विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन - प्रकरण 7
ईश्वरवाद्यांची ‘अंधश्रद्धा’ आणि बुद्धिवाद्यांचा ‘डोळसपणा’
ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे ब्लॉगवरून साभार
बुद्धिवाद्यांच्या दृष्टीने कोणत्याही गोष्टीवर पुराव्याशिवाय विश्वास ठेवणे ही अंधश्रद्धा ठरते. पुराव्याशिवाय केले जाणारे सर्व व्यवहार हेही बुद्दिवाद्यांच्या दृष्टीने अंधश्रद्धेत मोडतात, हे अर्थातच निराळे सांगण्याची आवश्यकता नाही. स्वाभाविकच बुद्धिवादी कोणताही व्यवहार पुराव्याशिवाय करीत नाहीत, असे मानणे चुकीचे ठरणार नाही.
या दृष्टीने पाहिले तर खरे बुद्धिवादी या जगात फक्त संन्यासी किंवा अध्यात्मवादी ठरतात. कारण प्रपंच दुखःदायक आहे याविषयी इतके पुरावे आहेत की त्याच्याकडे डोळेझाक करून प्रपंचात पडणे ही स्वतःच्या बुद्धिशी प्रतारणा आहे, हे ओळखून ते प्रपंचात पडत नाहीत. आणि पडले तरी ते प्रपंचाविषयी उदासीन राहून अनासक्त वृत्तीने जगतात. पण या लोकांना कोणी बुद्धिवादी म्हणत नाहीत आणि ज्यांना बुद्धिवादी म्हणतात, ते तर प्रपंचाचा त्याग करायला कधीच सांगत नाहीत, उलट प्रपंचात पडून त्यातील सुखांचा आंधळेपणाने ( म्हणजे प्रपंचातील दुःखाकडे डोळेझाक करून) उपभोग घ्यायला सांगतात. साहजिकच, ज्याला बुद्धिवाद म्हणून संबोधण्यात येते, तो खऱ्या अर्थाने बुद्धिवाद नाही, हे उघड आहे. तसेच ज्याला ‘डोळसपणा’ म्हणतात, तो खऱ्या अर्थाने अध्यात्मवाद्यांजवळ आहे, तथाकथित बुद्धिवाद्यांजवळ नाही हे ही उघड आहे[1].
कदाचित प्रपंचात पडून मर्यादित अर्थाने बुद्धिवादी बनून जगावे असे बुद्धिवाद्यांना म्हणायचे असावे. पण या मर्यादित अर्थाने तरी बुद्धिवादी बनून जगता येते का? म्हणजे पुराव्याशिवाय व्यवहार करायचा नाही, असे ठरवून प्रपंचात जगता येते काय? पुराव्याशिवाय कोणताही व्यवहार करणे हा धोका आहे, या दृष्टीकोनाला ‘संशयवाद’ म्हणतात. म्हणून प्रश्न असा आहे की संशयवादी बनून जीवन जगता येते काय?
याप्रश्नाच्या उत्तरासाठी प्रपंचात पडण्याचेच उदाहरण घेऊ. ज्या मुलीशी (किंवा मुलाशी) आपण लग्न करायचे ठरवतो, त्या मुलीमुळे (अगर मुलामुळे) आपण प्रपंचात सुखी होऊ काय, याविषयी आपण कधी पुरावे शोधतो काय? (पुरावे सापडतात काय हा प्रश्न बाजूला ठेवू) उलट या बाबतीत पुरावे शोधणे किंवा संशयीवृत्तीने (धोका आहे असे समजून) लग्न करणे हाच निर्बुद्धपणा आहे, असे आपण मानतो. कारण प्रेमात पडणे हे बुद्धिवादाचे (चिकित्सकपणाचे, संशयवृत्तीचे) काम नसून भावनेचे (आंधळेपणाचे) काम आहे असे आपण मानतो. प्रेम आंधळे असते (किंवा आंधळे प्रेम खरे असते) हा आपला याविषयीचा सिद्धांत प्रसिद्धच आहे! अशा रितीने मनुष्याला ज्याच्या शिवाय प्रपंचात जगताच येत नाही, त्या प्रेमासारख्या महत्वाच्या विषयातच बुद्धिवाद (संशयवाद) निरुपयोगीच नव्हे, तर अडचणीचा ठरतो.[2]
हीच गोष्ट नित्याच्या व्यवहाराच्या बाबतीतही खरी आहे. आपण आपले नेहमीचे जे जीवन जगतो, ते जवळ जवळ पुर्णपणे श्रद्धेने जगतो (या श्रद्धेचे समर्थन आपण 99टक्के अपघात होत नाहीत किंवा घटस्फोट घ्यावा लागत नाही, या आपल्या अनुभवाच्या आधारे केले तरी ती शेवटी श्रद्धाच असते) अशा रितीने पुराव्याशिवाय विश्वास ठेऊन चालण्याच्या या आपल्या वागणुकीला कोणी अंधश्रद्धा म्हटले तर मात्र आपण हा आरोप तात्काळ ठोकरून लावू. पण पुरावे नसताना जीवन जगण्याचे जीवनातील असंख्य गोष्टींवर विश्वास ठेवण्याचे, हे आपले धोरण ईश्वरावर ‘पुरावे नसताना’ विश्वास ठेवण्याच्या धोरणाहून तात्विक दृष्ट्या यत्किंचितही भिन्न नाही.
