून थोडे मार्गदशन केले. म्हटले चला चालत गेलो तर शांघाई जरा जवळून बघता येईल. त्याने सांगितलेल्या रस्त्यावरून सांगितलेली सारी वळणे घेतली तरी ईस्ट नानजिंग रोडचा सुगावा लागेना. रस्त्यावर पाच जणांना विचारायचा प्रयत्न केला पण सर्वांच्या चेहर्यावर तेच भाव, "ही मंगळावरची अगम्य भाषा सोडून जरा चिनीमध्ये विचारलेत तर नक्की मदत करेन." नशिबाने सहाव्या प्रयत्नाला इंग्लिश समजणारा चिनी माणूस मिळाला पण तोही शांघाईमध्ये नवखा होता. त्याने बरोबर रस्त्याच्या विरुद्ध दिशेला पाठवले ! पण नंतर ते त्याच्या ध्यानात आल्यावर रस्त्याच्या पलीकडून आरडा ओरडा करून परत बरोबर दिशा दाखवली. त्या वेळेपर्यंत मलाही रस्त्याची पाटी दिसली होती आणि तिकडे जाणारा निम्नमार्ग (underpass) ही दिसला होता. आनंदाच्या भरात मीही तेवढ्याच जोराने ओरडून त्याचे आभार मानले.
ईस्ट नानजिंग रोड कडे नेणारा एक मार्ग.
वाटेत एक सिंह-ड्रॅगन भेटला त्याला न घाबरता कॅमेर्याने 'शूट' केले आणि पुढे निघालो.
नानजिंग रोड १८४५ साली रहदारीस खुला झाला तेव्हा त्या काळाच्या कोणत्याही मोठ्या शहरातल्या रस्त्यासारखाच सामान्य रस्ता होता. परंतू २००० सालच्या उदारीकरणाच्या काळात त्याचा पूर्ण कायापालट करून त्याचे जगातील सर्वात लांब (६ किमी) शॉपिंग मॉलमध्ये रूपांतर केले गेले. या रस्त्यावर सर्व जगप्रसिद्ध ब्रँडची दुकाने आहेत. शॉपिंगबरोबर खाण्यापिण्याची ब्रंडेड स्टोअर्स आहेत. या रस्त्याचा पूर्वेकडचा हिस्सा म्हणजेच ईस्ट नानजिंग रोड हा केवळ पादचार्यांकरिता राखीव आहे. फक्त प्रवाशांकरिता सोय म्हणून ठेवलेल्या टायरवाल्या रंगीबेरंगी ट्रेन्स सोडून इतर कोणतेही वाहन याच्यावरून नेण्यास बंदी आहे. हा रस्ता चिनी आणि परदेशी या दोन्ही प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
.
थोडा वेळ या रस्त्यावर फिरून घेतले आणि त्याच्याच नावाचे सबवे (भूमिगत रेल्वेला येथे सबवे म्हणतात) स्टेशन शोधू लागलो पण काही केल्या ते सापडेना. शेवटी एका इंग्लिश जाणणार्या ललनेने जवळ असलेला अंडरपास दाखवून रस्त्याखाली जायला सांगितले आणि शेवटी ते सापडले. तिकीट काढायला मशीनजवळ गेलो. तेथे इंग्लिशमध्ये सूचना असलेली काही मशीने दिसली म्हणून खूश झालो. त्यांचा उपयोग करू लागलो तर ध्यानात आले की सूचना इंग्लिशमध्ये पण सर्व स्टेशनांची नांवे चिनी लिपीत होती !!! काही कळेना. मग शेवटी स्टेशनवरच्या एका गार्डला पकडले, त्याने दुसर्याला आणि त्याने तिसर्याला असे करत इंग्लिश समजणार्या गार्डपर्यंत पोहोचलो. तिसर्याने मला पाहिजे ते म्हणजे "शांघाई सायन्स व टेक्नॉलॉजी म्युझियम" स्टेशनचे तिकीट काढून दिले (हुश्श !) आणि आम्ही शांघाई सबवे पकडायला निघालो.
९८,००० चौ मीटर क्षेत्रफळाचे शांघाई सायन्स व टेक्नॉलॉजी म्युझियम हे एक विशाल संग्रहालय बनविण्यासाठी ३,२०० कोटी रुपये खर्च आला आहे. यात तेरा मुख्य कक्ष आणि शास्त्रीय विषयावरच्या फिल्म्स दाखवणारी ४ सिनेमा थिएटर्स आहेत (IMAX 3D Theater, IMAX Dome Theater, IWERKS Theater and Space Theater). अक्षयकुमारच्या 'चांदनी चौक टू चायना' चे काही भाग या संग्रहालयात चित्रित केले गेले आहेत. हे संग्रहालय नीट पाहायला एक दिवससुद्धा पुरा पडणार नाही हे लगेच ध्यानात आले त्यामुळे माहितीपत्रकावर ठराविक कक्षांवर खुणा करून तेच बघायचे ठरवले.
