अल्बर्ट स्पीअर – हिटलरचा वास्तूविशारद !
त्या काळातील जर्मनीत हिटलरनंतर सगळ्यात शक्तीमान असलेला हा गृहस्थ हा त्याचा खाजगी वास्तूविशारद होता. हिटलरच्या सान्निध्यात राहून त्याचा उत्कर्ष युद्धसामग्री मंत्र्यापर्यंत झाला खरा, पण त्याहुनही महत्वाचे म्हणजे तो हिटलरचा एक जवळचा मित्र झाला आणि एक काळ असा होता की त्याच्यावाचून हिटलरचे पानही हालत नसे. स्पीअरने नंतर बर्याच मुलाखती दिल्या त्यावर आधारीत हा एक लेख. बर्याच वर्षानंतर त्याने “इन्साइड थर्ड राईश” असे आत्मचरित्रही लिहिले आणि तेही चांगलेच गाजले. त्यातलीही काही माहिती याच्यात आहेच.
न्युरेंबर्गमधे जो युद्ध गुन्हेगारांवर दोस्त राष्टांनी खटला चालवला त्यात अल्बर्ट स्पिअरवर ही खटला चालवला गेला. सगळ्या गुन्हेगारांनी दोस्तराष्ट्रांचा तो आधिकार नाकारला किंवा सगळे आरोप नाकारले. अपवाद होता फक्त अल्बर्ट स्पिअरचा . त्याच्यावर आरोप होते, जर्मनीमधील कारखान्यात कैदी सैनिकांना आणि इतर देशातील नागरिकांना गुलाम म्हणून वापरून उत्पादनाचे काम करून घेतले हा. बाकी सर्वांना गुन्ह्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा सुनवण्यात आली पण अल्बर्ट स्पिअरला मात्र या गुन्ह्यासाठी तुलनेने कमी शिक्षा झाली व यासाठी त्याला सुरवातीला टिकेचे धनीही व्हायला लागले. बर्लीनच्या स्पनडाऊ तुरुंगात २० वर्षे तुरूंगवास भोगून तो १९६६ साली सुटला त्यावेळी त्याचे वय असेल साधारणत: ६६. डोळ्यात भरणारे व्यक्तिमत्व, करड्यारंगाकडे झुकलेले केस, दाट पण अजूनही काळ्या भुवया आणि या वयातही, एवढ्या तुरुंगवासानंतरही उत्तम शरीरयष्टी, असे त्याचे त्या वेळेचे वर्णन आहे.
सहाजिकच आहे. हिटलरच्या वर्तुळातील सगळ्यात देखणे व्यक्तिमत्व अशी त्याची ख्याती होती आणि एवढेच नाही तर त्या काळात सगळ्यात बुद्धिमान आणि विवेकी अधिकारी म्हणून तो सर्वमान्य होता.
जेम्स डॉनेल त्याच्या हायडलबर्ग येथील घरी त्याच्या मुलाखतीला गेला, तेव्हा त्याच्या टेबलावर त्याच्या आत्मचरित्राची हस्तलिखीते पडली होती आणि त्याच्या खुर्चीच्या मागे भिंतीवर सेपीया रंगातील प्राशश्ट्रासचे एक मोठे चित्र लटकवले होते. हिटलरच्या सविस्तर सुचनेबरहुकूम अल्बर्ट स्पिअरने या नवीन राजधानीचे आरेखन केले होते. याचा खर्च अवाढव्य होता आणि जर्मनी आता जर्मनी न रहात एक साम्राज्य होणार असल्यामुळे त्याचे नाव जर्मानिया असे ठेवण्यात येणार होते. अशी वसाहत आख्या युरोपमधे नसणार होती आणि इतरांची छाती दडपून जाईल असे त्याचे वैभव ठायी ठायी दिसणार होते. त्या चित्राकडे बघत अल्बर्ट स्पिअर म्हणाला “ ते चित्र मी मुद्दामहून जपून ठेवले आहे. टोकाच्या दुराभिमानाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे ते ! नुसत्या हिटलरच्याच नाही. तर माझ्यासुद्धा. मी पण त्यानेच झपाटलेला होतो. मीच तो आराखडा तयार केला ना ! त्या आराखाड्यात माझा दुराभिमान प्रत्येक रेषेत डोकावतो आहे. आता मी तसा आहे का ? खरंच माहीत नाही”.
