शिदोरी
घाटांतून वळणा वळणातून पसरलेली
हिरव्या निळ्या मोदकांची ताटे
त्यावर पांढरे शुभ्र बर्फ खोवून वाढलेले
नागमोडी शेवयांच्या दोर्या गच्च पकडून
शक्य तेवढ्या सगळ्या बाजुन्नी हिन्दकळत
नशा केल्यासारखी चाललेली बस
सृष्टी सौन्दर्य चाखून, पिऊन, ओरबाडून
टुन्न झालेली पन्धरा वीस डोकी
डोळ्यांत मावत नसलेले, शब्दांत गावत नसलेले
भराभरा पळणारे बेहोश क्षण
नंतर हवे तेव्हा स्मृतीच्या काळडोहांतून
जसे होते तसे बाहेर काढता येणार नाही
हे माहित असल्याने
कॆमेर्याच्या पटलावर आधाशासारखे कोरून ठेवलेले
कधी वाघा सिमेवर सैनिकांच्या संरक्षणात
शत्रूकडील बघ्यान्ना डिवचत केलेला मेरे देश की धरती नाच
कधी बियासच्या फेसाळत्या धारा दगडा दगडा मधून पेलत
रबरी बोटीत ठेचकाळून घेतलेली हाडे
कधी बरोबरच्या लहानग्याची लाधे कुत्न गोपाल कुत्न अशी बोबडारती
असे क्षण फितवून ठेवलेले एम व्ही आय फाइलीमधून
हजारो आठवणींची शिदोरी चित्रधारकात गच्च भरलेली.
सहल संपली तरी हवे तेव्हा तोच स्वाद पुन्हा पुन्हा देणारी...
मिळेल तसे इतरांचे चार निवांत क्षण चोरून
जरा उघडून दाखवावी म्हटले
आम्ही काय चाखले ते जरा बघा म्हटले
मय रज्जू पांडे... मय कहता हू... मयने ऐसा देखा..
पहिली दोन चित्रे जरा घोटाळली गेली असे वाटले
नंतरची दोन कदाचित न्याहाळली गेली असे भासले
अन त्या चित्रान्नी भराभरा उघडली गेली,
बघणार्या अनेक रज्जू पांडेंची स्मृती कवाडे
प्ले मोड एकामागून एक शिदोरीमधील मिठाया पटलावर वाढत होता
पटलावरील दृष्यान्मधून आरपार जाउन
एक रज्जू पांडे आपले दार्जिलिंग मसूरीचे मय पुराण ऐकवू लागला
दुसरा रज्जू पांडे त्याच्या लहानग्या बाळाचे बोबडबोलबच्चन टीव्हीवर मिरवू लागला
वाघा सिमेवरचा नाच केवळ हलू लागतो न लागतो तोच
एक रज्जू पांडे अमृता नातूच्या लावणीवर तिने मारलेली कडक शिट्टी ऐकून
गाणारीच कशी बेभान झाली होती
आणि मूळ लावणीपेक्षा तिची शिट्टीच कशी गाजली होती
ह्याचे मयपान इतर रज्जू पांडेन्ना करू लागली.
अनेक शिदोर्या हवेत उधळल्या जाऊ लागल्या
त्या शिळ्या कणांचे ठसके लागून सगळे रज्जू पांडे उबले गेले.
आपलीच कढी गोड कशी हे इतरान्ना चाखवू लागले
चित्रधारकाच्या मुसक्या आवळून
सहलीची शिदोरी बासनात बान्धली. फेसबुकावर हक्काच्या
दहा लाइक आणि चार वॉव, हाऊ ब्युटीफुल कमेंट्स
मिळवण्यासाठी नव्याने उघडली.
*****************************
प्रतिक्रिया
27 Dec 2011 - 7:04 pm | पैसा
बरेच दिवसानी आपली कविता वाचली. सुरुवातीचं सुरेख वर्णन, मधल्या भागातल्या चित्र दाखवणार्याच्या आणि बघणार्याच्या वेगळ्या भावना आणि शेवट काहीसा उपहास! छान जमलं आहे.
27 Dec 2011 - 7:20 pm | अरुण मनोहर
धन्यवाद
27 Dec 2011 - 7:22 pm | मदनबाण
मनोहर पंतांनी बर्याच दिवसांनी दर्शन दिल हाय तर! :)
छान कविता... :)
28 Dec 2011 - 7:26 am | इन्दुसुता
छानच.. आवडली