संग्रहालयाचा दर्शनी भाग
.
एव्हिएशन
प्राणिशास्त्र
जंगले
.....................
डायनॉसॉर्स
शियान मधल्या सहप्रवाशांकडून शांघाईमधल्या "लॉस्ट हेवन" या रेस्तरॉची खूप स्तुती ऐकली होती आणि त्यांच्याकडून त्याचा पत्ता व फोन नंबरही घेतला होता. दुपारचे जेवण तेथे घ्यायचे ठरवले होते. फोन करून जागा बुक करूनच जा असे सहप्रवाशांनी सांगितले होते. ऐनवेळेस ध्यानात आले की टॅक्सीचालकाला दाखवण्यासाठी चिनीमध्ये लिहून आणलेला पत्त्याचा कागद हॉटेलवरच राहिला होता. नशिबाने फोन नंबर मी माझ्याजवळच्या इटिनेररीच्या कागदावरपण लिहून घेतला होता. परत इंग्लिश जाणणार्या माणसाची शोधाशोध सुरू केली. शेवटी संग्रहालयाचा एक अधिकारी सापडला. त्याच्या समोर रेस्तरॉला फोन करून रिसेप्शनवरच्या ललनेला हॉटेलचा पत्ता त्या अधिकार्याला सांगायला सांगून तो कागदावर लिहवून घेतला. तिला म्हटले की आता लंचला येऊ शकतो का तर म्हणाली टॅक्सीने एक तास तरी लागेल आणि तोपर्यंत हॉटेल बंद होईल. मग संध्याकाळी साडेपाचचे बुकिंग मिळाले. चायना हायलाईट्सने दिलेल्या मोबाइलचा हा अजून एक सदुपयोग झाला !
संग्रहालयाच्या बाहेर पडलो तर हा फणसवाला समोर दिसला.
भूक तर लागली होती. संध्याकाळचे जेवण लवकरच साडेपाचला करायचे होते. आता आपल्याला पसंत येणारे रेस्तरॉ शोधण्याच्या प्रयोगात अजून वेळ घालवण्यापेक्षा यालाच राजाश्रय देऊया असा विचार केला. फणस हे माझ्या आवडीचे फळ आणि ते चवदारही होते. त्यामुळे मजेने भरपेट फणसाचे गरे खाल्ले आणि सबवे स्टेशनवर गेलो.
पुढचा थांबा पुडाँग होता. पुडाँग म्हणजे शांघाईचं मॅनहॅटन... अगोदरच्या भागांत जी सुंदर आकाशरेखा बंडच्या काठावर उभी राहून बघितली होती ती पुडाँगमधल्या गगनचुंबी इमारतींनी बनवलेली आहे. सबवेच्या दोन क्रमांकाच्या मार्गावरील लुजियाझुई (Lujiazui) स्टेशनवर उतरले तर पुडाँगमधील बहुतेक सर्व प्रेक्षणीय स्थळे पायी फिरून बघता येतात. तिकिटाच्या मशीनमध्ये स्टेशन्सची नावे चिनी मधून असूनदेखील आतापर्यंत मी लुजियाझुई स्टेशनचे तिकीट कोणाच्याही मदतीशिवाय काढण्याइतका तरबेज झालो होतो :).
लुजियाझुई स्टेशनला पोहोचलो आणि बाहेर जायला लागलो. कुठल्याही दिशेने गेलो तरी छोट्या छोट्या दुकानांच्या शॉपिंग कांप्लेक्समध्येच घुसत होतो?! तीन चार वेळा प्लॅटफॉर्मवर मागे येऊन परत शोधण्याचा प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही.चक्रव्यूहामध्ये अडकल्यावर अभिमन्यूला काय वाटले असेल त्याचा साक्षात अनुभव चिनी सबवेने दिला ! शेवटी अभिमान बाजूला ठेवून दुकानदारांना विचारायला सुरुवात केली. एका दुकानदाराने या सगळ्या दुकानांच्या चक्रव्यूहात लपलेला एक जवळचा मार्ग दाखवला आणि एका मिनिटात "जमिनीवर" आलो. याच अनुभवाची चुणूक संग्रहालयाच्या स्टेशनवर आली होती, पण लुजियाझुईला तोड नाही. अशा भुलभुलैयापूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रकार सर्वसाधारणपणे सर्व शांघाईभरच्या सबवे स्टेशन्सवर आहे. नवीन प्रवाशाला घोळात घालून जास्तीतजास्त वेळ दुकानाच्या गर्दीत फिरवत ठेवले तर त्याला काही ना काही विकत घेण्याची इच्छा होईलच असा एक मानसशास्त्रीय डाव यामागे असावा असा मला दाट संशय आहे ;).
