वास्तववाद - प्रारंभिक प्रवास
The raw material of the cinema is life itself… for the truly serious, socially conscious filmmaker, there can be no prolonged withdrawal into fantasy. He must face the challenge of the Contemporary reality, examine the facts, probe them, sift them and select from them the material to be transformed into the Stuff of cinema’
-Satyajit Ray
(Our Films, Their Films)
वास्तववादी चित्रपटाची प्रकृती कशी असावी, त्याचे स्वरूप काय असावे, त्याचा हेतू काय असावा, त्यातील विषय कुठून घ्यावेत यासंबंधी दिग्दर्शक सत्यजित राय यांनी लिहलेल्या या चार ओळीत जे मार्गदर्शन केलेले आहे ते वास्तववादी चित्रपटाची व्याख्या करण्यास पुरेसे आहे. मात्र या परिच्छेदात राय यांनी केवळ 'सिनेमा' असा शब्दप्रयोग केलेला आहे त्यास 'रिअॅलिस्टिक' , 'ऑफ बीट' , 'पॅरलल' , 'आर्ट' असे कोणतेही विशेषण त्यांनी लावलेले नाही. वास्तववादी सिनेमाची व्याख्या काय असा प्रश्न एखाद्या दिग्दर्शकाला केला जातो तेव्हा आपल्या चित्रपटावर 'वास्तववादी' असा शिक्का मारण्यास हे दिग्दर्शक नाखूश असतात. 'There are only two types of cinema, Good and Bad'. चांगला चित्रपट आणि वाईट चित्रपट अशा दोनच प्रकारांचे अस्तित्व बहुतांश दिग्दर्शक मान्य करतात. 'आर्ट सिनेमा', 'रिअॅलिस्टिक सिनेमा' आदी शब्दांचा शोध प्रसारमाध्यमांनी केवळ उल्लेखाच्या सोयीसाठी लावला असल्याचे सांगितले जाते. चित्रपटांचे हे वर्गीकरण दिग्दर्शकांना अमान्य असले तरी व्यावसायिक चित्रपटांचा आणि वेगळ्या चित्रपटांचा असे दोन प्रवाह चित्रपटसृष्टीत आहेत हे सत्य अमान्य करता येत नाही व्यावसायिक चित्रपटात जसे चांगले/ वाईट चित्रपट आहेत/ असतात/ असू शकतात त्याचप्रमाणे वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्येही फसलेले अथवा जमलेले चित्रपट असू शकतात.
वेगळ्या पठडीतल्या अशा चित्रपटांची निर्मिती होणे हे चित्रपटाचा 'कला' म्हणून विकास झाल्याचे लक्षण मानावे लागेल. अर्थात शुध्द व्यावसायिक, अर्ध व्यावसायिक, अर्ध कलात्मक, प्रयोगात्मक, अती वास्तववादी अशा अनेक प्रकारात मोडणारे चित्रपट भारतात गेल्या ८५ वर्षांत जन्माला आलेले आहेत. अगदी सुरूवातीला चित्रपट हा केवळ एक 'वैज्ञानिक चमत्कार' होता. या माध्यमातून गोष्ट सांगता येते हे लक्षात आल्यावर सुरूवातीला सर्वांना परिचित असलेल्या लोकप्रिय पौराणिक, ऐतिहासिक कथांचा भडिमार झाला व काळाची गरज म्हणून त्यानंतर स्वातंत्र्य लढ्याविषयी जागृती करण्याचे कामही या माध्यमाद्वारे करण्यात आले. परंतू 'गोष्ट सांगणे' हा त्यानंतर चित्रपटाचा कायम प्रधान हेतू होता. 