बीटलमेनिया - १ -> Norwegian Wood

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
1 Jan 2012 - 10:47 pm

बीटलमेनिया - १

लिवरपूलच्या क्वॅरी बँक शाळेतला १६ वर्षांचा जॉन लेनन, पंधरा वर्षांचा पॉल मॅकार्टनी आणि १४ वर्षांचा जॉर्ज हॅरिसन १९५७ मध्ये एकत्र आले. त्यांच्याबरोबर जॉनचा आणखी एक मित्र स्टुवर्ट 'स्टु' सॅट्क्लिफदेखिल होता. चौघांनाही गायक-संगीतकार बडी हॉली आवडायचा. त्याचा ग्रूप होता 'द क्रिकेट', मग त्या नावासारखंच नाव म्हणून त्यांनी स्वतःच्या ग्रूपचं नाव 'द बीटल' ठेवलं जे पुढे 'द बीटल्स' असं निश्चित झालं. सुरूवातीला या ग्रूपमध्ये कुणीच ड्रमवादक नव्हता तेव्हा पीट बेस्ट त्यांना साथ द्यायचा पण तो रेग्युलर ड्रम्सवर नसायचा त्यामुळे रिंगो स्टार यांच्यात दाखल झाला आणि बीटल्स एक परिपूर्ण बँड म्हणून क्लब संगीतात लोकांसमोर आले. याच दरम्यान 'स्टु'ने बँड सोडला आणि तो जर्मनीत चित्रकलेच्या पुढच्या शिक्षणासाठी गेला आणि बीटल्स मुख्यतः जॉन, पॉल, जॉर्ज आणि रिंगो यांचा ग्रूप झाला. यात गीतलेखनाची जवाबदारी प्रामुख्याने जॉन आणि पॉलने सांभाळली, जॉन गिटार वाजवायचा नि तो बीटल्सचा म्होरक्या गायक होता, त्याला पॉल आणि जॉर्ज साथ द्यायचे (बॅकिंग व्होकल), ड्रम्सवर रिंगो, बॅस गिटार पॉलची आणि लीड गिटार जॉर्जची अशी विभागणी झाली. पुढे जॉर्जही गीतलेखन करू लागला, गाणी म्हणूही लागला.

वेगवेगळ्या क्लब्ज मध्ये संगीताचे कार्यक्रम करून बीटल्सनी सुरूवात केली. ब्रिटनमधून ते युरोपात विशेषतः जर्मनीमध्ये कार्यक्रम करू लागले. क्लबसंगीतामध्ये ते लोकप्रिय होऊ लागताच इएम्आय रेकॉर्ड्सने त्यांच्याशी करार केला आणि त्यांच्या अनेक सिंगल्स बाजारात आणल्या. बीटल्सची लोकप्रियता चिकार वाढू लागली आणि १९६२-६३ सालात तो ब्रिटनमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ग्रूप बनला. त्यावेळी आणि त्यानंतर त्यांनी अनेक अप्रतिम गाणी दिली आणि त्यांची लोकप्रियता युके किंवा युरोपपुरती मर्यादित न राहता पार जगभरात पोहोचली. अमेरिका, आशियाच नव्हे तर अगदी आफ्रिकेतही बीटल्सचे चाहते निर्माण झाले. हा सिलसिला ७० सालापर्यंत सुरू होता. या काळातल्या बीटल्सच्या गाण्यांनी लोकांवर प्रचंड गारूड केलेलं की त्यालाच 'बीटलमेनिया' हे नाव मिळालं.

म्हणून २०१२ या नवीन वर्षामध्ये 'द बीटल्स'च्या उत्तमोत्तम गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी सुरू करत असलेल्या या नव्या लेखमालेलाही 'बीटलमेनिया' हेच नाव देत आहे आणि सुरूवात त्यांच्या 'Norwegian Wood' या गाण्याने करत आहे.

बीटलमेनिया - १ -> Norwegian Wood

१९६५ साली आलेल्या बीटल्सच्या 'Rubber Soul' नावाच्या अल्बममध्ये त्यांचं 'Norwegian Wood' हे गाणं आहे. बीटल्सची गीतकार म्हणून दोघांचं नाव देण्याची पद्धत होती. हे गाणं मूळ जॉनने लिहिलेलं असलं तरीही क्रेडिट लेनन-मकार्टनी असं संयुक्त आहे.

हे गाणं तसं वैशिष्ट्यपूर्णच मानलं पाहिजे. यात पहिल्यांदाच गाण्यात जॉनने एक संपूर्ण गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका ठिकाणी तो स्वतःच म्हणतो की ६५ मध्ये आपली पहिली पत्नी सिन्थियाबरोबर स्विट्झर्लंडमध्ये सुट्टीसाठी गेलो असताना मी हे गाणं लिहायला घेतलं. त्या दरम्यान माझं एका मुलीबरोबर प्रेमप्रकरण होतं. मी ते सिन्थियाला सांगू शकत नव्हतो मग त्याबद्दल मी या गाण्यात काय घडलं ते लिहिलं. पण नेमकं कोणाबद्दल हे गाणं आहे, ती मुलगी कोण होती हे मला आठवत नसल्याने मी सांगू शकत नाही.

या गाण्याचा सहलेखक पॉल मात्र याबाबत म्हणतो की ते अगदी काल्पनिक गाणं असावं पण जॉन काही तरी रंगवून त्याच्या प्रकरणाबद्दल सांगतो. त्या काळात लोकांकडे सजावटीचं फर्निचर अगदी साध्याशा पाईन लाकडाचं असायचं, त्याला नॉर्वेजियन लाकूड म्हणायचे. मग आम्ही असं नॉर्वेजियन लाकडाचं फर्निचर असलेलं घर कल्पलं. त्या घरात ती मुलगी त्याला घेऊन येते, तिथे त्याला टबमध्ये झोपावं लागतं आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ती घरात नसते तर तो घरात आग लावतो. आम्हाला एकूणच गाणं काहीसं विनोदी करून त्यातही काहीतरी सूड घेतल्याचं दाखवायचं होतं मग आम्ही गीतलेखन असं केलं की वाटावं त्याने घरालाच आग लावलीय.

या काळात पाश्चात्य संगीताच्या दुनियेला भारतीय संगीताची ओळख होत होती. भारतीय संगीताबद्दल युरोपात, विशेषतः ब्रिटनमध्ये खूप जिज्ञासा होती. या जिज्ञासेपोटी बीटल्सचा लीड गिटारिस्ट जॉर्ज हॅरिसन सतारीकडे ओढला गेला होता. या गाण्याचं संगीत बनवताना त्याने अ‍ॅकॉस्टिक गिटारच्या बरोबरीने चाणाक्षपणे सतारीचा प्रयोग केला आणि या गाण्याला एक वेगळेच परिमाण मिळाले. जॉर्ज रवीशंकरांकडे सतार त्यानंतर काही वर्षांनी शिकला पण तेव्हा नुकत्याच विकत घेतलेल्या साध्याशा सतारीवर शोधून शोधून त्याने हवे असलेले सूर काढले आणि या गाण्यात पाश्चात्य संगीतात प्रथमच भारतीय सतार निनादली आणि अगदी चपखल बसली. नंतरही बीटल्सने असे प्रयोग केले आहेत पण रॉक सगीतात सर्वप्रथम सतार याच गाण्यात वाजली.

'Norwegian WooD' गायलंय जॉन लेननने आणि साथ केलीय पॉल मकार्टनीने. अ‍ॅकॉस्टिक गिटार जॉनची तर बॅस गिटार पॉलची आहे आणि सतार जॉर्जने वाजवली आहे. रिंगोने तालवादन केलंय कारण या गाण्यात ड्रम्स नाहीत.

तर 'द बीटल्स'च्या 'Norwegian Wood' चा आनंद घेऊन बीटलमेनिया समजून घेण्याची सुरूवात करूया!

'Norwegian Wood' हे गीत असं आहे

I once had a girl, or should I say, she once had me...
She showed me her room, isn't it good, norwegian wood?

She asked me to stay and she told me to sit anywhere,
So I looked around and I noticed there wasn't a chair.

I sat on a rug, biding my time, drinking her wine
We talked until two and then she said, "It's time for bed"

She told me she worked in the morning and started to laugh.
I told her I didn't and crawled off to sleep in the bath

And when I awoke, I was alone, this bird had flown
So I lit a fire, isn't it good, norwegian wood.

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

अभिजीत राजवाडे's picture

2 Jan 2012 - 2:28 am | अभिजीत राजवाडे

बिटल्स माझा हि आवडता बँड आहे. तशी मला बरिच गाणि आवडतात पण त्यातल्या त्यात
Yellow Submarine आणि All my loving हि मला आवडतात. पुढच्या भागाची वाट पाहतोय.

येलो सबमरीनविषयीच लिहायला आलो होतो. तुम्ही आधीच लिहिलेलं बघून आनंद झाला. येलो सबमरीनने बीटल्स ऐकण्याची सुरुवात झाली.. मग आय वाँट टू होल्ड युअर हँड.. लव्ह मी डू..विथ लव्ह फ्रॉम मी टू यू.. आणि एकदम खजिनाच उलगडला. माझ्या बाबांच्या प्रचंड तबकडीसंग्रहाबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार..