जमिनीखालून वर आलो तर दोन वाजत आले होते आणि शांघाईच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आकाश ढगांनी नुसते भरून गेले होते. Shanghai World Financial Centre Tower या चीनमधली सर्वात उंच आणि जगातली दोन क्रमांकाच्या इमारतीवरून शांघाई नगरीचे सिंहावलोकन करायचा बेत होता. पण थेंब थेंब पडणारा पाऊस मुसळधार होणार याची स्पष्ट लक्षणे दिसायला लागली होती...
मग बेत बदलला आणि जवळच असलेल्या 'डोंगफांग मिंगझू' (Oriental Pearl TV Tower) कडे धाव घेतली.
धो धो पाऊस सुरू होण्यापूर्वी टॉवरच्या दारातून आत घुसलो. बाहेरून फक्त टॉवरसारखी दिसणारी ही वास्तू एक भलीमोठी इमारत आहे हे आत गेल्यावरच कळते... आत शॉपिंग कॉम्प्लेक्स, रेस्तराँ, इत्यादीसह एक मोठा मॉलच आहे.
.
जवळ जवळ ३० जणांना घेऊन एका महाकाय लिफ्टने आम्हाला एका मिनिटापेक्षा कमी वेळात २६३ मीटर उंच टॉवरच्या सर्वात वरच्या गोलात पोहोचवले. येथे एक निरीक्षण गॅलरी आहे. पण एवढे ढग गोळा झाले होते की आजूबाजूचे काहीही धड दिसत नव्हते...
.....................
.
.
अर्धा पाऊण तास वाट बधून नाराजीने खाली जाणारी लिफ्ट पकडायला खालच्या मजल्यावर आलो. लिफ्टच्या रांगेत उभे असताना सहज बाजूला बघितले तर काहीजण काचेवर उभे असलेले दिसले. आणि एकदम आठवले की या टॉवरच्या खालच्या गोलात काचेची जमीन असलेला एक निरीक्षण मजला आहे. रांग सोडून तेथे गेलो... आणि या टॉवरवर आल्याचे सार्थक झाले ! या मजल्याची बाहेरच्या बाजूची ७५% जमीन काचेची आहे. २५९ मीटर (पाव किलोमीटरपेक्षा थोडे जास्तच !) उंचीवरच्या पूर्ण पारदर्शक काचेच्या जमिनीवर उभे राहणे हा एक थरारक अनुभव आहे ! सुरुवातीला त्या काचेवर एकच पाय ठेवला तरी खाली पडल्याचा भास होतो. बरीच माणसे बाजूच्या २५% लाकडी भागावरूनच चालून फक्त काचेतून डोकावून समाधान मानत होती. पण एकदा भीड चेपली आणि पहिल्यांदा रेलिंगला धरून आणि नंतर मोकळ्या हातांनी चालण्याचा धीर झाला की केवळ "हवेत चालणे" म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव येतो ! माझ्याकरता या दिवसाचा हा परमोच्च बिंदू होता !!! मोजल्या नाही पण त्या मजल्यावर काचेवरून मी मनोर्याभोवती दहापेक्षा जास्तच फेर्या मारल्या असतील. तरी पुरे समाधान झाले नाही !
.
.
काही मोठी माणसे काचेवर जायला घाबरत होती तर काही बाप माणसे मजेत काचेवरून रांगत होती... अगदी टोकापर्यंत जाऊन "व्ही फॉर व्हिक्टरी" पण करत होती ;)
.
आणखी दुधात साखर म्हणजे हे सगळे होईपर्यंत चार वाजत आले होते आणि शांघाईचे ढग त्यांच्या प्रथेप्रमाणे कमी होऊ लागले. आजूबाजूच्या इमारती नजरेस येऊ लागल्या होत्या... फिनान्शियल सेंटरवर जाण्याचा बेत रहित करून येथेच जास्त वेळ घालवायचा निर्णय घेतला कारण फिनान्शियल सेंटर जास्त उंच असले तरी पर्ल टॉवर बंडच्या बाजूलाच असल्याने त्याच्यावरून आजूबाजूचे दृश्य जास्त चांगले दिसते. शिवाय बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीत अगोदरच जाऊन आल्याने उंचीपेक्षा दृष्टीसौंदर्य मला जास्त महत्त्वाचे वाटत होते.
