द्वितीय महायुद्ध व त्याचे परिणाम
द्वितीय महायुद्धात भारताचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता, त्यामुळे त्याची फारशी झळ भारतीय समाजजीवनाला बसली नाही. मात्र जे देश या युद्धात भरडले गेले, पोळले गेले त्यांच्या एकूण आयुष्यावर, जगण्यावर या युद्धाचे दूरगामी परिणाम झाले. त्यांच्या जीवनविषयक जाणिवा बदलल्या. या युद्धामुळे अनेक लोक बेघर झाले, कुटुंबातील सदस्य एकमेकांपासून दुरावले आणि मुख्य म्हणजे मृत्यूविषयी एक प्रकारची बेफिकिरी निर्माण झाली. एकमेकांविषयीचा अविश्वास वाढीला लागला. माणुसकीवरचा विश्वास उडाला आणि जपानवर अमेरिकेने टाकलेल्या अणुबाँबचा धसका घेऊन तिसर्या महायुद्धाची भीती कायमची मानगुटीवर बसली. या सर्व घटनांचे, परिस्थितीचे, मानसिकतेचे प्रतिबिंब चित्रपटात पडणे अपरिहार्य होते. युद्धापूर्वी युरोपियन प्रेक्षकांवर हॉलीवूडच्या चित्रपटांचा मोठा पगडा होता, परंतु युद्धानंतर युरोपमधील प्रेक्षकांच्या बदललेल्या मानसिकतेला रुचतील, पटतील, आपलेसे वाटतील असे चित्रपट देणे हॉलीवूडला कठीण झाले. परंतु युरोपीय देशांत मात्र त्यामुळे चित्रपटांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी लाभलेले, वास्तव सुखदु:खांचे अस्वस्थ चित्रण करणारे दिग्दर्शक पुढे आले. चित्रपटांत वास्तववाद त्यापूर्वीही होता परंतु प्रत्यक्ष होरपळीतून, अनुभवातून प्राप्त झालेली प्रहार करण्याची, ओरबाडण्याची ताकद त्यात अभावानेच होती. त्यामुळेच नव्याने अस्तित्वात आलेल्या या वास्तववादी चित्रपटांना 'नववास्तववादी' (निओ रिअॅलिस्टिक) असे नाव प्राप्त झाले. युद्धाच्या पार्श्वभूमीवरील युद्धाचे दुष्परिणाम दाखविणारे चित्रपट हॉलीवूडमध्येही त्या काळात निर्माण झाले परंतु हॉलीवूडच्या आणि युरोपीय चित्रपटांत एक मूलभूत फरक दिसून येतो. या प्रकारच्या हॉलीवूडी चित्रपटात मुख्यतः प्रियकर-प्रेयसी यांची युध्दामुळे झालेली ताटातूट, त्यांचा विरह, एकमेकांची भेट घेण्याचा प्रयत्न यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते तर इटालियन अथवा अन्य युरोपियन चित्रपटांत उद्ध्वस्त समाजजीवन, बदललेल्या जीवननिष्ठा, युध्दामुळे उद्भवलेल्या समस्या, अनेकांना भोगावा लागत असलेला सक्तीचा एकांतवास, युध्दाचा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम असे अनेक विषय आले. चित्रपटांत पडलेले जगण्याचे प्रतिबिंब असे एकुण त्याचे स्वरूप होते व त्यामुळे चित्रपट हि केवळ मनोरंजनाची कला नसून, वास्तव परिस्थितीचे आकलन करण्याचा प्रयत्न त्याद्वारे होऊ शकतो याचा प्रत्यय येऊ लागला आणि हि कामगिरी केली नव वास्तववादाने.
