दुसरे महायुद्ध भाग - १
दुसरे महायुद्ध भाग - २
पूर्वेची ८०० मैलाची सीमा राखणार्या पोलंडच्या तीन डिव्हिजन्सला १७ सप्टेंबरच्या पहाटे एक जोरदार धक्का बसला. अनेपक्षितपणे रशियाने पोलंडवर पूर्वेकडून आक्रमण केले. २४ ऑगस्ट रोजी रशिया आणि जर्मनीमधे जो गुप्त तह झाला होता त्याच्या कलमांचा आधार घेत हे आक्रमण करण्यात आले. रशियाला १९२० साली पोलंडबरोबर झालेल्या लढाईत जो अपमानास्पद पराभव स्विकारायला लागला होता त्याचा वचपा काढायचा होता. तसेच रशियाला बाल्टीक देशात जाण्याचा मार्ग आणि जर्मनी आणि रशियाच्या मधे एक युद्धभुमी पाहिजे होती. म्हणजे समजा युद्ध झाले तर या भुमीवरच झाले असते. या संधीचा फायदा उठवत विशेष विरोध न होता त्यांनी ही तीनही उद्दिष्टे हासील केली. पोलंडचा युक्रेन आणि बेलोरशियामधला वसाहतवाद व शांतता प्रस्थापीत करणे ही दोन कारणे देत त्यांनी हा हल्ला चढवला. यात त्यांचे फक्त ७३४ सैनिक गारद झाले. या हातोड्या आणि ऐरणीखाली पोलंडचा चेंदामेंदा झाला. त्यांना खरे स्वातंत्र्य मिळाले ते ५० वर्षानंतर पार १९८९च्या नोव्हेंबरमधे.
१९४० साली रशियाने एक अत्यंत तिरस्करणीय कृत्य केले ज्याची जगभर निंदा करण्यात आली. जिनेव्हा करारअंतर्गत शरण आलेल्या पोलंडच्या सेनेतील ४१०० अधिकार्यांना लाल सेनेने स्मोलेन्स्कच्या जवळील काटीन नावाच्या जंगलात नेऊन त्यांची अक्षरश: कत्तल केली.
जर्मन सैन्याने पोलीश सैनिकांची प्रेते उकरून काढली....
रशियाच्या गुप्तहेर खात्याचा (NKVD) वॅसिली ब्लॉखीन या मोहिमेचा प्रमुख होता. या पोलंडच्या अधिकार्यांना पाठीत किंवा डोक्यात गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यावेळी अंगावर रक्त आणि मेंदूचे तुकडे उडून त्यांचा पोषाख खराब होऊ नये म्हणून त्यांनी लांब ओव्हरकोट घातले होते आणि यासाठी त्यांनी जर्मन वाल्थर पिस्तोल उपयोगात आणली होती. कारण काय तर ही पिस्तूले सतत चालवली तरी गरम होऊन अडकत नसत. तिसर्या दिवशी हे हत्याकांड थांबले तेव्हा या नराधमाच्या पिस्तूलाच्या चापावरच्या बोटाला फोड आले होते. स्टॅलिनने या कॅटीन आणि इतर ठिकाणी केलेल्या हत्याकांडात एकूण २१८५७ पोलीश सैनिकांची याच प्रकारे कत्तल केली. जेव्हा हिटलरने रशियावर आक्रमण केले तेव्हा स्टॅलिनच्या पोलिसदलाच्या प्रमुखाने लावरेम्टी बेरियाने ही एक फार मोठी चूक झाल्याची कबूली दिली. १७ एप्रिलला जेव्हा जर्मन सैन्याने पोलीश सैनिकांची सामुदायीक थडगी उकरली तेव्हा गोबेल्सने जगाला या हत्याकांडाची माहिती दिली. रशियन प्रसिद्धी माध्यमांनी आणि स्टालिनने हे हत्याकांड जर्मन सैन्यानेच घडवून आणले असा कांगावा केला आणि ब्रिटीश परारष्ट्र खात्यानेही याला स्वार्थासाठी दुजोरा दिला. या खोटेपणाची कबुली ब्रिटनने फार उशीरा म्हणजे १९७२ साली दिली. या खोटेपणाची हद्द झाली जेव्हा न्युरेंबर्गच्या युद्धगुन्हेगारीच्या न्यायालयात जर्मनीवरचा कॅटीनच्या हत्याकांडाचा आरोप वगळण्यात आला तेव्हाही ब्रिटनने आपल्या दोस्तावर म्हणजे रशियावरच विश्वास दाखवला व रशियावर कसलेही आरोप केले नाहीत.