टॉवरशेजारचा एक भलामोठा चौक आणि त्यावर पादचार्यांसाठी रस्ते ओलांडून जायला बनवलेला गोलाकार मार्ग...
बंड चे मनोहर दर्शन
.
पर्ल टॉवरच्या पायथ्याजवळचा परिसर
नंतर खाली उतरताना मधल्या काही मजल्यांवर थांबून जरा एका वेगळ्या कोनातून इमारती व बंड पाहायला मिळतात.
.
.
मी बघितलेला जगातला सगळ्यात मोठा आरसा +D!
टॉवर उतरून येईपर्यंत चार वाजून गेले होते. लॉस्ट हेवनच्या रिसेप्शनिस्टने टॅक्सीने पोचायला एक तास लागेल असे सांगितले होते. म्हणून इतर कुठे न जाता सरळ टॅक्सीवाल्याला पत्त्याचा कागद दाखवला आणि रेस्तराँच्या दिशेने निघालो. बरोबर ७ मिनिटात त्याने टॅक्सी थांबवली आणि एका कसलीच वाणिज्य पाटी नसलेल्या इमारतीकडे बोट दाखवले. मी मनात म्हटले "परत भाषेचा घोळ झालेला दिसतोय!" मी नाही म्हणण्याच्या अनेक खाणाखुणांचा प्रयोग टॅक्सीचालकावर प्रयत्न केला पण तो ऐकेच ना ! शेवटी खाली उतरून (पटकन निघून गेला तर अजून पंचाईत म्हणून पैसे दिले नव्हते +D) इमारतीजवळ जाऊन बघितले आणि खरंच "Lost Heaven" नावाची एक छोटी पाटी गेटवर होती. काचेच्या दरवाज्यातून रेस्तराँचे रिसेप्शन दिसत होते. परत जाऊन टॅक्सीचे बिल चुकते केले आणि रेस्तराँमध्ये प्रवेश केला.
पण आत सगळी सामसूम. जरा आवाज दिला तर आतून एक ललना आली आणि स्वागत करून म्हणाली रेस्तरॉ उघडायला अजून वेळ आहे. मी विचारले की मी दुपारी फोन करून बुकिंग केले तेव्हा कोण बोलत होते. वहीतल्या यादीत माझे नाव बघून म्हणाली मीच होते. संग्रहालयापासून इथे यायला मला फारफार तर १५ मिनिटे लागली असती, पर्ल टॉवरवरून तर फक्त सातच मिनिटेच लागली, मग तू एक तास लागेल असे का सांगितलेस असे विचारले तर म्हणाली, "मी शांघाईची नाही. हुन्नानमधली (१,००० किमी किंवा जास्त दूरचा प्रांत) आहे. मला टॉवर, संग्रहालयच काय पण शांघाईतलं इतर काहीच माहीत नाही. मी आपलं तुम्ही उशीरा येऊ नये म्हणून एक तास सांगितला. आता मी काय बोलणार? मनातल्या मनात कपाळाला हात लावला. हिला जर बरोबर माहिती असती तर माझे दुपारचे जेवण इथे झाले असते आणि मला फिनान्शियल सेंटर बघायला व मॅगलेव्ह रेल्वेचा प्रवास करायला पुरेसा वेळ मिळाला असता.
मॅगलेव्ह (मॅग्नेटीक लेव्हिटेशन) म्हणजे चुंबकीय क्षेत्राच्या बळावर हवेत तरंगती राहून २०० किमी प्रतीतास जाणारी रेल्वे. जगात शांघाई या एकमेव ठिकाणी ही सर्वसामान्य माणसांना तिकीट काढून प्रवास करण्यास खुली आहे. हे प्रकरण व्यापारी तत्त्वावर फायदेशीर होऊ शकत नाही हे ध्यानात आल्यामुळे मॅगलेव्ह जगात इतर कोठेच प्रायोगिक अवस्थेच्या पुढे गेलेली नाही. चीननेही केवळ आपल्या भौतिकशास्त्रातील प्रगतीचे प्रदर्शन करण्यासाठीच हा तोट्यातला व्यवहार चालू ठेवला आहे. त्यामुळे फिनान्शियल सेंटरची भेट चुकल्याचे मला इतके वाईट वाटले नाही पण मॅगलेव्हचा प्रवास चुकल्याची रुखरुख अजूनही आहे. असो.
तासभर काय करायचे म्हणून बियर मागवून रेस्तरॉमधले फोटो काढून वेळ घालवायला सुरुवात केली. हरवलेला स्वर्ग (लॉस्ट हेवन) प्रथमदर्शनी छाप पडावा असाच आहे.
सजावट करण्यात काही कमी सोडली नव्हती... सगळीकडे खर्या फुलांची नयनमनोहर आरास होती... स्वागतकक्षात असे असणे स्वाभाविक होते...
