ड्रॅगनच्या देशात १९ - शांघाई : French Concession, Xintiandi, यू युवान बाग, संग्रहालय आणि जेड बुद्धमंदीर

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
22 Jan 2013 - 2:09 am

===================================================================

ड्रॅगनच्या देशात : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

===================================================================

शांघाई बद्दल बरेच काही ऐकले होते. "मुंबईची शांघाई करू" वगैरे सारख्या गाजलेल्या वक्तव्यांनी नावाजलेली ही शांघाई शांघाई आहे तरी कशी असे कुतूहल फार दिवसांपासून मनात होते. त्यामुळे सहलीचा एकविसावा दिवस बर्‍याच उत्सुकतेत उजाडला. अर्थात बिछान्यातून उठल्यावर दिवसाचा पहिला थांबा म्हणजे खोलीची बाल्कनी हे ठरलेलेच होते...

ढगाळलेले आकाश, किंचित धुके आणि बर्‍यापैकी सूर्यप्रकाश असतानेचे हे दिवसा केलेले पहिले शांघाई अवलोकन...

उत्तुंग इमारतींपासून...

...ते अगदी मध्यमवर्गीय वस्तीपर्यंत.

जरा उंचीवरून बघितला की कुठल्याही नगरीचे एक विलोभनीय रूप तर दिसतेच पण बर्‍याचदा डंखवण्यासाठी लावलेल्या मेकअपमागचा चेहराही दिसतो.

आज शांघाईची सहल करायची होती. निघताना गाईडने हॉटेलच्या रिसेप्शनमधून छत्री घ्यायला सांगितले. उन्हाळ्याच्या दिवसात शांघाईमध्ये बहुदा रोजच पाऊस पडतो... विशेषतः दुपारी दोन ते चारच्या दरम्यान. तेव्हा छत्री ही एक आवश्यक गोष्ट आहे. हॉटेल्स फक्त डिपॉझिट घेऊन तात्पुरत्या वापरासाठी छत्री मोफत देतात.

पहिला थांबा होत जुने शांघाई. जरी या जागेला जुने शांघाई म्हणत असले तरी फक्त जागाच जुनी आहे. घरे, रस्ते वगैरे सगळे नवे आहे! सम्राटाच्या काळात काही पाश्चात्त्य राष्ट्रांना शांघाई गावाबाहेरच्या जमिनी करारपट्टीवर वापरायला दिल्या होत्या... त्यातल्या काही व्यापारी करारांवर तर काही युद्धात झालेल्या तहांच्या करारांमुळे दिल्या होत्या. आता करारांची मुदत संपल्यानंतर त्या सर्व एक एक करत चीनने परत ताब्यात घेतल्या आहेत. या बाबतीत १९९७ मध्ये हाँगकाँगचे जगभर गाजलेले उदाहरण आठवत असेलच. शांघाई हे शहर यांगत्सेच्या त्रिभुज प्रदेशावर वसलेले प्राचीन शहर आहे. अर्थातच ते शेकडो वर्षांपासून एक मुख्य प्रशासकीय केंद्र असण्याबरोबर एक जागतिक स्तराचे व्यापारी बंदरही आहे. त्यामुळे चीनमध्ये पाश्चात्त्य सत्तांचा शिरकाव या बंदरातून होणे स्वाभाविक होते. प्रसिद्ध अफुयुद्धात मिळवलेल्या विजयामुळे झालेल्या नानकिंग तहात इ. १८४२ मध्ये ब्रिटिशांना सर्वप्रथम शांघाईमध्ये आंतरराष्ट्रीय वसाहत स्थापण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर अनेक पाश्चात्त्य सत्तांनीही चीनमध्ये शिरकाव करण्यास सुरुवात केली. त्यात इंग्रजांबरोबर फ्रेंच व अमेरिकन महत्त्वाचे होते. याचा एक फायदा असा झाला की शांघाई आशिया-पॅसिफिक भागाचे आंतर्राष्ट्रीय व्यापाराचे अग्रगण्य केंद्र बनले.

