होळी झाली की गावात हळू हळू वार बदलू लागे. जवळ जवळ गेले दहा महिने शेतावर एकसारखी सुरु असणारी लगबग आता कमी होई. रण रणत्या उन्हात पिकं नसलेली शेत उजाड वाटत.
पण शेतावर नसलं, तरी काम हे असायचच. उन्हाळ्यात बहुतेक जण; जे काय बांधकाम असेल, एखाद नवीन छप्पर उभा राहायचं , एखादी डागडूजीला आलेली भिंत दुरुस्त व्हायची. बहुतेक कामं, घरातलीच मानसं घेऊन पुरी करुन घेतात. फक्त गवंडी वां सुतार हे कसबी लोक या कामांसाठी मजुरीवर घेतले जात.
रानात उस असे. झाडाला आंबे, जांभूळ यांचा बहार असे. बहुतेक मोठी माणस गावात! अन मग शाळा नसलेली पोर मोकाट सुटत.गावात सुध्धा अधी_मधी एखादी करवंदवाली, वां गारेगारवाला 'आईस कांडी ' असं ओरडत येत असे.
बहुतेकदा माळावर अगदी सकाळी सकाळी गोवऱ्या लावायचं वा, कच्च्या मातीच्या विटा पाडायचं काम चाले. उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या नदीत फक्त डोहातच काय ते पाणी असे.पण डोहातल पाणी कधीही प्यायला म्हणून वापरलं जात नसे. नदीतच वाळूत खड्डे पाडुन प्यायचं पाणी आणल जाई,
वैशाख कधीच येताना एकटा नाही येत. सकाळ पासून तापत जाणारी उन्हं, दुपारी एकदम काळवंडतात! तशी माणसं सकाळ पासूनच अंदाज लावतात' आज फार गदमद होते आहे, दुपार वरून वळीव उतरतोय वाटत!' तोवर शेतातल्या नांगरटी निम्म्यावर आलेल्या असतात. सकाळी लौकर नांगर जुंपायचा, कारण दुपारी तसंच बाहेर पडल तर कवटीसुद्धा तडकेल असा या वैशाखाचा तडाखा! म्हणून दुपारच्या कडाक्यात बैल सावलीला बांधून, जरा निवांत विश्रांती घेतली जाते. नुसत पाणी पिऊन शोष लागतो,( प्रमाणाबाहेर पाणी प्याल की अंगातले क्षार विरघळून घामावाटे बाहेर पडतात अन उलट डि-हायड्रेशन होत___ याला म्हणतात शोष लागण!) म्हणून तांदळाची वां नाचण्याची थंडगार पौष्टिक आंबील कळशीत असतेच असते. आता जरा उन्हं परतली म्हणून परत नांगर जुपावा तोवर पश्चिमेकड मोठ्ठी च्या मोठ्ठी वावटळ उठते. सारा आसमंत धुळीन, पाला पाचोळ्यान भरून जातो. गावात घातलेली एक दोन वाळवण , गोवऱ्या सार गावभर होत, माणसं पळून पळून एकमेकाला मदत करतात. अशी धांदल उडालेली असतानाच एक विजेचा लोळ कडाडतो अन गावावर वळीव उतरतो.एव्हढ्या धावपळी नंतर ही माणसं एकमेकाला "हा! भारी काम केल पावसान . आता नांगरट कशी मऊसूत होऊन जाईल. लय तरास झाला बैलास्नी!" असं सांगत राहतात. आणि एक दोन वळीव झाले की नांगरट संपवून कुळव जोडले जातात. कुळवान नांगरटीन उलथवलेले भले मोट्ठे हेंडके फुटून जमीन तळ हातागत सपाट होऊन जाते. शेत पेरणी साठी तयार होतात. शेतावर काम फक्त एकंच..नांगरणी. या काळात बैलांना अगदी पौष्टिक खाद्य देण्यावर प्रत्येक शेतकऱ्याचा कटाक्षाने भर असतो. आधीच्या पिकांनी घट्ट झालेली मती , उन्हाने वाळून जास्तच कडक झालेलीअसते.,एकेक ढेकूळ सहज वीस वीस किलोच! अश्या जमिनीला नांगरट करून ढिसूळ करणं, अगदी खिल्लारी बैलांचा ही उर फोडून जात!.त्यामुळे रोजचा कोळथीचा भरडा तर असतोच, पण मग त्यात कधी शेंगाची पेंड, कधी गुळाचा तुकडा,तर कधी सोयाबीन मिसळल जात.
उन्हाळ्यात आणि एक लगबग असतेच असते....मुली दाखवणे अन..मुली बघणे.
आज हिला बघायला आलेत..तर उद्या त्याला मुलगी बघायला जायचं. दिवाळी नंतरचे मुहूर्त हे तुम्हा आम्हाला! शेतकरी शेतातली काम संपली की लग्नसराई सुरु करतात. एक तर शेतातली कामं मंदावलेली असतात, अन थोडा पैसाही गाठीशी असतो. गावातले चार कळते लोक एकत्र येऊन या सारया गोष्टी पर पडतात. अन मग एक दिवस मांडव उभारला जातो. सकाळ पासून स्पिकरवर गाणी लागतात. अन त्यावर्षीची लग्न वयाचे एक दोन उमेदवार उजवले जातात.
या उन्हाळ्यात; वर वर जरी गाव शांत दिसत असलं, तरी प्रत्येक घरात लगबग सुरु असते. अगदी मुंगीच्या तालावर" हं! आत्ता गप्प बसलं तर पुढचे चार महिने काय खायचं?' असं फिरून फिरून बोललं जात.मग गावात फेरा फेरान, प्रत्येकाच्या घरात वाळवणीचे पदार्थ केले जातात. प्रत्येक घरातल्या शेवया, सांडगे घालायला गावातली एकुण एक सुगरण हजर असते. अगदी घरच समजून ही सर्व कामं केली जातात.त्यामुळे एकदम मोठ्या प्रमाणात करायला घातलेले हे प्रकार कधीही फसत नाहीत. लग्न घरात तर आणखीच मजा. रुखवता साठी म्हणून हेच पदार्थ कधी रंगीत, तर कधी वेगवेगळ्या आकारात केले जातात.
उन्हाळ्याचा आहार सुद्धा थोडाफार वेगळा असतो. भाज्या जवळ जवळ मिळतच नाहीत. उसाच्या लावणीत येणारी थोडीफार आंबाडी, हीच या उन्हाळ्यात अगदी दर चार दिवसाला बनवली जाते. नांगरट करणारे तर दिवस भर पाणी पिऊन ताकद जाते ( हे आपल शास्त्र..पाणी पिऊन भूक कमी..आणि नुसता पाणी पिऊन शरीरातले क्षार घामावाटे वाहून जाऊन डी हायाद्रेत व्हायचा धोका असतो; म्हणून आम्बिली शिवाय हलत नाहीत. तांदळाच वां नाचणीच पीठ एक दिवस आंबवून दुसरया दिवशी भरपूर पाणी घालून शिजवलं जाते. थोड मीठ अन चवीपुरती लसून अन मिरची...झालं तयार.. दिवस भराचं शक्तिवर्धक कोल्ड ड्रिंक!!
उसाच्या शेतात उगवलेल्या अंबाडीचा अगदी कुणीही येऊन भाजी साठी पान काढून नेण्याला मज्जाव नसतो, पण त्या मुळ वाढणाऱ्या रोपाला मात्र हात नाही लावायचा, एक वीस दिवसाची वां महिनाभर वाढलेली अंबाडी, उपटून, तिची पान काढली जातात, अन मग ती उंच वाढलेलं खोडं एकत्र करून त्यांचा भारा, खुणेची चिंधी बांधून डोहात टाकला जातो चांगली कुजली की वर काढून साफ करून या वाकाच्या दोऱ्या बनविल्या जातात. हा भारा वर काढताना तेवढ्या दिवसात, त्यावर घर करून वाढलेले झिंगे एक दिवसाची ताजी मेजवाणी आणि वाळवून ठेवले तर पावसाळ्याची ही बेगमी करून जातात.
हळू हळू उन्हाचा ताप वाढू लागतो. जमिनीचा फुफाटा अलगद वर उचलला जाऊन वावटळी उठायला लागतात. वात्रट अश्या या वावटळी, दुपारची वाळत घातलेली वाळवण बघता बघता, गाव भर करून ठेवतात. अन मग एखाद्या दुपारी उन्ह कलताना मावळतीकड ढग उठायला सुरु होतात, एक विजेची लांबच लांब लकेर उठते आणि वळीव गावावर उतरतो. सारी संध्याकाळ गाव चिप्प भिजतो. तोवर वळीवाच्या थोड्याफार पाण्यान अन सततच्या उन्हान उकिरडे पुरे कुजले जातात. वर्षभराची चुलीतली राख, कोळसे जनावरांच शेण, हे सार घरच्या काराभारनिन चिमणीच्या भरीन आणि मायेन रोजच्या रोज इथ भरलेलं. आता कुजून त्याच सोन झालेलं असत.हे सार उपसून उकिरडा साफ केला जातो. गावात जागोजागी खड्डे दिसू लागतात. उपसलेली खत शेतात पसरली जातात. आता प्रतिक्षा मृगाची !!
__/\__
अपर्णा
प्रतिक्रिया
30 May 2012 - 6:18 am | रेवती
लेखन आवडले.
सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
अंबाडीचे भाजीशिवाय आणखी उपयोग समजले.
घरच्याघरी खत तयार करण्याची रीतही छानच!
30 May 2012 - 6:48 am | ५० फक्त
मस्तच लिहिलं आहेस, आणि टायमिंग तर एकदम परफेक्ट झालंय.
30 May 2012 - 7:10 am | सुहास..
एखाद्या दुपारी उन्ह कलताना मावळतीकड ढग उठायला सुरु होतात, एक विजेची लांबच लांब लकेर उठते आणि वळीव गावावर उतरतो. सारी संध्याकाळ गाव चिप्प भिजतो. तोवर वळीवाच्या थोड्याफार पाण्यान अन सततच्या उन्हान उकिरडे पुरे कुजले जातात. वर्षभराची चुलीतली राख, कोळसे जनावरांच शेण, हे सार घरच्या काराभारनिन चिमणीच्या भरीन आणि मायेन रोजच्या रोज इथ भरलेलं. आता कुजून त्याच सोन झालेलं असत.हे सार उपसून उकिरडा साफ केला जातो. गावात जागोजागी खड्डे दिसू लागतात. उपसलेली खत शेतात पसरली जातात. आता प्रतिक्षा मृगाची !! >>>>
क्या बात है अपर्णा !!
गावाचे चित्र मनासमोर उभे करीत, पावसाची ओढ लावलीस :)
30 May 2012 - 8:42 am | जयंत कुलकर्णी
मस्त !
असे वाटले आत्ता पाउस पडायलाच पाहिजे.............बस एवढेच राहिले आहे आता.....
30 May 2012 - 8:51 am | रणजित चितळे
तो मातीचा वास.... खरच मस्त लेख
30 May 2012 - 9:06 am | प्रचेतस
अतिशय सुंदर लिहिले आहे.
वाचून घाटमाथ्यावरचेच एखादे गाव नजरेसमोर उभे राहिले आहे. अगदी यथार्थ वर्णन.
30 May 2012 - 9:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पिव्वर शेतकर्याच्या खळ्या-मळ्यातलं चित्र.
और भी आनेदो.
-दिलीप बिरुटे
30 May 2012 - 9:31 am | अमृत
वाचताना राहून राहून वेंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडीचं चित्रं डोळ्यापुढे येत होतं :-)
अमृत
30 May 2012 - 9:57 am | पियुशा
मस्त लिहीले आहेस :)
30 May 2012 - 10:25 am | मृत्युन्जय
पर्फेक्ट वर्णन जमले आहे.
30 May 2012 - 12:38 pm | उदय के'सागर
खुपच छान लिखाण... माझ्या सारखा गाव फक्त वरवर आणि पुस्तकातुन पहिलेल्याला खुपच छान माहिती कळाली ह्या रोजच्या शेतकरी जिवनाची आणि गावाकडच्या राहाणिमानाची. थोड्क्यात पण प्रभावशालि लिखाण....म्हणावच लागेल कि 'एडिटींग' खुपच परफेक्ट केलंय :)
पुढचा भाग लवकर येऊ द्या!!!
30 May 2012 - 12:47 pm | श्रावण मोडक
वळवाची सर... :-)
30 May 2012 - 1:22 pm | प्रभो
हेच म्हणतो.
30 May 2012 - 12:52 pm | प्यारे१
मस्तच गं आपाताई!
30 May 2012 - 1:13 pm | नगरीनिरंजन
काय लेख आहे! अगदी वळवासारखाच. रापलेल्या मनाची ढेकळं विरघळवणारा!
जियो!
30 May 2012 - 1:16 pm | नंदन
लेख आवडला. वर्णन अगदी चित्रदर्शी झाले आहे.
30 May 2012 - 1:22 pm | निश
aparna akshay जी,
निव्वळ अप्रतिम लेख झाला आहे.
30 May 2012 - 1:26 pm | मेघवेडा
सुंदर चित्रदर्शी लिखाण. मस्त. पुभाप्र.
30 May 2012 - 1:33 pm | sneharani
सरस! अगदी सुरेख!!
आवडलं लेखन
:)
30 May 2012 - 1:52 pm | स्पा
आहाहाहा मस्तच लिहील आहेस ग
टायमिंग पण बेस्ट .. मे च्या रखरखत्या उन्हात तुझा लेख वाचून मन एकदम प्रसन्न झालं :)
गावाकडच वर्णन एकदम चित्र रेखाटल्यागत जमलंय
जियो :)
30 May 2012 - 8:38 pm | स्मिता.
हा लेख कसा काय सुटला होता काय माहिती... वाचून खूप मस्त वाटलं. एवढ्या उन्हातही वाटलं बाहेर पाऊस कोसळतोय आणि हवेत गारवा आलाय :)
30 May 2012 - 9:29 pm | पैसा
घाटावरच्या खेड्याचं चित्र मूर्तीमंत उभं केलंस अपर्णा! पण आमच्या गावात यावर्षी वळीव अजून आलाच नाही, आणि उन्हाने तापलेल्या जीवाला पावसाची आणखीच ओढ लागली. :(
30 May 2012 - 9:39 pm | भरत कुलकर्णी
गावाकडची आठवण झाली. मस्त लेखन.
30 May 2012 - 10:31 pm | कौशी
खुप छान लिहिलेय.. अपर्णा
30 May 2012 - 10:51 pm | पिवळा डांबिस
अगदी चित्रदर्शी लेखन! आवडलं!!
शब्दांच्या आधारे वाचकाच्या मनात सुरेख चित्र उभं करायची कला तुम्हाला अवगत आहे!
हार्दिक अभिनंदन!!!
1 Jun 2012 - 4:19 pm | वैशाली१
चित्र वर्णन मस्त जमले आहे. आवडले .
3 Jun 2012 - 3:00 am | मैत्र
नंदनने म्हटल्या प्रमाणे अतिशय चित्रदर्शी वर्णन ...
व्यंकटेश माडगूळकरांच्या लिखाणाची आठवण झाली.
शाळेत आठवी किंवा नववी मध्ये शंकर पाटलांचा वळीव नावाचा सुंदर धडा होता .. त्यात वळवाचा जोरदार पाऊस आल्यानंतरचं वर्णन होतं..
खूपच तयारीचं आणि उत्तम लिहिलं आहे... गावातले बारकावे माहीत नसलेल्या माझ्यासारख्यां साठी अजूनच झकास..
पुढच्या भागाची वाट पाहतो..