.
पण हात धुण्याच्या बेसिनच्या रचनेत फुलांकरिता खास जागा होती...
खुर्च्या टेबले आणि रेस्तरॉचे अंतरंग फर्निचर आणि कलाकुसर तिबेटी ढंगातली होती...
.
जेवण तिबेटी पद्धतीचे आणि अर्थातच उत्तम होते. 'हरवलेला स्वर्ग' शियानमधल्या सहप्रवाशांनी केलेल्या स्तुतीला पात्र होता. तृप्त होऊन आणि रिसेप्शनमधल्या ललनेला माफ करून (अजून करणार तरी काय म्हणा +D) परत हॉटेलवर आलो. दिवसभराच्या घोळांनी थकवा तर आला होताच पण उद्या सकाळी ७.१५ चे विमान पकडायचे होते म्हणून लवकरच झोपी गेलो.
===================================================================
शांघाई विमानतळ मोठा आहे आणि देशोदेशींच्या विमानांची गर्दी झाली होती असे सांगितले तर त्यात नवीनं काहीच नाही. पण एक गोष्ट जी सहसा इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही ती दिसली म्हणून कॅमेर्याने टिपली.... शांघाईचा पुडाँग आंतरराष्ट्रीय विमानतळ अगदी समुद्रकिनार्याला लागून आहे आणि विमानतळावर उभ्या विमानांना पाण्यातल्या जहाजांची पार्श्वभूमी लाभली होती !
शांघाईला शेवटचा रामराम करून विमानाने आकाशात भरारी घेतली आणि अचानक आठवण झाली की अरे आज चोविसावा दिवस ! नवनवीन मनोहर नजारे पहाता पहाता तेवीस दिवस कसे भुर्रकन उडून गेले. आता परत चाललोय याचे नाही म्हटले तरी थोडेसे दु:ख झाले नसते तरच आश्चर्य होते !
जागा अर्थातच खिडकीजवळची होती ! पण वरूणराजाने ढगांची एवढी पखरण करून ठेवली होती की विमान हवेतून न उडता दुधसागरातून तरंगत चालले आहे असेच वाटत होते. ब्रह्मदेशावरून जाताना जरासा ढगांचा पडदा दूर झाला आणि हिमालयाच्या सरळसोट उत्तर-दक्षिण पर्वतरांगांचे दर्शन झाले. या भागात पर्वतांची उंची कमी असल्याने आणि पावसाळ्याचे दिवस असल्याने ते हिरवेगार दिसत होते.
परत भारतावरून जाताना बदमाश ढगांनी मातृभूमीचे दर्शन होऊ दिले नाही :(. काही वेळाने ओळखीचा भूभाग दिसला... चला दुबई आली.
दुबईत चार तास थांबून पुढचे विमान पकडायचे होते. पण दुबईच्या टर्मिनल-३ मध्ये चार तास घालवणे तसे फारसे कठीण नाही. एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत रमत गमत एकदोन फेर्या मारून आणि ड्यूटी फ्री शॉपिंग एरियात (काहीही खरेदी न करता) विंडो शॉपिंग करत तीन चार तास सहज जातात. दुबई हा खाडी देशांतील सर्वात महत्त्वाचा एअर हब असल्याने हे अनेकदा (नाईलाजाने) करावे लागलेले आहे. दुबईचे टर्मिनल-३ मात्र खूप छान बनवलेले आहे.
.
विमानाने दुबईची जमीन सोडून आकाशात भरारी घेतली तेव्हा पहिल्यांदा दुबईचं हे विहंगम दृश्य दिसलं...
...आणि थोड्याच वेळात संघ्याकाळच्या धूसर प्रकाशात दुबईच्या आकाशरेखेचं दर्शन झालं... जगातील सर्वात उंच इमारत "बुर्ज खलिफा" ने इतर ७०-८० मजली इमारतींना एकदम खुजे करून सोडलं होतं !
विमानाने खाडीवर भरारी घेतली आणि मानवनिर्मित पाम बेटे मागे जाऊ लागली...
आता एक लांबलचक स्वप्नसफर संपून उद्यापासून रोजची घावपळ सुरू होणार हे नाईलाजानं मान्य करावंच लागलं :(
(समाप्त)
शेवटचे पान
वाचकहो अनेकानेक धन्यवाद!!!
हुश्श !!! आज ही प्रवास मालिका संपवताना सर्वात पहिली हीच भावना मनात आली !
चीन सहलीवरून परत आल्यानंतर अर्थातच मोठ्या उत्साहाने नातेवाईक व ओळखीच्या लोकांना फोटो दाखवून सहलीच्या सुरस कहाण्या सांगणे हे ओघाने झालेच. त्यातल्या काही जणांनी मी हे सर्व लिहून काढावे असे मत दिले, पण तेवढा उत्साह माझ्यात नव्हता.