'गोष्ट सांगणे' या हेतूचा विस्तार 'मनोरंजन करणे' असा झाला आणि 'संगीत-नृत्य-भावनाट्य' यांची जोड त्याला मिळाली. मनोरंजनाचा हा जो साचा तयार झाला त्याची चौकट न मोडता अधिक अर्थगर्भ, आशयपूर्ण, आनी प्रत्यक्ष जिवानाशी जवळीक साधणारे चित्रपट देण्याचा प्रयत्न करणारे काही दिग्दर्शक प्रत्येक दशकात होते. तर काही दिग्दर्शकांनी ती चौकट पुर्णपणे नाकारून वेगळ्या पध्दतीचा चित्रपट देण्याचे प्रयत्न केले. या प्रयत्नाला भारतीय संदर्भात मूर्त स्वरूप आले ते १९५२ नंतर आणि हिंदी चित्रपटांच्या बाबतीत असा विचार केला तर रुढ चौकट पुर्णतः मोडणारा पहिला चित्रपट १९६९ साली आला. मात्र असा चित्रपट येण्यापुर्वी व तो स्विकारला जाण्यापुर्वी प्रेक्षकांची मनोवृत्ती तयार करण्याचे काम व्हावे लागले. आधीच्या २५ वर्षात ते ज्यांनी केले त्यांचा सहभागही तेवढाच महत्वाचा असतो. कोणतीही चळवळ उभी राहते तेव्हा तिची पार्श्वभूमी पाहणेही तेवढेच आवश्यक ठरते. ही प्रक्रिया नेहमीच धीम्या गतीनं घडत असते. थोडीबहुत चौकट मोडणारे अनेक दिग्दर्शक, सातत्याने थोडेफार प्रयोग करण्याचे धाडस करीत राहतात तेव्हा कुठे मृणाल सेन, श्याम बेनेगल यांच्यासाठी प्रेक्षक तयार होऊ शकतो.
सुरूवातीला नाटकांचा मोठा प्रभाव चित्रपटांवर होता त्यामुळे नाटकी अभिनय. खटकेबाज संवाद आणि भरमसाठ गाणी घालता येतील असे कथानक मुख्यतः निवडले जाई. चित्रपटाचे स्वतःचे वेगळे तंत्र तयार होण्यास काही काळ जावा लागला. त्यानंतर चित्रपटांची अशी तांत्रिक भाषा तयार झाली तरी संगीताला वाव देणार्या प्रेमकथा तयार करण्याकडेच दिग्दर्शकांचा मुख्यतः कल होता. त्यातूनच मग प्रेमभंग, विरह, यांचे उदात्तीकरण करून प्रेक्षकांच्या भावना कोमाळण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्यांच्या सौंदर्याचे, व्यक्तिमत्वाचे चाहते हिरिरीने वाद घालू लागले आणि 'स्टार' जन्माला आले. त्यानंतर आजतागायत वेळोवेळी वेगवेगळे प्रवाह आले आणि गेले तरी व्यावसायिक चित्रपटात 'स्टार' आणी 'संगीत' यांचे वर्चस्व कायम राहिलेले आहे. १९३७-३८ साली 'एक बंगला बने न्यारा' अथवा 'करूं क्या आस निरास भयी' मध्ये रमणारा चित्रपट शौकीन १९५५ च्या सुमारास 'प्यार हुआ इकरार हुआ' मधे रमू लागला. १९८० साली तो 'देखो मैंने देखा है ये इक सपना' म्हणू लागला आणि १९९९ साली 'आती क्या खंडाला' असं विचारू लागला. नटनट्यांचे पेहेराव, कॅमेर्या चे तंत्र, अभिनयाच्या पद्धती बदलत गेल्या तरी व्यावसायिक चित्रपटांचा आत्मा कायम तोच राहिला. 'संगीत' आणि 'स्टार' हे प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणणारे घटक वापरून कथानक मात्र जीवनाशी अधिक जवळीक साधणारे, झालेच तर एखाद्या समस्येचा, एखाद्या सर्वकालिक सत्याचा वेध घेणारेही काही दिग्दर्शक यात होते आणि त्यांच्या चित्रपटांनीच पुढील वास्तववादी अथवा वेगळ्या प्रकारच्या सिनेमाचा मार्ग प्रशस्त केला. वास्तववादाकडे घेऊन जाणारा हा मार्ग कोणी व कसा प्रशस्त केला हे पाहणेही महत्वाचे आहे.