पण ईश्वरावर पुरावे नसताना विश्वास ठेवण्याचे धोरण असे जे वर म्हटले आहे ते मुळात खरे नाही कारण ईश्वरांचा वा अनेक देव-देवतांचा आपापल्या परीने अनुभव आल्याशिवाय लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
आणि तरी त्यांच्या विश्वासाला अंधश्रद्धा म्हणून संबोधण्यात येते आणि वर उल्लेख केलेल्या पुराव्याशिवाय जीवनातील हरघडी असंख्य गोष्टींवर विश्वास ठेवण्याच्या प्रकाराला मात्र अंधश्रद्धा समजण्यात येत नाही हा कुठला न्याय?
याशिवाय आणखी काही महत्वाच्या बाबी –
v ‘अंधश्रद्धा निर्मूलनवादी’ न्याय
v आमचे भांडण बुद्धिवाद्यांशी नाही तर बुद्धिवादाशी आहे.
v जीवनात बुद्धिनिष्ठ जीवन जगावे असे म्हटले जाते, त्याचा नेमका अर्थ काय?
v काहीजण अतींद्रिय विज्ञानाचे पुरावे नाकारणे आडमुठेपणाचे आहे हे ओळखून ते स्वीकारतात
v ईश्वराचा रोग होऊ नये म्हणून ज्यांनी बुद्धिवादाची लस टोचून घेतली आहे, त्यांना तो रोग होणारच नाही.
v तार्किक दृष्ट्या ईश्वर सिद्ध होत नाही.
संपुर्ण प्रकरण इथे वाचा.
टीप - प्रा. गळतगे कर्नाटक राज्यात निपाणी पासून २३ किमी दूर त्यांच्या शेतात - भोज नामक खेड्य़ात राहातात. त्यांचा संगणकाशी थेट संपर्क नाही. त्यांना संगणकावरील लेखन इतरांकडून समजून घ्यावे लागते. तसे असले तरी प्रा. गळतगे यांनी इथे मांडलेल्या विचारांवर लेखन करून प्रकाश टाकला तर तो मी जरूर सादर करेन. त्यांचे वय (८१) व तब्बेत यामुळे ते केंव्हा घडेल त्याबद्दल मी सध्या काही आश्वासन देऊ शकत नाही मात्र त्यांच्यापर्यंत विचार पोहोचण्यासाठी जरूर प्रयत्न करीन. याची खात्री बाळगा.
[1] . सुखाकडे (मग ते कितीही अल्प असेना का) डोळेझाक करणे हाच आंधळेपणा आहे, मिळेल त्या सुखाचा उपभोग घेणे हाच डोळसपणा आहे, असे बुद्धिवादी म्हणतील. पण (भौतिक) सुख आणि बुद्धिवाद यात विरोध आहे ते कसे ते पुढे दाखवून दिले आहे.
[2] पति पत्नी मधील प्रेम जितके आंधळे(दोषांकडे जितका कानाडोळा) तितका प्रपंच सुखाचा, जितकी संशयी वृत्ती(दोषांची चिकित्सा) अधिक तितका तो दुःखाचा. अशा रितीने बुद्धिवादाचे (संशयवादाचे) आणि प्रापंचिक सुखाचे प्रमाण व्यस्त आहे.
प्रतिक्रिया
14 Feb 2012 - 4:07 pm | सस्नेह
आपण जोपर्य॑त विज्ञानाची ढापणे लावून प्रत्येक गोष्टी कडे पाहतो तोपर्य॑त निखळ सत्याचा अनुभव कसा घेणार ?