नव वास्तववाद
नव वास्तववादाचा परिचय झाला तो इटालियन दिग्दर्शक वित्तोरियो 'डि' सिका यांच्या चित्रपटांमुळे. 'डि' सिकाचा पहिला चित्रपट युद्धकाळात म्हणजे १९४२ साली आला होता, त्याचे नाव होते 'द चिल्ड्रेन आर वॉचिंग अस' आईवडिलांच्या वैवाहिक आयुष्यातील विसंवादाचा मुलांच्या कोवळ्या मनावर कसा विपरीत परीणाम होऊ शकतो हे 'डि'सिकाने यात प्रभावीपणे सांगितले होते. त्यांनतरच्या चार पाच वर्षात युद्धज्वर वाढत गेला. आर्थिक ओढग्रस्ती, बेकारी यांनी युरोपातील जनजीवन त्रस्त झाले आणि चोर्यांचे प्रमाणही प्रचंड वाढले. इटलीतील या जीवनाचे चित्रण डिसिकाने आपल्या 'बायसिकल थीव्हज' (१९४८) या चित्रपटात केले होते. घरातील वस्तू विकून एक बेकार कामगार सायकल विकत घेतो कारण पोस्टर चिटकवण्याच्या सरकारी नोकरीसाठी 'मालकीची सायकल असणे' ही प्रमुख अट असते. त्याची सायकल चोरीला जाते. चोराला पकडण्याचे सायकल परत मिळवण्याचे सर्व प्रयत्न फसल्यावर निरुपायाने तोच मग दुसर्याची सायकल चोरण्याचे प्रयत्न करतो आणि स्वतःच्या मुलासमोरच चोर ठरण्याची नामुष्की त्याच्यावर येते. 'शू शाईन बॉईज' (१९४६) व 'अंबर्टो डी' (१९५१) या त्याच्या अन्य चित्रपटांतही युद्धानंतर निर्माण झालेल्या समस्यांचेच चित्रण असले तरी 'बायसिकल थीव्हज' हा एक प्रकारे त्या काळाचे 'डाक्युमेंटेशन' करण्याचे काम करणारा चित्रपट ठरला. १९४९ च्या सुमारास इटलीतील राजकीय वातावरण बदलले. सामाजिक अथवा राजकीय त्रुटींवर बोट ठेवणार्या चित्रपटांवर 'साम्यवादी विचारांनी' प्रेरित असा शिका बसू लागला तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या शोधात डिसिका हॉलीवूडकडे वळला.
ज्या जपानचे युद्धामुळे सर्वात जास्त नुकसान झाले तिथे चित्रपटांवर, त्यातील विषयांवर याचा प्रभाव दिसणे ओघाने आलेच. परंतु युद्धविरोधी प्रचार करणार्या तेथील अन्य चित्रपटांच्या तुलनेत दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांचे मनोविश्लेषणात्मक, प्रतिकात्मक चित्रपट अधिक परिणामकारक ठरले. १९५० साली आलेला त्यांचा 'राशोमान' हा याबाबतीत मैलाचा दगड ठरला. गोष्ट सांगण्याची परंपरागत चौकट मोडून मनुष्यस्वभावाचे वेगवेगळे व विचित्र पैलू सांगतानाच त्यांनी एखाद्या घटनेकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन कसा वेगळा व स्वहेतूने प्रेरित असू शकतो हेही त्यात दाखवून दिले होते. मात्र भारतीय दिग्दर्शक व प्रेक्षकांना 'राशोमान' मागाहून पाहायला मिळाला. त्यांच्यावर सर्वप्रथम प्रभाव पडला तो इटालियन दिग्दर्शक डिसिकाच्या 'बायसिकल थोव्हज' या चित्रपटाचा आणि नव वास्तववादाची वाट चोखाळणार्या अन्य युरोपीय दिग्दर्शकांचा.