भारतातील सिनेमाचा पहिला खेळ मुंबईत झाल्यावर विज्ञानाने दिलेली ही कला महत्वाची असल्याचे ओळखण्याचा द्रष्टेपणा दाखवून ती भारतात विकसित करण्याची, लोकप्रिय करण्याची प्राथमिक धडपड करण्यात सर्व मराठी माणसेच आघाडीवर होती. पहिल्या चित्रपटाचे श्रेय दादासाहेब फाळके यांच्या 'राजा हरिश्चंद्र'ला द्यायचे की तोरणे यांच्या 'भक्त पुंडलिक'ला द्यायचे याबाबत अजूनही वाद घातला जातो. हे श्रेय कुणालाही दिले गेले तरी ते मराठी माणसालाच मिळेल. 'सावकारी पाश' या मूकपटाद्वारे भारतातील वास्तववादी चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवण्याचे श्रेय बाबुराव पेंटर या मराठी माणसाकडेच जाते. सावकारांकडून होणार्यार शेतकर्यांेच्या पिळवणुकीचे व शेतकर्यांाच्या हलाखीचे अतिशय वास्तव चित्रण पेंटरांनी या चित्रपटात केले होते. या चित्रपटामुळे पेंटरांची तुलना त्याकाळी अमेरिकन दिग्दर्शक डी. डब्ल्यू. ग्रिफिथ यांच्याशीही करण्यात आली.
चित्रपटाच्या माध्यमाचा प्रभाव ओळखून या माध्यमाद्वारे सामाजिक विषमता, अन्याय यांना वाचा फोडली जाऊ शकते हे लक्षात येणे आणि लगोलग तसा चित्रपटही तयार करणे हे त्या काळात धाडसच होते. त्याचप्रमाणे चित्रपट हे दृश्यमाध्यम आहे आणि संवाद हे केवळ त्यास पूरक म्हणून वापरले गेले पाहिजेत ही अतिशय प्रगल्भ अशी जाणही बाबुराव पेंटरांना बोलपटांच्या प्रारंभीच्या काळातच आली होती, यावरुन त्यांची या माध्यमाविषयीची समज किती सखोल होती हे कळून येईल. 'तुम्ही बोलपट तयार केला म्हणजे त्याची ट्रायल दोन वेळा पहा. पहिली ट्रायल आवाज बंद करुन म्हणजे आपण मूकपट पाहतो तशी व दुसरी ट्रायल चित्र न पाहता नुसता आवाज ऐकून. दोन्ही प्रसंगी चित्रपट समजला तर तुम्ही शंभर मार्क मिळवले, नाही तर नापास !' हे बाबुरावांचे वाक्य प्रसिद्ध आहे. बाबुरावांच्या या चित्रपटविषयक दृष्टिकोनाचा प्रभाव पडून त्यांच्याही पुढे चार पावले टाकण्याचा पराक्रम बाबुरावांच्या 'सावकारी पाश' या मूकपटात शेतकर्या,ची भूमिका करणार्या! व्ही. शांताराम यांनी पुढे केला. 'प्रभात' या संस्थेसाठी व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या 'कुंकू' (१९३७), 'माणूस' (१९३९) आणि 'शेजारी' (१९४१) या तिन्ही चित्रपटांत सामाजिक जाणीव दिसून येते. केवळ रंजनाचे साधन म्हणून चित्रपटाकडे न पाहता त्यातून समाजप्रबोधन करण्याचा, समाजात अस्तित्वात असलेल्या घातक परंपरांवर प्रहार करण्याचा आणि चित्रपट निर्मितीच्या रुढ चौकटी मोडण्याचाही प्रयत्न प्रभातच्या या चित्रपटांनी केला. भविष्यात वेगळ्या प्रकारचा सिनेमा अस्तित्वात आला त्याचा पाया 'सावकारी पाश'सह या तीन चित्रपटांनी रचला. 'प्रभात'च्या सूत्रधारांनी 'संत तुकाराम' (१९३६) सारखा चित्रपट काढतानाही त्यातील चमत्कार अथवा परमार्थ यांना महत्व देण्यापेक्षा त्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला, यातून त्यांचा पुरोगामी, समाजाभिमुख दृष्टिकोन स्पष्ट होतो.
