सेल्समन भाग - ३

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
4 Jul 2012 - 8:54 am

भाग १
भाग २

संध्याकाळ कुणी कुणाशी न बोलता निघून जाते. पालकची नावडती भाजी तक्रार न करता राहुल जेवणात घेतो आणि गुपचुप झोपी जातो.
पुढे..

महिन्याभरात आप्पांचा राग निवळून जातो. राहुल वेळ जात नाही म्हणून कॉलेजच्या कँटीनमधे, खेळाच्या ग्राऊंडवर चकरा मारायला लागतो. लेक्चर सुटले की मित्रांची वाट बघणे, त्यांच्याबरोबर कँटीनमधे गप्पा ठोकणे हा त्याचा नित्यक्रम होऊन बसतो. पण बाकीचे कॉलेजात असताना आपण बाहेर फिरतोय हा सल त्याच्या मनात कायम असतो.

माई: "अहो, मी काय म्हणते, राहुलला काहीतरी कामधंदा करायला सांगा, चार पैसे घरात येतील आणि त्याचं हे रिकामं फिरणंही बंद होईल, नुसतच पेट्रोल जाळत फिरतो आणि बाहेरचं खाऊन पैसे उडवतो. महागाई किती वाढलीये आणि तुमचा पगारही पुरत नाही आता."

आप्पा: "अगं अजुन लहान आहे तो. आणि हेच वय आहे त्याचं मजा मस्ती करण्याचं, मी आतापासून त्याच्यावर जबाबदारीचं ओझं नाही टाकणार. आनी कुणास ठाऊक कामधंद्याच्या नादात अभ्यास कायमचाच विसरला म्हणजे? नाही नाही.. कमीत कमी स्वतःच्या बरोबरीच्या मुलांबरोबर जातोय ना, आज उद्या त्यांच्या नादाने का होईना व्यवस्थित शिक्षण पुर्ण केलं म्हणजे झालं."

माई: "नाही हो, मला तर असं वाटतय की आता त्याच्याकडून काही शिक्षण होणार नाही, हॉटेलात कपबश्या धुण्याचं काम मिळालं तरी चालेल मी तर म्हणते"

आप्पा: "बास.. अजुन काही बोललीस तर याद राख. मी समर्थ आहे अजून घर चालवायला. या विषयावर आणखी काही बोलु नकोस आणि राहुलला तर अजिबात नाही. माझंच स्वाभिमानी रक्त आहे त्याच्यात."

तो दिवसही निघून जातो. एक दिवस राहुल आणि त्याचे मित्र २ दिवसाच्या पिकनिकला जायचा प्लॅन करतात. प्रत्येकी ५००-६०० रुपये खर्च येणार. राहुल आनंदात हो म्हणून बसतो पण नंतर आप्पांना कसं विचारणार याची धास्ती घेऊन बसतो. पिकनिक एक आठवड्यावर आली असताना तो आप्पांना न विचारता माईला विचारुन बघावं असं त्याच्या मनात येतं आणि तो माईकडे आप्पा घरी नसताना धीर करून ५०० रुपयांची मागणी करतो. माईचा इतक्या दिवसांपासून दाटलेला राग या निमित्तानं बाहेर पडतो. माइ त्याच्या कानाखाली जाळ काढते. तास दोन तास त्याला अद्वातद्वा बोलते. पाच रुपये कमवुन दाखव आणि मग पाचशे माग असंही म्हणते. पाच रुपयाचं वाक्य राहुलला भलतंच सलतं.

मित्रांना पिकनिकला यायला जमणार नाही असं सांगून राहुल कॉलेजला जायचंही बंद करतो. खरंच मी पाच रुपये कमवायच्या लायकीचा नाही का? आणि आप्पा आपल्यावर किती खर्च करतात असाही विचार त्याच्या मनात येऊ लागतो, त्याला स्वत:ची लाज वाटु लागते आणि एक दिवस काहीतरी नोकरी करायची असा मनाशी ठाम निश्चय करतो.

नोकरी कशी करतात किंवा कशी शोधतात हेही माहित नसल्याने राहुल गोंधळून जातो. वर्तमानपत्रातल्या जाहीराती बघावं तर सगळीकडे शिक्षण, अनुभव आणि वयाची अट. अचानक त्याला विक्रमची आठवण होते. विक्रम हा त्याच्याच कॉलेजातला अधून मधून फुटबॉल खेळायला येण्यामुळे ओळख झालेला मित्र. तो फुल टाइम नोकरी करुन एमबीए करणारा म्हणजे कॉलेज न करता फक्त परीक्षेला हजेरी लावणारा, राहुलपेक्षा वयाने मोठा आणि राहुलच्या मनात त्याच्या व्यक्तीमत्वाची छाप सोडणारा एक तरूण. राहुल त्याचा नंबर मिळवतो आणि त्याला भेटायचे ठरवतो.

विक्रमला भेटल्यावर राहुल त्याला नोकरी करण्याची ईच्छा बोलून दाखवतो आणि त्याच्या मार्गदर्शनाची मदत मागतो. थोडासा गोंधळलेला विक्रम राहुलच्या डोळ्यातली चमक पाहुन हलकेच स्मित करतो. राहुलचा आत्मविश्वास त्याला चकीत करुन सोडतो.
विक्रमः "मी जिथे नोकरी करतो तिथे पदवीधर लोकांनाच नोकरी देतात. मी ट्रॅक्टर विकणार्‍या कंपनीत मार्केटींगची नोकरी करतो. तुझं शिक्षण अशा प्रकारच्या नोकरीसाठी कमी आहे. पण माझा एक मित्र आहे तो तुला नक्की मदत करु शकेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव. नोकरी आता कितीही पैसे देणारी असली तरी शिक्षण अपुर्ण ठेवु नकोस."

