===================================================================
ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...
===================================================================
सहलीचा तेरावा दिवस उजाडला. कितीही विचार करायचा नाही असे ठरवले तरी आजच्या ली नदीवरच्या जलसफरीबद्दल प्रचंड उत्सुकता होती. टूर मॅनेजरने ही निवड सुचवली होती व कोणतेही असे सल्ले चिमूटभर मिठासह (with a pinch of salt +D) स्वीकारायचे असतात हे पूर्वानुभवाने शिकवले होते. मात्र नंतर आंतरजालावर केलेल्या संशोधनांत असे कळले की भेट दिलेल्या प्रवाशांच्या वार्षिक आकड्यांवरून बनवलेल्या यादीत या सफरीचा क्रमांक पहिला आहे! तरीसुद्धा "हे चीन बद्दलचे माझे अज्ञान की आंतरजालावरची चिनी विक्रीचातुर्याची झलक?" असा प्रश्न मनात येतच राहिला. पण हॉटेलबाहेर पडलो आणि हा विचार झटकून टाकला आणि "सगळे पूर्वग्रह सोडून सहलीची मजा घे" असे मनाला समजावले.
सहलीचा आजचा दिवस जरा लवकरच सुरू झाला. कारण मुख्य सहल म्हणजे "ली नदीवरची जलसफर" सुरू करण्या अगोदर ४५ मिनिटांचा चारचाकीचा प्रवास करून झुजिआंग येथील बोटीच्या धक्क्यावर ९ वाजता पोचायचे होते. तेथून पुढे यांगशुओ पर्यंतचा ८० किमीचा अंदाजे चार तासांचा प्रवास बोटीने करायचा होता. आम्हाला धक्क्यावर सोडून चालक सामान यांगशुओ मधल्या हॉटेलमध्ये घेऊन गेला.
हा बोटीचा प्रवास ज्या भागातून आहे तो ली नदीचा परिसर इतका धक्कादायक प्रकारे सुंदर आहे की त्याचे वर्णन नेहमी artist's masterpiece असे केले जाते. चकीत होऊन बघायला लावणार्या वेगवेगळ्या विचित्र आकाराच्या टेकड्या, ९० अंशाच्या कोनामध्ये उभे कडे, हिरवीगार आणि मधूनच रंगीबेरंगी झाडी, फिल्मी हीरोच्या डोक्यावरच्या झुल्फांप्रमाणे दिसणारी बांबूची बेटे आणि त्याच्यातून नागमोडी वळणे घेत जाणारे ली नदीचे उथळ पात्र. या सर्व अनोख्या निसर्गाच्या दर्शनाने आपण खरेच स्वप्नामध्ये सफर करत आहे असे वाटते. बर्याचदा आपलाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. एक दोनदा तर आपण एखाद्या कल्पनारम्य शास्त्रीय कथेत घुसून परग्रहावर तर गेलो नाहीनां असा संशय आला. आजूबाजूला सगळेजण माणसांसारखेच दिसत होते... पण या एलियनांचे काय सांगता येत नाही. ते काय कोणतेही रूप धारण करू शकतात! +D
बर्याच टेकड्यांना त्यांच्या आकारावरून नांवे दिलेली आहेत आणि गाईड आवर्जून "कृपया थोडी कल्पनाशक्ती वापरून पहा, म्हणजे मी म्हणतो तसे दिसेल" असे सांगून माहिती देत होता. तीन मजल्याच्या बोटीच्या खालच्या दोन मजल्यांवर प्रवाशांना आरामात बसून जेवण वगैरे करत मोठ्या खिडक्यांतून आजूबाजूचे निसर्गसौंदर्य पाहण्याची सोय होती आणि हवे तेव्हा सर्वात वरच्या टेरेससारख्या सन डेकवर फिरून चारी दिशांना नजरेच्या टप्प्यात येणारा निसर्गाचा नजाराही पाहता येत होता.
येवढ्या उथळ नदीत येवढ्या मोठ्या बोटी पूर्वी कधी बघितल्या नव्हत्या. नदीचे पाणीपण एवढे नितळ होते की जवळ जवळ सगळ्या प्रवासात नदीचा तळ स्पष्ट दिसत होता.
