===================================================================
ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...
===================================================================
आज बायजींगमधला चौथा दिवस. दुपारी सव्वातीनला शियानचे विमान पकडायचे होते. गाईड बारा वाजता येईन म्हणाला होता. न्याहरी नऊ वाजता आटपली. नुसते लोळत पडण्यापेक्षा जरा हॉटेलच्या आजूबाजूस फेरफटका मारावे असे ठरवून बाहेर पडलो. हॉटेलच्या गल्लीतून बाहेर पडून एका प्रशस्त रस्त्यावर आलो. हा रस्ता जरा मजेशीर वाटला. कारण एका बाजूला पारंपरिक चिनी ठेवणीची दुकाने होती.
.
तर दुसरी बाजू आधुनिक संपन्न चीनचे दर्शन घडवीत होती.
.
चिनी व्यवसायाचे ठिकाण म्हटले म्हणजे भाग्य खेचून आणणारा सिंह दरवाज्यात पाहिजेच. असा दरारा असलेल्या व समृद्धीचे प्रतीक असलेल्या या राजाच्या काही खास रूपाबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. एक खास जगावेगळा सिंह... चितळाची शिंगे व खूर आणि बोकडाची दाढी धारण केलेला.
चारपाच मिनिटेच चाललो असेन तर एकदम एवढी हिरवळ व झाडी आजूबाजूला सुरू झाली की फुटपाथावर चालतोय की एखाद्या बागेतून चालतोय असा संभ्रम पडला.
.
.
.
.
मी स्वतः त्यावरून चालत नसतो तर हा मध्यवस्तीतल्या चारपदरी रस्त्याचा फुटपाथ आहे ह्यावर विश्वास बसणे कठीण गेले असते. पाचेक मिनिटे पुढे चाललो असेन तर फुटपाथ एका छोट्याशा पटांगणासारख्या मोकळ्या जागेला मिळाला. तेथे बरेच नागरिक जमा होऊन काही कार्यक्रम चालू होता. मीही बघ्यांच्या गर्दीत मिसळलो. खास गुलाबी कपडे परिधान करून बर्याच चिनी काकू-मावशा-आजी चिनी पद्धतीचा नाच करीत होत्या. नंतर पुढे प्रवासात कळले की ह्याला "ताई ची" म्हणतात आणि हा एक चिनी व्यायामप्रकार आहे. (अवांतर याचा मराठी 'ताई'शी कोणताही संबंघ नाही :)) .) सबंध चीनभर सकाळ संध्याकाळ चिनी लोक हा व्यायाम सार्वजनिक बागांत करताना दिसतात. विशेषतः वयस्कर मंडळी असतात, अगदी ७०-८० वर्षांचे चिरतरुण आजीआजोबा मोठ्या कौशल्याने सर्व हालचाली करतात.... तरुण फारच क्वचित दिसतात.
काय चालले आहे याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण पांचव्या-सहाव्या चेहर्यावरसुद्धा "काय वेड्यासारखी मंगळावरची भाषा बोलतोयस ? जरा शहाण्या माणसासारखी चिनी भाषा बोल ना." असे भाव होते. पण प्रयत्न सोडला नाही. शेवटी तिथे ड्यूटीवर असलेल्या गार्डला माझी दया आली. तो इंग्रजीची मोडतोड करीत माझी मदत करू लागला. आमचे बरेचसे विनोदी संभाषण ऐकून एका मावशीबाईंनाही इंग्रजीवर अत्याचार करण्याचा मोह आवरला नाही. सर्वसाधारण चिनी माणसाचा स्वभाव तसा मनमिळाऊ आणि मैत्रिपूर्ण आहे. पण भाषेच्या अडथळ्यावर अडकून कशी विकेट जाते याचा प्रत्यय संपूर्ण प्रवासात सतत येत राहिला. असो. शेवटी येवढे कळले की रस्त्याशेजारच्या कॉलनीचा वार्षिक "community day" साजरा होत होता. ताई ची संपल्यावर एक कॉमरेड आणि कॉमरेडीण आले आणि त्यांनी भाषणे ठोकली.
