ड्रॅगनच्या देशात ०७ - शियान... मातीचे सैन्य ("Terracotta Army" or "Terracotta Warriors and Horses")

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
19 Dec 2012 - 11:44 pm

===================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११...१२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

===================================================================

आज शियांनमध्ये फिरण्याचा दुसरा दिवस. चीनमध्ये जाण्याची ओढ ज्यांच्यामुळे वाटत होती त्यातील एक फार महत्त्वाची गोष्ट आज पाहायला जायचे होते.

चीन राजघराण्याचा आणि एकत्रित चीनचा पहिला सम्राट चीन शी हुआंग (Qin Shi Huang) याच्या कर्तृत्वाची आपण मागच्या भागात थोडी चर्चा केली आहेच. याच सम्राटाने मेल्यानंतरही आपल्या दिमतीला सैन्य असावे म्हणून आपल्या थडग्यात पुरण्यासाठी भाजलेल्या मातीचे हजारो सैनिकांचे पुतळे बनवले. ते नंतर त्याच्याबरोबर, इ पूर्व २१० / २०९ साली, थडग्यात पुरले गेले. १९७४ साली शियान पासून ३५ किमी वर विहीर खोदताना काही शेतकऱ्यांना काही पुतळे सापडले व नंतर सरकारने ही जमीन ताब्यात घेऊन उत्खननाचे कामे सुरू केले आणि त्यांच्या हाती एक पुतळ्यांचे भांडारच लागले !

विशेष म्हणजे हे पुतळे साच्यांच्या साहाय्याने न बनवता प्रत्येक पुतळा हा खरोखरच सम्राटाच्या सैन्यात काम करीत असलेल्या वेगवेगळ्या सैनिकाला पुढे ठेवून बनवलेला आहे. त्यामुळे कोणतेही दोन पुतळे एकसारखे नाहीत. अजूनही त्या ठिकाणी उत्खनन चालू आहे. पुतळे मातीचे असल्याने काम फारच कौशल्याने आणि संथगतीने करावे लागते. आतापर्यंत मिळालेले आणि विशिष्ट तंत्रांनी बांधलेल्या अंदाजावरून येथे एकूण ८००० सैनिक, ५२० घोड्यांसकट १३० रथ आणि १५० घोडदळाचे घोडे आहेत. या प्रकाराचा येवढा अजस्त्र उपक्रम आजवर जगात परत झाला नाही. चीनमधल्या प्राचीन अवशेषामध्ये या आकर्षणाचा पहिला क्रमांक मानला जातो. प्रत्यक्ष दर्शन केल्यावर खूप जणांची प्रतिक्रिया अशीच होती की: "या एका स्थळाच्या भेटीने चीनची सहल यशस्वी झाली." तरी बरे आजपर्यंत फक्त निम्मे ते २/३ पुतळेच खोदून काढले आहेत. शिवाय सम्राटाच्या मूळ थडग्याला तर हातही लावलेला नाही. कारण तेथे राजप्रासाद, बागबगीचे यांच्याबरोबर पार्‍याने भरलेल्या नद्या व तलाव आहेत. पार्‍यामुळे होणारा पर्यावरणाचा र्‍हास न करता हे थडगे कसे खोदायचे हे अजूनही शात्रज्ञांना उमगले नाही. चला तर मातीच्या सैनिकाचे सैन्य बघायला.

येथे जाण्यापूर्वी आपल्याला हे सैनिक कसे बनवले असतील याची कल्पना येण्यासाठी एका मातीचे पुतळे बनवण्याच्या कारखान्यात नेतात. तेथे पुतळा बनवणे, त्याला भट्टीत भाजणे आणि मग रंगवणे या साऱ्या प्रक्रिया बघायला मिळतात.


.


.

नंतर अर्थात "अर्थकारण" सुरू होऊन कारखान्याच्या शोरूमची एका चक्कर होते. खरेदी करावयाची नसली तरी बरीच कलाकुसरीची कामे बघायला मिळतात.


.

तेथून पुढे मातीच्या सैन्याकडे निघालो. हे आहे उत्खनन क्षेत्राचे आवार.

हा आहे संपूर्ण उत्खनन क्षेत्राचे मॉडेल. यात जी बसक्या पिरॅमिडसारखी टेकडी आहे तेथे सम्राटाचे अजून न खोदलेले थडगे आहे. त्याच्यासमोर जे दोन आयत आहेत त्या ठिकाणांना सध्ध्या बरेच उत्खनन झाले आहे. इतर सर्व पांढरे ठिपके नंतरच्या सम्राटांची छोट्या थडग्यांच्या जागा दर्शवितात.