त्यानंतर १९४९ साली कम्युनिस्टांनी चीनमध्ये सत्ता हस्तगत केल्यावर त्यांनी फक्त समाजवादी देशांशी व्यापारउदीम करण्यावर भर दिला. त्यामुळे शांघाईचे आंतरराष्ट्रीय व्यापारातले महत्त्व कमी झाले. मात्र १९९० च्या दशकात डेंग शियाओपिंग ने सुरू केलेल्या व्यापारी उदारीकरणाच्या लाटेत प्रचंड प्रमाणात विकासाची कामे केली गेली आणि त्यामुळे शांघाई परत एकदा जागतिक कीर्तीचे वित्त, व्यापार आणि परदेशी गुंतवणुकीचे केंद्र बनले आहे. ते एवढे की सध्याची शांघाईची गगनचुंबी इमारतींनी तयार झालेली लिजियाझुइ आकाशरेखा (Lujiazui skyline) ही आकाशरेखांमधील "जागतिक शो पीस" समजली जाते. तिचे रात्रीचे दर्शन आपण या आधीच्या भागात घेतले आहेच. पण तिच्या दिवसाच्या नयनमनोहर दर्शनाच्या अनेक छटाही पुढे येतीलच.

पाश्चात्त्य देशांना वापरण्यास दिलेल्या जमिनींना कन्सेशन्स असे संबोधत असत. आजही चिनी भाषेत वेगळी नावे असली तरी या भागांना इंग्लिशमध्ये कन्सेशन्स असेच संबोधले जाते. बहुतेक कन्सेशन्समधील जुन्या इमारती नष्ट झाल्या होत्या किंवा मोडकळीला आल्या होत्या. व्यापारी उदारीकरणाच्या काळात त्यांच्या जागी आता मौजमजा व पर्यटन डोळ्यासमोर ठेवून तशाच युरोपियन पद्धतीच्या इमारती बांधून त्या काळाचे वातावरण निर्माण केले आहे. दिवसा फिरून मजा बघायला आणि रात्री खाण्यापिण्याची धमाल करायला आलेल्या प्रवाशांनी आणि स्थानिक लोकांनी ही जागा सतत गजबजून गेलेली असते. तर चला जाऊया त्यातले सर्वात जास्त प्रेक्षणीय फ्रेंच कनेक्शन.... अर्रर्र.. कन्सेशन ;) बघायला...

अगदी जुन्या पॅरिससारखे वातावरण निर्माण केले आहे...

तसेच जुन्या काळचे छोटे चौक आणि त्यांच्या मध्यातील सुंदर कारंजी आणि शिल्पे...

अरुंद गल्ल्या आणि त्याच्यातली जुनी नावाजलेली रेस्तराँ...


.

इथली फेरी आपल्याला पॅरिसच्या एखाद्या सुंदर गल्लीत घेऊन जाते.

मध्येच एक दगडी इमारत लागते. चिनी कम्युनिझमच्या दृष्टीने या इमारतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे...

येथे माओ झेडाँगच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्टांची पहिली बैठक झाली होती. त्या काळी चीनमध्ये नॅशनॅलिस्ट सरकार होते आणि कम्युनिस्ट त्यांची सत्ता उलथवून टाकण्याच्या प्रयत्नात होते. या बैठकीचा सुगावा फ्रेंच कन्सेशनच्या पोलिसांना लागला आणि त्यांनी छापा घातला. मात्र कम्युनिस्ट त्याअगोदरच तेथून पळून गेल्याने बचावले. नाहीतर चीनचा गेल्या साठ-सत्तर वर्षांचा इतिहास फार वेगळा असता !

तेथूनच थोडे चालून पुढे गेलो की Xintiandi (नवीन स्वर्ग आणि पृथ्वी) नावाचा विभाग सुरू होतो. हा भाग म्हणजे एक प्राचीन शैलीत बांधलेल्या चिनी इमारतींचे प्रदर्शनच आहे...


.


.


.

मात्र त्या इमारतींच्या आत सर्व प्रकारच्या आधुनिक सुखसोयीने परिपूर्ण दुकाने आणि रेस्तरॉं आहेत! या असल्या इमारतींमध्ये मॅकडोनाल्ड, केएफसी, स्टारबक्स, इ जगप्रसिद्ध नावांची रेलेचेल बघून खूप करमणूक झाली !

एका कोपर्‍यातून हे "काल-आज-उद्या" चे झालेले मनोहर दर्शन...

या चित्रात सर्वात जवळ चीनच्या भूतकालातील इमारती दिसताहेत; त्या इमारतींच्या गर्दीतून दूरवर एक भोक असलेली इमारत दिसते आहे, ते आहे शांघाई जागतिक वित्त केंद्र (Shanghai World Financial Center) जी आजच्या घडीला उंचीमध्ये चीनमधली एक क्रमांकाची व जगातली दोन क्रमांकाची इमारत आहे; आणि तिच्या पुढच्या बाजूला बांधकाम चालू असलेली (क्रेन्स असलेली) इमारत नजिकच्या भविष्यात चीनमधली सर्वात उंच इमारत असणार आहे !

