कोर्टरूम या बॉलिवूडमधल्या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर "कटहरे में खडा रेह के" अनेक भल्याबुर्या लोकांच्या आयुष्याचे फैसले होत असतात. काहीवेळा बाइज्जत बरी तर काहीवेळा मिलॉर्डच्या पेनाचं निब मोडून कांडकं पाडलं जातं.
मुळात सिनेमात असल्याने केस कोर्टात झटपट उभी राहून झरझर चालते..
भिंतीवरची गांधीजी, गांधारी बनून हातात तराजू धरुन ताटकळणारी न्यायदेवता आणि सईदजाफरीछाप न्यायाधीश हे निकाल लावण्यासाठी पूर्ण सक्षम आहेतच.. पण तरीही.. फार्फार सिनेमे डोळ्यांची निरांजने करुन बघितल्यानंतर मला असं वाटलं की बॉलीकोर्टात काम करणारे वकील, न्यायाधीश, साक्षीदार, आणि अगदी गुन्हेगारांनाही जर मीही काही कळकळीच्या सूचना केल्या तर कोर्टाच्या कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी दीर्घकालीन उपयोगाचं ठरेल.
सर्वांना मिळूनच टिपा देतोय.
१. कोर्टात कितीही बारक्या गुन्ह्यात तुम्ही फसलेले असाल तरी "कधीच मात न खाणारा", "गेली अनेक वर्षं एकही केस न हरलेला", "शहरातला एक नंबरचा" असा वकील कधीही घेऊ नये. तो नेहमी हरतो.
२. गेली दहापंधरा वर्षं वकिली सोडलेला भणंग व्यसनी वकील किंवा नव्याने एलेल्बी केलेला तरुण तडफदार देखणा वकील निवडावा. हे जिंकतात.
३. सरकारी वकील घेऊ नये. हे हरण्यासाठी पैसे घेतात.
४. वकील म्हणून जी व्यक्ती निवडाल ती व्यक्ती पूर्वी कधीतरी सध्याच्या खटल्यातील आरोपीच्या कृष्णकृत्यांचा थेट बळी ठरलेली असली तर फार प्राधान्य द्या अशा व्यक्तीला. आरोपीकडून आपल्या तरुण तडफदार वकिलावर किंवा त्याच्या आयाबहिणींवर थेट अत्याचार झालेला नसला तर मग निदान पलीकडच्या पार्टीच्या अजिंक्य वकीलाकडून ज्याच्या वडिलांना बदनाम करुन तुरुंगात पाठवले गेले आहे असा तरुण उत्तम.
वाक्यं कॉम्प्लिकेटेड पडलं असावं. उदाहरणं घेऊन अधिक स्पष्ट करु.
-तुम्ही फिर्यादी आहात.
-प्रलयनाथ या शहरातल्या डॉनवर खटला चालू आहे.
-ठकराल हा शहरातला अजिंक्य वकील आहे. (हा तुम्हाला लाभणार नाही कारण तो प्रलयनाथचा डिफॉल्ट वकील असेल.)
अशा परिस्थितीत तुमच्यासाठी खालील सर्व कँडिडेटस् वकील म्हणून उत्तम आहेत:
अ. प्रलयनाथची स्वभावाने चांगली,भांगेत तुळस अशी मुलगी.
ब. ठकरालची सत्याची बाजू बळकट धरणारी तरुण देखणी वकील पोरगी
क. पंधरा वर्षांपूर्वी ठकरालकडून स्वतःच्या वडिलांची/ बहिणीची केस लढवताना हार खाऊन अज्ञातवासात गेलेला एक दारुडा
ड. प्रलयनाथने बलात्कार केलेली एखादी तरुणी.
यापैकी कोणी एकजण तरी पेशाने वकील असतंच. त्याची काळजी नसावी.