नंतर मिसळपाववरच्या भटकंतीतले लेख वाचता वाचता नोव्हेंबरच्या शेवटी केव्हातरी लिखाणाच्या किड्याने चावा घेतला आणि १ डिसेंबरला पहिला भाग चिकटवला... पहिल्यांदा मजा वाटली पण तिसर्या चवथ्या भागापर्यंत आल्यावर कल्पना आली की पहिल्याच प्रयत्नासाठी चीनची सफर निवडून एक मोठे वजन डोक्यावर घेतले आहे. हे काम सहज १५-२० भागांपर्यंत जाईल असे वाटले होते आणि प्रत्यक्षात २१ भाग झाले आणि ते लिहायला एकूण दोन महिने लागले ! शिवाय मराठीत सलग दोन ओळींपेक्षा जास्त कित्येक वर्षांत, किंबहुना दशकांत, लिहिले नव्हते. पण घेतलेले कार्य अर्धवट सोडायचे नाही ह्या सवयीचा थोडा बहुत फायदा झाला!
तरीसुद्धा हे लेखन होण्यात सर्वात जास्त महत्त्वाचे योगदान आपण रसिक वाचकांच्या मिळालेल्या सहभागाचेच होते... बऱ्याच जणांनी प्रतिसाद लिहून वारंवार पावती दिली त्यांचे पूर्णपणे आभार मानणे शक्यच नाही. त्याचबरोबर इतर बरेच जण मूकपणे का होईना वाचत आहेत ही जाणीव पुढचा भाग लिहिण्यासाठी बळ देत होती. वाचकांशिवाय नसता या लेखनाला अर्थ व नसते मिळाले लेखनासाठी बळ !
ही सफर करताना जेवढी मजा मला आली होती, तेवढीच मजा ते अनुभव तुम्हाला सांगताना परत आली... हा माझाच एक फार मोठा फायदा या लिखाणामुळे झाला. माझी मजा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात मी काही अंशी तरी यशस्वी झालो असेन हीच आशा आहे.
सर्व प्रतिसादकर्त्यांना आणि वाचकांना परत एकदा शतशः धन्यवाद !!!
===================================================================
ड्रॅगनच्या देशात : ०१... ०२... ०३...०४... ०५... ०६... ०७... ०८...०९...१०...११...१२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...
===================================================================
प्रतिक्रिया
27 Jan 2013 - 1:41 am | रेवती
सुरेख लेखमाला आणि छायाचित्रांबद्दल अनेक आभार. तुमच्या भाषाशैलीने माझ्यासारखेच अनेकांना अक्षरश: गुंतवून ठेवले. कुठेही उणे म्हणून नाही. तुमच्या सुंदर चीनभेटीला दृष्ट लागू नये म्हणून मॅगलेव्हने प्रवास करायला मिळाला नाही. आता मला चीनच्या प्रवासाला जाण्याची अजिबात गरज वाटत नाही. पुन्हा एकदा धन्यवाद.
27 Jan 2013 - 2:27 am | अग्निकोल्हा
महासत्ता ही ओळख मात्र ठसतेय चिन बाबत.
27 Jan 2013 - 2:34 am | बॅटमॅन
अप्रतिम केवळ!!!
बहुत काय लिहिणे, मर्यादेयं विराजते |
27 Jan 2013 - 2:58 am | दादा कोंडके
खुप छान लेखमाला. चीन सफरीवर निघणार्या माराठी माणसाला अगदी विकीट्रॅवल्स सारखा संदर्भ उपलब्ध करून दिलात. इतरही देशातलं प्रवासवर्णनं येउ द्या.
27 Jan 2013 - 3:51 am | नेत्रेश
खुप छान लेखमाला. उत्तम लेखनशैलीतील प्रवासवर्णन. आता चीनला भेट द्यायलाच हवी.
27 Jan 2013 - 7:44 am | नरेंद्र गोळे
लांबलचक स्वप्नसफर >>> आवडली. तिचे वर्णनही आवडले. आणि फोटो तर बेहद्द आवडले.
ह्या अद्भूत प्रवासाचे वर्णनात्मक पुस्तक अवश्य करा. उद्धव ठाकरेंच्या "महाराष्ट्र देशा" पुस्तकासारखेच फोटो प्लेटस वरच करा. भरपूर प्रतींची आवृत्ती काढा म्हणजे त्या पुस्तका सारखीच (रु.१००/-) किंमतही ठेवता येईल. पुस्तकाचे नाव "चीनी चमत्कार" असे ठेवा.