ह्या उत्खनन क्षेत्राचे एका वेगळेपण असे की जेथे या मूर्ती सापडल्या त्या सगळ्या क्षेत्राभोवती भिंत बांधून वर छप्पर टाकले आहे. अशा रीतीने सर्वच उत्खननक्षेत्र एका भल्यामोठ्या इमारतीनेच सुरक्षित केले आहे. उत्खनन केलेल्या प्रत्येक तुकड्याची शास्त्रीय पद्धतीने नोंदणी करून त्याच इमारतीतील एका मोकळ्या जागेवर त्याची साफसूफ करून मूर्तीची जुळणी करतात. आणि पूर्णं मूर्ती बनली की तिला तीच्या मूळच्याच जागेवर परत प्रस्थापित करतात. आपण हे सर्व इमारतीच्या भिंतींना लागून बांधलेल्या कट्ट्यावरून चारी बाजूंनी फिरून पाहू शकतो. या कल्पक आयोजनामुळे थडग्याची रचना व त्यांतील सैनिकांच्या मूर्तींची मांडणी अगदी मूळ जागेवर व मूळ स्वरूपात दिसते.


.


.

या जागेवर जमा केलेले तुकडे जोडून मूर्ती बनवल्या जातात.


.


.

आणि हे घोडे

प्रत्येक मूर्तीचा चेहरा, उंची व पेहराव (युनिफॉर्म) हे प्रत्यक्ष सैनिकांबरहुकूम बनवले असल्याने स्पष्टपणे वेगवेगळे दिसतात.

सहलीचा पुढचा टप्पा एका छोट्या शॉपिंग एरिया व उपाहारगृहातून आहे. त्याच्या प्रवेशद्वाराजवळ एका दुकानात ज्या चार जणांच्या शेतांत हे भांडार सापडले त्यापैकी एक शेतकरी बसला होता. वर भिंतीवर त्याचे चित्र आहे आणि खाली तो स्वतः: बसला आहे. त्याच्या दुकानातून १०० युवानचे माहितीपुस्तक विकत घेतले की त्यावर सही करून देत होता. याला चिनी कम्युनिस्ट कॅपिटॅलीझमचे उत्त्तम उदाहरण म्हणता येईल !

पहिल्या मोठ्या उत्खनन क्षेत्राजवळ अजून एक लहान उत्खनन क्षेत्र आहे. त्यामध्ये सैन्याची मुख्य छावणी (Head Quarter) आहे हे त्यातील मांडणीवरून व मूर्तींच्या अधिकाररपद दाखवणाऱ्या पोशाखावरून ओळखता येते.

शेजारीच एक प्रदर्शन आहे. त्यात पूर्णावस्थेत सापडलेल्या व काही विशेष महत्त्व असलेल्या मूर्ती ठेवल्या आहेत.

बसलेला धनुर्धर

बाण मारण्याच्या तयारीत असलेला धनुर्धर

अधिकारी

सेनापती

मूर्ती इतक्या बारकाईने बनवल्या आहेत की प्रत्येकाची केशरचनाही स्पष्ट दिसते.

उत्तम अवस्थेत सापडलेला संपूर्ण रथ

संग्रहालयातून बाहेर पडलो तर चीनच्या अख्ख्या सफरीत ही एकच म्हातारी बाई भीक मागताना दिसली.

आजच्या दिवसात बानपो या नावाच्या एका जागेलाही भेट दिली. येथेही उत्खननात सापडलेले ६००० वर्षांपूर्वीचे खेडे आहे. तेही त्याच्या सभोवती एका मोठी इमारत बांधून सुरक्षित ठेवले आहे. ही पुरातन वस्तू जतन करण्याची पद्धत वेगळी आणि खरोखरच innovative आहे.

हे त्या ६००० वर्षांपूर्वीच खेड्याचे काही अवशेष


.

आणि ते खेडे त्या काळी कसे दिसत असावे याचा संशोधाकांचा अंदाज.