असेच फिरत जरा पुढे गेले म्हणजे आपण यु युवान (हिला नुसते 'यु' अशा संक्षिप्त नावानेही ओळखतात) बागेत पोहोचतो. जुन्या काळी चिनी राजघराण्यात अधिकार्‍याची नोकरी मिळवण्यासाठी "इंपेरिअल परीक्षा" उत्तीर्ण व्हावी लागत असे. एका वरिष्ठ अधिकार्‍याचा पान युंदुआन नावाचा मुलगा या परीक्षेत नापास झाला (आवांतर: म्हणजे त्या काळी ह्या परीक्षेत वशिलेबाजी चालत नव्हती असे दिसते :) !) तेव्हा त्याने फावल्या वेळेचा उद्योग म्हणून १५५९ साली ही बाग आपल्या पिताश्रींना निवृत्तीच्या काळात राहण्यासाठी भेट म्हणून बनवायला सुरुवात केली. पण नंतर त्याची सिचुआन प्रांताचा गव्हर्नर म्हणून नेमणूक झाल्याने हे काम १५७७ पर्यंत १८ वर्षे बंद होते. त्यानंतर जेव्हा ही बाग बांधून पूर्णं झाली तेव्हा ती शांघाईमधली सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित बाग गणली गेली. मात्र तिच्यावर झालेल्या खर्चाने पान कुटुंब मात्र कफल्लक झाले! त्यानंतर बागेची मालकी बर्‍याचदा बदलली. शांघाई जवळच्या बर्‍याच युद्धांत तिला छावणीचे केंद्र म्हणूनही वापरण्यात आले. युद्धांत आणि दुर्लक्ष केल्यामुळे तिचे बरेच नुकसानही झाले. सरते शेवटी शांघाई प्रशासनाने १९५६ ते १९६१ या काळात जीर्णोद्धार करून ही बाग १९६१ मध्ये जनतेसाठी खुली केली. १९८२ मध्ये तिला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जाही दिला गेला.

पाच एकरांवर पसरलेली ही बाग चिनी लोकांची सौदर्यदृष्टी आणि त्यांचे निसर्गावरचे प्रेम यांचे अप्रतिम उदाहरण आहे. पण तसेच दोन वृद्ध माणसांच्या राहण्याच्या जागेवर केलेल्या संपत्तीच्या उधळपट्टीच्या अतिरेकाचेही उत्तम उदाहरण आहे ! ऋतुमानाला अनुसरून लावलेल्या वृक्षराजी आणि त्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यास मोक्याच्या जागी बांधलेल्या खोल्या, निरीक्षण मंच (pavilions) आणि मनोरे; स्वतंत्र आणि एकमेकाला जोडलेले अनेक आकाराचे आणि पाणवनस्पतींनी भरलेले तलाव; कलात्मक पद्धतीने केलेली फुलझाडांची लागवड; आणि या सगळ्यावर कळस म्हणजे असंख्य चमत्कृतीपूर्ण आकाराचे दगड या सगळ्यांनी ही बाग जगप्रसिद्ध बनली आहे ! कुटुंबाचे दिवाळे काढले म्हणून पान युंदुआनला मूर्ख म्हणावे की एक जगावेगळी चमत्कृतीपूर्ण देखणी बाग बनवली म्हणून त्याचा उदोउदो करावा असा यक्षप्रश्न पडतो !

ही त्या बागेची आणि ती बसून बघण्याची मजा घेण्यासाठी बनलेल्या निरीक्षण मंच व मनोर्‍यांची चित्रे...


.


.


.


.

महत्त्वाची चिनी इमारत म्हणजे सुखशांतीच्या हमीसाठी ड्रॅगन हवेच

ह्या खालच्या चित्रातला मधला दगड संपूर्णपणे जेडचा आहे.

एक दिवाणखाना ...

आणि हे आहेत गृहसंकुलांतल्या खोल्यांना जोडणारे मार्ग...


.

 ........................

दगडावरच्या कोरीवकामाची कलाकुसर...

छान होते हे छोटेसे घर म्हाताराम्हातारीला राहायला रिटायर झाल्यावर, नाही का ? ;)

बागेच्या बाहेर पडलो आणि एका दुकानात हा चिनी विनोदबुद्धीचा एक उत्तम नमुना दिसला ! "माओ आणि ओबा माओ" दोघेही चिनी कॉमरेडच्या टोप्या घालून :) !