पहिला चित्रपट महोत्सव
भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १९५२ साली मुंबईत झाला. नव वास्तववादी शैलीतील चित्रपटांचा एक वेगळा विभागच यावेळी पाहावयास मिळाला, परंतु त्यापैकी 'बायसिकल थोव्हज' च्या सादरीकरणातील निरागस सहजता, आशयाची खोली, साध्या प्रसंगातून मोठा अर्थ सांगण्याची कुवत आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे आजूबाजूच्या जीवनातील विषय चित्रपटासाठी निवडण्याचे नाविन्य या सर्वांचा प्रभाव भारतीय दिग्दर्शकांवर पडला. आपण समजतो त्यापेक्षा या माध्यमाची ताकत कितीतरी जास्त आहे आणि त्याचा कसा उपयोग होउ शकतो याचा साक्षात्कार झाल्यावर त्याचा प्रभाव ज्यांच्या चित्रपटात जाणवला त्यापैकी प्रमुख दिग्दर्शक होते सत्यजित राय, विमल रॉय व राज कपूर. 'बूटपॉलिश'(१९५४) या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून जरी प्रकाश अरोरा यांचे नाव झळकले असले तरी तो चित्रपट राज कपूरचाच समजला जातो. 'बूटपॉलिश' आणि 'जागते रहो' (१९५६) या दोन्ही चित्रपटांछी प्रकृती राज कपूरच्या अन्य चित्रपटांपेक्षा सर्वस्वी वेगळी आहे. याचे श्रेय 'बायसिकल थोव्हज' च्या त्याच्या प्रभावाला दिले जाते. रस्त्यावरील बेवारस मुलांचा प्रश्न त्यांना योग्य दिशा दाखवली जाण्याची गरज 'बूटपॉलिश' मध्ये ठसवण्यात आली होती. व्यावसायिक चित्रपटांच्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नव्हता. बिमल रॉय यांनी व्यावसायिक चित्रपटांमधील मेलोड्रामा व संगीत हे दोन्ही घटक कायम ठेवून भूमिहीन शेतकर्यांच्या सावकार जमिनदारांकडून होणार्या पिळवणूकीची कथा ' दो बिघा जमीन' मधून (१९५३) समोर ठेवली. शंभू महातो हा बिहारमधील गरीब शेतकरी! त्याच्याकडे जी अल्पशी जमीन असते ती सावकराकडे गहाण ठेवलेली असते. ती सोडवून घेण्यासाठी शंभू कलकत्त्याला येतो व तेथे रि़क्षा ओढण्याचे काम करू लागतो. वास्तव पार्श्वभूमी, वास्तव व्यक्तिरेखा व अनेक वास्तव प्रसंगांनी भरलेल्या या कथानकात पुढे 'भावनाट्य' गडद करणार्या घटना घडत जातात. परंतु दारिद्र्य पिळवणूक यांचे दर्शन, पारंपरिक प्रणयी व्यक्तीरेखांपासून फारकत, विवाहित नायक-नायिका असे चौकटी मोडणारे अनेक घटक या चित्रपटात होते. त्यामुळे लोकप्रिय असूनही तो वेगळा ठरला आणि 'बायसिकल थीव्हज्'च्या प्रेरणेतून जन्मलेला आणखी एक चित्रपट तयार झाला.