ओ की ठो कळत नव्हते पण एवढी मजा आली की ३० एक मिनिटं कार्यक्रम बघत होतो. नंतर गार्डबरोबर फोटोचा कार्यक्रम झाला. चीनमध्ये चिनी तोंडवळा नसलेली माणसे अत्यंत विरळा. अगदी एवढा अगडबंब देश (भारताच्या जवळजवळ तीनपट क्षेत्रफळ), भारतापेक्षा १०-१५ कोटी जास्त लोकसंख्या, खूप मोठा पर्यटन व्यवसाय पण परदेशी प्रवाशांचे प्रमाण अगदी नगण्य म्हणजे ३-५%. चिनी (मंगोलॉईड) नसलेली चेहेरपट्टी एकदम विरळा. त्यामुळेच बहुदा बर्याचदा थोडीशी ओळख झाली की लगेच फोटो काढू म्हणतात. हा दस्तूरखुद्दांचा त्याच गार्डबरोबरचा फोटो.
आमच्या ग्रेट वॉलच्या ग्रुपमध्ये एक उंचापुरा (अर्थातच) गोरागोमटा इटालियन तरुण होता त्याला तर चारपाच वेळेस चिनी पोरींनी फोटो काढायला घेरले होते. तोही मजेत लगेच हो म्हणून तयार. पण दर वेळेस त्याच्या बरोबर असलेल्या त्याच्या मैत्रिणीच चेहरा मजेशीर होई.
नंतर थोडे पुढे गेल्यावर फूट्पाथची (बागेची) रुंदी जरा कमी झाली आणि बाजूचा सर्विस रोड व कॉलनी दिसू लागली.
एवढे ऐश्वर्य पाहिले आणि त्याचे गालबोटही दिसले... हा त्या बागेतल्या पाण्यात सकाळची अंघोळ आटपून घेणारा बेघर बायजींगकर.
याला इंग्लिशमध्ये एक चपखल वचन आहे: "Starvation in the midst of plenty !"
हॉटेलच्या एका बाजूचा फेरफटका संपवून दुसरी बाजू पकडली तर दोनच मिनिटात एक मोठी बाग दिसली आणि आठवले की गाईडने सांगितले होते की तुमच्या हॉटेलच्या शेजारची सम्राटाची बाग (Imperial Garden) जरूर पहा. मी चक्क विसरलो होतो की ! जर योगायोगाने येथे आलो नसतो तर केवढी मोठी चूक झाली असती याची आत शिरताक्षणीच जाणीव झाली.
.
.
.
.
.
.
.
.
गंमत अशी की ही बाग आणि बाजूची घरे यांच्यामध्ये भिंत सोडा पण एकाधे साधे कुंपणही नव्हते. शेजारच्या घरांचे दरवाजे बागेत ऊघडत होते आणि काही गल्ल्या सरळ बागेला येऊन मिळत होत्या!
.
.
बाग बघायला आलेल्या प्रवाशांची वर्दळ तर होतीच पण विशेष म्हणजे बाजूच्या घरांतील लोकही आरामात आपल्या घराचीच बाग असल्यासारखे तिचा उपयोग करत होते. बायका झाडाच्या सावलीत बसून शिवणकाम / भरतकाम करता करता शिळोप्याच्या गप्पा मारत होत्या, पुरुष पेपर वाचत बसले होते. पोरं उंडारत होती.
.