सप्टेंबरच्या दुसर्या आठवड्यापर्यंत जर्मन सैन्याने वॉर्सा ओलांडून लुव्ह आणि ब्रेस्ट-लिटॉस्कसकट बराच भूभाग ताब्यात घेतला असल्यामुळे त्यांची गाठ रशियन सैन्याशी पडली. त्यांच्यातही चकमकी उडून वेगवेगळ्या ठिकाणी दोन रशियन कोसॅक्स आणि १५ जर्मन सैनिक ठार झाले. या चकमकींनंतर जर्मनीचा परराष्ट्रमंत्री रिबेन्ट्रॉप घाईघाईने मॉस्कोला रवाना झाला.
मोलोटोव्ह, रिबेन्ट्रॉप, स्टॅलीन...
रशिया आणि जर्मनी यांच्यामधे पोलंडची वाटणी कशी करायची यासाठी ही भेट होती. एका संध्याकाळी रशियन बोलशॉय नावाच्या बॅलेगृहात स्वान लेक हा बॅले बघून झाल्यावर दुसर्या दिवशीच्य पहाटेपर्यंत रशियाच्या परराष्ट्रमंत्री मोलोटोव्ह याच्याबरोबर ही वादळी चर्चा झाली. यात शेवटी असे ठरले की जर्मनीने वॉर्सा आणि लुब्लिन स्वत:कडे ठेवावे आणि रशियाने उर्वरीत पूर्वपोलंड आणि बाल्टीक देशांचे काय करायचे ते करावे. हे देश होते इस्टोनिया, लॅटिव्हिया आणि लिथुआनिआ. या बैठकीनुसार जर्मन सैन्याने ब्रेस्ट-लिटॉस्क आणि बियालिस्टॉक येथून माघार घेतली आणि पोलंडचे चौथ्यांदा तुकडे पाडण्याचे कारस्थान पूर्ण झाले. पहिले झाले होते १७७२ मधे. दुसरे झाले होते १७९० मधे आणि तिसरे झाले होते लगेचच १७९५ मधे. मोलोटोव्हने या चर्चेअगोदर हिटलरने माईन कांफमधे काय लिहिले होते हे वाचले असते तर बरे झाले असते असे म्हणायची वेळ नंतर आली. हिटलरने बर्याच वर्षापूर्वी त्यात लिहिले होते “रशियाशी आम्ही तह केला तर याचा अर्थ आम्ही त्यांच्याशी युद्ध पुकारणारच नाही असा होत नाही. किंवा युद्धाच्या तयारीला वेळ मिळावा म्हणून आम्ही हा तह करू असेही नाही. कुठल्याही तहाच्या मागे युद्ध हे उद्दिष्ट नसेल तर तो तह काय कामाचा ? हे तह दीर्घकाळ चालणार्या संघर्षाची पहिली पायरी असते असा माझा विश्वास आहे.”
