या लेखाचा पहिला भाग १२ ऑक्टोबर २०११ रोजी प्रकाशित केला होता.
भाग - २
१ जुलै १९७६ रोजी सुरु केलेली लोक बिरादरी प्रकल्पाची आश्रमशाळा ही या भामरागड भागातील पहिली शाळा होती. आदिवासी बांधवांना शाळा म्हणजे काय हे सुद्धा माहिती नव्हते. त्यामुळे स्वतःच्या मुलांना शाळेत पाठविण्यास आदिवासी तयार नव्हते. अनेक प्रश्न त्यांना पडायचे. कुठे नेणार आमच्या मुलांना? कशाला नेणार? काय शिकविणार? पळवून नाही ना नेणार? नरबळी ची भीतीपण होती त्यात. शाळेच्या पहिल्या वर्षी प्रकल्पातील कार्यकर्त्यांनी अनेक दिवस गावं-खेड्यात फिरून मोठ्या परिश्रमाने ५-६ गावातील २० मुलं शाळेकरिता जमा केलीत. बंदिस्त पणे एका चार भिंतीच्या खोलीत शाळा शिकविली असती तर कदाचित त्या काळात एकही मुलगा शाळेत बसला नसता. मुक्त पणे जंगलात फिरणाऱ्या आदिवासींना मुक्तपणेच शिक्षण द्यायचे ठरले. कधी नदीच्या काठावर. तर कधी मोठ्या वृक्षाच्या दाट सावलीत. तर कधी जंगलातील मोठ्या खडकावर शाळा सुरु झाली. अन्न-वस्त्रे आणि निवारा याचा संपूर्ण खर्च संस्था करायची. घरची किंवा पालकांची आठवण आली की ही मुल कोणालाही न सांगता घरी - गावाला पळून जायची. मग त्यांचा मागे आमच्या प्रकल्पातील कार्यकर्ते जायची. त्या काळात रस्ते नव्हते. २०-३० किलोमीटर चालत जावे लागायचे. गावात तो मुलगा नीट पोहोचला की नाही याची काळजी नेहमीच असायची. घरी जाऊन परत त्या मुलांना शाळेत आणायचे आणि समजवायचे. पहिले वर्ष हा त्रास आमच्या कार्यकर्त्यांना झाला. पहिल्या वर्षी असलेल्या २० मुलांपैकी अर्धी मुल मध्येच शाळा सोडून घरी पळून गेलीत ती कायमची. पण जी १० मुलं शाळेत राहिलीत - टीकलीत त्यांनी पुढील वर्षी आमच्या कार्यकर्त्यान बरोबर फिरून शाळेकरिता ४० मुलं गोळा केलीत. जी १० मुलं शाळेत टीकलीत त्यांचे वजन वर्षभरात चांगलेच वाढले. घरी ही मुलं अर्धपोटीच असायची. नुसतीच भाताची पेज असलेल्या जेवणामध्ये जीवनसत्वांचा अभाव असल्याने त्यांच्या बुद्धीचा विकास नीट होत नसे. रक्ताचे प्रमाण पण शरीरात कमी असायचे. प्रकल्पाच्या आश्रमशाळेत राहिल्याने या १० मुलांची तब्येत छान झाली होती. त्यांना घालायला नीट वस्त्रे आणि निवारा सुद्धा मिळाला होता. सोबतीला दवाखाना होताच. या सर्व सोई इथे त्यांना विनामोबदल्यात दिल्या गेल्या होत्या. हे सर्व या १० मुलांनी इतर गावातील मुलांना व पालकांना त्यांच्याच माडिया या बोली भाषेत समजावून सांगितले. त्यामुळे नंतर शाळेकरिता मुलं फिरून गोळा करावी लागली नाही. पहिल्या १० मुलांच्या तुकडी मधील एक विद्यार्थी पुढे शिकून नागपुरातून M.B.B.S. झाला. अजून पुढे शिकून त्याने स्त्री रोग तज्ञाची पदवी संपादन केली. शाळा सुरु केली तेंव्हा या भागातील एकही आदिवासी ४ थी शिकला नव्हता. आज आमची शाळा बालवाडी ते १२ पर्यंत आहे. आसपासच्या ५०-६० किलोमीटर परिसरातील सुमारे १०० गावातील ४०० मुलं आणि २५० मुली या शाळेत शिक्षण घेताहेत. मुला - मुलींना
राहण्याची स्वतंत्र नीट व्यवस्था करण्यात आली आहे. जेवणासाठी स्वतंत्र मेस आहे. मुलांसाठी मोठे क्रीडा मैदान तयार केले आहे. ४०० मीटर ची धावपट्टी तयार केली आहे. खेळात ही मुलं अतिशय तरबेज आहेत. शिकविण्याकरिता प्रशिक्षक नसूनही ही मुलं सर्व धावण्याच्या स्पर्धा, भाला फेक, गोळा फेक, लांब उडी व उंच उडी या खेळात नेहमीच शाळेचे नाव राज्य स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर गाजवितात. या शाळेत शिकून ६ मुलं डॉक्टर झालीत, वकील झालीत, इंजिनिअर झालीत. अनेक मुलं शिक्षक झालीत. अनेक मुलं पोलीस खात्यात व वन खात्यात नोकरी करताहेत.