परत येईपर्यंत बराच वेळ झाला. रात्रीचा शो बघायला उशिरा नको म्हणून त्वरित हॉटेलाच्या रेस्तरॉ मध्ये गेलो. वेटरने एक भले मोठे मेन्यु कार्ड आणून दिले... संपूर्ण चिनी भाषेतले. नशिबाने दर पानावर पदार्थांचे मोठे मोठे फोटो होते. पण एकाही पदार्थांची ओळख पटेना. त्या दिवशी गुरुवार होता. म्हणजे मांसाहार वर्ज्य. इंग्लिश समजणारी एकही व्यक्ती रेस्तरॉमध्ये नव्हती. वेटरमण्डळींशी खाणाखुणांची बरीच झुंज झाली. पण काही फायदा झाला नाही. शेवटी केवळ चित्रे बघून एक कोबीचा पदार्थ, एक वांग्याचा पदार्थ आणि भात सांगितला. भाताचे ठीक होते पण कोबी फक्त व्हिनेगार आणि लाल मिरच्यांमध्ये मुरवलेली होती. वांग्यांची भाजी म्हणजे बोट बोट लांब लाल मिरच्यांच्या भाजीत नमुन्यादाखल काही वांग्याच्या फोडी होत्या. दोन घास घेतले तेव्हाच ध्यानात आले की काही खरे नाही. भूकतर सॉलिड लागली होती आणि शोची वेळ जवळ येत होती. परत दुसरे काही मागविण्यासाठी वेळ नव्हता. जबरदस्तीने जेमतेम निम्मे पदार्थ खाऊन बाहेर पडलो.

चीनबाहेर म्हणजे भारतात किंवा अगदी पाश्चिमात्य देशांतही जे पदार्थ चिनी खासियत म्हणून प्रचंड प्रमाणात खपवले जातात त्यातला एकही पदार्थ चीनमध्ये पाहायला मिळाला नाही !

रात्री "The Great Chang'an " हा शो बघितला पण थिएटरामध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई असल्याने या मनोहर कार्यक्रमाचे फोटो नाहीत ह्याचा खेद आहे. पण चिंता नको. चीनमध्ये जागोजागी एकाहून एक सरस कार्यक्रम आहेत. पुढे त्यांचे फोटो येतीलच.

(क्रमशः)

===================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११...१२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

===================================================================

प्रतिक्रिया

रेवती's picture

20 Dec 2012 - 2:04 am | रेवती

सैनिकांची माहिती व फोटू चांगले आहेत पण एकदम इतके चायनीज चेहरे पाहायला कसेतरी वाटते. जेवणाचे काही फारसे खरे दिसत नाही. शाकाहार्‍यांचे तर नाहीच नाही. बहुतेक तुमच्या सफरीचा वृत्तांत वाचूनच समाधान करून घ्यावे लागेल, जाणे जमणार नाही. आपल्याला आधी बघताना सगळे चायनीज सारखेच दिसतात. त्यांच्या चेहरेपट्टीतला फरक काही दिवसांनी समजतो. तसेच एकदा एक चायनीज बाई सांगत होती की सगळे इंडीयन सारखेच दिसतात. मला फार आश्चर्य वाटले होते. ;)

आयला खायची एवढी बोंब म्हणजे अवघड आहे, कधी गेलो तिथं तर जाताना शेंगाच्या पोळ्या करुन घेउन जावं लागेल पोतंभर.

बाकी फोटो आणि माहिती नेहमीप्रमाणेच उत्तम. धन्यवाद.

अशोक सळ्वी's picture

20 Dec 2012 - 10:17 am | अशोक सळ्वी

२० वर्षा पूर्वी थायलंड गेलो होतो तेंव्हा असाच जेवणाचा त्रास झाला होता त्याची आठवण आली.
छान लिहिता. पुढ च्या भागाची प्रतीक्षा आहे.

इरसाल's picture

20 Dec 2012 - 10:23 am | इरसाल

हे मातीचे पुतळे आणी रथ वगैरे कुठल्याश्या पिक्चरमधे बघितले होते त्यात तो राजा दुष्ट शक्तींच्या सहाय्याने जिवंत होतो तसेच हे सैनिक पण जिवंत होतात.