:)

बीटल्सची गाणी म्हणजे काय महाराजा.. साधे सोपे आणि थोडेसेच शब्द.. बडबडगीतासारखे. . संगीतही साधंच.. पण ओव्हरऑल इफेक्ट असा की कोणीही एकदा ऐकलं की दिवसभर तेच गुणगुणत रहावं.

बीटल्सची गाणी आता इतकी "सोज्वळ" वाटतात की ती आली तेव्हा एक बंडखोरी त्यांना चिकटवली गेली होती आणि अतिशय बिघडलेल्या पिढीचं गोंगाटवालं संगीत म्हणून त्याला लेबल लागलं होतं यावर अजिबात विश्वास बसत नाही.

प्रासभाऊ, बीटल्सना एकापेक्षा अधिक भाग दिलेस, इनफॅक्ट वेगळी सीरीजच बनवलीस ते चांगलं केलंस.. लगे रहो.. पुढच्या भागाची वाट पाहतोय..

(मजकडे असलेल्या एका तबकडीवर शुद्ध भारतीय संगीत (विथ तबला बाय श्री अनिल भागवत), असलेलं बीटल्सचं एक गाणं आहे.. हॅरिसनवरच्या भारतीय पगड्यामुळे अशी अनेक गाणी त्यांनी केली होती असं वाटतं.)

प्रास's picture

2 Jan 2012 - 11:01 am | प्रास

यल्लो सबमरीन हे माझंही आवडतं गाणं. खास रिंगोसाठी बनलेलं असल्यामुळे एकदम साधं आणि कुणीही गाऊ शकेल असं. रिंगोने ते म्हंटलंयही छान तेव्हा त्याबद्दल बीटलमेनियात काहीतरी येईलच याची खात्री बाळगा. :-)

(मजकडे असलेल्या एका तबकडीवर शुद्ध भारतीय संगीत (विथ तबला बाय श्री अनिल भागवत), असलेलं बीटल्सचं एक गाणं आहे.. हॅरिसनवरच्या भारतीय पगड्यामुळे अशी अनेक गाणी त्यांनी केली होती असं वाटतं.)

ते गाणं आहे (बहुतेक) 'Within You Without You' आणि या गाण्याबद्दल लिहिणारच आहे.

बीटलमेनियामुळे द बीटल्सला नवे फॅन मिळाले तर सार्थक होईल लिखाणाचे....

पुनश्च अभिप्रायाबद्दल आभारी आहे!

विदिन यू नसावं..

ते गाणं असं आहे:

लव्ह टू यू.. की लव्ह यू टू... आता फार दिवस झाले तबकडी ऐकून..प्लेअर नसल्याने आता ऐकले जात नाही.. :(

ईच डे जस्ट गोज सो फास्ट
आय टर्न अराउंड इट्स पास्ट.. (किंवा इन पास्ट चुभूदेघे)
यू डोंट गेट टाईम टू हँग अ साईन ऑन मी...

लव मी व्हाईल यू कॅन.. बिफोर आय अ‍ॅम डेड ओल्ड मॅन.. इ इ..

व्हिडीओ शोधता किंवा देता येत नाही.. तुनळी ब्लॉक.. :( यावरुन काही क्लू लागेल अशी आशा..

मी शोधून बघेन. शक्य झाल्यास त्यावरही लिहिता आलं तर बघेन....

बीटलमेनियासाठी तुम्हा दर्दींच्या सूचनांची आवश्यकता आहेच.

नंदन's picture

2 Jan 2012 - 2:31 am | नंदन

लेख अतिशय आवडला. अलीकडेच हारुकी मुराकामी ह्या जपानी लेखकाचे 'नॉर्वेजियन वूड' नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे, त्या संदर्भात ह्या गाण्याबद्दल ऐकलं होतं; मात्र ह्या गाण्याच्या नावाचं प्रयोजन लेख वाचूनच समजलं. बाकी भारतीय सतार, ब्रिटिश गायक, नॉर्वेजियन लाकडाचे फर्निचर आणि त्यातून जपानी लेखकाला मिळालेली प्रेरणा हा बटरफ्लाय इफेक्टसारखा क्रम रोचक आहे :)

आत्मशून्य's picture

2 Jan 2012 - 3:58 pm | आत्मशून्य

आपली रॉक संगिताची आवड सुरेखच, मजा आलि माहिती वाचायला.

पार्टनर's picture

2 Jan 2012 - 10:09 pm | पार्टनर

लेख अत्यंत आवडला.

माझ्या आवडीची गाणी म्हणजे : Let It Be आणि hey jude

या गाण्यांविषयी वाचायला खूप आवडेल.

पार्टनर