सत्यजित राय यांच्या 'पथेर पांचाली'चे नाव 'बूटपॉलिश' व 'दो बिघा जमीन' या चित्रपटआंबरोबरच घेतले जात असले व या तिन्ही चित्रपटांची निर्मिती एकाच प्रभावातून झाली असा उल्लेख वारंवार केला जात असला तरी 'पथेर पांचाली' हा चित्रपट अन्य दोन्ही चित्रपटांच्या तुलनेत वेगळा आणि अधिक महत्त्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे परंपरा झुगारण्याची सुरुवात हा चित्रपट 'कथा' नाकारण्यापासूनच करतो. चित्रपटांना असते तशी 'गोष्ट' या चित्रपटात नाही. आहेत त्या केवळ व्यक्तीरेखा. एक दरिद्री कुटुंब, कुटुंब प्रमुखाची कुटुंबाला जगविण्याची धडपड, आई वडिलांच्या काळज्यांपासून मुक्त असलेले निरागस बहिण-भावंडांचे एक विश्व आणि म्हातार्या इंदिरा ठाकुरनची चटका लावणारी व्यक्तीरेखा. बंगालमधील एक खरेखुरे दरिद्री कुटुंब आपण पाहतो आहोत, हा चित्रपट नसून डोळ्यांपुढे घडत असलेले एक वास्तव आहे असा आभास हा चित्रपट निर्माण करतो. जीवनात, प्रत्यक्ष जगण्यात जे नाट्य असते ते एखाद्या रचलेल्या कथानकापेक्षाही अधिक आव्हानात्मक असते याचा प्रत्यय देणारा हा चित्रपट खर्या अर्थाने भारतीय वास्तववादी चित्रपटांचा प्रणेता ठरला. दुर्गा, अपू, सर्वजया, हरिहर, इंदिरा ठाकुरन या त्या चित्रपटातील व्यक्तीरेखा सर्वांना जवळच्या, आप्तांसारख्या वाटू लागल्या. 'बायसिकल थीव्हज'ने प्रेरणा दिलेल्या या प्रारंभिक चित्रपटांतून भारतात चित्रपटांचे दोन वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. त्यापैकी एक होता वेगळ्या आशयाचा, व्यावसायिक परंपरांशी फटकून वागणार्या चित्रपटांचा. मात्र या चित्रपटांचा प्रवाह आधी केरळ, कर्नाटक या राज्यांत वाहत गेला व १९७० च्या सुमारास हिंदी चित्रपटसृष्टीत अवतरला. दरम्यानच्या १५ वर्षांच्या काळात 'सेमी कमर्शियल' किंवा 'सेमी एक्सपेरीमेंटल' चित्रपटांचा एक प्रवाह हिंदीत अस्तित्वात आला. या चित्रपटांनीच प्रेक्षकआंची मनोवृत्ती तयार करण्याचे, त्याला 'सिनेमेटेकली' प्रशिक्षित करण्याचे, त्याच्या अभिरूचीला वेगळे वळण देण्याचे काम केले. याच मशागत झालेल्या भूमीवर मृणाल सेन यांच्या 'भुवन शोम' मुळे वास्तववादी चित्रपटाची बीजे 'अंकुर'ली! परंतु त्यापूर्वीच्या पंधरा वर्षात या वास्तववादाकडे जाणारा रस्ता तयार करणारे जे चित्रपट आले त्यांची ओळखही आवश्यक आहे.
वास्तववादाकडे...
जनमानसात लोकप्रिय असणारे अभिनेते-अभिनेत्री, गीत-नृत्यांची बहार आणि ठराविक चौकटीतील कथानके ही आपल्या व्यावसायिक चित्रपटांची ठरलेली वैशिष्ठ्ये. यापैकी नायक-नायिका म्हणून लोकप्रिय अभिनेता-अभिनेत्री व संगीत हे दोन घटक कायम ठेवून कथानकाच्या बाबतीत मात्र काही धाडसी, अभिनव प्रयोग करण्याचा प्रयत्न १९५२ नंतर बर्याच प्रमाणात झाला. बिमल रॉय यांच्यासोबतच गुरूदत्त, ह्रषिकेश मुखर्जी, बासू भट्टाचार्य, बी.