येडगावकर's picture

20 Dec 2012 - 11:18 am | येडगावकर

The Mummy: Tomb of the Dragon Emperor

घाशीराम कोतवाल १.२'s picture

21 Dec 2012 - 8:34 am | घाशीराम कोतवाल १.२

मजा आली होति थेटरात पिच्चर बघताना मला पन लेख वाचत असताना पिच्चरची आठवण आली

मानस्'s picture

20 Dec 2012 - 10:49 am | मानस्

एक प्रश्न मनात आला.चीनची लोकसंख्या आपल्या भारतापेक्षा जास्त आहे,तर मग तिथे आपल्या सारखीच गर्दी,अस्वच्छता,वाहतूकीची कोंडी दिसत नाहीए,तिथे काय उपाययोजना करतात या सगळ्यासाठी?
उद्योगधंदे,विषेशतः इलेक्ट्रोनीक्स मध्ये या देश्याने खुप प्रगती केली आहे,तुमच्या या सहलीत यातलं काही पहायला मिळालं का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Dec 2012 - 2:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्वच प्रतिसादंबद्दल आभार !

खाणे:
खाण्याबद्दल बर्‍याचजणांना कुतुहल आहे म्हणूनएकत्रच उत्तर देत आहे. पुर्ण शाकाहारी मंडळींना चीनमध्ये जरा तयारीने जावे लागेल. कारण शाकाहारी म्हणजे भाजी असलेला कोणताही पदार्थ... मग त्यात मांसमासे अथवा अंडे असले तरी... ही व्याख्या केवळ चीनी नव्हे तर पाश्चिमात्य देशातही आहे. उदाहणार्थ चिकन / एग / पोर्क सलाद. पण जर तुम्ही काही उपाययोजना करून गेलात तर एक अत्यंत प्रेक्षणीय देश पाहण्यापासून वंचित रहाणार नाही:

१) चांगली टुर कंपनी निवडा, जी तुमच्या खाण्याच्या सवयींची नीट काळजी घेण्यासाठी जागोजागीच्या गाईडना योग्य सुचना देण्याची जबाबदारी स्विकारेल.

२) ३* अथवा वरिष्ठ हॉटेल्समध्ये न्याहारीत बर्‍यापैकी शाकाहारी पदार्थ असतात. शिवाय फळेही असतातच.

३) अडीअडचणीसाठी टिकाउ खाद्यपदार्थ बरोबर ठेवा. हे तुम्ही भारतातूनही नेऊ शकाल.

४) फळे सर्वत्र मिळतात. आपल्याला माहीत असलेली (उदा. : केळी, संत्रे, मोसंबी, कलींगड, बोरे, ई.) व ड्रॅगन फ्रूट सारखी माहीत नसलेलीही. छान व चवदार असतात.

मात्र तुम्हाला मांसाहार वर्ज्य नसेल तर फार त्रास नाही... भाषा सोडून. दुभाषा गाईडची मदत असली तर अजीबातच नाही.

स्वच्छता

स्वच्छता आणि निटनेटकेपणा हे गुण चीनमध्ये सर्वचजागी प्रकर्षाने जाणवले. अगदी छोट्या खेडेगांवांमध्येही कोठेही कचर्‍याचे ढीग अथवा अस्ताव्यस्तपणे पडलेल्या वस्तू दिसल्या नाहीत. आता पुढ्च्या सहा दिवसांमध्ये न मळलेल्या वाटांवरून प्रवास आहे, त्यामध्ये याचा प्रत्यय (फोटोंसहीत) येईलच.

स्मिता.'s picture

20 Dec 2012 - 5:11 pm | स्मिता.

हा ही भाग आवडला. मातीच्या पुतळ्यांबद्दल याआधी माहिती नव्हती. ही नवीन माहितीसुद्धा रोचक वाटली. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.

चाणक्य's picture

20 Dec 2012 - 5:21 pm | चाणक्य

मस्तच चाललीये तुमची (आणि तुमच्यामुळे आमची पण) सहल. फोटोमय सहल चांगली वाटतीये

बांवरे's picture

21 Dec 2012 - 5:38 am | बांवरे

नवीनच माहिती. रोचक आणि रंजक आहे. इतर भागांचे दुवे दिल्याबद्दल धन्यवाद !

रुस्तम's picture

21 Dec 2012 - 5:12 pm | रुस्तम

अप्रतिम वर्णन.. सगळे भाग वाचले.

बॅटमॅन's picture

22 Dec 2012 - 12:52 am | बॅटमॅन

हा भाग वाचायला उशीर झाला. नेहमीप्रमाणेच हुकुमी वर्णन आणि फटू!!! ते सैनिक्स तर लयच भारी, "शे-शे" व्हेरी मच एस्पिकचे एक्कासाहेब.