जेवायला जाता जाता शांघाई बंडवर एक थांबा घेतला. पण 'ढग मेघांनी आक्रमीले' आणि थोड्याच वेळात सुरू झालेल्या धुवांधार पावसाने प्रवासीजन इमारतींच्या आसर्‍याला पळाले. गाईडच्या सांगण्यावरून घेतलेल्या छत्रीची काही पत्रास चालणार नाही अशी मुसळधार वर्षा झाली. पण गाईड म्हणाली, "घाबरायचे कारण नाही अर्ध्या एक तासात सगळे ठीक होईल. सहल खराब होणार नाही. तेवढ्यात आपण जेवून घेऊ." तिने मोबाईल वापरून चालकाला बस आमच्या जवळ आणायला सांगितली आणि आम्ही धावतपळत बसमध्ये चढलो. त्याअगोदर बंड च्या काठावरून काढलेले हे शांघाईच्या जगप्रसिद्ध लिजिआझुइ आकाशरेखेचे विलोभनीय चित्र.

जेवण आटपून बाहेर आलो तो काय, खरंच आकाश बरेचसे उजळले होते आणि पाऊस तर एकदमच थांबला होता. बसमध्ये बसून शांघई म्युझियम बघायला गेलो. संग्रहालयाचा परिसर आणि स्वागतकक्ष यांचे रूप "संग्रहालय कमी आणि पंचतारांकित हॉटेल जास्त" असे आहे. वानगीदाखल ही काही चित्रे...


.


.

या संग्रहालयात पाच मजल्यांवर आणि एकूण ३९,२०० चौ मीटर क्षेत्रफळाचे अकरा विशाल स्थायी कक्ष (galleries) आणि तीन खास प्रसंगोचित कक्ष आहेत. ते बघायला राखलेल्या दीड तासांचे ताणून दोन तास केले तरी बर्‍याच ठिकाणी फक्त भोज्ज्याला शिवून आलो असे वाटले. सगळे नीट बघायचे असेल तर कमीतकमी दोन दिवस (१२ तास) तरी जरूर लागतील.

विस्तारभयास्तव येथे फक्त निवडक चित्रे देत आहे...

जेडच्या कोरीवकामाचा प्राचीन नमुना...

फर्निचर

लाकडी खुर्च्यांचे कालपूर्ण नमुने...

आशियातल्या (सध्याच्या पाकिस्तान व अफगाणिस्तान व इराणच्या उत्तरेकडील भाग) कुशाण राज्यांच्या नाण्यावर शिवमुद्रा होती ही माहिती दिसली.

चिनी मातीच्या सुरया...

 ........................

बुद्धमूर्ती...

 ........................

जमातींचे वेष

 ........................

संग्रहालयातून गाईडने आम्हाला जवळजवळ ओढूनच बाहेर कारण नाहीतर पुढचा महत्त्वाचा कार्यक्रम बिघडला असता. बस मग आम्हाला शांघाईच्या जगपसिद्ध जेड बुद्धमंदीराकडे घेऊन गेली.

अठराव्या शतकाच्या शेवटी हुइ जेन नावाचा एक बुद्धभिख्खू तिबेटच्या यात्रेवर गेला आणि परततीच्या प्रवासात काही काळ त्याने ब्रम्हदेशात वस्ती केली. तेथे त्याला चेन जुन्पू नावाच्या ब्रम्हदेशात स्थायिक झालेल्या चिनी गृहस्थाने जेडच्या पाच मोठ्या बुद्धमूर्ती भेट दिल्या. हुई त्यांतल्या फक्त दोन मूर्ती शांघाईला आणू शकला. या मूर्तीसाठी १८८२ साली या मंदिराची स्थापना झाली. त्यांतली मुख्य बसलेल्या अवस्थेतील १९० सेंमी उंच बुद्धमूर्ती अगेट व पाचूने मढवलेली आहे. तर दुसरी ९६ सेंमी लांबीची मूर्ती एका बाजूवर पहुडलेल्या निर्वाण अवस्थेतली आहे. या दोन्ही मूर्तीचे फोटो काढण्यास मनाई आहे. पण या मंदिरात निर्वाण अवस्थेतील मूर्तीची ४ मीटर लांब मोठी संगमरवरी प्रतिकृती ठेवली आहे तिचा फोटो काढता येतो.

या मंदिरात इतरही अनेक कलापूर्ण वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत. त्यापैकी काहींचे फोटो...

 ........................

हे भव्य मंदिर आणि त्याच्या अनेक विभागांत फक्त मूर्ती आणि अनमोल वस्तूच नव्हे तर त्यापेक्षा अधिक मौल्यवान किंबहुना अनमोलच असे समजले जाणारे ७,००० पेक्षा जास्त दाझांग सूत्राचे ग्रंथ ठेवले आहेत. एकंदर मंदिराचा परिसर आणि त्याच्यातील प्राचीन वस्तू पाहून कोणीही भारावून जाईल.