इथले स्थानिक लोक पांचसहा बांबू बांधून बनवलेले खास प्रकारचे तराफे त्यांच्या रोजच्या वाहतुकीसाठी आणि व्यापारासाठी वापरतात. अशाच एका भाजीवाल्याकडून आमच्या बोटीच्या खानसाम्याने भाजी खरेदी केली आणि अस्मादिक खूश झाले... कारण आज गुरुवार होता !
बोटींगची मजा घ्यायलाही प्रवाश्यांना हे तराफे भाड्याने मिळतात.
पहिला काही वेळ साधारण गुईलीनसारख्याच टेकड्या दिसत होत्या. पण जसजसा प्रवास पुढे जाऊ लागला तसे एक वेगळे जग सुरू झाले.
.
या टेकडीमध्ये जगातील सर्वात मोठी, १२ किमी लांबीची, Crown Cave (Guanyan) नावाची गुहा आहे. ह्या गुहेची उंचीही बरीच आहे. आतमध्ये तीन मजली एस्कॅलेटर असलेली ही जगातली एकमेव गुहा आहे.
ह्या गुहेचे आणि आजूबाजूच्या प्रदेशाचे प्रवाशांच्या सोयीसाठी चाललेले विकासाचे काम अजून पुरे झालेले नाही; गुइलीनच्या बघितलेल्या गुहेतले लवणस्तंभ जास्त सुंदर आहेत असे समजले होते; आणि या गुहेच्या भेटीने सहल एक दिवसाने वाढली असती. या सर्व गोष्टींचा विचार करून या गुहेला दुरूनच 'हाय अॅन्ड बाय' करायचे ठरवले होते.
थोडेसे पुढे आल्यावर आजूबाजूचा निसर्ग त्याचा खजिना उलगडून दाखवू लागला आणि डोंगरांचे आकार अजूनच विचित्र बनू लागले. बर्याचश्या चिनी चित्रांमध्ये दिसणार्या सुळकेदार डोंगर याच भागातल्या निसर्गावरून बेतलेले असतात.
.
"या डोंगरावरच्या नैसर्गिक चित्रात किती घोडे आहेत हे सांगू शकाल काय?" असे गाईडने विचारले आणि बरेच जण हिरीरीने मोजदाद करायला लागले.
गाईड तुम्हाला "थोडी कल्पनाशक्ती वापरा" असे म्हणून नऊ घोडे आहेत असे सांगतो. कल्पनाशक्तीला ताण देऊन मोजता मोजता बोट केव्हाच पुढे निघून जाते! आणि आपण परत नवे, अधिक आश्चर्यकारक आकार पाहण्यात गुंग होऊन जातो.
मधून मधून छोटी छोटी गावे, गावकर्यांचे नदीकाठी पार्क केलेले बांबूचे तराफे आणि हिरव्या जादूतून डोकावणारी घरे मनाला मोहवत राहतात.
.
.
न संपणारी विचित्र डोंगरांची मालिकापण कायम सुरूच राहते...
.
.
.
ह्या चुनखडीच्या डोंगराच्या झिजेने व उघड्या झालेल्या रंगीत क्षारांच्या पट्ट्यांनी अर्ध्या माशाचे चित्र बनलेले दिसते.
अजून काही डोंगरांचे आकार
.
.
वृक्षवाल्लींनी भरलेल्या निसर्गाचे मोहक रूप चारी दिशांना उधळलेले होते.
रंगीबेरंगी फुलांनी लगडलेली झाडे...
आणि हिरवीगार बांबूची बेटे..
या जुळ्या टेकड्या २० युवानच्या नोटेवर विराजमान झाल्या आहेत.
.
या सफरीतले फोटो जेव्हा जेव्हा मी बघतो तेव्हा ली नदीतून बोटीने जाताना अनुभवलेल्या निसर्गाचे खरे दर्शन द्यायला ते खूपच तोकडे पडताहेत हे सतत जाणवते ! या सफरीच्या अधिक अनुभवाकरिता येथील व्हिडिओ क्लिप पहा (TravelChinaGuide च्या सौजन्याने).