28 Jan 2013 - 2:11 am | कवितानागेश
सम्पूर्ण प्रवासवर्णन वाचताना मलापन असंच वाटतय की याचे पुस्तक होउ शकेल.
सगळे फोटो तर फारच सुंदर आहेत.
27 Jan 2013 - 11:14 am | पियुशा
व्वा !! सर्व भाग सुरेख अन फोटो अप्रतिम होते तुमच्या या लेखांमुळे काही जण नक्कीच चीन सफरीचा बेत आखतील हे नक्की :)
27 Jan 2013 - 12:04 pm | संजय क्षीरसागर
हे एकदम खरंय.
तुमच्याकडे खुमासदार लेखनशैली आहे. असेच लिहीत रहा!
27 Jan 2013 - 12:21 pm | चित्रगुप्त
अद्भुत प्रवासवर्णन आणि फोटो.
आता कोणत्या देशाचा दौरा? वाट बघत आहोत.
27 Jan 2013 - 12:56 pm | सूनिल
मस्त, सुरेख,वाचनिय आणी इतरही देशातलं प्रवासवर्णनं येउ द्या.
27 Jan 2013 - 6:58 pm | मेघनाद
समाप्त हा शब्द बघितला आणि थोडा विरसच झाला.....पण तुम्ही लिहिलेला प्रत्येक भाग अगदी व्यवस्थित वाचून काढला आहे.
लेखनशैली आणि छायाचित्रे तर उत्तमचं.....
आपली इतर प्रवासवर्णने वाचायला आवडतील...
27 Jan 2013 - 10:08 pm | अशोक सळ्वी
अप्रतिम्...शब्द गहिवरलेत!
आता नव्या देशाची सफर घड्वा आम्हाला!
28 Jan 2013 - 12:06 am | अत्रुप्त आत्मा
फोटो आणी माहिती....नेहमीप्रमाणे जबरीच...! अतिशय छान लेखमाला...मनःपूर्वक धन्यवाद :-)
28 Jan 2013 - 4:08 am | स्मिता.
अप्रतिम फोटो आणि वर्णन असलेली ही लेखमाला २१ भागांची झाली हे सुद्धा लक्षात आले नाही एवढे सगळे भाग सुरस होते. आम्हाला घरबसल्या चीनची सफर केल्याचा आनंदानुभव मिळाला.
तुमच्या इतर प्रवासांबद्दलही वाचण्यास उत्सुक. पुलेशु.
28 Jan 2013 - 4:54 am | nishant
अप्रतिम फोटो आणि वर्णन...
28 Jan 2013 - 11:29 am | ५० फक्त
लई म्हंजे लईच भारी सगळं, फार फार धन्यवाद तुम्हाला. एका नविन उपक्रमाविषयी एक दोन महिन्यात व्यनि करेन.
28 Jan 2013 - 11:51 am | महेशकुळकर्णी
अप्रतिम मालिका !
तुमची लिहिण्याची शैली, तुम्ही काढलेले फोटो....
प्रत्येक भागाची आम्ही वाट पाहायचो आणि तुम्ही अपेक्षेप्रमाणे प्रत्येक भाग उत्तम दिलात.
आम्हाला अशी पर्यटन मालिका वाचायला आणि पाहायला दिल्याबद्दल खूप धन्यवाद!
- महेश
28 Jan 2013 - 11:57 am | झकासराव
अप्रतिम लेखमाला :)
28 Jan 2013 - 12:03 pm | चेतन माने
संपूर्ण लेखमाला खूप आवडली. पुस्तकरूपात आल्यास नक्की विकत घेऊ.
बाकी तुमच्या लिखाणात आणखी प्रवासवर्णन वाचायला आवडतील .
अनेक अनेक धन्यवाद चीनची अद्भुत सफर घडवल्याबद्दल :) :) :)
28 Jan 2013 - 12:37 pm | मृत्युन्जय
लेखमाला आवडली. चीनही आवडले :)
28 Jan 2013 - 2:00 pm | धनुअमिता
फोटो आणि वर्णन तर अप्रतिम.संपूर्ण लेखमाला अगदी मनापासून आवडली.
फोटो बघताना आणि वर्णन वाचताना अगदी त्या जागी आहोत असे वाटत होते.
धन्यवाद चीनची नयनरम्य सफर घडवल्याबद्दल.
28 Jan 2013 - 2:03 pm | आनन्दिता
अतिशय सुंदर लेखमाला... चीन ची सफर करुन आल्यासारखं च वाट्तं..
आता अजुन कुठलं छान डेस्टीनेशन निवडून मस्त सफर करुन या अन व्रुत्तांत लिहायला घ्या बरे!!