एवढे असून विशेष म्हणजे बागेत एकही गार्ड अथवा माळी दिसत नव्हता. तरीसुद्धा कमालीची स्वच्छता आणि टापटीप होती. बेपर्वाईने फेकून दिलेला एक कागदाचा कपटा किंवा कोठे कचर्याचा ढीग दिसला नाही, ना कुठल्या फुलझाडाची नासाडी, ना मरतुकडी फुलझाडे अथवा झाडाच्या बुंध्यावर कोरलेली नावें. बागेत फिरताना साडेअकरा केव्हा वाजते ते कळले देखील नाही आणि गडबडीत हॉटेलकडे निघालो. गाईड बरोबर बारा वाजता विमानतळावर सोडण्यासाठी आला आणि हॉटेलला बायबाय करून शियानला जाण्यास निघालो.
विमान घावपट्टीवर असताना घेतलेला बायजींग विमानतळाला बायबाय करतानाचा फोटो...
आणि हा विमानाने हवेत झेप घेतल्यावर बायजींग शहराचा...
पूर्व व दक्षिण चीन डोंगरदर्यांनी भरलेला भूभाग आहे. सपाट जमीन मधूनमधूनच दिसते. त्यामुळे हा भाग असंख्य नद्या-उपनद्यांनी सिंचलेला सुपीक आणि हिरवागार दिसत होता. बायजींग ते शियान संपूर्ण प्रवासात हेच चित्र दिसत होते.
.
.
असंख्य लहानमोठी धरणे चीनने केलेल्या भौतिक प्रगतीची साक्ष देत होती...
.
शेकडो किमी लांबीचा डोळ्यांच्या सीमेपर्यंत केवळ वळ्यावळ्यांचा भूभाग इतर कोठे बघितला नव्हता ! असं म्हणतात की चीनच्या इतिहासावर त्याच्या या भूगोलाचा फार मोठा परिणाम झाला आहे. पण ते पुढे केव्हा तरी.
.
मधूनच एखाद्या दरीत छोटी वस्ती किंवा एखादे मोठे शहर दिसत होते.
मधूनच अगडबंब यांगत्से नदी आणि तिच्या उपनद्या सापासारख्या वळसे घेते धावताना दिसत होत्या.
.
बायजींग-शियान हे अंतर १०३५ किमी आहे. पण चिनी निसर्गाचे हे विहंगम रूप पाहताना दीड तास भुर्रकन जाऊन शियानला विमान उतरू लागल्याची घोषणा झाली सुद्धा ! हॉटेलवर पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सात वाजले. शॉवर घेऊन जेवण करे पर्यंत ९ वाजत आले होते. खोलीवर येऊन ऊद्याच्या भरगच्च कार्यक्रमाचा बिछान्यावर पडून विचार करता करता केव्हा डोळा लागला ते कळलेही नाही.
(क्रमशः)
===================================================================
ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...
===================================================================
प्रतिक्रिया
9 Dec 2012 - 11:14 pm | खेडूत
हाही भाग आवडला. सम्राटाची बाग तर फारच छान!
9 Dec 2012 - 11:35 pm | दादा कोंडके
हा ही भाग उत्तम.
अवांतरः एखादं ठिकाण बघताना कितीही नाही म्हटलं तरी आपल्या देशाची तुलना होतेच. आणि भारताची या मागच्या पाच-दहा वर्षात कंट्री ऑफ स्नेक चार्मर पासून ते सुपरपॉवर अशी हाइप्ड प्रतिमा झाली आहे. प्रत्येक चार-चाकी सार्वजनिक पार्कींग लॉट मध्ये अपंगांसाठी काही (लोकसंख्येच्या पर्सेंटेजप्रमाणे) जागा राखीव असलेल्या एका देशात फिरताना गाईडने बोलताना, 'इथं प्रत्येक अपंग माणूस गाडी चालवतो या ग्रूहितकाने या जागा आरक्षीत केल्या आहेत ते चूकीचं आहे. त्यामुळे बहुतेक जागा रिकाम्याच असतात. भारतात असंच गृहितक आहे का?' असं निरागसपणे विचारून गृप मधल्या भारतीयांची विकेट काढली होती.