यांगशुओला बोटीतून उतरलो आणि सर्वात प्रथम या कोळ्याचे दर्शन झाले. त्या बांबूवर बसलेल्या पक्षांना Cormorant अथवा Fish Hawks नावाने ओळखतात. पक्षाच्या पायाला दोरी बांधून कोळी त्याला नदीच्या पाण्यांत सोडतो. पक्षाने पकडलेला मासा त्याने गिळू नये यासाठी त्याच्या गळ्या भोवती एक दोरा अश्या रितीने बांधतात की श्वासाला अडथळा होणार नाही पण त्याचबरोबर पक्षाला मासा पूर्णपणे गिळता येणार नाही. पक्षाने मासा पकडला की दोरी ओढून त्याला तराफ्यावर खेचून कोळी मासा काढून घेतो. ही मासेमारीची जगावेगळी पद्धत मी ली नदीच्या सफरीत पहिल्यांदाच पाहिली.
साधारण दुपारी दोनअडीचला हॉटेलवर पोहोचलो. आता रात्रीच्या शोपर्यंत मोकळा वेळ होता. बोटीच्या प्रवासांतील जेवणाचा वेळ सोडला तर जवळ जवळ सर्वच वेळ सन डेकच्या उन्हात आणि वार्यात उभा राहून भान विसरून निसर्गाचे अक्रीत पाहत होतो, त्याचा शीण आता जाणवू लागला होता. याला उपाय म्हणजे एक मस्त शॉवर आणि 'हिट द सॅक' !
दोन तासांच्या झोपेने परत ताजातवाना झालो. गाइड सात वाजता येणार होता म्हणजे अजून दोन तासतरी मोकळे होते. शिवाय भूकही लागली होती. आज गुरुवार होता. हॉटेलच्या रेस्तरॉच्या मेन्यूकार्डावर काही उपयोगी पदार्थ दिसले नाहीत. यांगशुओच्या बाजारपेठेचा फेरफटका मारून पोटोबाची काय सोय होते का हे बघायला बाहेर पडलो.
वाटेत एक पेस्ट्रीचे दुकान दिसले. ताजे ताजे डोनट्स आणि केक खुणा करत होते. भट्टीतून येणारा त्यांचा सुगंध भूक प्रबळ करू लागला होता. दरवाज्यात एक तरुण दुकानासमोरून जाण्यार्या प्रवाशांना निमंत्रण करीत उभा होता. जरा दबकतच त्याला इंग्लिशमध्ये यांत अंडे आहे का म्हणून विचारले. आणि अहो भाग्यम ! तो म्हणाला, "नो एग, नो एग". मग काय त्वरित अनेक गरमागरम डोनट्स आणि केकवर हल्ला करून त्यांना माझ्या जठर-सदनास पाठवून दिले !!
.
ही जणू नशीबानंच पाठविलेली रसद होती. कारण पुढच्या तास दीड तासाच्या यांगशुओच्या फेरफटक्यात परत शाकाहारी खाण्याची सोय होईल असे रेस्तरॉ दिसले नाही. पण आता फिकीर नव्हती. हॉटेलवर अगोदरच केलेली फळांची बेगमी होतीच. शोवरून परत आल्यावर थोडा फलाहार केला तरी पुरे होता. बेकरीतून बाहेर पडून यांगशुओदर्शन सुरू केले.
निसर्गाचा वरदहस्त असलेले छोटेसेच गांव, पण नीटनेटके, स्वच्छ, टापटीप आणि अर्थातच सुंदर. मुख्य बाजारपेठ सोडून नदी किनारी आलो तर हिरवाईच्या कुशीत बसलेली ही छोटी इमारत दिसली.
कापडाने अर्धवट झाकल्याने ते घर होते की मंदिर हे कळले नाही. नदीकिनाऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा न आणता किंबहुना नैसर्गिक सौंदर्याचा आधार घेऊन प्रवाशांना अधिक आनंददायक होईल असा विकास केला होता.
थोडा वेळ नदीची मजा पाहून परत गावांत शिरलो. मी झोपेत असताना बराच पाऊस पडून गेला होता. सगळे रस्ते ओले झाले होते पण चिखल किंवा कचरा नावालाही नव्हता, ना साठलेल्या पाण्याची डबकी.
.
रस्त्याशेजारच्या रेस्तराँमध्ये संध्याकाळची प्रवाशांची गर्दी गडबड अजून सुरू झाली नव्हती. खुर्च्या-टेबले मात्र नटूनसजून त्यांचे स्वागत करण्यासाठी तयार होऊन बसली होती.
.
सात वाजायला आले होते. हॉटेलवर परत आलो. गाइड आला आणि आम्ही 'लिउ' ताईच्या भेटीला निघालो. (चिनी भाषेत 'सांजे' म्हणजे बहीण. सांजे लिऊ म्हणजे लिऊताई.) हा कार्यक्रम या भागांतील झुआंग जमातीतील अतिशय सुंदर व गोड गळ्याच्या लिउ नांवाच्या मुलीच्या लोककथेवर आधारीत आहे. १९६१ साली आलेल्या या कथेवर आधारीत Sanje Liu नावाच्या चित्रपटाने ली नदी आणि यांगशुओला जगप्रसिद्धी मिळवून दिली. आपण लिजियांगला पाहिलेल्या Impression Lijiang प्रमाणेच ह्या शोच्या मागेही Zhang Yimou या जगप्रसिद्ध चिनी दिग्दर्शकाचा हात आहे. लिजियांगचा प्रचंड उघडा रंगमंच पाहून स्तिमित झालो होतो. पण येथे तर झांगच्या कल्पकतेने अधिकच कमाल दाखविली आहे.
इथला रंगमंच आहे... दोन किमी लांबीचे ली नदीचे पात्र, त्याला वेढणारी जमीन आणि बारा (यांगशुओ टाईपच्या) टेकड्या.. त्यांच्यावरच्या वनराजीसकट !!! शिवाय अधूनमधून येणारे धुके, पावसाची रिमझीम आणि ढगातून डोकावणारा चंद्र हे 'सीझनल इफेक्टस' त्यांत अजून भर घालतात ते वेगळेच. प्रेक्षकांची बसण्याची सोय ली नदीच्या पात्रातील एका बेटावर केली आहे.... आहे की नाही सगळा स्वप्नापलीकडला कारभार?
या कार्यक्रमातील कलाकार आहेत ६०० स्थानिक लोक, पन्नासएक बांबूच्या होड्या, असंख्य मीटर कापड आणि पाच-सहा गाई-म्हशी... आता बोला!
या शोचे वर्णन Human's Masterpiece in Cooperation with the God' असे केले जाते ते खरेच यथार्थ आहे.
प्रेक्षागृहात एका वेळेस ४,००० ते ६,००० लोक बसू शकतात... सगळे प्रेक्षागृह कॅमेर्याच्या एकाच फ्रेममध्ये मावू शकले नाही.
प्रथम अंधारामुळे सर्व "रंगमंच" दिसत नाही. सुरुवात होते नदीतल्या एका भव्य पडद्यावरच्या चलत्चित्राने, त्याच्या नदीतल्या प्रतिबिंबाने आणि त्या प्रतिबिंबात दिसणार्या तराफ्यांनी...
हळू हळू उजेड वाढतो आणि नदी व टेकड्या स्पष्ट दिसू लागतात... सांजे लिऊ बांबूच्या तराफ्यावरून गाणे गात प्रवेश करते...
नंतर कहाणीचा एक एक पदर उलगडत जातो... लोककथा, कलाकार, नदीचे पाणी, बोटी, निसर्ग आणि जनावरे यांचा अतिशय कलापूर्ण वापर करून स्थानिक लोककला, परंपरा, दिनक्रमातील कामे, इ. चे केलेले सुंदर प्रदर्शन ९० मिनिटे सगळ्या प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवते... अगदी भुरभुरणाऱ्या, रिपरिपणाऱ्या पावसाचीही कोणी फार फिकीर करताना दिसले नाही.
या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे (काळोख व झगमगते फ़्लॅशलाइटस यामुळे चित्रांची प्रत तितकीशी चांगली आली नाही याबद्दल दिलगिरी)
.
.
.
.
.
मी एखाद्या गोष्टीने सहज प्रभावित होत नाही असा माझा समज आहे, पण आता झांगच्या नावावर तुम्ही काहीही खपवण्याचा प्रयत्न केलात तरी मी ते खरे मानण्याचा खूपच संभव आहे! हॉटेलवर जरासा तरंगतच परत आलो. यांगशुओ बघण्याचा आग्रह केल्याबद्दल फीडबॅकमध्ये टूर मॅनेजरचे खास आभार मानायलाच पाहिजे हे पक्के करून मगच झोपी गेलो.
(क्रमशः)
===================================================================
ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...
===================================================================
प्रतिक्रिया
6 Jan 2013 - 12:05 am | संजय क्षीरसागर
अवर्णनीय आनंद झाला आहे, धन्यवाद!
6 Jan 2013 - 12:53 am | विलासराव
मस्तच!!!!!!!
6 Jan 2013 - 1:06 am | कानडाऊ योगेशु
सांजेलिऊ शो चे फोटो पाहुन अक्षरशः रोमांच उभे राहीले.प्रकाशझोतात उजळुन निघालेल्या टेकड्या एकाच वेळी गूढही भासत आहेत आणि सुंदरही.
बाकी पर्यटनापलिकडचा चीन तुम्हाला कसा वाटला हे ही जाणुन घ्यायला आवडेल.
म्हणजे तिथली माणसे,त्यांचा पर्यटकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन,पर्यटनस्थळे जपण्याबाबतची तिथल्या सरकार/स्थानिक व एकुणच चीन्यांची मानसिकता कशी आहे?
(मुद्दामुनच भारतातील कुठलेही तत्सम उदाहरण देत नाही.उगाच हा सुरेख धागा भरकाटायचा.)
6 Jan 2013 - 3:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
कोठेही गेलो की पर्यटनापलीकडला देश नेहमीच शोधत असतो... प्रसिद्ध स्थळांबरोबर खराखुरा देश आणि माणसं जरा समजली तर अजून मजा येते. या बाबतीत चीनमध्ये सर्वात जास्त अडचण आहे भाषेची. तरीसुद्धा जेथे कोठे लिहिण्यासारखे अनुभव आले ते त्यात्या भागांत लिहिले आहेतच... पुढच्याच (१४व्या) भागात या बाबतीत खास कारणाने बरीच माहिती येणार आहे. जरूर वाचा. प्रवासी म्हणून आलेल्या त्रोटक अनुभवांवरून सर्व चिनी जनतेचे सरसकट सविस्तर मोजमाप करणे संयुक्तिक होणार नाही म्हणून ते कटाक्षाने टाळले आहे. पण सर्वसामान्य चिनी माणसाचा स्वभाव मनमिळावू आणि मैत्रीपूर्ण वाटला. प्रवासात भारत-चिन तणाव कोठेच जरासुद्धा जाणवला नाही. उलट बुद्धाच्या देशाचा माणूस म्हणून आत्मीयताच जाणवली.
एकूण फोटो व वर्णन वाचून तुमच्या ध्यानात आलेच असेल की तेथे सरकारी आणि खाजगी इमारतीत उजवे डावे करणे कठीण आहे... उलट सरकारी इमारती, संग्रहालये, इ. च्या इमारती आणि अगदी त्यांच्या आवारांचेही सौंदर्य ज्या काळजीने जपले आहे ते जगात इतरत्र अभावानेच दिसले.
6 Jan 2013 - 1:23 am | बॅटमॅन
टेकड्या लैच खास!!!!!!!! आवडेश :)
6 Jan 2013 - 4:47 am | nishant
मस्तच! आता चिनला जाण्याचा कधि योग येतो, ते बघु ;)
6 Jan 2013 - 7:30 am | कौशी
सुंदर फोटो आणि वर्णन खुप आवडले.
6 Jan 2013 - 10:23 am | पियुशा
व्वाह !!!