28 Jan 2013 - 2:13 pm | मालोजीराव
लेखमाला संपूच नये असंच वाटत होतं...प्रत्येक भाग साठवून ठेवावा असा...!
28 Jan 2013 - 8:01 pm | शिद
अगदी मनातले बोललात...
@इस्पीकचा एक्का- तुम्ही केलेल्या चीन सफरीचे सगळेच २१ भाग वाचले पण ठरविल्याप्रमाणे शेवटच्या भागानंतर प्रतिक्रिया देत आहे. तुमच्या प्रवासाचे इतके सविस्तर आणि खुमासदार वर्णन आमच्या सर्वांपर्यंत पोहचवल्याबद्द्ल अनेक धन्यवाद...
28 Jan 2013 - 2:16 pm | नंदन
लेखमाला आवडली. फोटो, वर्णन, शैली - सारेच जमून आले आहे.
28 Jan 2013 - 2:28 pm | अजया
अजुन थोडे फिरायचे होतेत ना!!! आता दुसर्या देशाची सफर लवकर करा! आम्ही वाट पाहु नव्या लेखमालेची ;)
28 Jan 2013 - 4:05 pm | लाल टोपी
अतिशय नयनरम्य नेमके खुसखुशीत वर्णन सर्वच भाग पाहिले वाचले आणि फारच आवडले.. प्रवास करीत रहा आणि लिहीत रहा चांगली सफर घरबसल्या करवल्या बद्दल आभार...
28 Jan 2013 - 5:15 pm | Mrunalini
चीनची तुमच्या बरोबर आमची पण सफर खुप छान झाली... :)
28 Jan 2013 - 8:17 pm | मिहिर
अप्रतिम लेखमाला! वर्णन,फोटो सगळंच फार छान. खूप आवडली.
28 Jan 2013 - 9:36 pm | मिसळ
अप्रतिम लेखमाला. फोटो देखिल अतिशय सुन्दर.धन्यवाद.
28 Jan 2013 - 11:14 pm | सुनील
एवढा महाप्रचंड देश बघायला २४ दिवस लागणारच (बहुधा कुणाला भारत बघायचा असला तरी तेवढे लागतीलच) आणि तरीही काहीतरी राहून गेल्याची रुखरुख राहीलच!
असो, लेखमाला उत्तम झाली आणि फोटोही सुरेखच. वर म्हटल्याप्रमाणे पुस्तक काढायचे बघाच!
28 Jan 2013 - 11:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
आपल्यासारख्या रसिक वाचकांमुळेच हे सर्व शक्य झाले आहे.
थोड्याश्या विरामानंतर नविन सहलीचे वर्णन लिहिण्याचा मानस आहे. त्यावेळेसही असाच लोभ ठेवावा.
29 Jan 2013 - 9:01 am | प्रचेतस
शेजारचा देश असूनही त्याच्या अनोळखी अंतरंगाची छान सफर घडवलीत.
आता नविन सहलीचे वर्णन वाचण्यास उत्सुक आहे.
29 Jan 2013 - 1:55 pm | नि३सोलपुरकर
अतिशय सुंदर लेखमाला,वर्णन,फोटो सगळंच फार छान,तुमच्या बरोबर आमची पण सफर खुप छान झाली..
लेखमाला संपूच नये असंच वाटत होतं...
आता दुसर्या देशाची सफर लवकर करा आणी आमचीही अशीच सफर घडवा.
तुमच्या पुढील सहलीस खुप खुप शुभेच्छा
आम्ही वाट पाहु नव्या लेखमालेची
29 Jan 2013 - 2:38 pm | स्वराजित
संपूर्ण लेखमाला अगदी मनापासून आवडली.
3 Feb 2013 - 11:11 pm | विलासराव
सगळी लेखमाला वाचली आहे.
खुपच भावली.
4 Feb 2013 - 9:17 pm | मुक्त विहारि
संपूच नये, असे वाटायला लावणारी.
15 Jul 2013 - 4:26 pm | गजानन५९
Hats offffff Sir :)
1 Oct 2017 - 9:55 am | प्रिया१
All the parts are very informative and photos are so good and please don't reduce number of photos in your articles. While reading I felt like I'm actually living this journey. With your effective writing, photographs is an additional treat. Keep traveling and writing!!!
1 Oct 2017 - 6:33 pm | धर्मराजमुटके
अप्रतिम लेखमाला ! चीनची एवढी प्रगती बघुन एक देश म्हणून आपण खरोखरीच कोठे आहोत असा प्रश्न पडला आहे. राज्यकर्ते काही म्हणोत, पण जर समजा युद्ध झालेच तर आपण काय चीनच्या बरोबरीत टिकत नाही एवढे नक्की !