10 Dec 2012 - 10:57 am | डॉ सुहास म्हात्रे
अशी तुलना मनात सहजच होते आणि बर्याचवेळा निरागसपणे असे प्रश्न विचारले जातात की हे म्हणावे की नाही असा संभ्रम पडतो... कारण दोन्ही बाबतीत विकेट जाणार हे नक्की.
गौतम बुद्धासंबद्धी बोलताना एका गाईडने मला विचारले: "बुद्ध भारतातून चीनमध्ये आला. तर मग आमच्याकडे शंभर एक बुद्ध आहेत आणि तुमच्याकडे फक्त एकच शाक्यमुनी बुद्ध कसा?" आता याला मी काय सांगणार? चीनमध्ये ६०% लोक जरी बौद्ध असले तरी गेल्या ५०-६० वर्षांत कम्युनिस्ट राजवटिने धर्मसंस्थांवर एवढी बंधने घातली आहेत की २५-३० वर्षांच्या चीनी माणसाला बौद्ध धर्माची जुजूबी माहिती असावी. सर्व इंग्लीश गाईड या वयोगटातलेच होते, त्यांच्याशी झालेल्या बोलण्यावरूनतरी असेच जाणवते.
10 Dec 2012 - 12:27 am | बॅटमॅन
हाही भाग लै लै लै लै आवडला, फोटोंबद्दल काय बोलावे, _/\_. सम्राटाची बाग लय्च मस्ताड!!
10 Dec 2012 - 12:43 am | मीनल
तो लाल गोलाकार पूल आहे तिथे हिवाळ्यात अतिशय थंड अश्या पाण्यात पोहण्याच्या स्पर्धा होतात. आजूबाजूला बर्फ, पाण्याच्या कडेला काचेसारखे तयार झालेले बर्फाचे पापुद्रे यात नुसती उडी घेण्याचे धाडस होत नाही. परंतु असे धाडस करणा-यांचे पूलावर चार गरम कपड्यांवर कातडी जॅकेट घालून उभे असलेले लोक खूप कौतुक कर तात.
तायची च्या ही स्पर्धा होतात. वयाप्रमाणे गट करून बक्षिसे होतात. ब-याच बागेत, फुटपाथवर फुकट शिकवले जाते. लहान मुलांपेक्षा यात वयस्कर जास्त पहायला मिळाले.
आम्ही ज्या ठिकाणी रहात होतो तिथे जिम मधिल शिक्षक सकाळी बाहेर मोकळ्या हवेत शिकवायचे. मला त्या मधिल पाय-या विसरायलाच व्हायच्या. ते सर "मै वंती" म्हणजे नो प्रोब्लेम असे म्हणून हसायचे.
ते शांत म्युझिक मला फार आवडायचे. नंतर नंतर तायची छानसे जमायला लागले होते.
आता त्यापैकी काहिच येत नाही. शिवाय आठवणी !!!!!!
10 Dec 2012 - 2:08 am | रामपुरी
"आता त्यापैकी काहिच येत नाही. शिवाय आठवणी !!!!!!"
हे 'शिवाय आठवणी' म्हणजे काय असतं??
10 Dec 2012 - 3:11 am | बन्या बापु
उत्तम प्रवासवर्णन.. सगळे भाग पुन्हा वाचून काढले.. आणि चीनला भेट २०१३ मध्ये भेट द्यावी असा निर्धार करण्यात आलेला आहे.
पुढील भाग वाचण्यास उत्सुक.. तेथील खाद्यसंस्कृती बद्दल काही लिहिल्यास वाचायला आवडेल. फोटू असले तर अधिक मजा येईल.
पुलेशु
एक प्रश्न:
चीनमध्ये जाण्यास काही विशेष पारपत्र, विसा ( भारतीय वंशाचे असल्यामुळे ) लागतो काय ?