आर.चोपडा, झिया सरहदी, ख्वाजा अहमद अब्बास असे दिग्दर्शक या वेगळ्या पटडीत सहभागी झाले. व्ही.शांताराम यांनीही 'दो आखे बारह हाथ'सारख्या चित्रपटांद्वारे आपली प्रयोगशीलता व आधुनिक दृष्टी टिकवून ठेवली होती. सुदैवाने या दिग्दर्शकांच्या चित्रपटाला यशही मिळत होते. झिया सरहदी, ए.के.अब्बास यांसारख्या काही दिग्दर्शकांवर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता व भांडवलशाहीत पिळल्या जाणार्या शोषीतांची बाजू पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न ते करीत होते. रशियन साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव बहुतांश सुशिक्षितांवर त्या काळी होता आणि खुद्द पंतप्रधान नेहरू ज्या भावी भारताची स्वप्ने पाहत होते त्यालाही या विचारसरणीची थोडी किनार होती. भाषणबाजीच्या, उपदेशांच्या मोहात पाडणारी ही विचारसरणी आणि नेहरूंच्या डोळ्यांनी सामान्य भारतवासी पाहत असलेली स्वप्ने यांना प्रणयाची, गरीब व गरीबीच्या उदात्तीकरणाची जोड देऊन त्याचा व्यावसायिक चित्रपटांसाठी सुयोग्य वापर करण्याची, काही सामाजिक प्रवृत्तींवर प्रहार करण्याची हुशारी राज कपूरने दाखवली व त्याकाळी लेखक म्हणून खुद्द ए.के.अब्बास यानांच त्याने हाताशी धरले. त्यातूनच 'आवारा', 'श्री ४२०' चित्रपटांचा जन्म झाला.
त्याचवेळी बिमल रॉय मात्र कोणत्याही विचारसरणीचा आग्रह न धरता प्रणयाची व्यावसायिक चौकट स्वीकारूनही अस्पृश्यतेसारखे (सुजाता) विषय हाताळीत होते. त्यांच्या चित्रपटात काही सामाजिक जाणीव होती. चित्रपटाचा कला म्हणून वापर, कॅमेर्याचा कौशल्यपूर्ण वापर आणि आपली कथा दृश्यात्मक शैलीत मांडण्याची हातोटी ही या वेगळ्या चित्रपटांची वैशिष्ट्ये होती. शिवाय मुद्राभिनयात वाकबगार असलेल्या संवेदनशील कलावंतांची त्यांना साथ होती. त्या काळातील अनेक चित्रपट आज केवळ त्यातील गाण्यांच्या जोरावर स्मरणात राहिलेले असतानाच वर उल्लेख केलेल्या दिग्दर्शकांचे चित्रपट अद्याप आपला आशयात्मक प्रभाव टिकून आहेत याचे कारण त्या दिग्दर्शकांचा चित्रपटाकडे पाहण्याचा वेगळा व आधुनिक दृष्टिकोन, चित्रपट माध्यमाची त्यांना असलेली जाण हेच आहे.
या दोघांपेक्षाही गुरूदत्तचा 'प्यासा' वेगळा ठरतो. कारण त्यातील व्यथा व्यक्तीकडून समष्टीकडे जाणारी आहे. तसे पाहिल्यास विजय नामक कवीची शोकांतिका असे या चित्रपटाचे स्वरूप आहे परंतू मानवी प्रवृत्ती, सामाजिक प्रवृत्ती आणि विद्यमान समाजव्यवस्थेबद्दलचा कमालीचा रोष असे आणखी महत्वाचे असे अन्य घटकही त्याच्या चित्रपटात दिसून येतात. एक तंत्र म्हणून चित्रपटासाठीची प्रकाशयोजना, दृश्यविभागणी, दृश्य चौकटी आणि पटकथा लेखन याबाबत 'प्यासा' हा चित्रपट अन्य चित्रपटांच्या मैलोगणती पुढे होता. 