४. सत्यपक्षाच्या वकीलांसाठी एक महत्वाची सूचना. तुमचा साक्षीदार मुंबईतच रहात असला आणि केस मुंबई हायकोर्टात चालू असली तरी कोर्टाला जाण्याचा रस्ता नेहमीच जंगलातून जातो हे लक्षात घ्या. वाटेत निर्मनुष्य घाटही लागत असतात हे लक्षात घेऊन साक्षीदाराला आपल्या विश्वासू अब्दुलचाचांसोबत एकटेच रिक्षाने कोर्टात यायला न सांगता शक्यतो स्वतःबरोबर कोर्टात घेऊन या. कोर्ट दहा वाजता उघडत असेल तर आठापासूनच लोकल ट्रेन किंवा ब्येस्टची बस अशा सार्वजनिक आणि गर्दीने भरलेल्या वाहनाने कोर्टात येऊन वाट पहात बसा. म्हणजे तुमचा साक्षीदार कोर्टात न पोचल्याने "अदालत का वक्त बरबाद" होण्याची किंवा "तारीख पे तारीख" असं भाषण झोडून पाळणा लांबवावा तशी वेळ लांबवण्याची वेळ येणार नाही. शिवाय अब्दुलचाचांचा जीवही वाचेल.
५. सत्यपक्षाच्या वकीलांनो: तुम्ही एक कार्डिअॅक सर्जन अँब्युलन्ससहित आणि सॉर्बिट्रेटच्या गोळ्यांची बाटली इतकी सोय कोर्टमधेच करुन ठेवावी अशी एक सूचना आहे. त्यामुळे आरोपी आणि त्याचे वकील यांना योग्यवेळी येणार्या हृ.वि.झ. वर तातडीने उपाय करता येईल.
६. सत्यपक्षाच्या वकीलांनो: तुम्ही स्वतः जातीने एक रक्ताने लडबडलेलं हत्यार प्लॅस्टिक पिशवीत घालून सोबत बाळगावं. "खुनाचं हत्यार सापडलं आहे मिलॉर्ड.." असं सनसनीखेज विधान करुन उल्लेखित हत्यार वर करुन दाखवल्यास आरोपी किंवा त्याचे दहा वर्षं अजिंक्य असलेले काबिल वकील यांपैकी एकजण घामाने डबडबून "हे हत्यार मी वापरलंच नव्हतं.." असं ओरडून जीभ चावण्याची बरीच शक्यता असते. मग तुम्हाला "दॅट्स ऑल मिलॉर्ड.." म्हणून बसता येईल.
७. सत्यपक्षाच्या साक्षीदारांनो. तुम्ही साक्ष देण्यासाठी कोर्टात पोचाल तेव्हा जबरदस्त खिळखिळ्या आणि काळ्यानिळ्या अवस्थेत असाल. तेव्हा तिथे पोचताक्षणीच कटहर्यात घुसा. झटपट शपथ घ्या आणि आरोपीकडे थेट बोट दाखवून तो दोषी आहे हे पहिलं वाक्यं म्हणा. होतं काय की तुम्ही आलेले असता मरायच्या टेकीला. अशात मग तुम्ही प्रेमाची आणि देशभक्तीची भाषणं आधी करत बसलात तर नेमकं प्रत्यक्ष आरोपीचं नाव घेण्याच्या क्षणीच तुमची दातखीळ बसेल आणि डोळे मिटतील.. मग आरोपी बाइज्जत बरी होईल. एवढा मार खाऊन कोर्टात पोचलात ना? मग ते ठरवलेलं काम पूर्ण करुन टाकत जा.
८. कोर्टातील पोलीसहो: घोंगडी किंवा बुरखा घेऊन कोणालाही कोर्टात बसू देऊ नका. अशी व्यक्ती उपरिनिर्दिष्ट साक्षीदाराच्या सत्यकथनाच्या ऐनक्षणी घोंगडी फेकून देते आणि आत लपवलेल्या पिस्तुलाने साक्षीदाराच्या कपाळी गोळी घालते. आधीच काळजी घ्या. मुंबईतल्या उकाड्यात मरायला घोंगडी लागतेय कशाला?
९. असत्यपक्षाचे साक्षीदारहो.. (भ्रष्ट पोलीस, पैसे खाऊन खोटा मेडिकल रिपोर्ट देणारे डॉक्टर इ.इ.) तुम्ही खोटी साक्ष देताय हे लक्षात ठेवा. अशा वेळी पांचट विनोद आणि ओव्हरअॅक्टिंग कटाक्षाने टाळा. अतिउत्साह हा तर अशावेळी शत्रूच. तुम्हाला सत्यपक्षाचा वकील जेवढा प्रश्न विचारेल तेवढंच उत्तर द्या.. अघळपघळ बोलाल तर शब्दात अडकाल किंवा मग "आपको जो सवाल पूछा जाये, सिर्फ उसीका जवाब दिजीए मिस्टर नारंग." असं कडाडलेलं ऐकून घ्यावं लागेल. शिवाय तुम्ही भ्रष्ट अधिकारी आहात, त्यामुळे तुमची पोरगी सत्यपक्षाला सामील आहे हे आधीच ओळखून ठेवा. ती अवलक्षणी अवलाद तुम्हाला शंभर टक्के तोंडघशी पाडणार.
१०. दोन्ही पक्षांचे वकीलहो: समोरच्या वकीलाच्या तिसर्या किंवा चौथ्या प्रश्नाला "ऑब्जेक्शन" न घेतल्यास फाऊल धरतात. तेव्हा ही वेळ चुकवू नये. काही सुचलं नाही तर "काबिल वकील अॅडव्होकेट ठकराल मेरे विटनेस को गुमराह करने की कोशिश कर रहे है" वगैरे म्हणता येईल.
११. किमान चार ते पाच विरोधी साक्षीदारांच्या साक्षीनंतर आपल्या अशिलाचा चेहरा वितळलेल्या मेणासारखा पडत चालला असला तरी आपण मंद आश्वासक स्मित करत आपल्याला काहीही प्रश्न विचारायचे नाहीत असं म्हणत रहावं. पुरेसा तणाव निर्माण झाल्यावर मग शेवटच्या साक्षीदाराला फाडावा.
सर्वात शेवटचं आणि महत्वाचं. सर्व पार्टीजना जी काही डायलॉगबाजी करायची आहे आणि सामाजिक संदेश द्यायचे आहेत ते कोर्टरुमच्या आत देऊन संपवा. कारण हा "लासचा सीन" असणार आहे. केस जिंकून पुढच्या सीनमधेच हिरो हिरॉईन सार्या जगाला कोलून थेट गाण्यात शिरुन फ्रीझ होणार आहेत. तस्मात कोणताही आशयघन मुद्दा मांडायला मिलॉर्डच्या निकालानंतर अवसर राहणार नाही..
................
प्रतिक्रिया
16 Jan 2012 - 4:16 pm | मन१
फारएन्ड, आदि जोशी चा मिथुन ह्यांची आठवण होतेय.
16 Jan 2012 - 9:30 pm | मेघवेडा
फारेण्डच्या चित्रपटविषयक नियमांची प्रकर्षानं आठवण झाली!
टिपा वाचून समस्त मृत्युवाचक क्रियापदांची प्रथमपुरुष एकवचनं झालेली आहेत! :)
16 Jan 2012 - 4:18 pm | प्रास
गवि, हे मस्त लिहिलंयस रे! वाचताना हसल्यामुळे ज्या खुर्चीत बसलेलो तीच मोडतेय की काय असं वाटलं (कोण रे तो म्हणतोय, मी बसल्यामुळे ती मोडणारच आहे म्हणून? ;-))
प्रत्येक प्रसंगात मूळ चित्रपटातली दृष्य दिसत होती. मजा आली.....
16 Jan 2012 - 4:33 pm | मृगनयनी
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
हे लयी भारी!!!....... व्हर्चुअल प्रसन्ग डोळ्यान्समोर येऊन कोलमडल्या गेले आहे!!! ;) ;) ;)
16 Jan 2012 - 4:50 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हीहीही !!! भारी लिवलंय हो गवि !!!!!
मेरी जंग आणि दामिनी जास्त करून आठवत होते.
16 Jan 2012 - 4:35 pm | स्पा
कोर्टात कितीही बारक्या गुन्ह्यात तुम्ही फसलेले असाल तरी "कधीच मात न खाणारा", "गेली अनेक वर्षं एकही केस न हरलेला", "शहरातला एक नंबरचा" असा वकील कधीही घेऊ नये. तो नेहमी हरतो.
भेंडी आवरा....
साफ फुटलोय =)))
16 Jan 2012 - 4:31 pm | पियुशा
हे हे हे =))
ह,ह.पु वा :)
16 Jan 2012 - 4:39 pm | मुक्त विहारि
कोर्टाचा आणी माझा सम्बन्ध फार कमी वेळा आला.....पण तेवढ्या दिवसात एवढेच समजले की....सिनेमात आणी नाटकात दाखवतात ते काही खरे नसते.....अतिशय शान्तपणे ....दळण दळणे चालू असते....ते सुखद अनुभव परत कधीतरी.....आपण प्रतेक क्षणाचे पैसे मोजतो....आणी वकील लोक ते मोजून घेतात...
16 Jan 2012 - 4:52 pm | यकु
अ आणि प्र आणि ति आणि म !!!
एकेक सीन समोर दिसत होता.
होतकरु वकीलाला आणखी एक सकारात्मक सल्ला:-
तमाम गवाहों व बयानात के मद्देनजर ये अदालत मुल्जिम विजय शर्मा को गुनाहगार करार देते हुये बामशक्कत उम्रकैद का फैसला सुनाती है
हे न्यायमूर्तींच्या मुखकमलातून बाहेर पडलं तरी घाबरु नको..
नेमकी या क्षणी कुणाला तरी उपरती होऊन -
ठहरिये जज् साहाब, मुझे अदालत से कुछ कहना है म्हणणारा (आपको जो भी कहना हो कटघरे मे खडे रह के कहिये अशी तंबी खाऊन) कुणीतरी एक तुझ्या मदतीला धाऊन येईलच.. ;-)
16 Jan 2012 - 5:33 pm | मराठी_माणूस
ह्या वेळेस न्यायाधीश उर्दुत का बोलतात ते काही समजत नाही. वरच्या वाक्यात हे एक राहील .
"ताझराते हींद दफा३०२ के तहेत ये अदालत......"
16 Jan 2012 - 5:35 pm | प्रास
बहुतेक ते "काझीराते हिंद....." अर्थात हिंदुस्तानच्या कायद्यानुसार.... " अशा अर्थी असावं....
16 Jan 2012 - 8:45 pm | मराठी_माणूस
http://en.wikipedia.org/wiki/Indian_Penal_Code इथे पहा
16 Jan 2012 - 8:49 pm | प्रास
म_मा,
आभारी आहे.
संदिग्धता होतीच म्हणून आधीचे शब्द मागे घेतले आहेत.:-)
16 Jan 2012 - 8:51 pm | मराठी_माणूस
दोनदा आल्यामुळे काढत आहे
16 Jan 2012 - 5:56 pm | यकु
अहो म मा,
कादरखान किंवा तत्सम संवादलेखक संवाद लिहायला बसल्यावर आणखी काय होणार ;-)
त्यांची जी मातृभाषा तीच पात्रांचीही मातृभाषा.
शाळेत उर्दू शिकायला मिळाली नसली तरी या संवादांमुळंच उर्दूचे चार शब्द ओळखीचे झाले हा त्यातला प्लस पॉइंट.
(अनुवादक) यशवंत
16 Jan 2012 - 5:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पायलीच्या पन्नास वेळा हे दृष्य हिंदी सिनेमात समोर आलं आहे, पण या एकमेव दृष्याचा सिनेमात कधी कंटाळा येत नाही, हेही तितकंच खरं आहे.
:)
-दिलीप बिरुटे
16 Jan 2012 - 4:52 pm | प्यारे१
मेरी जंग , दामिनी, सलाखें, आणि तद्दन कोर्टरुम ड्रामे बर्याच वेळा पाहिलेत काय?
16 Jan 2012 - 4:56 pm | सुहास झेले
हा हा हा ... प्रचंड भारी !!!!
काय हो गवि आज एकदम कोर्टावर हल्लाबोल. इथे मी वेड्यासारखा हसतोय !!!
:D :D :D :D :D
16 Jan 2012 - 4:57 pm | ५० फक्त
मेलो, मेलो , मेलो
माय लॉर्ड मेरे को बाइ ज्जत बरी करो.
16 Jan 2012 - 5:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हहपुवा. :)
-दिलीप बिरुटे
16 Jan 2012 - 5:03 pm | किसन शिंदे
खि..खि..खि.. लय म्हणजे लयच भारीच!! :BIGSMILE:
:D :D :D
आम्हाला तर ब्वॉ मेरी जंग मधला लय आरडाओरडा करणारा अनिल कपुरच आठौला. ;)
16 Jan 2012 - 5:06 pm | पिंगू
काय समजून धागा उघडला आणि पेटार्यातून खमंग विनोद निघाले..
- पिंगू
16 Jan 2012 - 5:14 pm | अन्या दातार
चायला गवि, तुम्ही टिपा घातल्या की उसवल्या हो? ;)
16 Jan 2012 - 5:24 pm | मराठी_माणूस
मस्त.
16 Jan 2012 - 5:25 pm | मोदक
ठ्ठो..!!!!!! :-D
16 Jan 2012 - 5:30 pm | इरसाल
जबरदस्त हो गवि.
त्यातल्यात्यात परवाच "क्योंकी मै झूट नही बोलता" आणि के डी पाठकचे "अदालत" पाहिले म्हणून प्रसंगानुरूप चित्र मनात चितारू शकलो.
16 Jan 2012 - 5:33 pm | असुर
गवि,
कोर्टाशी तुमचं जुनं नातं आहे. त्या पार्श्वभूमीवर हा लेख नक्कीच आवडेश. :-)
--(कौतुकोत्सुक) असुर
लिखाणाची स्टैल मस्तच! प्रसंग डोळ्यासमोर उभे करण्यात तुमचा हातखंडाच आहे म्हणा.
-- (गविंचा फैन) असुर
पण गवि, फक्त सेन्चुरी मारलीत. क्या! क्या! क्या! नहींSSSSSSSSSS!!! ये नहीं हो सकता हय! हे म्हणजे लक्कीभाईने ऑस्ट्रेलियाला आख्या सिरिजमध्ये एकदापण फोडला नाय असा ज्हाला.
तुमच्याकडून फक्त सेन्च्युरी अपेक्षित नसते. २०० ची अपेक्षा असताना फक्त १५० रन्सा केल्या तुम्ही!
-- (स्पष्ट) असुर
हा असा फौल झाला ना रौ. ;-) आता अजून काय तरी भारी येऊद्या.
--(हावरट) असुर
16 Jan 2012 - 7:03 pm | स्वाती दिनेश
एकदम खमंग, खुसखुशीत!
स्वाती
16 Jan 2012 - 7:29 pm | सोत्रि
एकदम खमंग!
- (कोर्टात न गेलेला) सोकाजी
16 Jan 2012 - 7:04 pm | पक पक पक
भन्नाट ,लय भारी हसुन हसुन बेजार झालो.............
17 Jan 2012 - 3:37 pm | नगरीनिरंजन
निरीक्षणं फार जबरा आहेत!
प्रत्येक सल्ल्याला एकएक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहून हसण्याची उबळ येत होती.
अजून लिहा. फिल्मी इस्पितळांत कसं वागायचं यावर पुढचा भाग लिहावा असे सुचवतो.
17 Jan 2012 - 4:17 pm | यकु
>>>फिल्मी इस्पितळांत कसं वागायचं यावर पुढचा भाग लिहावा असे सुचवतो.
--- टेबल वाजवून जोरदार अनुमोदन !!!!
गवि, नोंद घ्या.
16 Jan 2012 - 7:59 pm | रेवती
ही ही ही.
दामिनी पिच्चर आठवत होता.;)
लेखन आवडलं.
16 Jan 2012 - 8:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
आपण महान आहात.
मायला हापीसातच माराचा इचार हाय काय? ;)
16 Jan 2012 - 10:28 pm | आनंद
लै भारी गवि,
पण साक्षीदाराला लोकल ने घेवुन जाणे म्हणजे डेंजरच कि वो, आठवा "जंजिर" मधला सिगारेटचा चटका आणि केष्टो लोकल मधुन खाली.
16 Jan 2012 - 10:34 pm | अन्या दातार
त्यावर उपाय म्हणजे लोकल फर्स्ट क्लासचे तिकिट काढून निदान चौथ्या सीटवर बसवून, आणि आपण त्याच्या आसपास उभारुन प्रवास करणे. ;)
16 Jan 2012 - 10:47 pm | मराठे
अश्याच एका पिच्चरमधे 'मेरे फाझिल दोस्त...' की कायंसासा डायलॉग होता.. तेव्हा तो सरकारी वकीलाला 'फाजिल' का म्हणतोय याचा उलगडा होता होत नव्हता.
बाकी गविंचा नेहमीप्रमाणेच अफलातून लेख.
16 Jan 2012 - 10:58 pm | पैसा
सगळे गाजलेले कोर्टरूम ड्रामे आठवले!!!
16 Jan 2012 - 11:07 pm | चतुरंग
खल्लास!! संपूर्ण बॉलीकोर्टातली पात्रे एकेक करुन टिपल्याबद्दल तुम्हाला न्यायाधीशांच्या डोक्यावरचा कुरळा विग आणि हातोडी सप्रेम भेट!! ;)
(सरन्यायाधीश)रंगाचलय्या
17 Jan 2012 - 9:22 am | मराठमोळा
ह.ह.पु.वा.. :)
बरेचसे चित्रपट आठवून गेले...
बाकी,
>>दोन्ही पक्षांचे वकीलहो: समोरच्या वकीलाच्या तिसर्या किंवा चौथ्या प्रश्नाला "ऑब्जेक्शन" न घेतल्यास फाऊल धरतात.
हे वाक्य पुलंच्या 'मुंबईकर, नागपुरकर, पुणेकर" यावरुन घेतलय असे वाटले.
त्यातलं वाक्य होतं - वक्त्याने पुण्यात दर चौथ्या वाक्याला हशा मिळवला नाही तर फाऊल धरतात.. :)
17 Jan 2012 - 10:01 am | sneharani
मस्त! मजा आली वाचायला!
=)) =))
:)
17 Jan 2012 - 4:08 pm | गणपा
:)
क्रमांक ७ चा सल्ला सगळ्यात जास्त आवडला.
=))
17 Jan 2012 - 5:14 pm | चिगो
येकदम कडक, गवि..
(फिल्मी कोर्टाचा फॅन) चिगो..
18 Jan 2012 - 1:26 pm | Maharani
मेरी जंग---अनिल कपूर- अमरीश पुरी (ठकराल) -->(सुहास शिरवळकर-अमर विश्वास - वरुन ढापलेले वकीलाचे character असा आपला आमचा कयास ) -----बाकी लेखन आवडलं.
21 Jan 2012 - 8:34 pm | प्रभाकर पेठकर
सूक्ष्म आणि अनंत काळाच्या तपशिलवार निरिक्षणातून प्रसवलेला अतिशय अप्रतिम लेख.
हिन्दी, मराठी चित्रपटातील अजूनही कित्येक दृष्यांवरील लिखाण अपेक्षित आहे.
22 Jan 2012 - 11:03 am | सुहास..
हा हा हा हा ...स्सही ..
काल-परवा (वकील)मित्रा ने सांगीतलेला किस्सा आठवला ,
जज्ज ने सहसा एखाद्या ची निर्दोष मुक्तता केली की ते सांगताना, तुम्हाला ह्या गुन्ह्यातुन सोडुन दिले आहे तुम्ही जावु शकता असे म्हणतात, त्यानंतर त्याचा वकील काहे असेल ती कारवाई करुन कोर्टातुन एक पत्रक मिळवुन ते चौकीला द्यायचे असते.
अशीच एका व्यक्तीवर दोन केस चालु होत्या ,एका केस मधुन त्या निर्दोष मुक्तता मिळाली, पण जज्ज साहेबांना प्रत्येक वाक्यानंतर पॉज घ्यायची सवय होती. त्यांनी एका केस मध्ये सोडुन दिले म्हटल्या-म्हटल्या आरोपी निघुन गेला कोर्टातुन , मग दोन मिनीटांनी जेव्हा कोर्टा च्या लक्षात आले तर म्हणे ' त्याला धरुन आणा ' त्याच्या वर चाललेल्या दुसर्या खटल्याचा अजुन निकाल द्यायचा आहे. पोलीसांनी त्याला धरुन आणला, तो त्याची त्या खटल्या तुन ही मुक्तता झाली. हा निकाल दिल्यानंतर ही आरोपी थोडा वेळ जज्ज समोर घुटमळला. जज्ज ने विचारले " का थांबला आहात ? " तर तो म्हणे " सर, खात्री ने जावु का " ...यावर कोर्टाचा अपमान केला म्हणुन त्या बिचार्याल एक दिवस शिक्षा देण्यात आली
22 Jan 2012 - 7:03 pm | किचेन
सगळी दृश्य अशी डोळ्यासमोर दिसू लागली.म्हणजे एकीकडे 20 मिनिट घाटातून ,जंगलातून,गर्दीतून येणारा साक्षीदार आणि दुसरीकडे अदालत का बरबाद होणारा वक्त,सत्यापाक्षाचे सारखे सारखे घड्याकडे बघणारे लोक....... ते खोट खुनाच हत्यार बाहेर काढल्यावर आरोपीच्या कपाळाला आलेला घाम...आणि नंतरची ततपप ......
:)
20 Jan 2022 - 12:05 pm | नीलकंठ देशमुख
मी मिसळपाव वर नवखा आहे माझ्या लेखावरील प्रतिक्रियेत या लेखाचा उल्लेख होता म्हणून शोधून वाचला. छान लिहिलय तुम्ही..