'माणूस' व 'शेजारी' हे दोन्ही चित्रपट अनुक्रमे 'आदमी' व 'पडोसी' या नावांनी हिंदीतही आले व त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीलाही या वेगळेपणाची दीक्षा आणि दृष्टी मिळाली. कटाक्षाने सुशिक्षित लोकांचा भरणा करण्यात आलेल्या 'बॉम्बे टॉकीज'ने त्यापूर्वी 'अछूत कन्या'(१९३६) हा सामाजिक आशय असणारा चित्रपट दिला होता, परंतु स्पृश्य-अस्पृश्य व्यक्तिरेखांचा पसारा मांडून झाल्यावर या चित्रपटात दिग्दर्शकाने केवळ प्रेमकथाच रंगवली होती. मात्र पुढे १९४० साली दिग्दर्शक मेहबूब खान यांनी 'औरत' चित्रपटाद्वारे सामाजिक प्रश्न मांडण्याचा केलेला प्रयत्न अधिक प्रामाणिक होता. त्यानंतर १९४६ साली आलेल्या ख्वाजा अहमद अब्बास यांच्या 'धरती के लाल' आणि चेतन आनंद यांच्या 'नीचा नगर' या चित्रपटांमुळे व्यावसायिक चित्रपटांच्या चौकटीतून संपूर्ण मुक्त असलेल्या वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांची चाहूल हिंदी चित्रपटसृष्टीला लागली. परंतु प्रत्यक्षात या वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांची एक चळवळ उभी राहण्यास आणखी १५ वर्षे जावी लागली आणि दरम्यानच्या काळात व्यावसायिक चित्रपटांचे नियम झुगारुन न देता वेगळेपणाचा हा प्रवाह वाहता ठेवण्याचे आणि एक तंत्र म्हणून, कला म्हणून चित्रपटाचा विकास करण्याचे काम बिमल रॉय, गुरुदत्त, राज कपूर यांनी केले, जे पुढेही चालू राहिले. वास्तववादी अथवा समांतर चित्रपटाच्या निर्मितीला कारणीभूत होणार्या या दिग्दर्शकांवर कुणाचा आणि कसा प्रभाव पडला हे पाहण्यासाठी जागतिक इतिहासाकडे वळावे लागेल.
वास्तववादाचा जन्मः
'वास्तव' आणि वास्तववाद हे दोन्ही शब्द सिनेमाचा जन्म होण्याच्या आधीपासूनच कलाप्रांतात अस्तित्वात आहेत. चित्रकला आणि साहित्याच्या संदर्भात त्यांचा वापर फार पूर्वीपासून होत होता. १७व्या शतकात ग्रीक मूर्तिकलेच्या संदर्भात या शब्दाचा प्रथम वापर झाल्याची नोंद आहे तर चित्रकलेच्या संदर्भात फ्रेंच चित्रकार गुस्ताव कॉर्बे याच्या १८५४-५५ सालच्या 'द स्टुडिओ' या चित्रकृतीच्या वेळी 'वास्तव' हा शब्द प्रथम वापरला गेला. कॉर्बेने काढलेल्या चित्रांना मान्यता देण्यास तेव्हाच्या अधिकृत संस्थेने नकार दिला तेव्हा कॉर्बेने आपल्या चित्रांचे 'रिअॅालिझम' या शीर्षकाखाली वेगळे प्रदर्शन भरवले. कॉर्बेच्या चित्रांमधील दाहक वास्तवावर चोहीकडून टीका झाली तेव्हा कॉर्बेने आपल्या चित्रकलेचे जोरदार समर्थन केले. दैनंदिन जीवनाचे वास्तव चित्रण करण्याची आणि समाजाकडे अभ्यासूवृत्तीने पाहण्याची संधी चित्रकारांनी सोडू नये असा आग्रह त्याने धरला. 'ब्युरिअल अॅाट ऑर्नास','स्टोनब्रेकर्स' या त्याच्या चित्रकृती गाजल्या. फ्रान्सच्या बाहेर अमेरिका, जर्मनी येथेही चित्रकलेत याच काळात वास्तववाद डोकावू लागला होता. कलेचे माध्यम राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी वापरणारा चित्रकारांचा एक गट यावेळी अमेरिकेत अस्तित्वात होता. त्यांना 'द एट' असे संबोधन होते. तर जर्मनीत पहिल्या महायुद्धानंतर चित्रकलेत जो वास्तववाद दिसू लागला त्याला सामाजिक वास्तववाद असे संबोधन होते.