शालेय शिक्षणा बरोबर शेतीचे प्रशिक्षण, बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण, बेकरी प्रशिक्षण आणि डेअरी प्रशिक्षण आदिवासी मुलांना दिले जाते. शरीराला व मनाला शिस्त लागावी या करिता रोज पाहते भूपाळी आणि संध्याकाळी मुलांची प्रार्थना घेतली जाते. श्रमाची किंमत कळावी या करिता रोज सकाळी एक तास श्रमदान करवून घेतले जाते. शाळेचा परिसर मुलंच स्वच्छ करतात. शाळेतील निवास्थानाच्या सांडपाण्याचा वापर करून मुलांकडूनच फळबाग लागवड केली आहे. त्याची देखरेख पण मुलंच करतात. वर्षानुवर्षे शिकार करून जंगलावर उपजीविका करणारी ही आदिवासी मुलं इथे शाळे मध्ये झाडे जगविण्याची कामे करतात. आमच्या प्रकल्पातील वन्यप्राणी अनाथालयातील प्राण्यांना खाऊ घालतात. त्यामुळे जंगलाबद्दल आणि प्राण्यांबद्दल त्यांना आपोआपच प्रेम निर्माण होत. पुढे जाऊन ही मुलं शिकारी कडे व जंगल तोडी कडे वळत नाहीत. दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी ही मुलं वृक्ष दिंडी काढतात. गावागावातील लोकांना झाडाचे - जंगलाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करतात. त्याच दिवशी वृक्षारोपण पण करतात. आणि लावलेल्या वृक्षाचे संवर्धन पण करतात.
परिस्थिती प्रमाणे काम करायचे ठरविले होते. आदिवासींच्या कलेनेच काम करायचे. त्यांच्यावर कुठलेही निर्बंध घालून कुठलेच काम नीट झाले नसते. कारण त्यांनी शिकावे ही पण गरज आमचीच होती आणि अजूनही आहे.
अनिकेत आमटे
संचालक
लोक बिरादरी आश्रमशाळा,
मु. हेमलकसा,
पोस्ट-तालुका. भामरागड,
जिल्हा. गडचिरोली- ४४२ ७१०.
मो. ९४२३२०८८०२
ईमेल - aniketamte@gmail.com
वेबसाईट - www.lbphemalkasa.org.in & www.lokbiradariprakalp.org
प्रतिक्रिया
23 Oct 2011 - 6:00 pm | बहुगुणी
प्रकल्पामधील मुले घरी पळून गेल्यानंतर कार्यकर्ते त्यांच्यामागे, रस्ते नसतांना, २०-३० किलोमीटर चालत जायचे!! कसली पराकोटीची निष्ठा! आपणही (आर्थिकच नव्हे तर) थोडी शारिरीक तोशीस सोसून या (तुम्ही म्हणता तसं आपल्याच गरजेच्या) कामात मदत का करू नये असा विचार बळावला आहे. लोक बिरादरी प्रकल्पाच्या सर्व कार्यकर्त्यांपुढे मी नतमस्तक तर आहेच, त्या सर्वांचा ऋणीदेखील आहे.
लेखमाला चालूच ठेवा, पण प्रकल्पाला सध्य स्थितीतल्या अडचणींवर मात करून नेमक्या कुठल्या विभागात लोकसहकार्याची (मदतीची म्हणत नाही) आवश्यकता आहे, तेही लिहा ही विनंती.
23 Oct 2011 - 7:31 pm | विलासराव
+१०००.
आपणही (आर्थिकच नव्हे तर) थोडी शारिरीक तोशीस सोसून या (तुम्ही म्हणता तसं आपल्याच गरजेच्या) कामात मदत का करू नये असा विचार बळावला आहे. लोक बिरादरी प्रकल्पाच्या सर्व कार्यकर्त्यांपुढे मी नतमस्तक तर आहेच, त्या सर्वांचा ऋणीदेखील आहे.
सहमत.
24 Oct 2011 - 11:34 am | मदनबाण
अद्भुत कार्य आणि महान वसा.
24 Oct 2011 - 1:23 pm | मैत्र
श्रामोंच्या नोंदी वाचून लगेचच हा लेख वाचला ..
१८० अंश विरुद्ध अनुभव असा जो वाक्प्रचार आहे त्याचे प्रत्यंतर आले.
प्रचंड, अगदी कल्पनेच्या पलिकडचा भ्रष्टाचार आणि हजारो / लाखो सामान्य लोकांच्या हक्काचे थोडे थोडे पैसे, जमिनी, फायदे लुबाडून एकदम कोट्यावधी रुपये आणि मालमत्ता गोळा करणारे लोक डझनाने शेकड्याने दिसत असताना,
आपल्या साध्या सोयीसुद्धा बाजूला ठेवून, आर्थिकच नव्हे तर शारिरीक कष्ट सोसून कुठल्याही विशिष्ट फायद्याची अपेक्षा न करता आयुष्यभर, शक्य तितक्या लोकांना जे फक्त गरीबच नव्हेत तर आदिवासी म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहाशी फारसा कसलाही संपर्क नसलेले असे आहेत, त्यांना मुलभूत मदत करणारे हे सर्व कार्यकर्ते आणि अर्थात आमटे कुटुंबिय यांचे अस्तित्वच माणुसकीवर उडत चाललेला विश्वास पुन:प्रस्थापित करणारं आहे.
सुनिताबाईंच्या पुस्तकात (चुभू देघे) वाचलं आहे की श्वाईटझरने म्हटलं आहे की जगात सुमारे दहा हजार लोक आहेत जे स्वार्थाशिवाय दुसर्यांसाठी काम करत राहतात त्यांच्या निर्हेतुक श्रद्धेवर, विश्वासावर आणि कर्तव्याजन्य पुण्यावर जगाचा गाडा चालू राहतो. या श्वाईटझरच्या दहा हजार लोकांमध्ये आमटे कुटुंबिय आणि त्यांचे सहकारी यांचा समावेश नक्की आहे.
खेड्यांत, लहान गावात, जंगलात राहणार्या लोकांच्या आयुष्यातल्या अडचणी,कष्ट यांची आमच्या सारख्या शहरी सरळ ठराविक पद्धतीने जगणार्या जनतेला काहीही कल्पना नसते. ज्या गोष्टी अतिशय गृहीत धरलेल्या असतात त्या अशा ठिकाणी अस्तित्वातही नसतात. त्यापेक्षाही किमान जगण्याच्या पातळीवरची धडपड अजून फार मोठ्या समुदायाला करावी लागते ही खरं तर आम्हाला जाणीव नाहीये आणि रोजच्या धावपळीत आणि आनंद दु:खात ते विसरणंही सहज आहे. खूप वर्षांपूर्वी मी एका अशाच संदर्भात "स्वार्थी उदासीनता" असा शब्द वापरला होता तो आठवला.
आमटेंच्या लेखांमुळे या जाणिवा निर्माण होतील आणि हळू हळू का होईना वृत्ती बदलेल अशी आशा.
मदत करण्यासाठी आणि करण्याजोगं खूप काही आहे .. आयुष्य पुरे पडणार नाही इतकं आणि आपणही थोडा हातभार लावावा असं वाटायला लावणं .. याहून चांगली दिवाळीची भेट नसावीच.. अनिकेत आमटे यांचे या भेटीबद्दल मनापासून आभार. तुमच्या कामाला खूप शुभेच्छा ....
27 Oct 2011 - 2:13 pm | वाहीदा
आमच्या अम्मी ने ही काही झोपडपट्टीतील मुलांसाठी अशीच कामे केली होती.
पण अम्मींनंतर Frankly speaking माझ्यातरी हि कामे करण्याची हिंमत नाही. कारण अम्मी सांगत असे
विद्यार्थ्यांचे पालकच आमच्या आईला "हमारा बेटा कामपर जायेगा तो रोजकी रोटी तो नसीब होंगी और हमें लडकियोंको पढाना नहीं है, पराये घर जायेगी, खाना पकाना जान लेगी बस हो गया हमारे लिए, वैसेभी पढलिख कर किसका भला हुवा है ? " असे प्रश्न विचारायचे.
तरिही अम्मीने बर्याच जणांचे मन शिक्षणाकडे वळविले होते पण मलातरी अश्या लोकांना अन त्यांच्या समस्यांना Face करणे खुप कठिण जाणविते.
आता भले यातील काही लोक्स आमच्या मरहुम अम्मीचा शुक्रिया अदा करो पण त्यावेळी त्यांना समजाविणे महामुश्किलीचे काम होते.
तुम्ही अंधारात लावलेली ही न्यान पणती अशीच तेवत रहावी हिच परमेश्वराकडे प्रार्थना कारण हा वसा पुढे नेण्यासाठी खुप हिंमत लागते, मदत मात्र आम्ही नक्कीच करु !