२५ सप्टेंबरला पोलंडवर दिवसभर भयंकर बाँबहल्ला चढविण्यात आला. पश्चिम देशांकडून कसलीही मदत नाही किंवा तशी शक्यताही नाही, पुर्वेकडून रशियाचे आक्रमण, जनरल शिमग्ली आणि त्याच्या सैन्याशी संपर्क तुटलेला, अन्नधान्याचा, पाण्याचा तुटवडा अशा परिस्थितीत पोलंडला शरणागती पत्करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. २७ तारखेला पोलंडने शरणागती पत्करली आणि जर्मनांनी जखमी सैनिकांची काळजी घ्यायचे कबूल केले अर्थात त्याला आता फार उशीर झाला होता आणि बरेच सैनिक मृत्यूमूखी पडले. पोलंडच्या सैनिकांसाठी जेवण बनवण्यासाठी मुद्पाकखाने उभारण्यात आले पण ते फोटो व चलतचित्र काढून झाल्यावर लगेचच हटवण्यात आले. ५ ऑक्टोबर पर्यंत पोलंडचा पराभव पूर्ण झाला. २१७,००० पोलीश सैनिक जर्मनांच्या ताब्यात युद्धकैदी झाले तर ६९३,००० रशियन सैन्याच्या ताब्यात. नशिबाने जवळजवळ १ लाख सैनिकांनी लिथुआनिया, हंगेरी आणि रोमानिया या देशात पळ काढला म्हणून ते वाचले. पश्चिमेकडे सरकत या सैनिकांनी स्वतंत्र पोलंडच्या जनरल व्लाडिस्ला सिकोस्की यांच्या अधिपत्याखाली आपला लढा चालू ठेवला. जनरल सिकोस्की हे पोलंडचे हद्दपार पंतप्रधान होते आणि त्यांनी फ्रान्समधे आपले सरकार स्थापन केले होते. रशियाच्या ताब्यातील पोलंडमधील १ लाख नागरिकांना तुरूंगात किंवा छळछावण्यात डांबण्यात आले. NKVD ने राजे, सरदार, बुद्धिवादी, कामगारांच्या संघटनांचे प्रमुख, चर्चचे धर्मगूरू, राजकारणी, कलाकार, लेखक, १९२० साली झालेल्या रशिया आणि पोलंडमधील युद्धातील अनुभवी पण वयस्कर जनरल्स, जे जे लोक जनतेला मार्ग दाखवू शकतील अशा सर्व नागरिकांना या छळछावण्यात डांबले आणि दुर्दैवाने यातील कोणीही या जगात राहिले नाही. सगळ्यांना येनेकेनप्रकारेण ठार मारण्यात आले.
या चार आठवड्याच्या युद्धात जर्मनीचे ८,०८२ सैनिक ठार झाले तर २७,२७८ जखमी झाले. ७०,००० पोलंडचे सैनिक, २५००० नागरीक ठार झाले तर १३०,००० सैनिक जखमी झाले. जर्मनीच्या जनरल मेलेनथिन याने या युद्धानंतर उद्गार काढले “ हे युद्ध आमच्या तरूण सैनिकांना खरे युद्ध कसे असते याची कल्पना द्यायला फारच उपयोगी पडले. वाहणारे रक्त बघायला फार मोठे धाडस लागते, ते त्यांच्यात आले असे म्हणायला हरकत नाही”. ज्या वेगाने हे युद्ध सुरू झाले त्याच वेगाने ते संपलेही. ५ ऑक्टोबरला एका खास आगगाडीने, जिचे नाव अमेरिका होते, हिटलर महाराज विजयी मुद्रेने आपल्या विजयी सैन्याची भेट घेण्यासाठी वॉर्साला पोहोचले. त्याच्याबरोबर असलेल्या वार्ताहरांना तो म्हणाला “वॉर्सा नीट बघून ठेवा. युरोपमधील कुठल्याही शहराची मी अशी अवस्था करू शकतो” खरेच होते ते !