कसे असणार होते जर्मानिया ? थोडे विषयांतर करून हे बघूयात आणि परत आपल्या वास्तूविशारदाकडे वळू.
आधीच म्हटल्याप्रमाणे जर्मन साम्राज्याची बर्लिन ही राजधानी असल्यामुळे आणि या साम्राज्यात जवळजवळ सगळे जगच सामील असल्यामुळे त्याचे नाव हिटलरने ठेवले होते - जगाची राजधानी – "जर्मानीया".
या योजनेअंतर्गत काही रस्ते रुंद करण्याचे काम सुरूही झाले होते आणि आजही ते रस्ते दिसतात - भले मोठे रुंद. दुर्दैवाने युद्ध सुरू झाल्यामुळे या कामाला खीळ बसली नाहीतर एक भव्य शहर जन्माला आले असते हे निश्चित. या योजनेत पहिल्यांदा बांधण्यात आले ते १९३६ सालात भरणार्या ऑलिंपिक्स साठी मोठे स्टेडियम. हे स्टेडियम बघून, येणार्या प्रेक्षकांना जर्मनीची ताकद ओळखता येऊ दे असे हिटलरचे म्हणणे होते. अजून चॅन्सेलरीसाठी नवीन इमारत बांधण्यात आली ज्यात भले मोठ्ठे सभागृह होते. हिटलरने त्याला अजून एक चॅन्सेलरी बांधायला सांगितली होती पण त्या कामाची काही सुअरवात झाली नाही. ही जी दुसरी बांधण्यात आली होती ती १९४५ साली सोव्हिएट लष्कराने पूर्ण नष्ट केली. या व्यतरिक्त ज्या इमारती व रस्ते यांचे आरेखन करण्यात आले होते त्यातील कुठलीही इमारत वा रस्ते दुर्दैवाने उभे राहू शकले नाहीत. नवीन बर्लीन एका नव्या रस्त्याच्या भोवती बांधण्यात येणार होते आणि हा रस्ता सुमारे ५ मैल लांबीचा आणि त्यावर कुठलीही वाहने आणण्यास बंदी असणार होती. सर्व वाहतूक या रस्त्याच्या खालून जे मोठ्ठे बोगदे बांधण्यात आले होते त्यातून वळवण्यात येणार होती. या रस्त्यावर दर १ मे ला एका वेळी १० लाख कामगार कवायत करतील असा हा ४०० फूट रूंद रस्ता छाती दडपणारा होता. हे जे बोगद केले होते त्यात आता भरपूर पाणी साठले आहे आणि ते अजूनही बघता येतात. या रस्त्याच्या एका टोकाला अल्बर्ट स्पिअरने एका अवाढव्य घुमटाकार इमारतीची योजना केली होती. वरील चित्रात तो आपल्याला सहज दिसेल. याचे नाव होते “फोक्सहॉल” – जनतेचे सभागृह. जगातील सगळ्यात मोठी बंदीस्त जागा असे त्याचे भविष्यात वर्णन होणार होते. या इमारतीसाठी जागा ताब्यात घेऊन आराखडे इंजिनिअर्सना देण्यात आले होते. ७०० फूट उंच आणि ८०० फूट व्यास असे त्याचा आकार होता. वरचा घूमट तांब्याचा असून सेंट पीटरच्या घूमटापेक्षा १६ पट मोठ्ठा असणार होता. त्याची माणसे बसण्याची क्षमता होती १८०,००० फक्त ! या घूमटालाही उंचित लाजवेल असा एक स्तंभ आणि त्यावर स्वस्तिकावर पंख
पसरलेल्या गरूडाची मुर्ती बघणार्या लोकांच्या टोप्या पाडणार होती.
अल्बर्ट स्पिअरने एका आठवणीत सांगितले की हिटलरच्या निवासस्थानापासून या रस्त्यावर येण्यासाठी एक खास खाजगी रस्ता होता. कधीतरी संध्याकाळी तो मोटारीने या रस्त्यावर यायचा आणि आपलि स्वप्ने रंगवायचा. एक दिवस अशाच संध्याकाळी त्याने त्या स्वस्तिकाकडे बोट दाखवून म्हटले “ हे स्वस्तिक आता आपल्या उपयोगाचे नाही. याची जागा पृथ्वीने घेतली पाहिजे.”