15 Feb 2012 - 12:12 am | शशिकांत ओक
लीनाजी,
धन्यवाद,
प्रा, गळतगे यांचे वरील पुस्तकातील लेखन विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे आहे. आपल्याला आवडेल.
15 Feb 2012 - 7:09 am | चौकटराजा
ईश्वर जर असेल तर तो फार मोठा आहे. त्याचीच ही सारी निर्मिती आहे. त्यालाच स्वता: ला ज्याचा बोध झालेला नाही असा चिद्विलास तोच
भोगतो आहे. अर्थात विज्ञान त्यानेच निर्मिले व अध्यात्म त्यानेच इंद्रिय त्याने व अतिंद्रिय त्यानेच . ज्ञान त्यानेच व भ्रम त्यानेच ! आपण जर त्याच्या या चिद्विलासाच्या खेळातील खेळणी असू तर मग आपला असा वेगळा संस्कार कशाला हवा ? शिक्षण , प्रबोधन हवेच कशाला ?
15 Feb 2012 - 1:45 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या लेखाचा सुगम मराठी अनुवाद कुठे मिळेल?
15 Feb 2012 - 3:35 pm | तर्री
श्रध्दा हा विषय वैयक्तिक आहे. कोणिही "आपलेच" मत बरोबर असा दाव न केलेले बरे.
ज्यांचा देवावर विश्वास आहे याचा अर्थ ते अंधश्रध्दाळू आहेत असे नाही . ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांनी ऊगाच सश्रध्द लोकाना "अंधश्रध्दाळू " म्हणू नये.
कुरुंदकर लिहून गेले आहेत :
देशातील बहुतांश जनता देव मानते आणि म्हणूनच मी देव मानतो.( संदर्भ आठवत नाही )
ऊगाच जाहिर अतिरेक नसावा.
16 Feb 2012 - 1:29 am | शशिकांत ओक
मित्रांनो,
प्रा गळतगे म्हणतात, "आमचे भांडण बुद्धिवाद्यांशीं नाही. बुद्धिवादाशी आहे."
या प्रकरणातील एक उतारा -
बुद्धिवाद्यांनी कसे वागावे, काय करावे, काय करून नये हे सांगण्याचा आम्हाला अधिकार नाही. त्यांनी आपल्याला समजलेला बुद्धिवाद खुशाल जगावा. पण आपला बुद्धिवाद ज्या विज्ञानावर आधारल्याचा दावा ते करतात, त्या विज्ञानाचा त्याला कितपत आधार मिळतो किंवा तो मिळतो काय हे तपासण्याचा अधिकार सर्व विज्ञानवाद्यांना आहे. कारण विज्ञानवाद हा काही बुद्धिवाद्यांचा मक्ता नाही. या वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांचा दावा हा फोल असल्याचे आपण यापुर्वी 'विज्ञान आणि बुद्धिवाद' या ग्रंथातील अनेक प्रकरणातून सप्रमाण दाखवून दिले आहे. ( विज्ञानाचा जन्मच बुद्धिवादाविरुद्ध बंड करून झाला असल्याची इतिहासाची साक्ष असल्याने विज्ञान आणि बुद्धिवाद यात विस्तव जात नसल्याचे त्या लेखातून दाखविले आहे.)
आता विज्ञानानेच माणूस डोळस बनतो हे सर्व मान्य आहे. पण विज्ञानावर बुद्धिवाद आधारलेला नसल्याने बुद्धिवाद किंवा त्याची बुद्धिवादाला कसलीच पुष्टी मिळत नसल्याने बुद्धिवाद कसा डोळस ठरतो हे बुद्धिवाद्यांनी सिद्धकरून दाखवले पाहिजे. तरच बुद्धिवाद डोळस आहे हे मान्य करता येईल. पण त्यांनी तसे कोठे सिद्ध केल्याचे आढळून येत नाही. केवळ बुद्धिवादाचा विज्ञानाच्या आधारे ते पुरस्कार करताना आढळतात. पण तो विज्ञानाचा पुरस्कार ठरतो. बुद्धिवादाचा पुरस्कार ठरत नाही. पण बुद्धिवाद्यांनी आम्ही विज्ञानाचे पुरस्कर्ते आहोत, हे तुणतुणे वाजवत राहिल्याने ते विज्ञानाच्या नावाखाली सत्यान्वेष ही जी खरी वैज्ञानिक दृष्टी आहे, तिची हानी करण्याची 'सेवा' मात्र त्यांच्या हातून बुद्धिपुरस्सर घडत असल्याचे जाणत्या लोकांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागते.