===================================================================
ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...
===================================================================
आजचा प्रवासाचा नऊवा दिवस. आज लिजीयांग ते शांग्रीला हा चार तासांचा चार चाकीचा प्रवास करायचा होता व वाटेत 'यांगत्से नदीचे पहिले वळण' व 'लीपींग टायगर गॉर्ज' हे दोन प्रेक्षणीय थांबे होते. वाहनचालक तुम्हाला घेऊन जाईल व अर्ध्या वाटेवर शांग्रीलाची गाईड येऊन भेटेल असे सांगून लिजीयांगच्या गाईडने निरोप घेतला. वाहनचालकाची दोन दिवसांची ओळख होतीच (त्याचं नांव होतं 'ख'). भला माणूस होता पण त्याचे इंग्लिशचे आणि माझे चिनी भाषेचे ज्ञान एकाच स्तरावरचे होते -- म्हणजे शून्य होते! पण दोन दिवसांत आमच्या खाणाखुणा एकमेकाला समजू लागल्या होत्या. शिवाय प्रश्न फक्त दोन तासांचाच होता. आमची गाडी पृथ्वीवरच्या स्वर्गाच्या दिशेने धावू लागली.
विसाव्या शतकाच्या दुसर्या भागापासून शांग्रीला हा विभाग देचेन (Deqen) अथवा Xamgyi'nyilha या नांवाने ओळखला जात असे. परंतू २००१ पासून चिनी सरकारने टूरिझम वाढवायच्या उद्देशाने त्याचे शांग्रीला या नावाने परत बारसे केले. शांग्रीला हे नांव ठेवण्याचे कारण असे की १९३३ साली जेम्स हिल्टन नावाच्या लेखकाने 'Lost Horizon' नावाची कादंबरी प्रसिद्ध केली. तिची कहाणी काहीशी अशी: १९३१ साली ब्रिटिश लोकांनी भरलेल्या एका विमानाचे अपहरण होते व नंतर त्याला हिमालयाच्या दुर्गम भागांत क्रॅशलँडींग करावे लागते. त्यातून वाचलेले चार जण एका जवळच्या लामासरीमध्ये आसरा घेतात. या भागाचे वैशिष्ट्य असे की इथे राहणारे लोक फारच हळूहळू वृद्ध होत असतात, आजारी पडत नाहीत, इ. इ.... म्हणजे जवळजवळ जणू स्वर्गातल्या वातावरणात राहतात असे दाखवले आहे. स्थानिक खांपा तिबेटी लोकांच्या मते शांग्रीला हे नांव "Shambala," (म्हणजे तिबेटी भाषेमध्ये "स्वर्ग") चे अपभ्रंशित इंग्लिश रूप आहे. शांग्रीला जिल्ह्यात तिबेटी वंशाचे लोक बहुसंख्य आहेत.
ही कादंबरी इतकी गाजली की तिच्यावर त्याच नांवचे दोन प्रसिद्ध चित्रपट, एक ब्रॉडवे म्युझीकल (जे फारसे चालले नाही), बी. बी. सी. वर बारा तासांची सीरियल, इ. इ. होऊन शांग्रीला हे नांव जगप्रसिद्ध झाले. त्यानंतर अजून बर्याच जणांनी शांग्रीलावर बरेच काही लिहिले, दाखवले. शांग्रीला ही जागा आपल्या देशातच असल्याचा दावा नेपाळने ही केला. त्यामुळे या सर्व प्रसिद्धीचा फायदा घेण्यासाठी चीनने कादंबरीतील शांग्रीलाच्या वर्णनाशी मिळता जुळता असलेल्या या युन्नानमधल्या प्रदेशाचे नामकरण शांग्रीला असे करून शिवाय त्यातल्या काही भागाला युनेस्कोमान्य हेरिटेज साईट करवून त्या नांवावरचा आपला हक्क बळकट केला आहे.
===================================================================
तर ख आणि मी दोघेच चारचाकीने निघालो. आजूबाजूचा परिसर पाहून हा दोन गावांतला प्रवास नसून एखाद्या प्रेक्षणीय स्थळामधला फेरफटका आहे असे सारखे वाटत होते. 'ख' ही कसलेला टूर वाहनचालक निघाला. खाणाखुणांनी म्हणाला की कुठे फोटो काढायचा असेल तेव्हा थांबायला सांगा. एकदोन ठिकाणे सोडून थांबायचा मोह आवरला आणि बरेचसे फोटो चालत्या गाडीतूनच काढले... नाहीतर चार ऐवजी आठ तास लागले असते शांग्रीलाला पोहोचायला!
.
वाटेत एक बुद्धमंदीर लागले.
.
डोंगराच्या अगदी कड्यावर असलेले निर्जन प्रदेशातले ते एकाकी मंदिर, पलीकडचा खोल कडा, प्रचंड धुक्यानं वेढली हिरवाई, धुके आणि ढगांनी काढलेली नक्षी आणि त्यातून मधूनच डोकावणार्या पर्वतराजी... हे सगळे एकदम वेगळ्याच जगात घेऊन गेले... जणू स्वर्गाची दारे किलकिली होऊ लागली होती!!!