चीन ईतका सुंदर प्रदेश असेल याची मी स्वप्नातदेखील कल्पना केली नव्हती तुमच्या धाग्यामूळे बरेच गैरसमज दुर झाले :)
6 Jan 2013 - 10:42 am | रेवती
सगळंकाही भव्यदिव्य वाटतय. निसर्ग असो की संध्याकाळचा शो. अशी चित्रे दाखवत राहिलात तर चीनला भेट द्यावीच लागेल.
6 Jan 2013 - 2:20 pm | सूड
>>या डोंगरावरच्या नैसर्गीक चित्रात किती घोडे आहेत हे सांगू शकाल काय?
नाय बा!! कधी लागले नायत त्यामुळं सांगता नाय येणार.
बाकी या प्रश्नांमुळे जाने तू या जाने ना मधले 'व्हॉट्स दॅट' छाप प्रश्न आठवले. ;)
फोटो नेहमीप्रमाणेच छान !!
6 Jan 2013 - 2:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
हा प्रश्न गाइडचा होता ! लेखात तशी दुरुस्ती केली आहे....
शिवाय असे प्रश्न गाइड प्रवाशांना 'ईंटरअॅक्टिव' वेग्रे कायते ठेवण्यासाठी करतच असतात हो ! आपण जास्त शिरेसली नाय घ्यायचं.
पण बरेच लोक मात्र हिरीरीने घोडे मोजत होते... आपल्याल त्यांची मजा बघायला जास्त मजा येते !
6 Jan 2013 - 9:48 pm | सस्नेह
फोटो खरंच सुरेख आहेत. चीन आवडला.
6 Jan 2013 - 10:05 pm | पैसा
घरबसल्या चीनची सफर घडवताय! धन्यवाद!
6 Jan 2013 - 10:28 pm | चित्रगुप्त
नदी-डोंगरांची दृष्ये केवळ अद्भुत. धन्यवाद.
7 Jan 2013 - 8:22 am | प्रचेतस
सुंदर फोटो, सुंदर सफर
7 Jan 2013 - 11:30 am | डॉ सुहास म्हात्रे
सर्व पतिसादकर्त्यांना मनापासून धन्यवाद !
7 Jan 2013 - 11:34 am | चेतन माने
बस्स आत्ता प्रतिक्रिया देणं अशक्य होऊन बसलंय !!! धन्यवाद
पुभाप्र :)
7 Jan 2013 - 3:42 pm | स्मिता.
नदी आणि तिच्या बाजूच्या टेकड्या, वनांचे फोटो अप्रतिम आहेत. हे फोटो बघून आपणही जाऊन चीनला भेट द्यावीशी वाटतेय.
7 Jan 2013 - 4:10 pm | मिहिर
टेकड्या आणि फोटो, वर्णन मस्तच! असंच फिरत आणि लिहीत रहा. :)
7 Jan 2013 - 7:07 pm | अनन्न्या
स्मायली स्मायली.... अजून बय्राच स्मायली टाकायच्या होत्या. पण येत नाहीत ना!
7 Jan 2013 - 10:21 pm | श्रिया
फोटो आणि प्रवासवर्णन, दोन्हिहि सुंदर!चीनविषयी कुतूहल होतंच, आणि तुमच्या लेखांमुळे चीनच्या पर्यटनाची भुरळदेखील पडली आहे.
8 Jan 2013 - 7:56 am | दीपा माने
निसर्गाचं वरदान लाभलेला चीन देश मनाला भावला.तुमच्या लेखनाला दिलेली छायाचित्रांची अप्रतिम साथ वाचताना आणि पाहताना प्रत्यक्ष चीनलाच गेल्यासारखे वाटले.
8 Jan 2013 - 3:20 pm | अशोक सळ्वी
सुन्दर प्रवास वर्णन...चालू ठेवा वाचतोय.
10 Jan 2013 - 7:39 pm | दादा पेंगट
झकास एकदम.. आम्ही तुमच्या सफरीचे फ्यान होत चाललोत. कधी गाठीशी पैसा जमलाच चुकून तर चीनसफर टॉपवर राहील.