“श्रेखलेकखाइट” म्हणजे दशहतवादी धोरण पोलंडच्या पाडावानंतर लगेचच स्विकारण्यात आले. पूर्वी युरोपमधे एक सैन्य दुसर्या सैन्याला शरण गेले की युद्ध संपले असे समजण्यात येत असे. पण नंतरच्या काळात आक्रमकांविरुद्ध नागरीक क्रांतिकारकांच्या संघटना स्थापन करून त्यांना गनिमी काव्याने विरोध करायला लागले. त्यांना दडपण्यासाठी हे धोरण स्विकारण्यात येऊ लागले. श्रेष्ठवंशाच्या जर्मनांसाठी हीन वंशाच्या लोकांना या जगात जागा खाली कराव्या लागल्या. पोलंडची १७.२ टक्के लोकसंख्या या युद्धात नष्ट झाली. जर्मन सैन्याच्या पावलावर पाऊल टाकत पोलंडमधे येणार्या तीन SS टोटनकॉफ रेजिमेंटच्या प्रमुखाने, थिओडर आइखने तर आदेश काढला “नाझीवादाच्या प्रत्येक विरोधकाला तुरुंगात घाला किंवा ठार करा”. नाझीवाद हा एक वंशभेद करणारे राजकीय तत्वज्ञान असल्यामुळे त्याला विरोध करणारी पोलंडची सर्व जनता शत्रू ठरली. एकदा शत्रू म्हणून जाहीर झाल्यावर मग त्याला दयामाया दाखवायचा प्रश्नच येत नसे. वरमाक्टही या हत्याकांडात मागे नव्हती. हे युद्ध सुरू होऊन आठ आठवड्यातच मुलकी अधिकार्यांकडे पोलंडचा करभार सोपवण्यात आला तेवढ्या आठ आठवड्यात, म्हणजे २६ ऑक्टोबरपर्यंतच कुठलाही आदेश नसताना त्यांनी ५३१ गावे नष्ट केली आणि असंख्य युद्धकैद्यांना यमसदनास पाठवले. या जर्मन सैनिकांनी त्यांचा बचाव करायच्या वेळी “आम्हाला या वंशसंहाराबद्दल काहीच माहिती नव्हती, काही अफवा ऐकल्या होत्या” असा जो पवित्रा घेतला होता, ते अत्यंत खोटे होते.
शुट्झस्टाफेल (SS) ही जर्मन सोशालिस्ट पार्टीच्या मालमत्तेची आणि जिविताचे संरक्षणासाठी एक उभारलेली एक उपसंघटना होती. औपचारीकरित्या हिमलरच्या अधिपत्याखालील ही संघटना एक छोटी संघटना होती. जेव्हा पोलंडचे युद्ध चालू झाले तेव्हा ही एक बलाढ्य संघटना म्हणून ओळखली जाऊ लागली. १९४२ साली तर ती “देशांतर्गत असलेला एक देश” अशी ओळख सांगू लागली. जरी या संघटनेला जर्मनीच्या अंतर्गत सुरक्षचे काम देण्यात आले होते तरी अत्याचार आणि क्रुरता यात या संघटनेचा हात धरणारा कोणी असेल असे वाटत नाही. १९३६ साली हिमलरने आपल्या संघटनेबद्दल एक पुस्तिका काढली त्यात त्याने म्हटले “आमचे काळे शर्ट पाहिल्यावर लाखो जर्मन नागरिकांच्या पोटात ढवळायला लागते हे खरे तर आहेच पण त्यांनी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा अशी आमचीही अपेक्षा नाही, हेही खरेच आहे”.
हिटलरच्या संघटनांची चिन्हे...