.
.
या सर्व निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत पुढची सफर सुरू केली. मधूनच छोटी छोटी खेडी, त्याच्याबाजूची शेती, पलीकडचे उत्तुंग पर्वत आणि मधूनच नजरेला येणार्या नद्या... जणू काही एका अगडबंब कॅनव्हासवर एखाद्या कसबी चित्रकाराने काढलेले लांबच लांब चित्र पाहत चललोय!
.
.
.
.
मधूनच एखाद्या गावातून रस्ता जात होता आणि चीनच्या प्रचंड प्रगतीमध्ये अजून सामील न झालेल्या अंतर्गत चीनचा मुखडाही समोर येत होता. चिनी अक्षराच्या पाट्या सोडल्या तर एखाद्या भारतीय खेड्याचेच रूपरंग दिसत होते...
पण हा देखावा क्वचितच दिसत होता. हा हा म्हणता यांगत्सेनदीच्या पहिल्या वळणावर पोहोचलो. यांगत्से (या शब्दाचा अर्थ 'लांब नदी' असा आहे) ही जगातली लांबीने तीन नंबरची, आशिया खंडातली सर्वात लांब आणि चीनमधील सर्वात जास्त नावाजलेली / गौरवलेली नदी आहे. ही नदी आणि तिच्या उपनद्या चीनच्या १/३ भागांवर (म्हणजे जवळजवळ भारताच्या पूर्ण क्षेत्रफळा येवढ्या भागावर) पडलेला पाऊस वाहून नेतात. येवढा मोठा आवाका या एकट्या नदीचा आहे. प्राचीन काळापासून चीनच्या जडणघडणीत, वाहतुकीत, व्यापारात आणि एकंदरीत सांस्कृतिक वाढीस यांगत्सेने मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे साहजिकच यांगत्से असंख्य चिनी कथा, कविता, कादंबऱ्या, नाटके, इ. मध्ये अगदी नायिकेचे किंवा निदान इतर महत्त्वाचे स्थानतरी पटकावून आहे.
यांगत्सेच्या पहिल्या वळणाचे आणि त्याच्या आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसराचे विहंगम दर्शन करता यावे यासाठी तेथे एक पांचसहामजली मनोरा बनविला आहे. त्याच्यावरून घेतलेले हे काही फोटो. मनोर्याच्या वरच्या २५ मी लांबीरुंदीच्या प्लॅटफॉर्म वरून चारीबाजूचा मनमोहक परिसर बधायला खूप मजा आली. एका टेकडीला जवळजवळ ३०० अशांचा वळसा घालून जाणारी तुडुंब भरून संथ वाहणारी यांगत्सेमाई, तिच्या पाण्यावर बहरलेले खोरे, आजूबाजूचा चौफेरे हिरवागार गालिचा, त्यांत मधूनच दिसणार्या कौलारू घरांची खेड्यांनी, काही नवीन बांधकाम असलेली छोट्या गावांनी व मधून मधून असलेल्या शेतांनी काढलेले भरतकाम आणि या सगळ्याला आडव्यातिडव्या विभागणार्या असंख्य टेकड्या आणि पर्वतराजी. हे सगळे किती नजरेत सामावून घेतले तरी समाधान होत नव्हते.
.
.
.
नंतर खाली आल्यावर हा खास दुर्मिळ पांढरा याक दिसला.
हर हर महादेव म्हणत त्याच्यावर स्वारी करण्याची हौस १० युवान मोजून पुरी केली!
आणि परत मार्गस्थ झालो. वाटेत हे गांव लागले. निरखून पाहिले तर ध्यानात येईल की इथले रस्त्यावरचे सगळे दिवे सौरऊर्जेवर चालतात! येथून पुढे जवळजवळ सर्व शांग्रीला जिल्ह्यात हेच दिसले. अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात चीन इतर सर्व देशांपेक्षा खूप पुढे आहे हे वाचून होतो, त्याचे हे एक उदाहरण.
पुढे गेल्यावर यांगत्सेच्या तीरावर ही एक आकर्षक इमारत दिसली. 'ख' ला विचारून पाहिले, पण येथे आमची खुणेची भाषा तोकडी पडली. तो फाडफाड चिनी भाषेत काहीतरी म्हणाला पण अर्थातच मला काही समजले नाही!थोड्या वेळाने तेथे पोचलो तर कळले की ते शांग्रीला जिल्ह्याचे प्रवेशद्वार आणि प्रवेशमुल्य वसूल करण्याचे स्थान होते.
.