10 Dec 2012 - 11:37 am | डॉ सुहास म्हात्रे
काही विशेष नाही. सर्वसाधारपणे ज्या गोष्टी परदेशप्रवासाला लागतात तेवढ्याच... कमीतकमी ६ महिने मुदत शिल्लक असलेला पासपोर्ट, आर्थिक परिस्थिती पुरेशी सबळ असल्याचा पुरावा (बँकेचा सहा महिन्यांचे स्टेटमेंट, ई.), विमानाचे परतीचे तिकीट, टूर कंपनीचे आमंत्रण ( हे चीनी व इंग्लीश मध्ये लागते व टूर कंपनी योग्य त्या फॉर्मटमध्ये पाठवते) ह्या महत्वाच्या गोष्टी. भारतीय असल्यामुळे मलातरी काही वेगळा अनुभव आला नाही.
चीनी दुतावासाच्या संस्थळावर application form व इतर सर्व माहिती आहे. फॉर्म डाऊनलोड करता येतो... दर देशाप्रमाणे थोडा फरक असतो असे दिसले, शिवाय version numbers होते. तेव्हा ज्या देशातल्या चीनी दुतावासात अर्ज करणार त्याच दुतावासाच्या संस्थळवरुन माहिती व फोर्म घेणे हिताचे आहे. तसेच खूप अगोदर माहिती जमा केली असल्यास जाण्याचे नक्की ठरल्यावर परत एकदा दुतावासाच्या संस्थळावर फेरी मारून सर्व ठीक असल्याची खात्री करून घ्या.
खाद्द्याबद्दल माहिती पुढे येईलच.
तुमच्या चीन भेटीसाठी धुभेछा !
10 Dec 2012 - 8:39 am | ५० फक्त
लई भारी बाबा, ते बागा बिगा, अर्थात चिनचा चिननं परवानगी दिलेला चेहराच तुम्हाला जगासमोर ठेवता येतो या लिमिटची पुर्ण जाणिव असुन तुम्ही लिहिताय ते खुप छान आहे.
10 Dec 2012 - 11:48 am | डॉ सुहास म्हात्रे
बायजींग हे तर प्रवासाचे पहिलेच ठिकाण. अजून बर्याच ठिकाणांना भेटी द्यायच्या आहेत. जसा प्रवास पुढे जाईल तसे बर्याच प्रकारचे चीनी चेहरे प्रसंगानुसार पुढे येतीलच. तुमचा असाच उत्साही सहभाग असला तर लिहायला अजून मजा येयील.
10 Dec 2012 - 9:07 am | प्रचेतस
लेखमाला उत्तम होते आहे.
10 Dec 2012 - 12:15 pm | टुकुल
अजुन एक मस्त सफर.
तो फोटोतला चिनी नागरीक झोपलेला आहे कि जागी हेच कळत नाही :-)
--टुकुल
10 Dec 2012 - 3:48 pm | सस्नेह
उत्तम लेखनशैली.
चीन एक लोकसंख्याच नव्हे, तर इतरही कितीतरी गोष्टींमध्ये भारतापेक्षा पुढे आहे याची जाणीव सफरवर्णन वाचून झाली.
10 Dec 2012 - 5:44 pm | रेवती
मस्त हो साहेब! आपण नव्या ठिकाणाला भेट देताना नुसती प्रेक्षणीय स्थळे पाहण्याऐवजी रोजचे जीवन पाहण्याची हौस असतेच. फटू तर छानच!
10 Dec 2012 - 9:14 pm | मदनबाण
मस्त वर्णन,मस्त फोटु ! :)तुमची फोटो काढुन घ्यायची हौस देखील आवडली ! :)
बाकी तो चितळ कम बोकड कम सिंह शॉलिट्ट "क्युट" दिसतो आहे ! ;) तुम्ही अंगठ्याने त्याची मिशी चांगली दाबुन धरलेली दिसतेय ! ;)
11 Dec 2012 - 11:39 am | मानस्
तुमच्या नेहमीच्याच शैलीतलं सर्व बारकाव्यांसह केलेल वर्णन आवडलं.हा भाग आणि सर्वच छायाचित्रे उत्तम.
पुढच्या भागाची वाट पाहातोय.