आजच्या दिवसाची सफर संपली होती. रात्री "ERA - Intersection of Time" नावाचा शो पाहिला. चिनी अ‍ॅक्रोबॅटीक्सचे टेक्नॉलॉजीचा कल्पक उपयोग करून कलापूर्ण दर्शन करण्याचा हा जगातला पहिलाच प्रयोग आहे आणि तो अत्यंत यशस्वीही झालेला आहे. मात्र फ्लॅशमुळे नेपथ्य व प्रकाशयोजनेला येणार्‍या अडथळ्यामुळे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे फोटो देऊ शकत नाही याबद्दल दिलगीर आहे. पण शांघाईला गेल्यास चुकवू नये असा हा कार्यक्रम आहे.

आजचा दिवस खरंच खूप मजेत गेला. काय बघू काय नको असे झाले होते. पण उद्या तर चीनच्या सर्वोत्तम चार प्राचीन खजिन्यापैकी उरलेली दोन स्थाने बघायची होती. त्यामुळे उद्या अजून काय आश्चर्यकारक बघायला मिळेल याचा विचार करतच झोपी गेलो.

(क्रमशः)

===================================================================

ड्रॅगनच्यादेशात : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

===================================================================

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

22 Jan 2013 - 3:36 am | चित्रगुप्त

वाहवा फारच सुंदर.
जुनी चिनी वास्तुकला, मूर्ती आणि चित्रकला फार उच्च दर्जाची आहे, आणि आधुनिक काळातसुद्धा त्या प्रकारची निर्मिती केली जात आहे हे विशेष. तुम्ही एवढ्या उत्साहाने आणि कसोशीने हा वृत्तांत आणि इतके अप्रतिम फोटो इथे देत आहात हे फार कौतुकास्पद आहे. चिनी चित्रकलेचे नमुने बघायला मिळाल्यास त्यांचे फोटो अवश्य द्यावेत. शुभेच्छा.

रेवती's picture

22 Jan 2013 - 3:44 am | रेवती

वाचतीये, बघतीये. नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण भाग. वेगळ्या तर्‍हेच्या खुर्च्यांचे चित्र मजेदार. बाकी खूप इतिहास जाणून घेणे कधीकधी ओझ्यासारखे वाटते.

५० फक्त's picture

22 Jan 2013 - 8:44 am | ५० फक्त

नैमीप्रमाणेच लई भारी,

आनन्दिता's picture

22 Jan 2013 - 8:51 am | आनन्दिता

खुप भारी....

अनन्न्या's picture

22 Jan 2013 - 4:31 pm | अनन्न्या

एका फोटोत चीन्यांकडून आपल्याकडे आलेल्या आकाशकंदिलासारखे काहीतरी दिसले. त्यांच्याकडचे असले तरी उगाच ओळखीचे वाटले. तिथली स्वच्छता पाहून मात्र आपले रस्ते आठवले,शहारे आले....

अत्यंत उत्तम वर्णनशैली आणि देखणी छायाचित्रं. एकदम दिलखुष, धन्यवाद!

बॅटमॅन's picture

22 Jan 2013 - 5:02 pm | बॅटमॅन

लै भारी हो. दर वेळेस वेगळी विशेषणे वापरू शकत नाही म्हणून इतकेच म्हणतो. :)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jan 2013 - 11:07 pm | अत्रुप्त आत्मा

+१

चेतन माने's picture

23 Jan 2013 - 10:36 am | चेतन माने

+१
पुभाप्र :)

सूनिल's picture

22 Jan 2013 - 5:46 pm | सूनिल

अप्रतिम.............

मालोजीराव's picture

22 Jan 2013 - 6:46 pm | मालोजीराव

चीनी इमारती लय भारी

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jan 2013 - 9:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकर्त्यांचे अनेक धन्यवाद !

लुप्त's picture

23 Jan 2013 - 2:55 am | लुप्त

सर्व भाग एका दमात
वाचुन घेतले धन्यवाद !!

खुर्च्या आवडल्या. फोटोज मस्त.
शेवटच्या फोटोतला उजवीकडचा फोटो हत्ती अन कलश दर्शवतो.

nishant's picture

23 Jan 2013 - 9:58 pm | nishant

निर्वाण अवस्थेतील मुर्ती फारच आवड्ली :)
बाकि लेख नेहमिप्रमाणेच छान जमलाय !