ही इमारत म्हणजे एखाद्या सर्वसामान्य उपयोगाच्या वास्तूमध्ये जीव फुंकून लोकांना आश्चर्याने कसे आ वासायला लावावयाचे याचा एक उत्तम नमुना आहे! याबाबतीत चिनी मंडळी अगदी जगावेगळी वरचढ आहेत. बहुतेक सर्व ठिकाणी वास्तू अवाढव्य-भव्य करून मोठेपणा ठसवण्याकडे जास्त कल असतो. पण चिनी लोक त्यांच्या बांधकामांत भव्यतेबरोबर कलाकुसर, रसिकतापूर्ण मांडणी आणि रंगांची उधळण अशा रितीने पेश करतात की आश्चर्याबरोबर आनंदाचीही अनुभूती होते. एखादे सुंदर निसर्ग चित्र आपल्याला वारंवार पाहण्याची इच्छा होते आणि दरवेळेचे पाहणे एक अनामिक आनंद देऊन जाते; पण असेच एखाद्या उत्तुंग-भव्य सिमेंट-काँक्रीटच्या इमारतीच्या चित्राबाबत होत नाही... असाच काहीसा हा फरक आहे.
अन मग आपल्याकडच्या परिस्थितीची आठवण होणे अपरिहार्य होते... "एक आडवा बांबू टाकून सर्व वाहने अडवली जातील याची पूर्ण काळजी महत्त्वाची, कारण गल्ला ठीकठाक जमा झाला पाहिजे! बाकी कामगार लोकांना एका टपरीपेक्षा जास्त छप्पर देऊन त्यांच्या सवयी बिघडवायचे पाप आपण कधीच करणार नाही. आणि प्रवाशांचं काय हो ?ते काय सोयीसवलती मागायलाच टपलेले आहेत. त्यांच्या अपेक्षा आम्ही का पुर्या कराव्या? आम्हाला काय दुसरी कामे नाहीत काय? तेव्हा बघू त्यांच्याकडे फुरसत झाली तर!" असो.
हा त्या प्रवेशद्वाराजवळचा झेप घेणारा वाघोबा.
त्याच्यासारख्याच प्रचंड टाकदीची बेभान झेप घेणारा 'लीपींग टायगर गॉर्ज' नांवाचा यांगत्सेचा प्रवाह थोडा पुढे आहे. हा वाघोबा त्याचे मानचिन्ह. उजवीकडे खोल दरीत वाहणारी यांगत्से आणि डावीकडे ऊंचच ऊंच कडा अशा रस्त्यावरून जाताना भारतीय हिमालयातल्या सफरींची आठवण जागी झाली.
आवांतरःचिनी भाषेत फ्रेंच भाषेप्रमाणेच विशेषण नामानंतर येते असे दिसते. शिवाय चिनी मंडळीचे इंग्लिश अगाध असल्याने ते बर्याच वेळा शब्दशः भाषांतर करताना दिसतात. उदा: ते "टायगर लीपींग गॉर्ज" असे लिहितात ... लीपींग टायगर गॉर्ज असे नाही. चिनी इंग्लिशची काही सचित्र उदाहरणे पुढे येतीलच. सर्वसाधारण चिनी माणसाला इंग्लिश वाचता येत नाही आणि अधिकारी मंडळींनाही अगदी सार्वजनिक जागांवरील इंग्लिशच चुकांबद्दलसुद्धा फारशी फिकीर आहे असे वाटले नाही. वाचताना विचित्र वाटू नये म्हणून मी पहिले विशेषण व नंतर नाम; उदा: लीपींग टायगर गॉर्ज असेच लिहिले आहे. आंतरजालावर व चीनच्या प्रत्यक्ष भेटीत मात्र ते "टायगर लीपींग गॉर्ज" असेच दिसेल.
प्रवेशद्वारावर शांग्रीलाच्या गाईडने स्वागत केले. भारतीय चेहरा बघून ती म्हणाली: "नमस्कार!" मी अर्थातच उडलो. ती तिबेटी वंशाची होती. चौकशी केल्यावर कळले की तिचा नवरा ल्हासाचा तिबेटी आहे आणि तो नऊ वर्षे दिल्लीत राहिला होता. तिनेही पाच वर्षे दिल्लीत एका गेस्टहाउसमध्ये व्यवस्थापक म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे तिला जुजुबी हिंदी येत होते. इंग्लीश मात्र उत्तम बोलत होती. आता ते दांपत्य शांग्रीलात स्थायिक झाले आहे. पुढचे दोन दिवस आमचे संभाषण अर्थातच 'हिंग्लीश' मध्येच झाले!
थोड्या वेळाने लीपींग टायगर गॉर्ज पाहण्याचे प्रेक्षणीय स्थळ आले आणि पायउतार झालो. यांगत्से तिबेटमध्ये Gelandandong glacier lake येथे उगम पावते, दक्षिणपूर्वेकडे वाहत येऊन युन्नानमध्ये शिरते आणि नंतर चीनच्या अनेक राज्यांतून प्रवास करत चीनच्या पूर्वकिनार्यावर शांघाईजवळ समुद्राला मिळते.
हे त्या प्रेक्षणीय स्थळावरच्या इमारतीचे दुरून झालेले दर्शन. निर्मनुष्य डोंगरदरीत प्रशस्त स्वागतकक्ष, उपाहारगृह, "स्वच्छ" स्वच्छतागृह आणि भरपूर मोठे आखीव-रेखीव पार्किंग. "Customer is King." हे भांडवलशाहीचे बोधवाक्य कम्युनिस्ट चीन सतत कसोशीने अमलात आणताना दिसत होता!