'कागज के फुल'मध्ये चित्रपट दिग्दर्शकाची शोकांतिका मांडतानाही मानवी स्वभावाचे अनेक पैलू उघड होतात तर 'साहिब बीवी और गुलाम'मध्ये सरंजामी व्यवस्थेतील स्त्रीच्या अंतर्मनातील दु:खे वेशीला टांगण्याचे काम दिग्दर्शक करतो. 'साहिब बीवी और गुलाम'चा दिग्दर्शक गुरूदत्त नसला तरी त्यावर त्याच्या अस्तित्वाची छाप मात्र स्पष्ट दिसते. ह्रषिकेश मुखर्जी, बासू भट्टाचार्य हे याच काळात आले आणि चौकटीत न बसणारे व्यावसायिक चित्रपट काढण्याचा हा परिपाठ त्यांनी पुढे सुरू ठेवला. मात्र दरम्यान 'पथेर पांचाली'च्या प्रभावातून केरळ, कर्नाटक व पश्चिम बंगाल या राज्यांमधे आधी फिल्म सोसायटी चळवळ सुरू राहिली व या चळवळीद्वारे आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे जे संस्कार झाले त्यातून दिग्दर्शकांची एक नवी पिढी उदयाला आली होती. पठडीतल्या व्यावसायिक चित्रपटांपासून अधिक फटकून असणारा विषय, सादरीकरण, कथानक, अभिनय यात वेगळेपण असणारा, प्रयोग करू इच्छिणारा, समाजव्यवस्थेतील, कुटूंबव्यवस्थेतील, पती-पत्नीच्या पारंपारिक नात्यातील तृटी दाखवू इच्छिणारा सुशिक्षित, सिनेमॅटिक परिभाषेची जाण असणारा हा दिग्दर्शकांचा नवा वर्ग होता.
प्रतिक्रिया
13 Jan 2012 - 7:00 pm | पैसा
उत्तम प्रस्तावना आणि विश्लेषण. ग्रंथपाल, पुन्हा धन्यवाद!
13 Jan 2012 - 7:15 pm | बिपिन कार्यकर्ते
वाचतोय!
14 Jan 2012 - 8:50 am | प्रचेतस
उत्तम प्रस्तावना.
14 Jan 2012 - 6:50 pm | सुहास झेले
मस्त... अनेक जुन्या चित्रपटांची ओळख नव्याने होतेय. बायसिकल थीव्हजचा ट्रेलर बघितला, प्रचंड आवडला आणि भिडला. बघतो कुठे मिळतोय पुर्ण सिनेमा...
मिपाचे मनापासून आभार ह्या उपक्रमासाठी... !!!
14 Jan 2012 - 7:37 pm | जाई.
बायसिकल थीव्ह माझ्या आवडत्या चित्रपटापैकी एक
छान विश्लेषण केले आहे
15 Jan 2012 - 12:38 pm | बबलु
उत्तम प्रस्तावना.
9 Feb 2012 - 3:38 pm | गणपा
नवीन भाग कधी येतोय?
14 Apr 2012 - 9:43 am | चौकटराजा
इतक्या अभ्यासपूर्ण , सम्यक लेखाविषयी प्रतिक्रिया इतक्या तोकड्या व कमी पाहून वाईट वाटले. अर्थात मी वास्तव वादी व मनोरंजक या दोन
बाजूंच्या मध्याचा पुरस्कर्ता असल्याने बासू चटरजी, वि वि चोप्रा, ह्र्षिदा , अशासारखे दिग्दर्शक मला आवडले .करायचा कलात्मक चित्रपट असा आव आणून केलेले संथ संवाद , संथ पटकथा उगीचच रेंगाळणारे कॅमेरे अति अंधारी प्रकाश योजना असलेले मला आवडले नाहीत मग ते कितीही नामांकिताने केलेले असोत.
मला आवडलेले चित्रपट- अ वेडनेस डे, इत्तफाक, काबुलीवाला, दोस्ती, एक रुका हुआ फैसला , जगाच्या पाठीवर, प्रपंच, सिहासन, शांतता कोर्ट ...
ई. ई.
दुसरे महायुद्ध, सामाजिक आर्थिक विषमता , संगीत, ई चे परिणाम झाल्याचे आपले निरिक्षण दाद देण्यासारखे.