विक्रमकरवी रितेशची भेट होते. रितेश जिथे नोकरी करतो तिथे सेल्स मधे नोकरी आहे असे राहुला कळते. रितेश राहुलला सोमवारी सकाळी ब्रँच मॅनेजरला भेटायला आणि मुलाखतीसाठी येण्यास सांगतो. त्याआधी रितेश त्याचा नोकरीसाठीचा अर्ज तयार करुन देतो आणि फॉर्मल शर्ट पँट आणि जमल्यास टाय लावून येण्यास सांगतो. राहुल डोक्याला हात लावतो. कारण त्याच्याकडे टाय तर लांबच पण फॉर्मल कपडे देखील नसतात. म्हणायला १-२ शर्ट आहेत पण पँट.. सगळ्या जीन्स वापरणारा कॉलेजतरूण तो. नविन कपडे घ्यावेत तर पैसे लागणार आणि शिवुन घ्यायला देखील ३-४ दिवस. त्याच्याकडे दोनच दिवस शिल्लक असतात. माईचे शब्द त्याच्या डोक्यात घर करुन बसले होते. माई किंवा आप्पांकडे पैसे न मागता त्याने जाड्याकडे मदत मागायचे ठरवतो पण आता पैसे कुणाकडेच मागायचे नाहीत असाही निश्चय तो करतो. जाड्या त्याला पैसे देऊ करतो पण राहुल ते नाकरतो. त्याऐवजी जाड्याची एखादी वापरात नसलेली फॉर्मल पँट तो मागतो. जाड्या राहुलचाहा अवतार पाहून थोडा दु:खी आणि थोडा आश्चर्यचकीत होतो.

जाड्याची पँट नीट बसत नसली तरी बेल्ट लावून एक दोन घड्या पडून का होईना पण तशीच वापरायचे राहुल ठरवतो.
राहुलचं नक्की काय चाल्लय हे माई आणि आप्पांना विचित्र वाटत असलं तरी 'असेल काहीतरी उपद्व्याप चालू' असे म्हणून सोडून देतात. रविवार रात्र, 'टाय नाहीये', 'उद्या काय होईल' असे अनेक प्रश्न, विचार, भिती, दडपण घेऊन राहुल रात्रभर कुस बदलत जागाच रहातो.

क्रमशः
विनंती: वाचकांनी कथेत आणि व्याकरनात काही चुका असल्या तर त्या माफ कराव्यात :)

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

4 Jul 2012 - 9:04 am | शिल्पा ब

व्याकरण घाल चुलीत! भाग जरा मोठे टाक नैतर सगळं लिहुन मगच टाक. |(

शैलेन्द्र's picture

4 Jul 2012 - 9:11 am | शैलेन्द्र

याला म्हणतात प्रतिक्रीया.. जाम्म सहमत्त..

प्रचेतस's picture

4 Jul 2012 - 9:11 am | प्रचेतस

ममो, कथा आवडली.
कथानकाच्या शैलीत थोडा बदल केलात तर अधिक वाचनीय होईल.

जसे.

महिन्याभरात आप्पांचा राग निवळून जातो. राहुल वेळ जात नाही म्हणून कॉलेजच्या कँटीनमधे, खेळाच्या ग्राऊंडवर चकरा मारायला लागतो.

महिन्याभरात आप्पांचा राग निवळून गेला. राहुल वेळ जात नाही म्हणून कॉलेजच्या कँटीनमधे, खेळाच्या ग्राऊंडवर चकरा मारायला लागला.

अर्थात ही फक्त सूचनाच.

पुभाप्र.

अमृत's picture

4 Jul 2012 - 11:07 am | अमृत

जातो, लागतो हे वाचताना थोडं खटकतच. बघा वल्लींची सूचना पटते काय.

अमृत

श्रीरंग_जोशी's picture

4 Jul 2012 - 9:31 am | श्रीरंग_जोशी

ममो -बरेच दिवसांनी नवा भाग वाचूनही लिंक तुटल्यासारखे वाटले नाही.

पण खालील वाक्याने तर दिलच तोडला.... ;-). तुम्ही असे लिहू लागल्यावर आम्ही कुणाकडे बघायचे?

>> विनंती: वाचकांनी कथेत आणि व्याकरनात काही चुका असल्या तर त्या माफ कराव्यात

५० फक्त's picture

4 Jul 2012 - 10:38 am | ५० फक्त

ब-याच दिवसांनी आला राहुल, लवकर लवकर टाका भाग म्हणजे मजा येईल.

मृत्युन्जय's picture

4 Jul 2012 - 11:19 am | मृत्युन्जय

सहमत.

निवेदिता-ताई's picture

4 Jul 2012 - 11:19 am | निवेदिता-ताई

छानच लिहिलीय--- येऊदेत लवकर पुढील...

मुक्त विहारि's picture

4 Jul 2012 - 11:21 am | मुक्त विहारि

वाचत आहे..

जमेल तसे लिहा आणि पूर्ण करा..

jaypal's picture

4 Jul 2012 - 11:39 am | jaypal

पुढिल भागाच्या प्रतीक्षेत.

येउद्या कि पुढील भाग लवकर