युन्नानमधला, विशेषतः लीपींग टायगर गॉर्जच्या भागातला यांगत्सेचा प्रवाह अत्यंत वेगवान आणि ताकदवर आहे. प्रबळ यांगत्सेची ताकद प्रवाश्यांना प्रवाहाच्या अगदी जवळ जाऊन पण पूर्ण सुरक्षितपणे बघता यावी म्हणून खास लाकडी जीने, ऑब्झर्वेशन प्लॅटफॉर्म्स, वैशिष्ट्यपूर्ण पूल, इ. इ. व्यवस्था केलेल्या आहेत. चला तर जवळून भेटूया आपण यांगत्सेमाईला.
स्वागतकक्षापासून साधारणपणे ६०० पाहिर्या उतरून खाली जायला लागते. उत्तम लाकडी जिना आहे. वरून अंदाज येत नाही पण जसजसे आपण खाली जातो तसे हळूहळू यांगत्सेचे रूप बदलत जाते.
हे अर्धे अंतर उतरल्यावर यांगत्सेचे सौम्य दिसणारे रूप
येथे तिबेटी भाषेमध्ये "ओम नमो शंबाला (शांग्रीला)" असे लिहिले आहे असे गाईडने सगीतल्यासारखे पुसटसे आठवते. आता नक्की आठवत नाही. तिबेटी लिपी आणि देवनागरीमध्ये थोडेसे साघर्म्य दिसले.
जसजसे खाली जाऊ तसतसे यांगत्सेचे रूप जास्त जास्त रौद्र होऊ लागते.
या ठिकाणीतर पाणी चाळीस टनी ट्रकला कागदाच्या बोटीसारखा चोळामोळा करीत वाहून नेईल असे वाटत होते. टक लावून पाण्याच्या प्रवाहाकडे पाहिले तर छातीवर एक प्रकारचे दडपण वाटावे इतका वेगवान आणि प्रबळ प्रवाह होता.
.
खाली उतरण्याचा लाकडी जिना आणि ऑब्झर्वेशन प्लॅटफॉर्म.
मधूनच एकदा भारताच्या सिंहाने चीनच्या वाघाला सहज तळहातावर उचलून धरले होते!
अवखळ आणि प्रबळ नदी नदी म्हणजे फार काय असणार या आमच्या तिरकस प्रश्नाला लीपींग टायगर गॉर्जने चांगलाच पण सुखद दणका दिला होता! लवकर निघायला मन करत नव्हते पण शांग्रीलाही खुणावत होती... निघावे तर लागलेच.
वाटेवरच्या या गांवात दुपारचे जेवण घ्यायला थांबलो.
तिबेटी जेवणाचा थाट
शाकाहारी मंडळींसाठी खुशखबर: येथे निम्म्यापेक्षा जास्त पदार्थ शाकाहारी होते. तिबेटी मसाले वापरून बनवलेले जेवण छान चवदार होते. शिवाय शांग्रीला जिल्ह्यातील फळे जरा जास्तच चवदार लागली आणि बायजींग-शियानच्या तुलनेने स्वस्तही होती.
चवथ्या मजल्यावरच्या जेवणाच्या जागेवरून दिसणारे सभोवतालचे सौंदर्य पाहत जेवण झाले आणि निसर्गाने आजूबाजूला उधळलेले सौंदर्य पाहत पुढे निघालो .
.
मध्येच एक प्रेक्षणीय थांबा घेतला.
.
.
तेथे "बा" जमातीची एक सुंदरी त्यांचा पारंपरिक पोशाख पेहरून फोटोसाठी उभी होती. १० युवान देऊन फोटो काढले.
मला वाटले की दहाबारा वर्षांची मुलगी असेल पण गाईडने तिला विचारून सांगितले की तिचे वय सोळाच्यावर आहे आणि तिचे लग्नही झाले आहे!
एक तासाभराने शांग्रीला गावाची सुरुवात झाल्याचे तिबेटी पद्धतीच्या मोठ्या इमारतींनी जाहीर करण्यास सुरुवात केली.
.
.
शांग्रीलाची माध्यमिक शाळा.
हॉटेलवर पोहोचेपर्यंत चार वाजले होते. गाईड म्हणाली की आज संध्याकाळी काही कार्यक्रम नाही. मोकळा वेळ आहे. जरा आराम करा. उद्या खूप चालायचे आहे. मस्तपैकी शॉवर घेतला आणि तरतरीत झालो. आता कसला आराम करणार? इतक्या दूर शांग्रीलाला काय आराम करायला आलो आहे काय? असा विचार करून हॉटेलच्या बाहेर पडलो. हॉटेल नव्या शांग्रीलात होते. हॉटेलवर येताना जवळच एका चौकातून जुन्या शांग्रीलात शिरणारा रस्ता गाईडने दाखवला होता. त्या दिशेने निघालो. जुन्या शांग्रीलात शिरलो तर एका अप्रतिम गावाची आणि सुखद धक्क्यांची मालिका सुरू झाली!
घरे, त्याचे दरवाजे-खिडक्या, इतकेच काय पण दर्शनी भिंतीही कोरीवकामाने व रंगकामाने इतक्या सजवलेल्या होत्या की रस्त्यावरून जाण्यार्या इतरांनीच माझा धक्का लागू नये याची काळजी घेतली असणार... माझे तिकडे अजिबात लक्ष नव्हते.
.....................
.
.
.
.
.
.
स्वर्गात प्रवेश तर केला तर स्वर्गातल्या पुलाने (किंवा देवेन्द्राच्या धनुष्याने म्हणा) ही जवळजवळ जमिनीला टेकून दर्शन दिले.
.
मध्येच अचानक कोणीतरी मोठ्याने म्हणाला, "कैसा है साब?" मी चमकून पाहिले तर एक सायकलरिक्षावाला हसून हात हलवत मी जागा होऊन "ठीकठाक. आप कैसे हो?" हे म्हणण्याच्या आत पुढे निघून गेलाही. आज दुसर्या माणसाकडून हिंदी ऐकली होती! नक्की कळत नव्हते की चकीत होऊ की गंमत वाटून घेऊ? पण आजचा खरा दणका तर पुढेच होता.
अजून पन्नास एक मीटर पुढे आलो असेन. एका रेस्तराँसमोर थक्क होऊन थबकलोच!
डोळे चोळायची वेळ होती. चीनमध्ये देवनागरीत "भाष्कर रेस्टो" उपाहारगृहाची पाटी? तेवढ्यात आतून खानसाम्याचे कपडे व टोपी घातलेला एक गृहस्थ "कैसा है साब? आओ साब चाय पिओ." म्हणत बाहेर आला.
हातमिळवणी झाली. थोड्या गप्पा झाल्या. माणूस एकदम नंबरी दिलखुलास, बोलका आणि आपुलकीने भरलेला. नाटकीपणा अथवा व्यापारीपणा नावालाही नाही. म्हटले, चहा नको, भूक मरेल. त्यापेक्षा मी जरा तासभर गांवात हिंडून येतो आणि मग मला तुझे खास पदार्थ करून वाढ. तोही म्हणाला, "जरूर आओ साब. खूश करके छोडेगा." मला काय? तेच हवे होते. दर ठिकाणी फिरताना कमीतकमी एकदा तरी संध्याकाळचे जेवण हॉटेलबाहेर चवीकरता नावाजलेल्या रेस्तराँमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. आज तर ते रेस्तराँच मला आमंत्रण देते होते! रेस्तराँ काही हायफाय नव्हते पण ठीकठाक, स्वच्छ व टापटीप होते. स्वच्छता आणि चव या मूळ अटींची पूर्तता झाली की मग बाकीकडे मी दुर्लक्ष करायला तयार असतो.
.
संध्याकाळी "भाष्कर रेस्टो"चाच पाहुणचार घेतला हे सांगायला नकोच.चवदार जेवण, तितक्याच चवदार गप्पांबरोबर आणि अगदी घरच्या जिव्हाळ्याने झाले. माणूस रसिक दिसला. रेस्तराँमध्ये एक छोटेखानी ग्रंथालय आहे. मोकळा वेळ असेल तर या, मस्त चहा आणि खायला काही चटपटीत देईन. खुशाल हवा तेवढा वेळ वाचत बसा म्हणाला!
भास्कर नेपाळी आहे, भारतातही काही काळ होता. नंतर नेपाळातून ल्हासाला गेला आणि एका तिबेटी मुलीशी लग्न केले आणि आता दोघे शांग्रीलामध्ये स्थायिक झाले आहेत. भास्कर स्वतः कसबी खानसामा आहे. अगदी दक्षिणेच्या मसाला दोसा पासून उत्तरेच्या मुघलाई पर्यंत अनेक प्रकार तो बनवतो. सौ. भास्कर सुद्धा रेस्टो चालवायला बरोबरीने झटत असतात. हे शांग्रीलातले एक चवीसाठी प्रसिद्ध रेस्तराँ आहे हे नंतर कळले. बोलता बोलता भास्करने त्याच्या गेस्टबुकांतील भारत, अमेरिका, जपान, जर्मनी, बेल्जीयम, इंग्लंण्ड, अशा अनेक देशांच्या पाहुण्यांच्या दीड-दोनशे शेर्यांचा सज्जड लेखी पुरावाही दाखवला. गंमत म्हणजे यातील काही शेर्यांत अमुक पदार्थ भारतात खाल्ला त्यापेक्षा येथे जास्त चवदार होता असे लिहिलेले होते... आणि असे शेरे लिहिणार्यात केवळ परदेशी नाही तर दोनतीन भारतीय नांवेही होती, आता बोला!!!
हे असे काही होईल हे स्वप्नातही बघणे कठीण होते. असे प्रसंगच फिरण्यातली गोडी मनामध्ये दगडावरच्या सुबक कोरीवकामासारखी कायम जतन करून ठेवतात.