साहित्याच्या संदर्भातही वास्तवाचे पहिले दर्शन फ्रान्समधेच घडले. तत्कालीन फ्रेंच समाजाचे यथार्थ दर्शन घडवण्याचा पहिला प्रयत्न कादंबरीकार हॉन्रे डी बॅल्झॅक याने त्याच्या 'ल कॉमेडी ह्युमेनी' या कादंबरीत केला होता. मात्र कॉर्बेच्या चित्रांपासून प्रेरणा घेऊन जेव्हा लेखक आणि पत्रकारांनी साहित्य प्रसवणे सुरु केले तेव्हाच खर्याे अर्थाने वास्तववाद साहित्यात दिसू लागला. कॉर्बेच्या चित्रांची प्रसिद्धी व्हावी म्हणून धडपड करणार्या चॅम्फ्लूटीए या पत्रकाराने कॉर्बेच्या चित्रांतील विचार शब्दांत मांडून त्याला 'ल रिअॅधलिझम' असे नाव दिले. साहित्याचा नायक हा सर्वसामान्य माणूस असला पाहिजे हा विचार सर्वप्रथम याच काळात मांडला गेला. १८५७ साली गुस्ताव फ्लॉबेरने आपल्या 'मॅडम बोव्हरी' या कादंबरीत अतृप्त मध्यमवर्गीय विवाहितेच्या मानसिक अवस्थेचे चित्रण केले आणि वास्तववादी साहित्याला कलात्मक मूल्य प्राप्त होण्याच्या दिशेने पावले पडू लागली.
१९व्या शतकाच्या अखेरीस रंगभूमीवरही 'वास्तवा'चे दर्शन घडू लागले. हेन्रिक इब्सेन, ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग, रशियात अँटन चेकॉव्ह, मॅक्सिम गॉर्की आदी नाटककारांनी कृत्रिम विषयांवरील नाट्यपूर्ण बांधणी आणि काल्पनिक कथावस्तू असलेली नाटके झिडकारण्यास सुरुवात केली. त्याऐवजी समकालीन जीवनाचे प्रतिबिंब रंगभूमीवर पडावे असा हट्ट त्यांनी धरला. काव्यात्मक अलंकारिक भाषा टाळून सामान्य व्यवहारातील संवादांची भाषा नाटकात वापरण्यास त्यांनी सुरुवात केली. नाटकाच्या नेपथ्यातही कलात्मकतेपेक्षा वास्तवता दिसावी असा हट्ट ते धरु लागले आणि 'वास्तववाद' या शब्दाची सांगड हळूहळू पुरोगामित्वाशी घातली जाऊ लागली.
१९व्या शतकाच्या अखेरीस जन्माला आलेल्या 'सिनेमा' या वैज्ञानिक कलामाध्यमात जीवनाच्या अधिक जवळ जाण्याची, जीवनाचे अधिक वास्तव दर्शन घडविण्याची ताकद असल्याचे सर्वांच्या लवकरच लक्षात आले. सुरुवातीच्या 'रंगमंचीय' प्रभावातून सिनेमा लवकरच बाहेर पडला. कथा सांगण्याची पारंपरिक पद्धत, सेटवरील चित्रीकरण यांना फाटा देऊन 'लोकेशन शूटिंग', 'नॉन अॅाक्टर्स' यांना घेऊन वृत्तचित्र, माहितीपट यांच्या अंगाने जात सामाजिक-राजकीय वास्तवावर टीका करणार्याअ सिनेमाचा या काळात जन्म झाला. त्यातून चित्रपटक्षेत्रात ज्या चळवळी जन्माला आल्या त्याला ब्रिटनमधे 'सामाजिक वास्तववाद', ब्राझीलमधे 'सिनेमा नोव्हो', फ्रान्समधे 'न्यू वेव्ह सिनेमा' आणि इटलीमधे 'नव वास्तववाद' असे म्हटले जाऊ लागले. 'वास्तववादी' असा स्पष्ट उल्लेख ज्याचा करता येईल असा पहिला चित्रपट होता १९४२ सालचा दिग्दर्शक लुशिनो व्हायकाऊंटी यांचा 'द ऑब्सेशन'. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर हा शब्द प्रथम प्रचलित झाला तो रॉबर्टो रोझेलिनी यांच्या 'रोम्-ओपन सिटी' या १९४५ सालच्या चित्रपटाने. आयझनस्टाईन, ग्रिफिथ यांनी सिनेमाला स्वतःची तांत्रिक भाषा दिली ती १९२०-१९२५ च्या सुमारास. मात्र सिनेमा या माध्यमाची ताकद ओळखून त्याला सामाजिक, राजकीय परिमाण मिळाले ते द्वितीय महायुद्धानंतरच!