अगदी सुरवातीला नाझी वक्त्यांना रस्त्यावर संरंक्षण पुरवायचे अशा किरकोळ कामे करणारी ही शूट्झ्स्टाफे (SS) संघटना आता चांगलीच बलाढ्य झाली होती. विशेषत: तिने तिच्या प्रतिस्पर्धी स्टॉर्मब्टाईलूंग (SA) संघटनेचा काटा काढला तेव्हा तिला रोखणारे कोणीच उरले नाही. हिटलरने जेव्हा SA त्याच्याविरूद्ध काम करते आहे अशी शंका आल्यावर या संघटनेचा काटा काढायचा ठरवला तेव्हा SSनेच ते काम चोख पार पाडले होते. थोड्याच दिवसात जर्मनीच्या अतंर्गत व्यवस्थापनात प्रत्येक ठिकाणी या संघटनेचा सहभाग आढळू लागला. हिटलरला वैयक्तिक शरीरसंरक्षक पुरवण्याबरोबरच ही संघटना “वंश आणि वंशज” या तत्वाची पाठराखण करायचे महत्वाचे काम चालू केले. लष्कर यांच्यापासून दूर होते म्हणून त्यांनी लष्कराचा एक भाग म्हणून वॅफेन-SS ही एक डिव्हिजन चालू केली. याच्यात १९४५ मधे ८३०,००० सैनिक होते म्हणजे या संघटेनेने जर्मनी कशी व्यापून टाकली होती ते आपल्याला कळेल. नॉर्वे आणि आफ्रिका या दोन युद्धाच्या आघाड्या सोडल्यास त्यांनी सर्व आघाड्यांवर लढाया लढल्या. हिमलरने अजून एक टॉटनकॉफबॅंड नावाची संघटना एक स्वतंत्र तुकडी चालू केली. यांना छळछावण्या किंवा कॉन्सट्रेशन कॅम्प चालवायची जबाबदारी देण्यात आली होती. या संघटना सर्व बाबतीत स्वयंपूर्ण होत्या. यांची स्वत:ची गोदामे होती, प्रशिक्षण केंद्रे होती ज्यात अत्यंत अवघड असे प्रशिक्षण दिले जायचे. या संघटनेअंतर्गत जी खाती होती त्यामधे अर्थशास्त्र, पुरवठा, मागणी, नगररचना, वित्तपुरवठा, कायदा, न्याय, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय, नागरिकांची इत्यंभूत वैयक्तिक माहिती, हद्द्पारी, पुनर्वसन, वंशाचा आभ्यास, शेतीउद्योग, अन्नधान्य इ.इ. विषयांवर काम करणारी अनेक माणसे होती. या खात्यामुळे आपल्या लक्षात आले असेल की जर्मनीच्या कुठल्याही खात्यात ते हस्तक्षेप करू शकत. या SS च्या संघटना किंवा सैन्य म्हणा इतर सरकारी कामकाजापासून वेगळ्या ठेवल्या होत्या. हिटलरने त्यांच्यासाठी ध्येयवाक्य ठरवले होते ते फार समर्पक होते “ हिटलरशी निष्ठा हाच माझा आत्मसन्मान” हे सगळे हिटलरने व्यवस्थित विचार करून केले होते. त्याला अशा युवकांची संघटना आणि अशा प्रकारचे सैनिक पाहिजे होते जे ती निष्ठा नैतिकतेच्या आणि राष्ट्रहिताच्याही पुढे ठेवतील.
त्यांच्या कारवायांचे स्वरूप लगेचच समोर यायला लागले. ५ सप्टेंबर १९३९ रोजी बिडगोष्ट नावाच्या एका गावात हजार एक नागरिकांची कत्तल करण्यात आली तर पिआझकू नावाच्या शहरात ज्यू वसाहतींना आगी लावण्यात आल्या. दुसर्याच दिवशी शरण आलेल्या १९ पोलीश सेनेच्या अधिकार्यांना म्रोझा येथे गोळ्या घालण्यात आल्या. याच बरोबर पोलंडमधील जेवढे गेट्टो होते त्यात तमाम ज्यूंना इतर ठिकाणाहून हाकलून डांबायचे काम सुरू झाले.
गेट्टो हा मूळ शब्द इटालियन भाषेतून आलेला आहे. व्हेनीस शहराजवळ या नावाचे एक बेट आहे आणि याच्यावर १६०० मधे ज्यूंना ठेवण्यात येत असे. त्यावरून ज्यूंना वेगळे ठेवण्याच्या वसाहतींना गेट्टो म्हणले जाऊ लागले. या वसाहतींकडे नगरपरिषदा लक्ष देत नसल्यामुळे त्या बहुतेक वेळा गलिच्छ असत.
ज्यू शेतकर्यांच्या बाबतीतही हेच घडले. अन्नधांन्याची परिस्थिती वाईट असताना, धांन्याची गरज असताना त्यांनाही घेट्टोमधे डांबण्यात आले यावरून हेच सिद्ध होते की नाझींचे ज्यूंविरुद्ध युद्ध दुसरे महायुद्ध चालू व्हायच्या अगोदरच चालू झाले होते.
ज्यूंचा वर्षातील सगळ्यात पवित्र दिवस “योम किपूर”च्या दिवशीच ज्युंना बिडगोष्ट्च्या सिनेगॉगमधे कोंडण्यात आले. त्यांना नैसर्गिक विधींनाही बाहेर सोडण्यात आले नाही. शेवटी ज्यूंना त्यांच्या पवित्र शालींचा उपयोग स्वच्छता करण्यासाठी करावा लागला. यापेक्षाही भयंकर हाल भविष्यात त्यांच्या नशिबी होते…..
नेहमीप्रमाणे क्रमशः :-)
जयंत कुलकर्णी..
प्रतिक्रिया
15 Mar 2012 - 2:31 am | अर्धवटराव
मळमळायला लागलय हे वाचुन... किती क्रौर्य... या लोकांना काळीज-हृदय-मन नावाचा प्रकार अजीबात माहित नव्हता काय???
अर्धवटराव
15 Mar 2012 - 9:19 am | सहज
दरवेळी दुसर्या महायुद्धावरच्या चर्चेत येणारी प्रातिनिधीक प्रतिक्रिया म्हणजे - किती क्रौर्य... या लोकांना काळीज-हृदय-मन नावाचा प्रकार अजीबात माहित नव्हता काय
मधे नॅशनल जिओग्राफीवर "नाझी स्क्रॅपबुक फ्रॉम हेल" नावाचा माहीतीपट आला होता. दोन फोटो अल्बम काही वर्षापुर्वी एका संग्रहालयाकडे आले होते व त्यातुन पुन्हा एकदा जर्मन अधिकार्याच्या नजरेतुन ते दिवस पाहीले गेले. त्यांचे विश्व हे वेगळेच होते. जरी रोज त्यांच्या हातून हे क्रौर्य घडत होते तरी / जरी दिवसभर महीला, पुरुष, लहानमुले यांच्यावर अत्याचार वैद्यकीय प्रयोग, कत्तल केली तरी संध्याकाळी- रात्री घरी आल्यावर आपल्या मुलांना खेळवणे , आपल्या कुटूंबाबरोबर नॉर्मल आयुष्य जगणे. हे सगळे असे एका मोठ्या समुदायाचे जगणे कसे शक्य होते?
म्हणूनच असे लेख, असे फोटो, असे माहीतीपट लोकांनी पाहीजे पाहीजेत कारण आजही सुशिक्षीत लोकांमधे कोण्या समुदायाच्या बद्दल तिरस्कार अगदी कत्तल करावी असे निर्धार भाषा ऐकू येतात म्हणुन यावर चर्चा झाली पाहीजे.
एक झलक इथे.
दुवा १ - येथे
15 Mar 2012 - 8:49 pm | अर्धवटराव
हा सर्व जीवघेणा खेळ्च मुळात क्रौर्याची पराकाष्ठा आहे (किंवा नसावी देखील...) इथे केवळ जर्मन अभीप्रेत नाहि. मी ज्यु लोकांनी केलेला नरसंहार देखील वाचला आहे.
पण क्रौर्य ते कौर्यच... ते वाचुन आणखी काय प्रतिक्रीया अभिप्रेत असावी??
अर्धवटराव
16 Mar 2012 - 6:18 am | सहज
हे जर्मन स्पेसिफीक नाहि !! - सहमत
नरसंहार हा सर्वच खंडात अनेक देशात झाला आहे. - सहमत
क्रौर्य ते कौर्यच - सहमत
ते वाचुन आणखी काय प्रतिक्रिया अभिप्रेत असावी?? - सहमत आहे. अगदी नैसर्गिक प्रतिक्रिया आहे.
एका बाजुला असे अमानुष कृत्य करवते कसे व तरीही तेच लोक सामान्य आयुष्य जगत असतात. लहान मुलांनाही मारायची टोचणी कशी लागत नाही याचे दर्शन त्या फोटो अल्बम मधे घडते. हे असे का घडत असावे, कुठल्या समुदायाच्या मनात अन्य समुदायाच्या नष्ट करण्याच्या इच्छा इतक्या बळकट का होतात व तसे न होण्याकरता [ज्यांची अशी प्रतिक्रिया येते त्यांनी] काय करता येईल यावर प्रत्येकाला विचार करायला पाहीजे. त्या अनुषंगाने तो माहितीपट आवडला. म्हणून तो दुवा दिला. अवांतराबद्दल क्षमस्व!
15 Mar 2012 - 4:41 am | पिंगू
यासंबंधातील सध्या विन्स्टन चर्चिलवर लिहिलेले पुस्तक वाचतोय. त्यात राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे जनतेचे बळी गेल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
अर्थात वर जी माहिती आहे, ती संपूर्णतः कटू सत्य आहे.
- पिंगू
15 Mar 2012 - 7:33 am | ५० फक्त
वाचतोय, कटु आहे पण सत्य आहे,
15 Mar 2012 - 8:34 am | असुर
हाही अगदी जमलाय. 'कातीन' हत्याकांडाचे फोटो अगदी अंगावर येतात.
पण क्रूरपणाविषयी लिहीलंच आहे, तर जरा जेत्यांच्या क्रूरपणाविषयीदेखील लिहा प्लीज. उदा. बर्लीन-बॉम्बिंग, स्पिटफायर सॉर्टिज किंवा पोस्ट-वॉर अॅट्रोसिटीज वगैरे वगैरे.
इतिहास हा नेहेमी जेत्यांचाच असतो तसं या सुंदर लेखमालेचं व्हायला नको. :-)
--असुर
15 Mar 2012 - 8:50 am | रणजित चितळे
हा पण लेख इतर लेखांसारखाच उत्कृष्ट. एक विचारु का. आपल्याला हे फोटो मिळाले कोठून.
15 Mar 2012 - 9:53 am | जयंत कुलकर्णी
काही नेट वर पण बरेचसे पुस्तकातून स्कॅन केलेले आहेत.
15 Mar 2012 - 9:29 am | मन१
काही ठिकाणी नावांत, विशेषनामात दुरुस्त्या सुचवाव्याशा वाटल्या.
15 Mar 2012 - 9:51 am | जयंत कुलकर्णी
मन१,
मी एखाद्या शब्दाचा उच्चार त्या त्या त्या भाषेत कसा होतो हे ऐकून तसे मराठीत लिहीले आहे. उदा लुव्ह या शहराच्या नावाचा स्पेलिंगप्रमाणे उच्चार केला तर भलताच होईल. यासाठी या सगळ्या शब्दांचे उच्चार मी नेटवर शोधून ते लिहिले आहेत. काही चूकही असतील पण ती माझ्या कंटाळ्यामुळे.
आपल्याला यात काही दुरुस्त्या करायच्या असतील तर जरूर कराव्यात.
15 Mar 2012 - 10:01 am | प्रचेतस
वचतोय.
लिखाण अप्रतिमच.
15 Mar 2012 - 10:06 am | प्यारे१
नरेचि केला किती हीन नर???? :(
किती विध्वंस, किती मनुष्य/वित्त/संपत्ती हानी?