हा भास्कर दांपत्याबरोबरचा फोटो.
शाकाहारी मंडळींसाठी खास खुशखबर : भास्कर शाकाहारी जेवणही उत्तम बनवतो. आणि लंचपॅक ही त्याची खासियत आहे. युरोपियन ट्रेकर्सही त्याच्याकडून शाकाहारी लंचपॅक्स बनवून घेतात असे कळले.
आवांतरः भास्कर रेस्टोच्या वरच्या मजल्यावर राहण्यासाठी खोल्याही आहेत. गडबडीत त्या कशा आहेत ते पाहायचे राहून गेले. परंतु तेथून काही पाश्चात्त्य मंडळी खाली उतरताना दिसली यावरून ठीकच असाव्यात. खालील बिझिनेस कार्डवरील ईमेल / फोनवरून अघिक माहिती मिळू शकेल.
भास्करला परत येतो असे सांगून शांग्रीलाचा फेरफटका परत चालू केला. जसजसा गावाच्या आतल्या भागात गेलो तशी भारताशी जवळीक जाहीर करणारी अनेक दुकाने / रेस्तराँ दिसली.
.
एका मॉलचे प्रवेशद्वार.
.
अजून एक हिंदी बोलणारा नेपाळी व्यापारी केसांगने हाक मारून थोडे संभाषण केले. हा बंगळुरूला पाचसहा वर्षे राहून तेथून बीए करून नेपाळला गेला. तेथून शांग्रीलाला आला आणि आता येथे व्यापार करतो. त्याच्या दुकानासमोरचा हा फोटो.
नंतर गाईडने सांगितले की इथे हिंदी सिनेमा आणि गाण्यांच्या सीडी-डीव्हीडी अत्यंत लोकप्रिय आहेत. तिबेटी-नेपाळी लोकांना भारताबद्दल आत्मीयात आहे हे तर जगजाहीर आहेच. पण त्यांनी ती भावना शांग्रीलासारख्या चीनमधल्या एका दूर पहाडी प्रदेशातही नेली आहे हे पाहून चकीत होण्यापेक्षाही अधिक काही अनामिक भावना दाटून आली. हॉटेलवर जाताना एक वेगळाच आनंद वाटत होता... तो शब्दात सांगणे कठीण आहे.
चला स्वर्गाचा दरवाज्याने तर बरेच काही दाखवले. उद्या प्रत्यक्ष स्वर्ग काय रूपाने पुढे येईल याचा विचार करतच झोपेच्या आधीनं झालो.
(क्रमशः)
===================================================================
ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...
===================================================================
प्रतिक्रिया
25 Dec 2012 - 11:27 pm | विलासराव
सगळे भाग वाचलेत आणी अर्थातच आवडलेही.
26 Dec 2012 - 8:59 am | प्रचेतस
अतिशय सुंदर.
फोटोंमध्येच यांगत्से इतकी रौद्र दिसतीय तर प्रत्यक्षात काय असेल.
26 Dec 2012 - 11:10 am | घाशीराम कोतवाल १.२
झक्कास अखेर चायना मधे हिंदि बोलणारे भेटले तर
26 Dec 2012 - 11:49 am | चेतन माने
यांगत्से नदी फारच रौद्र दिसतेय आणि शांग्रीला च्या सौंदर्याबद्दल काय म्हणावं!!
प्रत्येक भाग आधीच्या भागापेक्षा अजून सुंदर होत आहे!! पुढचा भाग (स्वर्गाचा) कळस गाठेल, वाट बघतोय :)
26 Dec 2012 - 3:22 pm | स्मिता.
असेच म्हणते. पुभाप्र.
26 Dec 2012 - 12:01 pm | बॅटमॅन
यांगत्से, शांग्री-ला आणि भाष्कर-रेस्टो.....सगळेच अवर्णनीय केवळ!!!!!!!!!!!!!! भरपूर फोटोंनी आम्हा सर्वांची भूक अंशतः का होईना, भागतेय एक्कासाहेब; निव्वळ तुमच्यामुळे. हॅट्स ऑफ टु यू!!!!!!!!!!
26 Dec 2012 - 1:04 pm | नि३सोलपुरकर
साहेब,
आमच्या सारख्या वाचकांसाठी हा ले़ख म्हणजे खरोखर "उघडले स्वर्गाचे दार " असेच आहे. केवळ अवर्णनीय
आणी "भारताच्या सिंहाने चीनच्या वाघाला सहज तळहातावर उचलून धरले होते !" हे तर खासच
खुप खुप धन्यवाद
26 Dec 2012 - 3:39 pm | पियुशा
सफर मस्त चाललीये :)
26 Dec 2012 - 4:12 pm | चाणक्य
मला तर त्या याकचा चेहरा पण चायनीज वाटला. नर्मदामाईच्या धर्तीवर यांगत्से'माई' आवडलं.
26 Dec 2012 - 8:30 pm | कानडाऊ योगेशु
+१.
मिपाकरांच्या वतीने एक नमस्कार यांगत्सेमाईंकडे पोहचवा! :)
26 Dec 2012 - 8:36 pm | कानडाऊ योगेशु
+१.
मिपाकरांच्या वतीने एक नमस्कार यांगत्सेमाईंकडे पोहचवा! :)
26 Dec 2012 - 8:37 pm | कानडाऊ योगेशु
+१.
मिपाकरांच्या वतीने एक नमस्कार यांगत्सेमाईंकडे पोहचवा! :)
26 Dec 2012 - 6:26 pm | वेताळ
वाचत आहे.
26 Dec 2012 - 8:49 pm | ५० फक्त
लई भारी, या वेळेपर्यंततर तुम्ही पक्के राव्डी राठोड दिसताय.....
धन्यवाद.
26 Dec 2012 - 9:10 pm | मिहिर
फोटो आणि वर्णनही मस्तच!
26 Dec 2012 - 9:27 pm | रेवती
इतके सुंदर फोटू आणि तसेच वर्णन केलेत. हा भाग या मालिकेतला उत्तम जमलेला असा आहे. तिबेटी म हे अक्षर आपल्या म अक्षराप्रमाणे आहे असे वाटले. शाकाहार्यांना खूषखबर दिल्याने आनंद झाला आहे.
26 Dec 2012 - 10:08 pm | तिरकीट
स्वर्ग दशांगुळे उरला.........
सुंदर अनुभव आहेत........
26 Dec 2012 - 10:25 pm | कौशी
यांगत्सेचे रौद्र रुप आवडले. पुढच्या भागाची वाट बघतेय.
26 Dec 2012 - 10:36 pm | रामपुरी
निसर्गसौन्दर्य ठीकठाक. पावसाळ्यात कुठल्याही घाटातून दिसणारे दृश्य. त्यामुळे फार काही भारी वाटले नाही. पण छायाचित्रे काढून घेण्याची हौस मात्र भारीच... :)
26 Dec 2012 - 10:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व प्रतिसादकत्यांचे मनःपुर्वक आभार ! या निमित्ताने मीही चीनची सफर पुन्हा अनुभवतोय.
मलापण अगदी तसेच वाटले. मी त्याला तसं म्हणालोही...
त्यावर तो काहीतरी पुटपुटला (पुरावा फोटोत आहे, बघा.)... पण चीनीमध्ये... म्हणून काय कळलं नाही बॉ ! +D
3 Jan 2013 - 2:08 pm | मालोजीराव
पुण्यात याक पाळू शकतो का ?
अवांतर:फोटो जबरी आला आहे.
- पशुपालक मालोजी
27 Dec 2012 - 2:37 am | सुनील
लेखमाला झकासच सुरू आहे. फोटोही छान.
खुद्द तिबेटमध्ये चीन सरकार, चिनी वंशियांचे प्रमाण वाढावे यासाठी खास प्रयत्न करीत असताना, चिनच्याच एका शहरात्/जिल्ह्यात, तिबेटींचे प्राबल्य असावे, ही बाब रोचक वाटली!
खेरीज, चीनच्या अंतर्भागात कुठेतरी देवनागरी पाटी आणि हिंदी भाषा ऐकायला मिळणे, हे तर खूपच चकित करणारे.
27 Dec 2012 - 8:50 am | अर्धवटराव
पुर्वी मितान ने नोर्वेची सफर घडवली होती. तशीच तुम्ही घडवताय. प्रसन्न, आल्हादकारी.
अर्धवटराव
27 Dec 2012 - 11:42 am | ह भ प
पयला फटू बगून तं मला यवतेश्वरच आटवला..
27 Dec 2012 - 12:20 pm | दादा पेंगट
ते जे तिबेटी भाषेत लिहीले आहे ते " ओम् मणिपद्मे हुम् "( तंतोतंत लिहायचे झाल्यास == ओं मणिपद्मे हूं ) लिहीले आहे. हा एक तिबेटी बौद्ध धर्मातला महत्वाचा षडाक्षरी मंत्र आहे आणि संस्कृतमध्ये आहे. तिबेटमध्ये सर्वत्र किंवा जिथे तुम्हाला तिबेटी संस्कृतीचा प्रभाव दिसेल तिथे हा मंत्र झेंड्यांवर, दगडांवर, प्रार्थनाचक्रांवर दिसेल. हा षडाक्षरी मंत्र लिहतांना रंगांचा वापर आणि क्रमही अत्यंत महत्वाचा आहे. फोटोत दिसलेल्या रंगांतच सर्वत्र हा मंत्र लिहीलेला दिसेल.(देवनागरी लिपीत आणि तिबेटी लिपीत साम्य आहेच.)
27 Dec 2012 - 1:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
आमच्या गाईडचे बहुतेक आयुष्य तिबेट बाहेर गेलेले असल्याने तिला बहुतेक तिबेटी लिपी नीट माहित नसावी. शिवाय एकंदर बुद्धधर्माच्याबद्दलच्या चीनच्या सरकारी अनास्थेमुळे सर्वसामान्य माणसात बौद्ध धर्माच्या इतिहासाबद्दल काहिसे अज्ञानही दिसले. कारण काही गाईडनी "बुद्धाचे लग्न झाले होते का?" असे विचारले. तर काही जणाना "तो जर खरेच राजपुत्र होता तर सगळे वैभव सोडून तपस्या करायला का बरं गेला?" असे आश्चर्य वाटत होते. अर्थात सगळे इंग्लीश बोलणारे गाईड २०-२५ च्या वयोगटातले असल्याने आणि इतर चीनी मंडळींशी भाषेच्या अडचणीमुळे संवाद अशक्य असल्याने हे माझे मत काही प्रातिनिधीक म्हणता येणार नाही.
तुमचा तिबेटचा अभ्यास चांगला दिसतोय. जर या मंत्राचा अर्थही सांगीतलात तर आनंद होईल; शिवाय त्या विशिष्ट रंगांचे महत्वही. हेच रंग सगळीकडे, विषेशतः धार्मीक पताकांत दिसले... पण पॅगोडा अथवा मंदीरांच्या रंगरगोटीत नाही.
27 Dec 2012 - 12:36 pm | अत्रन्गि पाउस
बुवा ह्याचे सन्कलित पुस्तक काढा नक्की...
27 Dec 2012 - 1:58 pm | गवि
बापरे. तो पाण्याचा धोंदाणा पाहून थरकापच उडतो आहे.
बाकी चायनीज / तिबेटी पदार्थ हे आपल्या चायनीज गाड्यावरच्या पदार्थांपेक्षा चवीला वेगळे असतात का हो?
की आपलेच चायनीज जास्त चमचमीत ? ;)
27 Dec 2012 - 4:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारतातच काय पण पाश्च्यात्य देशांतही (अगदी लॉस एन्जेलीसच्या चायना टाउनमध्येही) जे पदार्थ अस्सल चीनी पाककलेलेचे नमुने म्हणून गाजलेले पदार्थ खाल्ले आहेत ते चीनमध्ये औषधालाही आढळले नाहीत, अगदी ती नांवे सुद्धा नाही !!! याला फक्त चीनी डंपलींगच्या (मोदकांच्या) नावाचा अपवाद... पण तेथे त्यांची चव फारच वेगळी होती.
उगाच नाही आम्ही अगोदरपासून म्हणतो की जगातले "प्रसिद्ध" चीनी पदार्थ "व्हाया अमेरिकन ईमॅजिनेशन" आलेले आहेत... आणि भारतातले गाड्यांवर मिळणारे तर "व्हाया अमेरिकन ईमॅजिनेशन + कोल्हापुरी मसाला" !
27 Dec 2012 - 2:15 pm | पैसा
फोटो, वर्णन केवळ अप्रतिम. मालिका मस्त चालू आहे.
27 Dec 2012 - 4:35 pm | सस्नेह
खरोखर तुमचे सफर वर्णन एका वेगळ्याच गूढ-सुंदर जगात घेउन जाते आहे..
2 Jan 2013 - 2:52 pm | स्पंदन..
निव्वळ अप्रतिम...आम्हाला तुमचा हेवा वाटतोय्....साहेब एक प्रश्न आहे..प्लिज वाइट नका वाटुन घेवु..ब्लु जीन्स आणि सफेद शर्ट तुमचे खूप आवडते आहे का हो?...तुमच्या प्रत्येक फोटो मधे हेच कॉम्बिनेशन आहे. बाकी वर बोलल्याप्रमाणे तुम्ही पक्के रावडि राठोड दिसत आहात...पुढच्या लेखा॑ची वाट बघतोय.....
2 Jan 2013 - 6:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्यांतला एकही शर्ट पूर्ण पांढरा नाही... रंगीत रेषा किंवा चौकडी आहेत, पण जाड (बटबटीत !?) नाहीत त्यामुळे दुरून काढलेल्या फोटोत दिसत नाहीत. शिवाय पुढे अजून काही कपड्यांचे प्रकार दिसतील. जरा धीर धरा हो ! +D
3 Jan 2013 - 12:43 pm | स्पंदन..
साहेब.. आता धीर धरला जात नाहिये..आतुरतेने वाट बघतोय, पुढ्च्या ले़खाची आणि तुमच्या कपड्यांच्या प्रकारा॑ची... :)
3 Jan 2013 - 1:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
लेख जरूर येईल. तुमच्यासारख्या दर्दी वाचकांचा असाच सहभाग असला तरच लिहावेसे वाटते.
पण कपड्यांचा मला फार सोस नाही, तेव्हा त्याबाबतीत तुमचा भ्रमनिरास होण्याचीच जास्त शक्यता आहे. तसेच, जर लेखाला आवश्यक असणारे दृश्य माझ्याशिवाय नसले तरच माझा सहभाग असलेला फोटो टाकतोय हे तुमच्या तीक्ष्ण निरिक्षणशक्तीने ओळखले असेलच ! +D
2 Jan 2013 - 6:32 pm | जगड्या
नर्मदामाईच्या धर्तीवर यांगत्से'माई' आवडल.