या सर्व पार्श्वभूमीवर त्यावेळी वास्तववादाचा उल्लेख करताना 'वास्तव' या शब्दाच्या ज्या विविध व्याख्या करण्यात आल्या त्याही पाहता येतील. गुस्ताव कॉर्बेच्या चित्रकलेतील वास्तवाची चर्चा होऊ लागली तेव्हा 'वास्तववादी' या शब्दाचा अर्थ सांगताना तो म्हणाला होता, ' काल्पनिक आदर्शवाद नाकारणे म्हणजे वास्तवता होय. समकालीन जीवनपद्धतीचं, वृत्तींचं सविस्तर, अचूक आणि अनाकर्षक असलं तरी सत्य चित्रण करणं म्हणजेच वास्तववाद होय'. आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना त्याने दिलेलं उत्तर फार समर्पक होतं. तो म्हणाला होता, 'मी केवळ समाजवादीच नाही तर लोकशाहीवादी आणि प्रजासत्ताकवादीही आहे. मी सर्व प्रकारच्या क्रांतिकारक चळवळींचं समर्थन करतो आणि मुख्य म्हणजे मी वास्तववादी आहे. कारण 'वास्तववादी' होणे म्हणजे संपूर्ण सत्याचा मित्र बनणे होय!' १९व्या शतकाच्या पूर्वार्धातील अनेक घटना 'वास्तववादा'ला जन्म देण्यास कारणीभूत ठरल्या. जर्मनीतील 'अँटी रोमँटिक' चळवळीमुळे कलेचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूसच असला पाहिजे ही भावना प्रथम रुजविली. पाठोपाठ व्यावसायिक पत्रकारितेचा जन्म झाला तेव्हा अगदी बारीक तपशिलांसह एखाद्या गोष्टीचे 'दृश्यरुप' टिपण्याची कला अस्तित्वात आली. 'सिनेमा' हे माध्यम म्हणून या सर्व कलांचा आदर्श संगम ठरले. दाखविण्याची, सांगण्याची त्याची ताकद मोठी आहे हे संबंधितांच्या लक्षात आले. त्यामुळे रशियासारख्या देशात लेनिनने या माध्यमाचे महत्व ओळखून प्रचारासाठी त्याचा उपयोग केला. १९१९ सालीच लेनिनने रशियातील सिनेमा चळवळीचे राष्ट्रीयीकरण करुन या विभागाची प्रमुख म्हणून आपली पत्नी नादेशा कृपास्क्या हिची नेमणूक केली होती. 'सिनेमा'ची कला समजण्यासाठी रुढ अर्थानं 'शिक्षित' असण्याची गरज नसते हे लक्षात आल्यावर या कलेचा प्रचारासाठी अथवा व्यावसायिक उपयोग करुन घेण्याची प्रवृत्ती वाढली. मात्र लोकांना 'शिक्षित' करण्यासाठी, सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी या माध्यमाचा उपयोग होऊ शकतो हे काही पुरोगामी, सुधारणावादी दिग्दर्शकांच्या लक्षात आल्यावरच या माध्यमाचा 'वास्तवा'कडे प्रवास सुरु झाला असं म्हणता येईल.
'जे आहे आणि जसे आहे तसे दाखवणे', अशी जर वास्तवाची व्याख्या केली तर वास्तवाची मक्तेदारी बहुधा माहितीपट, वृत्तचित्रे, लघुपट आदिंकडे जाईल. ७ जुलै १८९७ रोजी भारतात ल्युमिए बंधूंचे 'द सी बाथ', 'अरायव्हल ऑफ द ट्रेन', 'अ डिमॉलेशन', 'लिव्हिंग द फॅक्टरी' आदि लघुपट दाखवले होते ते सर्वच तसे पाहिल्यास वास्तववादी ठरतात. १९०१ साली सावे दादांनी बनविलेले ' द रिटर्न ऑफ रँगलर परांजपे' आणि त्यानंतर फाळक्यांनी तयार केलेला 'ग्रोथ ऑफ अ पी प्लँट' हे दोन लघुपट म्हणजे भारतीय वृत्तचित्र आणि माहितीपटांची आद्य उदाहरणे म्हणता येतील. मात्र 'रिअॅटलिझम' (वास्तववाद) आणि 'डॉक्युमेंटेशन' (दस्तावेजीकरण) यात मूलतः फरक आहे. चित्रपटांसंबंधी 'वास्तवता' या शब्दाचा प्रत्यक्ष वापर होण्याच्या फार आधीपासूनच माहितीपटांमधून प्रत्यक्ष वास्तव दाखविले जात होते. तरी ही वास्तवता म्हणजे प्रत्यक्षातील वास्तवाची पडद्यावरील यांत्रिक पुनर्निर्मिती होती. 'कथापट' आणि 'माहितीपट' यांमधील हा फरक फार महत्वाचा आहे. केवळ 'वास्तवाचे दर्शन' हा कथापटांचा हेतू नसतो. या वास्तवाची कारणे शोधणे, त्यांच्या परिणामांचा धांडोळा घेणे आणि त्या निमित्ताने अखेर मानवी स्वभावाच्या, सामाजिक प्रवृत्तीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणे हा कथापटांचा उद्देश असतो. या उद्देशांचा विसर पडल्याने अनेक कथापटांना माहितीपटांचे स्वरुप आल्याचे चित्रपटांच्या इतिहासात दिसून येईल. त्याबरोबरच एखाद्या कथापटापेक्षाही अधिक परिणाम साधणारे माहितीपट निर्माण झाल्याची उदाहरणेही सापडतील. परंतु प्रस्तुत सूचीचा उद्देश अधिकृतपणे 'फिचर फिल्म' म्हणून प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रपटांची यादी तयार करणे हा असल्याने माहितीपट/लघुपट्/वृत्तचित्र चळवळीचा येथे विस्ताराने विचार केलेला नाही.
प्रतिक्रिया
5 Jan 2012 - 12:34 pm | सुनील
वाचत आहे.
5 Jan 2012 - 12:41 pm | सुहास झेले
व्वा व्वा... मस्त सुरुवात !!
आता पुढचे भाग लवकर लवकर येऊ द्यात.
5 Jan 2012 - 12:44 pm | स्पा
असेच म्हणतो....
5 Jan 2012 - 1:15 pm | अन्या दातार
पुभाप्र
याच वास्तववादाचा आधार घेऊन श्रीकांत बोजेवार यांनी लिहिलेल्या "तंबी दुराई" या मालिकेचे भाग आठवले.
5 Jan 2012 - 1:20 pm | गणपा
वाचतोय..........
5 Jan 2012 - 3:37 pm | मन१
+१
7 Jan 2012 - 9:35 pm | पैसा
सवडीने वाचायला मागे ठेवला होता. ग्रंथपाल, धन्यवाद! मस्त चाललंय!
7 Jan 2012 - 11:12 pm | धनंजय
वा
8 Jan 2012 - 12:53 am | बिपिन कार्यकर्ते
+१
9 Jan 2012 - 2:13 pm | प्रभाकर पेठकर
चित्रपट कलेचा वास्तववादी परामर्ष अत्यंत बोधक आणि रंजक आहे. श्रीकांत बोजेवार ह्यांच्या अभ्यासक वृत्त्तीचे मनोहारी दर्शन प्रस्तावनेत दिसून आले.
प्रत्यक्ष पुस्तकाच्या प्रतिक्षेत आहे.
10 Jan 2012 - 4:11 pm | गणपा
पुढला भाग कधी येतोय?