एखाद्या व्यक्ती/व्यक्तीसमूहाची सत्ता/संपत्ती/ अधिकार लालसा इतकी बळावली जावी?
तंत्रज्ञानाची प्रगती अथवा प्रगत तंत्रज्ञान यासाठी उपयोगात आणली जाते ?
पिस्तुलांचा 'इफिशिएन्ट' वापर हा प्रगत तंत्राचाच वापर म्हणावा लागतो ना?
(परवाच्या गविंच्या लेखात देखील विमानांचा वापर मनुष्य / माल वाहतुकीआधी बॉम्ब फेकीसाठी झाला असे म्हटले आहे.)
त्यापेक्षा पूर्वीच्या समोरासमोरच्या तलवार बाजी/ लढाया/ कुस्त्या बर्या.
वरच्या शेतात युद्ध चालू असले तरी खालच्या शेतात नांगरट सुरु असणं शक्य.
दोन योद्ध्यांमधली चुरस त्याहून चांगली.
जो जास्त ताकदवान, शक्तीशाली, बुद्धीशाली तो जिंकला.
जिंकला की अधिकार/पद/ राज्य. हरला की खेळ खल्लास.
के हेच्च ए ए जे तुम्हाला आहे ना? मग तुमची तुम्ही काय ** करायची ती करा.
आम्हाला मध्ये घेऊ नका. सोप्पं नी सरळ होतं राव.
हे वरचं सगळं किती त्रासदायक आहे राव????
15 Mar 2012 - 12:39 pm | निश
जयंत साहेब, खरच वाचुन मन सुन्न झाल
15 Mar 2012 - 2:27 pm | गणेशा
अप्रतिम लिहित आहात .. असेच लिहित रहा..
वाचत आहे.
15 Mar 2012 - 2:51 pm | इष्टुर फाकडा
हाही लेख अंगावर काटा आणणारा झाला आहे. WWII बद्दलचा इतिहासच तसा आहे. जयंतराव, तुमचे लेखन खूप प्रभावी आहे.
अवांतर: या 'कातिन' हत्याकांडावर पोलिश चित्रपट नुकताच पहिला. हि त्याची झलक
15 Mar 2012 - 9:47 pm | पैसा
पोलंडने या युद्धात फार सहन केलं. एकूणच सगळं वाचून विचित्र वाटतं. माणूस इतका क्रूर असू शकतो, ही कल्पनाच कशीतरी आहे.
15 Mar 2012 - 9:57 pm | मराठे
सुन्न झालोय. प्रतिक्रीया तरी काय द्यायची? एखादा माणूस क्रूरतेने वागू शकतो हे समजू शकेल पण जेव्हा क्रूरताच 'वे ऑफ लाईफ' असेल तर काय म्हणायचं? असल्या मानववंशापेक्षा पशू म्हणून जगण्ं अधिक श्रेयस्कर !
16 Mar 2012 - 6:52 pm | अमितसांगली
अप्रतिम...वाचायचा प्रयत्न करतोय....
16 Mar 2012 - 8:31 pm | अस्वस्थामा
जबरी लिहिलंय काका..
पोलंडबद्दल हे आधीही वाचलं होत पण तुम्ही लिहिलेलं वाचताना (खासकरून मराठीत!) हे सगळ अंगावर येत .. कशासाठी हे सगळ झाल असा प्रश्न तर येतोच सारखा मनात पण सगळ्या पोलंडवासियांनी असे काय पाप केले होते, असा कोणता ग्रह त्या सगळ्यांच्यावर वक्रदृष्टी लावून बसला होता ते काही कळत नाही.. किती सोसलय त्यांनी त्यावेळी याची कल्पना पण करवत नाही..
16 Mar 2012 - 11:10 pm | अन्या दातार
हा प्रश्न महान युयुत्सु यांना विचारा. जयंत कुलकर्णींचा ज्योतिषशास्त्राचा(?) अभ्यास नाही.