अल्बर्ट स्पीअरने तत्परतेन ते स्वस्तिक काढून त्याजागी एका पृथ्वीगोलाची स्थापना केली.
याच रस्त्यावर विरूद्ध दिशेला असणार होती एक कमान. ही फ्रान्सच्या आर्क दी ट्रायंफच्या धर्तीवर उभारण्यात येणार होती अर्थात मुळ इमारत याची पिल्लू दिसेल अशी काळजी घेतली गेली होतीच.
यातून दुसर्या टोकाचा घूमट असा दिसणार होता.
हे सगळे काम होत असताना हिटलरचे रशियाशी युद्ध चालू होते. ते संपल्यावर नवीन जर्मानियामधे एक मोठ्ठे औद्योगिक प्रदर्शन भरवून तो निवृत्त होणार होता असे अल्बर्ट स्पिअरने एका ठिकाणी म्हटले आहे.
जी काही ड्रॉइंग्स आता मिळालेली आहेत त्यावरून सध्याच्या तज्ञांचे असे म्हणणे आहे की हे बांधकाम संपायला १९६४ साल उजाडले असते आणि ते संपल्याबरोबर त्याचा नाशही सुरू झाला असता कारण बर्लिनची जमीन ही दलदलीत आहे आणि या संगमरवराच्या वजनाने त्या इमारती त्या दलदलीत फसत गेल्या असत्या. खरे खोटे ते तज्ञ व अल्बर्ट स्पिअरच जाणोत.
अशा या वास्तूविशारदाचा जन्म एका दक्षिण जर्मनीतील सूखवस्तू वास्तूविशारदाच्या पोटी झाला. राजकिय उलथापालथ, अस्थिरता असणार्या काळात म्हणजे साधारणत: १९२५ मधे त्याने हायडलबर्ग सोडून बर्लीनसाठी प्रस्थान ठेवले. (त्याच्या बालपणाबद्दल जास्त लिहायला नको कारण मग ही लेखमालिका फार मोठी होईल) सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे तो बर्लिन टेक्निकल विद्यापिठात अध्यापकाची नोकरी करत असताना त्याच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली. राजकारणात विशेष रस नसणार्या अल्बर्ट स्पिअरला त्याचे मित्र एकदा हिटलरचे भाषण ऐकायला घेऊन गेले..........
क्रमश:
छायाचित्रे इंटरनेटवरून व त्याच्या आत्मचरित्रातून साभार.
जयंत कुलकर्णी.
स्पिअर संपल्यावर हाईंन्झ गुडेरियन.
प्रतिक्रिया
29 Jul 2011 - 1:52 pm | मदनबाण
वाचतोय...
29 Jul 2011 - 1:59 pm | यकु
ही मेजवानी आवडली !!
वाट पाहातोय!
29 Jul 2011 - 2:07 pm | सहज
अल्बर्ट स्पीअर च्या मराठी विकीपेज वर हे डकवून द्या.
स्पीअरची अजुन काही डिझाईन्स ह्या दुव्यावर
29 Jul 2011 - 2:17 pm | सुमो
असेच म्हणतो.
पुढील भागाची वाट पहात आहे.
@ सहज,
खूप छान दुवा.
29 Jul 2011 - 2:23 pm | स्वाती दिनेश
माहितीपूर्ण लेखमाला,हाइन्स्झ गुडेरियन ची वाट पाहत आहे.
स्वाती
29 Jul 2011 - 2:32 pm | प्रास
झकास!
ही लेखमालाही वाचनीय होणार याचा तत्काळ अंदाज आलाय.
जरासं अधिक विस्तृत लिहिता आलं तर बघा की....
नेहमीसारखंच पुलेप्र आहेच!
29 Jul 2011 - 2:44 pm | जयंत कुलकर्णी
बरेच विस्तृत लिहिणार आहे. :-) वाचा म्हणजे झाले !
29 Jul 2011 - 2:46 pm | प्रास
आमी तर तुमचे नि तुमच्या लेखणाचे फ्याण आहोत हे इतक्यात कस्काय इसरलात? ;-)
29 Jul 2011 - 3:07 pm | जयंत कुलकर्णी
हो ते ठीक आहे पण मधेच सगळे गायब होतात मग आपण अंधारात शब्द फेकतोय की काय असे वाटायला लागते त्याचे काय ?
:-)
29 Jul 2011 - 3:42 pm | मृत्युन्जय
साधारण क्रमशः असेल तर लोक पहिल्या १-२ भागात आणि शेवटच्या भागात मनातले प्रतिसाद देतात. एरवी नुसतेच "वाचतोय", छान, उत्तम, मोठे भाग टाका, परिच्छेद करा असले प्रतिसाद येत राहतात. जे देत नाहीत ते ही अर्थात वाचत असतात पण प्रतिक्रिया शेवटच्या भागासाठी राखुन ठेवतात.
बाकी त्या प्रासाशी सहमत. आम्ही देखील तुमच्या लिखाणाचे फ्यान आहोत.
29 Jul 2011 - 3:46 pm | प्रास
मधे मधे प्रतिसादकर गायब झाले तरी वाचन-संख्येवरून कळतंच ना की लोक (पक्षी:आम्ही ;-)) वाचतायत.....
तुम्ही लिहा(च) आणि आम्ही वाचू(च).
काळजी नसावी.
फ्याण :-)
10 May 2017 - 6:07 pm | मी-सौरभ
- काकांचा स्वघोषित पुतण्या
29 Jul 2011 - 2:53 pm | स्पा
छान माहिती
29 Jul 2011 - 3:19 pm | परिकथेतील राजकुमार
उत्तम परिचय.
शक्य झाल्यास ही चित्रे पिकासा किंवा इतर तत्सम संस्थळावर चढवुन मग इथे द्याल का ? चित्रांच्या मूळ संस्थळामुळे धागा उघडायला प्रचंड वेळ लागत आहे.
29 Jul 2011 - 4:34 pm | सुत्रधार
असेच लिहिते रहा
29 Jul 2011 - 4:47 pm | आत्मशून्य
.
29 Jul 2011 - 5:09 pm | इरसाल
तुमचे लेख वाचताना एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती येते. अगदी त्याकाळात असल्यासारखे वाटते.
29 Jul 2011 - 5:52 pm | पल्लवी
हिटलरचा द्वेष करणारी जितकी आहेत तितकीच त्याला मानणारी देखिल.
आवडो अथवा न आवडो, पण हिटलर आणि त्याच्याशी संबंधित माणसांबद्द्ल प्रचंड उत्सुकता नेहेमीच वाटत आली आहे.
परिचय , आराखड्याचे फोटो आणि वर्णन - आवडले.
पुढचा भाग कधी ?
29 Jul 2011 - 6:38 pm | आचारी
अतिशय उत्तम लेख !!
29 Jul 2011 - 7:05 pm | मनराव
उत्तम.........
>>>अल्बर्ट स्पिअरला त्याचे मित्र एकदा हिटलरचे भाषण ऐकायला घेऊन गेले..........<<<
पहिल्या भागाचा एंड एकदम पर्फेक्ट............आवडला आपल्याला.......
29 Jul 2011 - 10:01 pm | अर्धवटराव
वाचतोय !!
तुमचे लेख म्हणाजे पर्वणीच !!
अर्धवटराव
29 Jul 2011 - 10:30 pm | आनंदयात्री
हेच म्हणतो. ही लेखमालाही उत्तम होणार यात शंका नाही. पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे.
29 Jul 2011 - 11:30 pm | शिल्पा ब
छान. तुमचे लेख आवडतात. पुढचे भागही चटापट येउ द्या.
30 Jul 2011 - 1:40 am | प्राजु
वाह! मस्त लेखमाला होईल ही.
वेगळाच विषय... ! मस्त!
30 Jul 2011 - 2:44 am | धनंजय
रोचक माहिती.
30 Jul 2011 - 1:10 pm | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
10 May 2017 - 4:52 pm | नया है वह
लेखमालाही वाचनीय
12 May 2017 - 12:04 pm | नया है वह
कधी?